Thursday 26 May 2022

Reflection for the SOLEMNITY OF THE ASCENSION OF THE LORD (29/05/2022) by Fr. Benher Patil

प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सोहळा
दिनांक: २९/०५/२०२२
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १:१७-२३
शुभवर्तमान: लुक २४:४६-५३


 प्रस्तावना:

            प्रिय बंधू-भगिनीनो, आज ख्रिस्तसभा पुनरुत्थित काळातील सातवा रविवार साजरा करीत आहे. आजच्या दिवसाचं विशेष महत्व म्हणजे प्रभू येशूचे वैभवी स्वर्गारोहण. आजची वाचने आपणास स्पष्टपणे सांगतात कि पुनरुत्थानानंतर ख्रिस्ताने चाळीस दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शिष्यांना दर्शनं दिली, त्यांना देवराज्याची शिकवण दिली आणि पवित्र आत्म्याच्या आगमनाची शाश्वती देऊन तो सर्वासमक्ष मोठ्या वैभवाने वर स्वर्गात घेतला गेला. येशूचे स्वर्गरोहण आपणासाठी एक आशेचा किरण आहे आणि ते आपल्या विश्वासाचं प्रखर सत्य आहे, ज्याद्वारे आपणास असा बोध होतो कि, आपणसुद्धा स्वर्गासाठी निर्माण केलेले असून, आपलं ऐहिक जीवन संपल्यावर ख्रिस्तासारखे आपणसुद्धा स्वर्गाराज्यात देवाबरोबर निरंतर वास करणार आहोत.

मनन चिंतन:

            येशूचे गौरवी पुनरुत्थान हे ख्रिस्ती धर्माचा आणि श्रद्धेचा गाभा आहे. हे रहस्य आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतरची महान घटना म्हणजे ख्रिस्ताचे वैभवी स्वर्गरोहण. हा सोहळा साजरा करत असताना त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते? अथवा त्याचं आपल्या ख्रिस्ती जीवनात काय आणि किती महत्व आहे, ह्या बाबीवर मनन-चिंतन करणे गरजेचे आहे.

            आपल्याला कदाचित शंका येत असेल कि येशू वर स्वर्गात गेला म्हणजे नक्की कुठे आणि कश्यासाठी गेला? पहिल्या प्रथम, येशूचे स्वर्गरोहण आपल्याला जाणीव करून देते कि तो स्वर्गात देवपित्याकडे परत गेला. पवित्र शास्रात ह्या सत्याचा उलगडा केलेला पाहायला मिळतो. योहानाच्या अध्यायात (१६:२८) येशू म्हणतो कि, “मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा जग सोडून पित्याकडे जात आहे.” आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल ह्या सत्याला दुजोरा देत म्हणतो कि, परमेश्वर पित्याने ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठविले; आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत, आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले.

            दुसरी गोष्ट म्हणजे येशूचे स्वर्गरोहण हे त्याच्या दैवत्वाची साक्ष देते. तो खरा देव आणि प्रभूचा प्रभू असून स्वर्ग आणि संपूर्ण सृष्टी त्याच्या हातात आहे. त्याने जगातील सर्वावर: पापावर, सैतानावर, मरणावर विजय मिळवून स्वर्गात म्हणजे त्याच्या गौरवात प्रवेश केला आहे. त्याने अभिवचन दिल्याप्रमाणे तो स्वर्गात पहिल्या प्रथम आपल्यासाठी जागा तयार करावयास गेला आहे (“मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो; आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन”, योहान १४:२). त्याचप्रमाणे तो देवाच्या उजवीकडे आपला सामर्थ्यशाली तारणकर्ता आणि मध्यस्त बनून बसला आहे. येशू स्वर्गात जाण्याचं तिसर आणि महत्वाचं कारण म्हणजे पवित्र आत्म्याचं दान. येशू म्हणतो, “मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलों तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही; मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवीन” (योहान १६:७). 

            येशूचे स्वर्गरोहण ही आपणा प्रत्येकासाठी विशेषकरून खूप फायदेशीर बाब आहे. ह्या घटनेद्वारे ख्रिस्त आपल्याला मानव कोण आहे आणि त्याच स्थान काय आहे हे दाखवून देतो. जो ख्रिस्त वर स्वर्गात घेतला गेला त्याने काळाची पूर्तता होताच मानवी अवतार धारण केला (गलतीकरांस ४:४-७). ज्याप्रमाणे येशूच्या मानवी रुपाद्वारे (Incarnation) खुद्द देव मनुष्य झाला आणि आम्हामध्ये वस्ती करून राहायला (योहान १:१४). त्याचप्रमाणे येशूच्या स्वर्गरोहणाने (Ascension) मानवाला देवाबरोबर राहण्याचं सदभाग्य मिळालं आहे. ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वर्गाचे दरवाजे खुले करून त्याच्या स्वर्गीय वैभवात सहभागी होण्याचा मान दिला आहे.

            ख्रिस्ताचे स्वर्गरोहण हे निश्चितच आमच्यासाठी स्वर्गीय जीवनाची सुरुवात आहे. ह्या घटनेद्वारे त्याच्या वैभवात सहभागी होण्याची आशा पल्लवित झाली आहे. पण तत्पूर्वी आपण ह्या जगातील जबाबदारी दिवसेंदिवस विशासुपणे पार पाडली पाहिजे. येशूने ज्याप्रमाणे परमेश्वर पित्याने सोपविलेलं तारणकार्य आणि मिशन सर्वस्वीपणे आणि चोखपणे पार पाडले. त्याचप्रमाणे आपले ह्या ऐहिक जगातील जीवन, कार्य आणि मिशन आहे ते प्रेमाने आणि देवाच्या इच्छेप्रमाणे पार पाडून त्याच्या स्वर्गीय वैभवात आपणास वाटा मिळावा म्हणून ह्या ख्रिस्त-यागात देवाकडे याचना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे ख्रिस्ता आम्हासाठी देव पित्याकडे मध्यस्ती कर.

१. आमचे पोप फ्रान्सीस, बिशप्स, सर्व मिशनरी धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांनी येशूच्या स्वर्गारोहणामुळे नविन चैत्यन्याने आणि आशेने प्रेरित होऊन तसेच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रोस्ताहीत होऊन जगातील आपले सुवार्ताकार्य आनंदाने पार पाडण्यास देवाची कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करू या.

२. ह्या जगात जिथे अशांतता व अराजकता आहे तसेच जिथे भ्रष्टाचार फोफावलेला आहे अश्या ठिकाणी, शांतीचा राजपुत्र ख्रिस्ताने राजकीय लोकांचं परिवर्तन करावं आणि त्यांना जगाच्या कल्याणासाठी प्रेरित करावं म्हणून प्रार्थना करू या.

3. आपल्या समाज्यातील असंख्य बेरोजगार तरुण आणि तरुणी ह्याना नोकरी मिळावी, जे भरकटलेले आहेत त्यांना सन्मार्गास लावावे तसेच जे वासना आणि व्यासानांच्या आहारी गेलेले आहेत अश्यांची सुटका करावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करू या.

४. ह्या मे महिन्यात सर्व ख्रिस्ती भाविकांच्या पवित्र मरीयेवरील भक्तीला उधान यावं, तिचा योग्य तो मान सन्मान करावा आणि तिचा कित्ता आपल्या डोळ्यासमोर ठेऊन आपलं ख्रिस्ती जीवन पवित्र, नम्र, आणि शांतीने जगावे आणि आपापले मिशन-कार्य आज्ञाधाराकपणे तसेच आनंदाने पार पाडण्यास ईश्वरी कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करू या.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.

Wednesday 18 May 2022

 Reflection for the 6th Sunday of Easter (22/05/2022) By Bro. Rockson Dinis




पुनरुत्थान काळातील सहावा रविवार


दिनांक: २६/०५/२०२२

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १५:१-२, २२-२९

दुसरे वाचन: प्रकटीकरण २१:१०-१४, २२-२३

शुभवर्तमान: योहान १४:२३-२९


पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील”




प्रस्तावना

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण पुनरुत्थान काळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत.  आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्या बरोबर राहण्यास, त्याच्यासारखे वागण्यास, त्याच्यासारखे कार्य करण्यास व त्याच्यासारखे प्रेम करण्याचे आवाहन प्रत्येकाला करत आहे. आजच्या वाचनात आपण ऐकतो की पवित्र आत्मा शिष्यांना कठीण परिस्थितीमध्ये अचूक असा निर्णय घेण्यास मदत करतो. आजच्या शुभवर्तमानात आपण नियमावळी व  देवाच्या प्रेमाविषयी ऐकतो. ख्रिश्चन  धर्म हा नियम आणि नियमांचा धर्म असा कधीच नव्हता.  एकापेक्षा जास्त वेळा, येशूला अशा लोकांचा सामना करावा लागला. म्हणून कायद्यापेक्षा प्रेमावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आज या मिसाबलीदानामध्ये  भाग घेत असताना आपण प्रभूकडे प्रार्थना करूया व त्याचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करू या. ते म्हणजे  नियमापेक्षा देवावर, व व्यक्तीवर प्रेम करावे आणि ते प्रेम हृदयातून असावे.

मनन चिंतन

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, आज ख्रिस्तसभा पुनरुत्थान काळातील सहावा रविवार साजरा करीत आहे. आज ख्रिस्त आपल्याला त्याच्या सहवासात राहण्यासाठी आमंत्रण करत आहे. प्रेषितांचे कृत्य ह्या पुस्तकातून घेतलेले आजच्या पहिल्या वाचनात, आपण वाचतो की, चर्चमध्ये वास्तव्यास असलेल्या पवित्र आत्म्याने प्रेषितांना विदेशी ख्रिस्ती बनण्याविषयीची एक मोठी कठीण समस्या सोडवण्यास कशी मदत केली हे सांगते, ज्याने सुरुवातीच्या काळाचा पायाच हादरवला.

प्रकटीकरणाच्या पुस्तकातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनामध्ये चर्चचे वर्णन स्वर्गीय जेरुसलेम असे केले आहे, जे जेरुसलेममधील मंदिरातील पवित्र स्थानामध्ये देवाच्या पवित्र उपस्थितीची जागा घेते. हे नवीन जेरुसलेम हे प्रेमाने एकत्रित केलेले शहर आहे, ज्यामध्ये विजयी येशू राहतो आणि त्याच्या प्रत्येक सदस्यामध्ये आहे. आजचे शुभवर्तमान आपल्याला आठवन  करून देते की, पवित्र आत्मा, आपल्यामध्ये राहतो, तो आपला शिक्षक, आपला वकील आणि आपली शांती आणि आनंदाचा स्रोत आहे.  येशूने आपल्या अनुयायांना वचन दिले आहे की, पवित्र आत्मा येईल आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती देईल.

येशु म्हणतो, “मी वेल आहे, तुम्ही फाटे आहा, जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो, तोच पुष्कळ फळ देतो कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही. (योहान १५:५) प्रभू येशूख्रिस्ता बरोबर राहणे म्हणजे आपण प्रत्येक दिवशी वैयक्तिक प्रार्थना, देवाशी बोलणे आणि त्याचे ऐकण्यात थोडा वेळ घालवणे असे आहे.  आपण येशूसोबतचे आपले नाते अधिक घट्ट केले पाहिजे, त्याच्याशी संपर्क साधण्यास शिकले पाहिजे आणि त्याच्यावर मनापासून प्रेम केले पाहिजे. असे केल्याने आपण येशू ख्रिस्तमध्ये एकरूप होऊ शकतो. आपण पाहतो, येशूच्या  मृत्यूच्या आणि पुनरुत्थानानंतर काही वर्षांनी, पहिला ख्रिश्चन समुदाय ख्रिस्ती आणि येशूचा शिष्य बनवण्याबद्दल वादविवाद करत होता.   त्यांचे लक्ष बाह्य, सुंता व शरीरावर असते.  तथापि, ते वादविवाद करत असतानाही, त्यांना कळले की येशूचा हा मुळीच हेतू नव्हता.  आत्म्याने त्यांना त्यांचे लक्ष आंतरिक, हृदयाकडे बदलण्यासाठी प्रेरित केले. हा तोच आत्मा आहे ज्याचे वचन येशूने आजच्या शुभवर्तमानात शिष्यांना दिले होते.  हा आत्मा येशूचा आत्मा आहे.  स्वातंत्र्याच्या या आत्म्याचे ऐकून, त्यांना त्यांच्याशी बोललेले वचन पाळण्यास आणि येशू आणि पित्याला त्यांच्याबरोबर घर बनविण्यास सक्षम केले जाईल.  येशूने त्यांच्याशी बोललेले शब्द काही नियम नव्हते.  त्यांच्याशी बोललेला शब्द आज्ञांची यादी नव्हती.  त्यांच्याशी बोललेला शब्द हा प्रामुख्याने कायद्याबद्दलचा शब्द नव्हता.  तो नेहमी, येशूबरोबर, प्रेमाचा शब्द होता.  म्हणूनच येशूने शिष्यांना दिलेली भेट ही शांतीची देणगी आहे, ज्याचा अर्थ संपूर्णता आणि कल्याण आहे.

सर्वात मोठी देणगी आपल्याला देवानी दिलेली आहे ती म्हणजे, पावित्र आत्मा, (१ करिंथकरांस ६:१९)  तुमचे शरीर, तुम्हा मध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे.

  म्हणून   आपण एकटे नाही याची खात्री बाळगणे आवश्यक आहे:  कारण आपल्याला कधीही एकटे राहण्याची गरज नाही. येशू नेहमी आपल्यासाठी उपस्थित असू शकतो. तो आपला आनंद आपल्याबरोबर साजरा करतो आणि आपल्या अपराधाचे ओझे क्षमाशीलतेने बदलतो. तो आपले दु:ख घेतो आणि त्याचे आनंदात रूपांतर करतो. या एकाकीपणापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला फक्त येशूला आपल्या जीवनात प्रवेश देण्याची गरज आहे. येशूसोबत एकता ही सर्वात मोठी भेट आहे जी आपण आपल्या मुलांना, मित्रांना किंवा ज्यांना, जीवनात कोणताही उद्देश दिसत नाही त्यांना देऊ शकतो. आपण लोकांना येशूसोबत ऐक्यामध्ये आणण्यास मदत करू शकतो, एक एकता जी त्यांचे जीवन बदलेल.  ह्या मिसाबलिदानामध्ये भाग घेत असताना आपल्याला आत्म्याचे खरे जीवन जगण्यास शक्ती  मिळावी, म्हणून प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: पुनरुत्थित ख्रिस्ता, आमची प्रार्थना ऐक.

१. पुनरुत्थित ख्रिस्ताच्या प्रीतीची व शांतीची सुवार्ता अखंडितपणे पोहचविणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी व सर्व धार्मिक अधिकाऱ्यांनी ह्या सर्वांना निरोगी स्वास्थ आरोग्य मिळून पुनरुत्थित त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता सर्वांना विशेष करून जे अज्ञात आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

२. पुनरुत्थित ख्रिस्ताची प्रीती प्रत्येकाच्या कुटुंबात येवून कुटुंबात मंगलमय वातावरण निर्माण होवून, एक दुसऱ्यांना समजून घेवून दुरावलेले व तुटलेली कुटुंबातील नाती पुनरुत्थित ख्रिस्ताने पुन्हा एकदा एकत्रित करावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे लोक अतिशय आजारी आहेत अशा सर्वांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा स्पर्श होवून त्यांची आजारातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आपणा प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. कितीतरी लोक प्रेमासाठी आतुरलेले आहेत अशा सर्वांना पुनरुत्थित ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. यंदाच्या वर्षी चांगला व योग्य पाऊस पडावा व शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे व सर्व आपत्ती व रोगराई पासून मानवजातीचे संरक्षण व्हावे म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी ठेवूया.


Thursday 12 May 2022



          Reflection for the
5th Sunday of Easter (15/05/2022) By  Bro. Justin Rithesh Dhavade


पुनरुत्थानकाळातील पाचवा रविवार

दिनांक: - १५/५/२०२२

पहिले वाचन: - प्रेषितांची कृत्ये १४:२१-२७

दुसरे वाचन: - प्रकटीकरण २१:०१-०५

शुभवर्तमान: - योहान १३:३१-३५


“जशी मीं तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हींहि एकमेकांवर प्रीती करावी”. 



प्रस्तावना

आज देऊळमाता पूनरुत्थान काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे आणि आजची उपासना पूनरुत्थित प्रभू येशुख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संकट, दुःख आणि  छळवनूकीला सामोरे जाऊन परमेश्वरावर भक्कम श्रद्धा ठेवण्यास आवाहन करीत आहे.

आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की, संत पौल आणि त्याचे सोबती सुवार्तेसाठी अतोनात छळ सहन करायला तयार होते कारण खरा ख्रिस्ती श्रद्धावंत चार भिंतीच्या आत अडकून पडून राहूच शकत नाही, तर तो पूनरुत्थित ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी अतोनात प्रयत्न करणार. तसेच शुभवर्तमानात प्रभू येशूख्रिस्त आपणास प्रेमाची आज्ञा देत आहे, कि, तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे. जर तुमचे एकमेकावर प्रेम असेल ह्या वरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.

आजच्या उपासनेमध्ये सहभाग घेत असताना पूनरुत्थित प्रभू येशूख्रिस्ताने म्हटल्याप्रमाणे, आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या समाजामध्ये व इतर ठिकाणी प्रेम करण्यास कमी पडलो असेल, तर त्याबद्दल क्षमा मागूया किंवा या जगामध्ये जीवन जगत असताना आपणावर येत असलेले दुःख, छळ किंवा संकट याद्वारे आपण विश्वासामध्ये डगमगत असेल तर ख्रिस्ताने आपणाला विश्वासाच्या दानाने परीपूर्ण करावं, म्हणून पूनरुत्थित प्रभू येशूख्रिस्ताकडे कृपा, शक्ती आणि सामर्थ्य मागूया.

मनन चिंतन

आजच्या शुभवर्तमानात पूनरुत्थित प्रभूयेशूख्रिस्त म्हणतो, “मी तुम्हावर प्रेम केले, तसे तुम्हीही एकमेकावर प्रेम करावे म्हणजे तुम्ही माझे शिष्य व्हाल”. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेमाची आज्ञा दिली  कारण तो स्वतः प्रेम आहे. संत योहन म्हणतो, “ जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे” (१ योहान ४:८).

प्रभू येशू ख्रिस्तानं मानवावर एवढं प्रेम केलं की त्यांने मानवाच्या तारणासाठी स्वतःचा जीव क्रूसावर समर्पण केला. हे सत्य असून काही लोक अजून ख्रिस्ताच्या प्रेमापासून दूर आहेत. तर काहीकांनी त्या ख्रिस्ताच्या प्रेमाला ओळखले नाही.

मी येथे तुम्हाला एक सत्य घटना सांगू इच्छितो. एक ख्रिस्ती कुटुंब होतं आईवडील आणि त्यांची एकुलती एक मुलगी अशा तीन व्यक्तींच कुटुंब होतं आई वडील धार्मिक होते, दररोज मिस्साला जायचे, नित्यनियमाने घरी रोझरीची प्रार्थना करायचे आणि आध्यात्मिक जीवन जगणारे होते. त्यांची मुलगी एका ऑफिसमध्ये काम करीत असताना एका अन्यधर्मीय व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडली. त्यांच्या प्रेमाला काही महिने निघून गेले. एक दिवस तिच्या आई-वडिलांना कळालं की आपली मुलगी एका मुलाच्या प्रेमामध्ये पडलेली आहे. आणि तो मुलगा अन्यधर्मीय आहे. आई वडील धार्मिक होते नीतीच जीवन जगत होते. म्हणून त्यांची इच्छा होती की आपली एकुलती एक मुलगी, तिचे लग्न आपल्या ख्रिस्ती धर्मामध्येच व्हावं. धर्मगुरूंच्या अभिषिक्त केलेल्या पवित्र हाताने, पवित्र मीस्साबळीमध्ये तिचा लग्न संस्कार व्हावा, ही त्यांची इच्छा होती. म्हणून एक दिवस संधी पाहून तिच्या आई-वडिलांनी आपल्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमामध्ये एवढी गुरफटून गेली होती की ती आपल्या आई-वडिलांना म्हणाली की मी स्वःताच्या जीवाला हानी पोहचवणार पण त्या मुलाला सोडणार नाही. मुलीचे हे शब्द ऐकताच त्या आईवडिलांना भरपूर दुःख झालं. तेव्हा त्यांनी विचार केला की आपण आपल्या मुलीला घेऊन रिट्रिट सेंटरला प्रार्थनेसभेसाठी जाऊया. ते आपल्या मुलीला घेऊन रिट्रिट सेंटरला गेले. तेथे चार दिवसाची प्रार्थना सभा होती. पहिल्या दिवसापासूनच सर्व लोक त्या रीट्रिट सेंटरमध्ये प्रभू येशूख्रिस्ताची स्तुति आराधना आणि गौरव करत होते. रीट्रिटचा पहिला दिवस निघून गेला. त्या मुलीच प्रार्थनेमध्ये मन लागत नव्हतं कारण तिच मन त्या मुलाकडेच लागलेलं होतं दुसरा दिवस ही निघून गेला. तरीदेखील त्या मुलीचं काहीच परिवर्तन झालं नाही. रीट्रिटच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला धर्मगुरूनी पवित्र साक्रामेंन्त उघडे केले आणि सर्व लोक जिवंत देवाची पूनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुति आराधना करीत असताना, पूनरुत्थित खिस्तानं तिला एक दृष्टांत दिला त्या दृष्टांतात तिने पाहिले कि प्रभू येशू ख्रिस्त मोटार गाडी घेऊन त्या रीट्रिट सेंटरमध्ये आला व तिला स्कूटरवर आपल्यामागे बसवलं आणि जगाच्या कानाकोपऱ्यात फिरवलं, शॉपिंग सेंटर, मॉल, थिएटर, मार्केट आणि जगामध्ये कोणती सुंदर जागा उरली नसेल अशा सर्व ठिकाणी तिला फिरवलं. ज्वेलरीच्या दुकानांमध्ये जाऊन तिला दागिन्याने सजवलं आणि पुन्हा आणून त्या रीट्रिट सेंटरमध्ये सोडलं. जेव्हा तिने हे सर्व दृश्य बघितलं तेव्हा तिचे डोळे उघडले. ती मोठ्या दुःखाने रडायला लागली. तिने मनामध्ये विचार केला कि मी ज्या मुलावर प्रेम करते त्याने मला कधीच थेटर मध्ये नेऊन पिक्चर दाखवलं नाही. मी ज्या मुलावर प्रेम करते त्याने मला कधीच शॉपिंग करून दिली नाही. मी ज्या मुलावर प्रेम करते त्यांनी माझ्या हातात छोटीशी अंगठी देखील घातली नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तर मला जगाच्या कानाकोपर्यामध्ये फिरवलं मला दागिन्याने सजवलं मग तो ख्रिस्त त्या मुलापेक्षा कितीतरी जास्त पटीने माझ्यावर प्रेम करीत आहे. लगेच तिने आपला निर्णय बदलला ती आपल्या आई-वडिलांना म्हणाली कि तुम्ही म्हणणार त्याच मुला बरोबर मी माझं लग्न करणार. काही काळानंतर एक ख्रिस्ती व्यक्ती बरोबर तिचं लग्न झालं आणि पुढचा आयुष्य तिने सुखामध्ये व आनंदामध्ये घालवलं.

पूनरुत्थित प्रभू येशूख्रिस्त प्रेम आहे आणि तेच प्रेम तो आपणा प्रत्येक मानवावर करित आहे. पण कधी कधी आपण त्याच्या प्रेमाला ओळखत नाही. आपण आपणाला वाटतो तोच मार्ग पकडतो आणि नाशाकडे वळतो व आपल्या जिवाचा नाश करून घेतो. आज आपण ख्रिस्ताच्या प्रेमाला ओळखू .या आपण ख्रिस्ताच्या प्रेमापासून कुठेतरी दूर गेलो असेल तर आज आपण क्षमा मागूया आणि प्रभू येशूने अपणा प्रत्येकाला परमेश्वरावर, आपल्या कुटुंबावर व शेजाऱ्यावर खरं प्रेम करण्यासाठी कृपा शक्ती आणि सामर्थ्य द्यावं, म्हणून पूनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, एकमेकांवर प्रेम करण्यास आम्हाला शिकव.

१. आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी व सर्व धार्मिक अधिकाऱ्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे व कार्याद्वारे प्रभूचा अनुभव प्रत्येक भाविकापर्यंत पोहचवावा व सर्वांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

२. जे निराश होऊन देवापासूनदूर गेलेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून यावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखविलेल्या मार्गावर चालावे आणि जीवनाचे सार्थक करावे म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

३. आपणा प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. प्रेम ही काळाची गरज आहे. म्हणून आपली प्रीती सर्वांचे हित साधणारी असावी. त्यात स्वार्थ व दुजाभाव नसावा. सर्वाबरोबर समेट, शांती व सलोखा असावा म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

४. आपल्या सर्व मिशनरी बंधू-भगिनींना त्यांचे कार्य जोमाने सुरु ठेवून प्रभूची सुवार्ता जगाच्या काना कोपऱ्यात पसरविण्यास सामर्थ्य व कृपा लाभावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी ठेवूया.

 

Thursday 5 May 2022

Reflection for the Fourth Sunday of Easter (08/05/2022) By: Br. Jeoff Patil.




पुनरुत्थान काळातील चौथा रविवार

दिनांक: ०८/०५/२०२२

पहिले वाचन: प्रेषित. १३: १४, ४३-५२

दुसरे वाचन: प्रकटीकरण ७:९, १४ब-१७

शुभवर्तमान: योहान १०:२७-३०

 


विषय: "माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात."


 प्रस्तावना:

आज आपण पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेचा मुख्य विषय आहे, “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात.”

आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पौल आपणास सार्वकालिक जीवनाची आठवण करून देतो आणि सांगतो की, अनेकवेळा आपणास देवाचे वचन ऐकने जमले पाहिजे जेणेकरून आपण पवित्र आत्म्याने पूर्ण होऊ. प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, स्वर्गात उद्धार पावलेल्या साक्षात्कार राजासनामध्ये ‘मेंढपाळ येईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल. तर शुभवर्तमान आपल्याला  येशू ख्रिस्त आपणा सर्वांचा उत्तम मेंढपाळ व आपण त्याची मेंढरे आहोत ह्याची जाणीव करून देत आहे.

प्रभू येशूला लोकांचा कळवळा आला कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते बहकले होते. आपले सर्वांचे जीवन कृपेने भरलेले असावे असे प्रभूला वाटते. मात्र आपण त्याला आपल्या जीवनाचा मेंढपाळ म्हणून स्वीकारायला हवे. ह्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या पवित्र मिस्साबलिदानात मागूया.

 


मनन चिंतन:

ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, एकदा एक अमेरिकन प्रवासी सीरिया देशात प्रवास करीत होता. प्रवासादरम्यान एक गोष्ट त्याच्या निदर्शनास आली. त्यांने बघितले की, तीन मेंढपाळ आपले कळप घेऊन त्यांना पाणी पिण्याकरिता तलावावर आले होते. बघता-बघता सर्व मेंढरे एकमेकांमध्ये विखुरली. कोणाची कुठली मेंढरे हे ओळखता येत नव्हते.

अमेरिकन प्रवासी स्वतःच्या मनामध्ये म्हणू लागला, कदाचित मेंढरांना आपला मेंढपाळ कोण हे ओळखता येणार नाही! परंतु तसे काही झाले नाही पहिल्यांदा एक मेंढपाळ बाहेर आला त्याने आपल्या मेंढरांना नावाने हाक मारली व त्याची मेंढरे त्याच्यामागे चालून गेली, तसेच दुसऱ्याने केले आणि तिसऱ्यानेही. कारण, त्या मेंढरांना आपल्या मेंढपाळाचा आवाज ठाऊक होता. म्हणूनच, त्या आवाजाच्या दिशेने ती मेंढरे गेली.

माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो,आज आपण उत्तम मेंढपाळ रविवार साजरा करीत आहोत. ख्रिस्त आपला उत्तम मेंढपाळ आहे. ख्रिस्त आपणास सांगत आहे की, माझ्या मेंढरांना मी ओळखतो, ती माझी वाणी ऐकतात आणि ती माझ्या मागे येतात.

ख्रिस्त आपला प्रिय आणि उत्तम मेंढपाळ असल्यामुळे त्याला आपल्या विषयीच्या सर्व गोष्टींची जाणीव आहे. आपले दुःख, संकटे, अडचणी, त्रास आणि वेदना ह्या सर्व गोष्टी ख्रिस्ताला ठाऊक आहेत. ख्रिस्त म्हणूनच म्हणतोय "देव पित्याने तुम्हा सर्वांना माझ्याकडे सोपविलेले आहे". उत्तम मेंढपाळ म्हणून ख्रिस्त त्याला दिलेल्या मेंढराची जबाबदारी वाहतो. आपण सर्व त्याला दिलेली मेंढरे म्हणजेच अखिल ख्रिस्तसभा देव पित्याकडून मिळालेली एक महान देणगी किंवा जबाबदारी आहे. आणि ख्रिस्त ती जबाबदारी यथायोग्यपणे पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो किंबहुना ती जबाबदारी त्याने त्याच्या मरणाने पूर्ण केली आहे.

एक उत्तम मेंढपाळ म्हणून ख्रिस्ताकडे त्याच्या मेंढराकरिता एक महत्वाची योजना आहे. ही महत्वाची योजना म्हणजे ख्रिस्त आपणास सार्वकालिक जीवनाची महान देणगी देण्याचे आश्वासन देत आहे. मेंढपाळ म्हणून ख्रिस्त आपणाला हिरव्यागार कुरणांमध्ये नेण्याचे तसेच मंजूळ झऱ्याचे पाणी पाजण्याचे आश्वासन देतो. म्हणजेच ख्रिस्त एक उत्तम मेंढपाळ म्हणून आपला योग्य प्रकारे सांभाळ करतो. आपल्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात तो पुरवितो. मग अशा उत्तम मेंढपाळांच्या मागे जाऊन आपलं जीवन सार्थ करण्यातच आपल्या जीवनाचं सार आहे, हे ख्रिस्ती माणसाला कळलं पाहिजे.

प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य जो ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो, ती एक उत्तम मेंढपाळ बनतो. उत्तम मेंढपाळ म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या मेंढरांची काळजी घेणे. आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडून आपल्या मेंढराना ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे. ज्या वेळेला आपली मेंढरे कळपापासून दूर जातात, बहकली जातात, वाट चुकतात त्यावेळेला उत्तम मेंढपाळ म्हणून त्यांना वाट दाखवणे व मार्गस्थ करणे ही आपली प्रामाणिक जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे पौल आणि बार्नबस त्यांच्या लोकांचे उत्तम मेंढपाळ होऊन त्यांनी त्यांच्या लोकांना मार्ग दाखवला त्याप्रमाणे आपण देखील आपल्या जीवनामध्ये मार्ग चुकलेल्या लोकांना मार्ग दाखवावा.

आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्या म्हणजे ख्रिस्ताला आपण काय आहोत आणि आपण काय करतो हे सर्व ठाऊक आहे. आपल्या चिंता, दुःख, आपल्या वेदना आणि अडी-अडचणी या सर्व ख्रिस्ताला ठाऊक आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ख्रिस्त प्रेम आहे, देव प्रेम आहे. देवाचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे, हे आपल्या जीवनात आपण ओळखलं पाहिजे आणि अनुभवलं पाहिजे. आपल्या मेंढरांना आपण ओळखलं पाहिजे आणि आपली वाणी आपल्या मेंढरांनी ओळखली पाहिजे.

शेवटी एक उत्तम मेंढपाळ म्हणून ख्रिस्ताप्रमाणे जगण्यास व त्याच्या प्रमाणे आपल्या जीवनात आचरण करण्यास शिकलं पाहिजे. जर आपण आपल्या जीवनात ख्रिस्त अनुभवला तर तो अनुभव इतरांना एक उत्तम मेंढपाळ म्हणून इतरांच्या जीवनात बदल घडवून आणण्याकरिता कारणीभूत ठरू शकतो. ख्रिस्त आपणा सर्वांना सार्वकालिक जीवनाचे आश्वासन देत आहे, त्याच पद्धतीने ख्रिस्ताप्रमाणे आपण आपल्या जीवनात जगु आणि वागू, तरच आपण इतरांना ख्रिस्ताचे सार्वकालीक जीवन अनुभववण्यास प्रवृत्त करू शकु. त्याकरिता लागणारी कृपा, शक्ती आणि सामर्थ्य आपणास मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभो, तुझ्या मेंढरांना तुझे साहाय्य दे.”

१.           ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, महागुरू, धर्मगुरू, धर्म-भगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.           जो ख्रिस्त आपल्या सर्व मानवजातीच्या पापांसाठी मरण पावला व जिवंत होऊन सर्वाना नवजीवन दिले तो ख्रिस्त मेंढपाळ आपणाला अधिक पवित्र बनवण्यास धैर्य व शक्ती देवो म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.

३.           जी मेंढरे मेंढपाळाची वाणी ऐकत नाही आणि जी माणसे मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे बहकलेले आहेत. अशांना परमेश्वराच्या मदतीने सन्मार्गावर चालण्यास कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करुया.

४.           जी कुटूंबे वेगळी झाली आहेत. जेथे प्रेम, शांती व दया नाही अशा कुटुंबात प्रेम, शांती व दया प्रस्थापित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.           हे प्रभू येशू, तूच उत्तम मेंढपाळ आहेस. आज आपण इथे एकत्रीत जमलो असताना आपण स्वत:साठी न जगता इतरांसाठी जगावे व आपले जीवन कृपेने भरलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.           आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.