Friday 28 May 2021

   Reflection for the SOLEMNITY OF THE MOST HOLY TRINITY (30/05/2021) By Br. Pravin Bandya




पवित्र त्रैक्याचा सण



दिनांक: ३०/०५/२०२१

पहिले वाचन: अनुवाद ४:३२-३४, ३९-४०

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:१४-१७

शुभवर्तमान: मत्तय २८:१६-२०

प्रस्तावना:

आज देऊळमाता पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहे. महान संत ग्रेगरी म्हणतात, “जुना करार हा देव पित्याचा काळ, तर नवा करार हा देव पुत्राचा काळ व आधुनिक काळ हा पवित्र आत्म्याचा काळ आहे”. आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो कि, परमेश्वराने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले. तर दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो कि, आपण परमेश्वर पित्याला, बाबा, बापा अशी हाक मारतो, असा दत्तकपणाचा आत्मा आपणाला मिळाला आहे व प्रभू येशूख्रिस्ता बरोबर आपण त्याचे वारस झालो आहोत. पुढे शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पूत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आपणा प्रत्येकाचा बाप्तिस्मा पवित्र त्रैक्याच्या नावाने झालेला आहे. ज्या परमेश्वराने आपल्याला निर्माण केले, ज्या प्रभू येशूख्रिस्ताने आपलं तारण केलं आणि जो पवित्र आत्मा आपल्या सोबत असून, पवित्र जिवन जगण्यास आपणाला कृपा देत आहे, त्या त्रैक्याने आपल्याला दिलेली जबाबदारी आपण पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

पहिले वाचन: अनुवाद ४:३२-३४, ३९-४०

          आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो कि, परमेश्वराने मानवाला निर्माण केले म्हणून परमेश्वर सांगतो कि, वर आकाशात व खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही. आणि म्हणून परमेश्वर जो देव आपणाला निरंतराचा देत आहे, त्यात आपण चिरकाळ राहावे, म्हणून परमेश्वर आपल्याला देत असलेले विधी आणि आज्ञा ह्यांचे पालन करण्यास सांगत आहे.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:१४-१७

          आजच्या दुसऱ्या वाचनात आपण वाचतो कि, देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे म्हणून आपण त्याचे पुत्र आहोत. आपल्यामध्ये दास्यत्वाचा नाही तर पवित्र आत्मा आहे. आणि तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो कि, आपण देवाची मुलें आहोत; आणि जर मुलें तर वारसही आहों, म्हणजे आपणसुद्धा ख्रिस्ताबरोबर देवाचे वारस आहोत.

शुभवर्तमान: मत्तय २८:१६-२०

          येशू ख्रिस्ताच्या पुन:रुत्थानानंतर काही दिवसांनी ११ शिष्य गालील प्रांतातील डोंगरावर गेले. या अगोदर येशू ख्रिस्ताची व त्यांची येरुशलेमेत भेट झाली होती. त्या डोंगरावर त्यांनी ख्रिस्ताला नमन केले. तरी कितेकांच्या मनांत संशय होता. प्रभू येशूला त्यांच्या मनातील संशय समजला. तो त्यांच्या जवळ त्यांच्याशी बोलू लागला. त्यांची दुर्बळता व भय प्रभूला माहित होते, कारण पुनरुत्थित प्रभू त्यांच्याबरोबर पूर्वीप्रमाणे राहत नसे. ख्रिस्ताने त्यांना स्व:ताच्या अधिकाराविषयी सांगितले. तो स्वर्गाचा व संपूर्ण पृथ्वीचा अधिकारी आहे. कैसर राजा किंवा सर्व धर्मपुढारयापेक्षा तो श्रेष्ठ अधिकारी आहे.

या अधिकाराने, ख्रिस्ताने त्यांना आज्ञा दिली की शिष्यांनी सर्व लोकांस ख्रिस्ताचे अनुयायी करावे. हे काम, शिष्य, फक्त ख्रिस्ताची सुवार्ता सांगून पार पाडू शकतात. आणि जे ख्रिस्ताचे अनुयायी होण्याची इच्छा ठेवतात त्यांना पाण्याने बाप्तिस्मा देणे हे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले होते. देव जो पिता, देव जो पुत्र व देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाशी एकनिष्ठ राहण्याची ही साक्ष आहे. ख्रिस्त त्यांच्याबरोबर आत्म्याने सदासर्वदा राहणार.

मनन-चिंतन:

          आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहोत. देव एकच आहे पण त्याचं अस्तित्व तीन व्यक्तींमध्ये आहे. (१) स्वयम् परमेश्वर पिता (२) पूत्र म्हणजे प्रभू येशूख्रिस्त आणि (३) पवित्र आत्मा. हे अस्तित्व जाणण्यासाठी आपणाला पवित्र शास्त्राचा आधार घेऊन त्याच्यावर मनन-चिंतन करण्यास आजची उपासना बोलावत आहे.

पवित्र त्रैक्याच रहस्य एवढं मोठ्ठ आहे की, ते मानवजातीच्या विचारांच्या आकलनापलीकडे आहे. म्हणूनच रोमकरांस पत्र ११:३३ मध्ये संत पौल म्हणतो, “देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती आघात आहे; त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत”. तसेच जुन्या करारात, अनुवाद ह्या पुस्तकात २९:२९ मध्ये मोशेद्वारे परमेश्वर म्हणतो, “गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत”.

आपण हे जग पाहतो. सुंदर असा निसर्ग पाहतो. झाडं-झुडपं, समुद्र, नदी-नाले, दगड, डोंगर, आकाश, सूर्य, चंद्र, तारे, पक्षी, प्राणी हे सर्व पिता परमेश्वर निर्माण करीत असताना प्रभू येशू आणि पवित्र आत्मा त्याच्या सोबत होते. पवित्र त्रैक्याद्वारेच ह्या सर्वस्वाची निर्मिती झाली आहे. उत्पत्ती १:१- ३ मध्ये आपण वाचतो कि, “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी आकारविरहीत व शून्य होती, आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला प्रकाश होवो, आणि प्रकाश झाला”.

पिता परमेश्वर सर्वकाही निर्माण करीत असताना पवित्र आत्मा जलावर तळपत होता आणि परमेश्वराने शब्द उच्चारला प्रकाश होवो आणि तो शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणूनच योहान लिखित शुभवर्तमानात १:१ मध्ये आपण वाचतो, “प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता”. तसेच, “शब्द देही झाला आणि त्याने आम्हा मध्ये वस्ती केली” (योहान १:१४). नवीन करारात त्या शब्दाचे रुपांतर शरीरामध्ये झालं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने (शब्दाने) आम्हामध्ये वस्ती केली” (योहान १:१).

देव एक असून त्याचं अस्तित्व तीन व्यक्ती मध्ये आहे; म्हणूनच प्रभू येशूख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पूत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या” (मत्तय २८:१९).  पवित्र त्रैक्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये भरपूर ठिकाणी आपणास पहावयास मिळतो. जुन्या करारात यहेज्केल पुस्तकात ३६:२६ मध्ये यहेज्केल संदेषट्याद्वारे परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्याठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हास मासमय हृदय देईन. यहेज्केल संदेष्ट्याद्वारे नवे हृदय म्हणजे प्रभू येशुख्रिस्त आणि नवा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा होय.

एकदा एक धर्मगुरू पवित्र साक्रामेन्ताच्या खोलीमध्ये प्रार्थना करीत असता पवित्र आत्म्याने त्यांना एक दृष्टांत दाखवला ज्यात पवित्र आत्मा त्यांना सांगतो कि, पिता म्हणजे मस्तक आहे; पुत्र म्हणजे हृदय आहे; आणि पवित्र आत्मा म्हणजे हात आहेत. यहेज्केल संदेषट्याद्वारे दिलेल्या ह्या वचनामध्ये आपण पवित्र त्रैक्य म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तीन व्यक्ती एकत्र पाहतो.

नवीन करारामध्ये देखील भरपूर ठिकाणी पवित्र त्रैक्याचा उल्लेख केलेला आपणास आढळतो. मत्तय ३:१६ मध्ये आपण वाचतो, “मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलीच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला”. तसेच प्रेषितांची कृत्ये १०:३८ मध्ये आपण वाचतो कि, नासोरी येशुला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला कारण देव त्याच्या बरोबर होता”. बाप्तिस्मा संस्कार आपणाला पवित्र त्रैक्यावर खोलवर मनन चिंतन करण्यास बोलावत आहे.

तसेच पेत्राचे पहिले पत्र १:२ मध्ये संत पेत्र म्हणतो कि, पवित्र त्रैक्याद्वारेच आपण शुद्ध व पवित्र झालो आहोत. म्हणजे पवित्र आत्म्याद्वारेच आपल्या प्रत्येकाचे शुद्धीकरण किंवा तारण झालेल आहे.

          जसं संत पौल करिंथकरास पहिले पत्र १३: १४ मध्ये म्हटल्या प्रमाणे आपण पवित्र मिस्साबलीदानाची सुरुवात ही पवित्र त्रैक्यानेच करतो: “प्रभू येशुखिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागीता तुम्हा सर्वासह असो”. म्हणून आपण कोणतेही काम पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्याच नावाने सुरुवात करतो. 

          तीन व्यक्ती पण एकच देव, ह्या रहस्यावर आपण विश्वास ठेवतो का? पिता जो उत्पन्न करता, पुत्र जो तारणारा आणि पवित्र आत्मा जो शुद्ध करणारा आहे, ह्या पवित्र त्रेक्यावर आपण पूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवावा म्हणून प्रार्थना करूया.   

Praise the Lord!!!

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे पवित्र त्रैक्या आम्हांला आमच्या कुटुंबातील व समाजातील एकरूपता वाढविण्यास मदत कर.

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्त बंधू-भगिनी, जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, त्यांची त्रैक्यावरील श्रद्धा बळकट व्हावी व इतरांनाही त्याच श्रद्धेत दृढ करण्यास त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. आज पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत असताना त्रैक्यातील समन्वयातून आपण प्रेरणा घेऊन आपल्या कुटुंबात, धर्मग्रामात व समाजात समन्वय राखून सुखा-समाधानाने आपल्याला जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. त्यामुळे कुटुंबांत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत अश्या कुटुंबांना अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सढळ हस्ते मदत करण्यास त्यांना कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. अनेक तरुण-तरुणी जे देवापासून दूर गेले आहेत त्यांना परमेश्वरी दयेने पुन्हा चांगल्या मार्गावर आणावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.


आपणा सर्वांस पवित्र त्रैक्याच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Friday 21 May 2021

                       Reflection for the PENTECOST SUNDAY (23/05/2021) By Br. Aaron Lobo



पवित्र आत्म्याचा सण

(पेन्टेकॅास्टचा सण)

दिनांक: २३/०५/२०२१

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११

दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र १२:३ब-७, १२-१३

शुभवर्तमान: योहान २०:१९-२३

प्रस्तावना:

आज देऊळमाता पवित्र आत्म्याचा सण साजरा करीत आहे. आजच्या दिवशी शिष्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला व पवित्र आत्म्याच्या वरदानांनी परिपूर्ण होऊन त्यांनी प्रभूची सुवार्ता पसरविण्याच्या कार्यास सुरुवात केली.

असे म्हटले जाते की जे आपल्याकडे नसते ते आपण इतरांना देऊ शकत नाही. गेल्या आठवडयात आपण ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाचा सोहळा साजरा केला. प्रेषितांचा सहवास सोडून, येशू ख्रिस्त, आपल्या पित्याजवळ स्वर्गात परत गेला. येशूच्या मृत्यूनंतर, त्याचे शिष्य घाबरले होते, व आता, त्याला त्यांच्या सहवासातून कायमचे निघून गेलेला पाहून अजून हताश झाले. ते भयभीत होऊन त्यांनी स्वतःला एका खोलीत बंद केले. परंतु ख्रिस्ताने त्यांना सोडले नाही तर त्यांच्यावर असलेल्या अफाट प्रेमाकरिता, त्याने त्यांच्यावर आपल्या पवित्र आत्म्याचा वर्षाव केला; या आत्म्यामुळे येशूच्या शारीरिक अनुपस्थितीतसुद्धा, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे, ते त्याची उपस्थिती अनुभवतील.

या मिस्साबलीदानात भाग घेत असताना, आपण प्रार्थना करूया की शिष्यांप्रमाणे, पवित्र आत्म्यावरील आपला विश्वास दृढ व्हावा व आपण सुद्धा आत्म्यात असलेली ख्रिस्ताची जाणीव ओळखून त्याची सुवार्ता इतरापर्यंत पोहचवावी.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की येशूचे शिष्य एकचित्ताने प्रार्थना करीत होते. पवित्र आत्म्याच्या आगमनाची वाट पाहत होते. पेंन्टेकाँस्टच्या दिवशी म्हणजे पास्कानंतरच्या पन्नासाव्या दिवशी ते सर्व एकत्र जमले असताना स्वर्गातून आवाज आला व त्या आवाजाने ज्या घरात ते सर्व बसले होते ते घर भरून गेले आणि अग्नीच्या जीभा प्रत्येकावर बसल्या व नंतर सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. तसेच आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.

दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र १२:३ब-७, १२-१३

          दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास सांगतो की पवित्र आत्मा एकच आहे. विविध प्रकारची कृपादाने एकाच उगमापासून, देवापासून येतात. देवानेच ती सर्वांच्या समान हितासाठी दिली आहेत. हाच आत्मा प्रभू व देव ह्यांच्या कडून विविध प्रकारची कृपादाने, देणग्या मिळून सेवाकार्य होत असते. प्रत्येक व्यक्तीला स्वतः साठी नव्हे तर सार्वजनिक हितासाठी आत्म्याचे प्रकटीकरण होते.

शुभवर्तमान: योहान २०:१९-२३

येशू शिष्यांना दर्शन देतो व शिष्यांना आपली शांती देतो. पुनरुथित ख्रिस्ताने उच्चारलेले शांतीचे वचन हेच त्यांच्या आनंदाचे कारण आहे. त्याच्या ह्या शब्दाद्वारे त्याने आपली स्वतःची शांती शिष्यांना दिल्याचे दिसून येते व त्याच्या पुनरुत्थानाविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका तो दूर करतो. पित्याकडून मिळालेली शांती शिष्यांना देऊन त्यांना सुद्धा ती इतरांना देण्याचे कार्य येशू त्यांना सोपवितो.

मनन चिंतन:

गेल्या रविवारी आपण येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाचा सोहळा साजरा केला. पुनरुत्थित येशू ४० दिवस आपल्या शिष्यांबरोबर राहिला व आपल्या जिवंत असण्याचे पुरावे त्यांना दिले. येशूच्या दुखःसहन व मरणानंतर, सगळे शिष्य भयभीत झाले होते, परंतु, स्वतः त्यांच्या समोर प्रकट होऊन, त्यांच्या मनातले भय येशूने दूर केले व त्यांचा विश्वास स्थिर व दृढ केला.

आज आपण ‘पेंन्टेकाँस्टचा’ सोहळा साजरा करतो, म्हणजेच येशू ख्रिस्त पुनरुत्थित होऊन, त्यानंतर पन्नासाव्या दिवशी त्याने आपल्या शिष्यांवर आपल्या पवित्र आत्म्याचा, अग्नीच्या जीभांच्या रूपाने वर्षाव केला.

हा पवित्र आत्मा कोण आहे? त्याचे कार्य काय आहे? आपल्या जीवनात त्याचे काय महत्त्व आहे?

एका गावात एक भिकारी होता. आपलं भिक्षापात्र घेऊन तो लोकांच्या दारोदारी जाऊन त्यांच्याकडून भिक्षा मागायचा. एके दिवशी भिक्षा मागत मागत तो गावातल्या सोनाराजवळ पोहचला, व त्याच्यासमोर आपले भिक्षेचे पात्र ठेऊन त्याच्यात काहीतरी टाकण्यास आग्रह केला. त्याची वाईट अवस्था पाहून, त्या सोनाराला त्याच्यावर दया आली व आपल्या खिश्यातले काही शिक्के काढून त्याने त्या माणसाच्या भांड्यात टाकले. त्या पात्रात ते शिक्के पडण्याचा आवाज ऐकून तो सोनार आश्चर्यचकित झाला व त्याने त्या गरीब माणसाकडून ते पात्र घेतले व त्याची पडताळणी केली, व त्याला असा प्रश्न विचारला की तो कटोरा त्याला कुठून भेटला? भिकाऱ्याने त्याला सांगितले की त्याला कोणी तरी एका श्रीमंत माणसाने भेट म्हणून दिला होता. सोनार त्याला उत्सुकतेने म्हणाला, “या गावातला सर्वात श्रीमंत मनुष्य तूच आहे! जे पात्र तू घेऊन भिक्षा मागत फिरत आहेस, ते पात्र पूर्ण सोन्याचे आहे, व अमौल्य असे ते पात्र आहे!”

आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुद्धा असेच काही तरी घडते. परमेश्वराने आपल्या सर्वांनाच पवित्र आत्म्याच्या रूपाने एक उत्तम अशी भेट दिली आहे. परंतु आपण ही भेट आपल्या जीवनाच्या एक कोपऱ्यात, न वापरता तशीच ठेवून देतो आणि अमुल्यवान असलेल्या या भेटीला विसरूनही जातो! आजची उपासना आपल्याला देवाने आपणास दिलेल्या याच पवित्र आत्म्याची जाणीव ठेवण्यास आमंत्रण व संधी देत आहे.

हा पवित्र आत्मा, पवित्र त्रैक्यात असलेली तिसरी व्यक्ती आहे, परंतु तो एकच देव आहे. आपल्या जीवनात कश्याप्रमाणे तो आपली उपस्थिती जाहीर करतो?

१. सर्वात प्रथम, आपल्यामध्ये तो निवासतो व आपणास आपल्या प्रती दिवसाच्या व्यवहारात सहाय्य करतो. १ करिंथ ३:१६ मध्ये आपण वाचतो की आपण देवाचे मंदिर आहोत व देवाचा आत्मा आमच्यामध्ये वास करितो.

२. पवित्र आत्मा आपल्याला, बळ व शक्ती देतो. आपल्या कष्टाच्या वेळेत, परीक्षेच्या वेळेत तो आपणास धैर्य देतो व त्याच्यावर विजय प्राप्त करण्यास मदत करतो.

३. पवित्र आत्मा, आपल्याला संस्कारांद्वारे पवित्र करतो: बाप्तिस्माद्वारे आपल्याला देवाची मुलं म्हणून मान्यता देतो, दृढीकरणाद्वारे आपणास देवाचे खरे शिष्य व साक्षी बनवतो, ख्रिस्तशरीराद्वारे आपल्याला देवाच्या शरीराचा हिस्सा बनवतो, प्रायश्चिताद्वारे पापांची क्षमा देतो व देवाशी तुटलेला संबंध जोडतो, रुग्णभंगाद्वारे आपणास चागले आरोग्य देतो व आपले शरीरिक व आत्मिक आजार दूर करतो, तसेच लग्न व गुरुदीक्षेद्वारे आपले एकमेकांशी व देऊळ मातेशी नाते जुळवण्यास व ते घट्ट करण्यास सहाय्य देतो.

पवित्र आत्माहीन असलेले जीवन हे एका फुटलेल्या किंवा तुटलेल्या चाकाप्रमाणे आहे. त्याचा काहीच उपयोग नसतो. जेव्हा आपण ते दुरुस्त करतो, त्याच्यात हवा भरतो, तेव्हाच ते उपयोगी बनते. त्याच प्रमाणे आपल्या जीवनात पवित्र आत्मा जर नसेल तर आपल्या ख्रिस्ती जीवनाला कसलाच अर्थ नसेल, काहीच किंमत नसेल. खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. तर आजच्या या मिस्साबलीदानात, पवित्र आत्म्याचे दान आपणास मिळावे अशी प्रार्थना करूया व त्याचा सहवास आपणास पुन्हा एकदा एका नवीन रूपाने अनुभवता यावा यासाठी देवाकडे कृपा मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या आत्म्याचे दान आम्हाला दे.

१. ख्रिस्त प्रेमाचा दिवा तेवत ठेवण्यास हातभार लावणारे आपले परमगुरूस्वामी फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, व्रतस्थ व प्रापंचिक ह्यांना चांगले आरोग्य मिळावे व हे कार्य अखंड चालू ठेवण्यास पवित्र आत्म्याने त्यांना प्रेरणा द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

२. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी कृपा दृष्टी आमच्या देशाच्या सर्व नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर असू दे. त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास मदत कर व त्यांना सर्व वाईट वृत्तीपासून दूर ठेव व चांगल्या मार्गांवर चालण्यास मदत कर म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

३. आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत तसेच जगभरात अनेक लोक कोरोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना ह्या रोगापासून मुक्तता मिळावी त्यांना पुनरुत्थित प्रभू परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नवीन जीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

४. इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत असलेला आपला देश अनेक नैसर्गिक आपत्तीशी सामना करत आहे, हे आपत्ती दूर व्हाव्या व उद्ध्वस्त झालेली त्यांची घरे व जीवन पुनर्स्थापित व्हावीत यासाठी आपण प्रभूकडे विशेष प्रार्थना करू या.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व वैयक्तिक गरजा प्रभूकडे मांडू या.



Thursday 13 May 2021

            Reflection for the SOLEMNITY OF THE ASCENSION OF THE LORD (16/05/2021) By Dn. David Godinho




प्रभू येशूचे स्वर्गरोहण




दिनांक: १६/०५/२०२१

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ४:१-१३

शुभवर्तमान: मार्क १६:१५-२०



विषय: ख्रिस्ताचे सुवार्तिक बनून ख्रिस्ताचे मिशनकार्य पुढे नेऊ या

प्रस्तावना:

          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,

आज आपण पुनरुत्थित काळातील सातवा रविवार तसेच प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सोहळा साजरा करीत आहोत. आजची उपासना, विशेषत: आजचा प्रभू शब्दविधी आपणांस ख्रिस्ताचे सुवार्तिक बनून ख्रिस्ताचे मिशनकार्य पुढे नेण्यास पाचारण करीत आहे.

प्रभू येशूचे स्वर्गरोहण ‘कष्ट-दुःख सहन करून तो मरण पावला, मरणातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व-समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे.’ ही आमच्या विश्वासाची ‘सत्ये’ आपण प्रेषितांचा विश्वासांगिकार ह्या प्रार्थनेत मोठया अभिमानाने प्रगट करतो.

          पित्याने दिलेले मिशनकार्य प्रभू येशूने पूर्ण करून, तो स्वर्गात आपल्या पित्याकडे जाण्यापूर्वी, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करण्याचे कार्य त्याने आपल्या शिष्यांस दिले.

          तेच मिशन कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आता प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची आहे. हे कार्य पूर्ण करण्यास आपणा प्रत्येकास पवित्र आत्म्याची कृपा व सामर्थ्य ह्या मिस्साबलीदानात मागूया.

बोधकथा:

          लिओनार्डो दा विन्सी हा एक सुप्रसिद्ध असा चित्रकार होता. एकदा त्याने एक सुंदर असे चित्र काढावयास सुरुवात केली होती. थोडे दिवस त्या चित्रावर काम केल्यानंतर त्याच्या एका हुशार शिष्याला बोलवून ते चित्र पूर्ण करण्यास सांगितले. त्याचा शिष्य घाबरून त्यास म्हणाला, “गुरुजी, तुम्ही काढलेले चित्र पूर्ण करण्यास मी अयोग्य व अपात्र आहे. एवढेच नव्हे, तर तुम्ही सुरु केलेले एवढे सुंदर चित्र मी पूर्ण करुच शकत नाही.” तेव्हा लिओनार्डो दा विन्सी त्यास शांत करत म्हणाला, “माझं काम तुला चांगलं करण्यास प्रेरणा देणार नाही काय?” (Will not what I have done inspire you to do your best?)

मनन चिंतन:

          प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाचा सोहळा आज आपण साजरा करीत आहोत. त्याचे स्वर्गरोहण  आपणा प्रत्येकास त्याने ह्या जगात असताना सुरु केलेले कार्य पुढे नेण्याची प्रेरणा देत आहे. बोधकथेत सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताचे संपूर्ण जीवन, त्याने शब्दांनी व कृतीने केलेले कार्य हे आपणा प्रत्येकासाठी सुवार्तिक होण्यास एक आदर्श आहे.

          हे कार्य पुढे नेण्यास आपणास गरज आहे ती म्हणजे पवित्र आत्म्याची. कारण प्रभू येशूने त्याचे कार्य पवित्र आत्म्याच्या सहाय्याने व कृपेने पूर्ण केले. पवित्र आत्मा तुम्हांवर येईल व हे कार्य पुढे नेण्यास म्हणजेच ख्रिस्ताचे सुवार्तिक होण्यास सामर्थ्य देईल म्हणून त्याच्या दानांसाठी प्रार्थना करा असे प्रभू येशू आजच्या पहिल्या वाचनात आम्हांस सांगत आहे.

          २८ मे २०१७ रोजी, येशूच्या स्वर्गरोहणाच्या सणादिवशी पोप महाशय फ्रान्सिस यांनी असा संदेश दिला की, प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाने, पुत्राची ह्या पृथ्वीवरील कार्याची सांत्वना (समाप्ती) झाली आहे आणि पवित्र ख्रिस्तसभेच्या कार्यास आरंभ झाला आहे. आणि हे कार्य जगाच्या अंतापर्यंत चालू राहणार आहे. (General Audience 28/05/2017)

          ह्या मिशनकार्या संबंधात पोप पौल सहावे त्यांच्या Evangelii Nuntiandi ह्या परिपत्रकात ख्रिस्तसभेची अशी शिकवण देतात. ते म्हणतात, ख्रिस्तसभा ही अस्तित्वात आहे त्याच कारण प्रचार करण्यासाठी/सुवार्ता घोषविण्यासाठी. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर पवित्र सभा १. सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी २. ती शिकविण्यासाठी ३. कृपेच्या दानांची वाहिनी/स्त्रोत कशी ४. पापी लोकांचा देवाशी समेट घडवून आणण्यासाठी तसेच ५. ख्रिस्त यज्ञ (मिस्साबलीदान) चिरंतन ठेवण्यासाठी अस्तित्वात आहे (EN 14). एवढेच नव्हे, तर Evangelii Gaudeum ह्या परिपत्रकात पोप फ्रान्सिस प्रत्येक ख्रिस्ती बंधू-भगिनींना उपदेश करतात की, सर्व बाप्तीस्मा संस्कार स्वीकारलेल्या ख्रिस्ती जनांवर सुवार्तिक होण्याची/सुवार्तेचे प्रतिनिधी होण्याची जबाबदारी आहे (EG 120). आणि पोप संत जॉन पौल दुसरे आपल्या Redemtoris Missio ह्या परिपत्रकात तीन प्रकारे आपण हे मिशन कार्य पुढे नेऊ शकतो असे शिकवितात (RM 33-34).

१. Evangelization: ज्यांना प्रभूची ओळख नाही अशा सर्वांना घोषवून.

२. Re-Evangelization: ज्यांचा ख्रिस्ती जीवन जगण्याचा जोश/आनंद कमी झाला आहे, त्यांस पुन्हा एकदा नव्याने सुवार्ता घोषवून.

३. Pastoral Care: जे ख्रिस्ती आहेत, जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांची काळजी घेऊन.

          प्रत्येक कुटुंब हे छोटीशी ख्रिस्तसभा आहे. पहिल्या प्रथम आपल्या कुटुंबात ख्रिस्ती मुल्ये जोपासून, ख्रिस्ती मूल्यांचं बाळकडू पिऊन ते जगणे गरजेचं आहे. जेव्हा ही ख्रिस्ती मुल्ये आपण आत्मसाद करून आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या शब्दा व कृत्याद्वारे उतरविण्याचा प्रयत्न करू तेव्हाचं आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे सुवार्तिक बनू व सर्व जगात व संपूर्ण सृष्टीला त्याची सुवार्ता घोषित करू शकू. ती सुवार्ता खंबीरपणे घोषविण्यासाठी गरज आहे ती म्हणजे पवित्र आत्म्याची तर पवित्र आत्म्यास आपल्या जीवनात आपण आमंत्रण देऊया. आमेन.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू तुझे सुवार्तिक होण्यास आम्हांस कृपा दे.

१. आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी संपूर्ण सृष्टीस प्रभू येशूची सुवार्ता घोषविण्यासाठी पवित्र आत्म्याचे सहाय्य त्यांच्यासाठी मागुया.

२. आपल्या सरकारी अधिकाऱ्यांनी एक चांगलं, न्यायचं व एकोप्याचं राज्य स्थापन करण्यासाठी झटावं म्हणून त्यांच्यासाठी परमेश्वराची कृपा मागुया.

३. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता प्रगट करता यावी व ख्रिस्ताचे खरे अनुयायी बनून त्याने दिलेले मिशनकार्य पूर्ण करण्यास कृपा व सामर्थ्य मिळावं म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. कोरोनामुळे अनेक अश्या समस्या व संकटांना लोकांना सामोरे जावे लागते. अनेक लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे. अशा सर्वांवर प्रभूने आपली कृपादृष्टी वळवावी व कोरोनाचा समूळ नाश करावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करू या.

Thursday 6 May 2021

                Reflection for the Sixth Sunday of Easter (09/05/2021) By Br. Brian Motheghar

पुनरुत्थान काळातील सहावा रविवार



दिनांक: ०९/०५/२०२१

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:२५-२६, ३४-३५, ४४-४८

दुसरे वाचन: १ योहान ४:७-१०

शुभवर्तमान: योहान १५:९-१७



विषय: “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे”

प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो आजची उपासना आपल्याला प्रेम किंवा प्रीती ह्या विषयावर मनन चिंतन करावयास पाचारण करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात देव पक्षपाती नसून तो सर्वांना समान लेखतो व सर्वांवर त्याच्या प्रेमभरित दानांचा वर्षाव करतो हे सांगण्यात आले आहे. योहानलिखित पत्रातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात देव प्रेम आहेव त्याच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून त्याने त्याचा पुत्र आपणाखातर दिला, ह्याची घोषणा करण्यात आली आहे. शुभवर्तमानात येशू ख्रिस्त प्रेम करण्यासाठी शिष्यांना आज्ञा देत आहे. जे प्रेम पिता आणि येशूमध्ये आहे तेच प्रेम येशू शिष्यांना देउन इतरांवर करण्यासाठी आवाहन करतो.

 खरे प्रेम हे शारीरिक किंवा, अद्भुत रम्य असे नाही. तर, खरे प्रेम हे समोरच्यात असणाऱ्या, नसणाऱ्या, आहेत, नाहीत, होणार आहेत ह्या सर्व गोष्टींचा स्वीकार करून आपले जीवन दुसऱ्यांसाठी समर्पित करणे होय. समाजामध्ये आज पैशापेक्षा प्रेमाची गरज जास्त आहे. परमेश्वराच्या प्रेमाचा आपल्याला सखोल अनुभव यावा व तोच अनुभव इतरांना देण्यास आज ह्या मिस्साबलिदानामध्ये विशेष कृपा मागूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:२५-२६, ३४-३५, ४४-४८

पहिल्या वाचनात संत पेत्र आपल्याला अशी शिकवण देतो की, ‘देव पक्षपाती नसून तो सर्वांना समान लेखतो व त्याच्या प्रेमाला सीमा नाही.’  देव आपल्याला त्याच्या प्रेमात गुंफित असे राहण्यास सांगत आहे. देव हा सर्वांवर समान प्रेम करतो. तो जसा याहुदिंवर, तसाच परराष्ट्रीयांवर सुद्धा प्रेम करतो. तो समाजाने गलिच्छ, वाळीत टाकलेल्यांवर प्रेम करतो तसचं प्रेम आपल्या स्वतःच्या शिष्यावर सुद्धा करतो. त्याची एकच इच्छा आहे की, ह्या प्रेमामध्ये त्याच्या पुत्राच्या बलिदानाने सर्व बचावले जावे. ह्याचे उत्तम उदाहरण आजच्या उताऱ्यातील परराष्ट्रीय कर्नेलियस आहे.

दुसरे वाचन: १ योहान ४:७-१०

आजच्या दुसऱ्या वाचनात संत योहान आपल्याला देव प्रेम आहे असे सांगतो. हे प्रेम त्याने मानवजातीच्या उद्धारासाठी व्यक्त केले आहे. ह्याच त्यागाने व प्रेमाने आपल्याला आज्ञा व जबाबदारी दिली आहे की, आपण सुद्धा देवाप्रमाणे एकमेकांवर प्रेम करावे. जसे देवाने प्रथम आपल्यावर प्रेम केले आहे, त्याचप्रमाणे आपण सुद्धा त्याच्यावर व त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक जीवावर प्रेम करणे गरजेचे आहे.

शुभवर्तमान: योहान १५:९-१७

द्राक्षवेल आणि फांद्या यांचा दाखला झाल्यानंतर प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात त्याच्या शिष्यांना प्रेमाचा संदेश देऊन त्याप्रमाणे जगण्यास आज्ञा देतो. जसा पिता व पुत्र एक आहेत तसे आपण सुद्धा एक राहणे गरजेचे आहे. प्रभू येशू आपल्याला त्याच्या जीवनाद्वारे एक नवीन परंतु महान अशी शिकवण देत आहे. ती, म्हणजे आपल्या मित्रासाठी केलेलं सर्वात महान अर्पण म्हणजे आत्मसमर्पण होय.

मनन चिंतन:

देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र मानवाच्या तारणासाठी दिला’ (योहान ३:१६) आणि एवढेच नाही तर येशू ख्रिस्ताने क्रूसावर आपला प्राण समर्पण करून आणि तिसऱ्या दिवशी मरणावर विजय मिळवून आपणावरील प्रेम सिद्ध केले, म्हणूनच येशू ख्रिस्त आपणाला सांगत आहे, “जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले तसे मीही तुम्हावर केले आहे, तेच प्रेम तुम्ही एकमेकांवर करा” (योहान १५:९). जो इतरांवर प्रेम करतो तोच देवाला ओळखतो (१ योहान ४:७) कारण देव प्रेम आहे. ह्या प्रेमाखातर ती व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे इतरांसाठी आपला प्राण द्यायला देखील तयार होते (योकान १५:१३).

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो आजच्या उपासनेचा प्रेम हा विषय आहे. हाच विषय आजच्या सर्व वाचकांना संघटित करीत आहे. कारण हा शब्द आजच्या वाचनात अकरा वेळा वापरण्यात आला आहे. ह्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना आठवण करून देतो की, प्रेमाची अंतिम अभिव्यक्ती ही आत्मत्यागात आहे. आजचे वाचन हे प्रभू येशूच्या निरोप प्रवचनांमधून घेतलेलं आहे. (योहान १४-१७) हा निरोप संवाद त्याच्या शिष्यांबरोबरचा हृदयस्पर्शी संवाद आहे. ह्या संवादामध्ये प्रेम हा अविभाज्य घटक आहे. प्रेम हा त्रिवारी संगम आहे: देवाचे प्रेम त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर, येशू ख्रिस्ताचे त्याच्या शिष्यांवर आणि शिष्यांचे त्यांच्या गुरूवर असा हा त्रिवेणी संगम आपल्याला पहावयास मिळतो. पित्याच्या व पुत्राच्या प्रेमात तसेच पुत्राच्या व त्याच्या शिष्यांच्या प्रेमात काही विभिन्नता नाही. तरीपण प्रभू येशू त्याच्या शिष्यांना सांगतो की, “माझ्या प्रीतीत राहा” (योहान १५:९) कारण त्याच्या प्रीतीविना हे प्रेम हरवल्यासारखे किंवा हरवण्याची शक्यता आहे. पुढे त्याच्या प्रितीत राहण्यासाठी आपल्याला अट घालण्यात आली आहे. की, “जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर, माझ्या प्रीतीत राहाल.” (योहान १५:१०) ह्याद्वारे त्याचे शिष्य आयुष्यभर त्याच्याशी एक राहतील व त्याच्या प्रेमाचा अनुभव घेतील. ह्याद्वारे येशू ख्रिस्ताने आपल्याला शिष्यांना आदर व स्वातंत्र प्राप्त करून दिले आहे. “जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर, माझ्या प्रीतीत राहाल.” (योहान १५:१०) त्याच्याकडे आपल्या पित्याच्या आज्ञेत राहण्याचे स्वातंत्र्य होते, आणि त्या स्वातंत्र्याचा त्याने गैरवापर न करता, त्याने आपल्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली व हे उत्तम उदाहरण आपल्यासाठी बहाल केले आहे. त्याच्या पित्याच्या प्रेमात तो सदैव राहिला आणि त्याच्या पित्याच्या आज्ञेत राहून जो आनंद प्रभू येशूने अनुभवला तोच आनंद प्रभू येशू त्याच्या शिष्यांना देत आहे.

ह्या उताऱ्यातील काहिक ठळक मुद्द्यांवर आपण आता चिंतन करूया.

नवीन आज्ञा: प्रभू येशूने जुन्या करारातील दहा आज्ञांचे दोन आज्ञेमध्ये रूपांतर केले आहे. त्या दोन आज्ञा अशा, “येशूने उत्तर दिले, पहिली ही की, ‘हे इस्त्राएल, ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बिद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’ दुसरी ही की, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.” (मार्क १२:२९-३१) ह्या आज्ञेच्या दुसऱ्या पाठाचे रूपांतर ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ ह्या ऐवजी फक्त ‘एकमेकांवर प्रीती करा’ अशा छोट्याशा परंतु महत्वपूर्ण बदलाचा उल्लेख आपल्या ह्या उताऱ्यात आढळून येतो. ह्याद्वारे प्रभु येशू आपल्याला सांगत आहे की, प्रीती ही सर्वांवर करा व ती सतत करत राहा. जशी त्याने आपल्यावर केली आहे, करत आहे, आणि पुढे देखील करणार आहे.

आनंद: आनंद हा विषय येथे आपल्याला अकराव्या ओवीत आढळून येतो. येशू ख्रिस्ताचा आनंद हा त्याच्या पित्याच्या आज्ञेत राहण्यात असतो. हा आनंद तो आपल्याबरोबर वाटत आहे. हा आनंद आपण त्याच्या पित्याच्या सहवासात राहिलो तर, पूर्णत्वास येतो. हा आनंद पूर्णत्वास आणण्यासाठी आपल्याला त्याच्या आज्ञा पाळाव्या लागणार आहेत.

दास नाही तर मित्र आहात: प्रभू येशू आजच्या उताऱ्यात म्हणतो की, “मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे.” (योहान १५:१५) बायबलमध्ये डूलोस (Doulos) म्हणजेच सेवक, दास किंवा देवाचा दास ही उपमा लाज वाटण्यासारखी नव्हती; तर हा मोठा मान किंवा अभिमान मानला जात होता. ह्याची उदाहरणे आपल्याला बायबल मध्ये आढळतात: ज्याप्रमाणे मोशे हा देवाचा दास होता. (अनुवाद ३४:५) यहोशवा देवाचा दास होता. (यहोशवा २४:९) तसेच दावीद हा सुद्धा देवाचा दास होता. (स्तोत्रसंहिता ८९:२०). ही उपमा संत पौलाने सन्मान म्हणून वापरली आहे. (तिताला पत्र १:१) तसेच याकोबानेही वापरली आहे. (याकोबाचे पत्र १:१) इतिहासातील सर्व महान व्यक्ती ‘देवाचा दास’ म्हणून संबोधले गेले होते. परंतु ख्रिस्त आपल्याला फक्त ‘दास नव्हे तर मित्र म्हणून संबोधतो.’ तो आपल्याला त्याच्या पित्याच्या बरोबरची जवळीकता बहाल करीत आहे. ही जवळीकता किंवा मैत्री अब्राहामाच्या जीवनात आपल्याला जुन्या करारात पहावयास मिळते. शलमोनाचा ज्ञानग्रंथ ह्यात म्हटले आहे की, “ज्ञानाच्या सानिध्यात राहणाऱ्या माणसावर देव खचितच प्रेम करतो.” (शलमोनाचा ज्ञानग्रंथ ७:२८) पुरातन काळात जे राजांच्या अधिक जवळचे असत तेच राजांचे मित्र बनत असत. आज ख्रिस्त आपल्याला मित्र व ते पण देवाचे मित्र म्हणत आहे. ह्या जवळीकतेने त्याने आपल्याला एकत्र आणले आहे. कारण, याद्वारे तो आपल्यापासून दूर जात नाही तर, एकदम जवळचे मित्र आपणास बनवत आहे.

शिष्यत्व ही दैवी निवड: ह्या दैवी मैत्रीच्या गुणाचे पुढे शिष्यत्वामध्ये रुपांतर केले गेले आहे. कारण, प्रभू येशू पुढे म्हणतो, “तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे.” (योहान १५:१६) शिष्यत्व हे दैवी दान आहे. ते आपल्याला आपल्या कार्याने किंवा गुणवत्तेने प्राप्त करता येत नाही. हे शिष्यत्व पुढे जाऊन “विपुल असे फळ द्यावे” (योहान १५: १६) हे फळ आपल्याला प्रभू येशूच्या प्रेमातुन, आणि त्याच्या मैत्रीतून मिळत असते. तेच फळ आपण आपल्या दैनंदिन जीवनात दुसऱ्यांना देण्यासाठी ख्रिस्त आपल्याला प्रेरणा देत असतो. तसेच त्यासाठी लागणारी शक्ती ही आपल्याला त्याच्या नावात सामावलेली आहे. कारण तो म्हणतो, “आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे.” (योहान १५:१६) हे आपण आपल्या दैनंदिन जीवनातील प्रार्थनेत आत्मसात करत असतो. शेवटी प्रभू येशू आपल्या शिष्यांना वास्तविक सत्याविषयी सावध करीत आहे. प्रभू म्हणतो, “या जगात जीवन जगत असताना माझ्या नावामुळे तुमचा द्वेष केला जाईल.” तरीसुद्धा तुम्ही एकमेकांवर प्रीती करा व त्याहून अधिक आपल्या शत्रूवर किंवा जी व्यक्ती तुमचा द्वेष करते त्यांच्यावर अधिकरित्या प्रेम करा.

संत पौल म्हणतो, “मी जरी देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो; पण माझ्याठायी प्रीति नसली तर मी आवाज करणारी थाळी किंवा झणझणणारी झांज आहे” (१ करिंथ १३:१-२). प्रेमाशिवाय मनुष्यजीवन हे नरका समान आहे. खरं प्रेम करणं म्हणजे यातनांना सामोरे जाणे, स्वतःचा त्याग करणे, स्वतः पडून दुसऱ्यांना उठवणे, ह्यालाच म्हणतात प्रेम. प्रत्येकाला प्रेम हवं असतं पण द्यायला मात्र थोडेच तयार असतात. खरं प्रेम धनदौलतीने विकत घेता येत नाही ते इतरांना देण्यात असते. परत मिळविण्याची आशा न ठेवता जीवन जगणे ह्यातच खरा आनंद असतो. क्रूसभक्त संत योहान म्हणतात, “प्रेमाच्या आधारावरच ह्या विश्वाचा न्याय-निवाडा केला जाईल. सर्व मानवजातीचं तारण हे प्रेमावरच आधारित आहे, ‘प्रेमहा शब्द मानवजातीच्या इतिहासातील सर्वात शेवटचा शब्द असेल”. संत पौल प्रमाणे आपण ह्या प्रेमाने झपाटले गेले आहोत का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे परमेश्वरा, परस्परावर प्रेम करण्यास आम्हाला सहाय्य कर.”

१. ज्याप्रमाणे पित्याने पुत्रावर प्रेम केले व पुत्राने आपणावर, तेच प्रेम सर्व भाविकांना व ख्रिस्तसभेच्या सर्व पुढाकाऱ्यांना एकमेकांवर करण्यास कृपा मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. पवित्र आत्म्याचा वर्षाव आपणा प्रत्येकावर व्हावा व मिळालेल्या पवित्र आत्म्याच्या दानांचा उपयोग स्वत: पुरताच न करता इतरांच्या व समाजाच्या कल्याणासाठी करावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. दु:ख सहन करणारे आपले शेजारी, विशेषकरून जे आजारी व गरीब आहेत. अश्यांकडे बेपर्वाई व उदासीनतेने न पाहता, सर्वांनी त्यांची काळजी घ्यावी, ह्या परमगुरुस्वामींच्या हेतूसाठी आपण प्रार्थना करू या.

४. यंदाच्या वर्षी पावसाळी मोसमात चांगला पाऊस व्हावा, शेती-बागायतीसाठी योग्य ते हवामान मिळावे व शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाबरोबरच त्यांच्या शेतातील भरगोस पिकाने इतरांचेदेखील पोषण व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. थोडा वेळ शांत राहून आता आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजांसाठी आपण प्रार्थना करू या.