Tuesday 29 October 2013


Botham Fready Patil hails from our Lady of Lourdes, Uttan Palli. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province, Maharashtra. Presently, he is pursuing his theological studies at JDV, Pune. Having gifted with literary qualities, he has authored numerous articles, poems, and stories. This homily presents his journey into biblical planet to unearth the hidden Gospel values.





सामान्यकाळातील तीसावा रविवार
वर्ष-क
शलमोनाचा  ज्ञानग्रंथ, ११: २२-१२:.
थेस्सलनीकाकरांस पत्र, : ११ - :.
लूक१९:१-१०.   
''आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे.''
प्रस्तावना:
परमेश्वर दयाळू आहे, तो पाप्यांवर तसेच संतावर सारखेच प्रेम करतो. मनुष्याच्या प्रत्येक कृतीला स्वत:च्या फायदयासाठी कशाची तरी जोड असते परंतू देवाला नाही. तो कोणतीही अट ठेवत नाही; कारण हे विश्व त्याचे आहे, जगातील प्रत्येक व्यक्ती, गोष्ट, प्रत्येक कण-कण त्याचा आहे. जरी कोणी त्याच्या इच्छेविरूद्ध गेला तरी तो त्यांना शिक्षा न करता परिवर्तनासाठी पाचारण करतो, त्यांना त्यांच्या नावाने हाक देऊन स्वत:जवळ बोलावतो कारण सर्वच त्याची लेकरे आहेत. आजची उपासना आपणाला परमेश्वराच्या अधिक जवळ येण्यास बोलावत आहे. म्हणूनच आपण योग्य त्या मार्गावर चालून चुकीच्या मार्गाला अंतरण्यासाठी ह्या पवित्र मिस्साबलिदानाद्वारे प्रभू येशू कडे प्रार्थुया.

पहिले वाचन ( शलमोनाचा  ज्ञानग्रंथ, ११: २२-१२:)
परमेश्वराला हे संपूर्ण विश्व एका धुळीकणासारखे असले तरी तो ह्या संपूर्ण विश्वावर त्याने उत्पन्न केलेल्या प्रत्येक वस्तूवर  निस्सीम प्रेम करतो; त्याची जोपासना करतो   मानवाने केलेल्या प्रत्येक पापाची क्षमा करतो. त्याच्या प्रेमाला सीमा नाही. मानव एकमेकांना क्षमा करतो परंतु  त्याच्या क्षमेला मर्यादा आहे. परमेश्वराच्या  क्षमेला कुठलीच मर्यादा नाही असे पहिले वाचन आपणाला सांगत आहे.

दुसरे वाचन ( थेस्सलनीकाकरांस पत्र, : ११ - :)
काहीजण प्रभू येशूच्या पुनरागमनाची खोटी-नाटी घोषणा करून इतरांना भांबावून सोडत होते; म्हणून संत  पौल ह्या पत्रामध्ये थेस्सलनीकाकरांस पाठबळ देत आहे आणि तो त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे ह्याची शाश्वती  देत आहे. प्रभूचा दिवस जवळ आला आहे, अशी खोटी सुवार्ता जे पसरवत होते, त्यांना घाबरून जाता परमेश्वराने दिलेल्या पाचारणाला योग्य मानून विश्वासाने जीवन जगण्यास संत पौल आवाहन करत आहे.

शुभवर्तमान (लूक१९:१-१०)
सम्यक विवरण:
आजच्या शुभवर्तमानामध्ये पापी जकातदार जक्कय ह्याचा उतारा दिलेला आहे. चारही शुभवर्तमाने पडताळून पाहिली तर कळून येते की हा उतारा केवळ लूकच्या शुभवर्तमानामध्येच आढळून येतो. लूकच्या शुभवर्तमानामात येशू आपल्या सुवार्ताकार्यात श्रीमंत लोकांविषयी बहुतेक नकारात्मक व त्यांच्या तारणाच्या बाबतीत धोक्याचे व कडक इशारे देतो; उदाहरणार्थ:''तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार?'' (६:२४) ''सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर रहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्यांचे जीवन होते असे नाही.'' (१२:१५) ''ज्यांच्याजवळ धन आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.'' (१८:२४-२५)
लूकच्या वृत्तांतानुसार जक्कयच्या बाबतीतील कथानकाच्या अगोदर येशूने प्रत्यक्ष कृतीने समाजातील उपेक्षित, गरिब, पापी, जकातदार, स्त्रिया, रोगग्रस्त इत्यांदीसाठी आपले प्रेम व दया दाखविली होती पण श्रीमंतांसाठी फक्त शिकवण दिली होती, धोक्याचे इशारे दिले होते, प्रत्यक्ष कृतीने त्यांच्यासाठी आपले प्रेम व दया दाखवली नव्हती. परंतू १९:१-१० या उता-यामध्ये येशू जक्कय या पापी मुख्य जकातदार व श्रीमंत माणसासाठीही खास आस्था व प्रेम दाखवतो.
जक्कय: जक्कय हे नाव दोन वेळेस जुन्या करारात आढळून येते (एज्रा, २:९, नहेम्या, ७:१४) ''जक्काई'' ह्या नावाचा अर्थ ''नितीमान व्यक्ती'' असा होतो. परंतू ह्या नावाव्यतिरिक्त ह्या माणसाविषयी जास्त माहिती नाही.
मुख्य जकातदार: येशू यरीहोतून येरूशलेमकडे जात होता. त्याकाळी यरीहोत हे जकात जमा करण्याचे महत्वाचे ठिकाण होते. कारण तेथून शेतकरी व दुसरे व्यापारी आपल्या मालाची ने-आण पूर्वेकडून-पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून-पूर्वेकडे करत व जेव्हा ही ने-आण होत असे तेव्हा त्यांना त्या मालाचा जकात भरावा लागे. हा जमा केलेला जकात रोमी अधिका-यांना दयावा लागे परंतू ते स्वत:हून तिकडे बसत नसत तर यहुदयापैकीच काहींची नेमणूक करून हा जकात जमा करत असत अशा ह्या काही जणांच्या नेमणूकीमध्ये जक्कय हा प्रमुख जकातदार होता.
तो पापी परंतू श्रीमंत जकातदार होता: जे लोक जकात जमा करत त्यांना यहुदी पापी व तुच्छ म्हणत कारण ते स्वत:च्या लोकांकडूनच पैसे जमा करत व परकियांना (Gentiles) देत असत. (लूक, १८:९) ह्या जकातदारांचा परकियांबरोबर सबंध येत असे. ह्याच कारणास्तव धार्मिक रितीरिवाजानुसार ते अपवित्र होते, म्हणून परूशामार्फत त्यांना अनिष्ट किंवा अयोग्य ह्या प्रकारात गणले जाई (मत्तय, ९:११, ११:१९; लूक, १५:१). ते परकियांसाठी काम करीत. यहुदयासाठी हे जकातदार काफीर (विश्वासघातकी) होते. कारण ते स्वत:च्याच लोकांना लुबाडत असत. रोमी अधिकारी ह्या जकातदारांकडून काम करवून घेत. पण त्यांना त्यांचा मोबदला देत नसत म्हणून हे जकातदार अपेक्षेपेक्षा जास्त कर लोकांकडून घेत असत व जे वरचे पैसे ते जमा करत ते स्वत:साठी ठेवून घेत आणि ह्याच पैशाने ते श्रीमंत होत असत.
त्याला येशूला पाहण्याची फार इच्छा होती: जक्कयला येशूला का पहायचे होते ह्याविषयी ह्या उता-यात काहीच सांगण्यात आले नाही, पण त्याला हेरोदाप्रमाणे (९:९, २३:३) कुतुहुलता म्हणून नक्कीच येशूला पाहण्याची इच्छा नव्हती किंवा येशू चमत्कार कसे करतो किंवा कुठली चिन्हे देतो हे देखील अनुभवायाची त्याची इच्छा नसावी (११:१६,२९) अध्याय १९:९ सांगतो की जक्कय तारण प्राप्तीसाठी येशूचा शोध घेत होता. कारण त्याच्याकडे पैसा , धनदौलत होती, परंतू मनाशांती नव्हती. तो एकटेपणा अनुभवत होता व त्याला देवाची उणीव जाणवत होती. म्हणून तो येशूला पाहण्याची धडपड करत होता. परंतू तो शरीराने ठेंगणा असल्याकारणाने, गर्दीमध्ये येशूला पाहू शकत नव्हता. ह्यास्तव ज्या रस्त्याने येशू जाणार होता, त्या रस्त्यावर सर्वांच्या पुढे धावत जाऊन उंबराच्या झाडावर चढतो. त्याकाळी एका श्रीमंत व प्रौढ व्यक्तीची अशी पोकरट कृती यहुदी संस्कृतीत मान्य नव्हती, तरीदेखील जक्कय हे कृत्य करतो. येशूला पाहण्याच्या आतुरतेमुळे जाऊन झाडावर बसतो. जेणेकरून येशू जेव्हा तेथून जाईल, तेव्हा त्याला त्याचे दर्शन होईल.
जक्कय त्वरा करून खाली ये: कोणाच्या मनात सहज प्रश्न उद्‌भवेल की येशूला जक्कयचे नाव कसे ठाऊक होते? येशूच्या अद्‌भुत शक्तीमुळे (योहान, १:४७-४८) की जक्कय शरीराने ठेंगणा व प्रमुख जकातदार असल्यामुळे प्रसिद्ध असावा? परंतू ही नावाची बाब तितकी महत्वाची नाही. येशूला स्विकारण्यासाठी जक्कयची उत्सुकता किंवा तत्परता इतकी होती कि येशू जेव्हा जक्कयला हाक देतो तेव्हा तो त्वरेने खाली उतरून येशूचे आपल्या घरी आनंदाने स्वागत करतो.
मी चौपट परत करीन: निर्गम, २२:१ व २ शमुवेल, १२:६ मध्ये कळते की चोराने केलेल्या चोरीबद्‌दल त्यांना चारपट भरपाई करावी लागे. आणि यहुदी लोक आपल्या वार्षिक कमाईपैकी एक पंचमाश दिलेल्या नियमाप्रमाणे भरत असत (लिवीय, ६:५, गणना, ५:७), परंतू ह्या नियमाच्या कितीतरी जास्त पटीने जक्कय दान करतो. ऐवढेच नाही तर तो ज्याच्याकडून काही घेतले असेल तर तो पुन्हा चौपट देण्याचे येशूला वचन देतो. ही भरपाई जक्कय स्वखुशीने व उत्स्फुर्तपणे करतो. ही भरपाई त्यांच्यावर कोणी बळजबरी केली म्हणून किंवा कोणीतरी त्याच्यावर फिर्याद किंवा तक्रार केली म्हणून करत नाही तर येशूच्या येण्याने त्याचे तारण झाले होते म्हणून करतो. जेव्हा तो म्हणतो की, 'माझे अर्धे द्रव्य गरीबांस देतो.'  तेव्हा तो असे म्हणत नाही की मरण्याअगोदर मी ती मृत्यूपत्रात लिहून देईल, 'तर ती मी आत्ताच देईन असे स्पष्ट करतो.' ह्या कृत्याने तो दाखवतो की, तो आता 'जुना जक्कय' नव्हता तर पूर्णपणे आत्मपरिवर्तन झालेला नवीन व्यक्ती होता. स्वर्गराज्यात प्रवेश मिळवण्यासाठी जी येशूची आज्ञा होती, 'तुझ्याकडे जे असेल नसेल ते गोरगरिबांत वाटून टाक.' (लूक, १८:२२), ती आज्ञा त्याने पूर्ण केली होती.
आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे: श्रीमंत पापी लोकही 'हरवलेल्यांमध्ये' जमा आहेत. त्यांचाही शोध करून, त्याचे तारण करावयास दैवी योजनेनुसार येशू आला आहे. समाजातील उपेक्षित किंवा तुच्छ लेखले जाणारे लोकच नव्हेत तर श्रीमंत लोकही आब्राहामाचे पुत्र आहेत व देवाच्या येशूमधील तारणाचे वाटेकरी व्हावेत अशी देवाची योजना आहे, आणि ती पूर्ण करण्यासाठीच मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे (१९:१०). ह्या कृत्याने देवाने पूर्वजांना दिलेल्या वचनाची पूर्तताही झाली (लूक, १:५४,७३). परंतू ही पूर्तता जक्कय आब्राहामाच्या वंशामध्ये जन्माला होता म्हणून झाली नाही तर त्याच्या हृदय परिवर्तनामुळे झाली.

बोध-कथा:
१. एक साधु जंगलामध्ये बसून देवाचे नाम जप करत असे आणि कित्येक वर्षे उलटण्यानंतर त्याला प्रभूप्राप्ती झाली. त्याला चमत्कार करण्याची शक्ती प्राप्त झाली. आणि ही शक्ती तो लोकांच्या उद्‌धारासाठी वापरत असे. एके दिवशी हे जेव्हा एका उंदराने ऐकले, तेव्हा तो येऊन साधुला म्हणाला, ''शेजारची एक मांजर माझा नेहमीच पाठलाग करते, मला तिची भिती वाटते, कारण कोणास ठाऊक मला कधी ती पकडून मारून टाकेल; म्हणून तुझ्या दिव्य शक्तीने मला तू मांजर बनव.'' साधु हसून ''तथास्तु'' म्हणाला. काही दिवस लोटल्यानंतर मांजर झालेला उंदीर पुन्हा साधूकडे परत आला आणि म्हणाला, ''तो शेजारचा कुत्रा सारखा-सारखा माझ्या पाठीमागे लागतो, कोण जाणे कधी तो माझा फडशा पाडेल मला तू तुझ्या शक्तीने कुत्रा बनव.'' हसून साधु पुन्हा ''तथास्तु'' म्हणाला आणि मांजराचा कुत्रा झाला.
काही दिवस गेल्यावर कुत्रा साधुकडे येऊन रडक्या आवाजात म्हणाला, ''मानव कितीतरी पटीने बलवान आहे. मला पुन्हा एकदा उंदीर बनव. मला माझे जूने रूप परत दे.'' तेव्हा साधु हसून म्हणाला, ''रूप बदलल्याने काही होत नाही, तर हृदयाचे परिवर्तन होणे हे अत्यंत जरूरीचे आहे. तू जरी मांजर , कुत्रा असला तरी तुझे हृदय हे उंदराचेच होते, जर स्वत:मध्ये खरा बदल घडवायचा असेल तर हृदयाचा बदल होणे गरजेचे आहे.''
२. एका प्रार्थनासभेत पाच स्त्रिया विशेष साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आल्या होत्या. एका-मागून एक स्त्री आपल्या जीवनात परिवर्तन कसे घडले हे सा-या लोकांसमोर सांगत होते, परंतू पाचापैकी एक स्त्री शांतपणे बसली होती. ती काहीही न बोलता, फक्त एका ठिकाणी बसली होती. तिच्या चेह-यावरून ती थोडी गंभीर दिसत होती. जेव्हा तिला विचारण्यात आले की,''तू का आपली साक्ष देत नाहीस?'' तेव्हा ती उद्‌गारली की, ''ह्या ज्या चार स्त्रिया आहेत त्यांच्याकडे माझे उसणे घेतलेले पैसे आहेत आणि ते पैसे परतफेड करण्याची त्याची क्षमता आहे, तरीही त्या तसे करत नाहीत आणि माझे कुटूंब चालवायला माझ्याकडे आज पैसे नाहीत आणि आम्ही सारेजण भुकेने मरत आहोत, मग ह्यात कुठला बदल किंवा परिवर्तन म्हणाव?''

मनन चिंतन:
येशूला पाहण्याची जक्कयला फार इच्छा होती, परंतू त्याच्यापुढे दोन अडचणी होत्या. एक म्हणजे जमा झालेली गर्दी व दुसरी त्याच्या ठेंगणेपणा. परंतू तो मागे-पुढे न बघता सर्वांच्या पुढे जाऊन झाडावर चढतो. लोक काय बोलतील, कुठल्या समस्येला त्याला सामोरे जावे लागेल ह्याचा विचार न करता तो  येशूच्या दर्शनाची वाट बघतो. आणि येशू जेव्हा त्याला 'जक्कय' ह्या नावाने हाक देऊन खाली बोलावतो व त्याच्या घरी उतरावयास जातो, त्याच घटकेस जक्कयचे परिवर्तन होते. त्याच्या शरीरात कोणताच बदल होत नाही तर त्याच्या हृदयाचे व आत्म्याचे परिवर्तन येशूच्या येण्याने घडून येते.
येशू ख्रिस्त आज आपल्याला देखील आपल्या जीवनावर विचार-विनीमय करावयास बोलावत आहे. काही क्षण आपण आपल्या हृदयात डोकावून पाहुया. आणि स्वत:ला विचारूया की माझी देवाला पाहण्याची धडपड किती आहे? मी परमेश्वराला फक्त चर्चमध्ये शोधत आहे की प्रत्येक व्यक्तीत आणि प्राण्यामध्ये देवाला पाहण्याची माझी क्षमता आहे? जर मी वाईट मार्गावर चालत असेन तर माझे परिवर्तन व्हायला मी कोणते प्रयत्न करत आहे. ज्याप्रमाणे शौलाचा दैवी कृपेने पौल झाला (प्रेषितांची कृत्ये,९:१-९). त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो का?
फक्त शब्दाने परिवर्तनाची कबूली न देता आपल्या हृदयाचे परिवर्तन होणे अति गरजेचे आहे. जर आपले शरीर स्वच्छ असेल पण आत्मा मलिन असेल तर त्याचा स्वर्गराज्यात काय उपयोग? म्हणूनच आपल्या हृदयाचे व आत्म्याचे परिवर्तन कसे घडेल ह्यासाठी प्रयत्न करणे योग्य ठरेल. जेव्हा नवीन दिवस उजाडतो, तेव्हा तो कसा समाप्त होईल, ह्याची जाण कोणालाच नसते. ज्या दिवशी जक्कयला येशूचे दर्शन घडले, तो दिवस त्याच्यासाठी अती महत्वाचा व आनंदाचा होता कारण त्याने देवाच्या पुत्राबरोबर मेजवाणी घेऊन आपले तारण प्राप्त करवून घेतले; कारण येशू ख्रिस्त जे हरवलेले होते त्यांना शोधावयास व तारावयास आला होता. आज देखील तो आपणा प्रत्येकाला शोधत आहे. जेणेकरून आपले तारण होईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद : हे  प्रभो, आम्हाला तुझी दया दाखव
१. सर्व धार्मिक अधिकारी तसेच सर्व लोकांना प्रभूची ओढ लागावी आणि ती ओढ पूर्ण करण्यासाटी त्यांनी आटोकाट परिश्रम करावे व हया परिश्रमात त्यांना प्रभूने यश दयावे म्हणून आपण प्रार्थना करू या .
२. मानव आज आपला मानवधर्म विसरून धन, संपती व प्रसिद्धी ह्यांना आपला धर्म समजत आहे. ज्याप्रमाणे  जक्क्यचे मनपरिवर्तन झाले त्याप्रमाणे आपणा सर्वाना देखील प्रभूचा स्पर्श व्हावा व मानवतेवर आपले प्रेम वाढावे म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करू या .
३. आपल्या  देशामध्ये गरिबी, भ्रष्टाचार, स्त्रीयावर अत्याचार असे प्रकार वाढत आहेत. प्रत्येकाने इतरांच्या  प्रतिष्ठेचे भान ठेवून चांगली वागणूक दाखवावी व कुणालाही कमी न लेखता त्यांचा आदर राखावा व राजकीय पुढा-यानी देशाची निस्वार्थी सेवा करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. जो निसर्ग आपल्या गरजा भागवत आहे, त्याचीच आज आपल्या हातून कत्तल होत आहे. आपण प्रत्येकाने ह्या निसर्गाची काळजी घ्यावी व भावी पिडीला देखील नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरवठा आपल्या हातून घडावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करुया.




Tuesday 22 October 2013



Cajeten Pereira comes from St. Gonsalo Gracia Church, Gass, Vasai. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province of Maharashtra. Known as a good musician and a dressmaker with humble and simple Franciscan nature, his sermons are context based and practical oriented. Presently, he is pursuing his Theological studies in Jnana Deepa Vidyapeeth, Pune.





 सामान्यकाळातील तीसावा रविवार
/११/२०१३.
वर्ष-क
बेनसिरा; ३५;१२-१४,१६-१८.
२ तीमथी; ४:६-८,१६-१८.
लूक, १८:९-१४.

प्रस्तावना:

नम्रता हा सुखी जीवनाचा पाया आहे. नम्रता आपल्याला सद्गुणी बनविते. प्रभू येशूने त्याच्या जीवनात नम्रतेला अन्यसाधारण महत्व दिले. परंतु गर्वाने व अहंकाराने फुगत चालले विश्व आणि स्वभावाने गर्वीष्ठ झालेला मनुष्य मीच श्रेष्ठ, सद्गुणी व उत्कृष्ठ तर दुसरे नीच, पापी व दृष्ट अशी भावना उभारत आहेत. परिणामी जीवनातील शांती, प्रेम, बंधुत्व नाहीसे होत आहे. नम्रता हा आजच्या तिन्ही वाचनाचा बोध आहे. येशू म्हणतो, ''जो कोणी आपणाला उंच करतो, तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवितो तो उंच केला जाईल. नम्र झाल्यानेच सुखी जीवन जगता येईल. नम्रतेने जीवनात शांती, प्रेम, बधुंत्व प्रस्थापित करता येईल.

पहिले वाचन:
बेनसिरा बोधवचने ह्यातून घेतलेले आजचे वाचन विनयशील माणसाच्या प्रार्थनेविषयी बोध देतात. आज जगात नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा नाही तर सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा जगावर हुकूम चालवित आहे. परंतू देव माणसाला त्यांच्या सपंत्तीमुळे श्रेष्ठ ठरवित नाही. प्रभू हा न्यायी न्यायाधीश आहे. नम्र व मनापासून सेवा करणा-याची प्रार्थना प्रभू ऐकतो. न्यायाची व सत्याची उभारणी होईपर्यत विनयशील मनुष्य प्रभूकडे अहोरात्र प्रार्थना करतो. विनयशील माणसाच्या प्रार्थना देवाच्या हृदयाला स्पर्श करून कृपेचा वर्षाव करतात.

दुसरे वाचन:
आजच्या वाचनाद्वारे तीमथ्याने आपला आदर्श व्हावा, हाच पौलाचा उद्देश आहे. शत्रुत्व आणि मृत्यू पौलाला घाबरवू शकत नाही किंवा हृदयहीन करू शकत नाही. तो स्वत:विषयी समाधानी आहे. कारण संत पौल म्हणतो, ''ख्रिस्तासाठी विश्वासाशी मी एकनिष्ठ राहिलो, जरी कठीण प्रसंगात सर्वांनी मला सोडले परंतू प्रभू माझ्या पाठीशी राहिला. प्रभूने मला सिहांच्या जबड्यातून मुक्त केले.'' पौलाचा विश्वास होता की, जर आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू. न्यायाच्या दिवशी नीतिमत्वाचा मुकुट प्रभू आपणाला परिधान करतील. ख्रिस्ती लोकांसाठी मृत्यू अंत नसून सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे.

शुभवर्तमान:
आजच्या शुभवर्तमानात येशू आपणाला परूशी व जकातदार ह्या दाखल्याद्वारे प्रार्थना करताना आपला स्वभाव कसा असावा ह्याविषयी स्पष्टीकरण देतो. देवापुढे प्रार्थनेत आपण गर्विष्ठतेचे नव्हे तर नम्रतेचे रूप अंगीकारले पाहिजे. नम्र माणसाची प्रार्थना परमेश्वर ऐकतो व त्याच्यावर कृपेचा व क्षमेचा वर्षाव करतो. पापी लोकांचे तारण होईल पण गर्विष्ठ लोकांचे कधीच तारण होणार नाही. कारण पापी मनुष्य देवाकडे क्षमेची भीक मागतो पण गर्विष्ठ देवाकडे कधीच क्षमा मागत नाही. उलट तो देवाकडून आभाराची व स्तुतीची अपेक्षा करतो.

बोध कथा:
. नम्र तो महान: दोन तरुणांनी मौज-मजेसाठी बकरी चोरली. परंतू त्यांची चोरी पकडली गेली. शिक्षा म्हणून त्यांच्या कपाळावर ST ह्याचा अर्थ असा Sheep Thief (बकरी चोर) लिहिण्यात आले. त्यातील एक तरूण हा अपमान सोसू शकला नाही. रागाच्या भरात त्याने आत्महत्या केली. कालांतराने लोक त्याला विसरून गेले.  दुस-या तरूणाने मात्र वेगळा मार्ग निवडला. तो स्वत:शी उद्गाराला, ''मी जे काही केले आहे त्यापासून पळू शकत नाही, म्हणून मी इथेच राहून गमावलेला मान व सन्मान परत मिळवेन.'' तो गरिबांची व गरजवंतांची सेवा करू लागला. जशी वर्ष सरू लागली तशी त्याने प्रामाणिकपणाची भक्कम प्रतिष्ठा उभारली. एके दिवशी एका अनोळखी व्यक्तीने त्या तरूणाच्या, जो आता वृध्द झाला होता त्याच्या कपाळावरची ST ही अक्षरे पाहिली. त्याने गावातील एका मनुष्याला त्याचे रहस्य विचारले. तो मनुष्य म्हणाला, ''हे फार वर्षापूर्वी घडले होते, मलासुध्दा आठवत नाही. पण मला वाटते ती अक्षरे संत पदाचे इंग्रजीतील संक्षिप्त रूप आहे.''

. खरी भक्ती: एक महान ऋषी देवाचा फार मोठा भक्त होता. आपली भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे असा त्याचा गैरसमज होता. त्यामुळे तो गर्विष्ठ व अहंकारी बनू लागला. ऋषीला धडा शिकविण्यासाठी देवाने त्याला दर्शन दिले व म्हटले, ''माझ्या भक्ता, तुझा गैरसमज होत आहे. तुझ्याहून माझ्यावर अधिक प्रेम करणारा गंगेच्या तीरावर राहत आहे. त्याच्याकडे जाऊन दोन दिवस राहा म्हणजे तुला ख-या भक्तीचा उलघडा होईल.''
ऋषी गंगेतीरावर जातो. तिथे गरीब शेतकरी राहत होता जो सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करी व आपल्या कामाला जात असे; रात्री झोपेअगोदर तो पुन्हा देवाचे नामस्मरण करी व झोपी जाई. हे पाहून तक्रार करित ऋषी म्हणाला, ''हा शेतकरी देवाचे फक्त दोनदा नाव घेतो, हा कसा काय देवाचा भक्त होऊ शकतो?''
ह्यावर देव ऋषीला म्हणाला, ''ठीक आहे! तू काठोकाठ तेलाने भरलेला हंडा घे व गावप्रर्दक्षिणा कर. पण तेलाचा एक थेंबसुध्दा बाहेर पडता कामा नये.'' देवाने सांगितल्याप्रमाणे ऋषीने केले व देवापुढे हजर झाला. देवाने त्याला विचारले, ''किती वेळा तू माझी आठवण केलीस?'' ''एकदापण नाही'', ऋषी उद्गारला. ''तुम्ही मला तेलाने भरलेल्या हंड्यावर लक्ष केंद्रीत करावयास सागितले; मग मी तुम्हाला कसे स्मरणार?''
तेव्हा देव म्हणाला, ''त्या हंड्याने तुझे लक्ष इतके वेधून घेतले की, तू मला विसरलास. त्या शेतक-याकडे बघ, संसारी जीवनाची ओझे वाहत असताना दिवसातून दोनदा तो माझी आठवण करतो.''

सम्यक् वितरण:
परूशाची प्रार्थना: येशूच्या मनात परूशीविषयी आदरभाव होता कारण ते निवडलेल्या लोकांच्या ख-या विश्वासाचे साक्षीदार होते. परूशी धार्मिक, देवभिरू, सचोटीचे जीवन जगणारे व देवाच्या नियमाविषयी नेहमी चिंतन करणारे असे होते. नियम शास्त्रानुसार आवश्यक ते सर्व करीत असत, उदा. आठवड्यात दोन वेळा उपवास, नियमानुसार प्रार्थना व मिळकतीतील उत्पन्नाचा दशांश देणे (लुक १८:१२).
तथापि, परूशाचे ढोंगीपण येशूला आवडले नाही. परूशी हा परमेश्वराकडे प्रार्थना करण्यास गेला नव्हता तर स्वत:शी प्रार्थना करीत होता. खरी प्रार्थना परमेश्वराला अर्पण केली जाते, स्वत:ला नव्हे. तो प्रार्थना करण्यासाठी प्रमुख मोक्याच्या जागी उभा राहिला. त्याने आपल्या धर्माचरणाबद्दल स्वत:चीच प्रशंसा केली (त्याची सर्व प्रार्थना 'मी', 'माझे', 'मला' या विषयीच आहे). त्याने आपल्या सद्गुणाचा तक्ता तयार केला जेणेकरून देवापुढे इतरापेक्षा तो जास्त नीतिमान ठरेल. शेजा-यांची हेटाळणी करीत आता आपल्याला काही उणे नाही असे त्याने देवाला सुचवले. दैवी कृपेमुळे नव्हे, तर स्वत:च्या उत्कृष्टपणामुळे प्रभूच्या आर्शिवादाला आपण पात्र ठरतो अशी त्याची धारणा होती.

जकातदाराची प्रार्थना: परूशासारखे जकातदाराला समाजामध्ये कोणताच दर्जा नव्हता. रोमन अधिका-यासाठी तो ज्यू लोकांकडून कर वसूल करीत असे. स्वत:चे खिशे भरण्यासाठी जकातदार लोकांकडून जास्त कर उकारीत; त्यामुळे ज्यू लोकांच्या मनात त्याच्याविषयी तिरस्काराची भावना होती. जरी एखादा प्रामाणिक असला तरी समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा खूपच खालच्या दर्जाची होती. त्याला सार्वजनिक पापी म्हणून ओळखत.
जकातदार परमेश्वराकडे प्रार्थना करण्यास आला तेव्हा मंदिरातील पवित्र स्थानापासून खूपच दूर उभा राहिला. कारण स्वत:च्या पापी जीवनाची जकातदाराला पुर्व कल्पना असल्यामुळे आपण देवाच्या कृपेसाठी लायक ठरत नाही हे तो मान्य करतो. त्याला परमेश्वराकडे डोळे वर करून पाहण्याचे ही धैर्य नव्हते. मग हात उभारून देवाला विंनती करण्याचे धाडस तरी कोठले? परमेश्वराच्या महान प्रतिमेकडे मी कसं पाहणार? झुकलेल्या नयनांनी व दु:खी अंतकरणाने त्याने आपली छाती पिटली. पाप स्विकारत व तिरस्कारत त्याने म्हटले, ''हे देवा, मज पाप्यावर दया कर.'' त्याने आपल्या पापीपणाची सरळ-सरळ कबुली दिली आणि काकुळतीस येऊन देवाकडे दयेची याचना केली. देवाने त्यांच्या प्रेमळ दयेने आणि करूणेने आपणाला स्पर्श करावा व आपले तारण करावे अशी याचना केली.

जीवन -बोध:
. आज जगात सुखी व समाधानी जीवन जगणारे क्वचितच सापडतात. बहुतेकजण आपल्या जीवन पद्धतीवर असमाधानी आहेत. सुखी जीवन जगण्यासाठी विश्व दररोज हजारो मार्ग आपणापुढे उभे करते आणि आपण आधंळ्यासारखे सुखी जीवन प्राप्त करण्यासाठी ह्या मार्गावर धावत असतो. पण आपल्या पदरी सदैव निराशाच पडते.
परूशी आणि जकातदारचा दाखला आपणाला आपल्या प्रवृत्तीतील लबाडीचा दोष दाखवून देतो. परूशाप्रमाणे आपण जीवनात नेहमी स्वत:ची वाहवा करीत असतो. आपणाला वाटते की, सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी मुबलक प्रमाणात फक्त आपणालाच मिळाव्यात. कारण मी पुष्कळ सत्कार्य करतो; दुस-यापेक्षा मी चांगला, नीतिमान व निष्पाप आहे; माझ्या तुलनेत माझ्याबरोबरीचा कोणीच नाही; इतर सर्वजण पापी, बलात्कारी, गर्विष्ठ, अनाचारी, इतराना लुबाडणारे व पिळवणूक करणारे आहेत असा भ्रम ठेवतो. आजचे शुभवर्तमान आपल्याला दैंनदिन जीवनात नम्रता धारण करण्यास आवाहन करत आहे. मोबदल्याचा लोभ, गर्व आणि ढोंगीपणा परमेश्वर व माणसामध्ये कुंपण निर्माण करते तर नम्रता, प्रेम व करुणा हे कुंपण घालवण्यास आपणास मदत करू शकते.

. प्रार्थना ही ख्रिस्ती निष्ठेचा मूलभूत घटक आहे तर नम्र प्रार्थना तिचा कळस आहे. नम्र प्रार्थनेद्वारे माणूस देवाबरोबर (चांगले) नाते स्थापन करतो. ह्याद्वारे माणसाची देवाबरोबर गौरवशाली व विलक्षणीय भेट होते व  मानवी हृदये देवाच्या प्रेममय हृदयाशी जुळतात. नम्रतेच्या गाभा-यातून केलेली स्तूती, आराधना, आभार, विंनती आणि क्षमेची याचना देवाकडून असंख्य कृपेचा व आर्शिवादाचा वर्षाव भाविकांवर करते.
प्रभू हा पावित्र्याने परिपूर्ण आहे. त्यांच्या पावित्र्यापुढे आपण सर्व पापी, अपात्र व अयोग्य आहोत; ह्या भावनेतून आपल्या प्रार्थनेचा उगम झाला पाहिजे. प्रार्थनेत आपली प्रवृत्ती नम्रतेची असायला हवी. आपणाकडे स्वत:ला गौरविण्यासाठी काहीच नाही. प्रभूच्या अमर्यादेत नतमस्तक झालेला मनुष्य आंतरिक शांतता व मनपरिवर्तन अनुभवतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद, हे देव आम्हा पाप्यावर दया कर.
१. पोपमहाशय, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी, जे फलदायी अध्यात्मिकतेचे आदर्श आहेत, त्यांना मिशन कार्य करण्यासाठी व खरे प्रेम, शांती इतरांनामध्ये प्रस्थापित करण्यासाठी पवित्र आत्म्याचे सामर्थ्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
२. जे धार्मिक जीवन जगण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यांना -या प्रार्थनेची ओढी लागावी व देवाच्या सानिध्यात अधिकाधिक वेळ घालविता यावा, म्हणून प्रार्थना करूया.
३. सर्वत्र ख्रिस्ती भाविकांना दु:खात व संकटात धैर्य व सामर्थ्य मिळावे, तसेच येशु ख्रिस्तावर व त्याच्या शुभवर्तमानावर त्यांचा विश्वास बळकट व्हावा, म्हणून प्रार्थना करूया.
४. बाह्य-स्वरुपीय धार्मिक विधीवर समाधानी न होता, अध्यात्मिक प्रवासात उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे, म्हणून प्रार्थना करूया.
. आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा ईश्वर चरणी समर्पित करू या.