Sunday 25 March 2018


Reflection for the Homily of Easter  Sunday (01-04-2018) 
By Fr. Malcolm Dinis









पास्काचा सण
(सकाळची मिस्सा)

दिनांक: १/४/२/०१८
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४ अ. ३७-४३
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४
शुभवर्तमान: योहान २०:१-९







प्रस्तावना:

“ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला”

आज संपूर्ण ख्रिस्तसभा ‘पास्काचा सण’ साजरा करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मरणावरती विजय मिळवला म्हणजेच ख्रिस्ताने पाप, मरण व सैतान ह्यावर विजय मिळवला. पुनरुत्थानामुळे ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणाऱ्या भाविकांना जशी विजयी जीवनाची आशा प्राप्त होते त्याचप्रमाणे सार्वकालिक जीवनावरील श्रद्धाही बळकट होते. ख्रिस्ताचे पुनरुत्थान म्हणजे अंधःकाराच्या राज्यावर मिळविलेला विजय होय. या विजयामुळे सैतानी शक्तीचा कायम निःपात करण्यात आलेला आहे. ख्रिस्ताच्या ह्या आगळ्यावेगळ्या शक्तीमुळे त्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना विजयी जीवन जगण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून प्रत्येक मानवाच्या मनात आशेचा अंकुर फुलविला आहे. त्याच्या पुनरुत्थानाने आपणास नवजीवन व आशा प्राप्त करून दिली आहे. जसा गव्हाचा दाणा कुजतो, रुजतो तेव्हा हजारो दाणे निघतात तसेच ख्रिस्ताच्या मरणाने प्रत्येक मानवाचे तारण झाले आहे. आपल्या सर्वांना विजयी जीवन जगण्यास पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशिर्वाद, कृपा व सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलित विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४ अ. ३७-४३

संत लूकचा खरा मुख्य हेतू असा होता की, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे आणि सर्व लोक येरुशलेममध्ये त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार होतील. हीच साक्ष संत पेत्र ह्या वाचनात देत आहे की, नाझरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला कारण देव त्याच्या बरोबर होता. अशाप्रकारे सर्व यहुदिया, गालील व शोमरोन ह्या प्रदेशातील मंडलीस स्वास्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या कृपेत व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. ही पुनरुत्थानाची साक्ष खुद्द प्रभूने आम्हास दिलेली आहे व आज्ञा केली की, लोकांस उपदेश करा आणि अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जीवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४

     या जगातील गोष्टी क्षणभंगुर व व्यर्थ आहेत. देवाच्या गोष्टी सार्वकालिक व सार्थ आहेत म्हणूनच आपले लक्ष ख्रिस्तावर केंद्रित करणे स्वर्गीय लाभाचे आहे. जे ख्रिस्ताशी जडलेले आहेत ते त्याच्या विचारांशी सुद्धा जडलेले आहेत. विश्वासणारा ख्रिस्ताबरोबर मेला तर त्याच्याबरोबर जिवंतही होईल. कारण ख्रिस्त स्वतः विश्वासणाऱ्याचे जीवन आहे हे सत्य आपल्या नवीन जीवनाचा पाया आहे. जो ख्रिस्तावर आपले संपूर्ण जीवन केंद्रित करतो तो मेला तरी जगेल व त्याच्या गौरवात प्रगट होईल.

शुभवर्तमान: योहान २०:१-९

     पुनरुत्थानाविषयी घटना सांगताना योहानाने निवडक प्रसंगाचाच उल्लेख केल्याचे स्पष्टच दिसते. या घटनेमधून शिकावयाच्या काही आध्यात्मिक धडयांचे विवरण करण्याचा त्याचा उद्देद्श आहे
      चारही शुभवर्तमानकरांनी सांगितलेल्या विविध प्रसंगांची एकवाक्यता साधून त्यातून एकच सलग चित्र उभे करणे सोपे नाही. मरीया मग्दालीया एकटीच कबरे जवळ होती असे योहान सांगतो, तर मत्तय व मार्क हे यात इतरांचाही समावेश करतात. तथापि मरीया मग्दालीया तेथे होती यावर सर्वांचे एकमत आहे.   
            कबरेमध्ये असलेल्या वस्त्रांची जागा योहानाने नेमकेपणे सांगितली आहे. डोक्याला असलेला रुमाल वेगळा एकीकडे होता, यावरून असे समजून येते की, त्यांना कुणीच हात लावला नाही हे सूचित होते. लाजर कबरेतून प्रेतवस्त्रे गुंडाळलेला असा बाहेर आल्याचे आठवण योहानाने कदाचित हे वेगळेपणा दाखवले असेल. येशूच्या कार्यध्येयामध्ये शास्त्रलेख परिपूर्ण होण्याचे महत्त्व काय व किती आहे ते आरंभीच्या ख्रिस्ती लोकांना पुढे नंतरच समजले.

बोधकथा:

     दुसऱ्या महायुद्धानंतर एक जपानी अधिकारी उद्वस्त झालेल्या परिस्थितीची पाहणी करत होता, सर्वत्र राख, अर्धवट जळालेली प्रेते, झाडांच्या खोडामधून निघणारा धूर अश्या परिस्थितीत त्या अधिकाराचे लक्ष एका लहानशा झाडाकडे गेले, त्या झाडाला नवीन पालवी फुटली होती. त्या माणसाने विचार केला जर ह्या लहानश्या झाडाला अश्या परिस्थितीत पालवी फुटते तर मग ह्या आमच्या मानवी जीवनाला काय झाले आहे, आमच्या मनाला व विचारांना पालवी का फुटू नये ? अश्या विचाराने ह्या माणसाने इतरांना पुन्हा उठण्याची व भरारी मारण्याची प्रेरणा दिली.
     येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आम्हाला आज हेच शिकविते.        

मनन चिंतन:

     मनुष्याचे या जगातील जीवन अतिशय क्षणिक आहे. या जीवनाची अखेर ज्या घटनेने होते, तिला आपण मरण म्हणतो. गवताप्रमाणे मनुष्यजीवन अल्पकाळ टिकते, सृष्टीतील पशुप्राणी, वनस्पती देखील नश्वरतेच्या अधीन आहेत. आपल्याला एक दिवस हे जग सोडून जावे लागणार आहे. इथली धनदौलत, उच्च पदव्या, नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांचा निरोप घ्यावा लागणार आहे. ही वस्तुस्थिती मानवी जीवनावर नैराश्याचे सावट आणणारी आहे. जसे मनुष्याचे पृथ्वीवरील जीवन क्षणभंगूर आहे, तसे पृथ्वीवरील आनंदही क्षणभंगुर आहेत. मधुर फळ खाताना आनंद होतो. नवा कोरा पोशाख चढवताना आनंद होतो. चित्रपट पाहताना आनंद होतो. मात्र हे सर्वच आनंद विरघळून जातात. केवळ अल्पकाळ टिकणारे जगिक आनंदाचे क्षण उपभोगण्यासाठी जर मनुष्य जगत असेल व मरणानंतर आपलं काय होत हे त्याला ठाऊक नसेल तर मानवी जीवन ही एक क्लेशदायी शोकांतिका आहे.
     परंतु मरण हा ख्रिस्ती जीवनाचा पूर्णविराम नसून तो एका खऱ्या नवजीवनाचा प्रारंभ आहे. म्हणूनच गुडफ्रायडेला अर्थ आहे तो इस्टरच्या पुनरुत्थित प्रभू येशूच्या प्रकाशात कारण पुनरुत्थित प्रभू येशूख्रिस्त हा आदि आणि अंत आहे, प्रारंभ आणि शेवट आहे. आपल्या जीवनाचा पाया आणि कळस आहे. रात्र आणि दिवस ह्यांच जस नात आहे तस गुडफ्रायडे आणि इस्टर ह्या दोन दिवसाचं नात आहे. रात्रीनंतर निश्चितपणे पहाट होत असते तशीच गुडफ्रायडेच्या अंधारानंतर इस्टरची मंगल पहाट फुटत असते. किंबहुना इस्टरची सुंदर पहाट होण्यासाठी गुडफ्रायडेच्या रात्रीची आवश्यकता आहे. असत्याची सर्व बंधने तोडून सत्य हे आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या रुपात पुनरुत्थित झाले आहे.
आजचा दिवस हा आम्हा श्रद्धावंतासाठी एक आनंदाचा दिवस आहे. पुनरुत्थान म्हणजे ‘पूर्ण बद्दल’ राखेतून पुन्हा उठण्याचा अनुभव.
     अनेक वेळा जीवनातील दुःखभोग, वेदना, अरिष्टे, संकटे, एकाकीपणा यामुळे आम्ही निराश आणि हतबल होतो. सर्व आशा गमावून बसतो. हे चित्र बदलण्याची किमया प्रभू येशूने केली. आपल्या पुनरुत्थानाने त्याने वधस्तंभालाच अर्थपूर्ण केले. म्हणूनच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना निश्चितच भविष्यात आशा आहे. ह्या आशेच्या किरणामुळेच निराशेतून आशेकडे, अपयशातून यशाकडे, दु:खातून सुखाकडे, असत्याकडून सत्याकडे मार्गक्रमण करण्यास सामर्थ्य प्राप्त होते. कारण ख्रिस्ताने पुनरुत्थित होऊन जगावर, मृत्यूवर आणि सैतानावर संपूर्णपणे विजय मिळवलेला आहे. ख्रिस्त मेलेल्यातून उठला आणि आजही तो आपल्यामध्ये जिवंत आहे. ज्यांना ह्या जिवंत ख्रिस्ताचा अनुभव झालेला आहे त्यांनी देवाला अनुभवलेला आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनात स्वच्छ अंतःकरणाने प्रभू येशुला शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो आपल्याला दर्शन देत असतो. ज्याप्रमाणे शुभवर्तमानामध्ये ज्या शिष्यांनी येशूला सोडून दिले पण जेव्हा त्यांनी शुद्ध अंतःकरणाने प्रभूला शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रभूने त्यांना दर्शन दिले व ही आनंदाची शुभवार्ता इतरांना देण्यासाठी त्यांना पाठविले.
     आज जगात पुनरुत्थान व जीवन ह्यांची गरज आहे. अर्धेअधिक लोक मेलेले आहेत. त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना, त्यांची ध्येयधोरणे मेलेली आहेत. जगात द्वेष, हेवा प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे खून, रक्तपात, जाळपोळ, युद्ध होत आहेत. पुरुष व्यसनात जळून जात आहेत. स्त्रिया वेश्या व्यवसायात कुजून गेलेल्या आहेत. राजकीय नेते पैशांच्या गुलामगिरीत बंदिस्त आहेत. व्यापारी लोक फसवेगीरीच्या साखळदंडानी बांधले गेले आहेत. अन्याय, अत्याचार अशा विकृतीत जीवन जगणाऱ्या सर्वांना प्रभू येशूच्या जीवनाची व पुनरुत्थानाची अधिक गरज आहे. ज्यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत असे प्रेमभंग झालेले लोक, ज्यांना लुटून गेले आहे असे उद्ध्वस्त झालेले लोक ह्या सर्वांना पुनरुत्थान व जीवन ह्यांची गरज आहे.
     ज्याप्रमाणे प्रभूने मरणावर विजय मिळवला त्याचप्रमाणे आपणदेखील ह्या आपल्या आधुनिक संकटावर विजय मिळवूया. कारण आपण पुनरुत्थित प्रभूचे लोक आहोत आणि ‘आल्लेलूया’ हे आपले गीत आहे. म्हणजेच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आनंदाची शुभवार्ता संपूर्ण जगाला घोषित करूया व म्हणूया “विजयी तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी”.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे परमेश्वरा द्या कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. आपले पोप महाशय फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी आपल्या कार्याद्वारे आपल्या लोकांना आणि स्वतःच्या जीवनात नवजीवनाचा अनुभव यावा म्हणून कष्ट घेतात. त्यांच्या कार्यात पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या कृपेने यश लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ताच्या मळ्यात काम करण्यास तरूण तरुणींनी पुनरुत्थित ख्रिस्ताच्या आदर्शातून पाचारण घडावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामातील गरजवंत, आजारी व एकाकी लोकांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. राष्ट्रा-राष्ट्रांमधील, देशांतर्गत चाललेले वाद व हिंसाचार निवळावे, आपण सर्व एकाच देवाची लेकेरे आहोत ही ऐक्य भावना वाढीस लागावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजीक हेतूसाठी प्रार्थना करूया. 




Reflection for the Homily of  'Easter Vigil' (31-03-2018)

पुनरुत्थान रविवार


जागरण विधी 


दिनांक: ३१/०३/२०१८
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,
दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८
तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१अ
चौथे वाचन: यशया ५४:५-१४
पाचवे वाचन: यशया ५५:१-११
सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४
सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८
आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११
शुभवर्तमान: मार्क १६:१-७ 

आजच्या ह्या विधीचे चार मुख्य भाग आहेत.  

पहिला भाग: 

·   प्रकाश विधी- ह्या विधीमध्ये पुनरुत्थित येशू जगाचा प्रकाश आहे हे आपण घोषीत करतो.

दुसरा भाग: 

·    प्रभुशब्द विधी-  ह्या विधीमध्ये जुन्या व नवीन करारातील निवडक वाचने वाचली जाणार आहेत. ह्या सर्व वाचनांतून देवाचे मानवावरील अपार प्रेम आहे हे दिसून येते. 

तिसरा भाग: 

·   पाण्याला आशीर्वाद- ह्या विधीमध्ये बाप्तिस्म्या संस्कारासाठी लागणा-या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. बाप्तिस्मा संस्काराने आपण देवाची मुलं होतो. पुनरुत्थानाचे पहिले गोड फळ म्हणजे बाप्तिस्मा. ख्रिस्तामध्ये आपला बाप्तिस्मा होणे हा देवाचा अनन्यसाधारण आशीर्वाद आहे.

चौथा भाग: 

·   ख्रिस्तप्रसाद विधी-  ह्या विधीमध्ये आपण सर्वजण पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारणार आहोत. पुनरुत्थित येशूला आपण आपल्या जीवनात नव्याने स्वीकारणार आहोत.
       
प्रस्तावना:

तो उठला आहे 

ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय भाविकांनो आज ह्या पवित्र रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळविला आहे. त्याने दु:ख सोसले, त्याला क्रुसावर खिळण्यात आले आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे आज तो मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला आहे. येशू मरणातून उठलेला आहे हा आपला दृढ विश्वास आहे आणि ह्या विश्वासाच्या बळावर आज अखिल ख्रिस्तसभा बांधण्यात आली आहे. आपल्या पापांचे ओझे येशूने स्वत:च्या खांद्यावर घेऊन आम्हाला विसावा दिला. आमच्या पापांसाठी तो क्रुसावर मेला. येशू पुनरुत्थित होऊन आम्हा सर्वांना शाश्वत जीवनात सामील केले आहे. येशूच्या जीवनात प्रामाणिकपणा, ध्येय आणि विश्वास होता. जन्मापासून ते पुनरुत्थित होई पर्यंत त्याने प्रामाणिकपणे आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण केली. शेवटी त्याने आपल्या जीवनाचे सार्थक केले.
ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असताना पुनरुत्थित येशूचा प्रकाश, कृपा आणि शांती आम्हावर सदैव रहावी आणि आम्ही सुद्धा आमचे ख्रिस्ती जीवन आणि कार्य, प्रामाणिकपणा आणि विश्वास ह्या मुल्यांनी भरावे म्हणून प्रभूकडे याचना करूया. 
सम्यक विवरण:

     आजचा विधी हा पास्काचा जागरण विधीम्हणून ओळखला जातो. ख्रिस्ती धर्माने हे नाव व दिवस यहुद्यांच्या पास्काच्या सणावरून घेतलेले आहे. इजिप्त देशात देवाचा दूत यहुद्यांची घरे ओलांडून गेला व इजिप्त वासियांच्या प्रथम जन्मलेल्या बालकांचा वध केला; हे सर्व यहुद्यांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून करण्यात आले. ख्रिस्ती धर्माने हा सण प्रभूच्या पुनरुत्थानाचा सणम्हणून घोषित केला. प्रभूने आपले मरण व पुनरुत्थानाने पापांवर विजय मिळविला. मरणातून सार्वकालिक जीवनाकडे प्रभूने केलेले हे ओलांडण यहुद्यांनी ज्याप्रमाणे गुलामगिरीतून सुटका झाल्यानंतर परमेश्वराठायी एका नव्या जीवनाला सुरुवात केली; त्याचप्रमाणे प्रभूच्या पुनरुत्थित जीवनाद्वारे आपणास एका नव्या जीवनाला प्रारंभ करण्यास मुभा मिळते. म्हणूनच आजच्या दिवशी स्नानसंस्कार दिला जातो व स्नानसंस्काराच्या वचनांचे नुतनीकरण केले जाते. म्हणूनच प्रभूच्या जीवन, मरण व पुनरुत्थानाला ‘paschal mystery’ ‘पास्काचे रहस्यम्हणून संबोधित केले जाते व ख्रिस्ती श्रद्धेत महत्वाचे स्थान दिले जाते.
अ) जुन्या करारातील सात वाचने आपणास परमेश्वराच्या दैवी नियोजनाची पुर्तता मानवी जीवनात कशी होते याची प्रचीती देते. देव शून्यातून विश्वाची निर्मिती करतो, आपल्याच प्रतिरुपाप्रमाणे तो मानवास निर्माण करतो व त्यास सा-या निर्मितजणांचा अधिपिता करतो. मानवाचे वर्चस्व त्यांस देवापासून दूर घेऊन जाते व तो पापांच्या खाईत पडतो. परंतु देव मानवाच्या तारणासाठी आपल्या निवडलेल्या लोकांद्वारे, संदेष्ट्यांद्वारे मानवास आपल्या जवळ आणतो. पाप व मुक्तता याची पुन्हा-पुन्हा होणारी पुनरावृत्ती याचे दर्शन आपणास ह्या वाचनात घडते.
ब) संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात ख्रिस्ती बांधवांना प्रभूमध्ये जीवन जगण्यास प्रवृत्त करत आहे. पौल म्हणतो, “स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक ख्रिस्ती हा ख्रिस्तामध्ये मरतो व ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होतो”. त्याचे सर्व जीवन हे ख्रिस्ताद्वारे सुरु होते व ख्रिस्तामध्येच संपते. संत पौल हा खिस्ती लोकांविषयी फार चिंतित होता, कारण त्यांनी आपले ख्रिस्ती जीवन चांगल्याप्रकारे सुरू केले होते, परंतु अनेक वेळा ते कुमार्गाला जात होते. त्यामुळेच पौल त्यांस ख्रिस्ती जीवनाचा मार्ग कसा क्रमण करावा ह्याचे धडे देतो. तो म्हणतो, स्नानसंस्काराद्वारे मानवाने आपला पूर्वीचा कुमार्ग सोडावा व तो अशाप्रकारे सोडावा की त्याने जणू म्हणावे मी पापासाठी मेलो आहे. मृत व्यक्ती चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खुण करत नाही म्हणजेच तो आपल्या पापी जीवनाला मरतो व ख्रिस्तामध्ये नवजिवीत होऊन जगतो. अशाप्रकारे स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक व्यक्ती देवाचे लेकरु होते. जोपर्यंत ख्रिस्त माझ्यात नाही व मी ख्रिस्तात नाही, तोपर्यंत मी प्रभूच्या सानिध्यात जीवन जगू शकत नाही.
क) मार्कलिखित शुभवर्तमानात आपण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी ऐकतो. यहुदी लोक मृत व्यक्तीस काळजीपूर्वक दफन करीत असत. विविध गंधरस लावून ते प्रेतास जपत असत. शब्बाथ दिवस आड आल्याने प्रभू येशूचा मृतदेह घाईत दफन केला गेला होता. त्यामुळे स्त्रियांना यहुदी रीतीप्रमाणे गंधरस लावता आले नव्हते. ह्यासाठीच त्या भल्या पहाटे ही उत्तरक्रिया पूर्ण करण्यासाठी थडग्यापाशी गेल्या होत्या. त्यांनी हे कृत्य येशुठायी असलेल्या प्रेमापोटी व श्रद्धेपायी केले.
     प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची प्रचिती आपणास खालील मुद्द्यावरून येते:
१. कबरेचा धोंडा बाजूला सारला होता.
२. कबरेत दूताने दिलेला संदेश
३. रिकामी कबर 
४. प्रभूला ज्या वस्त्रात गुंडाळून ठेवले होते ते वस्त्र येशुविरहित तेथे पडलेले होते.
हे सर्व दृश्य पाहून स्त्रिया भयभीत झाल्या होत्या. त्या शिष्यांना काय जाब देणार? म्हणूनच दूत त्यांना म्हणतो, ‘भिऊ नका प्रभू मरणातून उठला आहे.स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या; कारण हे असले अजब कधीच घडले नव्हते व ऐकलेही नव्हते. फक्त मार्कच्या शुभवर्तमानातच दूताचा आदेश आपणास आढळतो: जा, व त्याच्या शिष्यांना व पेत्रास सांगा.दूत स्त्रियांस ही शुभवार्ता घोषीत करण्याचे आदेश देतो. शुभवर्तमानाच्या शेवटी आपण ऐकतो की, ह्या स्त्रिया भीतीपोटी हा संदेश कुणालाच सांगत नाहीत.
खरे पाहता, संदेश किंवा शुभवर्तमान प्रसारण करण्याचे कार्य हे देवाचे आहे. जोपर्यंत देव आदेश देत नाही तोपर्यंत त्या संदेशाचा प्रसार कुणीच करू शकत नाही. दूताने पेत्राचे नाव विशेष घेतले कारण जे काही प्रभूने भाकीत केले होते त्याची पूर्तता झाली आहे ह्याची खात्री पेत्राला व्हावी. पेत्र जरी बेईमान ठरला तरी त्याने पश्चातापाद्वारे प्रभूच्या दयेची प्राप्ती केली. त्यामुळे आपल्या पुनरूत्थानाचा संदेश पेत्राला नक्कीच संतोष देईल ही प्रभूला खात्री होती. प्रभू पापी माणसासाठी क्रुसावर मरण पावला व मरणातून उठला. पश्चातापी  लोकांस आपल्याजवळ घेणे प्रभूला नक्कीच संतुष्टकारक ठरेल. 
बोधकथा:

     आपल्या राज्याचा भावी राजा ठरवण्यासाठी वृद्ध राजाने एक परीक्षा घेण्याचं ठरवलं. आपल्या चारही पुत्रांना बोलावून त्याने प्रत्येकाला एक ‘बी’ दिली आणि सांगितलं, ही बी नेऊन तिची लागवड करा. आलेल्या झाडाची उत्तम जोपासना करा. एक वर्षानंतर तुमच्या झाडांची मी पाहाणी करेन. त्यातून उत्तम ठरलेल्या तुमच्यापैकी एकाची मी राजा म्हणून निवड करेन.
     एका वर्षानंतर राजाने चौघांनाही बोलावलं. धाकटा जायला तयार नव्हता. कारण त्याच्याकडचं बी रुजलचं नव्हतं. पण जे घडलं ते सरळ सांगावं या इराद्याने तोही पोहोचला. राजाने आपल्या पुत्रांनी जोपासलेली झाडं पाहिली आणि त्यांचं कौतुक केलं. धाकटा मात्र शांत उभा होता. राजाने त्याच्या झाडाबद्दल विचारलं तेव्हा त्याने जे घडलं ते सांगितलं. आपले प्रयत्न अयशस्वी ठरल्याबद्दल राजाची क्षमा मागितली. तसा राजा झटकन पुढे झाला आणि स्वत:च्या डोक्यावरचा राजमुकुट त्याने धाकट्याच्या डोक्यावर ठेवला.
     राजाची ही कृती पाहून बाकीचे पुत्र चकित झाले. धाकट्याचे झाड उगवलं नसताना त्याची निवड का ? असा प्रश्न त्यांनी राजाला केला. तेव्हा राजा म्हणाला, ‘मी तुम्हा सर्वांना उकडलेल्या बिया दिल्या होत्या. त्यातून झाड उगवणे शक्यच नव्हतं. तुम्ही तिघांनी अप्रामाणिकपणा केला. दुसरंच बी रुजवून झाड उगवलंत. धाकट्याने मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केले. तो सत्याशी प्रामाणिक आणि प्रामाणिकतेशी वचनबद्ध राहिला. मला राज्यासाठी असा राजा हवा, जो आपल्या प्रजाहिताच्या ध्येयासाठी आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कार्याशी वचनबद्ध राहील. कारण वचनबद्धता राखणारा माणूसच यशस्वी ठरतो.
( ‘ध्येयाशी व्हा वचनबद्ध’ हे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या जीवनात देखील पाहता येते. येशू जन्मापासून ते पुनरुत्थित होईपर्यंत आपल्या पित्याशी आणि शिष्यांशी प्रामाणिक राहिला. येशूचे हे प्रामाणिकपणाचे जीवन आम्हा सर्वांचा विश्वास दृढ करते.)    

मनन चिंतन:

     प्रत्येक माणसाचे ध्येय असते. प्रत्येकाला महत्वकांशी व्हायचे असते. म्हणून एखादे विशिष्ट प्रकारचे ध्येय गाठण्यासाठी श्रमाची, विश्वासाची, प्रामाणिकपणाची आणि सातत्याची गरज असते. आपल्या स्वप्नांना चिकटून रहा, कारण जर स्वप्नेच मेली तर जीवन पंख तुटलेल्या पक्षासारखे होईल. ह्या गोष्टींचा जर अभाव असेल तर आपले जीवन समुद्रात नावाडी नसलेल्या होडी प्रमाणे होईल, होडी वाऱ्याच्या प्रभावामुळे कुठेही जाईल.
     आज आपण मोठ्या उल्लासाने ‘आलेलूया’ गातो. गोड सुराने देवाची महिमा गातो. का? कारण आज ध्येयाला वचनबद्ध असलेला येशू पुनरुत्थित झाला आहे. देवाचे वचन सांगते, ‘असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठावे (लूक २४:४६). जर आपण बारकाईने येशूच्या जीवनावर मनन चिंतन केले तर आपल्याला असे आढळून येईल की येशूच्या शब्दाला व कृतीला प्रतिबिंब आहे; म्हणजेच येशूचे जीवन परिणामकारक आहे. उत्पती पुस्तकात जेव्हा सृष्टीची निर्मिती करण्यात आली तेव्हा देव बोलला, तेथे प्रकाश होवो आणि तेथे प्रकाश झाला. अशाप्रक्राचे येशूचे जीवन आहे. येशू म्हणतो, मी जीवनाचा प्रकाश आहे आणि खरोखर तो प्रकाश झाला. येशू इतर लोकांना विविधप्रकारे प्रकाश झाला ह्याची ग्वाही किंवा साक्ष पवित्र शास्त्र देते. हेच वचनबद्ध येशूचे जीवन त्याच्या पुनरुत्थित कृतीला शोभा देते.
     गुलाबाच्या फुलाला ज्याप्रमाणे काट्यांच्या मार्गातून वाट काढावी लागते, त्याप्रमाणे येशूचे पुनरुत्थित जीवन संकटानी, दु:खानी आणि मोहाने भरलेले होते. पण ह्या सर्वांवर मात करत येशू पुनरुत्थित झाला. देवाने आपणा सर्वांसाठी तारणारा पाठवला. शिष्यांच्या मते हा तारणारा तलवार घेऊन सर्वांचा नाश करेल. त्यांच्यामते तारणारा हा मोठा राजा असेल. परंतू तारणारा कसा आला? तो गाढवावर बसून आला. हातात तलवार नव्हती. तर त्याचे जीवन फक्त शांतीने, क्षमेने आणि प्रेमाने भरलेले होते. आयुष्यभर येशूने हिंसक गोष्टी नाही केल्या तर शांतीचा झेंडा हातात घेऊन गर्विष्ठ लोकांची मान लाजेने खाली झुकवली. आज आपण ह्याच येशू ख्रिस्ताला शांतीचा, प्रेमाचा राजा संबोधतो.
     येशूने बहुतेक वेळा पवित्र शास्त्रात म्हटले आहे की, मला जीवे मारले जाईल, परंतू मी तिसऱ्या दिवशी मरणातून उठेन. आज खरोखर डोळ्यातून अश्रू खाली पडत आहेत. का ? कारण निष्पाप येशूला यहुद्यांनी क्रुसावर जीवेशी मारले. माझ्या, तुमच्या आणि सर्वांच्या पापांसाठी येशूने क्रूस वाहिला. पण आज डोळ्यातून आनंदाचे अश्रू बाहेर यायला पाहिजे. कारण येशूने जे सांगितले होते त्याची आज पूर्तता झाली आहे. आज तिसरा दिवस. ह्या तिसऱ्या दिवशी येशू पुनरुत्थित झाला आहे. शुभवर्तमानात आपण ऐकले की मग्दालीया मरिया, योकोबाची आई मरिया व त्या सलोमे ह्यांनी येशूला सुगंधद्रव्ये लावण्यासाठी कबरेजवळ आल्या. परंतु त्यांना कबर उघडी दिसली. कबरेच्या आत गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहा. तो उठला आहे, तो येथे नाही.
तो उठला आहे याचा अर्थ येशू पुनरुत्थित झाला आहे. त्याने मरणावर विजय मिळवला आहे. आपण नव्या करारामध्ये पाहतो: विशेषकरून;
·        मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसानंतर पुन्हा उठावे (मार्क ८:३१).
·        मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे (लूक २४:७).
·        आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारिले; पण देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले ह्याचे आम्ही साक्षी आहो (प्रेषितांची कृत्ये ३:१५).
पुनरुत्थित होऊन येशूने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली. सर्व मानवजातीस पापमुक्त करणे हे येशूचे ध्येय होते. ते त्याने पूर्ण केले. येशूने स्वत:चा प्राण गमावला. स्वत: निस्वार्थी जीवन जगून इतरांना प्रभूकडे आणले. त्याची महत्वकांक्षा ही प्रेमाने, शांतीने आणि समेटाने व्यापून गेली होती. सदैव तो आपल्या जीवनात प्रामाणिक राहिला. जेव्हा शिष्यांनी येशूची बिकट हालअपेष्टा बघितली तेव्हा त्यांनी कदाचित विचार केला असेल की हा येशू आमचा तारणारा स्वत:ला वाचवू शकत नाहीत मग आम्हाला कस काय वाचवू शकेल? शिष्यांच्या शंकेचे निरासन येशूने पुनरुत्थित होऊन केले. पुन्हा एकदा शिष्यांचा विश्वास दृढ झाला. कित्येक शिष्य येशूची सुवार्ता घोषविण्यासाठी तप्तर झाले. जगाच्या काना कोपऱ्यात जाऊन येशूचा मार्ग प्रगट केला. त्यांनी देवराज्याची घोषणा केली. काहींनी आपला प्राण गमावला. हीच आहे पुनरुत्थित येशूची घोषणा.
आपल्या जीवनातील ध्येय काय आहे ? पैसा, मालमत्ता, नाव-लौकिकता, बंगला, गाडी हे सर्व आहे का? ह्याच्या व्यतिरिक्त येशू आणि येशूची शिकवण असली पाहिजे. देवाचे वचन सांगते, ‘तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील (मत्तय ६:३३). आजचा हा पुनरुत्थित येशूचा दिवस आपणा सर्वांना त्याच्या ध्येयाने भरून जावो अशी प्रभूकडे विनवणी करूया. ज्याप्रमाणे येशू जन्मापासून ते पुनरुत्थित होई पर्यंत आपल्या पित्याशी विश्वासू राहिला, प्रामाणिकपणाने जगाला; त्याप्रमाणे आपण ख्रिस्ती बांधव सुद्धा आपल्या ख्रिस्ती जीवनात प्रामाणिक राहावे व आपल्या विश्वासाला चिकटून राहावे म्हणून प्रार्थना करूया.        

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: प्रभो आंम्हास कृपेचे नवजीवन दे.

. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू आणि धर्मबंधूभगिनींना पुनरुत्थित प्रभूचा आनंद व आशा त्यांच्या प्रेषितीय कार्यात सतत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. आपला ख्रिस्ती समुह पापांच्या दरीतून मुक्त होऊन, परस्पर प्रेम व सौख्यभावनेने रहावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. आज ज्यांनी नव्याने स्नानसंस्कार स्वीकारला आहे अश्यांनी प्रभूठायी विश्वासू राहून एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. ज्या लोकांना ख्रिस्ताची अजूनही ओळख पटलेली नाही अशांना प्रभूच्या प्रेमाची ओळख त्याच्या निवडलेल्या लोकांद्वारे व्हावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
५. आपण सर्वांनी विश्वासात घेतलेला पुनरुत्थित प्रभूचा अनुभव सदाकाळ आपल्या मनी बाळगून त्या सार्वकालिक जीवनात सहभाग घेता यावा म्हणून आपण प्रार्थना करुया.


 Reflections for the homily of Good Friday (30-03-2018) by Br Robby Fernandes.










उत्तम शुक्रवार


दिनांक: ३०-०३-२०१८
पहिले वाचन: यशया ५२:१३; ५३:१२
दुसरे वाचन: इब्री ४:१४-१६, ५:७-९
शुभवर्तमान: योहान १८:१-१९, ४२









 प्रस्तावना: 

     उत्तम शुक्रवार हा खरोखरच उत्तम आहे, कारण प्रभू येशूने आमच्या प्रेमासाठी व तारणासाठी या दिवशी क्रुसावर आपला प्राण दिला. येशूचे क्रुसावरील मरण हे अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ठरले आहे, कारण येशूने आम्हा सर्वाना पापमुक्त केले. त्याने असंख्य चाबकाचे फटके व दु:खे भोगिली, ज्यासाठी आपण सर्वजण कारणीभूत आहोत. हा शुक्रवार शुभ मानला जातो; कारण येशूने स्वत:चा प्राण जन-कल्याणार्थ वाहिला; त्याच्या ह्या बलिदानाद्वारे आपणास प्रेरणा आणि कृपा-शक्ती मिळावी म्हणून आपण मोठ्या श्रद्धेने ह्या पवित्र विधीमध्ये सहभाग घेऊया.  

पहिले वाचन: यशया ५२:१३; ५३:१२

     पहिल्या वाचनात यशया संदेष्टा परमेश्वराच्या पवित्र वचनावर मनन-चिंतन करावयास सांगत आहे. यशया परमेश्वराच्या पुत्राचे वर्णन करत आहे. आपणा सर्वांना पापातून मुक्त करण्यासाठी देवाच्या पुत्राने सर्वांची शिक्षा स्वत:च्या उरावर घेतली. आमच्या अपराधामुळे तो घायाळ झाला. कापायला नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो गप्प राहिला कारण त्याने बहुतांचे पाप स्वत:वर घेऊन, अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.

दुसरे वाचन: इब्री ४:१४-१६, ५:७-९

     दुसरे वाचन हे इब्री लोकांस लिहिलेले आहे. देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आहे म्हणून सर्वांनी त्याच्या विश्वासात दृढ राहण्याची गरज आहे, कारण तो त्याच्या मरणातून आम्हास तारावयास समर्थ आहे. तो देवाचा पुत्र असूनही त्याने जे दु:ख सोसले त्यामुळे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि जे कोण त्याच्या आज्ञेत राहतात त्यांचा तो तारणकर्ता झाला.

शुभवर्तमान: योहान १८:१-१९, ४२

     शुभवर्तमानामध्ये योहान आपल्यासमोर प्रभू येशूचे दु:खसहन मांडत आहे. येशू ख्रिस्त मरणाला केव्हाच घाबरला नाही. त्याने देवाच्या कार्यामध्ये हर्षरित्या सहभाग घेतला. त्याने देवाच्या कार्याला कधीच नकारार्थी उत्तर दिले नाही. जेव्हा शिपाई पकडायला आले तेव्हा तो त्यांना निर्भीडपणे सामोरे जाऊन त्यांना सांगितले की, “मीच तो, नाझरेथकर येशू.” अशाप्रकारे त्याने स्वत:ला लीन केले.

बोधकथा:

     एका गावामध्ये जीवाला जीव देणारे दोन जिगरी मित्र होते.  आपला आनंद साजरा करण्यासाठी ते एका मद्यपान करण्याच्या दुकानात जातात. ते दोघे दारूच्या धुंदीत एकमेकांना शिव्या घालू लागतात. मारामारी सुद्धा करतात. जे जीवाला जीव देणारे होते ते आता ऐकमेकांचा जीव घेणारे होतात. जेव्हा दोघांमधील एक शुद्धीवर आल्यानंतर त्याला समजते की त्याने त्याच्या मित्राला जीवे मारले होते. त्याचे पांढरे शर्ट रक्ताने माखलेले होते. जेव्हा पुलिस त्याला पकडायला येतात तेव्हा तो पोलिसांच्या हातून निसटून पळून जातो. तो स्वत:चा गाव सोडून दुसऱ्या गावी राहायला जातो. ज्या घरात तो राहतो ते एका ख्रिस्ती बांधवाचे छोटेसे घर असते. तो त्या ख्रिस्ती माणसाला आश्रय देण्यास विनंती करतो पण ख्रिस्ती माणूस सांगतो की ह्या छोट्याश्या घरामध्ये तुला कोठे लपवू, पण तो खूपच आग्रह करतो. त्याची सर्व घटना तो ख्रिस्ती बांधवाला सांगतो.
     थोडा वेळ विचार केल्यानंतर ख्रिस्ती बांधव त्याला त्याचे शर्ट द्यायला सांगतो व स्वत:चे शर्ट त्या खुनी माणसाला देतो व सांगतो, “ह्या माझ्या शर्टवर एक सुद्धा डाग असता कामा नये”. त्या दोघांनी ऐकमेकांची शर्ट अदलाबदल केली. जेव्हा त्या घरामध्ये पोलीस आले, तेव्हा पोलिसांनी ख्रिस्ती माणसाला खुनी समजून घेऊन गेले. त्याच्यावर खुनाची केस झाली, कोर्टामध्ये त्याचा गुन्हा पण सिद्ध झाला. न्यायाधीशाने त्याला मरण दंडाची शिक्षा ठोठावली व उद्याच त्याला फासावर लटकवण्यात यावे असा आदेश दिला.  
     खरा खुनी त्या ख्रिस्ती माणसाच्या घरी सुरक्षित होता. त्याला त्याचाच हेवा वाटू लागला. जेव्हा त्याला समजले की त्या ख्रिस्ती माणसाला मरणदंडाची शिक्षा दिली आहे, तो थोडाही विलंब न करता कोर्टामध्ये गेला पण त्याचा काहीही उपयोग नव्हता. तो नंतर पोलीसांजवळ गेला व त्याचा गुन्हा त्याने कबुल केला. पण खूपच उशीर झाला होता. कारण त्या माणसाला कधीच फाशी दिली होती. त्याने स्वत:ला म्हटले की, ‘त्याने माझा गुन्हा स्वत:वर घेऊन त्याची भरपाई केली.’ त्याला ख्रिस्ती माणसाचे शब्द आठवले: ‘माझ्या शर्टवर एक सुद्धा डाग लावू देऊ नकोस’. अशाप्रकारे त्याने पश्चाताप केला व जीवन बदलले.

मनन चिंतन:  
    
     क्रुसावरील येशूच्या दु:खात सहभागी होण्यास आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपण सर्वजण ख्रिस्ताच्या दु:खसहनामध्ये भाग घेण्यास आलो आहोत. येशूचं दु:ख आपलं करण्यास ह्या पवित्र ठिकाणी मनन चिंतन करावयाव आलो आहोत. ख्रिस्ताच्या जीवनावर एक चांगले गीत आहे.
“मी वेचिले फुलांना काटे, ख्रिस्त मिळाले.
जखमी करुनी तुजला मला सर्व रे मिळाले.
हाती-पायी तुजिया, रुतले खिळे दुधारी.
मी रोगमुक्त झालो, फटके तुला मिळाले”.
ह्या छोट्याशा गायनाच्या कडव्यातून ख्रिस्ताचे वर्णन केलेले आहे. ख्रिस्त स्वत:साठी मेला नाही तर दुसऱ्यांसाठी मेला. आम्हाला रोगमुक्त करण्यासाठी येशूने स्वत:च्या शरीरावर काटेरुपी व खिळेरूपी दु:खे जग कल्याणार्थ वाहिली. आमच्या पापकर्मामुळे तो स्वत: जखमी झाला. आमच्या पापाच्या ओझाखाली तो चिरडला गेला. पण परमेश्वराचे कार्य शेवट पर्यंत म्हणजेच शरीरामध्ये जीव-प्राण असे पर्यंत त्याने कार्यरत ठेवले.
     येशू जीवनाच्या शेवट पर्यंत सत्य बोलला. सत्याला अनुसरून त्याने त्याचे कार्य पूर्ण केले; सत्याला चिकटून राहिला. त्याने सत्याला आपली ढाल बनवली आणि देवाच्या शब्दांना त्याने तलवार बनवून असत्यतेचा संहार केला. येशू सत्याचे जीवन जगत होता आणि असे हे सत्याचे जीवन जगत असताना कुठेतरी शास्त्री-पुरुषांचा ढोंगीपणा चवाट्यावर यायला लागला होता त्यामुळे त्यांना येशूची भीती वाटत होती. त्या कारणास्तव: येशूला जीवे मारण्याचा कट त्या दूषकर्मी माणसांनी रचला. ढोंगी माणसे, स्वत:च्या अभिमानासाठी व उच्च स्थान मिळविण्यासाठी कुठल्याही स्थराला जावू शकतात. कारण सत्य वचन हे कडू व दु-धोरी तलवारी सारखे असते. या माणुसकीच्या जाळ्यात देहाच्या रस्सीचा खेचाखेचि होत असताना तो शांत मेंढरा सारखा होता. का? कारण तो सत्याने वागला होता आणि याच सत्यासाठी त्याने स्वत:चे बलिदान दिले.
सत्य हे ऐका खऱ्या मित्रा प्रमाणे आहे. ते स्वत:चा प्राण देण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. हेच सत्य त्याने त्याच्या शिष्यांना शिकविले. शिष्यांना त्याने मित्र म्हणून संबोधले. म्हणून योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय १५:१३ मध्ये येशू असे बोलतो की, “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्या पेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.” याच शिष्यांद्वारे आपण सर्वजण त्यांचे मित्र झालो.
     येशूने बारा शिष्यांची निवड केली होती. जेणेकरून त्याचे कार्य पुढे नेण्यास मदत होईल. पण ते सुद्धा निष्फळ झाले. जेव्हा येशूला पकडण्यात आले तेव्हा ते पळून गेले. त्या शिष्यां मधल्या जुदासने येशूला थोड्याश्या पैशापोटी विकूनही टाकले. तर पेत्राने जो ख्रिस्तासाठी मरावयास तयार होता त्याने तर सर्व लोक समुदायांपुढे येशूला नाकारले आणि ते सुद्धा तीन वेळा.
“मित्राच्या मृत्यूपेक्षा, मैत्रीचा मृत्यू हा अधिक दुख:दायक असतो. त्याचप्रमाणे, येशूच्या शरीरावरील घायाच्या वेदनेपेक्षा शिष्यांनी नाकारून व फसवून दिलेल्या वेदना ह्या क्लेशदायक व त्रासदायक होत्या.”
जो विश्वासघात शिष्यांकडून झाला तोच आतापण होत आहे. एका नीतिमान माणसाला क्रुसी खिळले ते आजही होत आहे. एका निष्पाप माणसाला त्याचे शरीर रक्तबंबाळ होईपर्यंत मारणे हे पण आज चालत आहे. जे २००० वर्षा अगोदर झाले ते आजही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण आपण त्या शिष्यांप्रमाणे घाबरून होतो. आजच्या समाजात स्त्रियांवर अत्याचार होतात तसेच समाजाचे विविधप्रकारे शोषण होत आहे त्या विरुद्ध आपण काहीही करत नाही. जीवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे ते म्हणजे सिरीयावर झालेला हल्ला. या हल्ल्यामध्ये हजारो-लाखो लोकांनी व निष्पाप बालकांनी त्यांचा प्राण गमावला; त्यांची घरे, रोजगार, सर्वकाही उध्वस्त झाले. ह्या सर्व अत्याचाराला फक्त माणूस व त्याची लोभमय वृत्तीच जबाबरदार आहे. ह्या लोभमय वृत्तीला विसर्जन करून पश्चातापी हृदयाने परमेश्वराकडे वळूया. जे ख्रिस्ताने केले ते आपल्या जीवनामध्ये अनुसरुया जेणेकरून आपण ख्रिस्तासारखे सत्याचे आणि क्षमेचे जीवन जगून ख्रिस्तासारखे ख्रिस्तमय होवूया.