Friday 22 February 2019



Reflection for the Homily of 7th SUNDAY IN ORDINARY TIME (24-02-19) By Br. Robby Fernandes 



 सामान्य काळातील सातवा रविवार


दिनांक: २४/०२/२०१९
पहिले वाचन: १ शमुवेल २६:२, ७-९, १२-१३, २२-२३
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:४५-४९
शुभवर्तमान: लूक ६:२७-३८




"तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा"


प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सातवा रविवार साजरा करीत आहोत. देव दयाळू व कनवाळू आहे. आजची उपासना आपल्याला हे गुण अवगत करून, ख्रिस्ती जीवन जगण्यास आमंत्रण करीत आहे. जरी आपले जीवन हे कष्टाचे, दुःखाचे व ताणतणावाचे असले तरी परमेश्वर सांगत आहे की, आपले संपूर्ण जीवन हे ख्रिस्ताप्रमाणे प्रीतीचे व प्रेमाचे असले पाहिजे.
पहिले वाचन हे शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले आहे. परमेश्वराने दावीद राजाचा शत्रू शौलाला त्याच्या हाती दिला होता. पण त्याने त्याला जीवे मारले नाही, कारण त्याला देवाने अभिषिक्त केले होते व त्याचा न्याय हा देवच करेल म्हणून शौलाला न मारता ते निघून जातात. तर दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, पहिला आदाम हा मातीचा आहे व दुसरा आदाम हा स्वर्गातून आलेला आहे. जसे आपण पहिल्या आदामाचे प्रतिरूप झालो, त्याचप्रमाणे दुसऱ्या आदामचे सुध्दा प्रतिरूप व्हायला पाहिजे. तसेच लुककृत शुभवर्तमानात आपल्यला सांगितले आहे की, येशूने जसे त्याच्या वैऱ्यावर किंवा शत्रूवर प्रीती केली, तीच प्रीती आपल्या शत्रूवर करण्यास आजचे वाचन आपल्याला आव्हान करीत आहे.
ज्याप्रमाणे सूर्योदयाचा व पावसाच्या सरीचा अनुभव आपल्या जीवनात होतो त्याचप्रमाणे देवाची दया व माया आपल्याला विनामुल्य लाभत असते. तर ह्या मोफत कृपेचा अनुभव प्रीतीद्वारे आपल्या जीवनात घेण्यासाठी परमेश्वराची कृपा मागुया.     

सम्यक विवरण:
पहिले वाचन: १ शमुवेल २६:२, ७-९, १२-१३, २२-२३

          ह्या पुस्तकामध्ये आपल्याला शमुवेल दाखवून देत आहे की, परमेश्वर सर्वांचा राजा आहे. जेव्हा शौल दावीदला मारण्यासाठी शोधत होता; खुद्ध परमेश्वर शौल राजाला दावीदच्या हातामध्ये देतो. पण दावीद शौल राजाला काही करीत नाही. पण त्याला समजावे म्हणून त्याच्या जवळचा भाला व पाण्याचा चंबू एक चिन्ह म्हणून ठेवून जातो. याचे एकच कारण की, परमेश्वराने शौल राजाला त्याच्या हातामध्ये दिले होते. पण हे घृण कृत्य त्याने केले नाही; कारण शौलाला परमेश्वराने राजा म्हणून अभिषिक्त केले होते.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:४५-४९

      संत पौल आपल्या पत्रात दोन आदामांची तुलना करीत आहे. पहिला मनुष्य आदाम हा जिवंत प्राणी असा झाला व शेवटचा आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. पहिला आदाम हा मातीचा आहे, तर दुसरा स्वर्गातून आहे. तसेच पौल सांगतो की, ज्याप्रमाणे आपण पहिल्या आदामाचे प्रतिरूप धारण केले त्याचप्रमाणे जो स्वर्गातील आहे त्याचे प्रतिरूप आपण धारण केले पाहिजे, म्हणजेच आपण ख्रिस्ताचा स्वभाव अंगिकारला पाहिजे किंवा ख्रिस्ताचे गुण अवगत केले पाहिजेत.

शुभवर्तमान: लूक ६:२७-३८
लुकलिखित शुभवर्तमानात आपणांस सांगण्यात आलेले आहे की, आपण आपल्या शत्रूवर प्रीती, प्रेम करायला शिकलं पाहिजे. जे शाप देतात त्यांना आशीर्वाद द्यायला शिकलं पाहिजे. तसेच जे निर्भत्सना करतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे. आजचे वाचन दयावंत व उपकारवादी बनण्यास आपल्याला आमंत्रण करत आहे. वैऱ्यावर प्रीती करा, त्यांचे बरे करा व निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ हे मोठे असेल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण परमेश्वर सर्वांवर दया करतो. तो दयाळू आहे व आपण त्याच्या सारखे दयावंत व्हायला बोलावत आहे.
 मनन चिंतन: 
हात त्याचे, पाय त्याचे, खिळे मात्र माझ्या पापाचे,
मस्तक त्याचे, पण त्या मस्तकावर काट्यांचा मुकुट मात्र माझ्या पापांचा
शरीर त्याचे, श्वास त्याचा, घाव त्याचे, घाम त्याचा, तारण मात्र माझे.

       ख्रिस्ताने मानव जातीवर एवढे प्रेम केले की, त्या खातर त्याने स्वताःचे सर्वस अर्पण केले. त्याने प्रेम केले व प्रेम करायला शिकविले, त्याने दया केली व दया करायला शिकविले व शेवटी क्रुसावरून त्याच्या मारेकऱ्याना माफ केले व माफ करायला पण शिकविले आणि हे सर्व त्याला साध्य झाले त्याचे एकच कारण म्हणजे मनुष्य जातीवर त्याने अफाट असे केलेले प्रेम.
       येशू ख्रिस्त हा वास्तववादी माणूस म्हणून या भूतलावावर जगला. येशू ख्रिस्ताला माहित होते की, आपण डोळ्यासाठी-डोळा व दातासाठी-दात ह्या पद्धतीने जगलो तर संपूर्ण जग हे आंधळे  व दाता विना होणार. हे सर्व थांबवण्यासाठी आपल्या जवळ एकच मात्र उपाय आहे तो म्हणजे; ख्रिस्ताच्या नियमाचे अनुसरण करणे, तर हे ख्रिस्ताने बोलूनच दाखवलं नाही तर ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणले. त्याने त्याच्या मारेकराना माफ केले. त्याने त्याच्या शत्रूचां द्वेष केला नाही तर त्याच्यासाठी प्रार्थना केली. आपण सर्वजण ख्रिस्ती आहोत. ख्रिस्तामध्ये आपण राहिलो पाहिजे, तेव्हाच आपल्याला जीवन प्राप्त होईल. तेव्हाच आपल्या जीवनाच नुतनीकरण होईल, आपल जीवनात नवचैतन्य येईल. ज्या प्रमाणे ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये, तो नवचैतन्याचा झरा बनला; त्याच नवचैतन्याने आपण सुद्धा त्या झऱ्याचे पाणी लोकांपर्यत पोहचवल पाहिजे. परमेश्वर हा जेव्हा पाऊस पाठवतो, तेंव्हा तो पाहत नाही. कोण शत्रू व कोण चांगले व कोण वाईट. तो सर्वाना समानतेने देतो. कारण त्याचं प्रेम हे सिमापलीकडचे असते. त्याच्या प्रेमाला आपण सीमित करू शकत नाही.
       येशूच्या कारकिर्दीमध्ये शास्त्री, परुषी व धर्मपंडीत ह्यांना खूप मान होता. त्यांचा वरचढपणा होता, त्यामुळे त्यांनी अनेक नियम लोकांवरती लादले होते. त्या कारणास्तव लोक धर्माच्या ओझ्याखाली दडपली होती. धर्माचे नियम पाळने हे सक्तीचे केले होते. व जो कोणी धर्माच्या नियमाचे उल्लंघन करील, त्याला शिक्षा होत असे. धर्माच्या नावाखाली लोकांची खूप पिळवणूक होत होती. पण ख्रिस्ताने लोकांसाठी नवा मार्ग खुला करून दिला. जे नियम लोकांना देवापासून वंचित करत असत त्या विरुद्ध त्याने आवाज उठवला. शिष्यांना  प्रत्यश मार्गदर्शन दिले. त्याने स्वतः दाखवून दिले की शत्रूवर कसे प्रेम करावे.  लूक ६ : २७: २८ मध्ये येशू सांगतो कीतुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा, जे तुमचे द्वेष करितात त्यांचे बरे करा. तुम्हास शाप देतात, त्यांस आशीर्वाद द्या व जे तुमची निंदा करतात त्यासाठी प्रार्थना करा.आणि ह्या साध्या व सोप्या पद्धतीने तो लोकांना मार्गदर्शन करत असे.
                शिष्य व पहिले ख्रिस्ती ह्यांनी येशू ख्रिस्ताची शिकवणूक त्यांच्या कार्यातून दाखवून दिली. त्याचप्रमाणे जे परधर्मप्रांतांतील आहेत त्यांनी सुद्धा ख्रिस्ताची शिकवण जी प्रेमाच्या व प्रितीच्या स्तंभावर उभारली होती; ही शिकवण त्यांनी आत्मसात केली. पण जस जशी वर्षे उलटली, तसतशी ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये सुद्धा बदल करण्यात आला कारण माणसाने स्वतःच्या सुखाला प्रथम प्राधान्य दिले व अशा प्रकारे ख्रिस्ताला आणि त्याच्या शिकवणुकीला दुय्यम स्थान दिले.
       मानवजात ही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या व भाषेच्या नावाखाली खूप काही धर्मयुद्धे, जातीवाद करून लोकांच्या मनावर त्यांनी ह्या सर्व विचारांचा पडदा घातला होता. त्यामुळे लोक त्यांच्या जातीपुरते, त्यांच्या धर्मापुरते व भाषेपुरते मर्यादित राहिले. अशामुळे मानवधर्म नष्ट होत गेला. येशूख्रिस्त हा मानवधर्म स्थापन करण्यासाठी आला होता व ह्या मानवधर्माचा मुलभूत पाया होता तो म्हणजे प्रेम होय. म्हणून संत पौल करिंथ करांस पहिले पत्र १३:१३ मध्ये सांगत आहे की, “विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यात प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे.
       आपण सर्वजण ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. त्यामुळे आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे मानवजातवाचविण्याची. ही फक्त प्रेमाने, क्षमेने आणि दयाळूपणानेच बचावली जाऊ शकते. त्यासाठी आपण स्वतःपासून ख्रिस्ताचे कार्य सुरु ठेवायला देऊळमाता आपणा सर्वांना प्रेमाने आमंत्रण करीत आहे.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे परमेश्वरा, दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक
१) आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधुभगिनी ह्यांना आपल्या कार्याकडे देवाच्या नजरेतून पाहण्याचे धैर्य लाभावे आणि त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या सेवाकार्यात सतत बदल करत राहावे म्हणून प्रार्थना करूया.
२) आपल्यावरील दुःखामुळे, अडीअडचणी आणि संकटांमुळे आपण निराश न होता येशूच्या कृपेने जीवनाकडे अधिक आशेने पाहावे आणि तसे इतरांना आपल्या कृतीद्वारे शिकवावे म्हणून प्रार्थना करूया.
३) आपल्या धर्मग्रामासाठी प्रार्थना करूया की, जेणेकरून या धर्मग्रामातील प्रत्येक भाविकाला प्रभू परमेश्वराच्या प्रेमाचा व दयेचा अनुभव यावा व त्यांनी परमेश्वराच्या कृपेने एकत्र येऊन, एक कुटुंब म्हणून कार्य करावे म्हणून प्रार्थना करूया.
४) जे आजारी आहेत, यातनेत आहेत, अन्याय, अत्याचार, हिंसा यांना बळी पडलेले आहेत अशा सर्वांनी स्वर्गीय भाकरीत कृपेचा अनुभव घ्यावा म्हणून प्रार्थना करूया.
५) थोडा वेळ शांत राहून स्थानिक व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.      

Friday 15 February 2019


Reflection for the Homily of 6th SUNDAY IN ORDINARY TIME (17-02-19) By Br. Julius Rodrigues    





सामान्य काळातील सहावा रविवार



दिनांक: १७/०२/२०१९
पहिले वाचन: यिर्मया १७:५-८
दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र १५:१२, १६-२०
शुभवर्तमान: लूक ६:१७, २०-२६






तो त्यांच्याबरोबर डोंगरावरून खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला 

प्रस्तावना:
          आज आपण सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणा सर्वांना देवावर विसंबून राहण्यासाठी आमंत्रण देत आहे. कारण असे म्हटले जाते, ‘कर्ता आणि करविता, तो एकटा सर्वसमर्थ पिता परमेश्वर आहे.’
          आजच्या पहिल्या वाचनात प्रवादी यिर्मया म्हणतो, ‘मानवी शिकवण तुमचा नाश करील परंतु, दैवी शिकवण तुमचे तारण करील. देवावर आपल्या जीवनाचे कल्पतरू बांधा, तुमचा विकास अधोधित होईल, म्हणजेच दुसऱ्या शब्दात देवावर विसंबून राहण्यासाठी तो आपणांस बोलावित आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस सांगत आहे की, तुमचा विश्वास दृढ करा, कारण त्यामुळे तुम्हांस नवीन जीवनाची देणगी प्राप्त होणार आहे; कारण ख्रिस्त हा मेलेल्यातून उठला आहे. तर कशाप्रकारे आपल्याला आपले जीवन सुखी-समाधानी करता येईल, ह्या विषयी संत लूकच्या शुभवर्तमानात आपणास येशूने सांगत आहे.
          आजच्या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असताना त्या परमेश्वराकडे नवजीवनाच्या देणगीसाठी प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया १७:५-८
          यिर्मया प्रवादी हा देवाने निवडलेला होता आणि म्हणून देवाचे देवपण आपण त्याच्यामध्ये अनुभवत आहोत. देवावर अवलंबून राहणे, ह्याचे वर्णन तसेच मानवी साधनावर भरवसा आणि देवावर भरवसा ह्यामधील फरक आजच्या वाचनात दर्शविला आहे. त्याचप्रमाणे, स्वास्थ्यासाठी, मानवी शक्तीवर विसंबून राहणारा आणि देवावर विसंबून राहणारा अशा दोघोंमध्ये तुलना केली आहे. स्वतःची शक्ती आणि क्षमता यांवर स्वास्थ्यासाठी विसंबून आपले जीवन सुरळीत पायावर आधारण्याचा प्रयत्न सर्वस्वी विफळ होतो. देवावर भरोसा ठेवणे म्हणजे विश्वासाने आज्ञापालन करणे आणि निष्काम कर्म किंवा स्वहित बाजूस ठेवून कार्य करणे हाच जीवनाकडे जाणारा मार्ग आहे.  

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १५:१२, १६-२०
          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौलाचे करिंथकरांस पहिले पत्र यात संत पौल ख्रिस्ताचे पुनरुत्थान व आमचे पुनरुत्थान ह्याविषयी बोलत आहे. त्याने चांगल्याप्रकारे पुनरुत्थानाविषयीची शिकवण लोकांना दिलेली आहे. ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे सत्य असल्याचे सांगून, तो पुढे म्हणतो की, ख्रिस्ताचे पुनरुत्थान हेच मेलेल्यांचे पुनरुत्थान होईल ह्याची हमी आहे. उदा. कोणत्याही पिकाची पहिली फळे, हे आणखी पिक मिळण्याचे चिन्ह आहे.

शुभवर्तमान: लूक ६:१७, २०-२६
          शुभवर्तमानकार लूक प्रस्तुत उताऱ्यात धन्यवाद आणि दुःखोद्गार ह्यांच्यात तुलना करीत आहे. त्याने दोन प्रकारच्या लोकांची तुलना येथे केलेली आहे. पहिल्या गटातील लोक आहेत त्यांचे बाह्यरूप, त्यांची परिस्थिती पाहिली, तर कोणालाही त्यांची दया आणि कीव येईल. दुसऱ्या गटातील लोकांना, सर्व काही मिळाले आहे; ऐहिक, भौतिक मालमत्तेसंबंधीची त्यांची इच्छा तृप्त झाली आहे. जगामध्ये त्यांना चांगल, नावलौकिक प्रतिष्ठा आणि सौख्य मिळाले आहे. परंतु, दुसऱ्या गटातील लोकांना येशूने म्हटले आहे की, त्यांच्याकडे काहीच असणार नाही.

मनन चिंतन:
          आज आपला देश, समाज आणि आजूबाजूची परिस्थिती बदलत चालली आहे. सर्व जग हे पैशाच्या, अभिमानाच्या, श्रीमंतीच्या मागे धावत आहे. माणूस दुसऱ्यांची पर्वा करत नाही आणि माणुसकी सुद्धा विसरत चालला आहे. जर माझ्याकडे श्रीमंती असली, तर मला ह्या जगातील सर्व गोष्टी प्राप्त होतील, असा समज प्रचलित होत आहे. एका हिंदी चित्रपटातील संवाद पुढीलप्रमाणे आहे, ‘मेरे पास पैसा है, बंगला है, तुम्हारे पास क्या है?’ आणि अश्या वेळेस प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे उत्तर असले पाहिजे, ‘मेरे पास भगवान है|’ आज श्रीमंतीने देवाला हिरावून घेतले आहे. आज पुष्कळव्यक्ती ‘मी’पणाने स्वार्थी जीवन जगत आहेत.
          आजच्या पहिल्या वाचनात सुध्दा प्रवादी यिर्मया प्रखर शब्दांत सांगतो की, जो माणूस स्वतःवर अवलंबून राहतो, स्वतःची वाहवा करतो त्याचा नाश होईल, त्याला देवाच्या आशीर्वादाचे फळ मिळणार नाही व त्याचा नायनाट होईल; परंतु जो विश्वास ठेवतो तो सर्व आशीर्वादाचा अनुभव घेईल. त्याच्या जीवनात आनंद पसरेल व त्याची भरभराट होईल. खरा आनंद हा ख्रिस्ताशी एकरूप होण्यात आहे. कारण तोच कर्ता आहे.आज आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू प्रभू येशू आहे का? आपल्या जीवनरूपी नावेचा नावी हा ख्रिस्त आहे, कि जगातील इतर गोष्टी आहेत? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतातकी, ‘तुच आहेस  तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’परंतु प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा पाया आणि शिल्पकार बनवले पाहिजे.
          मेलेला माणूस पुन्हा जिवंत होतो का? असा प्रश्न पुर्वजापासून आजपर्यंत आपल्याला भेडसावत आहे. त्याच प्रकारचा प्रश्न करिंथ येथील लोकांना सुद्धा होता. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथ येथील मंडळीना येशूच्या पुनरुत्थानाविषयी सांगत आहे. कारण लोकांच्या मनात शंका होती की, हे कसे शक्य आहे? पौलाने ख्रिस्त सभेची शिकवण ह्या लोकांना दिलेली होती. कारण ख्रिस्ती विश्वासाचा गाभा हे ख्रिस्ताचे पुनरुत्थान आहे.
          ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने आपल्याला नवीन जीवन लाभले आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचा ह्यावर विश्वास असायला हवा असे संत पौल ह्या लोकांस सांगत आहे. ह्या ठिकाणी देखील ख्रिस्त हा आपल्या जीवनाचा गाभा आहे, असे संत पौल आपणास दर्शवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
          आजच्या शुभवर्तमानात संत लुक आपल्याला येशूच्या शिकवणुकीची तोंड ओळख करून देत आहे. येशूची शिकवणूक हीजगाच्या शिकवणुकीपेक्षा वेगळी आहे. मत्तयच्या शुभवर्तमानात ह्या शिकवणुकीला डोंगरावरील प्रवचन, तर लुकच्याशुभवर्तमानात सपाट मैदानावरील प्रवचन असे म्हटले आहे. येशू म्हणतो की, दीन ते धन्य कारण देवाचे राज्य त्यांचे आहे. जे भुकेले आहेत ते धन्य, जे रडत आहेत ते धन्य; उद्या तुम्ही तृप्त होणार, हसणार. पण हे कसे शक्य आहे? आपणास असे लक्षात येते की, लुक येथे चार दुःख व चार आशीर्वाद मांडत आहे.
          कोंकणीत अशी एक म्हण आहे, ‘आज माका, फाल्या तुका.’ म्हणजे जे आज माझ आहे, ते उद्या तुझ असणार आहे. माझी आजची परिस्थिती उद्या तुझी होणार आहे. हिंदी मध्ये अस म्हटलं जातं कभी ख़ुशी, कभी गम.खरोखरच आयुष्य हे सुख-दुःखाच्या दोन धाग्यांनी विणलेले आहे, आज सुख, तर उद्या दुःख. प्रभू येशू ख्रिस्त देखील माझ्या मते आपल्याला हेच सांगत आहे, सबका वक्त आयेगा. ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की, दुसऱ्यांना हसू नका, कमी लेखू नका, तर एकमेकांना सहाय्य करा आणि परमेश्वराचे वैभव, राज्य या भूतलावर निर्माण करा. खरोखरच परमेश्वर आपला प्रेमळ पिता आपल्या बरोबर सतत असतो आणि म्हणूनच आजच्या तिन्ही वाचनांमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला समजून येईल कि आशीर्वाद आणि दुःख ह्यांची मांडणी केली आहे. ह्या वाचनांद्वारे एक संदेश घेवूया की, ख्रिस्त माझ्या जीवनाचा शिल्पकार आणि केंद्रबिंदू असला पाहिजे.
शेवती कागदाची नाव होते,
पाण्याचा किनारा होतो,
मित्रांचा सहारा होतो,
खेळण्याची मस्ती होते,
परंतु ख्रिस्ताच्या येण्याने,
जीवनाची लॉटरी होते.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे परमेश्वरा, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१) आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना देवाच्या वचनानुसार जीवन जगण्यास व प्रापंचिकांना मार्गदर्शन करण्यास परमेश्वराने विवेकबुध्दी द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात शांती नांदावी, घरातील वातावरण खेळीमेळीचे राहून, प्रार्थनेला अधिक महत्त्व द्यावे, जेणेकरून ख्रिस्त हाच आपल्या कुटुंबाचा केंद्रबिंदू होईल ह्यासाठी आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.
३) मादक पेये व मद्य यांच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीने व कुटुंबाच्या प्रमुखाने केवळ क्षणिक सुखाचा विचार करू नये, तर आपल्या जीवनाला नवे वळण लावण्याचा विचार करावा म्हणून आपण प्रार्थना  करूया.
४) सुखी जीवनाचा महामंत्र परमेश्वराने आपणा सर्वांना आज दिला आहे. त्याने दिलेल्या वचनांवर आपले जीवन विसंबून ठेवावे आणि जीवनांत आनंद उपभोगावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) आपल्या धर्मग्रामातील जे कोणी शारीरिक व मानसिक आजाराने त्रस्त झाले आहेत, त्यांनी प्रार्थनेबरोबर औषधोपचार व मानसोपचारही करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) आता आपल्या वैयक्तिक व सामुहिक गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करूया.


Thursday 7 February 2019


Reflection for the Homily of 5th SUNDAY IN ORDINARY TIME (10-02-19) By Br. David Godinho    



सामान्य काळातील पाचवा रविवार

दिनांक: १०/०२/२०१९
पहिले वाचन: यशया ६:१-२अ, ३-८
दुसरे वाचन: करिंथीकरांस पहिले पत्र १५:१-११
शुभवर्तमान: लुक ५:१-११


भिऊ नको कारण येथून पुढे तू माणसे धरशील

प्रस्तावना:
“तू बोलाविले, सेवा कराया प्रभू आलो आनंदे”
आज आपण सामान्य काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला पाचारण ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास आमंत्रण करत आहे. प्रभू परमेश्वर आपल्या उदारतेने आपल्या प्रत्येकाला त्याची आणि त्याच्या लोकांची सेवा करण्यास पाचारण करीत असतो.
सर्वप्रथम चांगला माणूस बनण्यासाठी व एक चांगले वैवाहिक जीवन जगण्यासाठी, आदर्श कुटुंब बनविण्यासाठी, तसेच धर्मगुरू किंवा धर्म-भगिनी होऊन देव राज्याची सुवार्ता सर्व जगभर पसरविण्यासाठी अशा वेगवेगळया कार्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावीत असतो.
आजची तिन्ही वाचने देखील ‘पाचारणा विषयी’ बोलत आहेत. पहिले वाचन दैवी दर्शनातून यशयाला प्रवक्ता होण्यास झालेले पाचारण ह्यावर आधारित आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल त्याला प्रेषित म्हणून झालेल्या पाचारणाविषयी बोलत आहे. तर शुभवर्तमानात खुद्द येशू ख्रिस्त ‘मासे नव्हे, तर माणसे धरण्यासाठी’ पेत्राला आणि त्याच्या सहकाऱ्यांना बोलावीत आहे.
परमेश्वर आपल्याला बोलावीत आहे, याची जाणीव आपल्याला व्हावी व त्या हाकेला आपण उत्फूर्तपणे व स्व: खुशीने होकार देण्यास पवित्र आत्म्याची कृपा आणि सामर्थ्य आजच्या मिस्साबलिदानात परमेश्वर चरणी मागुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ६:१-२अ, ३-८
दैवी दर्शनात इस्राएलच्या पवित्र देवाशी झालेल्या यशयाच्या भेटीचे वर्णन आजच्या वाचनात केलेले आहे. ह्या दर्शनात त्याने सेनाधीश प्रभू भव्य व उंच सिंहासनावर आसनस्थ असलेला पाहिले. आणि परमेश्वर जणू कोणाला तरी शोधत आहे अशी परमेश्वराची वाणी त्याला ऐकावयास आली. ती वाणी अशी होती की, “मी कोणाला पाठवू? आमचा प्रवक्ता म्हणून कोण जाईल?” आणि ह्या परमेश्वरी हाकेला यशया स्व: खुषीने होकार देतो. असे आपणांस सांगण्यात आलेले आहे.

दुसरे वाचन: करिंथीकरांस पहिले पत्र १५:१-११
          ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे मरतात तेव्हा त्यांचा शेवट असतो, ते पुन्हा जिवंत होत नाहीत. असे शिकविणारे खोटे शिक्षक करिंथ येथील ख्रिस्ती मंडळीत शिरले होते. त्यांचे शिक्षण किती खोटे आहे, हे संत पौलाने विस्ताराने दाखविले आहे. ख्रिस्ती श्रद्धेच्या महत्त्वाच्या बाबीची म्हणजेच ख्रिस्त आपल्या पापासाठी मरण पावला आणि त्याला कबरेत ठेवण्यात आले आणि तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला व त्याने केफाला (पेत्राला) आणि इतर प्रेषितांना दर्शन दिले ह्या विषयी संत पौल खात्रीपुर्वक आपल्याला सांगत आहे. तसेच आपणास प्रेषित म्हणून झालेल्या पाचारणाविषयी येथे नमूद केलेले आहे. म्हणूनच संत पौल म्हणतो की, “जो काही मी आहे, तो देवाच्या कृपेने आहे.”

 शुभवर्तमान: लुक ५:१-११
चार प्रेषितांच्या विशेषतः शिमोन पेत्राच्या पाचारणाविषयी येथे सांगितलेले आहे. त्याच्या पाचारणाची सुरुवात अशा प्रकारे होते. शिमोन पेत्र आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपली जाळी समुद्रावर साफ करत होता. येशू येतो आणि त्याच्या मचव्यात चढून लोकांना शिकवण देतो. ही शिकवण पेत्राने नक्कीच ऐकली असेल. शिकवण देऊन झाल्यानंतर येशू पेत्राला म्हणतो, मासे पकडण्यासाठी तुझा मचवा खोल पाण्यात ने. पेत्र म्हणतो रात्रभर कष्ट करून आम्हाला काही मासळी भेटली नाही, परंतु ‘तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून मी माझी जाळी समुद्रात टाकतो.’ आणि जाळी फाटेपर्यंत त्यांना मासळी मिळते. आणि पेत्राच्या तोंडून नकळत शब्द निघतात, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी आहे. आणि येशू त्याला प्रेषित होण्यास पाचारण करतो. आणि सर्व काही सोडून ते त्याच्या मागे गेले, असे आपणास आजच्या शुभवर्तमानाच्या शेवटी सांगण्यात आले आहे. ह्यावरून आपल्याला असे दिसून येते की, प्रभू जर आपल्याला बोलावित असेल, तर आपण सगळ्या वस्तूचा त्याग करून ख्रिस्ताचा पाठलाग करावयास उत्सुक असले पाहिजे.

बोधकथा:
          एका राजा जवळ एक सुंदर असा मौल्यवान हिरा होता. त्याला त्या हिऱ्याचा एवढा अभिमान होता की त्याने तो हिरा आपल्या राज्याचं राष्ट्रीय प्रतिक म्हणून ठेवला होता. हा हिरा एवढा सुंदर व आकर्षित असतो की, तो हिरा पाहण्यासाठी पुष्कळ लोक त्या राज्यात येऊ लागले. तो हिरा आता त्या राज्याची प्रतिष्ठा बनला होता.
एके दिवशी दुर्दैवाने हा हिरा खाली पडतो व त्याला बारीकशी केसाएवढी तडा किंवा फट पडते आणि त्याची आकर्षकता किंवा सुंदरता कमी होते. म्हणून राजाला फार दुःख होते व खूप वाईट वाटते. मग राजा त्याच्या राज्यातील नामांकित कुशल व्यक्तींना बोलावतो व त्यांचा सल्ला घेतो. त्यांनी राजाला सांगितले की, त्या हिऱ्याने त्याचे वैभव आणि मूल्य गमावले आहे. तेव्हा निराशेमध्ये राज्याने संपूर्ण राज्यात घोषणा केली की, “जर कोणी हा हिरा दुरुस्त करेल, तर त्या व्यक्तिला खूप मोठे बक्षीस देण्यात येईल.” परंतु कोणीही तो हिरा दुरुस्त करण्यास पुढे आला नाही. शेवटी राजा तो हिरा दुरुस्त होणार ही आशा सोडणार एवढ्यात हिऱ्यावर कोरीव काम करणारी एक गरीब म्हातारी बाई राजाजवळ आली आणि म्हणाली, “तो हिरा मला द्या, हिरा घेऊन ती बाई म्हणाली की, हया हिऱ्यावरील ही लहानशी तडा ज्यामुळे ह्या हिऱ्याची सौंदर्यात नष्ट झाली आहे, तीच तडा ह्या हिऱ्याच्या प्रतिष्ठेला किंवा सौंदर्यतेला कारणीभूत ठरेल.” असे म्हणून तो हिरा घेऊन ती बाई राजाच्या नजरे आड झाली.
थोड्या दिवसानंतर ती बाई हा हिरा घेऊन राजाकडे परत आली आणि हिरा पाहताच राजा खूपच आश्चर्यचकित झाला. त्या हिऱ्याला आता पहिल्यापेक्षा खूप सुंदर असे नवीन आकर्षित रूप मिळाले होते. त्या बाईने त्या हिऱ्यावर हस्तकलेने सुंदर असे गुलाबाचे फुल कोरलेले होते आणि  त्या फुलाचा देठ म्हणून तडा गेलेल्या त्या फटीचा उपयोग केला होता. त्यामुळे तो हिरा आता पहिल्यापेक्षा अधिक आकर्षित दिसत होता.
तात्पर्य : देव वाईटापासून चांगले निर्माण करू शकतो.  
       
मनन चिंतन:
          जर आपण आजच्या जगात नजर मारली, तर आपल्याला समझेल की, जगात खूप अशी स्पर्धा चालू आहे. कुठल्याही क्षेत्रात म्हणा, प्रत्येकाला पहिलं यायचं आहे. आणि जर ह्या जगातील स्पर्धेत टिकायच असेल तर, चांगल्या कुशल माणसांची किंवा प्रशासकांची गरज आहे. जर आपल्याकडे चांगले ज्ञान असेल, व्यवस्थापनाचे कौशल्य असेल, तरच आपण ह्या जगातील स्पर्धेत भाग घेऊ शकतो. जर एखाद्याची चांगली कंपनी असेल व जर त्याला ही कंपनी ह्या जगात टिकवायची असेल, तर चांगल्या कुशल, उच्च शिक्षण असलेल्या, हुशार, बुद्धिमान आणि अनुभव असलेल्या माणसांची निवड करणे गरजेचे आहे. तेव्हाच त्याचा ह्या जगातील स्पर्धेत ठाव लागेल नाहीतर कालांतराने ती कंपनी बंध होईल.
          परंतु, काहीतरी विपरीत असं आपल्याला येशूच्या शिष्यांच्या बाबतीत ऐकायला मिळते. येशूने त्याच्या राज्याची स्थापना करून त्याचा कारभार पाहण्यासाठी अशिक्षित, अनपड मासेमारी करणाऱ्या लोकांची निवड केली. असे नाही की, त्यावेळी चांगले शिकलेली माणसे नव्हती, शास्त्री-परुशी हे खूप शिकलेले होते, त्यांना सखोल असं ज्ञान होतं, तसेच खूप वकील सुध्दा होते. ह्यांची निवड न करता ख्रिस्ताने ह्या अनपड, न शिकलेल्या कोळ्यांची निवड केली. त्यांना त्याने त्याचे सहकारी बनवले व त्यांच्या हातात स्वर्ग राज्याच्या चाव्या दिल्या.
          देव त्याचे कार्य पुढे नेण्यास कोणाला पाचारण करतो, हे आपल्याला आजच्या शुभवर्तमानात सांगितलेले आहे. खरे पाहता पाचारण हे देवा कडून येत असते. त्याची सेवा करण्यासाठी आणि त्याचे राज्य पुढे नेण्यासाठी देव त्याच्या इच्छेप्रमाणे लोकांची निवड करत असतो. बायबलमध्ये आपण पाहतो कि, अब्राहाम, मोशे, दावीद राजा, मरीया आणि संत योसेफ ह्यांना झालेल्या पाचारणात देव पुढाकार घेतो असे आपणास पहावयास मिळते. गेल्या रविवारी यिर्मया प्रवक्त्याच्या पुस्तकातून घेतलेल्या वाचनात प्रभू म्हणतो, “तुला जीवन देण्या अगोदरच, मी तुझी निवड केली आहे” (यिर्मया १:५). तसेच शमुवेलच्या पाचाराणात आपणास दिसून येते कि परमेश्वर त्याला हाक मारतो (१ शमुवेल ३:३). योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू म्हणतो, “तुम्ही माझी निवड केली नाही, परंतु मीच तुमची निवड केली आहे” (योहान १५:१६). यावरून आपल्याला समजते की, परमेश्वर आपल्याला बोलाविण्यास पुढाकार घेत असतो आणि तोच आपली निवड करीत असतो.
          परमेश्वर कोणाची निवड करतो? अनुवाद ७:७ मध्ये इस्रायेल प्रजेविषयी सांगितले आहे, प्रभू म्हणतो, “प्रभूने तुमच्यावर प्रेम केले, तुम्हाला निवडून घेतले, ते तुम्ही इतर राष्ट्रांपेक्षा बहुसंख्य होता म्हणून नव्हे, वास्तविकता तुम्ही तर सर्वांत अल्पसंख्य होता म्हणून.” म्हणजेच परमेश्वर सर्व सामान्य माणसांना त्याची सेवा करण्यास आणि त्याचे कार्य पुढे नेण्यास बोलावीत असतो. म्हणजेच देव हा जगाच्या ज्ञानी किंवा बुद्धिवान लोकांची निवड करीत नाही, तर देवाचे शहाणपण हे जगाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. त्याचे सुवार्तिक बनण्यासाठी आपल्याला त्याची हाक ऐकणे फार गरजेचे आहे. ही हाक आपल्याला कोठे ऐकावयास मिळते?
१. कुटुंब: कुटुंबामध्ये देवाच्या हाकेचे बी आपल्या हृदयात पेरले जाते. म्हणून आई-वडिलांनी आपल्या लेकरांना देवाच्या प्रेमाची, प्रार्थनेची ओढ लावणे गरजेचे आहे. त्यासाठी दररोज कौटुंबिक प्रार्थना करणे गरजेचे आहे.
२. देव शब्द: प्रभू शब्दाचे वाचन करणे आणि त्यावर मनन चिंतन करणे फार महत्त्वाचे आहे. कारण बायबल द्वारे देव आपल्याशी सवांद करीत असतो. आणि त्याच्या योजना आपल्याला कळवीत असतो.
जेव्हा आपण कौटुंबिक प्रार्थेनेला आणि देव शब्दाला प्रथम स्थान देऊ तेव्हा आपल्यामध्ये त्याची सेवा करण्याची आणि त्याच्या सान्निध्यात राहण्याची भावना उत्पन्न होईल आणि ही भावना म्हणजेच परमेश्वरी हाक असते. आजच्या शुभवर्तमानात शिकवण देवून झाल्यानंतर म्हणजेच देव शब्दा नंतर येशूने पेत्राला बोलावले. जेव्हा आपण पेत्राप्रमाणे देवाच्या हाकेला स्वः खुषीने होकार देतो, तेव्हा देव आपल्याद्वारे अदभूत अशी आगळीवेगळी कार्य करतो. तेव्हाच आपण बोलू शकू,
“ऐकुनी देवा हाक तुझी, चरणाशी तुझिया आलो मी.”
  
 विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू, तुझी सेवा करण्यास आम्हाला कृपा दे.

१. पवित्र देऊळमातेचे सेवक पोप फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्म-भगिनी, धर्म-शिक्षक व सर्व ख्रिस्ती प्रापंचिक ह्यांच्याद्वारे तुझी व तुझ्या प्रजेची सेवा करण्यास आणि त्यांना केलेल्या पाचाराणात ते विश्वासू राहण्यास लागणारी कृपा त्यांना मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, विशेषकरून आपले राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रीमंडळ व इतर अधिकार यांनी भारताच्या संविधानातील नियम पाळून देशाचा कारभार चालवावा व निःस्वार्थीपणे देशाची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. हे प्रभू तू म्हणतो, “पीक फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत.” म्हणून तुझ्या मळ्यात काम करण्यासाठी अनेक तरुण-तरुणींनी स्व: खुशीने पुढे यावे व आई-वडिलांनी त्यांच्या ह्या निर्णयाला पाठींबा व प्रोत्साहन द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. पवित्र शास्त्राला अनुसरून देऊळमातेच्या शिकवणीप्रमाणे आम्ही खरे ख्रिस्ती जीवन जगावे. आई-वडिलांचा सन्मान, आजारी भाऊ-बहिणींची सेवा, शेजारप्रीती, रंजल्या गांजल्यांना मदत अशी सेवादायी कृत्ये आपल्या हातून घडावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण विशेष प्रार्थना करूया अशा लोकंसाठी जे कामा-धंद्याच्या शोधात आहेत. जे आजारी आहेत, व्यसनाधीन आहेत, ज्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ज्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात, जे अनाथ आहेत व ज्या जोडप्यांना लेकरे नाहीत. अशा सर्व लोकांना देवाने भरपूर असा आशीर्वाद द्यावा आणि सतत त्यांच्या पाठीशी राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूसमोर ठेवूया.

Friday 1 February 2019




Reflection for the Homily of 
4th SUNDAY IN ORDINARY TIME 
 (03-02-19) By Br. Jackson Nato 






सामान्य काळातील चौथा रविवार

दिनांक: ३/०२/२०१९
पहिले  वाचन: यिर्मया १:४-५, १७-१९
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १२:३१-१३:१३
शुभवर्तमान: लूक ४:२१-३०







कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या गावात स्वीकारला जात नाही.

प्रस्तावना:
          आज आपण सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत असताना ख्रिस्त हा असामान्य व्यक्ती होता, हे ओळखण्यास देऊळमाता आपल्याला आमंत्रण देत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात, यिर्मयाला देवाने केलेल्या पाचरणाची गोष्ट आपण ऐकतो व यिर्मयाप्रमाणे आपणाला सुद्धा परमेश्वराने निवडले आहे, ह्याची आठवण आपण करणे गरजेचे आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल आपणांस प्रेमाचा बोध करत आहे. आपले जीवन हे प्रेमावर आधारित असावे कारण प्रेम हे शाश्वत आहे. तर आजचे शुभवर्तमान येशूचा त्याच्याच लोकांनी केलेल्या धिक्काराबद्दल सांगत आहे.
          आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपणा प्रत्येकाला वेगवेगळ्या कार्यासाठी निवडले आहे व ते कार्य आपण प्रेमाने करावे ह्याची सतत आठवण ठेवली पाहिजे. प्रेमावर आधारित जीवन आपल्याला ख्रिस्ताची ओळख पटवून देईल व त्याद्वारे ख्रिस्त आपल्या जीवनाचा कायापालट करील हे मात्र नक्की. ख्रिस्ताला ओळखण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात आपण विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया १:४-५, १७-१९
आजच्या वाचनात परमेश्वर म्हणतो की, मी तुला अनाधी काळापासून ओळखत आहे आणि तू माझी सुवार्ता संपूर्ण राष्ट्रांत घेवून जावी म्हणून मी तुला माझा संदेष्टा नेमिले आहे आणि त्यासाठी तुला पवित्र ठेविले आहे. म्हणून तू तयार रहा मी जे वचन तुला सांगत आहे ते सर्व लोकांना निर्भीडपणे घोषित कर. कारण जर तू त्यांना घाबरलास, ते काय म्हणतील तुझा स्वीकार करतील की  नाही ह्याकडे लक्ष दिलेस, तर मी तुला त्यांच्यासमोर घाबरवीन. म्हणून परमेश्वर त्याला म्हणतो घाबरू नकोस मी तूला ध्यैर्य देईन. आणि म्हणून तू माझे वचन सर्व लोकांना, गरीब-श्रीमंत, राजे व सामान्य माणसे ह्या सर्वांना घोषित कर ते कदाचित तुझा धिक्कार करतील पण त्यांचा वर्चस्व तुजवर होणार नाही कारण मी तुझ्या पाठीशी आहे.    

दुसरे वाचन: १ करिंथ १२:३१-१३:१३
ह्या वाचनात संत पौल करिंथकरांस बोध करून सांगतो की, ह्या प्रीतीवाचून श्रेष्ठ काहीही नाही. आपणा प्रत्येकाला वेगवेगळ्या कृपादानांनी परमेश्वराने आशीर्वादित केले आहे. पण समाजाच्या सुरळीत कारभारासाठी प्रीतीची गरज भासते. कारण एकमेकाप्रीत्यर्थ असणारी प्रीती आपणा सर्वांना एकत्र बांधून ठेवते. कारण प्रीती आपल्या समाजाला तडा पाडणाऱ्या अनैतिक मुल्यांपासून दूर ठेवते. हेवा, राग, मत्सर, गैरवर्तणूक, बढाया मारणे ही अनैतिक मुल्ये आहेत. त्यात प्रीती आनंद मानत नाही. तर सत्यामध्येच स्वतःचे पूर्णत्व शोधते. संत पौल पुढे सांगतो की, प्रीती कधी अंतर देत नाही. ह्या जगातील सर्व गोष्टींची मुदत एक ना एक दिवस संपेल आणि फक्त विश्वास, आशा आणि प्रीती अशा ह्या तीन गोष्टी शेवटपर्यंत उरतील आणि ह्यात सर्वात श्रेष्ठ प्रीती आहे.

शुभवर्तमान: लूक ४:२१-३०
आजचे शुभवर्तमान हे गेल्या रविवारच्या शुभवर्तमानाचा दुसरा भाग आहे. गेल्या रविवारच्या उपासनेत आपण पाहिलं की, येशू ख्रिस्त स्वतः बद्दल आपणच ‘तारणारा आहे’ ह्याची साक्ष देतो व स्वतःची ओळख दर्शवितो. पण आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, त्याला स्वतःच्या गावात, लोकांत स्विकारण्यास लोक तयार नाहीत. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की, संदेष्ट्याला त्याच्या गावात व देशांत मान नाही. कारण येशू ख्रिस्तालाच नव्हे, तर भूतकाळात त्यांच्या पूर्वजांनी सुद्धा संदेष्ट्यांना हीच वागणूक दिली होती. म्हणून येशू ख्रिस्त हे कडू शब्द त्यांना उद्देशून म्हणतो. कारण अशा ह्या कठोर हृदयामुळे यशया, एलिया संदेष्ट्यांच्या काळात परमेश्वराने परदेशीयांना प्राधान्य दिले. परमेश्वराने परदेशीयांना प्रथम स्थान द्यावे व इस्राएल लोकांना दुय्यम स्थान द्यावे हे इस्राएल लोकांना स्विकारणे अजिबात मान्य नव्हते. कारण परमेश्वर हा फक्त इस्राएल लोकांचाच आहे अशी त्यांची समजूत होती. म्हणून त्यांनी रागाच्या भरात येशूला ठार मारण्याची धमकी दिली. ह्याचा अर्थ असा की, परमेश्वराचे वचन सांगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कठीण अडचणींचा सामना करावा लागेल.       

 बोधकथा:
          एकदा एका मठवाशी संस्थेचे मठवाशी कमी झाले. ते फक्त चारजण राहिले आणि ह्यापुढे आपली संस्था बंद पडेल ह्या विचाराने ते खंतीत झाले, कारण कित्येक वर्षे त्यांच्या संस्थेस एकही पाचारण लाभले नव्हते. एक दिवस ते एका यहुदी सन्यासी व्यक्तीला भेटले. हा सन्यासी एक चांगला व ज्ञानी मनुष्य होता. त्यांने मठवासीयांना सांगितले की, त्यांच्यामधील एक मठवासी हा मसीहा किंवा ख्रिस्ताचे रूप आहे. हे ऐकून ते चकित झाले व त्या दिवसापासून एक-दुसऱ्याला मसीहा म्हणून वागवू लागले. काही दिवसानंतर त्यांच्यातील एकामेकाबद्दल असलेली प्रेम भावना वाढीस लागली, त्यांच्यातील आपुलकीचा परिणाम असा झाला की, त्यांच्या ह्या वर्तनाने आजूबाजूचे लोक, युवक-युवती त्यांच्या मठाला भेटी देऊ लागली. त्यांच्यासह प्रार्थना करू लागली व सरतेशेवटी काहीजण त्यांच्या मठात सामील झाले. अशाप्रकारे मठवासीयांची संख्या अधिकाधिक वाढत गेली व पुन्हा त्यांची सख्या पुर्नरचित झाली.      

मनन चिंतन:
आजचे शुभवर्तमान हे गेल्या रविवारच्या उपासनेचा दुसरा भाग आहे. गेल्या रविवारी आपण पहिले की, येशूने मंदिरात जाऊन ग्रंथपट उघडला व त्यातून यशया ६१:१ हे वचन वाचले ज्यात लिहिले होते, “परमेश्वराने, माझ्या प्रभूने, त्याचा आत्मा माझ्यात घातला. गरीब लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी आणि दु:खी लोकांचे सांत्वन करण्यासाठी देवाने मला निवडले. बंदिवानांची आणि कैद्यांची मुक्तता झाली आहे, हे सांगण्यासाठी देवाने मला पाठविले.ह्या वचनाद्वारे येशूने त्यांच्यासमक्ष घोषणा केली की, हे वचन त्यांच्यासमोर पूर्ण झाले आहे. ह्याचा अर्थ असा की, ज्या मसिहाची ते वाट पाहत होते, तो आज त्यांच्यासमोर उभा आहे. येशूने स्वतःला प्रकट केले आणि त्या प्रकटीकरणाला लोकांचा प्रतिसाद काय आहे? हे आजचे शुभवर्तमान आपल्या लक्षात आणते.
लोकांचा प्रतिसाद काय होता? ‘हा योसेफचा पुत्र ना?’ ह्या शब्दांनी त्यांनी येशू हा खरोखरच मसिहा नाही ह्या विधानावर शिक्कामोर्तब केला. येशूची ख्याती सर्व ठिकाणी पसरली होती. त्याच्या गावातील लोकाव्यतिरिक्त इतर गावातील लोकांनी, येशूने केलेली चिन्हे पहिली होती आणि विश्वास ठेवला होता. पण नाझरेथकरांना ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण जात होते. येशूच्या वचनाने ते चक्क झाले होते; कारण त्याच्या मुखातून कृपावचने बाहेर पडत होती. तरीसुद्धा ह्या आश्चर्याची नशा काय त्यांच्या डोक्यावर पकड धरू शकली नाही आणि ते लगेच म्हणाले, “हा योसेफचा पुत्र ना?”
सामान्य गोष्टी जेव्हा असामान्य वाटू लागतात, तेव्हा त्या गोष्टीचा असामान्यपणा कबुल करणे आपणास कठीण जाते. समाजात वावरताना ह्या गोष्टींचा अनुभव आपल्याला पावलोपावली येतो. एखादा कमी गुण मिळवणारा विद्यार्थी, जेव्हा मेहनत करून प्रथम क्रमांक पटकावतो तेव्हा त्याला त्याचे श्रेय देण्यास आपण अनिच्छता दर्शवतो. त्याला इतके गुण मिळालेच कसे? नक्कीच त्याने कॉपी केली असेल, असे निष्कर्ष लावतो. आणि हेच येशूच्या बाबतीत घडले. येशू हा सामान्य सुताराचा मुलगा होता. त्याला लहानाचा मोठा होताना त्यांनी पाहिले होते. ज्या गोष्टी सर्वसामान्य व्यक्ती करतो, त्या करताना त्यांनी येशूला पहिले होते. म्हणून 'मसीहा' असा असू शकतो, हे त्यांना पटले नाही. कारण त्यांच्या विचारानुसार 'मसीहा' हा त्यांना राजकीय स्थैर्य मिळवून देणार होता. कित्येक वर्षे दुसऱ्या देशाच्या व आता रोमन लोकांच्या आदेशाखाली ते होरपळून निघाले होते. म्हणून येणारा मसीहा आपल्याला आजूबाजूंच्या देशातच नव्हे, तर जगातील सर्व राष्ट्रांवर व इस्राएलचे वर्चस्व प्राप्त करून देईल, अशी व्याख्या त्यांनी आखली होती. म्हणून आपला मसीहा हा आध्यात्मिक नसून, राजकीय असेल हे त्यांच्या मनात बिंबले होते. पण येशूने त्यांच्या विचारास प्रतिकार केला. कारण येशूचे कार्य हे राजकीय वर्चस्वाचे नव्हते तर, आध्यात्मिक वर्चस्वाचे होते म्हणून येशूने त्यांना विदेशी, पापी, ह्याबरोबर परमेश्वराच्या राज्याचे भागीदार होण्याचे आमंत्रण दिले पण त्यांनी ते धुडकावून लावले.
संदेष्ट्याला त्यांच्या मायदेशात जागा नाही, ह्या शब्दाद्वारे येशूने त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कारण त्यांनी येशूला ओळखण्यास नकार दिला. स्वदेशी कुर्ता घालायला मात्र कधी-कधी आपल्याला  लाज वाटते, परंतु परदेशी जीन्स, जरी ती फाटकी असेल तरीसुद्धा ती घालून मिरवायला आपण संकोचत नाही. आपण आपल्या जीवनात स्वतःचे महत्त्व ओळखायला कमी पडतो. माझ्यामध्येसुद्धा काही कलागुण आहेत. मी सुद्धा एक विशिष्ट कामगिरी करू शकतो. असा आत्मविश्वास बाळगण्यास आपण स्वतःला सामान्य लेखतो. मी सुद्धा काही चांगले करू शकतो, ह्यावर आपण लक्ष देत नाही व दुसऱ्यांना अधिक महत्त्व देतो. त्यामुळे आपण स्वतःची वाट खुंटवतो.
म्हणून आजचे शुभवर्तमान आपल्याला आध्यात्मिक पातळीवर येशूला ओळखण्यास व त्याद्वारे वैयक्तिक पातळीवर स्वक्षमतेला ओळखण्यास निमंत्रण देत आहे. गेल्या रविवारी येशूने स्वतःला प्रकट केले, पण आज मी त्याच्या दैवी पणाला कबूल करतो का? ह्या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला द्यावयाचे आहे. कारण जर आपण आज ख्रिस्ताला ओळखले, तर उद्या ख्रिस्त आपली ओळख जगभर पसरवेल यात मात्र अजिबात शंका नाही.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद : हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
१. 'ख्रिस्ताची सेवा हेच जीवन' ह्या वचनावर आपले जीवन आधारित करणारे आपले परमगुरुस्वामी फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांना मानसिक व शारिरीक आरोग्याचा लाभ व्हावा व ख्रिस्ताची सेवा अधिक जोमाने करण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आजच्या युगात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, ह्यास आळा घालण्यास आपण सर्वांनी पुढे यावे व त्यासाठी लागणारी कृपा आपल्याला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक शारिरीक, भावनिक व लैंगिक अत्याचाराला बळी पडलेले आहेत, त्यांना समाजात वावरण्यास आधार मिळावा व लोकांनी त्यांच्याशी प्रेमाने वागावे व त्यांना आनंदाने जीवन जगण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या देशात वादविवादाला दुजोरा मिळत आहे व धर्माच्या नावाने लोकांमध्ये फूट पाडली जात आहे, ह्या सर्व गोष्टीस वाव न देता एकमेकां प्रीत्यर्थ प्रेम व आपुलकीची भावना वाढीस लागावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा शांतपणे प्रभूचरणी मांडूया.