Friday 29 June 2018


Reflections for the homily of 13th Sunday in Ordinary time 
(01-08-2018) by: Br Robby Fernandez






सामान्य काळातील तेरावा रविवार



मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे



दिनांक – १-८-२०१८
पहिले वाचन – ज्ञानग्रंथ :- १:१३-१५; २:२३-२४
दुसरे वाचन - कारीथकरांस दुसरे पत्र :- ८:७.९.१३-१५
शुभवर्तमान - मार्क :- ५:२१-४३


प्रस्तावना

      आज आपण सामान्य काळातील तेरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आम्हांस मरण, स्पर्श, आणि विश्वासाची जाणीव करून देत आहे. आजच्या वाचनामधून आपल्याला समजते कि, देव हा सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा-जेव्हा मानव परमेश्वरापासून दूर गेला, तेव्हा-तेव्हा देवाने मानवाला पुन्हा त्याच्या जवळ आणले आहे. अनेक प्रकारच्या संकटातून, अडीअडचणीतून देवाने मानवाचा बचाव केला. त्याला आपल्या करुणेचा व मायेचा स्पर्श केला. आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानात आम्हास दोन दाखले दिलेले आहेत. दोन्ही दाखल्यामध्ये विश्वासाला प्रथम प्राधान्य दिले आहे, म्हणूनच आपल्याला शुभवर्तमानामध्ये असे दिसून येते कि, ह्याच विश्वासामुळे त्या दोन्ही व्यक्ती बऱ्या होतात.
      आपल्या ही जीवनात विश्वासाची नितांत गरज आहे. व तो विश्वास टिकवून ठेवण्यासाठी प्रभूच्या स्पर्शाची गरज आहे. ह्या मिस्साबलीत सहभागी होत असताना, आपण प्रभूकडे विश्वासाची याचना करूया आणि त्याच्या कृपेचा वर्षाव आम्हावर व्हावा म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन - न्यानग्रंथ :-१:१३-१५; २:२३-२४

      आजचे पहिले वाचन आपल्याला मरणाकडे नव्या दृष्टीकोनातून पाहायला बोलावत आहे. मरण हे परमेश्वराने निर्माण केले नाही, तर ते माणसाच्या वाईट कर्मा मुळे या जगामध्ये आले. परमेश्वराने माणसाला त्याच्या प्रती रुपा  प्रमाणे बनविले, पण माणूस हा स्वःताच्या स्वार्थापायी त्याने स्वःताचे स्वतंत्र गमावले. आणि त्या मुळे सर्वांना मरणाचा अनुभव घ्यावा लागला.

दुसरे वाचन - करीथकरांस दुसरे पत्र :- ८:७.९.१३-१५

      संत पौल आपणा सर्वांना वाचनातून दानशूर होण्यास पाचारण करत आहे. कारण ज्या परमेश्वराने सर्व काही निर्माण केले व तो धनवान असूनही आम्हासाठी गरीब झाला, अशा हेतूने कि आम्ही सर्व धनवान होऊ.

शुभवर्तमान - मार्क :- ५:२१-४३

      आजच्या  शुभवर्तमानातून मार्क दोन व्यक्तीची प्रतिमा आपल्या समोर मांडत  आहे. एक म्हणजे ‘याईर अधिकारी’ व दुसरी म्हणजे ‘रक्तत्स्रावी स्त्री’. ह्या दोन व्यक्तीच्या विश्वासाची प्रचिती दिसून येते. ह्या विश्वासामुळे त्यांना जे हव होतं ते परमेश्वराने बहाल केले. याईरची मुलगी मरण पावली तेव्हा येशू त्याला म्हणाला, “भिऊ नकोस, विश्वास धर”. त्याच विश्वासापायी त्याच्या मुलीला नवजीवन मिळाले, तसेच त्या स्त्रीचा विश्वास सुद्धा खूप प्रबळ व सखोल असा होता, जेव्हा तिने येशूच्या कपड्यांना स्पर्श केला, लागलीच ती बरी झाली आणि सगळ्यानां तिने येशू विषयी साक्ष दिली. या दोन्ही व्यक्ती आपणा सर्वांना एक नवीन आशेचा किरण दाखवतात, आपल्या जीवनामध्ये कितीही अडी-अडचणी आल्या तरी आपला विश्वास दृढ असायला पाहिजे.

बोधकथा

     हि एक सत्य घटना आहे. जी मुंबई मध्ये घडलेली होती. एका तरुण मुलगा असतो. त्याचे नाव दिनेश असते. तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असतो. अभ्यासामध्ये खूप हुशार. तसेच तो ख्रिस्ती कुटुंबामध्ये वाढलेला असतो. पण त्याचा परमेश्वरावर अजिबात विश्वास नसतो. त्याचे आईवडील त्याला चर्च मध्ये जायला सांगायचे पण तो काही त्यांचे ऐकत नव्हता. एकदा कॉलेज मध्ये असताना तो जमिनीवर कोसळला. शिक्षकांनी त्याला हॉस्पिटल मध्ये हलवले, व त्याच्या आईवडिलांना कळवले. त्याचे आईवडील खूप चिंतेत होते. पण ह्या सर्वांचा परिणाम त्या मुलावर काहीही झाला नाही.
     आईवडिलांनी जेव्हा डॉक्टरकडे विचारले तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले कि, दिनेशला ब्रेन ट्युमर असल्याने त्याला असे होत आहे. तर लवकरच त्याचे ऑपरेशन नाही केले तर मुलगा दगावू शकतो. दिनेशच्या आईवडीलांच्या  हृदयावर दुखाचा डोंगरच कोसळला. त्यांनी काय करावे ते त्यांना समजत नव्हते. ऑपरेशनसाठी पैसे गोळा केले. ऑपरेशन होऊन सुद्धा तो ट्युमर तसाच होता. त्यांनी मुंबई येथील ताबोर या ठिकाणी जायचे ठरवले. आणि दुसऱ्या दिवशी ते ताबोरला प्रार्थना सेंटरवर गेले व त्या ठिकाणी दोन तीन दिवस राहिले. जेव्हा प्रार्थना चालू होती तेव्हा फादरांनी सागितले कि, परमेश्वर एका तरुणाचा ब्रेन ट्युमर बरा करत आहे, पण त्यासाठी त्याने त्याचा विश्वास दृढ करायला हवा. जेव्हा दिनेश व त्याचे आईवडील ताबोर वरून आले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांजवळ जाऊन चौकशी केली पण त्याचा काहीही उयोग झाला नाही तो ट्युमर तसाच होता. तेव्हा त्याच्या आईला त्या फादारांचे शब्द आठवतात, तेव्हा ती आई तिच्या मुलाकडे जाऊन सांगते कि, जर तू परमेश्वरावर विश्वास दृढ नाही केला तर तुझा हा ट्युमर बरा होऊ शकत नाही. तेव्हा त्या दिनेशला त्याच्या कृतीचा खूप पश्चाताप झाला. व त्याने त्याच्या आईला जोराने मिठी मारून रडू लागला. व तो बोलला होय मी विश्वास ठेवितो. थोड्या वेळा नंतर त्याला ऑपरेशन साठी पुन्हा ऑपरेशन थेटर मध्ये नेले तेव्हा काय चमत्कार झाला, त्या मुलाला असलेला तो ट्युमर त्या ठिकाणी नव्हताच. हे सर्व पाहून डॉक्टराना विश्वास बसत नव्हता. हे सर्व घडले कारण त्याच्या विश्वासामुळे आणि याच विश्वासाने त्याला मरणाच्या दारातून ओढून आणून नवीन जीवन दान दिले.

मनन चिंतन

      “नीतिमान जगे विश्वासाने स्वर्ग त्या मिळे. म्हणून जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत आपला विश्वास असायला हवा.”
आजच्या ह्या आधुनिक युगात आपण एवढे गुरफटून गेले आहोत की, आपल्याला दुसऱ्याचा नव्हेच, पण स्वतःचा विचार देखील करायला वेळ नाही. अशा वेळी आपण सर्वजण एकच विचार करतो की, कमी वेळात जास्त कसे मिळवावे किंवा सर्वकाही आपल्याला जलद कसे मिळेल यावर आपला केंद्र बिंदू असतो. जेव्हा परमेश्वरावर श्रद्धा ठेवण्याची वेळ येते तेव्हा सुद्धा आपणाला सर्वकाही जलद हवे असते. जो पर्यंत परमेश्वर चमत्कार करत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही. गावात अशी म्हणायची प्रथा आहे कि,जोपर्यंत चमत्कार होत नाही तोपर्यंत आपण नमस्कार करत नाही.’ परमेश्वराला आपण ATM प्रमाणे मानले असते. आपण आपल्या स्वार्थासाठी त्याचा पुरेपूर उपयोग करत असतो. आपण सर्वजण दुःखाचा, कष्टाचा, पापांचा व मरणाचा अनुभव ह्या दैनंदिन जीवनात घेत असतो. आपणा सर्वांना ठाऊक आहे की, परमेश्वर हा दयाळू व कृपाळू आहे. जरी आपण त्याला अन्य दृष्टीकोनातून पाहीले, तरी तो आपल्याला त्याच्या बालकाप्रमाणे पाहत असतो. ह्या जीवनात दुःख, कष्ट व मरण ह्याच अनुभव येतो कारण माणूस परमेश्वरा विरुद्ध गेला, त्यामुळे मरणाने प्रवेश केला. शलमोनाचा ज्ञानग्रंथ २:२३-२४ मध्ये असे नमूद केले आहे की,
देवाने मानवाला अविनाशी असे निर्माण केले आणि त्याला शाश्वत प्रतीरुपाप्रमाणे बनवले; पण सैतानाच्या द्वेषामुळे मरणाने जगात प्रवेश केला आणि त्याच्या पक्षाच्या असणाऱ्या साऱ्यांना मरणाचा अनुभव येतो.
 या मरणावर विजय मिळवण्यासाठी येशूने स्वतःचे बलिदान दिले व सैतानाच्या मोहातून सुटका करून दिली व आम्हाला सर्वांना नवजीवन प्राप्त करून दिले.

आजचे वाचन हे मार्क ह्या शुभवर्तमानातील असून याला “ मार्कन सेंडविच” म्हणून हा उतारा प्रसिद्ध आहे. आता हे “मार्कन सेंडविच” म्हणजे काय? बायबलच्या उताऱ्यामध्ये दुसरी घटना, पहिल्या घटनेला व्यत्यय आणते व त्यानंतर पहिल्या घटनेचा किंवा गोष्टीचा अंत होतो, यालाच म्हणतात “मार्कन सेंडविच”. शुभवर्तमनामध्ये येशू चमत्कार करताना दिसत आहे; त्यामुळे त्याच्या अवती-भवती गर्दी जमलेली दिसते. हे लोक त्याला पाहण्यासाठीच नव्हे, तर त्याच्या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी आले होते. कारण तो त्यांना एका अदभूत माणसासारखा दिसत होता. त्यामुळे लोकं त्याच्या जवळ आकर्षिली किंवा खेचली जायची, त्यामळे येशू ख्रिस्त खूप लोकप्रिय झाला होता. जर आपण त्याच्या जीवनावर दृष्टीकोन टाकला तर  त्याच्या जीवना मध्ये तीन P’S आढळतात. १) preaching (प्रचार) 2)power (शक्ती) 3)parables(दृष्टांत) ह्या तीन गोष्टीमुळे लोकांचा झुंडी त्याच्या मागे जायच्या. त्याच्या ह्या मधुर वाणीमुळे लोकांना त्याची आस वाटायची. त्याच्या त्या अधिकारयुक्त शब्दापुढे सैतानी शक्ती सुद्धा नतमस्तक व्हायची. तो लोकांना बरे करायचा, त्याने सागितलेल्या सर्व दृष्टातामुळे लोक भारावून जायचे.
आजच्या वाचनामध्ये सुद्धा त्याच प्रकारचे वातावरण पाहायला मिळते. येशू ख्रिस्त दोन व्यक्तींना बरे करतो. पहिली म्हणजे याईराची कन्या आणि दुसरी म्हणजे  रक्तस्त्राव झालेली स्त्री. जर ह्या दोन्ही व्यक्तीची तुलना एकमेकाशी केली तर असे दिसून येते कि, याईर हा नामवंत अधिकारी होता पण त्या स्त्रीचा काहीही दर्जा समाजामध्ये नव्हता. एक बाजूला तो खूप श्रीमंत होता तर दुसरीकडे हि स्त्री आर्थिक दृष्ट्या दुर्बलझाली होती. तसेच यहुदी धर्माच्या परंपरे प्रमाणे ती एक अशुद्ध स्त्री होती. जर तिने कोणाला शिवले तर ते अशुद्ध होत असे. याईर हा मोठा अधिकारी असला तरी त्याने येशू पुढे स्वतःच्या कन्येसाठी भिक मागितली, व त्याच्या पाया पडून त्याने विनंती केली. जेव्हा हि स्त्री तिच्या रोगातून बरी झाली तेव्हा तिने सुद्धा येशूच्या पाया पडून त्याला व जमलेल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी घडलेली घटना सांगितली. अशा प्रकारे आपल्याला दिसून येते कि, येशू ख्रिस्त हा देव आहे. त्याचे सामर्थ्य रोगावरच नव्हे, तर मरणावर सुद्धा आहे; म्हणून तो याईरच्या मुलीला मरणाच्या दाढेतून उठवतो, व नवजीवन बहाल करतो. असे म्हणतात  कि, ‘निद्रा हे तात्पुरते मरण आहे व मरण हे कायमस्वरुपाची झोप आहे.’ ह्याच कायमस्वरूपी निद्रावर, त्याने कायमस्वरूपी विजय मिळवून आम्हाला अजिंक्याचे दिवस पाहण्यास भाग्य दिले आहे.
परमेश्वर त्याच्या चमत्कारी स्पर्शाने आपल्याला नविन रूप देतो. हे नविन रूप त्याने याईराच्या कन्येला व स्त्रीला बहाल केले. ह्या ठिकाणी दोन चमत्कारी स्पर्श आढळतो. दैवी स्पर्श व मानवी स्पर्श. दैवी स्पर्श- या ठिकाणी खुद्ध परमेश्वर आपणाला भेटायला येतो, उदाहरणार्थ- ‘याईराची कन्या’ व मानवी स्पर्श- या ठिकाणी आपण परमेश्वरा जवळ जातो, उदाहरण म्हणजे-‘रक्तस्त्राव स्त्री’. विश्वास हा आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाया असला पाहिजे, आपण फक्त चमत्कारावर न अवलंबून राहता, आपला विश्वास दृढ करणे फार गरजेचे आहे. तर देऊळमाता आपल्याला आवर्जून सांगत आहे कि, चमत्कार पाहून नमस्कार करण्यापेक्षा विश्वास वाढवून चमत्कार अनुभवूया! म्हणून जेव्हा आम्ही परमेश्वरावर खरा विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला त्याच्या प्रेमाची, दयेची अनुभूती येते.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे सामर्थ्यशाली प्रभू आमचा विश्वास मजबूत कर.
1.      आपले परमगुरु फ्रान्सीस, महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी यांना  देवाचे काम करण्यासाठी विपुल असा आशीर्वाद मिळवा. ते जे निस्वार्थी काम करतात त्यांच्या त्या  कामामध्ये परमेश्वराचे सहाय्य लाभावे व त्यांनी त्याच्या कार्य द्वारे सर्व ख्रिस्ती लोकांना देवाकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.      आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी आपला राजकीय धूर्तपणा सोडून निस्वार्थीपणे लोकांची व देशाची सेवा करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
3.      जे आजारी आहेत अश्या सर्वांना सदृढ, शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे व त्यांचे सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
4.      जे कोणी देवापासून दूर गेले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करूया, जेणेकरून त्यांनी मागे वळून परत एकदा सामर्थ्यशाली येशूला आपला देव म्हणून स्वीकारावे व आपले संपूर्ण जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
5.      आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करूया.


Thursday 21 June 2018


Reflections for the homily of Solemnity of John the Baptist 
(24-06-2018) by: Br Jackson Nato.




कारण प्रभू त्याच्याबरोबर होता







योहान बाप्तिस्तचा जन्मदिन

दिनांक : २४-०६-२०१८
पहिले वाचन : यशया:- ४९:१-६
दुसरे वाचन : प्रेषिताची कृत्ये:- १३:२३-२६
शुभवर्तमान : लुक:- १:५७-६६,८०

प्रस्तावना

     ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण योहान बाप्तीस्ता ह्याचा जन्म दिन साजरा करत आहोत. योहान हा बायबल मधील शेवटचा संदेष्टा. त्याने आपले संपूर्ण जीवन देवराज्याच्या तयारीसाठी समर्पित केले. साधेपणा, नम्रता व सत्याशी एकनिष्ठता, ह्या गुणाद्वारे तो देवाशी विश्वासू राहिला.
     आजची तिन्ही वाचने आपल्याला योहानाची विशेष ओळख करून देतात. पहिल्या वाचनात यशया संदेष्टा योहानाचा जन्म व त्याचे कार्य ह्याबद्दल भाकीत करतो. दुसरे वाचन आपल्याला परमेश्वराने योहानाद्वारे पाठविलेल्या तारणाबदल माहिती करून देते. तसेच शुभवर्तमान योहानाच्या रहस्यमय जन्माबद्दल आपल्याला सागत आहे.
     योहान हा देवभिरू होता. देवासाठी जगणे हे त्याचे आद्य ध्येय होते आणि त्यासाठी तो प्राणास मुकला. ह्या मिस्साबलिदानात भाग घेत असताना आपण देवाशी अधिकाधिक विश्वासू होण्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन : यशया:- ४९:१-६

     हा उतारा आपल्याला देवाचा सेवक कोण असेल व त्याचे कार्य काय असेल ह्याविषयी स्पष्टपणे सांगत आहे. इतिहासात जर आपण पहिले तर इस्त्राईल जनता परकीय राष्ट्राच्या छळाला बळी पडली. त्यांच्या जीवनाचा केंद्र बिंदू म्हणजे मंदिरपडले गेले. त्यांना बाबिलोन देशात गुलाम म्हणून नेले. अशा परिस्थितीत आपला समूळ नायनाट होईल काय, ह्या विचाराने इस्त्राईल जनता ग्रासली आहे. अशावेळी यशया संदेष्टा त्यांना त्याच्या आशेचा किरण दाखवतो. त्यांचे दुख यातना, गुलामिगिरी हा फक्त मर्यादित आहे, कारण परमेश्वर त्यांच्यामध्ये एक संदेष्टा पाठवील. त्याची ओळख म्हणजे त्याचे मंदिर तो पुन्हा उभारिल, त्यांनी हरवलेली प्रतिष्ठा तो पुनस्थापित करील, आणि हे तारण फक्त इस्त्राईल पुरतेच नव्हे तर दिगंतापर्यंत पसरविल. म्हणजेच परमेश्वराच्या तारणात संपूर्ण जगाचा समावेश असेल.

दुसरे वाचन : प्रेषिताची कृत्ये:- १३:२३-२६

     ह्या उताऱ्यात संत पौल, देवाचे भय बाळगणाऱ्यांना उदेशून सांगतो कि, आपल्याला तारणाची वार्ता पाठवलेली आहे. तो ह्या उताऱ्यात योहानाविषयी सांगतो कि, योहानाने स्वताः त्याची साक्ष दिली. योहान हा एक प्रतीचीत संदेष्टा लोकनी जवळून पहिला होता. त्याने लोकांना बाप्तिस्मा दिला. त्याकाळात बाप्तिस्मा घेणे म्हणजे, यहुदी धर्म व त्याद्वारे याहावेहाच देव आहे, असे मत अंगीकारने. पण योहानाने हो घोषणा इस्त्राईल लोकांमध्येसुधा केली म्हणजे जरी ते निवडलेल्या लोकांचे वंशज असले तरीसुद्धा त्यांनी परिवर्तन करून स्वतःला निवडलेले असे पुनर्घोषित करावे. इथे संत पौल एकाच गोष्टीचे तुणतुणे वाजवतो ती म्हणजे येशूहा ख्रिस्त आहे आणि त्याची साक्ष योहानाने दिली आहे. आणि जर योहानास आपण खऱ्या देवाचा संदेष्टा मानत असू तर त्याच्या मुखातून येणारे शब्द सुद्धा खरे मानण्यास आपण संकोचू नये.    

शुभवर्तमान : लुक:- १:५७-६६,८०

     ह्या उताऱ्यात लुक आपणास योहानाचा जन्म कथित करत आहे, पण ह्या उताऱ्याचा प्रमुख मुद्दा असा कि देव तारण कार्यास स्वताः सुरुवात करणार आहे आणि ती सुद्धा आपणामध्ये उपस्थित राहून करणार आहे. आणि ह्या तारणात आपणास सहभागी व्हायचे असेल तर आपण पश्चाताप करायला हवा. योहानाचा जन्म रहस्यमयरीत्या झाला. त्याच्या जन्माद्वारे त्याच्या आईवडिलांना आनंद प्राप्त झाला. मग त्याच्या कार्याने तो परमेश्वराच्या आगमनाच्या तयारीची भूमिका बजावणार होता.

मनन चिंतन

     मजकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे, म्हणून मी तुला प्रकाश असे नेमितो.”(यशया:४९:६)
     परमेश्वराने ह्या सृष्टीची निमिती केली आणि सर्व वस्तूवर व जीवांवर मनुष्याचे वर्चस्व प्रस्थापित केले. आदाम व हव्वा ह्या दोन व्यक्तीस त्याने सर्व सजीव व अजीव गोष्टीवर अधिकार दिला. कारण ते देवास प्रिय होते. देव त्याच्याबरोबर, त्याच्यामध्ये होता. सर्व काही सुरळीत होते. पण ह्या सुखाचे दिवस काही कालावधीपुरतेच उरले; कारण परमेश्वराने निषिद्ध केलेल्या झाडाचे फळ त्यांनी खाल्ले. देवाच्या आज्ञेचा भंग केला व जगात पाप अवतरले. देव आणि मानवामध्ये दुरावा निर्माण झाला. परमेश्वराने मानवास जवळ आणण्यासाठी वेगवेगळी युक्त्या चालविल्या पण मनुष्य मात्र पापाच्या जाळ्यात अधिकाधिक अडकला गेला. परंतु संपूर्ण जगाचे तारण व्हावे म्हणून परमपित्याने एक योजना आखली व काळाच्या पूर्ततेनंतर येणाऱ्या प्रत्येक पिढीने तारणाचे फळ चोखावे यासाठी योहान बाप्तीस्त्यास बोलाविले.
     आज आपण योहानाचा जन्म दिन साजरा करत आहोत. ख्रिस्ताच्या जन्माने नवीन पर्वाला सुरुवात झाली. पण ह्या पर्वाची पूर्व तयारी करण्यासाठी परमेश्वराने योहानाला निवडिले. योहान हा ख्रिस्ताचा सुकून होता. ख्रिस्त देवराज्य घोषित करणार आहे, त्या अगोदर लोकांना त्याबद्दल जाणीव व्हावी, हे गरजेचे होते. ख्रिस्त ज्यासाठी ते अनेक वर्षे थांबले होते, त्यास स्वीकारण्यास इस्रायेल जनता पात्र असावी म्हणून योहान बाप्तीस्मा देत सर्व ठिकाणी फिरला. पश्चाताप करा आणि देवाकडे वळाहा संदेश त्याने गळा फोडून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत केला.     
     योहानाच्या जीवनावर जर आपण प्रकाश टाकला तर देव किती दयाळू व कनवाळू आहे हे आपल्याला कळून चुकते. खुद्ध योहानह्या नावाचा अर्थ म्हणजे कृपा किंवा द्या. योहानाच्या नावातच परमेश्वराची द्या आपल्याला पाहण्यास मिळते. त्याच्या जन्माने परमेश्वराने त्यांच्या आईवडिलांवर नव्हे तर संपूर्ण जगावर दया केली. आजच्या शुभवर्तमानावर जर आपण नजर फिरविली तर आपल्यला समजतें कि, योहान हा त्याच्या आईवडिलांना त्यांच्या उतारवयात झालेला मुलगा. योहानाची आई अलिशिबा हिला समाजाने वांझ म्हणून ओळखले. यहुदी समाजात वांझपण हे फक्त शारीरिक दोष नव्हे तर पूर्वजाच्या किंवा स्वतःच्या पापामुळे मिळालेला एक शाप. आणि त्यामुळे तिला लोकांपासून होणाऱ्या निंदेला सामोरे जावे लागले. पण त्या टीकेची परमेश्वराने जाणीव घेतली. व उतारवयात आई होण्याचे भाग्य तिच्या पदरात पडले. समाजाने लावलेला शापित ठसा पुसून काढला. लुक १:४८ परमेश्वराने आपल्या दासीच्या दैन्यावस्तेचे अवलोकन केले.हे वचन तिच्या जीवनात पूर्णत्वास आणले. योहान ह्या नावामुळे त्याचा पिता जखाऱ्या ह्याची मुखी वाचा उघडली.
     परमेश्वराची दया फक्त योहानाच्या कुटुंबांपुरती मर्यादित नव्हती. तर येणाऱ्या प्रत्येकाला संपूर्ण जगासाठी दयेची दारे उघडी होणार होती. आदम व हव्वाच्या पापामुळे परमेश्वर मनुष्यापासून दूर गेला. तेव्हापासून मनुष्य पापाच्या कचाट्यात सापडला होता. हे दुरावलेले नाते पुन्हा एकदा जुळावे म्हणून परमेश्वराने खुद्ध आपला पुत्र ह्या जगात पाठविण्याचे ठरविले. परमेश्वर आपल्या जवळ येणार आपल्या मध्ये राहणार त्यासाठी पापाची घाण साफ करावी. कारण देव आपल्या घरी येणार आहे. त्याला स्विकारण्यास आपली हृदये तयार असावी म्हणून योहान लोकांना बाप्तिस्मा देत जागोजागी फिरला.
     योहानाच्या जीवनातील महत्वाचा पैलू म्हणजे तुरुंगात असताना त्याच्या मनात संशयाने प्रवेश केला. जो बाहेर देवाच्या नावाने चमत्कार, सत्कृते करत आहे तो नक्कीच मसीहा आहे ना? आपण ज्याला बाप्तिस्मा दिला तो ख्रिस्तच आहे ना? ह्या संशायाशी दोन हात करत असताना तो आपला विश्वास गमावून बसला नाही उलट शिष्यांना पाठवून तो खरोखरच ख्रिस्त आहे अशी चौकशी करून तो अधिक दृढ केला.
     आपले दैनंदिन जीवनावर जर आपण मनन चिंतन केले तर ते योहानापेक्षा काही आगळेवेगळे नाही. अलीशिबेप्रमाणे आपण सुद्धा समाजाच्या निंदेला विनाकारण बळी पडतो. आदम आणि हव्वाप्रमाणे पापासमोर गुडघे टेकतो. योहानाप्रमाणे ख्रिस्तावरील संशय आपल्यामनात घर करून बसतो. अशा वेळी परमेश्वराने आपले तारण केले आहे. आपल्या दैन्यावस्थेतचे परमेश्वर नक्कीच अवलोकन करील. ह्या आशेने पुढे पाऊल टाकून जगलो पाहिजे. योहानाने दिगंतापर्यंत प्रकाश पोहोचवला. ख्रिस्ताची ओळख करून देण्यास शेवटपर्यंत झटला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा ख्रिस्त दुसऱ्यांना द्यावा, परमेश्वराच्या तारणकार्यात सहभागी व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

1.       हे परमेश्वरा तुझ्या सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप, फादर्स व सर्व व्रतस्त बंधूभगिनी, ह्यांना तुझे कार्य करण्यास शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे. तुझ्याशी एकनिष्ठ राहून जगाला तुझी ओळख द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.       जे लोक देवापासून दूर गेले आहेत. त्या सर्वाना दैवी दयेचा स्पर्श व्हावा व त्यांनी देवाकडे वळून एक नवीन, विश्वासू जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया.
3.       जी कुटुंबे दैनिक वाद-विवादाला बळी पडून मोडकळीस आली आहेत, त्या कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला भर यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
4.       जी दांपत्ये, असून बाळाच्या देणगीसाठी वाट पाहत आहेत, त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व बाळाच्या देणगीने त्याचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून प्रार्थाना करूया.
5.       ह्या पावसाळी हंगामात चांगला पाऊस पडावा व सर्व प्राणी, पक्षी व शेतीची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून प्रार्थना करूया.  
6. थोड्या वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.






Thursday 14 June 2018


Reflection for the Homily of 11th  Sunday (17-06-2018) in Ordinary Time by Br. Rahul Rodrigues. 






सामान्य काळातील अकरावा रविवार




दिनांक: १७/०६/२०१८
पहिले वाचन: यह्ज्केल १७: २२-२४
दुसरे वाचन: २ करिंथ ५:६-१०
शुभवर्तमान: मार्क ४:२६-३४









प्रस्तावना:

     आज आपण सामान्य काळातील अकरावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल संदेष्ट्याद्वारे देव म्हणतो की, “मी निचास उंच व जे स्वतःला उंच असे मानतात त्यांना नमविल”. तर दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये, ‘श्रद्धेच्या मार्गदर्शनाने आम्ही धैर्याने वागतो आणि प्रभूला संतोषविणे हेच आमचे ध्येय होय’ असे म्हणतो.
     तसेच शुभवर्तमानात आपण पाहतो की येशू देव-राज्याची तुलना ‘मोहरीच्या बी’ बरोबर करतो. मोहरीचे बी हे दिसण्यात जरी लहान असले तरी रुजल्यानंतर ते सर्व झाडा-पाल्यामध्ये मोठे होते व ते अनेकांच्या आश्रयाचे आशास्थान बनते. कारण ते जरी दिसण्यात लहान असले तरी त्या मध्ये एक मोठे वृक्ष होण्याची क्षमता असते तसेच त्याला जमिनीशी त्याचे जवळीक जोडावे लागते तेव्हाच ते रुजते.
     तसेच आपणही परमेश्वराचे वचन ग्रहण केले व त्याचा अंकुर आपल्या जीवनात वाढत गेला तर आपले ही जीवन परमेश्वराच्या असंख्य कृपादानानी बहरून जाईल व आपणही त्या मोहरी प्रमाणे फार मोठे होऊ. म्हणून त्यासाठी लागणारी कृपाशक्ती ह्या मिस्साबलीदानात मागुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: यह्ज्केल १७: २२-२४

     ह्या वाचनाचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला त्याचा इतिहास जाणून घेणे फार गरजेचे आहे. इस्त्रायल आपल्या हाताचे बाहुले व्हावे यासाठी बाबेलच्या लोकांनी पध्दतशीर योजना आखून ती पार पाडली होती. त्यांनी राजघराण्यासाठी सर्वांना धरून नेले. पण कारभार पाहण्यास त्यांच्यातील एका दुर्बल माणसाला मागे ठेवले. हा माणूस होता सिद्कीया. त्यांनी त्यांच्याकडून जबरदस्तीने बाबेल तहनामा करून घेतला. आता त्यांच्या दृष्टीने इस्त्राएलची निष्ठा पक्की झाली. देशाचा कारभार चालवण्यास हुशार व कर्तबगार असे जेवढे कोणी होते तेवढ्यांना देशांतरास नेले. यामुळे त्यांनी संघटीत प्रतिकार होऊ देण्याची संधी ठेवली नाही.
ह्या सर्वांत त्यांना वाटले कि आता इस्त्रायलचा नायनाट होईल व ते राज्य संपुष्टात येईल परंतु तसे होत नाही. तर खुद्द देव म्हणतो मी ते राज्य पुन्हा उभारीन.

दुसरे वाचन: २ करिंथ ५:६-१०

      करंथीकारस लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात संत पौल म्हणतो कि, देव आम्हामध्ये कार्य करीत आहे. व त्याचा आत्मा आम्हाला मिळाला आहे. या खात्रीमुळे पौल धैर्याने जगत होता. ४:१६-१८ या वाचनातील प्रमुख विचार त्याने पुन्हा विस्ताराने मांडत आहे. पुढे संत पौल म्हणतो, आम्ही स्वर्गात जाईपर्यंत मंडपरुपी गृहात राहत असून आमचा बाह्य देह क्षय पावत आहे. हि गोष्ट आम्ही लक्षात ठेवतो व हि स्थिती आपण या शरीरात वस्ती करू तोवरच असणार. अशा परिस्थितीत आपण कसे वागावे या प्रश्नाचे उत्तर तो लगेच देत आहे.
    पौलाचे लक्ष्य भविष्य काळावर खिळले होते. भविष्यकाळात जी गौरवी स्थिती विश्वासणाऱ्याला प्राप्त होणार आहे त्याबद्दल त्याला खात्री होती. आज्ञापालनामुळे कठीण प्रसंग आले तरी त्या आज्ञा पळत राहणे हा पौलाचा जीवनक्रम होता. स्वर्गात गेल्यावर प्रभूला संतुष्ट करण्यासाठी तो झटत होता. ख्रिस्त आपल्या मंडळीला घेऊन जाण्यास आल्यावर प्रत्येक विश्वासणारी व्यक्ती ख्रिस्ताच्या न्यायासमोर उभी राहील व प्रत्येकाच्या सेवेचे मूल्यमापन होईल.

शुभवर्तमान मार्क ४:२६-३४

     संत मार्क आपल्याला आज आपल्या अध्यात्मिक वाढी संबधीचे सुस्पष्ट दाखले देत आहे. आमच्या अंतःकराणामध्ये देवाच्या राज्याची सतत शांतपणे वाढ होत असते हे आम्हाला पहिल्या दाखल्यातून सांगण्यात आले आहे. आपण चिंतातूर होऊन धडपड करण्याची काहीच गरज नाही. पेरलेले बी वाढून आपोआप फळ देईल. नैसर्गिक वाढीची प्रतिक्रिया आपल्याला समझत नाही. पण त्या वाढीत सहभागी होण्यासाठी ती समझुन घेण्याची आम्हाला गरज नाहीच. पिक मिळण्याचे अभिवचन तर आहेच पण त्याबरोबर पवित्र शास्त्रात अनेकदा देवाच्या न्यायाची सूचनाही आहे.
     दुसऱ्या दाखल्यामध्ये पुन्हा न लक्षात येणारी वाढ आणि त्याचे आश्चर्यकारक परिणाम याचे वर्णन केले आहे. मोहरीचे बीअगदी छोटे असते पण त्याची वाढ झाली कि कालांतराने एका मोठ्यात मोठ्या रोपात त्याची गणना केली जाते. देव राज्याची वाढ हि अशीच असते. प्रारंभी ते अगदी अल्प वाढते पण अखेरीस त्याचाच जय होतो.

बोधकथा

    एकदा एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या व्यक्तीने त्याच्या सुट्टीच्या दिवसात काही वैद्यकीय औषधात पिवळ्या रंगाचे पावडर मिसळून कपडे धुण्याचे पावडर म्हणून विकू लागला. व त्याला निरमा असे नाव दिले. काही दिवसाताच ह्या निरमा पावडरला फार मागणी वाढली. व अखेरीस त्याने  निरमा नावाची कंपनी चालू केली. हळूहळू त्याने निरमा साबण व टूथपेस्ट ही बनवली. व त्याला फार मागणी मिळाली. काही वर्षातच ह्या व्यक्तीने ६०० करोड रुपये चा नफा केला. त्या व्यक्तीचे नाव आहे करसान भाई पटेल. त्याचे वडील एक गरीब शेतकरी होते. आज निरमा कंपनी फार नावाजलेली आहे. त्याच्या जीवनाची कथा आजच्या शुभवर्तमानाशी फार जुळत आहे. ज्याप्रमाणे बीज पेरल्यावर ते एखाद्या वृक्षामध्ये वाढत जाते त्याचप्रमाणे करसान भाईचा व्यवसाय ही वाढत गेला.

मनन चिंतन :

     स्वर्गाचे राज्य हे एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. आज पुन्हा एकदा आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू ख्रिस्त लोकांना शिकवण्यासाठी दोन दाखल्याचा वापर करतो. कारण ते लोक सर्वसामान्य होते व त्यांना शिकवण्यासाठी येशू ख्रिस्ताने अगदी साधी व सरळ भाषा वापरली व त्यांना महत्व पटवून देण्यासाठी त्याच्या दररोजच्या जीवनातील गोष्टीचा समावेश केला .
     तसे पाहता मोहरीचा दाण्याचा दाखला हा खूप प्रेरणादायी आहे. मोहरीचा दाणा खूप लहान असतो. परंतु त्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर होते. हे सर्व मोहरीच्या दाण्यांमध्ये असलेल्या शक्तीमुळे होते. हाच वृक्ष अनेकांच्या आश्रयाचे स्थान बनतो. तसेच आपण जर परमेश्वराचे वचन ग्रहण केले व त्याचा अंकुर आपल्या जीवनात वाढत गेला तर आपले जीवन परमेश्वराच्या असंख्य कृपादानांनी बहरू शकते.
     परंतु बऱ्याच वेळेला आपण स्वतःला कमी लेखतो. आपण म्हणतो मला हे जमणार नाही पण खरे पाहता आपल्या सर्वामध्ये भरपूर अशी क्षमता व सामर्थ्य असते. ज्या प्रमाणे मोहरीचा दान इतका छोटा असून मातीच्या संपर्कात येताच एका वृक्षात वाढतो त्याच प्रमाणे आपल्यालाही वाढण्यासाठी देवाच्या सानिध्यात येणे फार गरजेचे आहे.
     ह्यासाठी आपल्यला जीवनात परमेश्वराला प्राधान्य दिले पाहिजे तरच आपल्याला त्याच्या कृपेचा अनुकूल असा अनुभव मिळेल. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचे सर्वस्व अर्पण करून आपणा सर्वांचे तारण केले. त्याच्याठायी आपण सर्वजण मोहरीच्या दाण्यासारखे आहोत. आपण जरी स्वतःला अपात्र समजत असलो; व देवापासून दूर गेलो असलो तरीसुद्धा परमेश्वर सतत व कायम स्वरूपी आपल्यावर करुणामय दृष्टीने पाहत असतो.
     तसेच आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण देवाच्या राज्याविषयी सुद्धा एकतो. ज्या प्रमाणे एखादा शेतकरी बी पेरतो. परंतु त्या बीजाला अंकुर कसा फुटतो व त्याचे रोपटे कसे तयार होते हे त्या शेतकऱ्याला कळत नाही. देवाने घातलेल्या निसर्गाच्या नियमानुसार सर्व काही घडत असते. व तेच आपण आजच्या पहिल्या वाचनात एकतो कारण आपला देव असा आहे जो वाकडया ओळीवर सुद्धा सरळ लिहतो. देवाचे राज्य त्यासारखेच आहे. देवाच्या वचनाचा अंकुर माणसाच्या जीवनात वाढत जातो व माणूस देवाच्या अधीन असल्यामुळे देवराज्याच्या दिशेने अपोआप वाटचाल करतो.
     ज्या प्रमाणे संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात म्हणतो कि, मी देवाच्या जवळ असो कि दूर असो पण मला देवाला प्रसन्न करण्यास बरे वाटते. मला त्याच्या सानिध्यात राहून त्याची सेवा करणे बरे वाटते. तसेच आपले सुद्धा असावे. आपलेही ध्येय देवाच्या सानिध्यात राहून, त्याची सेवा करणे असावे.
     तर आपणही देवाच्या सानिध्यात राहून मोहरीच्या दाण्यासारखे एका वृक्षात वाढावे व मोठे व्हावे यासाठी लागणारी कुपा, शक्ती आणि सामर्थ्य श्रद्धेने प्रभूचरणी मागू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद :- हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

1. आमचे परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व प्रभूच्या प्रेमशांतीचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
2. यंदाच्या वर्षी सुद्धा आपल्याला चांगला पाऊस मिळावा व आपल्या शेतकरी बांधवाना चांगले पिक घेता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
3. जे कोणी आजारी आहेत त्यांना चांगले आरोग्य, जे दुःखी आहेत त्यांचे दुःख दूर व्हावे व जे एकटे आहेत अशांना प्रभूचा सहवास मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
4. जे तरुण-तरुणी देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहे, त्यांना प्रभूच्या प्रकाशात मार्गक्रमण करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या प्रेमाकडे वळावे म्हणून प्रार्थना करूंया.
5. दहावी बारावी चे रिझल्ट लागले आहेत, त्या विद्यार्थांनी जीवनात चांगला मार्ग निवडावा व आयुष्यात चांगले काही करावे व त्यासाठी लागणारी कृपा, दृष्टी व सामर्थ्य त्यांना लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
6.थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक गरजासाठी देवाकडे प्रार्थना करूया.