Thursday 25 July 2019


Reflection for the Homily of 17th SUNDAY IN ORDINARY TIME (28-07-19) By Br. Godfrey Rodriques



सामान्य काळातील सतरावा रविवार





दिनांक: २८/०७/२०१९
पहिले वाचन: उत्पत्ती १८:२०-३२.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र २:१२-१४.
शुभवर्तमान: लुक ११:१-१३


 प्रस्तावना :

आज आपण सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला प्रार्थनेचे महत्व पटवून देत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, अब्राहाम देवाकडे सदोम आणि गमोरा ह्या देशांसाठी प्रार्थना करत आहे आणि त्याच्या प्रार्थने मुळेच परमेश्वर एका नितीमानासाठी सुद्धा पूर्ण शहराचा नाश करणार नाही असे वचन अब्राहामाला देत आहे. संत पौलाचे कलस्सैकरांस लिहिलेल्या पत्रात पौल सांगतो कि तुमच्या बाप्तिस्मा द्वारे आणि देवावरील विश्वासामुळे तुम्हांला तारण प्राप्त झाले आहे. तर आजच्या शुभवर्मानात  येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करण्यास शिकवतो व प्रार्थनेचे महत्व ख्रिस्त त्यांस पटवून देतो. ख्रि
स्ताने शिकविलेल्या प्रार्थने द्वारे ख्रिस्त आपल्या निदर्शनास आणतो कि प्रार्थना हि देवाने मानवाला दिलेली अमुल्य असे दान आहे. म्हणून आजच्या ह्या पवित्र मिस्साबालीदानात सहभागी होत असताना, आपल्याला शिकविलेली प्रार्थना आपण सातत्याने करावी व त्यांचे महत्व इतरांना पटवून द्यावे म्हणून आपण स्वतासाठी आणि एकदुऱ्यासाठी विशेष  प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: उत्पत्ती १८:२०-३२

उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात, आब्राहाम हा आपल्या देवपित्याकडे सदोम आणि गमोरा ह्या देशासाठी प्रार्थना करतो. ह्या दोन्ही प्रांतामध्ये फार वाईट कृत्ये घडली होती, हे दोन्ही प्रांत  देवा पासून दूर गेले होते.त्यामुळे देवाला त्या देशांचा नाश करायचा होता. पंरतु आब्राहामाची त्या देशांचा नाश  व्हावा अशी इच्छा होती, कारण त्याच्या भावाचे कुटुंब त्या देशात वस्ती करत होते म्हणून त्याने देवाची दया त्या प्रांतांवर व्हावी म्हणून प्रार्थना केली. परमेश्वराने त्याची प्रार्थना एकली परमेश्वर त्याला म्हणला कि त्या देशात दहा माणसे जरी नीतिमान असली तरी मी त्यांचा नाशकरणार नाही’. आब्राहामाने देवाशी साधलेल्या सततच्या संवादामुळे व प्रार्थनेमुळे  त्या प्रांतांचे संरक्षण झाले.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र २:१२-१४

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल कलस्सैकरांस लिहिलेल्या पत्रातून आपल्या आठवणीस आणून देतो कि, आपल्या देवावरील विश्वासामुळे आपले तारण झाले आहे, कारण ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाने आपल्या सर्वाचा बाप्तिस्मा झाला तेंव्हाच आपण त्याच्याबरोबर मरण पावलो व पुरले गेलो आहोत व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्याच देवाने आपल्यालादेखील आपल्या मरणातून उठविले आहे, म्हणून देवाच्या सतत सानिध्यात व प्रार्थनेत राहून त्याचे विश्वासू सेवक होण्यास व त्याची साक्ष बनण्यास संत पौल आपणास आमंत्रण करीत आहे.

शुभवर्तमान: लुक ११:१-१३

आजच्या शुभवर्तमानात नमूद केलेल्या उताऱ्यातून आपल्या निदेर्शनास येते कि, प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करताना त्याच्या शिष्यांनी त्याला अनेकदा पाहिले होते व त्यांच्या मनांत प्रार्थना करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून येशूच्या शिष्यांनी येशूला प्रार्थना शिकविण्यांस विनंती केली. प्रार्थना म्हणजे आपल्या स्वर्गीय पित्यावर भरवसा ठेऊन सर्व गोष्टीकरिता त्याच्यावर अवलंबून राहणे. आपला देवपिता अति प्रेमळ व ज्ञानी आहे.  तो आपल्या मुलांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो. त्यांच्या पूर्ण ज्ञानाने तो तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करीत आहे हे खरे, तरी आपली अडचण त्याला कळते. तो आपली काळजी घेतो. त्याच्याकडे चांगले ते मागणाऱ्यान तो कधीच वाईट देत नाही.

मनन चिंतन : 

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस मात्र देऊ शकते.आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही परंतु सघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. त्याच प्रमाणे दु:खात केलेली प्रार्थना आपल्याला कधी-कधी लगेच उत्तर देत नाही परंतु दु:ख सहन करण्याचे धाडस मात्र  नक्कीच देते. म्हणून प्रत्येक परिस्थितीत प्रार्थनेची साथ असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण प्रार्थना हि सुख-दु:खाचा आधार, अधंकारात दिप, असाह्य लोकांचे सहाय्य, निराशितांची आशा, दुर्बळांचे बळ, थकलेल्या मनाचा विसावा, हृदयाची आस आहे. प्रार्थना ही देवाने मानवाला दिलेली अमुल्य अशी देणगी आणि शक्ती आहे. प्रार्थना आपण कोणसाठीही व कोणत्याही हेतुसाठी करू शकतो; मात्र हे हेतू देवाच्या वचनाशी सबंधित असावेत.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की, देवाने मोशेची प्रार्थना ऐकली. मोशे हा फक्त देवाचा निवडलेला भक्तहोता. परंतु येशूख्रिस्त हा देवाचा एकुलता एकपुत्र,आपल्या तारणासाठी, देवाने ह्या धरतीवर पाठवला. मग ख्रिस्त जो आपला तारणारा आहे,त्याच्या नावाने केलेली प्रार्थना देव कधीच नाकारू शकत नाही. कारण ख्रिस्त ह्याविषयी स्वत:च साक्ष देताना म्हणतो, “पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.
म्हणून आपल्या दररोजच्या जीवनात आपण ख्रिस्ताच्या नावाने सातत्याने स्वर्गीय पित्याजवळ प्रार्थना करणे अगत्याचे आहे. म्हणूनच प्रभू येशू म्हणतो, ‘सातत्याने खचून न जाता,नित्य करावी आपण प्रार्थना’. त्यासाठी ह्या मिस्साबलिदानात एकत्र जमलो असताना विशेष प्रार्थना करूया कि, दु:खांना घाबरून न जाता व संकटांत डगमगून न जाता ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना शिकवलेल्या प्रार्थनेद्वारे स्वत:साठी व एकदुसऱ्यासाठी प्रार्थनामय आधार बनूया.

विश्वासु लोकांच्या प्रार्थना

प्रतिसादहे प्रभू आमची प्रार्थना एकूण घे.

.ख्रिस्त सभेचे पोप महाशयसर्व बिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत त्यांची ख्रिस्ताने शिकाविलेलेया प्रार्थनेद्वारे त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रार्थनेची गोडी लाभून प्रभु प्रेमाचा स्पर्श होऊन, त्यांनी अंधाराचा मार्ग सोडून प्रकाशाचा मार्ग निवडण्यास त्यांस प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी ख्रिस्ताने शिकविलेल्या प्रार्थनेद्वारे  जीवनावर मनन-चिंतन करून सर्व वाईटांपासून व मोहांपासून दूर रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे आजारी व दु:खी कष्टी आहेत त्यांना त्यांच्या जीवनात प्रार्थनेद्वारे ख्रिस्ताचा स्पर्श लाभाव व  प्रार्थना त्यांचा आधारस्तंभ  बनावा  म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. ओरिसातील पुरग्रस्तात जे लोक मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्यांना चिरकाळ शांती लाभावी व ज्या लोकांची आर्थिक व इतर हानी झाली आहे अश्यांना आर्थिक मदत मिळावी व पुन्हा त्यांचे जीवन सुरळीतपणे चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक  हेतूंसाठी प्रार्थना करूया.



Thursday 18 July 2019


Reflection for the Homily of 16th SUNDAY IN ORDINARY TIME (21-07-19) By Br. Isidore Patil    




सामान्य काळातील सोळावा रविवार

दिनांक: २१ -०७ -२०१९
पहिले वाचन: उत्पत्ती: १८: १-१६
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र  १:२४-२८
शुभवर्तमान: लुक १०:३८-४२




प्रस्तावना:

          आज आपण सामन्य काळातील सोळावा रविवार साजरा करीत आहोत. आज देऊळमाता आजच्या उपासनेत आपण नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वागतासाठी त्याच्या सानिध्यात राहण्यास व  त्याची मौल्यवान वचने ऐकावयास आमंत्रण करीत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, आब्राहाम हा त्याच्या घरी आलेल्या तीन पाहुण्यांचे आदराने स्वागत करतो व आदरतीथ्य त्यांची शाररीक भूक भागवतो. ह्या त्याच्या चांगुलपणामुळे आनंदित होऊन ते आब्रामाला पुत्र प्राप्तीचे दान देतात. दुसऱ्या वाचनात संत पौल स्वतःच्या दुःख सहना विषयी सांगत आहे; आणि हे दुःख आपल्या जीवनाचा एक भाग आहे व ह्या दुखातुनच येशूने आपल्याला तरणप्राप्त करून दिले आहे असे तो म्हणतो. तर आजच्या शुभवार्मानात येशू ख्रिस्ताचे, मार्था व मरिया ह्यांच्या घरी गेलेल्या भेटीचे वर्णन ऐकावयास मिळते.
          मरिया जशी प्रभू येशूचे वचन ऐकावयास त्याच्या सानिध्यात समीप राहिली तशाच प्रकारचे सामर्थ्य व ध्येर्य आपल्याला प्रभू येशूने ख्रिस्ताने द्यावे म्हणून आपण ह्या पवित्र ख्रिस्तयागात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: उत्पत्ती: १८: १-१६

          पहिल्या वाचनात आपण पाहतो की परमेश्वराने आब्राहामाला दर्शन दिले होते. त्यावेळी आब्राहाम एलोन नावाच्या झाडाखाली राहात होता. आब्राहामाचा देवावर खुप विश्वास होता. प्रत्येक मनुष्य जो आब्राहाकडे येतो तो आब्राहामासाठी देव माणूस असतो.
          एके दिवशी आब्राहाम त्याच्या दारापाशी बसला असता तीन यात्री करू जात होते. आब्राहामाने त्यांना ओळखले की हे नक्कीच देवमाणसं असतील म्हणून आब्राहामाने त्यांना आत येऊन विश्रांती घ्यावयास विनंती केली व जेवू ही घातले.
          जो पर्यंत ते तीन पाहुणे त्यांच्या घरात होते तिथ पर्यंत त्यांनी त्यांचा सहवास सोडला नाही आणि त्याचे फळ त्याला त्यांनी साराला पुत्र होईल असे सांगून दिले.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र  १:२४-२८

पौल ख्रिस्ताच्या मंडळी साठी किंवा लोकांसाठी दुख सहन करीत होता. मानवाच्या तारणासाठी ख्रिस्ताने जे दुख सहन केले त्यांचा तो या वाचनात उल्लेख करीत आहे. ख्रिस्ताच्या लोकांचा छळ होतो तेव्हा ख्रिस्ताला क्लेश होतात व या क्लेशात सहभागी होण्यास पौल तयार होता. देवाच्या वाचनात देवाची परिपूर्ण योजना प्रगट झाली आहे. हे सत्य इतरांना कळविण्याची सेवा देवाने पौलाला दिली. ती पूर्ण करण्यास पौल आतुर झाला होता. तो लोकांचा सेवक होता ख्रीस्तामधील देवाची योजना त्या काळापर्यंत गुप्त ठेवली होती. ती आता या कृपेच्या काळात देवाने प्रगट केली आहे. ती योजना ख्रिस्ताचे लोक हीच आहे.
          यहुदी व परराष्ट्रीय एक नवा गट कसे होतील हे रहस्य ख्रिस्त येईपर्यंत गुप्त होते. आता ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारे देव केवढी गौरवी संपतीच परराष्ट्रीयांना देत आहे हे प्रगट होत आहे. विश्वास ठेवणाऱ्यात जो ख्रिस्त वस्ती करीत आहे तोच या गौरवी संपत्तीची आशा आहे. देवाला ख्रिस्तामध्ये त्याच्याकडे येणाऱ्या सर्वांना ध्यान करायचे आहे.

शुभवर्तमान: लुक १०:३८-४२

मार्था व मारिया या दोन बहिणी व लाजर हा त्यांचा भाऊ. यांच्या घरात प्रभू येशू नेहमी जात असे. एक दिवस प्रभू येशू त्याच्या गावी आला मार्था येशू ख्रिस्ताचा पाहुणचार करण्यास फार उत्स्तुक असे. त्या देवशी तिने जास्त स्वयपाक बनविण्याचे ठरवले. पण काही वेळातच तिची तारांबक  उडाली कारण ते तिला एकटीला जमत नव्हते. आपली नक्कीच फजिती होणार हे तिने ओळखले आणि त्याचा दोष प्रभू येशूला दिला. त्यात तिने तिच्या बहिनिवरही आरोप केला. प्रभू येशूने तिला शांतपणे उत्तर दिले. यागोधळाला तिच जबाबदार होती. प्रत्येक गोष्टी विषयी काळजी करून धावपळ करणे व स्व:ताला त्रास करून घेणे हा मार्थाचा स्वभाव होता. या स्वभावाप्रमाणे ती वागत होती. यामुळे तिने प्रभूयेशुला व आपल्या बहिणीला दोष दिला. प्रभू म्हणाला भाजी भाकर चालली असती पक्वाने करायची गरज नव्हती, कशाची गरज आहे त्याचा विचार कर विनाकारण डोक्यावरचा भार वाढवू नकोस.
          मारियेला आत्मिक भूक होती. ती प्रभूचे ऐकण्यास व त्याची महानता ओळखण्यास उत्सुक होती. तिने आपली आध्यात्मिक गरज ओळखली होती. प्रभूचे भाषण एकूण तिचे अंत:करण प्रफुल्लीत झाले तिने चांगला वाटा निवडला होता.

मनन चिंतन:   

प्रिय बंधू भगिनीनो आजची उपासना आपल्याला पर्मेश्वाराच्या सानिध्यात राहून, त्याचे पवित्र शब्द ऐकण्यास बोलावत आहे. आपले लक्ष नेहमी पर्मेश्वरारावर केंद्रित असले पाहिजे व  प्रभू येशुख्रिस्त आपला किंद्र्बिंदू बनला पाहिजे. आपल्या दररोजच्या जीवनात आपले लक्ष योग्य त्या गोष्टीवर, योग्य त्या दिशेने व  योग्य त्या ठिकाणी  असणे खूप महत्वाचे आहे. एकदा एक व्यक्ती डिजिटल कॅमेरा घेऊन फोटो काढत होता त्याने एका मुलाला बोलावले आणि त्याला सांगितले कि मी तुझा फोटो काढतो तेव्हा तो मुलगा तयार झाला व जेव्हा तो व्यक्ती फोटो काढत होता तेव्हा तो त्याने कॅमेरा त्याच्या बाजूने फिरवला व फोटो काढला. फोटो बघताच त्याच्या लक्षात आले कि त्याने त्याचा कॅमेरा फोटो काढताना त्याच्या कडे फिरवला होता त्यामुळे त्याचा स्वताचा फोटो आला, त्या मुलाचा नाही. थोड्या वेळाने  त्याने पुन्हा प्रयत्न केले. व या वेळेला, त्याने कॅमेरा मुलाकडे फिरवला व त्यामुळे त्या मुलाचा चांगला असा फोटो आला. सांगायचे तात्पर्य इतकेच कि आपला कॅमेरा कोणाकडे फिरलेला  असतो योग्य गोष्टीकडे अथवा  दुसऱ्याठिकाणी? आजच्या शुभवर्तमान आपल्याला हेच पाहण्यास भेटते. मरीयेचा केंद्र बिंदू हा प्रभू येशू होता, त्यामुळे तिचे संपूर्ण लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावर केद्रित होते. खूप वेळा आपण योग्य त्या गोष्टीला प्राधान्य न देता चुकीच्या गोष्टीकडे वळतो. मरिये प्रमाणे आपण नेहमी प्रभू येशू जो सर्वगुण संपन्न आहे त्याला प्राधन्य दिले पाहिजे.
                   
          आजच्या शुभ वार्तमानातून आपल्याला दुसरा संदेश भेटतो तो म्हणजे आपण नेहमी परमेश्वराचा शब्द ऐकण्यास तयार असलो पाहिजे. मरीयेने प्रभूचा शब्द ऐकण्यास प्राधन्य दिले. काही वेळेला आपण पाहतो कि काहि मुले त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी खूप मेहनत करतात त्यांचा बहुतेक वेळ त्या गिफ्टसाठीच जात असतो. परंतु आई वडिलांना किंवा एखद्या मित्राला गिफ्ट शिवाय त्यांना साथ हवी असते. कोणी तरी आपल्या बरोबर बोलावे व आपले ऐकावे ह्याची गरज जास्त असते.
एक मुलगी तीच्या वडिलांबरोबर दररोज वॉक घेण्यासाठी जात असे. काहिक दिवसांनी त्या मुलीने तिच्या वडिलांना सांगितले कि तिला काम आहे ती वाक साठी येऊ शकणार नाही. जेव्हा तिचे वडील वॉकला जात होते तेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांसाठी वाढदिवसा निमीत्ताने गिफ्ट देण्यासाठी ती स्वेटर  विकत आणायला जाते. वडिलांच्या वाढदिवसी ती मुलगी आपल्या वडिलांना ते स्वेटर देते. तेव्हा वडिलांना माहित पडते कि हि माझ्या बरोबर वॉक ला न येता माझ्यासाठी स्वेटर विकत आणायला गेली होती. त्यावर तिचे वडील तिला म्हणाले कि, तू हे जे गिफ्ट मला दिलेले आहे ते खूप चांगले आहे. परंतु मला ह्या स्वेटर पेक्षा, तुझ्या सहवासाची  जास्त गरज आहे. तु माझ्या बरोबर बोलत असते हेच माझ्या साठी जास्त मोलाचे आहे.
आशाप्रकारे आपण अनेक वेळेला मार्था प्रमाणे जास्त काम करण्यात गुंतून जातो परंतु आपण मरीये प्रमाणे दुसऱ्यांचे ऐकणारे, दुसऱ्यांना वेळ देणारे बनलो पाहिजे.   

विश्वासु लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो तुझी सेवा करावयास आम्हाला सहाय्य कर.

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे, पोप महाशय, बिशप्स, कार्डीनल्स, सर्व धर्मगुरु व व्रतस्त जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, ह्या सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य अखंडित चालू ठेऊन एक उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. प्रत्येक ख्रिस्ती बांधवाने देवाची मुले म्हणून जीवन जगावे व ख्रिस्ताच्या वचनांचे आज्ञाधारकपणे पालन करून देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. उत्तम ख्रिस्ती ह्या नात्याने आपणास एक दुसऱ्यांची सेवा करण्यास व देवाच्या नावाने दुसऱ्यांचा स्वीकार करण्यास शक्ती व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. यंदाच्या वर्षी परमेश्वराने आपल्यावर चांगली पर्जन्यवृष्टी केली आहे; त्याबद्ल आपण परमेश्वराचे आभार मानत असता, जेथे वाजवीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होऊन पुराचे वातावरण निर्माण झाले आहे, अशा ठिकाणच्या लोकांचे परमेश्वराने संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे कोणी बेरोजगार आहेत व नोकरीच्या शोधात आहेत त्यांना प्रभूच्या आशिर्वादाने त्यांच्या योग्यतेप्रमाणे चांगली नोकरी मिळावी व त्याचा संसार सुखाने चालावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



Wednesday 10 July 2019


Reflection for the Homily of 15th SUNDAY IN ORDINARY TIME (14-07-19) By Br. Amit D'Britto





सामन्य काळातील पंधरावा रविवार




दिनांक : १४/०७/२०१९
पहिले वाचन : अनुवाद ३०:१०-१४
दुसरे वाचन :  कलस्सेकरांस पत्र १:१५-२०
शुभवर्तमान : लुक १०:२५-३७






“जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा”


प्रस्तावना :

          आज आपण सामान्य काळातील पंधराव्या आठवड्यात पदार्पण केले आहे. आजची पवित्र वाचणे आपणास देवाच्या आज्ञेचे पालन करून आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्यास आमंत्रण करीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात मोशे लोकांना देवाच्या आज्ञेचे पालन करून परमेश्वराशी एकरूप होऊन जीवन जगण्यास सांगत आहे. संत पौलाचे क्ल्स्सैकारांस पत्र ह्यातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात येशू ख्रिस्त, उत्पतीचा आणि शांतीचा प्रभू ह्याविषयी  वर्णन करत आहे.
लुकलिखित शुभवर्तमानामध्ये ‘चांगल्या शोमरोनीचा’ दुष्टांत आपल्या समोर ठेऊन आपल्याला शेजार प्रीती वाढवण्यास प्रेरणा देत आहे. आजच्या मिस्साबालीदानात सहभागी होत असताना आपण आपल्या कुटुंबातील, समाजातील व आपल्या सानिध्यात येणाऱ्या सर्व लोकांवर प्रेम करून बंधू-भावाने राहण्यास देवाकडे विशेष आशीर्वाद व प्रेरणा घेऊ या.

सम्यक विवरण

पहिले वाचन : अनुवाद ३०:१०-१४

          अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात मोशे लोकांना सांगतो कि, देवाच्या आज्ञा आत्मसात करणे अवघड नाही. तसेच ह्या आज्ञाचे पालन करून आपल्या संपूर्ण मनाने व जीवाने देवाशी संलग्न जीवन जगण्यास विनवणी करत आहे. चांगले आणि वाईट यांच्याविषयीचे सत्य देवाच्या वाचनामध्ये आहे आणि ही वचने आपल्या अगदी समीप असल्याने आपण त्याप्रमाणे वागले पाहिजे.

दुसरे वाचन :  कलस्सेकरांस पत्र १:१५-२०          

          संत पौल ह्या उताऱ्यात प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप व त्यांचे कार्य वर्णन करतो. येशू ख्रिस्त हा सृष्टी व उत्पतीचा प्रभू आहे व तो अद्रुष्य देवाचे प्रतिरूप आहे. सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण झाले आहे आणि सर्व गोष्टीच्या पूर्वी तो अस्तित्वात आहे. तसेच ख्रिस्ताच्या मरण्याने शांती व समेट घडविण्यात आला आहे.

शुभवर्तमान : लुक १०:२५-३७

          आजच्या शुभवर्तमानातील उताऱ्यात एक शास्त्री येशूला विचारतो ‘गुरुजी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय केले पाहिजे’? तेव्हा येशू ख्रिस्त त्यास नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपल्या देवावर व शेजाऱ्यावर प्रीती करण्यास सांगतो. परंतु त्याने जेव्हा ‘माझा शेजारी कोण?’ हा प्रश्न विचारला तेव्हा येशू त्यांना ‘चांगला शोमरोनीचा दुष्टात देतो. उत्तरादाखल दिलेल्या हा दुष्टात अगदी समर्पक आहे. एखाद्या यहुदी माणसाने कोणावरही अगदी शोमरोनी माणसावरही प्रेम केले पाहिजे असे सुचविले आहे. ह्या दाखल्या वरून असे समजते की, आपण देवावर व सर्व मानवांवर निस्वार्थीपणे प्रेम व सेवा केल्याने आपल्याला शाश्वत जीवनाची पूर्तता होईल.

बोधकथा :   

          जगप्रसिद्ध डॉक्टर विल्यम मॅगी हे नावाजलेले प्लास्टिक सर्जन आहेत. समाज्यातील अनेक मुले दुभंगलेले-ओठ ह्या आजाराने त्रस्त आहेत हे त्यांनी पाहिले. ह्या आजारामुळे मुलांना खाण्यासाठी, बोलण्यासाठी व हसण्यासाठी खूप त्रास होत असतो. ह्यावर उपाय म्हणून डॉक्टर विल्यम व त्यांच्या पत्नी ह्यांनी ऑपरेशन स्माईल हि संघटना स्थापन केली आहे. ह्या संघटनेद्वारे परदेशातील डॉक्टरांना ह्या आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रशिक्षण दिले. आशाप्रकारे  ऑपरेशन स्माईल तर्फे आतापर्यंत ५०,०००हून अधिक बालकांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात आले आहे. कदाचित जर डॉक्टर विल्यम ह्यांनी जर फक्त स्वत:चाच विचार केला असता तर समाज्यातील अनेक मुले ह्या सोयीपासून वंचित राहिले असते. परंतु त्यांनी स्वतःहा ‘चांगला शोमरोनी’ बनून अनेक डॉक्टरांना प्रशिक्षण दिले व चांगले कार्य करण्यासाठी एक आदर्श बनले.

मनन चिंतन :

          शाश्वत जीवनप्राप्ती मिळविण्यासाठी येशूने शास्त्राला नियमशास्त्र पालन करावयास सांगितले, आणि नियमशास्त्र हे परमेश्वरावर व शेजाऱ्यावर संपूर्ण मनाने, जीवाने, शक्तीने व बुद्धीने प्रीती करण्यास सुचविते. प्रभू येशू आपल्याला चांगला व्यक्ती होण्यासाठी आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्यास सांगतो. परंतु शास्त्र्याने  विचारले “माझा शेजारी कोण”? तेव्हा येशू ख्रिस्त चांगल्या शोमरोनीचा दुष्टांत देऊन स्पष्ट करतो.  
          वेबस्टर शब्द्कोशाप्रमाणे ‘शेजारी’ म्हणजे जो आपल्या जवळ आहे तो व्यक्ती होय. हिंदू, मुस्लीम, बौध यासारखा प्रत्येक धर्मामध्ये शेजाऱ्यावर प्रेम करण्यास वेगवेगळ्या रीतीने सुचवण्यात आले आहे. येशुसाठी जो व्यक्ती गरजेमध्ये आहे तो शेजारी होय’ मग तो श्रीमंत किंवा गरीब असो, काळा किंवा गोरा असो, ह्यामध्ये रंग, धर्म, जात-पात ह्यावरून शेजारी निवडता येत नाही.
          आपल्या समाज्यात व शेजाऱ्यात अनेक व्यक्ती नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना, अन्याय यासारख्या घटनेला बळी पडतात. पुष्कळ व्यक्ती आजार, गरिबी, वृद्धत्व, हिंसा ह्यामुळे दु:ख सोसत आहेत. ह्या सर्व व्यक्ती आपल्याकडून काही मदतीची अपेक्षा करत असतात. त्यांना कधी-कधी पैशाची, अन्नाची किंवा वस्तूंची गरज असते. तसेच काही वेळ त्यांना सल्ला, हास्य, आलिंगन किंवा आपला काही वेळ ह्याची गरज असते. जर आपण बाप्तिस्मा स्विकारलेले ख्रिस्ती व्यक्ती आहोत तर त्यांना मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
          आज आपल्यासमोर ‘चांगल्या शोमरोण्याचा’ आदर्श आहे. त्याने जखमी व्यक्तीच्या जखमा बांधल्या व त्याची काळजी घेण्यासाठी खर्चाला पैशे हि दिले. अॅन लॅडर म्हणतात की “सर्वांशी दयाळूपणाने वागा. कारण जगाला दयेची खूप गरज आहे.” तसेच मार्क टाईन म्हणतात कि, “करुणेची भाषा हि बहिरे ऐकू शकतात व आंधळे वाचू शकतात.”
          शास्त्री परुषांस येशूने शेवटी म्हंटले की, त्या शोमरोनी प्रमाणे ‘जा आणि तूही तसेच कर’ आणि ही येशूची आज्ञा आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे. ही आज्ञा परिपूर्णपणे जीवनात उतरवलेली व्यक्ती म्हणजे मदर तेरेसा. तिचा शिक्षकी पेशा असल्यामुळे ती शिकवण्यात मग्न होती; परंतु एक दिवस कलकत्त्याच्या रस्त्यावर जेव्हा ती एक अर्धमेलेली स्त्री पाहते त्या दिवसापासून ती आजाऱ्या व समाज्यातील नाकारलेल्या व्यक्तींची काळजी व सेवा करण्याचा निर्णय घेते. ती संपूर्ण मनाने व जीवाने अश्या व्यक्तींची शेवटपर्यंत सेवा करते व तिचे अनुयायी आज पर्यंत तसे काम करत आहेत.
          चांगल्या शोमरोनाच्या ह्या दाखल्याद्वारे प्रभू येशू आपल्याला शेजाऱ्यावर व आपल्या शत्रूवर प्रेम व द्या करण्यास प्रेरणा देत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : ‘हे प्रभू आम्हांला प्रेम करण्यास प्रेरणा दे’.

(१)  ख्रिस्ताची सुवार्ता पसरविणारे आपले पोप, बिशप्स धर्मगुरू व धर्मभगिनी ह्या सर्वांना देवाचे कार्य करण्यासाठी शक्ती व प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
(२)  आपल्या समाजातील व शेजोळातील सर्व लोकांनी एकमेकांवर प्रेम करावे व चांगले आनंदी जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
(३)  ह्या वर्षी संपूर्ण भारत देशात योग्य प्रमाणात पर्जन्यवृष्टी व्हावी व सर्वत्र हिरवळ पसरून देशाचा विकास व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
(४)  संपूर्ण जगभरात ज्या लोकांवर अन्याय व अत्याचार होत आहे त्यांना प्रभूची शांती व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
(५)  थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक गरजा साठी म्हणून आपण प्रार्थना करूया.
                                                                                  
















       

Thursday 4 July 2019


Reflection for the Homily of 14th SUNDAY IN ORDINARY TIME (07-07-19) By Br. Jameson Munis







सामन्य काळातील चौदावा रविवार



दिनांक – ७/७/२०१९
पहिले वाचन – यशया ६६:१०-१४
दुसरे वाचन - गळतीकारस पत्र ६:१४-१८
शुभवर्तमान – लुक १०:१-१२, १७-२०

प्रस्तावना:

          ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, आज आपण सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत आहोत.  आजची उपासना आपल्याला देवाचे मिशन कार्यया विषयावर मनन चिंतन करण्यास बोलावत आहे.
पहिल्या वाचनात यशया संदेष्टा  लोकांना येरुस्लेम बरोबर आनंद उत्सव व उल्हास करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे; कारण परमेश्वराचा वरदहस्त नेहमी त्यांच्या सेवकावर आहे  असा संदेश आजचे पहिले वाचन देत आहे.
दुसऱ्या वाचनात म्हणजे गलतीकरांस  लिहिलेल्या पत्रास संत पौल, त्याची देवावरची इच्छा व्यक्त करतो. तसेच, जे कोणी ख्रिस्तामध्ये असलेली नवी उत्पत्ती यावर विश्वास ठेवतात, अशांनाच  शांती व द्या प्राप्त होते असे म्हणतो.
तसेच आजच्या शुभवर्तमानात संत लुक येशू ख्रिस्ताच्या बहात्तर शिष्याची कामगिरी व त्यांचे पुनरागमन व त्यांनी केलेले मिशन व सुवार्ता कार्य या विषयी सांगत आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो येशू ख्रिस्ताने व त्यांच्या शिष्यांनी देवाचे मिशन कार्य करून शांतीचा व सेवेचा संदेश पसरून लोकांच्या विश्वासात वाढ केली. म्हणून मिस्साबालीदानाद्वारे आपण सुद्धा देवाच्या कार्याचे अनुयायी बनू, यासाठी लागणारी कृपा व सामर्थ ह्या पवित्र  मिस्साबालीदानाद्वारे मागुया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन – यशया ६६:१०-१४

          पहिल्या वाचनात यशया संदेष्टा लोकांना येरुस्लेम बरोबर आनंद उत्सव व उल्हास करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कारण, परमेश्वर म्हणतो, पाहा नदीप्रमाणे शांती व पाण्याच्या पुरा प्रमाणे राष्ट्राचे वैभव मी तिजकडे वाहवितो. तसेच जशी एखादयाची आई त्याचे सांत्वन करिते तसे मी तुमचे सांत्वन करीन. म्हणजे यशयाने केलेली भविष्यवाणी हि ख्रिस्ताद्वारे पूर्ण झाली आहे. ती वाणी म्हणजे, जी  देऊळमाता  ख्रिस्ताने स्थापन केली आहे, ती  आता पृथ्वीवर नवीन येरुसलेम झाले आहे. आता सर्व ख्रिस्ती लोक ह्या नवीन येरुसालेमचा आनंद व उल्हास करू शकतात. ते  स्वर्गीय येरुसलेम सर्वांची वाट पाहात आहे. परमेश्वराचा हात व आशीर्वाद नेहमी त्याच्या सेवकांवर राहील असा संदेश आजचे पहिले वाचन देत आहे.

दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र:  ६:१४-१८

          आजच्या दुसऱ्या वाचनात म्हणजे गलतीकरांस लिहिलेल्या पत्रात संत पौल, त्याची देवावरील इच्छा व्यक्त करतो, ती म्हणजे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा पौलाला मोठा अभिमान वाटत आहे. कारण ख्रिस्ताने वधस्तंभावरील प्रायश्चीताचे कार्य परिपूर्ण केले. जगाला पौल वधस्तंभावर खिळलेला वाटत होता व पौलाला जग वधस्तंभावर खिळलेले वाटत होते. अशाप्रकारे त्याचा व जगाचा संबंध तुटला होता. पौलाला ख्रिस्तामधील नवी उत्पत्ती असणे हेच गरजेचे होते. अशांनाच शांती व द्या प्राप्त होते असे सांगत आहे.

शुभवर्तमान: लुक: १०:१-१२,१७-२०

          आजचे शुभवर्तमान आपल्याला बहात्तर शिष्यांची कामगिरी व त्यांचे पुनरागमन या विषयी सांगत आहे. तसेच आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त बारा शिष्या व्यतिरिक्त आणखी बहात्तर शिष्यांची निवड करतो व त्यांना मिशन कार्यासाठी व सुवार्ता घोषित करण्यासाठी, प्यलेस्टाईन देशाच्या इतर भागांकडे पाठवीतो. जेणेकरून ते येशुख्रिस्ताच्या येण्याची तयारी करतील.
तसेच पिक फार आहे, परंतु कामगार किवा कामकरी फार थोडे आहेत, त्यामुळे आपल्याला प्रार्थना करण्याची फार गरज आहे. जेणेकरून आपल्याला कामकरी  भेटतील व देवाचे राज्य पुढे नेता येईल. येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितले होते कि त्यांनी लोकांच्या घरी जाऊन त्यांना देवाची शांती व आशिर्वाद प्रदान करावा. परंतु ते रहिवासी योग्य नसतील तर तो आशिर्वाद पुन्हा तुमच्याकडे परत येईल. जे कुटुंब तुमचा स्वीकार करतील त्यांच्या घरी तुमचे कार्य पूर्ण करा. येशूचे शिष्य मोठ्या आनंदाने परत आले. त्यांचा संदेश एकूण अनेकांनी पश्चाताप केला. अनेक जन भुतांच्या सत्तेतून मुक्त झाले होते. म्हणून देवाच्या सेवेतील यशाचे श्रेय पूर्णपणे  देवाला द्यावे असे संत लुक आजच्या शुभवर्तमानाद्वारे सांगत आहे.


मनन चिंतन:

          आजच्या काळात जगाच्या भलेपनासाठी व कल्याणासाठी जर कुठल्या गोष्टीची गरज असेल तर ती गरज देवाच्या मिशन कार्याची आहे. देवाचा संदेश म्हणजे आनंदाची बातमी. देवाचा संदेश म्हणजे आशेची बातमी, सुखदायी बातमी तसेच मनाला प्रफुल्लीत करणारी बातमी, मात्र दुदैवाची गोष्ट अशी कि आपल्याला आनंदायी वार्ता ऐकन्यामध्ये, पाहन्यामध्ये व पसरविण्यामध्ये फारसा काही रस नाही. कारण आपल्याला हवी असते वार्ता दु:खाची, अपघाताची, दुर्घटनेची, शिव्यागाळीची, व लढाईची. परंतु आजच्या उपासने मध्ये आपण सर्वांनी सेवा कार्याचे मिशन ह्या विषयी ऐकले. जेव्हा येशू ख्रिस्ताचे शिष्य, सोपविलेले मिशनकार्य पूर्ण करून आल्यावर ते सर्वजण फार आनंदित होते. त्यांनी स्व:ताला मोठे न करता ख्रिस्ताची सुवार्ता पसरवून ख्रिस्ताला उंचावले  केले. जगाला ख्रिस्त देणे हाच त्याचा ध्येय  होता, हे त्यांनी त्यांच्या कृत्याद्वारे सिद्ध केले. त्यांनी येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे लोकांना बरे केले, त्यांच्यातून भूते देखील बाहेर काढली, त्यांना प्रार्थना शिकविली, त्यांना शांतीचे जीवन जगण्यास मार्गदर्शन केले व त्यांच्या श्रद्धेत वाढ केली. म्हणून आजची उपासना आपल्याला पुढील तीन मुद्यावर मनन चिंतन करण्यासाठी बोलावत आहे. ते मुद्दे म्हणजे
(१) सेवामय जीवन
(२) चमत्कारी नाव
(३) शांतीचा संदेश
हे तिन्ही मुद्दे चांगले आहेत ते आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद आणत असतात.
1)       सेवामय जीवन
ज्या प्रमाणे येशू ख्रिस्त सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास ह्या भूतलावर आला, त्याचप्रमाणे येशूख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सुवार्ता व सेवामय जीवन जगण्यास पाठविले. त्यांनी येशूच्या आदेशानुसार लोकांना देवाची वाणी सांगितली. लोकांना बरे केले, त्यांनी लोकांच्या घरात राहून त्यांच्या समस्या सोडविल्या त्यांना प्रार्थना करायला शिकविले. त्यांनी येशूची प्रीती दुसऱ्यापर्यंत पोहचविली. हे कार्य करीत असताना ते सर्वजण आनंदित होते.
२) चमत्कारी नाव
येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये शक्ती व सामर्थ्य आहे. येशूचे नाव चमत्कारी नाव आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताचे बहात्तर शिष्य, त्यांच्या मिशन कार्यावरून परत आले, तेव्हा ते फार आनंदित आणि उत्साहित होते. ते येशू ख्रिस्ताला सांगत होते कि प्रभू तुमच्या नावामध्ये फार पावित्रता आहे. तुमच्या नावाने आम्ही लोकांना त्यांच्या आजारातून बरे केले व लोकांच्या जीवनात चमत्कार केले.
३) शांतीचा संदेश
शांतीच्या मार्गावर चालणे म्हणजे लोकांना जवळ आणणे व त्याच्याबरोबर आदराने वागणे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात एक भावना असते व त्या भावनेला एक तहान लागलेली असते, ती म्हणजे शांतीची. आपल्याला वाटते कि, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात, कुंटुंबात, गावात व देशात शांतता असावी. म्हणून येशुख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना शांतीचा संदेश व सुवार्ता पसरविण्यासाठी वेगवेगळ्या गावात व शहरात पाठविले. ज्या प्रमाणे येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना शांतीचा संदेश देण्यासाठी पाठवले त्याच प्रमाणे ख्रिस्ताने संपूर्ण देऊळ मातेची निवड केली आहे, जेणे करून आपण सर्वजण शांतीचा व प्रेमाचा संदेश दुसऱ्याकडे पोहचवण्याचे साधन बनू. येशू ख्रिस्ताने व त्याच्या शिष्याने सत्याचा, आशेचा, शांतीचा, तारणाचा व पुनरुस्थानाचा संदेश पसरविला. म्हणून आपण सर्वांनी देखील आजपासून सुखदायी, आनंदमय, आशादायी शुभवार्ता घोषविण्याचा निर्धार केला पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:  

प्रतिसाद: हे प्रभो आम्हाला सेवामय जीवन जगण्यास सहाय्य कर.

१. आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स ह्यांना अखिल ख्रिस्त सभेची धुरा सांभाळण्यास व प्रभूच्या प्रेमाचा व सेवेचा संदेश जगभर पसरविण्यास सामर्थ मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 
२. सर्व आजारी गरीब,अनाथ व अपंग ह्यांना मानसिक स्वास्थ व आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ख्रिस्त आपल्या प्रत्येक कुटुंबाचा केंद्रबिंदू बनावा, कौटूंबिक प्रार्थनेद्वारे आपले नाते ख्रिस्ताशी अधिक जवळचे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ह्या वर्षी अधिका अधिक पाऊस पडावा, व आपल्या शेतांची, पिकांची, मासळीची चांगली वाढ व्हावी. तसेच वातावरण शुद्ध राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आता, आपल्या सामाजिक, कौटूंबिक व व्ययक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.