Tuesday 28 December 2021

Reflection for the Solemnity of the Epiphany of the Lord (02/01/2022) By Fr. Bariton Nigrel.



प्रकटीकरणाचा सण

 दिनांक: ०२/०१/२०२२.

पहिले वाचन: यशया ६०: १-६.

दुसरे वाचन: इफीसी ३:२-३, ५-६.

शुभवर्तमान: मत्तय २:१-१२.

 


प्रस्तावना:

ख्रिस्तसभा आज प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा म्हणजेच तीन राजांचा सण साजरा करीत आहे. प्रभू येशू या जगाचा प्रकाश आहे. पूर्वेकडील आलेल्या तीन राजांनी आपली दाने ख्रिस्ताला समर्पित करून ह्याच प्रकाशमय ख्रिस्ताचे दर्शन घेतले म्हणून देवाने त्यांचे जीवन प्रकाशमय बनवले.

यशया संदेष्टा आजच्या पहिल्या वाचनात आपणांस सांगतो, ‘सर्व राष्ट्रे एक होऊन प्रभूच्या प्रकाशाकडे येतील’. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला देवाच्या प्रकटीकरणाविषयी सांगतो. हे प्रकटीकरण सर्व लोकांसाठी आहे आणि म्हणूनच विदेशीयांना सहवारस व सहसभासद करून संत पौल त्यांचा उल्लेख करीत आहे. तर आजचे शुभवर्तमान आपल्याला तीन राजांची ख्रिस्ताला भेट ह्याविषयी जरी सांगत असेल तरीही शुभवर्तमान हे राजांचा राजा, प्रकाशाचा प्रकाश जो जन्माला आला आहे, त्याच्याविषयी आहे. 

तीन राजांनी ज्याप्रमाणे आपली दाने ख्रिस्ताला समर्पित केली, त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या तेजस्वी प्रकाशाला शरण जाऊन, आपले सर्वस्व त्याच्या चरणी समर्पित करूया तसेच आपल्या व इतरांच्या जीवनात आनंद व प्रकाश निर्माण व्हावा म्हणून आजच्या या पवित्र मिस्स्साबलीदानात प्रार्थना करूया.


 

मनन-चिंतन:

येशू ख्रिस्ताच्या जन्माचा संकेत तीन मागी लोकांना आकाशातील एका नव्या ताऱ्याद्वारे मिळाला होता. म्हणून आजचे शुभवर्तमान आपणास सांगत आहे की ते तीन राजे येशू बाळाला नमन करण्यासाठी ते त्या ताऱ्याचा पाठलाग करीत पूर्वेकडून यरुशलेमपर्यंत प्रवास करीत आले. तारा त्यांच्या पुढे जाऊन त्यांना मार्ग दाखवत राहिला आणि शेवटी बेथलेहेममध्ये बाळ येशू होता तेथे जाऊन थांबला. तेथे त्यांनी येशूला नमन केले आणि त्याला सोने, ऊद व बोळ (गंधरस) ह्या भेटी अर्पण केल्या (मत्तय २:१-१२). खरोखर, ख्रिसमसच्या महान कथांपैकी एक कथा म्हणजे पूर्वेकडील मागी राजांच्या भेटीची कहाणी.

जेव्हा काळाची पूर्णता झाली तेव्हा परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले (योहान ३:१६). प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र मरियेद्वारे या जगामध्ये मानवरूपामध्ये जन्म घेतला. ख्रिस्ताचा जन्म फक्त यहुदी लोकांनाच नव्हे; तर संपूर्ण मानवजातीला तारण्यासाठी झाला. हे सत्य परमेश्वराने ख्रिस्ताच्या जन्मावेळी आणि जन्मानंतर ज्या घटना घडल्या त्यातून प्रकट केले आहे. खऱ्या परमेश्वराने स्वतःला सुरुवातीला फक्त यहुदी लोकांना प्रकट केले होते आणि अज्ञानाच्या काळाकडे डोळेझाक केली होती. पण आता ख्रिस्तजन्मानंतर सर्वांनी खऱ्या जिवंत परमेश्वराला ओळखावे आणि त्यांनी सर्वत्र पश्चात्ताप करून खऱ्या देवावर विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे (प्रे. कृ. १७:३०).

ख्रिस्ताच्या जन्माने एक अनमोल सत्य जगासमोर मांडण्यात आले आहे की, प्रभू येशू ख्रिस्त हाच खरा जगाचा एकमेव तारणारा आहे (प्रे. कृ. ४:१२) आणि एकाच खऱ्या परमेश्वराचे प्रकटीकरण आहे (योहान १:१८). खरा परमेश्वर स्वतःला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रकट करतो. म्हणून आज आपण प्रकटीकरणाचा सण साजरा करीत आहोत. प्रकटीकरण हा शब्द ‘एफीफानिया’ (Epiphaneia) ह्या ग्रीक शब्दापासून आलेला आहे, म्हणजे ‘प्रकट होणे’ (Manifestation). हा शब्द जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणासाठी वापरला जातो, तेव्हा त्याचा अर्थ अधिक गहन होतो: “जे कुणी कधी पहिले नाही ते प्रकट करणे.”

मागी राजांना झालेले प्रकटीकरण (परराष्ट्रीयांचे प्रतीनिधी):

आजच्या शुभवर्तमानात आपण एकले की पूर्वेकडून ज्ञानी राजे येशू बाळाच्या दर्शनासाठी येतात. हे मागी पुरुष कोण आहेत? या माजीं लोकांना "ज्ञानी" म्हटले जाते; कारण ते विद्वान होते. ते खगोलशास्त्रज्ञ/ज्योतिषी होते. ते भविष्य किंवा स्वप्नांचे अर्थ सांगत असतं. हे मागी लोक परराष्ट्रीय होते, मग त्यांना ख्रिस्ताचे प्रकटीकरण का करण्यात आले?

प्रकटीकरणाचा सोहळा हा प्रकाशाचा सोहळा म्हणून मानला जातो, जिथे मागी लोकांना (परराष्ट्रीयांना) प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे असे प्रकट करण्यात येते. प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश देणारा पहाटेचा तेजस्वी तारा आहे (प्रकटी. २२:१६) आणि त्याच्यावर जे विश्वास ठेवतात त्यांना तो स्वतः प्रभाततारा देईल (प्रकटी. २:२८). हे ज्ञानी लोकांच्या बाबतीत घडले, म्हणजे ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये त्यांना प्रकाशित करण्यात आले.

ज्ञानी लोक घरात गेल्यानंतर बाळ येशू आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून ‘सोने’, ‘ऊद’ व ‘गंधरस’ ही दाने त्याला अर्पण केली (मत्तय २:११).

‘सोने’ - प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे, म्हणून त्याला सोने अर्पण करण्यात आले. ‘ऊद’ – ऊद हे परमेश्वराच्या भक्तीसाठी मंदीरामध्ये वापरण्यात येत असे (निर्गम ३०:३७). प्रभू येशूला ते अर्पण करून तो परमेश्वर आहे हे दर्शविण्यात आले. ‘गंधरस’ – गंधरस महायाजक याजकांच्या अभिषेकासाठी वापरत असे (निर्गम ३०:२३). तो प्रभू येशूला अर्पण करून तो जगाची पापे दूर करणारा खरा अभिषिक्त महायाजक आहे हे दर्शविण्यात आले. प्रभू येशू ख्रिस्त अशाप्रकारे फक्त यहुदी लोकांनाच नव्हे; तर परराष्ट्रीयांना देखील प्रकट होतो.

आजचा सोहळा आपल्याला सांगत आहे की, प्रभू येशू ख्रिस्त हा त्याच्या सर्व लोकांना एकत्र करण्यासाठी आला आणि आता देवाची प्रजा ही फक्त यहुदी धर्मियांसाठीच मर्यादित नाही; तर परराष्ट्रीयांना देखील त्यांच्याबरोबर समान स्थान देण्यात आले आहे: ‘परराष्ट्रीय हे ख्रिस्त येशूच्या ठायी सुवार्तेच्या योगाने यहुद्यांबरोबर एकशरीर आणि अभिवचनाचे वाटेकरी आहेत” (इफी. ३:६).

ज्ञानी माणसे आपल्याला शिकवतात की, येशू ख्रिस्त सर्व लोकांसाठी, यहूदी आणि परराष्ट्रीयांसाठी जन्मला आहे. येशू ख्रिस्ताच्या वंशावळीवरून हे सिद्ध होते की देवाची कृपा व्यापक आहे आणि त्याचे प्रेम सर्व लोकांपर्यंत पोहोचते. त्याच्या वंशावळीवरूनही हे सिद्ध होते की, देवाची कृपा दूरवर असलेल्या लोकांपर्यंत पोहचते. कारण असंख्य परराष्ट्रीयांचा उल्लेख त्याच्यामध्ये केला आहे. आणि शेवटी परमेश्वराच्या दृष्टिकोनातून सर्व लोक समान आहेत. आपण सर्व त्याची प्रिय लेकरे आहोत. आपल्यामध्ये काहीतरी बाह्य भौतिक किंवा सांस्कृतिक भेद असू शकतात तरी पण आपण सर्वजण एकाच कुटुंबाचे आहोत ज्याचा पिता एक आहे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद : “हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.”

१.    ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करीत असलेले आपले पोप फ्रान्सीस, सर्व कार्डीन्ल्स, बिशप्स, धर्मबंधू-धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक यांना ख्रिस्ताचे योग्य मार्गदर्शन लाभावे व त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    आपण सर्वांनी देवाच्या प्रेरणेने ख्रिस्ताचा शोध खऱ्या मनाने व हृदयाने करावा व आपल्याला जीवनात ख्रिस्ताची शांती व प्रेम मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    जे पापी लोक ख्रिस्ताच्या प्रकाशापासून दुरावलेले आहेत व पापाच्या अंधारात अजूनही भटकत आहेत अश्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांच्या जीवनात आशेचा व ख्रिस्ताच्या प्रेमाचा किरण प्रकाशित व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    देव हा सर्वाचा एक आहे. हि भावना अखिल मानव-जातीच्या मनात रुजावी व सर्वांनी एक जुटीने, आनंदित, प्रेमान जगावं म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजा प्रभू चरणी अर्पण करूया.

||“प्रकटीकरणाच्या सणाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा”||


Monday 27 December 2021

Reflection for the Solemnity of Mary, Mother of God and of New Year (01/01/2022) By: Fr. Benjamin Alphonso.



देव मातेचा सण

(नवीन वर्ष २०२२)

दिनांक: ०१/०१/२०२२

पहिले वाचन: गणना ६:२२-२७.

दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ४:४-७.

शुभवर्तमान: लुक २:१६-२१.

 


प्रस्तावना:

आज आपण नवीन वर्षाला सुरुवात करत आहोत. देऊळमाता वर्षाचा पहिलाच दिवस पवित्र मरीयेला समर्पित करून त्या देवमातेचा सण साजरा करीत आहे. आजची तिन्ही वाचने देवाचा आशीर्वाद मिळवून तोच आशीर्वाद एकमेकांना देण्यासाठी आमंत्रित करीत आहे. मरिया मातेने आपल्या जीवनात देवाच्या इच्छेला प्राधान्य दिले. आपणही आपल्या जीवनात देवाला प्राधान्य देऊया. आजच्या मिस्साबलीदानात आपण विशेष करून हे वर्ष प्रत्येकाला सुखा-समाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे, आणि एकमेकांवर परमेश्वराचे प्रेम व दया दाखवण्याचे जावे म्हणून विशेष प्रार्थना करूया.




मनन-चिंतन:

||तू सन्मान, तू बहुमान

मारिया आमुचा तू अभिमान||

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण सर्वजण आनंदी आहोत कारण, आपण सर्वजण भाग्यवान आहोत, व आपल्याला नवीन वर्ष २०२२ बघण्याचे भाग्य लाभलेले आहे. आपल्यामधील कदाचित काही लोकं दुःखी, निराश असतील. कारण, काहीकांची स्वप्ने, कार्ये अपूर्ण राहिलेली असतील. अशा वेळेला देऊळमाता आपल्यासर्वां समोर मरिया मातेचे उदाहरण ठेवत आहे. काही लोकांना प्रश्न पडत असेल की, आपल्या समोर मरिया मातेचं (देमातेचचं) उदाहरण का ठेवले जाते? त्याचं कारण म्हणजे रिया माता ही विश्‍वासाची माता होती. तसेच आपलं संपूर्ण आयुष्य देवाच्या इच्छेप्रमाणे ती जगली. देऊळ मातेची इच्छा आहे की, आपण सुद्धा आपल्या जीवनात मरिया मातेच्या मार्गाचा अवलंब करावा व देवाच्या अधिकाधिक जवळ जावे.

नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याचं नाव आहे जानेवारी.” जानूस’ नावाची एक ग्रीक देवता आहे. त्या देवतेच्या नावाचा अर्थ असा आहे की, “भविष्याकडे आशेने बघणे.” (Looking Towards Future). म्हणून वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण विश्वासाने व आशेने पाहत आहोत. तसेच आपलं भविष्य आपल्या सर्वांच्या हातात व देवावरील विश्वासात आहे.

अशी एक गोष्ट आहे की, एकदा एके ठिकाणी एक ज्ञानी, पवित्र गुरू होते. अनेक लोक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी जायचे. काही युवकांना गुरूचा हेवा वाटायचा आणि त्यांना गुरु हे चुकीचे किंवा ढोंगी आहेत असे दाखवायचे होते. म्हणून, त्यांनी एक योजना आखली; ते त्या ज्ञानी गुरुकडे हातात एक छोटा पक्षी घेऊन गेले. त्याचा विचार होता की, गुरूला विचारायचे की, त्यांच्या हातात जो पक्षी आहे तो जिवंत आहे की, मेलेला आहे?’ जर गुरूने त्यांना सांगितले की, जिवंत आहे.’ तर, त्याला हातातच मारायचे. पण, जर गुरु म्हणाला ते मेलेले आहे.’ तर, त्या पक्षाला सोडायचे. जेव्हा ते युवक गुरुकडे गेले व गुरुला प्रश्न विचारला तेव्हा, गुरूंना त्यांची योजना अंतर्मनात समजली व ते त्या युवकांना म्हटले की, त्या पक्षाचे भविष्य तुमच्या हातात आहे.”

होय माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आपले सगळ्यांचे आयुष्य आपल्या हातातचं व देवाच्या दयेवर आहे. आपला योग्य निर्णय आपल्याला योग्य दिशेकडे नेईल. आजचे पहिले वाचन हे गणना ह्या पुस्तकातून घेतलेले आहे. देव अहरोन ह्यांना लोकांना पवित्र गुरूचा आशीर्वाद देण्यास आज्ञा करतो. जुन्या करारात आशीर्वाद हा शब्द ४०० वेळा वापरण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त हा शब्द स्तोत्रसंहिता ह्या पुस्तकात ८८ वेळा वापरण्यात आला आहे. आजचे दुसरे वाचन हे गलतीकरांच पत्र ह्यामधून घेतलेले आहे. ते आपल्याला सांगत आहे की, देवाने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात पाठवला व त्याद्वारे आपण सर्व देवाची मुले झालेली आहोत. तसेच स्वर्गीय पित्याने आपल्या सर्वांना त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आशीर्वादित केले आहे. हे आपल्या सगळ्यांचं मोठं भाग्य आहे व नवीन वर्षाची सुंदर भेट आहे.

आजचे शुभवर्तमान हे सुंदर आहे. लुकलिखित शुभवर्तमानात आपण ऐकतो की, मेंढपाळ बाळ येशूला बघण्यासाठी पळत जातात. त्यांना गव्हाणीत बाळ येशू, त्याची आई मरिया व योसेफ ह्यांचे दर्शन होते. ते आनंदी होतात. ते येशूबाळा विषयी अनेक चांगल्या गोष्टी मरिया मातेला सांगतात. मरिया माता त्या सर्व गोष्टी आपल्या हृदयात ठेवते व त्याच्यावर चिंतन करते.

सन ४३१ साली ऐफेसुस ह्या परिषदेत मरिया मातेला देव पुत्राची आणि जगाची माता म्हणून घोषित केले. ह्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्या म्हणजे मरिया मातेचा विश्वास व तिचा आज्ञाधारकपणा होय. मरिया मातेने आपलं संपूर्ण जीवन देवाच्या सेवेसाठी अर्पण केले. एकदा एक सुप्रसिद्ध ईशज्ञानी व मरीया माते विषयी लिखाण केलेला गुरु होता. त्याला प्रश्न विचारण्यात आला की, मरिया मातेविषयी, देवमाते विषयी तुमचं काय मत आहे? ते म्हणाले, जेव्हा तिला आपण देवमाता संबोधीतो त्याच्यामध्ये सर्व काही सामावलेलं आहे.

होय आजच्या ह्या नवीनवर्षी मरिया मातेचं उदाहरण आपल्यासमोर ठेवूया व प्रार्थना करूया की, येणारे नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे, व भरभराटीचे जावो. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाचा आनंद मिळो.

देव तुम्हाला आशीर्वाद देवो व तुमचे संरक्षण करो

दे तुमचे मूख-प्रकाशित करो

देवाचे लक्ष तुम्हावर येवो व तुम्हाला शांती देवो. आमेन

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे देवा ह्या नवीन वर्षात आम्हाला आशीर्वादित कर.”

१.    हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमचे परमगुरु, महागुरु, धर्मगुरु, व व्रतस्थ यांना ख्रिस्तसभा योग्य मार्गाने चालविण्यासाठी आणि अखील जगात आशीर्वादाचे प्रतीक होण्यासाठी लागणारी कृपा व शक्ती त्यांना प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तू जीवनाचा दाता व त्राता आहेस. ह्या नवीन वर्षात आम्हाला सर्वांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे व देवाने आम्हाला सर्वांना आशीर्वादित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    देव मातीच्या मध्यस्थीने आम्ही अनाथ, निराधार, परक्‍या, आणि पोरकयांसाठी आशीर्वाद मागतो. आमच्या दानशूर वृत्तीमुळे त्यांचे जीवन सदोदित आशीर्वादमय व्हावे म्हणून, आपण प्रार्थना करूया.

४.    ह्या नवीन वर्षात नवीन जीवनाची सुरुवात करण्यास व नाविन्याने जीवन देव सेवेसाठी समर्पित करण्यास लागणारे कृपा-वरदान आम्हाला प्राप्त व्हावे म्हणून, आपण प्रार्थना करूया.

५.    ज्या स्त्रिया मातृपदाची अपेक्षा आपल्या मनात बाळगून आहेत, अशांवर देवाचा आशीर्वाद यावा व त्यांना मातृपद प्राप्त व्हावे म्हणून, आपण प्रार्थना करूया.

६.    थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, व सामाजिक गरजा प्रभू चरणी समर्पित करूया.



||"नूतन वर्ष आपणांस सुख-समृद्धीचे आणि आनंदाचे जावो हीच प्रभू चरणी प्रार्थना."||