Thursday 29 April 2021

                 Reflection for the Fifth Sunday of Easter (02/05/2021) By Br. Suhas Ferrel


पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार



दिनांक: ०२/०५/२०२१

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ९: २६-३१

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र ३: १८-२४

शुभवर्तमान: योहान १५: १-८




प्रस्तावना:

          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. ख्रिस्ताने मरणावर विजय मिळविला आहे. पुनरुत्थित झालेला प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. या पुनरुत्थित ख्रिस्ताद्वारेच आपणा सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. आजच्या पहिल्या वाचनाद्वारे आपण ऐकणार आहोत की शौलाला दिमिष्काच्या मार्गावर असताना पुनरुत्थित येशूचे दर्शन घडले आणि तदनंतर त्याने पौल बनून धैर्याने येशूची सुवार्ता सर्व जगाला पसरविण्याचे काम हाती घेतले. पौल हा नेहमी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे पुनरुत्थित येशुमध्ये राहिला. आजचे दुसरे वाचनही आपल्याला येशूवर पुरेपूर विश्वास ठेवून एकमेकांवर प्रेम करण्याचा उपदेश करत आहे. आपण जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहिलो तर आपले तारण होईल आणि जर का आपण प्रभू येशू पासून दूर गेलो तर आपला नक्कीच ऱ्हास होईल. एखादी फांदी ज्याप्रमाणे झाडाला चिटकून असते तेव्हा भरपूर फळ देते अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण ख्रिस्ताशी एकरूप होतो तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये अनेक चांगली कृत्ये करतो आणि आपले जीवन नेहमी फलदायक बनत असते. हेच आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकणार आहोत.

          आपण नेहमी प्रभू येशूच्या सानिध्यात राहावे आणि त्याची सुवार्ता सर्व जगाला बिनधास्तपणे प्रकट करावी म्हणून या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करू या.

बोधकथा:

          एकदा एका राजाने गाढवाचं पिल्लू घरी आणले आणि त्या पिल्लाला स्वच्छ आंघोळ घातली, त्याच्यावर चांगली वस्त्रे चढविली आणि त्या गाढवाचा वापर तो गावामध्ये फिरण्यासाठी करू लागला. जेव्हा जेव्हा राजा गाढवावर बसून गावाचा फेरफटका मारण्यासाठी निघत असे तेव्हा तेव्हा लोक आनंदाने त्याच्यापुढे नाचत-गाजत असत. हे दृश्य पाहून गाढव अतिशय आनंदित झालं; गाढव मनातल्या मनात विचार करू लागलं की, मी काही साधारण गाढव नाही. नक्कीच माझ्यामध्ये काहीतरी असाधारण गुण सामावलेले आहेत. हळूहळू हे गाढव गर्वाने फुगत चालले होते. जेव्हा जेव्हा राजाचे नोकर ह्या गाढवाला घेऊन जाण्यासाठी येत तेव्हा तेव्हा ते गाढव नखरे करू लागलं. त्यामुळे ऐके दिवशी राजाने वैतागून आपल्या नोकरांना त्या गाढवाला बाहेर रस्त्यावर हाकलून देण्यास सांगितले. गाढवाला रस्त्यावर हाकलून दिल्यावर गाढव दारोदारी हिंडू लागले. गाढवाला वाटलं की लोकं त्याचा आनंदाने स्वीकार करतील, त्याच्यापुढे नाचतील. परंतु लोकं त्या गाढवाला हाकलू लागले. त्याच्यावर दगड फेक करू लागले. आता त्या गाढवाला कळले की त्याची किंमत, त्याचे महत्त्व हे त्याच्यावर सवारी करणाऱ्या राजामुळे त्याला प्राप्त झाले होते. क्षणभरातच त्याचा गर्व मातीस मिळाला.

मनन चिंतन:

          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकटे, दुःखे, अडथळे, अडीअडचणी येतात परंतु अशा परिस्थितीमध्ये देवाच्या जवळ येणे म्हणजेच खरा ख्रिस्ती धर्म होय. जेव्हा-जेव्हा आपण अंधकारमय जीवनामध्ये एकटे पडले असतो. तेव्हा-तेव्हा आपला परमेश्वर आपल्यासोबत नेहमी खंबीरपणे उभा असतो.

          आज पुनरुत्थान काळातील पाचव्या रविवारी ख्रिस्तसभा आपणा सर्वांना देवामध्ये एकनिष्ठ राहण्याचा सल्ला देत आहे. संत पौल हा त्याच्या जीवनामध्ये नेहमी कायद्याला धरून जीवन जगत होता. नियम हा त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळेच जे नियम पाळीत नव्हते त्यांचा तो छळ करीत होता. पौलाला कळत नव्हते की जो प्रभू येशू ख्रिस्त ख्रुसावर टांगलेला आहे, जो स्वतः दयनीय परिस्थितीमध्ये आहे तो इतरांचा उद्धार, इतरांचे तारण काय करणार? परंतु जेव्हा पौलाला पुनरुत्थित ख्रिस्ताचे दर्शन घडते तेव्हा त्याला खऱ्या सत्याची ओळख येते आणि तेव्हापासून जो छळणारा होता तो आता ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना पसरविणारा बनतो. आपल्याही जीवनामध्ये अनेकदा आपण इतरांची निंदा-नालस्ती, तसेच इतरांविषयी वाईट गोष्टी बोलून त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न करीत असतो. ह्याचा अर्थ असा होतो की आपल्याला अजून खऱ्या ख्रिस्ताची ओळख झालेली नाही. जेव्हा आपल्याला खरोखर पुनरुत्थित ख्रिस्ताची ओळख होईल त्यावेळी आपोआपच आपण इतरांना देवाचे प्रेम, आपुलकी, दया दाखवून आपले जीवन अर्थमय बनविण्याचा प्रयत्न करू.

          संत योहान येशूचा अतिजवळचा शिष्य आपल्याला येशूच्या प्रेमाविषयी बोध करीत आहे की जर आपण खरोखरच इतरांवर प्रेम करीत असाल तर ते आपल्या कृतीद्वारे प्रकट व्हायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त प्रेमाचा धडा संपूर्ण जगाला शिकविला नाही तर त्या प्रेमापोटी स्वतःचा प्राण क्रुसावर अर्पण केला. ह्याला म्हणतात खरे प्रेम. त्याच प्रेमामुळे आज आपण सर्वजण ख्रिस्ती म्हणून नवीन जीवन जगत आहोत. कारण हे जीवन ख्रिस्ताने आपणास दिलेले आहे. त्यामुळेच ख्रिस्तामध्ये एकनिष्ठ राहणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.

          जोपर्यंत एखादी फांदी झाडाशी एकरूप असते तोपर्यंत ती चांगली, ताजीतवानी राहते आणि फळे देत असते. परंतु जेव्हा ती फांदी कापून झाडापासून वेगळी केली जाते तेव्हा तिचा उपयोग जाळण्यासाठी केला जातो. तिचा नाश होतो. तिचे अस्तित्व नाहीशे होते. आज येशू ख्रिस्त आपल्याला एकच बोध करत आहे, की जसा मी माझ्या पित्यामध्ये आहे तसे तुम्हीही माझ्यामध्ये राहा. संत मदर तेरेजा म्हणतात की जर तुम्हामध्ये ख्रिस्त असेल तरच तुम्ही इतरांना ख्रिस्त देऊ शकता. नाहीतर विहिरीत नाही पाणी तर पोहऱ्यात कुठून येणार? जर आपल्याकडे ख्रिस्त नसेल, ख्रिस्ताचा अनुभव नसेल तर आपण इतरांना ख्रिस्त कसा देणार? त्यामुळे ख्रिस्तामध्ये एकनिष्ठ असणे फार गरजेचं आहे. अनेकदा आपण जागतिक सुखात इतके धुंद होतो की आपल्याला आपल्या तारणकर्त्या येशूचा विसर पडतो. क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्याला जास्त महत्त्वाच्या वाटू लागतात. आणि कालांतराने आपण आपल्या जीवनाची दिशा विसरून आपले जीवन हे अर्थहीन बनू लागते. त्यामुळेच आपण नेहमी ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे जीवन जगून इतरांना ख्रिस्ताकडे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्याद्वारे आपणाला सार्वकालीन जीवन प्राप्त होईल. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:        

प्रतिसाद: हे प्रभू आम्हांला तुझे पुनरुत्थित दर्शन घडवून दे.

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्म भगिनी व तसेच प्रापंचिक ह्यांना ख्रिस्त सभेने प्रभूची शुभवार्ता घोषवण्यासाठी जी जबाबदारी सोपवली आहे ती त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. जी लोकं देऊळमातेपासून दुरावलेले आहेत व पापांच्या अंधारात खितपत पडलेले आहेत अशा लोकांना प्रभूच्या जीवनदायी प्रकाशात येण्यास प्रभूकडून शक्ती व सामर्थ्य मिळावे आणि तसेच त्यांना त्याच्या अपराधांची जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. जी लोकं दुःखी आहेत, ज्यांना भविष्याची चिंता भेडसावत आहे, ज्याचा आत्मविश्वास ढासळत आहे अशांना पुनरुत्थित येशूचे दर्शन घडून त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करू या.

४. जी लोकं आजारांनी ग्रस्त आहेत. विशेषतः करोना आजाराने पिडीत असलेल्या लोकांना पुनरुत्थित येशूचा स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. आता थोडावेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक, सामाजीक व वैयक्तिक गरजासाठी प्रार्थना करू या.       

Thursday 22 April 2021

                 Reflection for the Fourth Sunday of Easter (25/04/2021) By Br. Roshan Rosario



पुनरुत्थान काळातील चौथा रविवार


दिनांक: २५/०४/२०२१

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ४: ८-१२

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ३: १-२

शुभवर्तमान: योहान: १०: ११-१८


प्रस्तावना:

आज देऊळमाता पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांस येशू ख्रिस्त आपल्या उत्तम मेंढपाळावरील आपला विश्वास दृढ करण्यास आवाहन करीत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो की, संत पेत्राने पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावाने रोग्यांस बरे केले व त्यांना आरोग्यदान दिले. तर संत योहान दुसऱ्या वाचनाद्वारे आपल्याला सांगत आहे की जर आपण देवाच्या नावावर विश्वास ठेवला तर आपण सर्वजण देवाची लेकरे बनू”.

तसेच आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे की, प्रभू येशू हा आपला उत्तम मेंढपाळ आहे. जशी मेंढरे आपल्या मेंढपाळाची हाक ऐकतात तशेच आपण प्रभू येशू जो आपला उत्तम मेंढपाळ आहे त्याची वाणी ऐकतो का? ह्या जगातील तात्पुरत्या आकर्षणांना मोहित होऊन आपण प्रभू येशूच्या वाणीकडे दुर्लक्ष करतो.

आज आपण सर्वजण पवित्र मिस्साबलित सहभागी होत असताना, आपण आपल्या जीवनात उत्तम मेंढपाळापासून बहकून न जाता त्याच्या सहवासात राहावे व जे कोणी ख्रिस्ता पासून दूर गेले आहेत ते परत यावेत म्हणून प्रभूकडे प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ४: ८-१२

पेत्राने मंदिराच्या अंगणात जमलेल्या लोकांना ख्रिस्ताचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. पुष्कळांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला. परंतु मेलेले जिवंत होतील यावर लोकांचा विश्वास नव्हता. म्हणूनच येशू मेलेल्यातून जिवंत झाला आहे हे ऐकून त्यांना राग आला व त्यांनी पेत्र व योहान ह्यांना अटक केली.

दुसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्यांनी पेत्र व योहान यांना धर्मसभेसमोर आणले व विचारले की, तुम्हाला ह्या पांगळ्याना बरे करण्याचे सामर्थ कोठून मिळाले व कोणत्या व्यक्तीने तुम्हाला हा अधिकार दिला? त्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे दरडावून विचारताच पेत्राला ख्रिस्ताविषयी सांगण्याची नामी संधी मिळाली.

ज्या व्यक्तीने आम्हाला हा अधिकार दिला ती व्यक्ती दुसरी कोणी नसून येशू ख्रिस्त आहे. ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याच येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही लोकांना बरे करीत आहोत. येशू मरणातून उठला आहे व जिवंत आहे. त्याला तुम्ही नाकारले पण तोच सर्वश्रेष्ठ ठरला आहे. ज्याच्याकडून तारण मिळाले तो एकमेव येशू आहे. या शब्दांत पेत्राने येशू ख्रिस्ताची श्रेष्ठता सांगितली.

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ३: १-२

ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाची मुलेहे नाव देवाने दिले आहे. यावरून देवाने किती प्रिती केली आहे ते आपणास समजते. परंतु जगातल्या लोकांना हे कळत नाही व लोकं देवाची मुले म्हणून ओळखली जात नाहीत कारण जगातले लोक ख्रिस्त कोण आहे हे ओळखत नाहीत. जेव्हा ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा देवाच्या मुलांच परिवर्तन होईल, त्यांना नवे शरीर प्राप्त होईल व ख्रिस्ताच्या सानिध्यात हा बदल घडून येईल.

शुभवर्तमान: योहान: १०: ११-१८

येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्या मेंढरांवर प्रीती करतो. आपल्या मेंढरांचे रक्षण करण्यासाठी तो मेंढरांबरोबर असतो. एखादा चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरांचे कसे संरक्षण करतो याचे उदाहरण आपल्याला येशू ख्रिस्त देतो.

मेंढरांचे संरक्षण करताना मरण पत्करण्यास मी तयार आहे असे तो म्हणत नाही. मेंढरासाठी मी आपला प्राण देतो. कारण मनुष्याला सार्वकालिक जीवन देता यावे यासाठी येशू ख्रिस्ताला आपला प्राण वधस्तंभावर द्यावा लागला ही पित्याची आज्ञा होती. इतकेच नव्हे तर येशू ख्रिस्ताला आपला प्राण परत घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. परंतु येशू ख्रिस्त मरण पावला व तिसऱ्या दिवशी मरणातून उठला व जिवंत झाला.

बोधकथा:

फ्रान्सिस बॅरॉड हा एक चित्रकार होता, मार्क नावाचा त्याचा एक भाऊ होता. जेव्हा मार्क यांचे निधन झाले, तेव्हा फ्रान्सिसला त्या मार्कच्या घरात खालील गोष्टी मिळाल्या: एक फोनोग्राफ प्लेयर, मार्कच्या आवाजाची नोंद आणि मार्कचा कुत्रा, निप्पर.

जेव्हा फ्रान्सिस मार्कच्या आवाजाची रेकॉर्डींग वाजवायचा तेव्हा त्याच्या असे निदर्शनास आले की, निप्पर त्या फोनग्राफकडे धावत जायचा, हे पाहण्यासाठी की आपल्या मालकाचा आवाज कोठून येत आहे. हे सर्व दृश्य फ्रान्सिसच्या आठवणींमध्ये इतके विस्मयकारक राहिले की, निप्परच्या निधनानंतर  त्याने ते दृश्य  रंगविले आणि त्याला त्याच्या गुरुंचा आवाज” (His Masters Voice) असे संबोधले.

थोड्या वर्षानंतर एका ग्रामोफोन कंपनीने चित्रकला £ 100 मध्ये खरेदी केली. आठ वर्षांपर्यंत हि चित्रकला लोकप्रिय झाल्यामुळे कंपनीने त्यांचे नाव बदलले आणि आज आपण ह्या कंपनीला 'HMV' ह्या नावाने ओळखतो.

मनन चिंतन:

आपल्या आयुष्यात आपण कोणत्या गोष्टीशी सर्वात जास्त परिचित आहोत? आमच्या  मनात बहुतेक वेळा कोणता आवाज प्रतिध्वनीत होतो? आपणाला नियमितपणे प्रभावीत करणारे बरेच अनुभव व गोष्टी आहेत. काही चांगले आहेत तर, काही तेवढेसे चांगले नाहीत. बर्‍याच वेळा आपल्याला अनेक आवाजकिंवा अनुभव प्रभावीत करतात. आजचं शुभवर्तमान आपल्याला आपल्या अंतर्गत असलेल्या संघर्षाबद्दल अंतःदृष्टी देते कारण ती मेंढपाळांच्या आवाजाशी व परक्या माणसाच्या आवाजाशी तुलना करते. मेंढरांना मेंढपाळांची हाक सहज ऐकायला व ओळखून घेण्यासाठी शिकवले जाते. मेंढरे मेंढपाळांचा आवाज ऐकतात कारण मेंढपाळ त्याच्या मेंढरांशी नियमितपणे बोलणे ही सामान्य पद्धत आहे. एकदा मेंढराला मेंढपाळाच्या आवाजाची सवय झाली की, जेव्हा जेव्हा मेंढरू मेंढपाळाचे आवाज ऐकतात, तेव्हा तेव्हा ते वळून त्याच्या मागे जातात. आपल्या जीवनात पण अशा प्रकारे असते. ज्याच्या बरोबर आपण सर्वात परिचित असतो त्याच्या आवाजाचे आपण अनुकरण करतो. आपण प्रत्येक दिवस ज्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करतो त्या गोष्टीचा प्रभाव आपल्या जीवनात वाढत जातो आणि आपल्याला नकळत अनुकरण करण्यास आकर्षित करतो. म्हणून आपण आपल्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे की, आपण आपल्या जीवनात कशाशी परिचित आहोत? असं बघायला गेलो तर आपण देवाचं वचन, त्याची भाषा, स्वर आणि आवाज शिकण्यासाठी पुरेसा वेळ वापरायला पाहिजे. तसेच आपल्याला आपल्या दिवसाचा काही भाग, दररोज, देवाचा शब्द वाचनासाठी व त्यावर चिंतनासाठी समर्पित करायला पाहीजे. आपण हे करत असताना, त्याच्या आवाजाची आपल्याला सवय होईल आणि आपल्याला त्याच्या आवाजाने शांती आणि सांत्वन मिळेलं. एकदा ही सवय आपण अवगत केली कि, जेव्हा जेव्हा देव आपल्याबरोबर बोलेल तेव्हा तेव्हा आपण आपल्या व्यस्त दिवसामध्ये पण त्याचे बोलणे ऐकू शकू. आपण त्याची हाक ओळखून त्याचे अनुकरण करू. आज आपल्याला सोशल मीडिया, पॉप संस्कृती, पैशावर प्रेम, सामाजिक मान्यता अशे बरेच काही जगाचे दुसरे आवाज ऐकायला मिळतात. ह्या गोष्टींचा आपल्या जीवनात प्रचंड असा प्रभाव आहे आणि आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो आणि ते आपल्यावर परिणाम करतात. आज आपण स्वतःला विचारूया की आपल्या जीवनात आपल्याला सर्वात जास्त हाक कोणाची ऐकू येते. आपल्या दैनंदिन जीवनात जगातील इतर बर्‍याच आवाजांमध्ये देवाच्या आवाजाला हरवू देऊ नका. त्याऐवजी, त्याने बोलण्यास निवडलेल्या क्षणांसाठी आपण स्वत: ला तयार ठेवायला पाहिजे आणि जेव्हा तो आपल्याला बोलवील तेव्हा त्या आवाजाकडे आपले लक्ष केंद्रित करून आपण त्याचे अनुसरण करायला पाहिजे.

आज पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला त्याच्या मागे येण्यास बोलावित आहे. जो आपल्या सर्वांचा उत्तम व श्रेष्ठ मेंढपाळ आहे, तोच येशूख्रिस्त आपणास आपल्याला प्रत्येकाच्या नावाने हाक मारीत असतो. आपण ह्या आधुनिक काळाच्या व जगाच्या मोह मायामध्ये न गुरफटता व न अडकता, आपण एकनिष्ठेने व स्वच्छेने उत्तम मेंढपाळाची वाणी ऐकुया व सदा-सर्वदा येशूच्या सानिध्यात एका चांगल्या मेंढराप्रमाणे राहू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे, प्रभू तुझ्या लेकरांची वाणी ऐक.

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वाना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य द्यावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद राहावा, तसेच त्यांनी त्यांच्या मेंढरांची काळजी घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या

२. आपल्या कुटुंबातील गैरसमज दूर करून आपण एकमेकांना प्रेमाने समजून घ्यावे व प्रत्येकाचा आदर राखावा व त्याद्वारे एका चांगल्या ख्रिस्ती कुटुंबाची साक्ष समाजाला द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

३. जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळावी त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या कामा-धंद्यावर प्रभूचा वरदहस्त असावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

४. जे लोक देवापासून दूर गेलेले आहेत, तसेच देवाची वाणी न ऐकता दुसऱ्यांची वाणी ऐकतात अश्या सर्व लोकांना देवाचा दैवी कृपेचा स्पर्श होऊन त्यांनी देवाची प्रेमळ वाणी सतत ऐकावी व देवाच्या जवळ यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी व हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करू या.

Thursday 15 April 2021

               Reflection for the Third Sunday of Easter (18/04/2021) By Dn. David Godinho




पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार



दिनांक: १८/०४/२०२१

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ३:१३-१५१७-१९

दुसरे वाचन: १ योहान २:१-५

शुभवर्तमान: लूक २४:३५-४८



तुम्हास शांती असो

प्रस्तावना:

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या या आधुनिक काळात आपण खूप अशी प्रगती केलेली आहे. सर्वच क्षेत्रात आपण आघाडीवर आहोत. परंतु आपणामध्ये एका गोष्टीची उणीव आहे आणि ती म्हणजे शांती’. ‘शांतीया विषयावर मनन चिंतन करण्यास आजची उपासना आपणास पाचारण करीत आहे. प्रत्येक व्यक्ती हा शांतीचा भुकेला व तहानलेला आहे. परंतु खरी शांती ही ख्रिस्ताकडून आपणास मिळते. तीच शांती देण्यासाठी ख्रिस्त पुनरूत्थित होऊन आपणामध्ये आलेला आहे. थोडा वेळ शांत राहून आपले संपूर्ण आयुष्य पुनरूत्थित ख्रिस्तास अर्पण करूया. त्याला आपल्या जीवनात आमंत्रण देऊया व त्याच्या शांतीचा अनुभव घेऊ या.

बोधकथा:

एकदा एक राजा आपल्या राज्यात ‘शांती’ या विषयावर चित्रकलेची स्पर्धा आयोजित करतो. आणि सर्वात उत्कृष्ट चित्रास उत्तम असे बक्षीस देण्याचे घोषित करतो. भरपूर असे चित्रकार या स्पर्धेत भाग घेतात. शांतीह्या विषयावर खूप आकर्षक अशी वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढून ते राजासमोर घेऊन येतात. ह्या सर्व चित्रांमधून राजा फक्त दोन चित्रे निवडतो. पहिल्या चित्रात अतिशय शांतपणे डोंगरातून वाहणारी सुंदरशी नदी दाखवलेली असते व सर्व वातावरण अतिशय शांत स्वरूपाचं असतं. सगळीकडे प्रसन्नतेच व शांत असं वातावरण पाहून लोकांना वाटलं की, ह्याच चित्राला उत्तम चित्रअसे राजा घोषित करील. दुसऱ्या चित्रात शांततेचं तसं काही दृष्य रेखाटलेलं नव्हतं. किंबहुना वादळ-वाऱ्याचं दृश्य या चित्रात चित्रित केलेलं होतं. तसेच कडाक्याचा मुसळधार पाऊस व विजा चमकत होत्या आणि सोसाट्याचा वारा सुटलेला असं ते चित्र चित्रित केलं होतं. संपूर्ण चित्र शांततेचं नसून, अशांततेचं ते एक प्रतीक होतं. परंतु त्याच चित्रात डोंगराजवळ एक छोटंसं झाड होतं व त्या झाडाच्या फांदीवर एक छोटसं घरट होतं व त्या घरट्यात एक पक्षी अतिशय शांतपणे बसलेला होता. हे दृश्य पाहून त्या राज्यांने या दुसर्‍या चित्रास सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून घोषित केलं.

याचं कारण राजाने सांगितलं कीशांतता म्हणजे संघर्ष व हिंसालढाया व मारामाऱ्या यांचा अभाव नव्हेतर आंतरिक स्वास्थ्य होय. जे आपणास कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करण्यास शक्ती देते. तीच खरी शांती होय.

 

मनन चिंतन:

कधीकधी शांती मिळेल का बाजारी?’ ‘शांती मिळेल का शेजारी?’ अशी आपणा प्रत्येकाची परिस्थिती झालेली असते. प्रत्येक माणसाला शांतीची नितांत गरज असते. चांगली झोप हवी असेलतर आपणास शांत वातावरण लागते. जीवनात चांगला निर्णय घ्यायचा असेलतर शांततेची, एकांतवासाची गरज असते. चांगला अभ्यास करून परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं असेल, तर आपणास शांतीची गरज असते. सर्वच गोष्टीतकिंबहुना, परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी आपणास शांततेची गरज असते. स्तोत्रात सांगितलं आहे, “शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे!” (स्तोत्र ४६:१०). म्हणूनच जेव्हा एलिया परमेश्वराला शोधण्यासाठी किंवा त्याचा अनुभव घेण्यासाठी गेलातेव्हा त्याच्या समोरून सोसाट्याचा वारा गेला व भूकंप झाला त्यात परमेश्वर नव्हताभूकंपानंतर मोठा अग्नी प्रगट झाला त्या अग्नीतही परमेश्वर नव्हतात्या अग्नी नंतर शांत व मंद वाणी झाली. त्या शांतते मध्ये त्याला परमेश्वराचा अनुभव आला. (१राजे१९:१०-१४).

जर सर्व गोष्टीत शांतीच गरज आहेतर शांतीम्हणजे नक्की कायबोधकथेत सांगितल्याप्रमाणेशांती म्हणजे फक्त संघर्ष व हिंसालढाई व मारामाऱ्या या गोष्टींचा अभाव नव्हे. खरी शांती म्हणजे आंतरिक स्वास्थ्य किंवा प्रसन्नता होय. आणि ही शांती आपणास फक्त पुनरूत्थित येशू ख्रिस्त देऊ शकतो. कारण देवा ठायीच आपणास शांती मिळते. म्हणूनच संत अगस्तीन म्हणतात, “आपली हृदये परमेश्वरासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत आणि ती त्याच्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीही शांत होणार नाहीत.

आंतरिक स्वास्थ्य किंवा शांती मिळविण्यासाठी आपणास भीतीवररोगावरसंकटावरपापावर किंबहुना मरणावर मात करणे गरजेचे आहे. खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने कष्ट, मरण व पुनरुत्थान यांद्वारे भितीवररोगावरपापावरसंकटावर व मरणावर विजय मिळविला आहे. आणि म्हणून तोच पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्त आपणास खरी शांती देऊ शकतो जी शांती जगावेगळी आहे. योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू म्हणतो, “मी तुम्हास शांती देऊन ठेवितोमी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते, तसे मी तुम्हाला देत नाही.” (योहान १४:२७). हीच शांती प्रभू येशू ख्रिस्त जगाला देण्यासाठी या पृथ्वीवर आला. म्हणून त्याच्या जन्मासमयी स्वर्गातील दूतगणं मोठ्या सुरात परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले, “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती!” (लूक २:१३-१४).

पुनरुत्थानानंतर जेव्हा-जेव्हा प्रभू येशू शिष्यांस भेटलातेव्हा-तेव्हा त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची प्रथम वाणी किंवा शब्द होते ते म्हणजे, “तुम्हास शांती असो.आजचे शुभवर्तमान देखील या अभिवादनास अपवाद नाही. आजच्या शुभवर्तमानात आपणास सांगितले आहे कीयहुद्यांच्या भितीमुळे शिष्य दारे बंद करून खोलीत बसले होते. एवढेच नव्हे, तर प्रभू येशूच्या दुःख व कष्टाच्या समयी त्याला साथ न देता मरणाच्या ताब्यात सोडून आपण पळून गेलोआपल्या गुरूला नाकारलेत्याचा घात घेतलाअशा सर्व विचारांमुळे शिष्यांची मने व अंत:करणे फार खचून गेली होती. ते स्वतःला दोषी ठरवत होते. अशा या भीतीजनक परीस्थितीत प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये यशया प्रवक्त्याने भाकीत केल्याप्रमाणे शांतीचा अधिपती’ (यशया ९:६) कसा त्यांनी हरवलेली शांती त्यास पुन्हा बहाल करण्यास त्यांच्यामध्ये येतो व म्हणतो, “तुम्हास शांती असो.

इब्री भाषेत शांती या शब्दास शालोमम्हणतात. शालोमम्हणजेपरिपूर्ण भरभराटकल्याणस्वास्थ्य व ऐक्य होय. म्हणून पूनरूत्थित ख्रिस्ताची शांती सर्वप्रथम त्या शिष्यांस त्यांनी केलेल्या कृत्यांची शिक्षा न करता क्षमा करते व प्रेमाने आपलेसे करून पुन्हा एकदा आपले मित्र व शिष्य बनवते. एवढेच नव्हे, प्रभू येशू त्यांना त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा सर्व राष्ट्रांना घोषित करण्यास व त्याच्या शांतीचे दूत व साक्षीदार बनण्यास आमंत्रण देतो.

प्रभू येशू आपणा प्रत्येकास त्याचे कार्य पुढे नेण्यास पाचारण करतो. प्रत्येक मिस्साबलिदानात धर्मगुरू आपणास प्रभूची शांती देत असतो व ती शांती दुसऱ्यांना देण्यास आमंत्रण करीत असतो व मिसाच्या शेवटी जा! ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहेअसे सांगून शांतीचे दुत असे आपणास समाजात पाठवीत असतो.

आज कोरोना ह्या रोगामुळे अनेक लोक आर्थिकसामाजिककौटुंबिकअध्यात्मिकशैक्षणिक अशा समस्यांना सामोरे जात आहेत. शिष्यांप्रमाणे आपण देखील घाबरलेलो आहोत. सगळीकडे लॉकडाउन ची परिस्थिती आहे. अशा ह्या भितीजन्य परिस्थितीत ख्रिस्ताने दिलेली शांती इतरांपर्यंत पोहोचविणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

असिसिकर संत फ्रान्सिसने एक सुंदर अशी शांतीची प्रार्थना लिहिलेली आहे ती प्रार्थना आपल्या दैनंदिन जीवनात जगून आपण ख्रिस्ताची शांती इतरांना देऊ शकतो व त्याच्या शांतीचे साक्षीदार होऊ शकतो. ती प्रार्थना,

हे प्रभोमला तुझ्या शांतीचे साधन बनव.

जेथे द्वेष आहेतेथे मला प्रेम पेरू दे.

जेथे दुखावलेली मने आहेततेथे मला क्षमा करू दे.

जेथे संशय आहेतेथे विश्वास निर्माण करु दे.

जेथे वैफल्य आहेतेथे आशा निर्माण करू दे.

जेथे अंधार आहेतेथे प्रकाश निर्माण करू दे.

हे दिव्य स्वामीमला अशी कृपा दे की,

सांत्वनाची अपेक्षा करण्याएवजी मीच सांत्वन करावे.

इतरांनी मला समजून घेण्याऐवजीमीच त्यांना समजून घ्यावे.

इतरांनी माझ्यावर प्रेम करण्याएवजीमीच त्यांच्यावर प्रेम करावे.

कारण प्रेम देण्यातचआम्ही प्रेम मिळवत असतो.

क्षमा करण्यातचआम्हाला क्षमा होत असतेआणि मरण्यातच

आम्ही चिरंतन जीवनात जन्मत असतो. आमेन.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हांला तुझी शांती दे.

१. आपले परमगुरु फ्रान्सिस, महागुरू, व्रतस्थ आणि इतर ख्रिस्ती लोकांनी आपल्या आचरणाद्वारे प्रभूची शांती मिळविण्याचा प्रयत्न करावा व ती शांती इतरांना देण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

२. आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या कार्याद्वारे देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी झटावे, स्वतः शांतीचे साधन बनावे तसेच त्यांनी शांती प्रस्थापित करणारे प्रकल्प हाती घ्यावेत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

३. अनेक लोक वेगवेगळ्या आजाराने त्रस्त झाले आहेत. अनेक लोक कोरोना ह्या महामारीचा सामना करीत आहेत अशा लोकांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व प्रभूची शांती अनुभवता यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

४. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील सर्व समस्या दूर व्हाव्यात व पुनरुत्थित प्रभूच्या शांतीचा आपणास अनुभव यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.

Thursday 8 April 2021

            Reflection for the Second Sunday of Easter (11/04/2021) By Dn. Julius Rodrigues




पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार

दैवी दयेचा रविवार




दिनांक: ११-०४-२०२१

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ४:३२-३५

दुसरे वाचन: १ योहान ५:१-६

शुभवर्तमान: योहान २०:१९-३१


प्रस्तावना:

आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत आणि हा रविवार दयावंत येशूचा रविवार म्हणून संबोधला जातो. आजच्या शुभवर्तमानात आपल्या सर्वांस विश्वासू होण्यासाठी बोलावीले आहे. भीतीमुळे आपण घाबरून जाऊ नये किंवा निराश होऊ नये परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवीत त्याची सेवा करण्यास पुढे गेलो पाहिजे व त्यासाठी हवी असलेली शक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवी दयेतून आपल्याला मिळत असते. परेश्वर  दयाळू आहे, प्रेमळ आहे आणि हीच त्याची कृपा आपल्या सर्वांस लाभावी म्हणून आपण ह्या मिस्सा बलिदानात प्रार्थना करू या.

मनन चिंतन:

आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. हा रविवार दैवी करुणेचा रविवार असे म्हटले जाते. प्रभू येशू हा दयेचा व करुणेचा महासागर आहे, त्याच्या हृदयातून दयावंत कृपेचा झरा वाहत असतो.  त्याची दया आणि शांती अपार व सनातन आहे  आणि त्याचा अनुभव प्रभू येशू आपल्याला सर्वांना देत असतो.

असे म्हटले जाते, “जो डर गया वो मर गया”.  “डर के आगे जीत है”.  “डरना मना है”

 आज आपण भीती ह्या विषयावर मनन चिंतन करणार आहोत. धोक्याची स्पष्ट जाणीव असणे व त्या बद्दलची मानवी भावना मनात निर्माण होवून शारीरिक हानीची, धोक्याची व इजा होणारी संकल्पना ज्यावेळेस आपण अनुभवतो त्यास भीती असे म्हणतात.

 भीती ही एक मानसिकता किंवा भावना आहे आणि ही भावना वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या मनात निर्माण होते. उदाहरणार्थ अपघात पाहिल्यावर, भीतीदायक चित्रपट पाहिल्यावर किंवा स्वतः सोबत अपघात झाल्यावर इत्यादी... ह्यामुळे माणूस हा भिऊन जात असतो, घाबरत असतो, खचून जात असतो.

दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला लहान-मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत असते व त्यामुळे आपण घाबरून जात असतो, निराश होत असतो, आशाहीन बनत असतो व ह्यांतून आपण आपल्याला किंवा स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत असतो. उदारणार्थ...करोना.  करोना महामारीने संपूर्ण जग हादरून गेले आहे. सर्व लोक घाबरून गेले आहेत. आपले कसे होईल, सगळे पुन्हा कधी चालू होईल. आपला बचाव होईल का? आपल्याला करोना होईल का ? असे अनेक प्रश्न लोका समोर उभे आहेत आणि म्हणून लोक घरात लपून बसले आहेत. आणि आज अशाच प्रकारचा अनुभव आजचे  शुभवर्तमान आपल्या समोर ठेवत  आहे. येशूच्या मरणाने शिष्य घाबरून गेले होते. त्यांची दानादान झाली होती. जो ख्रिस्त त्यांचा आश्रयस्थान होता, त्यांचा प्रेरणास्थान होता, तोच मरून गेला होता आणि म्हणून त्यांच्या मनात एक भीतीचे वातावरण तयार झाले होते. ज्याप्रामाणे एखाद्या बोटीचा  तांडेल जेव्हा मरण पावतो तेव्हा ती बोट जशी दिशाहीन होते, अगदी त्याचप्रमाणे शिष्यांची स्थिती किंवा परिस्थिती झाली होती. थोडक्यात तेही दिशाहीन झाले होते. शिष्यांनी आपली इच्छाशक्ती गमावली होती. ते निराश झाले होते, हताश झाले होते. आपण आता काय करणार? आपले कसे होणार? आपला बचाव होईल का ?  ह्या नाना प्रकारचे प्रश्न त्यांना भेडसावत होते. परंतु येशू आपल्या दैवी शक्तीने पुनर्जीवित झाला होता, आणि आता त्यांच्यासमोर उभा राहिला होता. येशूने आपल्या शिष्यांना त्याच्या दैवीपणाचे बक्षीस म्हणून चार गोष्टी दिल्या आणि तो आज आपल्याला ही देणार आहे.

१.    १. दैवी आनंद: संध्याकाळची वेळ होती. शिष्य हे याहुद्यांच्या भीतीमुळे दारे बंद करून एका खोलीत लपून बसलेले होते. ह्यावरून आपल्याला समजते की, शिष्यांची बाह्य स्थिती खूप घाबरेपणाची आणि भित्रेपणाची झालेली होती आणि येशू अशावेळी आपले दर्शन त्यांस देतो व संपुर्ण वातावरण आनंदमय करतो. शिष्य किंवा प्रेषित आनंदाने हर्षवतात. त्यांच्यात असलेली भीती ही आनंदात बदलत असते. ते आनंदीत होतात. ज्या वेळेस आपण मिस्साला येतो तेव्हा ख्रिस्ताच्या येण्याने आपण आनंदित होतो का?

२. दैवी शांती: ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एक दैवी देणगी आपल्या शांतीद्वारे दिली होती. “तुम्हास शांती असो” त्याने आपल्या शिष्यांची चलबिचल झालेली मने आपल्या दैवी शब्दाद्वारे शांत केली होती. शिष्यांस एक मन-शांती लाभली होती. त्यांनी सुखाचा जणू सुसकारा सोडला होता.

ख्रिस्ताची शांती आपण आपल्या जीवनात अनुभवतो का? आपली मने ख्रिस्ताच्या शांतीने प्रेरित होतात का ?

३. दैवी मिशन कार्य / सामर्थ्य: ज्याप्रमाणे पित्याने, येशूला आपले कार्य करण्यासाठी पाठविले, त्याचप्रमाणे येशू आपल्या शिष्यांना मिशन कार्य करण्यासाठी पाठवितो. आता त्यांना चार भिंतीआत नसून तर, चार भिंती बाहेर जायचे होते आणि म्हणून येशू आपला पवित्र आत्मा त्यांच्यावर पाठवितो आणि त्यांना दैवी मिशन कार्य करण्यासाठी दैवी सामर्थ्य परिधान करतो.

आपण ख्रिस्ताचा संदेश इतरांपर्यंत पोहचोवतो का? की, आपण अजून चार भिंतीआड बसून आहोत?

४. दैवी स्पर्श: थोमाला ख्रिस्त आपल्या कुशीत हात घालण्यासाठी पुढे बोलावतो आणि थोमाला एक दैवी स्पर्शाची देणगी देतो. थोमाचा हा अनुभव त्याला विश्वासहीनते कडून विश्वासनीयतेकडे आणतो, आणि मग थोमा पुढे म्हणतो, “माझ्या देवा, माझ्या प्रभो.” आपणाला ख्रिस्त प्रसादाद्वारे देवाचा दैवी स्पर्श होतो का? आपला विश्वास बळकट होतो का? जर आज ख्रिस्त आपल्यासमोर उभा राहिला तर, तो म्हणेल, ‘डरना मना है ! आणि डर के आगे जीत है’ !

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद:  “हे दयावंत प्रभू आम्हाला श्रद्धेचे वरदान दे”

१. ख्रिस्ती श्रद्धेचे विस्तार करणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांना सर्वांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा प्रकाश इतरांना देण्यासाठी कृपा आणि शक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. थोमाप्रमाणे आपल्या सर्वांच्या मुखातून विश्वासाची घोषणा व्हावी, “माझ्या देवा व माझ्या प्रभो.” आणि त्यांच्याशी विश्वासू राहण्यासाठी कृपा मागूया.

३. आपल्या धर्मग्रामात जे लोक आजारी आहेत, दु:खीत आहेत, अशा सर्वांना परमेश्वराच्या दैवी हृदयाचा अनुभव येवून त्यांना शांती आणि कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आपण सर्वजण एक कुटुंब व एक ख्रिस्ती समूह आहोत ह्याची भावना आपल्या मनात निर्माण होऊन त्याप्रमाणे वागण्यासाठी पुनरुत्थित ख्रिस्ताची कृपा मागूया.

५. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक, वैयक्तिक, व सामाजिक हेतूंसाठी प्रभू कडे प्रार्थना करू या.