Wednesday 25 May 2016

 Reflection for the Feast of Body and Blood of Christ (29-05-2016)  By Baritan Nigrel. 




ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा







दिनांक: २९-५-२०१६
पहिले वाचन: उत्पत्ती १४: १८-२०
दुसरे वाचन: १ करिंथ ११:२३-२६
शुभवर्तमान: लुक ९:११-१७


तेव्हा सर्व जण जेवून तृप्त झाले






प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा प्रभू येशु ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभू येशु ख्रिस्ताने क्रूसावरील समर्पणाद्वारे स्वतःचे रक्त सांडून, मानव आणि परमेश्वर पिता ह्यांच्यामध्ये नवीन कराराची स्थापना केली. अखिल मानवजातीला सर्व पापांतून मुक्त केले.
संत पौल आपल्याला सांगत आहे की, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे देवाने पापक्षमेचा नवा करार केला आहे. त्यामुळे देवाच्या सान्निध्यात येण्यास आपण पात्र झालो आहोत. म्हणून ख्रिस्त आपला मध्यस्थ आहे याची आठवण देऊळमाता आज आपल्याला करुन देत आहे.
प्रत्येक दिवशी ख्रिस्तशरीर संस्काराद्वारे आपण ख्रिस्ताबरोबर एकरूप होतो व ख्रिस्त आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. म्हणून या मिस्साबलीदानात भाग घेत असताना, प्रभू येशु ख्रिस्ताच्या पवित्र शरीराने व रक्ताने आपले अंतःकरण पावन बनून आपण ख्रिस्तासारखे व्हावे, म्हणून देवाकडे विशेष प्रार्थना करु या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: उत्पत्ती १४: १८-२०

     उत्त्पतीच्या पुस्तकात भाकर व द्राक्षारसाचा उल्लेख केला आहे. अब्राहमने कदालार्गोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे यांस सामोरे जाऊन त्यांचा वध केला. ह्या कार्याबद्दल शालेमाचा राजा मलकीसदेक जो देवाचा याजक होता, त्याने भाकर व द्राक्षरस घेऊन अब्राहामपाशी गेला आणि त्याला आशीर्वाद दिला. 

दुसरे वाचन: १ करिंथ ११:२३-२६

 संत पौल, प्रभू भोजनाचे महत्त्व व गांभीर्य करिंथ येथील मंडळीच्या नजरेसमोर आणतो. वल्हांडणाचे भोजन चालू असता, ख्रिस्ताने मेजावरील बेखमीर भाकर घेतली. ही बेखमीर भाकर ख्रिस्ताचे निष्कलंक व्यक्तिमत्व व जीवन दर्शविते. त्याने ती भाकर मोडली. ख्रिस्ताने स्वतः भाकर होऊन स्वतःचे अर्पण केले. रक्त ओतल्यावाचून क्षमा होत नाही (इब्री ९:२२). ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे देवाने पापक्षमेचा नवा करार केला आहे. प्रभूभोजन ख्रिस्ताच्या मरणाची, गौरवी तारणाच्या महान योजनेची आणि ख्रिस्ताच्या पुनरागमनाची घोषणा आहे (२६), असे संत पौल या वाचनात सांगत आहे.

शुभवर्तमान: लुक ९:११-१७

बारा जण आपली कामगिरी संपवून परत माघारी आले. त्यांना घेऊन एकांतस्थळी विसाव्यासाठी जावे असा येशूची इच्छा होती. पण लोकांच्या गर्दीमुळे ते जमले नाही. म्हणून येशूने ही संधी साधून लोकांना शिक्षण दिले. सायंकाळच्या सुमारास शिष्यांना लोकांची चिंता वाटू लागली. खुद्द त्यांच्याकडे फारच थोडे अन्न होते आणि सर्वांना पुरेल एवढे अन्न विकत घेण्यास पैसेही नव्हते.
त्यांच्या जेवणाचा प्रश्न मोठाच होता. तुम्ही त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा असे येशु ख्रिस्ताने म्हणताच, ते पेचात पडले. आमच्याजवळ असलेल्या पाच भाकरी व दोन मासे एवढ्याने आम्ही काय करणार असा जणू उलट प्रश्न त्यांनी प्रभूला विचारला (१३). जे होते तेवढे पुरे होते, कारण प्रभू येशूने ते आपल्या हातात घेतले (१६). देव ज्यांवर आशीर्वाद ओततो त्यामुळेच इतर तृप्त होतात. देवाच्या हातात दिलेले छोटेसे दान त्याच्या हातात विपुल होते.

मनन चिंतन:

मानवी जीवन हे चिन्हांनी भरलेलं आहे. आपलं बोलण, चालण, वागण, धावण, आपली घर, वस्त्र ह्या साऱ्या गोष्टी बरच काही सांगून जातात. आपण उपासना करतो, प्रार्थना करतो, भेटीगाठी देतो त्यामागे काहीतरी उद्देश असतो. ख्रिस्ताच जीवन व मरण हे देखील चिन्ह आहे. ही चिन्हे बरच काही सांगतात व समजून देतात. ह्या चिन्हांच्या मुलभूत अर्थाकडे आपण गेलो तर रहस्य समजण्यास ती मदत करतात. ख्रिस्ताने चमत्कार केले व दाखले दिले. ती चिन्हे होती. त्याद्वारेही येशूने मुलभूत अशी शिकवण आपल्याला दिली आहे.
आज आपण येशूच्या पवित्र शरीराचा व रक्ताचा सोहळा साजरा करीत असताना, देऊळ माता आपल्याला सांगत आहे की, येशूने भाकर व द्राक्षारस ही पारंपारिक चिन्हे वापरून आपले शरीर व रक्त स्वर्गीय पित्याला अर्पण केले. म्हणून ख्रिस्ताचे क्रूसावरील शरीर व रक्त ही देखील ख्रिस्ताच्या आत्मसमर्पणाची, त्याच्या आज्ञाधारकपणाची, व ईश्वरी इच्छेला दिलेल्या प्राधान्याची चिन्हे बनली.
स्वर्गीय पित्यावर त्याने जे प्रेम व्यक्त केले ते शरीर व रक्त ह्याद्वारेच! व त्याद्वारेच त्याने पित्यावर परिपूर्ण निष्ठेने, संपूर्ण आत्म्याने, संपूर्ण बुद्धीने प्रेम केले. दानशूर लोक दान करतात ते त्यांच्या प्रेमाचे चिन्ह असते. वेळ देणे, पैसे अथवा वस्तू देणे, रक्त देण, सहवास देणे ही प्रेमाचीच चिन्ह आहेत. हि चिन्हे/प्रतीके उपासनेत प्रेरणादायी ठरतात. ख्रिस्ताचे शरीर हे स्वर्गीय अन्नाचे कृपासंस्कारात्मक प्रतिक बनले आहे. आध्यात्मिक पालन पोषणासाठी ख्रिस्त आपणास त्याचे शरीर व रक्त देतो. हे शरीर व रक्त सार्वकालिक जीवनाची कृपासंस्कारात्मक प्रतीके आहेत, “तुम्ही माझे शरीर खाल्ले नाही व माझे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही.”
जुन्या करारामध्ये द्राक्षारस आणि भाकर ही पृथ्वीच्या प्रथम फळांचे अर्पण म्हणून देवाला वाहिली जात. त्यामागे देवाबद्दल कृतज्ञेची भावना होती. निर्गमच्या घटनेत ह्या चिन्हांना नवीन अर्थ दिला गेला. दरवर्षी वल्हांडण सणाच्या दिवशी, इस्रायल लोक, देवाने त्यांची इजिप्तच्या फारो राजाच्या गुलामगिरीतून सुटका केली होती, ह्याचे स्मरण बेखमीर भाकर खाऊन करीत असत (अनुवाद ८:३).
ज्यू लोकांमध्ये भोजनसमयी यजमान कुटुंबप्रमुख भाकर मोडून उपस्थितांना वाटीत असे. येशूने ह्याच पद्धतीचा अवलंब करून आपल्या अखेरच्या भोजनासमयी भाकर घेतली (मार्क १५:३६) आभार मानून ती मोडली आणि आपल्या शिष्यांस दिली (मत्तय २६:२६). आजच्या शुभवर्तमानामध्ये ऐकले की, पाच हजारांना भोजन देण्याअगोदर येशूने भाकरी घेतल्या. देवाचे आभार मानून त्या मोडल्या आणि लोकांना वाढण्यासाठी त्या आपल्या शिष्यांजवळ दिल्या. संत योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण बघतो की, ह्या चमत्कारानंतर येशु ‘आपणच ती स्वर्गातून उतरलेली भाकर आहोत असे म्हणतो. तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला आणि ते मेले. ही भाकर खाणारा सर्वकाळ जगेल,’ असे म्हणतो (६:४८-५१).
येशू ख्रिस्ताच्या मागोमाग आलेल्या मोठया समुदायाला, येशू ख्रिस्ताने पाच भाकरी व दोन मासे घेऊन चमत्कार केला व पाच हजार लोकांना जेवू घातले. ह्या चमत्काराद्वारे प्रभू येशूने पवित्र ख्रिस्तशरीर कृपासंस्कर व परस्पर मानवी संबंध ह्यांच्यातल नात स्पष्ट केल. कारण तेथे जो लहान मुलगा होता त्याच्याजवळच्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन येशूने हा चमत्कार घडवून आणला होता. या छोटया मुलाने मोठया मनाने व स्वखुशीने आपल्याकडच्या भाकरी व मासे दुसऱ्यांसाठी येशु ख्रिस्ताकडे दिल्या, म्हणून येशूने तो चमत्कार केला. जर त्या मुलाने भाकरी व मासे दिले नसते, तर ख्रिस्ताने कदाचित तो चमत्कार केला नसता.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, मानवी परस्पर संबंध व व्यक्ती-व्यक्तीमध्ये प्रेम ह्याचा पाया प्रभू येशूचे शरीर व रक्त आहे आणि हे स्पष्ट करताना प्रभू येशु म्हणतो, ‘माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो” (योहान ६:५५-५६).
आपण प्रत्येक मिस्सा बलिदानामध्ये येशूच्या पवित्र शरीराचे व रक्ताचे सेवन करून आपण ख्रिस्तासारखे बनतो व ख्रिस्ताप्रमाणे आपणसुद्धा इतरांसाठी आपले रक्त सांडायला व प्राण अर्पण करायला तयार असाव म्हणून आपल्या सर्वांना आज प्रभू आव्हान करीत आहे. त्याने जशी अखिल मानव जातीवर प्रीती केली, तशी प्रीती ख्रिस्ताचे शरीर स्वीकारणाऱ्या व्यक्तीने म्हणजे आपण सर्वांनी आपल्या शेजाऱ्यावर व आपल्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीवर दाखविली पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे व गरजेवेळी त्यांना सहाय्य केले पाहिजे.

बोधकथा:

मदर तेरेजा त्यांचा एक अनुभव सांगताना म्हणतात की, एकदा त्यांना अनेक दिवस भुकेले असलेले एक हिंदू कुटुंब आढळले, त्यांनी त्या कुटुंबासाठी थोडेसे तांदूळ आणून दिले. त्यावेळेला त्या हिंदू स्त्रीने त्या तांदळाचे दोन समान भाग केले व त्यातील एक भाग शेजारच्या मुस्लीम कुटुंबासाठी बाजूला काढून ठेवला. मदरांना या गोष्टीचा खूप अचंबा वाटला. त्यांनी त्या स्त्रीला म्हटले, “तुमच्या कुटुंबामध्ये इतकी माणसे आहेत, हे सर्व तांदूळ तुम्हालाच पुरणार नाहीत.” तेव्हा त्या स्त्रीने उत्तर दिले, “पण त्यांनीही अनेक दिवसात काहीही खाल्लेले नाही.” त्या स्त्रीचे ते उत्तर ऐकताच मदर उद्दगारल्या, “असे कृत्य करण्यासाठी खूप मोठे मन लागते.” 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

आपला प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या शरीर व रक्ताद्वारे आमचा विश्वास दृढ कर.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व इतर प्रापंचिक या सर्वांवर देवाचा विशेष आशीर्वाद यावा व त्यांना त्यांच्या पवित्र कार्यात प्रभूचे मार्गदर्शन व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील सर्व नेत्यांवर व अधिका-यांवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा, त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास परमेश्वराने मदत करावी तसेच सर्व वाईट वृत्तींपासून  त्यांना दूर ठेवून चांगल्या मार्गावर चालण्यास सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आज आपण प्रभू येशु ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत असताना आपण आपल्या शरीररूपी मंदिरात देवाला प्रथम स्थान द्यावे व आपले जीवन त्याच्याठायी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामात जे दु:खीत, पिडीत आहेत, तसेच जे असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा व नवजीवनाची वात त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी थोडावेळ शांत राहून प्रार्थना करूया.  


Thursday 19 May 2016

 Reflection for the Feast of Most Holy Trinity  (22/05/2016) By: Ashley D'Monte.



पवित्र त्रैक्याचा सण





दिनांक: २२-५-२०१६
पहिले वाचन: नितिसुत्रे ८:२२-३१
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१-५
योहान: १६:१२-१५


पवित्र त्रैक्य: आदर्श कुटुंबाचे प्रतिक




प्रस्तावना:

     आज देऊळमाता पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहे. पवित्र त्रैक्य हे ख्रिस्ती विश्वासाचा गाभा आहे. प्रत्येक ख्रिस्ती उपासना व प्रार्थना ही पवित्र त्रैक्याला संबोधून सुरु केली जाते. ख्रिस्ती श्रद्धेचा उगम व शेवट हा पवित्र त्रैक्यातच होतो. आजचा प्रभू शब्दविधी त्रैक्याचे गुणगान गातो व पवित्र त्रैक्यातील ऐक्य आपणास पटवून देतो.
         नितिसुत्रामधून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ज्ञानाची थोरवी गायिलेली पाहतो. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करण्याआधीच ज्ञान त्यावेळीस पैदा केले. परमेश्वराच्या प्रत्येक महान कृत्यात त्यात ज्ञानाची हजेरी होती.
रोमकरास लिहिलेल्या पत्रात संत पौल विश्वासाचा परिणाम काय होतो हे सांगत आहे. आपल्या पवित्र त्रैक्यातील विश्वासामुळेच आपण नितिमान ठरलो आहोत असे पौल म्हणतो. विश्वासानेच आपणास त्रैक्याची जाणीव होते. तर योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू येशू पाचव्या व शेवटच्या वेळीस पवित्र आत्म्याच्या येण्याची घोषणा करतो. हा सत्याचा आत्मा आपणास पिता, पुत्र व आत्मा या विषयी शिकविल, असे येशू म्हणतो.
पवित्र त्रैक्य हे एक रहस्य आहे. हे रहस्य केवळ विश्वासाने व पवित्र आत्माच्या सामर्थ्याने उलघडू शकते. पिता, पुत्र व पवित्र आत्म्याची खरी ओळख आपणाला व्हावी व आपली श्रद्धा दृढ व्हावी म्हणून आजच्या ह्या मिस्साबलीदानात आपण प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: नितिसुत्रे  ८:२२-३१ 
   
नितिसुत्रे हे जुन्या करारातील एक ज्ञानात्मक पुस्तक आहे. ह्यात अनेक बोध वचनांचा व मार्गदर्शनांचा संचय केलेला आहे. आजच्या अध्यायात ज्ञानाची केलेली स्तुती आपणास आढळते. ज्ञान हे परमेश्वराच्या निर्मितीकार्यापूर्वीपासून अस्तिवात होते असे नितिसुत्रे सांगत आहेत. ज्ञानाची व्यक्तिश: तुलना केलेली असून ती व्यक्ती असून ती व्यक्ती खुद्द येशू ख्रिस्ता विषयी नमूद करते. म्हणजेच परमेश्वर हा सृष्टीचा निर्माता असून ह्या त्याच्या निर्मितीकार्यात त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताचा पूर्ण सहभाग होता. हा सृष्टीक्रम परमेश्वराच्या ज्ञानाने व शहाणपणाने निर्मित केला आहे. मनुष्य हा सर्व निर्मितीत अप्रतिम आहे, त्यामुळेच त्याचा निर्माता म्हणजेच परमेश्वर सदैव त्यावर संतुष्ट राहील. ज्यांनी कोणी ज्ञानाचा मार्ग निवडला ते सदैव हर्ष करतील कारण त्याच्याठायी परमेश्वर राज्य करील व आनंद पावेल.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१-५

संत पौलाचे रोमकरांस पत्र ह्यातील पाच ओव्या पवित्र त्रैक्याच्या तत्वप्रणाली नमूद करतात. आपण नितिमान ठरण्यात पवित्र त्रैक्यातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आहे. येशूच्या मरण व पुनरुत्थानाने आपण पित्याठायी एकनिष्ठ झालो आहोत. पवित्र आत्मा आपल्यामध्ये वास करतो व पित्याचे प्रेम आपल्या हृदयात प्रज्वलित ठेवतो. संत पौल पुढे म्हणतो, ‘मानवाची निर्मिती परमेश्वराठायी चिरंतर वास करण्यासाठी केलेली आहे व हा गौरव आपणास त्याच्या पुत्रावरील विश्वासाद्वारे, जो आपणासाठी मनुष्य झाला त्यामुळे प्राप्त होत आहे. आपल्या ख्रिस्ती विश्वासामुळेच परमेश्वराशी आपली मैत्री झाली आहे; त्याठायी एक नवे नाते निर्माण झाले आहे. जर आपण ख्रिस्ती विश्वासाला खरे ठरलो व त्याच्या शिकवणुकीप्रमाणे जर वागलो तर आपणास स्वर्गीय नंदनवनाचे वैभव पाहण्याचे भाग्य लाभेल. संत पौलास व प्रत्येक ख्रिस्तीजनांस ख्रिस्ताच्या दु:खसहनात सहभाग घेणे ही फार भाग्याची बाब होती. पौल म्हणतो दु:ख, संकटे खरे ख्रिस्ती सद्गुण उभारण्यास व ख्रिस्ती आशेचा पाया भक्कम करण्यास लाभदायक ठरतात. परमेश्वराच्या स्वर्गीय वैभवाची आशा खोटी ठरणार नाही कारण आपणास पवित्र आत्म्याचे आश्वासन लाभले आहे. आपल्या बाप्तीस्माच्यावेळी आपणा प्रत्येकाने त्रैक्यातील ह्या तिसऱ्या व्यक्तीचा विचार केला आहे. पवित्र आत्मा प्रत्येक व्यक्तीत वास करतो व त्यास आपल्या दानांनी सद्रुढ करतो. पौल म्हणतो, ‘देवाच्या दैवी प्रेमाचा आत्मा आपल्या प्रत्येकाची हृदये त्याच्या प्रेमाने दररोज भरून टाकतो.’

शुभवर्तमान: योहान १६:१२-१५

येशू, भोजनप्रसंगी केलेल्या उपदेशात, पवित्र आत्मा पाठविण्याचे आश्वासन आपल्या शिष्यांस देतो. हा आत्मा त्यास धीर व सामर्थ्य देईल व येशूने सांगितलेल्या गोष्टींचा उलघडा करून देईल. आजच्या वाचनातही येशू त्याच आश्वासनाची पुन:रावृत्ती करीत आहे. येशूला शिष्यांना भरपूर गोष्टी सांगावयाच्या होत्या परंतु त्यांची मने मात्र, येशू आता आम्हांस सोडून जाणार, आता पुढे काय होणार ह्या विचारांनी ग्रासलेली होती. अशा प्रसंगी येशू जे काही सांगणार होता ते त्यांच्या ध्यानात येणारे नव्हते म्हणून येशू पवित्र आत्मा, सत्याचा आत्मा पाठविण्याचे आश्वासन देतो. तो त्याच्या शिष्यांना योग्यवेळी येशूने शिकविलेल्या गोष्टी सांगील. तेव्हा त्यांस सत्याची जाणीव होईल की, येशू हा देवपुत्र होता व त्याच्या कार्याची त्यांस प्रचीती होईल. ज्याप्रमाणे ख्रिस्ताला शिकवणुकीचा अधिकार पित्याकडून प्राप्त झाला त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याला शिकवणुकीचा अधिकार पिता व पुत्राकडून प्राप्त होईल. म्हणजेच जे सत्य आत्मा प्रकट करील ते पवित्र त्रैक्याच्याद्वारे होईल. हा आत्मा परमेश्वराचे गौरव करील व त्याच्या शिष्यांतही गौरव करण्यात शिकविल. शेवटी येशू पवित्र त्रैक्याची कार्यप्रणाली प्रकट करतो. तीनही व्यक्ती मानवाच्या कल्याणासाठी सहकार्य करतात व एकत्रितपणे कार्य करतात.

 बोधकथा: 

      संत अगुस्तीन पवित्र त्रैक्याचे रहस्य समजण्याचा प्रयत्न करत होते व ह्या रहस्यावर एकांतात विचार करण्यासाठी एक दिवस समुद्रकिनारी फेरफटका मारत होते. किनाऱ्यावर चालत असताना त्याला एक मुलगा किनाऱ्यावर खेळत असताना दिसला. तो काय करत आहे हे पाहण्यासाठी संत अगुस्तीन त्या मुलाजवळ गेले. त्या मुलाने किनाऱ्यावर एक छोटासा खड्डा केला होता व तो पाण्यापाशी जाऊन आपल्या ओंजळीत समुद्राचे पाणी घेत होता व ते पाणी त्याने केलेल्या खड्ड्यात ओतत होता. हे पाहिल्यावर संत अगस्तीन त्या मुलाला म्हणाला, ‘तू काय करत आहेस?’ तेव्हा तो मुलगा म्हणाला की, ‘मला संपूर्ण समुद्र ह्या खड्ड्यात रिकामा करायचा आहे.’ हे ऐकून संत अगुस्तीन स्मितहास्य देत म्हणाले, ‘ते कस काय शक्य आहे? एवढा मोठा अथांग सागर ह्या छोट्याश्या खड्यात रिकामा करणे अशक्य आहे.’ तेव्हा तो मुलगा म्हणाला, जर तुम्हाला वाटत असेल की, आपल्या बुद्धीसामर्थ्यापलीकडील हे पवित्र त्रैक्याचे रहस्य तुम्ही समजू शकता तर मी का नाही ह्या खड्ड्यात समुद्र रिकामा करू शकणार?’ एवढे म्हणून ते बाळ तिथून अदृश्य झालं, तेव्हा पवित्र त्रैक्याचे संपूर्ण रहस्य आपल्या बुद्धिचातुर्यापलीकडीचे आहे हे संत अगुस्तीनला समजले.

मनन चिंतन:

     त्रैक्य म्हणजे तीन गोष्टी, व्यक्ती एकत्र येणे; एकत्रितपणे कार्य करणे, पवित्र त्रैक्य म्हणजे पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या तीनही व्यक्तीचे एकत्रित संमेलन. एक देव व तीन व्यक्ती हा आपला ख्रिस्ती विश्वास आहे. ह्या तीनही व्यक्ती अलग नसून जणू एकमेकांत गुंफलेल्या आहेत. त्यांचे विचार, त्यांचे ध्येय एकच आहे. ह्या तीनही व्यक्तींचे त्यांनी केलेल्या कार्यानुसार वर्गीकरण करण्यात येते: पिता हा सर्व सृष्टींचा निर्माणकर्ता आहे, पुत्र हा मानवजातीचा तारणकर्ता व पवित्र आत्मा हा सर्व गोष्टींचे पवित्र्यकरण करतो. तीनही व्यक्तींचे कार्य जरी वेगवेगळी असली तरी त्यांचा उद्देश, हेतू एकच आहे मानवजातीचा उद्धार. एकच देव पण तीन व्यक्ती कशा ? ही बाब समजणे थोडे कठीण आहे म्हणून हे एक ख्रिस्ती रहस्य आहे. जे केवळ परमेश्वराच्या कृपेनेच कळते. हा केवळ विश्वासाचा भाग आहे. विश्वासाने सर्व गोष्टी कळीत होतात असे संत पौल रोमकरांस पत्रात आज म्हणतो व विश्वासाबरोबर पवित्र आत्म्याचे दान लाभणे गरजेचे आहे हे आपण शुभवर्तमानात ऐकले. म्हणजेच हे रहस्य मानवाच्या बुद्धीमतेच्या पलीकडे आहे, कारण ज्या गोष्टी मानवाला अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.
     ख्रिस्ती ह्या नात्याने पवित्र त्रैक्याचे अस्तिव आपण नाकारु शकत नाही कारण हा आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. त्यामुळेच प्रेषितांचा विश्वास ह्या प्राथनेत आपण आपला त्रैक्यावरील विश्वास प्रथम प्रकट करतो. ह्या त्रैक्यामध्ये एकता आहे. तीन व्यक्ती एकत्रितपणे आपले कार्य करतात. कुठल्याही प्रकारचा दुरविचार, स्वार्थ तेथे नाही. पिता जे काही करतो ते पुत्र जाणून आहे व पुत्र काय करणार ह्याची जाणीव आत्म्याला आहे. ह्या तीनही व्यक्ती एकसमान आहेत. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. एका त्रिकोणाच्या समान बाजूप्रमाणे त्रैक्य आहे. पवित्र त्रैक्याप्रमाणे आपणही आपला ख्रिस्ती समाज एकत्रितपणे बांधून ठेवला पाहिजे. जेथे कुठलाही भेदभाव नाही, स्वार्थ नाही. सर्व एकमनाचे व एकविचाराचे असून ख्रिस्ती जीवन जगावे व जगाला ख्रिस्ताची साक्ष द्यावी व शेवटी त्या स्वर्गीय नंदनवनात परमेश्वराची स्तुती-गीत गावे.
     त्रैक्यातील एकतेला सलामी देत असता पवित्र त्रैक्यातील तीनही व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण पित्याने ह्या विश्वाची निर्मिती केली, आपणास निर्माण केले इतकेच नव्हे तर आपल्या तारणासाठी त्याच्या एकुलत्या एका पुत्रास पाठवून जगाचे तारण केले व आपणास त्याची लेकरे बनविले. परमेश्वराने पवित्र आत्म्याला पाठविले जेणेकरून आपणा प्रत्येकाची हृदये परमेश्वराच्या प्रीतीने भरून  जाओत. त्या परमेश्वराची व त्रैक्याची स्तुतिसुमने गाणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपला मानवी दुर्बलपणा जाणून आहेत व ह्या  दुर्बलपणावर मात करून आपण स्वर्गीय नंदनवनाकडे वाटचाल करतो. त्यामुळेच ही संधी सर्वाना उपलब्ध आहे. पवित्र त्रैक्य कुणालाच ह्यापासून वंचित ठेवणार नाही.
     पिता, पुत्र व पवित्र आत्मा आपणा सर्वास मानवी दुर्बलतेवर मात करण्यास कृपाशक्ती देवो; जेणेकरून आपण परमेश्वराच्या प्रेमात आपले जीवन व्यथीत करून शेवटी पवित्र त्रैक्याच्या सान्निध्यात त्या चिरंतर जीवनाचा अनुभव घेऊ. 
  
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, पवित्र त्रैक्यात आम्हात संघटीत कर.

१.आपले परमगुरु स्वामी, महागुरुस्वामी, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी ह्यांनी पवित्र त्रैक्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ख्रिस्ती समाज, ख्रिस्ताठायी एकत्र करण्यास तत्पर राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या ख्रिस्ती समुदायातील वेगवेगळे पंथ आपला स्वार्थ, भेदभाव बाजूला सारून एकत्र यावेत व ख्रिस्ती जीवनाची साक्ष जगाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात ऐक्य, सलोखा नांदावा; सर्व प्रकारचा भेदभाव दूर व्हावा व एक आदर्श कुटुंब व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण सर्वांनी एकमेकांशी प्रेमभावनेने वागावे; परमेश्वराची दया, क्षमा इतरापर्यंत पोहचवावी व शेवटी ईश्वराठायी चिरंतर जीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या धर्मग्रामातील जे लोक आजारी आहेत, अशांना परमेश्वरी कृपेचा स्पर्श व्हावा, त्यांना आजारात सहनशक्ती लाभावी व त्यांचा आजार बरा व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.                 

Thursday 12 May 2016

Reflection for the homily of the Feast of Pentecost (15/05/2016) By: Dominic Brahmne.












पवित्र आत्म्याचा सण



दिनांक: १५/०५/२०१६.
पहिले वचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११.
दुसरे वाचन: १करिंथकरांस पत्र १२:२-७, १२-१३.
शुभवर्तमान: योहान २०:१९-२३. 

“ते विविध भाषा बोलू लागले”




प्रस्तावना:

     आज आपण पवित्र आत्म्याचा सण साजरा करत आहोत. ह्याच सणाला ‘पेंन्टेकॉस्ट’ असेही म्हणतात. पेंन्टेकॉस्ट’ म्हणजे ‘पन्नासावा दिवस’. ह्या सणाला देऊळमातेचा किंवा ख्रिस्तसभेचा वाढदिवस म्हणुनही संबोधले जाते. कारण ह्या दिवशी भयभीत होऊन खोलीत दडून बसलेल्या शिष्यांना प्रभू येशूने दर्शन देऊन त्यांच्यावर पवित्र आत्म्याची फुंकर घातली व त्याच पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन त्यांनी निर्भीडपणे प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची शुभवार्ता जगजाहीर केली. त्यांना नवजीवन प्राप्त झाले.
     आजच्या पहिल्या दोन वाचनात पवित्र आत्म्याच्या वर्षावाचे कथन व त्यातून त्यांना प्राप्त झालेल्या दानांचे वर्णन करण्यात आले आहे. तर शुभवर्तमानात ‘तुम्हांला शांती असो’ ह्या प्रभूच्या दर्शनात्मक अभिवादनाने शिष्यांना दिलासा प्राप्त होऊन त्यांच्यात नवचैतन्य संचारले.
पवित्र आत्म्याची दाने ख्रिस्ताठायी लीन असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होत असतात. त्या दानांच्या प्रेरणेने आपल्या समाजात आपण प्रेमाचे, बंधुत्वाचे व ऐक्याचे नाते निर्माण करावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११.
ज्यू पंथीयांसाठी वल्हांडणाचा, कापणीचा, आणि पवित्र कोशाचा सण हे तीन सण अतिशय महत्वाचे होते; व ह्या सणांसाठी उपस्थित असणे त्यांना अनिवार्य होते.
‘पेंन्टेकॉस्ट’ म्हणजे ‘पन्नासावा दिवस’ ह्यास ‘आठवड्याचा दिवस’ म्हणून सुद्धा ओळखले जात असे. वल्हांडणाचा व पवित्र आठवड्याचा सण एकमेकाला लागुनच येत असे, त्यामुळे वल्हांडणाच्या सणासाठी उपस्थित असलेले लोक, कापणीच्या सणासाठी सुद्धा हजर असत. हा सण महत्वाचा मानला जात असे कारण: १) हा एक ऐतिहासिक क्षण होता, ह्याच दिवशी सिनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञांची आठवण केली जात असे. २) ह्या सणाला कृषी उत्पादनाचे सुद्धा महत्व लाभले होते. वल्हांडणाच्या सणानिमित्ताने बार्ली नावाचे धान्य देवाला अर्पण केले जात असे आणि पेंन्टेकॉस्ट सणाच्या दिवशी न गोळा केलेल्या धान्याबद्दल, धन्यवाद देण्यासाठी दोन भाकरी अर्पिल्या जात असे.  ह्या दिवशी कोणतेही मेहनतीचे काम केले जात नसे (गणना २८:२६; लेवी २३:२१). येरुशलेमच्या रस्त्यावर अधिक गर्दी, जमाव असण्याचे हेच एक कारण होते.
     येरुशलेमातील सगळा जमाव येथे एकत्र जमत असे ह्याच कारणास्तव हा सण प्रेषितांवर येशूचा आत्मा उतरण्यासाठी योग्य असावा. ख्रिस्ती धर्म हा वैयक्तिक धर्म नसून सर्वमान्य जागतिक असा धर्म आहे आणि ह्याचीच अनुभूती आपल्याला ‘ते विविध भाषांत बोलू लागले’ (प्रे.कृत्ये २:४) ह्या वाक्यातून समजते. कारण ऐकणाऱ्यांनी त्यांच्या भाषांत  ते जे बोलत होते ते ऐकले. ह्यांतून जागतिक ऐक्यता दिसुन येते. परमेश्वराने सिनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्या फक्त यहुद्यांसाठी होत्या. परंतु ख्रिस्ताने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे दिलेली नवीन आज्ञा हि सर्वांसाठी एकतेचे प्रतिक म्हणून दिली होती. पॅलेस्तीन शहरातून मोठ्या प्रमाणात आलेल्या ज्यू पंथीयांना ख्रिस्ताचा हा संदेश पेत्राच्या मुखातून देण्यासाठी ही एक उत्तम संधी होती.

दुसरे वाचन: १ करिंथ १२:२-७,१२-१३.

     पहिल्या ख्रिस्ती समूहाच्या वागणुकीतून पवित्र आत्म्याची दाने स्पष्ट दिसून येत होती; कारण त्यांनी ती दाने आत्मसात केली होती. हाच एक पुरावा विधर्मी लोकांना पुरेसा होता कि, ख्रिस्ती धर्म हा जिवंत, खऱ्या देवाचा धर्म आहे, ज्याचा ह्या सृष्टीवर अधिकार आहे.
     संत पौल ह्या परीच्छेदात विशेषरित्या आणि अगदी ठामपणे सांगू इच्छितो की, हि पवित्र आत्म्याची दाने स्वत:च्या किंवा वैयक्तिक नावलौकिकांसाठी नव्हे तर त्याद्वारे प्रत्येकाने इतरांना ख्रिस्तामध्ये एकत्र आणून चर्चबांधणी (ख्रिस्ती समूह एकवटावा) करावी हाच एक उद्देश आहे असे तो सांगतो. पवित्र आत्म्याच्या दानांचा महत्वाचा घटक म्हणजे ‘आपण आपल्या ख्रिस्ती विश्वासात पूर्णपणे ठाम होतो, दृढ होतो. आणि ज्याने ख्रिस्तात आपला विश्वास प्रकट केला तो पवित्र आत्म्यात एकवटला असे आपण म्हणू शकतो’. विश्वास हि देवाने दिलेली एक महत्वाची देणगी होय.
     पहिल्या ख्रिस्तीसमूहामध्ये असलेली दाने हि एकाच पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना प्राप्त झाली आहे; त्यामध्ये कोणतेही दान उच्च किंवा नीच असे मानु नये हे निक्षूण सांगण्यासाठी संत पौल म्हणतो मी, ‘दाने वेगवेगळी आहेत परंतु पवित्र आत्मा एकच आहे आणि हे स्पष्टपणे निर्देशित करण्यासाठी तो शरीर व त्याच्या अवयवाची उपमा येथे वापरतो. कारण चर्च हे ख्रिस्त मस्तीश्क असे शरीर होय. येशूने स्वर्गरोहणावेळी स्वर्गातून पवित्र आत्मा पाठविला तो अशासाठी कि, नवीन स्थापन केलेल्या ख्रिस्ती समूहाला मार्गदर्शन व प्रेरणा मिळावी व आपण ख्रिस्तशरीरात एकरूप, एकदेह असे बनावेत.

शुभवर्तमान: योहान २०: १९-२३.

येशूच्या क्रूसावरील भयावह मरणानंतर भयभीत झालेले प्रेषित शेवटले भोजन घेतलेल्या ठिकाणी जमत असत. निर्दयी यहुद्यांनी येशूचा केलेला छळ व क्रूसावरील यातनामय मरण हे त्यांच्या भयाचे कारण होते. कारण ते भ्याले होते. त्यांना वाटले कि, आपलेही मरण जवळ आले आहे; ते निर्दयी यहुदी त्यांचा नक्कीच पाठलाग करत असतील. असा विचार त्यांना सतत भेडसावत असता, येशू त्या माडीवरील खोलीत शिष्यांना दर्शन देऊन “तुम्हांस शांती असो” असे म्हणतो. ह्याचा अर्थ खालील प्रकारे घेता येईल. १) तुम्ही भयातून मुक्त असा २) देवाकडून तुंम्हाला योग्य त्या गोष्टी प्राप्त होवो. मग येशूने त्यांना त्याचे साक्षीदार होण्यासाठी आज्ञा दिली. जसे देवाने मला पाठविले तसे मी देखील तुम्हांला पाठवतो.
अ) ख्रिस्ताला ख्रिस्तसभेची (देऊळमातेची) गरज आहे.
हाच मुद्दा पौल इफी. पत्र १:२३, १करिंथ १२:१२. ह्या त्याच्या पत्रात ‘आपण ख्रिस्तात एकदेह आहोत’ अशा शब्दात मांडतो. येशू पित्याचा संदेश घेऊन ह्या भूतलावर अवतरला परंतु तो आता त्याच पित्याकडे निर्गमन करत आहे. ख्रिस्तसभेने हा संदेश इतरांपर्यंत पोहचविल्या शिवाय प्रत्येकाला त्या संदेशाची महती कळणार नाही. ह्या संदेशाद्वारे येशू ख्रिस्तसभेला त्याची मुखवाणी बनण्यास पाचारीत आहे. म्हणून येशू ख्रिस्तसभेवर अवलंबून आहे असे थोडक्यात म्हणता येईल.
आ) ख्रिस्त सभेचा येशू हा केंद्रबिंदू आहे.
एखाद्या विशेष कार्यावर पाठविल्या गेलेल्या मनुष्यास पाठविणारा, संदेश, मार्गदर्शनकर्ता व अधिकार ह्या सर्वांची नितांत गरज असते हे सर्व ख्रिस्तसभेला देऊळमाते कडून प्राप्त होते म्हणून ख्रिस्त हा ख्रिस्तसभेचा केंद्रबिंदू आहे.
इ) ख्रिस्ताने देवपित्याची आज्ञा पाळली.
तो देवपित्याशी पूर्णतः आज्ञाधारक राहिला त्यायोगे त्याने पित्याचा, तारणाचा संदेश त्याच्या कृतीद्वारे सर्वश्रुत केला हीच अपेक्षा येशू ख्रिस्त त्याचे शरीर असलेल्या ख्रिस्तसभेकडून बाळगतो. ती ख्रिस्तसभा त्याने दिलेल्या निरोपाचे, संदेशाचे वाहक व साधन आहे. ख्रिस्तसभेने स्वत:चा नव्हे तर ख्रिस्ताचा संदेश सर्वश्रुत करणे यथायोग्य ठरेल. अर्थात तिने (ख्रिस्तसभेने) ख्रिस्ताच्या मताशी एकनिष्ठ असावे.
येशू ख्रिस्ताने त्यांच्यावर पवित्र आत्म्याची फुंकर घातली. योहानाच्या ह्या लिखाणाप्रमाणे (यह्जक्वेल ३७:९; उत्पत्ती २:७) ह्याची ती पाश्वर्भूमी असावी. उत्पत्ती २:७ मध्ये आपण वाचतो कि, देवाने मानवाची मातीपासून निर्मिती करून त्याच्या नाकपुड्यांत नवजीवनाची फुंकर घातली तसेच (यह्जक्वेल ३७: ९) मध्ये वाचतो कि, ‘विखुरलेल्या अजिवित हाडांना परमेश्वराने जीवित केले. म्हणजेच त्यांस जीवन प्राप्त झाले. अगदी त्याचप्रकारे पवित्र आत्म्याची फुंकर घालून येशू त्याच्या शिष्यांना नवजीवन देऊन त्यांना धाडस देतो आणि त्यांना त्यांच्या कार्यास प्रबळ बनवतो. तो त्यांना इतरांच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार देतो आणि हाच अधिकार शिष्यांद्वारे ख्रिस्तसभेस प्राप्त झाला आहे. ख्रिस्तसभा त्यामुळे दैवी दयेचे व करुणेचे साधन बनते.

मनन चिंतन :

रविवारचा दिवस होता दिपक झोपला होता. त्याची आई त्याच्या खोलीत जाते आणि धक्के देऊन उठविते. ‘दिपक उठ मिस्साला जाण्याची वेळ झाली आहे’. ‘नाही, मला जायचे नाही’, पांघरूणातून आवाज येतो. ‘आई मी तुला चर्चला न जाण्याचे दोन कारणे देतो. एक म्हणजे, मला ते आवडत नाही आणि दुसरे, त्यांना मी आवडत नाही’. ‘मीही तुला चर्चला जाण्यासाठी दोन कारणे देऊ शकते, एक, तू आता चाळीस वर्षाचा आहे आणि दुसरे म्हणजे, तू त्या चर्चचा पास्टर आहेस’.
     भयभीत झालेले शिष्य हे त्या दिपकप्रमाणेच येशूचे साक्षीदार होण्यास थरारले होते. येशूच्या क्रूर मरणानंतर त्यांचे येशूचे साक्षीदार होण्याचे स्वप्न छिन्नविछिन्न झाले होते. त्यांनी स्वत:ला माडीवरच्या खोलीत दडून ठेवले होते. येशूने दिलेला संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी रोमन अधिकाऱ्यांच्या व ज्यू पंथीयांच्या भयावह धजावत नव्हते.
     त्यांच्या ह्या भयाला दूर करण्यासाठी व ईश्वराची सुवार्ता पसरविण्याचे कार्य अखंडित चालू ठेवण्यासाठी येशू आपल्या शिष्यांना दर्शन देतो आणि त्यांच्यावर पवित्र आत्माची फुंकर घालतो आणि त्याचे साक्षीदार बनण्यास त्यांना उत्तेजित करतो. असेच उदाहरण आपल्याला जुन्या करारात उत्पत्तीच्या पुस्तकात वाचायला मिळते. परमेश्वराने मनुष्यास मातीतून निर्माण केले आणि त्याच्या नाकपुड्यांत श्वास फुंकला; तेंव्हा त्यास जीवन प्राप्त झाले. अगदी तसेच आजच्या पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्म्याचे येण्याने  शिष्यांना नवजीवन प्राप्त झाले. दुसरे म्हणजे यहज्वकेल पुस्तकात परमेश्वराने निर्जीव, विखुरलेल्या हाडांमध्ये जीव भरला व त्या हाडांस जीवन प्राप्त झाले. म्हणून आजचा हा सण देऊळ मातेचा वाढदिवस म्हणूनही साजरा केला जातो.
     आजचा हा सण आपल्याला उत्पत्ती ११ मधील बाबेलच्या बुरुजाविषयी आठवण करुन देतो.
१) बाबेलचा हा बुरुज लोकांनी स्वबळावर विसंबून बांधण्याचा ठरवला होता. त्यांत त्याचा स्वार्थीपणा व अहंमपणा होता. परंतू पेंटेकॉस्ट (पवित्र आत्म्याचा) सण हा देवाचा मानवाशी घडवून आणण्यासाठी केलेला समेट होय. हा देवाने मानव व देव ह्यांच्यात बांधलेला पूल होय. हि एक दैवी कृती पवित्र आत्म्याच्या माध्यमातून घडवून आणली गेली. घाबरून गेलेल्या शिष्यांना पवित्र आत्म्याद्वारे ग्रीक तत्त्ववेत्त्यांसमोर तसेच रोमन अधिकाऱ्यांसमोर येशूची शुभवार्ता घोषवण्याचे धाडस मिळाले, ते त्यांच्या स्वबळावर नव्हे तर देवाच्या कृपेने व पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. बऱ्याचदा देवाने त्याच्या प्रत्येक विश्वासू व्यक्तीला दिलेले कार्य हे अवघड व कठीण वाटते परंतु पवित्र आत्म्याने प्रेरणेने व दैवी दयेने असफल असे काहीच नाही. संत पौल म्हणतात, ‘देवामध्ये मला सर्वकाही शक्य आहे’.
२) बाबेलचा बुरुज हा गैरसमजाचे कारण बनले, तर पेंटेकॉस्ट सणाद्वारे सर्व भाषांतील गैरसमज दूर होऊन त्यांमध्ये साम्य निर्माण झाले. बाबेलचा बुरुज बांधण्यासाठी एका भाषेचे, एका पंथांचे लोक एकत्र आले. परंतु त्यांच्या स्वार्थी हेतूमुळे देवाने त्यांच्यात फुट पाडली. नंतर त्यांना एकमेकांची भाषा समजेनाशी झाली. त्याविरुद्ध पेंटेकॉस्ट सणाच्या दिवशी विविध भाषा बोलणारे लोक एकत्र आले आणि त्यांच्या देवावरच्या नितांत प्रेमामुळे पवित्र आत्म्याची कृपा त्यांच्यावर झाली व त्यांच्या भाषा एकमेकांना समजू लागल्या; त्यांना विविध भाषा बोलण्याचे वरदान लाभले. त्यांच्यात एकजूट निर्माण झाली. त्यांना ऐकणाऱ्यांनाही ते काय बोलतात, ते त्यांच्या स्वत:च्या भाषेत समजले (प्रे.कृत्ये २:७-८). पेंटेकॉस्ट सणाच्या दिवशी घडलेला चमत्कार हा देवाचा व पवित्र आत्म्याचा अविष्कार होय.
आपल्याला कदाचित प्रश्न उद्भवेल कि, अशी कोणती भाषा आहे जी सर्वांना समजू शकते? होय अशी भाषा आहे. आणि ती म्हणजे ‘प्रेमाची भाषा’. संत अगुस्तीन म्हणतात, ‘Love and do whatever you want’. अगोदर प्रेम करा तदनंतर सर्वकाही करण्यास तुम्हांस स्वातंत्र्य प्राप्त होईल.
३) पेंटेकॉस्ट आणि बाबेलचा बुरुज ह्यांचा झालेला शेवटही अतिशय निराळा आहे. त्यात वेगळेपणा आढळतो. बाबेलच्या बुरुजाचा अंत हा वादविवाद, गैरसमज प्रांतातील दुरावा ह्यांनी झाला, तर पेंटेकॉस्ट सण हा एकजूटतेचे, एकरूपतेचे प्रतिक बनले.
     फुल्टन शीन म्हणतात, ‘God’s chosen people behave like God’s frozen people’. ‘देवाचे निवडलेले लोक हे देवाचे गोठलेले (निकामी) लोक होत चाललेले आहेत. गोठलेले: आपली एकमेकांबद्दलची दुरावलेली वृत्ती, स्वार्थीपणा प्रार्थनेस विसरलेले, देवापासून दूर गेलेले असे आहेत. आपण देवाच्या घरात वास करण्यास आनंदी नाही. आपण कोणत्याही धार्मिक गोष्टीची सुरवात करण्याअगोदरच शेवट करण्यासाठी विचार करतो’ म्हणून आज जसा प्रभू येशूने प्रेषितांवर पवित्र आत्म्याची फुंकर घालून त्यांना नवजीवन दिले, धाडसी बनवले, उत्तेजित केले; तसे आपल्या बाबतीतही व्हावे म्हणून ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आम्हांस तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान दे.
१. विश्वव्यापी खिस्तसभेची धुरा वाहणारे परमगुरु व सर्व अधिकारी ह्यांना ख्रिस्तसभेने प्रभूची शुभवार्ता घोषावण्याची जी जबाबदारी सोपविली आहे, ती त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या ख्रिस्ती समूहात आपण पवित्र आत्म्याची वरदाने प्रीती, ऐक्य, सहानुभूती ह्यांना अधिकाधिक प्राधान्य द्यावे व त्यांचे दैनंदिन जीवनात आचरण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक दु:खी आहेत, ज्यांना भविष्याची चिंता भेडसावत आहे, ज्यांचा आत्मविश्वास ढासळत आहे, त्यांचे पवित्र आत्म्याने सांत्वन करून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सुका दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. लोकांचे जीवन पाण्याविना असह्य होत आहे. त्यांची हि दुर्बलता जाणून केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. येथे जमलेल्या प्रत्येकावर, धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबावर पवित्र आत्म्याचा वर्षाव होऊन आपल्या घरात शांतता, प्रीती व ऐक्य सदैव नांदावे म्हणून आपण प्रार्थना करूया.