Reflections By: Valerian Patil.
राखेचा बुधवार
दिनांक:०५/०३/२०१४
पहिले वाचन: योएल २:१२-१८
दुसरे वाचन:२ करिंथकरांस पत्र ५:२०-६:२
शुभवर्तमान:मत्तय ६:१-६, १६-१८
"माती असीसी मातीत
मिळशी मनुष्या आठव तू हेची"
प्रस्तावना:
"माती असीसी मातीत मिळशी मनुष्या आठव तू हेची". प्रिय
भाविकांनो आजपासून आपण उपवास काळाला सुरवात करीत असताना ख्रिस्तसभा आपणा सर्वांस
आत्मपरीक्षण करून अंतकरण शुद्ध करण्यास व पवित्र जीवन जगण्यास आवाहन करीत आहे.
देवाने आपल्याला हे चाळीस दिवस त्याच्या जवळ येण्यासाठी व जास्तीत जास्त प्रार्थना, दानधर्म व इत्यादी चांगल्या गोष्टी करण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे ह्या चाळीस दिवसाची सुरवात आपण योग्य
रीतीने करण्याचा प्रयत्न करूया.
तुम्ही प्रार्थना करा, उपवास करा व दान धर्म करा हा संदेश आजच्या वाचनात आपल्याला मिळत आहे. ह्या उपवास काळात पात्र होण्यास देवाने आपणाला
उपवास व दानधर्म करण्यास शक्ती दयावी म्हणून ह्या मिस्साबलित आपण विशेष प्रार्थना करूया.
पहिले वाचन (योएल; २:१२-१८):
योएल संदेष्टा हा जुन्या करारात प्रवक्ता होऊन गेला, देवाचा
शब्द लोकांसमोर नेण्यास त्याने खूप मेहनत घेतली. जुन्या करारात पाहिले तर
इस्त्राएल लोक देवापासून दूर जात असताना देवाने योएल प्रवक्त्याची निवड केली. जुन्या
करारात प्रवक्ता योएल विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, तरी
सुध्दा योएल प्रवक्ताने थोडे का होई ना आपले
काम जबाबदारीने केले. 'आता तरी पूर्ण मनाने, उपवास, विलाप
व शोक करून माझ्याकडे परत या' ह्या प्रभूच्या वचनावर विश्वास
ठेवा, असे आवाहन तो आपणास करत आहे.
दुसरे वाचन (२ करिंथकरांस पत्र; ५:२०-६:२):
ह्या वाचनात आज पौल देवाचा संदेश देत असताना आपणास
सांगतो की, तुम्ही देवाबरोबर समेट करा कारण आताच समय अनुकूल आहे पाहा
आताच तारणाचा दिवस आहे त्यामुळे ख्रिस्तापासून मिळणारे तारण धिक्कारणे म्हणजे
कृपेचा नकार करणे होय.
शुभवर्तमान (मत्तय; ६:१-६, १६-१८):
धर्माचारण करण्याची योग्य व अयोग्य रीत कोणती ते तीन संमातर उदाहरणे देऊन स्पष्ट
केले आहे. दानधर्म करणे, प्रार्थना व उपवास ही यहूदी धर्मातील तीन मध्यवर्ती
सुत्रे होती आणि येशूच्या शिष्यांनाही ती लागू असल्याचे गृहीत
धरले आहे. तुम्ही सर्व करावे वा करू नये हा प्रश्न
नसून ते कसे व का करावे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो प्रतिफळ मिळण्याच्या
प्रश्नावर केद्रिंत केला आहे.
१. तू दानधर्म करतोस तेव्हा:
परूशी जेव्हा दानधर्म करीत तेव्हा या कृत्यांना
जास्तीत जास्त प्रसिध्दी कशी मिळेल ते पाहत लोकांनी आपला गौरव करावा असे त्यांना मनातून वाटत होते. प्रभू येशू त्यांना ढोंगी म्हणतो त्यांचे हे धर्माचारण केवळ स्वार्थासाठी होते. आपण दानधर्म करतो तेव्हा
त्याचा गाजावाजा करू नये ते इतके गुप्त असावे की, "जे डाव्या
हाताने केले आहे ते उजव्या हाताला कळू नये"(मत्तय ६:३). जेणेकरून आपला देव
पिता आपल्याला त्याचे प्रतिफळ देईल.
२. जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा:
सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करण्यास परुश्यांना फार आवडते. आपण किती धार्मिक आहोत असे पाहणा-यांना वाटावे
व त्यांनी आपले कौतुक करावे ऐवढाच त्यांचा हेतू होता. आपण
लांबलचक प्रार्थना केली तर देव ती ऐकतो असे त्यांना वाटे. प्रार्थना करणे खूप
महत्वाचे असते परंतू येशू परुश्यांचे उदाहरण
देत असताना म्हणतो,' तुम्ही त्याच्यासारखे बनू नका तर, नम्रपणाने, लहान मुलांप्रमाणे प्रार्थना करा व ती करत असताना तुम्ही बंद खोलीत जा जिकडे कोणीच नसेल
म्हणजे देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला
नक्कीच देईल"(मत्तय ६:६).
३. जेव्हा तू उपवास करतो तेव्हा:
आपण उपवास करतो म्हणून फार धार्मिक आहोत असे परूशी म्हणत व तसे दाखविण्याचा
प्रयत्नही करीत, ते ढोंग किंवा नाटकच होते. उपवास करणे महत्वाचे आहे परंतू
तो करत असताना येशू म्हणतो, "तुम्ही ढोग्याप्रमाणे वागू नका तर तुम्ही काय करता
याची तुम्हाला कल्पना असली पाहिजे". बायबलमध्ये उपासाला महत्त्व
दिलेले आहे. बायबलमध्ये अनेक
ठिकाणी एकट्याच्या व सामुदायिक उपावासाची उदाहरणे आहेत.
⇒ नेहेम्या संदेष्ट्याने जेव्हा येरुशलेमच्या लोकांची दारूण
हकीकत ऎकली तेव्हा तो उदिवग्न झाला, रडला, त्याला दु:ख झाले
व त्याने कित्येक दिवस उपवास करून देवाची प्रार्थना केली(नेहेम्या १:४).
⇒जेव्हा दाविद राजाला समजले की, शौल युद्धात
मारला गेला तेव्हा दाविद व त्याच्या सहका-यांनी वस्त्रे फाडली, उपवास
केला(२शमुवे १:१२).
⇒ जेव्हा नाथान संदेष्ट्याने दाविद राजाला त्याच्या पापाची
जाणीव करून दिली तेव्हा दाविद राजाने अन्न पाण्याचा त्याग केला व परमेश्वराजवळ
पापांची कबूली करून पश्चाताप केला. शौल राजाच्या मुत्यूनंतर लोकासमुदायाने सात दिवस
उपवास करून शोक प्रकट केला(१ शमुवेल ३१:१३).
⇒ दाविद राजाने उपवास करून अबनेर करता शोक केला(२ शमुवेल ३:१५).
⇒ भयानक परिस्थितीतून स्वताला व इतरांना सावरण्यासाठी
एस्तेरने तीन दिवस व तीन रात्र उपवास केला(ऎस्तेर ४:१६).
⇒ एज्रा इस्रायल लोकांच्या अविश्वासूपणाबदल दु:ख व उपवास
करतो(एज्रा १०:६).
⇒ दारयावेश राजाने जेव्हा दनिएल संदेष्ट्याला सिहाच्या पिंज-यात
टाकले तेव्हा राजाने त्या रात्री उपवास केला(दनिएल ६:१८).
⇒ यहुदाचा राजा यहोशाफातवर जेव्हा भंयकर संकट आले तेव्हा
त्याने यहुदामध्ये उपवासाची घोषणा केली, जेणेकरून परमेश्वराकडून
सर्वांचे संरक्षण होईल(२ इतिहास २०:३).
⇒ दुष्टांताचा अर्थ समजण्यासाठी दनिएलनेसुद्धा उपवास
केला(दनिएल १०:३).
⇒ योएल संदेष्ट्याने बहकलेल्या लोकांना परमेश्वराच्या नावाने
एकत्रित करण्यासाठी उपवास करण्याचे आवाहन केले. याहोयाकीम राजाच्या कारकिर्दीत
शत्रूपासून संरक्षण होण्यासाठी राजाने सर्वांनी परमेश्वराजवळ उपवास करावा अशी
आज्ञा केली होती(यिर्मया ३९:९).
⇒ निनवेच्या लोकांनी परमेश्वराच्या संदेशावर विश्वास ठेवला, राजाने व सर्व
लोकांनी उपवास केला व आपल्या पापांचा पश्चाताप केला.दु:ख व खेद प्रदर्शित करणारे
खास कपडे घातले(योना ३:५-१०).
बोध कथा:
एका गावात मार्टिन नावाचा श्रींमत माणूस राहत होता.
तो खूप धनवान होता ह्या गोष्टीचा त्याला गर्व नव्हता. तो नेहमीच स्वता:ला नम्र
समजायचा, तो दररोज देवळात मिस्साला जायचा, गरिबांना मदत करायचा. तसेच उपवास सुद्धा करायचा.
एकदा तो देवळात मिस्साला गेला होता, तो दिवस राखेचा बुधवार होता. तेव्हा प्रवचन ऐकत
असताना त्याने ऐकले की, आपण नेहमी प्रार्थना करावी, उपवास
करावा व दानधर्म करावा. काही दिवसांनी मार्टिन
आपल्या शेतावर जात असताना, दोन कामगार रस्त्याच्या बाजूला बसलेले होते ते
त्याने पाहिले. एक कामगार दुस-या कामगाराला म्हणत होता, ‘माझ्या घरामध्ये खूप मोठे सकंट आले आहे. माझ्या
एकुलत्या एका मुलाच्या हृदयाला छेद आहे व
डॉक्टरांनी ऑपरेशनासाठी ६ लाख रूपये मागितले आहेत. मित्रा मला
काय करावे तेच सूचत नाही, मी आणि माझी बायको देवाकडे रात्र व दिवस प्रार्थना
करतो, मदतीसाठी खूप ठिकाणी जातो, तरी सुद्धा पैसे काही जमत नाही’. तेव्हा मित्र म्हणाला, ‘तू प्रार्थना कर देव नक्कीच मदत करील, कारण देव आपल्या लोकांना कधीच विसरत नाही’.
जेव्हा हे संभाषण मार्टिनने ऐकले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले व त्याने मनात निश्चय केला की
मी माझ्याकडून होईल ती मदत करीन. दुस-या दिवशी मार्टिन
उठला व देवाकडे त्या मुलासाठी प्रार्थना करू लागला. त्याने आपले पैशाचे कपाट उघडले व ६ लाखाची रक्कम घेऊन दवाखान्यात गेला व
डॉक्टरांच्या हातात रक्कम दिली व म्हटले, ‘हे घ्या पैसे व त्या मुलाला वाचवा’ तेव्हा डॉक्टरांनी
विचारले, तुमचे नाव काय? आणि तुम्ही ह्या मुलाला ऐवढी रक्कम देता ह्याचे कारण
काय? तेव्हा मार्टिन म्हणाला, ‘डॉक्टर कोणत्याही कामासाठी नावाची गरज लागत नाही. मी एक ख्रिस्ती आहे व माझा
येशू ख्रिस्त मला हेच करायला शिकवतो’, येशू म्हणतो, प्रार्थना करा, उपवास करा व दानधर्म करा आपल्याकडे आहे ते
दुस-याबरोबर वाटून घ्या. नतंर मार्टिन निघून गेला. जेव्हा ही गोष्ट त्या मुलाच्या आई-वडीलांना माहित पडली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी देवाचे आभार मानले.
मनन-चिंतन:
वसंतऋतू सृष्टीचे
आपल्यला एक म्हत्वाचे वरदान आहे. सृष्टीत नवचैतन्याचे
कार्य वसंतऋतू करतो. या वसंतऋतूच्या आगमनापूर्वी सारी सृष्टी निस्तेज दिसते. सर्व ठीकाणी
मरगळ आलेली दिसते, मोठमोठे वृक्ष
पतझडीने बोडखे झालेले दिसतात. काही वृक्षांचे
तर फक्त सांगाडेच दिसतात. वसंतऋतूच्या आगमानाने ह्याच वृक्षांना नवीन पालवी फुटते,
संपूर्ण सृष्टीत नवचैतन्य येते. नव्या
जोमाने-दिमाखाने वृक्ष पर्णभरीत होऊन नुतनीकरणाचा आनंद घेऊ लागतात. उपवासकाळ हाही मानवाच्या जीवनासाठी
वसंतऋतूसारखाच आहे. वसंतऋतू जसे
सृष्टीचे रूप बदलून तिचे नुतनीकरण करतो; सृष्टीत नवचैतन्य पसरवितो
त्याचप्रमाणे उपवासकाळही मानवाला आंतरिक बदल करण्यासाठी, परमेश्वराने
दिलेला उत्तम काळ आहे. स्व:ताचे नुतनीकरण करून देवाच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा
साज चढविण्यासाठी ही अमूल्य अशी संधी आहे.
येशू ख्रिस्त मत्तयच्या शुभवर्तमानात आपल्याला तीन महत्वाच्या गोष्टी करायला सांगत आहे त्या
म्हणजे उपवास, प्रार्थना, दानधर्म. परमेश्वराला दयाळूपणा व करुणा पाहिजे आणि
उपवासाचा उगम ह्याच भावनेतून व्हायला हवा व दुस-याचे भले व्हावे ह्या उपदेशाने
झाला पाहिजे, नाहीतर अन्य प्रकारे म्हणजेच जागतिक उपवास परमेश्वराला मान्य
होत नाही. म्हणून परमेश्वर जख-यास (७:५-७) म्हणतो," याजकांना आणि या
देशातील इतर लोकांना सांग की तुम्ही वर्षाच्या पाचव्या व सातव्या महिन्यात उपवास व
शोक प्रकट केलात, पण हा उपवास खरोखरच माझ्यासाठी होता का? म्हणजेच याचा
अर्थ असा की लोकांनी अर्थहीन उपवास केले. अशा प्रकारचे आणखी एक उदाहरण म्हणजे यशया
संदेष्टयाद्वारे परमेश्वर म्हणतो विशेष दिवशी उपवास करून तुम्ही तुम्हालाच पाहिजे
ते करता. तुम्ही तुमच्या शरीराला क्लेश देत नाही तर तुमच्या नोकरांना शिक्षा करता.
तुम्ही भुकेले आहात, पण हि भूक अन्नाची नाही, भाकरीची नाही, देवाच्या वचनाची
नाही तर भांडणाची व लढाईची आहे. तुमच्या पापी हातांनी लोकांना मारण्यासाठी तुम्ही
भुकेले आहत. तुम्ही माझ्याकरिता उपवास करत नाही(यशया ५८:३-५). बायबलमध्ये
सांगितल्याप्रमाणे वरील गोष्टी आपल्या जीवनामध्ये अनेकवेळा दिसून येतात. उपवासाबरोबच
आपले आचरण अयोग्य असू नये. उपवास हा पवित्र आत्म्याच्या
कृपेने व्हावा.
आपण काही गोष्टीचा उपवास किंवा त्याग करावा, त्या
म्हणजे:
·
आपण ह्या उपवास काळात गरीबांना मदत करावी,
·
आपण ह्या उपवास काळात भांडण्यापासून दूर रहावे,
·
आपण ह्या उपवास काळात व्यसनापासून दूर रहावे,
·
आपण ह्या उपवास काळात वाईट गोष्टीपासून दूर रहावे,
·
आपण ह्या उपवास काळात जास्तीत जास्त प्रार्थना करावी,
·
आपण ह्या उपवास काळात आपल्या आई-वडिलांवर, घरातील सर्वावर प्रेम करावे.
इत्यादी, खरा उपवास, प्रार्थना व दानधर्म करणे हाच संदेश येशू ख्रिस्त
आपल्याला आजच्या दिवशी देत आहे. जर आपल्या कृतीने काही चांगले होत असेल तर ती कृती
आपण नक्कीच केली पाहिजे, कारण असेच केल्याने उपवास काळाला खरा अर्थ
येतो.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
१. आपले पोप, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू- धर्मभगिनी ह्या सर्वांना देवाने चांगले
शारीरिक व मानसिक आरोग्य दयावे तसेच ह्या उपवास काळामध्ये त्यांनी उपवासाचे, प्रार्थनेचे
व दान-धर्माचे महत्व आपल्या दररोजच्या जीवनाद्वारे लोकांना पटवून दयावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहते, हे उत्तम
उदाहरण घेऊन आपण प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना करूया, प्रत्येक
कुटुंबाने एकत्र यावे व प्रार्थना करावी जेणेकरून त्यांच्या घरात प्रेम, शांती व सौख्य नादवे म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. जे लोक देवापासून दूर गेले आहेत
त्यांना ह्या उपवास काळात देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव
घेऊन देवाजवळ परत यावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. जे आजारी आहेत त्यांना देवाने चांगले आरोग्य दयावे तसेच जे लोक आजा-यांना मदत
करतात त्यांना देवाने आर्शिवाद दयावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आपल्या वैयक्तिक गरजासाठी आपण देवाजवळ, प्रार्थना करू या.