Wednesday 24 February 2016


Reflection for the homily of 3rd Sunday of Lent (28/02/2016) By: Baritan Nigrel.






प्रायश्चित काळातील तिसरा रविवार






दिनांक: २८/०२/१६
पहिले वाचन: निर्गम ३:१-८अ. १३-१५
दुसरे वाचन: १ करिंथ १०: १-६, १०-१२
शुभवर्तमान: लुक १३: १-९




‘जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल!’

प्रस्तावना:
प्रायश्चित काळातील ह्या तिसऱ्या रविवारी, देऊळमाता आपल्याला पापी जीवनावर मनन-चिंतन करण्यासाठी व आपण केलेल्या पापांचा पश्चाताप करून, प्रायश्चित संस्कार घेण्यास आमंत्रित करीत आहे.
निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात, इस्रायली जनतेने आपल्या पापांबद्दल पश्चाताप करावा आणि सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून त्यांची सुटका व्हावी म्हणून देव मोशेला पाचारण करतो. दुसऱ्या वाचनात, संत पौल इस्रायल लोकांचा उल्लेख करून ‘देव त्यांच्याविषयी संतुष्ट नव्हता’; त्यांच्या अविश्वासामुळे व पापांमुळेच देवाने त्यांचा नाश केला असे तो म्हणतो. लुकलिखित आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशु पश्चातापाचा आपल्याला सल्ला देत असता, अंजिराच्या झाडाच्या दाखल्याद्वारे आपल्याला सांगत आहे की, ‘जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल’.
ह्या प्रायश्चित काळात प्रभू परमेश्वर आपल्याशी समेट व परिवर्तन करून आपले जीवन ख्रिस्तमय बनविण्याची संधी देत आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या पापी जीवनापासून परावृत्त होऊन देवाकडे परत यावे व पश्चातापी अंतःकरणाने पापक्षमा मागून, देवाशी एकनिष्ठ रहावे म्हणून आजच्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये प्रार्थना करुया.

 सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम ३:१-८अ. १३-१५
प्रस्तुत उताऱ्यात इस्रायल लोकांना इजिप्तमधून बाहेर नेण्याची जबाबदारी देव मोशेवर सोपवतो. देव आणि मोशे ह्यांची भेट महत्त्वाची असल्याने, तिचे वर्णन या भागात विस्ताराने केले आहे. देव आणि मोशे ह्यांच्या या भेटीतील अनेक मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. मोशेला देव सर्वप्रथम जळत्या झुडूपामधून दर्शन देतो हे आपल्याला सांगण्यात आले आहे. दुसरा मुद्दा असा की, देव पवित्र आहे, हे जाणून मोशेने आपले जोडे काढले. दिव्य पावित्र्यतेचा हा विचार निर्गमच्या पुस्तकात एक प्रमुख विषय म्हणून सादर केलेला आहे.
मोशेला एक शंका होती कि, ‘मला देवाने पाठवले आहे, हे फारो राजाला व इस्रायल लोकांना कसे पटवून दयायचे’? म्हणून (vv. १३-१५) मधून देव स्वतःची ओळख स्पष्ट करून देतो. मोशेने देवाचे नाव विचारले कारण नावामधून व्यक्तीचे मूळ तत्व व्यक्त होते, असे इस्रायल लोक मानत असे. येथे देवाने ‘यहोवा’ या व्यक्तिवाचक नामाने स्वतःची ओळख करून दिली. ह्याचा अनुवाद बहुधा ‘देव’ असा केला आहे (v.१५). ‘यहोवा’, हे हिब्रू भाषेतील ‘देवाचे नाव’ होय. त्याचाच उल्लेख वचन १४ मध्ये ‘मी जो आहे तो आहे’, या शब्दांनी केला आहे. 

दुसरे वाचन: १ करिंथ १०: १-६, १०-१२
ख्रिस्ताद्वारे आपल्याला महान आशिर्वाद मिळालेले आहेत, यामुळेच सर्व ठीक आहे; आमचे पतन होणार नाही किंवा देवासमोर आम्ही अपात्र ठरणार नाही, असे कोणी मानू नये असा इशारा संत पौल ह्या विभागात आपणास देत आहे.
जरी देवाने इस्रायल लोकांना इजिप्त देशातील गुलामगिरीतून सोडविले तरी देव त्यांच्याविषयी संतुष्ट नव्हता. म्हणून त्यांच्या पापांमुळे (त्यांचा लोभ, मूर्तीपूजा, त्यांची कुरकुर) व त्यांच्या अविश्वासामुळे देवाने त्यांचा नाश केला. संत पौल आपल्याला आठवण करून देतो कि, आपण सर्व पापी आहोत. आपण आपल्या पापांचा पश्चाताप केला पाहिजे. माझ्याकडून पाप घडणार नाही अशी घमेंड करू नका, ह्याविषयी संत पौल आपल्याला इशारा देत आहे.

शुभवर्तमान: लुक १३: १-९
एखादा अपघात झाला किंवा अन्यायाने कोणी ठार झाला तर जखमी झालेल्या अगर मेलेल्या व्यक्तीच्या पापांमुळे असे घडले असा त्या काळातही लोकांचा गैरसमज असे. येशु ख्रिस्ताने हि समजूत खोडून काढली. काही गालिलीकर येरुशलेमेस यज्ञ करावयास गेले असता, पिलाताने त्यांचा तेथेच वध करविला व त्यांचे रक्त यज्ञाच्या रक्तात मिसळले, यावरून येशू ख्रिस्ताने जमलेल्या लोकांना पश्चाताप करण्याचे महत्व सांगितले (v.६).
प्रभू येशु अंजिराच्या दाखल्याद्वारे आपल्याला सांगत आहे की, जो पश्चाताप करतो तो स्वतःचे पाप ओळखतो, स्वतःचे पातके व मलीन स्थिती पाहतो व त्यापासून देवाकडे वळतो व ख्रिस्ताकडे पापाक्षमेची याचना करतो. ख्रिस्त त्याला पापक्षमा देतो आणि तो मनुष्य बदलतो. ‘फळ नाही, ते तोडून टाक’ असे मालक म्हणाला (v.७), म्हणून प्रत्येकाने पश्चाताप करावा ह्यासाठी प्रभू आज कृपापूर्ण संधी देत आहे (v.८).

बोधकथा:
एकदा एका नवीन धर्मगुरूची नेमणूक एका गावातील पॅरीशमध्ये झाली. त्या धर्मगुरूने एका रविवारी चर्चमधील सर्व युवक-युवतींची सभा घेतली. तेव्हा त्यांच्या निर्दशनास आले की, डेवीड नावाचा तरुण हा चर्चला येत नाही. गावामध्ये लोकांना शिवीगाळ देऊन त्यांच्याशी विनाकारण भांडण करतो. कधी-कधी चोरी करतो. आई-वडीलांच्या आज्ञेविरुद्ध वागतो, वैगेरे. म्हणून गावात त्याच्याबरोबर कोणीही बोलत नाही.
त्या धर्मगुरूने धाडस करून डेवीडला आपल्याकडे बोलावले व त्याला विचारले, ‘माझं एक लहानसं काम करणार का?’ डेवीड हसला आणि म्हणाला, ‘फादर तुम्ही कायपण बोला आपण करावयास तयार आहोत.’ फादरांनी म्हटले, ‘ह्या घे तीन मेणबत्त्या, आणि रात्री झोपण्याअगोदर तुझ्या पलंगाच्या बाजूला लाव आणि तीन वेळा बोल, “जर आज मी मेलो तर नरकात जाईन.” डेवीडने फादरांना तसे करण्याचे आश्वासन दिले आणि निघून गेला.
त्या रात्री डेवीडने मेणबत्त्या लावल्या व चाचरत का होईना त्याने ते शब्द, एक वेळा शांतपणे उद्गारले. दुसऱ्यावेळी तो घाबरला आणि तिसऱ्यावेळी त्याच्या तोंडातून ते शब्दच निघेनात. त्याला आता उमगले, त्याने त्याच्या जीवनामध्ये काय केले होते. मी एक पापी माणूस आहे, अशी त्याला जाणीव झाली. तो घाबरला. दुसऱ्या दिवशी पहाटे लगेच त्याने फादरांची भेट घेतली व सांगितले, फादर ‘मला नरकात जायचे नाही, मला स्वर्गात जायचे आहे. मी एक पापी माणूस आहे. मला सांगा त्यासाठी मी काय करु’? फादरांनी त्याला संगितले, ‘तू केलेल्या पापांची आठवण करून देवाकडे क्षमा माग व पश्चाताप कर.’ आपला देव दयाळू आहे, तो तुझ्या पापांची नक्कीच तुला क्षमा करील फक्त त्याला तुझे शुद्ध अंत:करण हवे आहे. त्यादिवसापासून डेविडचे परिवर्तन झाले.

मनन चिंतन:
पोप फ्रान्सिस म्हणतात, ‘प्रायश्चित काळ हा अखिल ख्रिस्तसभा आणि स्थानिक ख्रिस्ती समूह, तसेच हरेक विश्वासूजन यांच्या आध्यात्मिक नूतनीकरणाचा काळ आहे’. विशेषकरून तो “कृपेचा कालावधी आहे” (२ करिंथ ८:२).
आजची तिन्ही वाचने आपल्याला एकच संदेश देतात तो म्हणजे, ‘पश्चाताप करा आणि प्रभूच्या प्रेमामध्ये, दयेमध्ये नव्याने जन्म घ्या. येशु, योहान ३:३ मध्ये आपल्याला म्हणतो, ‘नव्याने जन्मल्याशिवाय कोणीही देवाचे राज्य पाहू शकणार नाही.’ ह्याचा अर्थ, ‘नव्याने जन्म घेणे म्हणजे पश्चाताप करणे व पवित्र आत्मामध्ये नव्याने जन्मणे’.
पश्चाताप म्हणजे काय?
पश्चाताप म्हणजे दिव्य योजनेद्वारे अंतःकरणात पटलेली पापांची जाणीव. देवासमोर आपण दोषी आहोत म्हणून पापापासून मागे वळून देवाच्या कृपेचा स्वीकार करणे म्हणजे पश्चाताप करणे. आपण पापी आहोत हे मान्य करून, पापांचा त्याग करणे आणि पवित्र कृपेचे जीवन जगण्यासाठी, पवित्र आत्माच्या सहाय्याचा स्वीकार करणे म्हणजे पश्चाताप होय.
आपल्याला ठाऊक आहे कि, मनुष्य ही देवाची सर्वोत्कृष्ट निर्मिती असली तरी देवाने आपल्याला ‘शरीर’, ‘मन’ आणि ‘आत्मा’ अशा तीन गोष्टी दिलेल्या आहेत. शरीराद्वारे आपण जगाशी संपर्क साधतो. आपल्या मनाद्वारे आपण स्वतःशी सुखसंवाद करतो आणि आपल्या आत्म्याद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ येत असतो. आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा परिणाम या तीनही पैलूंवर होतो. दुसरी गोष्ट म्हणजे, आपण सर्वजण अशक्त आहोत, दुर्बल आहोत. वारंवार आपल्या हातून चुका, अपराध आणि पापे होत असतात आणि त्या सर्वांचा परिणाम आपल्या शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक जीवनावर होत असतो.
ख्रिस्ती जीवन सुरक्षित चालावे म्हणून परमेश्वराने आपणाला दहा नियम दिलेले आहेत. हे नियम पाळले नाहीत तर आपले आध्यात्मिक जीवन विकसित होणार नाही. उपवास काळात प्रभू येशु आपल्याला आठवण करून देतो की, ‘जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल’. या प्रायश्चित काळामध्ये आपण केलेल्या पापांची आठवण करून त्याबद्दल दुःख व्यक्त करावे व प्रायश्चित संस्कार स्वीकारून देवाच्या प्रेमाचा, दयेचा अनुभव आपण प्रत्येकांनी घ्यावा म्हणून आज येशु आपणा प्रत्येकाला अंजिराच्या झाडाच्या दाखल्याद्वारे बोलावीत आहे.
आपले जीवन हे परमेश्वराचे महान दान आहे. प्रत्येकाला परमेश्वराने कला, गुण आणि बुद्धिमत्ता दिलेली आहेत. परमेश्वराची आपल्याकडून एकच अपेक्षा असते आणि ती म्हणजे आपण सर्वांनी चांगली ,गोड, रसाळ फळे द्यावीत. तसेच आपल्याला प्राप्त झालेल्या वरदानांचा योग्य तो वापर करून स्वतःचे तसेच इतरांचे जीवन फुलविण्याची जबाबदारी परमेश्वराने आपल्यावर सोपवलेली आहे. मात्र आपण आपल्या स्वार्थी आणि अहंकारी स्वभावामुळे, प्रभूची आज्ञा धुडकावून लावतो आणि पापास प्रवृत्त होतो. पापामुळे आपले जीवन त्या निष्फळ अंजिराच्या झाडासारखे होते. आपण आपल्या दुराग्रही वृत्तीमुळे चांगले व गोड फळे इतरांना देऊ शकत नाही. पाप म्हणजे सर्वनाश! म्हणूनच प्रभू येशु म्हणतो, ‘जर तुम्ही पश्चाताप केला नाही, तर तुम्हा सर्वांचा नाश होईल’.
पहिल्या वाचनात आपण ऐकले की, देव इस्रायल लोकांना इजिप्त देशातील फारो राजाच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी मोशेची निवड करतो. इथे देव ‘यहोवा’ या नावाने स्वतःची ओळख करून देतो. ‘यहोवा’ म्हणजे ‘मी जो आहे तो आहे’. ह्याच देवाची (यहोवाची) उपासना अगोदरच्या सर्व पिढ्यांनी केली (आब्राहमाचा देव, इसहाकचा देव, याकोबाचा देव).
मात्र इस्रायल लोक या यहोवाबरोबर अविश्वासूपणे वागले. ते त्याच्यापासून दूर गेले व मूर्तिपूजा करु लागले. त्यांनी देवाची परीक्षा पाहिली व देवाविषयी कुरकुर केली, म्हणून त्यांच्या सर्व पापांमुळे देवाने त्यांचा नाश केला असे संत पौल आपल्याला दुसऱ्या वाचनात सांगतो. देव इस्रायल लोकांविषयी संतुष्ट नव्हता, कारण त्यांनी त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप केला नाही.
आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. बोधकथेत सांगितल्याप्रमाणे आपण इच्छुक असलो तर आपल्या प्रत्येकाला स्वत:च्या जीवनात बदल घडवून आणता येईल. येशु ख्रिस्त किंवा देव नव्हे तर आपणच आपल्या स्वत:च्या पापांमुळे नाश ओढवून घेत असतो. ह्या उपवास काळामध्ये येशु ख्रिस्त आपल्याला पश्चातापासाठी आणखी एक संधी देत आहे. कारण येशु नितीमानांचे नव्हे तर पाप्यांचे तारण करावयास आला आहे.
बेनसिरा १७:२५ मध्ये आपण वाचतो, “पाप सोडून प्रभूकडे परत या, त्याच्या सान्निध्यात प्रार्थना करा म्हणजे तुमचे अपराध कमी होतील.” ह्या उपवास काळातील तिसऱ्या रविवारी, आपण आपल्या पापांची आठवण करु या. आपल्या हातून घडलेल्या पापांबद्दल मनात दुःख व्यक्त करून, यापुढे पाप न करण्याचा निश्चय करुया. सरते शेवटी परमेश्वराने दिलेल्या संधीचा फायदा घेऊन प्रायश्चित संस्कार स्वीकारून देवाच्या प्रेमाचा, क्षमेचा, दयेचा व कृपेचा अनुभव ह्या करुणा वर्षात आपण घेऊया.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे.
१. आपले परमगुरु पोप फ्रान्सीस ह्यांना प्रभूने शारीरिक,मानसिक व आध्यात्मिक आरोग्य द्यावे व योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्व पापी आहोत ह्याची जाणीव आपणा प्रत्येकाला व्हावी व या प्रायश्चित काळात आपण सर्वांनी आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रायश्चित संस्कार घेऊन देवाची करुणा व दया आपल्या जीवनात अनुभवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे देवापासून दूर गेले आहेत त्यांना प्रभूच्या दया, क्षमा व करुणेचा स्पर्श व्हावा व त्यांनी पुन्हा एकदा प्रभू ख्रिस्तामध्ये आनंदाचे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे बेरोजगार आहेत अशांना त्यांच्या कला-कौशल्यावर आधारित योग्य ती नोकरी मिळावी जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या सामजिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.









Wednesday 17 February 2016

Reflection for the homily of 2nd Sunday of Lent (21/02/2016) By: Ashley D'Monte.






प्रायश्चितकाळातील दुसरा रविवार




दिनांक: २१/०२/२०१६.
पहिले वाचन: उत्पत्ती १५:५-१२, १७-१८.
दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र ३:१७-४:१.
शुभवर्तमान: लुक ९:२८अ-३६.

प्रस्तावना:
     आज आपण प्रायश्चित काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना परमेश्वराने मानवाशी केलेल्या कराराविषयी सांगत आहे.
उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात ह्या कराराची सुरुवात नमूद करण्यात आली आहे. आब्राहामाने केलेले यज्ञ स्विकारून, देव आब्राहामाशी करार प्रस्थापित करतो. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल फिलिप्पीकरांस पाठवलेल्या पत्रात म्हणतो, ‘आपण स्वर्गीय राज्याचे प्रजाजन आहोत. आपला उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त येऊन, आपले नीच शरीर बदलून त्याच्यासारखे वैभवशाली करील’. तर लुकलिखित शुभवर्तमानात आपण येशूच्या रूपांतराविषयी ऐकतो.
परमेश्वर, आपला पुत्र येशू ह्याच्याद्वारे मानवाशी करार करतो. येशूचे रुपांतर हे त्याच्या वैभवशाली पुनरूत्थानाचे व त्या स्वर्गीय नंदनवनाची एक पूर्वसुचना होती. ह्या नंदनवनात आपण सर्व सामील होण्यास केलेला हा करार होय. येशुप्रमाणे आपल्याही जीवनाचे रुपांतर व्हावे व आपणास त्या स्वर्गीय नंदनवनात प्रवेश मिळावा म्हणून ह्या मिस्साबलीत प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
उत्पती: उत्पत्ती १५:५-१२, १७-१८.
देव आब्राहामाला ‘उर’ देशातून बोलावून त्याच्याशी करार करतो. परमेश्वर त्याला आकाशात पहायला सांगतो, ते ह्यासाठी की, ‘हे सर्व काही स्वप्न नसून हकीकत होती’. परमेश्वर आपल्या वचनांशी एकनिष्ठ राहतो. आकाशातील ताऱ्यांप्रमाणे आब्राहामाची संतती होण्याचे वचन परमेश्वर त्याला देतो. आब्राहाम त्याच्या देवावरील विश्वासामुळेच ‘विश्वासाचा पिता' ठरतो व नितीमान गणण्यात येतो. आब्राहामाला व साराला पुत्राचे वचन दिल्यानंतर, परमेश्वर त्यांस आता वतन देण्याचे आश्वासन देतो. त्याच्या ‘पुत्राचा बळी’ अर्पण करण्यास सांगणे, ही परमेश्वराने आब्राहामाच्या विश्वासाची केलेली परीक्षा होती. परंतु आब्राहाम त्यात उत्तीर्ण होतो. परमेश्वर मेघवाणीतून आब्राहामाला वतन मिळवून देतो. मात्र ह्या वतनावर इस्रायली जनतेचे वर्चस्व फार उशिराने होते. दरम्यानच्या काळात त्यांना अनेक खाच-खळग्यांतून जावे लागते. इस्रायली जनता देवापासून दूर जाते, परंतु परमेश्वर मात्र त्याने केलेला करार ‘मी तुमचा देव व तुम्ही माझी प्रजा आहात’ हे विसरत नाही.

दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र ३:१७-४:१.
पौल ख्रिस्ती बांधवाना आपल्याप्रमाणे ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास आवाहन करीत आहे. आपण घेतलेल्या निर्णयावर पौल ख्रिस्ती जनांस विचार-विनिमय करण्यास सांगत आहे. पौल, ‘ख्रिस्ताच्या क्रुसाचे शत्रू’ असे संबोधताना, केवळ अधर्मी व जे ख्रिस्ताच्या सुवार्तेचा स्वीकार करत नाही अशांचा उल्लेख करीत नाही; तर अनेक ख्रिस्ती जनही त्यामध्ये सामील आहेत असे त्यांस सांगावयाचे आहे असे दिसून येते. कारण त्यांचा विश्वास व त्यांचे जीवनमान एकसमान नसून, ते विरोधाभास आहे असे वाटते. आपल्या जीवनात येणाऱ्या दु:खांपासून दूर पळून ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे शत्रू बनले आहेत. ते ख्रिस्ताची स्तुतीसुमने गातात व आपण परिपूर्ण कसे व्हावे ह्यासाठी झटतात. पौल म्हणतो, ‘त्यांची वाटचाल ही विनाशाकडे आहे. ते ऐहिक जगात रमले आहेत. त्याविरोधात संत पौल ख्रिस्ती जनास म्हणतो की, ‘हे ऐहिक जग आपले मुळ स्थान नसून स्वर्गीय नंदनवन आपले ध्येय आहे. ह्या भूतलावर आपण फक्त एक क्षणभंगुर जीवन जगतो, परंतु स्वर्गात आपणास चिरकाल जीवन प्राप्त होईल. त्यामुळे आपली दृष्टी ही स्वर्गाकडे असावी; हे स्वर्गातील स्थान आपल्याला, आपला उद्धारक प्रभू येशू मिळवून देईल. जो अखिल पृथ्वीचा अधिपती आहे. येशू, आपले शरीर त्याच्या शरीराप्रमाणे वैभवशाली करून आपणास नवजीवन प्राप्त करून देईल. हे सर्व शक्य होण्यास, ‘प्रभूच्या येण्याची प्रतिक्षा, आपण विश्वासाने करावी व ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे आपले आचरण ठेवावे असे संत पौल म्हणतो.

शुभवर्तमान: लुक ९:२८अ-३६.
     येशूच्या रुपांतराची कथा आपणास मार्क, लुक व मत्तय ह्या तीनही शुभवर्तमानात आढळून येते. मत्तय शुभवर्तमानकार येशूला नवीन मोशे म्हणून गणतो. तर लुक शुभवर्तमानकार येशू प्रार्थनेत मग्न होऊन, त्यांस हा अविष्कार होता असे म्हणतो. लुकलिखीत आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू परमेश्वराचा परमप्रिय पुत्र असल्याचे जाहीर होते. येशूचे रुपांतर हे त्याच्या मरणोत्तर पुनरूत्थानाचे व त्यानंतरच्या सार्वकालिक जीवनाची जणू एक पूर्वसुचना करुन देते. येशू प्रार्थना करावयास डोंगरावर जातो. डोंगर हे त्याकाळच्या परंपरेनुसार परमेश्वराच्या प्रकाटीकरणाचे स्थळ होते. येशू प्रार्थना करीत असावा, परमेश्वराचे वैभव एका लखलखीत प्रकाश झोताप्रमाणे त्याच्या शरीराला भेदून गेले व येशूचे वस्र पांढरे शुभ्र झाले व तो दैदीप्यमान दिसू लागला. लखलखीत प्रकाश हे ‘दैवी नगरीचे’ प्रतिक होय. येशू हा ‘ख्रिस्त’ म्हणजेच ‘परमेश्वराचा अभिषिक्त’, हे त्यावेळी प्रकट झाले. मग मोशे आणि एलिया हे दोघेजण त्याच्याशी बोलताना त्याच्या शिष्यांना दिसले.
मोशे आणि एलिया ह्या दोघांना परमेश्वराचे दर्शन डोंगरावर झाले होते. मोशेने परमेश्वराकडून दहा आज्ञा ‘सिनाय’ पर्वतावर स्वीकारल्या व एलिया संदेष्याला परमेश्वराचे दर्शन ‘होरेब’ पर्वतावर झाले आणि येशुसुद्धा ‘ताबोर’ पर्वतावर प्रार्थना करीत होता. मोशे व एलिया ह्यांनी परमेश्वराने दिलेली जबाबदारी पार पाडली होती. मोशेने इस्रायली जनतेस फारोच्या गुलामगिरीतून सुटका करून सोडवले व वचन दिलेल्या देशात त्यांची वाटचाल केली. तर एलीया संदेष्ट्याने तारणारा आपले तारण कसे करील ह्याचे भाकीत केले होते. हे दोन्ही महापुरुष केवळ येशू करीत असलेल्या समर्पनासाठी, त्याला पाठींबा देण्यासाठी आलेले नसून, ‘येशू’ हाच ‘मसीहा’, ‘तारणारा’ आहे ह्याची ग्वाही देण्यास आले होते. स्वर्गातून आलेली वाणी हि येशूच्या बाप्तीस्म्याच्या वेळीसुद्धा होती. ही वाणी सांगते कि, येशू हा देवपुत्र होता व देवाने ख्रिस्ताद्वारे आपणास त्याची मुले म्हणून स्वीकारले आहे. येथे येशूचे रुपांतर हे त्याचे दुख:सहन, मरण व पुनरुत्थान ह्यांची सुरुवात आहे असे संत लुक मांडतो.

मनन चिंतन:
लुकलिखित शुभवर्तमानात आपण ऐकले की, येशू प्रार्थना करीत असता त्याचे रुपांतर झाले. प्रार्थनेत नम्र झालेला येशू उंचावला गेला. येशूने प्रार्थनेला महत्वाचे स्थान दिले. आपल्या बाप्तिस्म्यापूर्वी त्याने प्रार्थना केली, शिष्य निवडण्यापूर्वी त्याने प्रार्थना केली, चमत्कारापुर्वी प्रार्थना केली व शेवटी दु:ख सहन करण्यापुर्वी त्याने प्रार्थना केली. येशूने दिवसातील पुष्कळ वेळ केवळ प्रार्थनेसाठी दिला होता. आपली प्रार्थना ही केवळ पोपटपंची नसावी तर परमेश्वराठायी मन एकरूप करणारी असावी. खऱ्या अंत:करणाने केलेल्या प्रार्थनेत परमेश्वराशी समेट होतो, आपण त्याच्याठायी एकरूप होतो. ख्रिस्त जेव्हा परमेश्वराशी एकरूप झाला तेव्हा तो पूर्णत: प्रकाशमान झाला. परमेश्वराठायी साचलेली एकरूपता आपणालाही प्रकाशमान करते. आपले अंत:करण बदलून टाकते.
येशूचे रुपांतर हे त्याच्या जीवनात कायापालट करणारी घटना होती. ख्रिस्त हा लोकांना चमत्कार करून व आपल्या प्रवचनाद्वारे दयेकडे आकर्षित करीत होता. पण आता मात्र त्याला डोंगर उतरून येरुशलेम नगरीत प्रवेश करावयाचा होता; गेथसमनी बागेची वाट चालत शेवटी कालवरी टेकडी चढायची होती. रूपांतरामुळे येशूला पित्याच्या प्रेमाची जाणीव झाली. ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्यावेळी पित्याने आपल्या प्रेमाची ओळख करून दिली, ‘हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याच्या बाबतीत मी संतुष्ट आहे,’ व रूपांतराच्या वेळी परमेश्वर म्हणतो, ‘हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याचे तुम्ही ऐका’.
येशूचे झालेले रुपांतर हे केवळ त्याच्या स्वत:साठी नसून ते शिष्यांसाठी होते. ते त्यांस धीर देण्यासाठी होते. कारण येशू त्याच्या रुपांतरानंतर येरुशलेम नगरीत जाणार होता. तेथे त्याचा छळ होणार होता. त्यास दु:ख सहन करायचे होते व शेवटी एखाद्या लुटारुप्रमाणे क्रुसावर मरण पत्करायचे होते. या सर्व गोष्टी पाहण्यास त्याच्या शिष्यांस धीर देण्याची गरज होती हे येशू जाणून होता. येशू त्यांस भविष्यात घडणाऱ्या गोष्टींची जणू एक पुर्वसुचना देतो व त्याच्या पुनरुत्थानाविषयीची कल्पना देतो.
शिष्यांना हा प्रसंग अतिशय आल्हाददायक वाटत होता म्हणून पेत्र म्हणाला, ‘प्रभो आपण येथे असणे फार छान आहे’. परंतु येशू त्यांना तिथे राहावयास मनाई करतो. कारण येशूला त्यांची गरज होती. गेथसमनी बागेत त्याला त्यांच्या प्रार्थनेची गरज होती परंतु ते झोपी गेले; येशूला जेव्हा धरून नेले तेव्हा सर्व शिष्य पळाले. आपणही शिष्या प्रमाणे वागतो का? आनंद, उत्सव सर्वांनाच आवडतात. आनंदाच्या वेळी, यशाच्या वेळी आपण जणू म्हणतो, ‘प्रभो हे सर्व चांगले आहे; परंतु थोडे दु:ख वाट्याला आले तर शिष्यांप्रमाणे आपण पळून जातो. आपण परमेश्वराला प्रश्न विचारतो, ‘परमेश्वर हे दु:ख माझ्याच वाटयाला का’? ‘आयुष्यात जर दु:ख नसेल तर सुख काय आहे हे आपणाला कधीच कळणार नाही’. ‘प्रकाशाची जाणीव जशी अंधारात होते त्याच प्रमाणे सुखाची, आनंदाची जाणीव ही दु:खामध्ये होते’.  अपयशाच्या चिखलात पाय रोवल्याशिवाय यशाची कमळे हाती लागत नाही. ख्रिस्ताचे खरेखुरे अनुयायी बनायचे असेल तर आपण आपल्या दु:खाचे क्रूस वाहिले पाहिजेत तरच आपणास पास्काचा आनंद मिळेल.
ख्रिस्तासमवेत आपण अनुभवलेला प्रत्येक क्षण सुखकारक असतो. परंतु ज्यावेळी आपण त्यावेळात साधलेला संवाद प्रत्यक्ष जीवनात आचरण करतो, त्यावेळी आपणास खरा आनंद प्राप्त होतो. आजचे जग हे क्षणभंगुर, सुखाच्या मागे धावत आहे व आपणही ह्या शर्यतीत सरपटले जात आहोत. परंतू ख्रिस्त आपणास म्हणतो, ‘खरा आनंद, सुख मी तुम्हाला देत आहे’. जग दु:ख, संकटे ह्यांना टाळण्याचे अनेक उपाय सांगत आहे परंतु ख्रिस्ताने दु:खाला सामोरे कसे जावे व त्यावर मात कशी करावी हे दाखवून दिले आहे. ज्याप्रमाणे येशूचे रुपांतर झाले, त्याचप्रमाणे आपलेही पुनरुत्थानावेळी रुपांतर होईल व येशुप्रमाणे आपणही तेजमान होईल. त्यासाठी आपण आपली दृष्टी स्वर्गीय राज्याकडे लावायला हवी व परमेश्वराची योजना आपल्या जीवनाद्वारे पूर्णत्वास नेली पाहिजे. येशूने सुद्धा तेच केले. आपल्या पापांसाठी त्याने क्रुसावर मरण पत्करले व स्वर्गीय नंदनवनात आपणास सामील करुन घेतले. येशूचे रुपांतर शहरापासून दूर, डोंगरावर झाले, म्हणजेच आपण जर ह्या एैहिक जगात गुरफटले असलो तर परमेश्वराच्या सानिध्यात कधीच येऊ शकणार नाही. आपण थोडा वेळ बाजूला सारून त्याच्या सानिध्यात घालवला पाहिजे. हे एैहिक जग सर्वस्व नसून त्यानंतरही जीवन आहे आणि ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय. येशूला आपणा सर्वांस ह्यात सहभागी करून घ्यायचं आहे म्हणूनच तो आपल्या शिष्यांना आपले प्रतिनिधी म्हणून त्याच्या ह्या दैदीप्यमान-पणाचा अनुभव देतो. आपण सर्व त्या चिरंतर जीवनाचे वाटेकरी होऊया, पण त्याअगोदर आपले दैनंदिन जीवन सुखकर बनवूया परमेश्वराच्या सानिध्यात राहून आपले रुपांतर करूया. आपण सर्व जगात राहून ख्रिस्ताकडे वळूया, त्याच्या शिकवणुकी-प्रमाणे वागूया व शेवटी त्या स्वर्गीय नंदनवनात सहभाग घेऊया. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :

प्रतिसाद: हे प्रभो, आम्हांस तुझ्या कृपेने नवजीवन दे.
   आपले परमगुरु, धर्मगुरू, धर्मबंधू व भगिनी यांनी ख्रिस्ताप्रमाणे स्वर्गीय नंदनवनाचे पुढारक व्हावे व त्यांना अडचणींवर मात करण्यास प्रभूने कृपा-शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.     आपल्या ख्रिस्तसभेने येशू व मोशे, हे आपली पापांपासून सुटका करून आपल्याला स्वर्गराज्यात नेतील ह्यावर  विश्वास ठेवावा व त्यांच्या पुढारकीला नम्रपणे होकार द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.     आपण सर्वांनी ह्या जगातील एैहिक सुखाच्या मागे न लागता, परमेश्वराच्या सानिध्यात थोडा वेळ घालवावा व येशुप्रमाणे आपलेही रुपांतर व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.     जे निराश आहेत, हताश आहेत अशांना परमेश्वराच्या प्रेमाच्या स्पर्श व्हावा व आपले ख्रिस्ती जीवन त्यांनी विश्वासुपणे जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Wednesday 10 February 2016

Reflection for the homily of 1st Sunday of Lent (14/02/2016) By: Dominic Brahmane.








उपवासकाळातील पहिला रविवार
दिनांक: १४/०२/२०१६.
पहिले वाचन: अनुवाद २६:४-१०.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १०:८-१३.
शुभवर्तमान: लूक ४:१-१३.

“अरण्यात सैतानाने येशूची परीक्षा केली”





प्रस्तावना:
     आज आपण उपवास काळातील पहिला रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला येशूवरील विश्वासात वाढ करून आपणांस मोहांवर विजय मिळविण्यास पाचारण करीत आहे.
     अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराने इस्रायली लोकांची आरोळी ऐकून त्यांना मिसऱ्यांच्या छळातून मुक्त करून दुधामाधाचे पाट ज्या देशात वाहतात त्या देशांत सुखरूप आणिले असे ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल ‘जो अंत:करणात येशूवर विश्वास ठेवतो व तोच विश्वास त्याच्या मुखाने कबूल करतो त्याचे तारण होईल’ असे सांगत आहे. तर लूकलिखित शुभवर्तमानात अरण्यात सैतानाने घेतलेली येशूची परीक्षा व येशूने मोहांवर मिळविलेला विजय ह्याविषयी ऐकावयास मिळते.
     ‘येशूवर विश्वास ठेवणारा कधीही फजित होणार नाही’. येशू, त्याने मोहावर मिळविलेल्या विजयाने आपल्याला एक आदर्श बनला आहे. म्हणून त्याच्यावर असलेला आपला विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा व दैनंदिन जीवनात जे मोह आपल्याला परमेश्वरापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात त्या मोहांवर मात करण्यासाठी ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: अनुवाद २६:४-१०.
पुरातन इस्रायलमध्ये परमेश्वराची केली जाणारी पूजा-अर्चना ही देवाने त्यांच्यावर केलेल्या उपकारांची परतफेड आणि मिसऱ्यांपासून त्यांच्या सुटकेबद्दल दिलेली उपकार स्तुती व धन्यवादाचा भाग होता. ह्या ऋणानिर्देशात त्यांना जमिनीच्या देणगीहूनही अधिक प्रिय होते ते म्हणजे देवाची आठवण व उपकारस्तुती. निर्गमाच्या पुस्तकात आपणांस वाचावयास मिळते की, परमेश्वराने इस्रायली लोकांचा देश गुलाममुक्त बनवून त्यांना स्वातंत्र्य बहाल केले ह्या त्यांच्या देवपुजनात दोन परंपराचा उगम आहे. एक म्हणजे देवाने मिसऱ्यांच्या हातून केलेली सुटका व त्यांना मिळवून देलेल्या स्वातंत्र्याबद्दल धन्यवाद आणि दुसरे म्हणजे त्यांच्या पूर्वजांची परत मिळवून दिलेली जमीन ह्याबद्दलची आस्था.
     (ओवी ५-१०) हा अनुवाद २४ ह्या अध्यायातील महत्वाचा गाभा आहे. ह्या उताऱ्यात इस्रायली लोकांनी परमेश्वराच्या पुढ्यात मांडलेली अर्पणे ही त्यांच्या प्रायश्चिताचे प्रतिक आहे. कारण पूर्वजांच्या जमिनीशिवाय त्यांचे अस्तित्व शून्य आहे असे ते मानात. देवाने त्यांच्यावर त्यांच्या पूर्वजांकरवी केलेल्या ह्या महत्कृत्यामुळे त्यांनी देवाला उत्पन्नाचा दशांस भाग अर्पण केला. एक परिवार म्हणून केलेले सहभोजन हासुद्धा त्यांच्या आनंदोत्सवाचा व ऋणानिर्देशाचाच भाग होता.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १०:८-१३.
     प्रस्तुत उताऱ्यात संत पौलाचा यहुद्यांविषयीचा कठोरपणा दिसून येतो, परंतु ह्यामागचा हेतू हाच होता की, त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवावा व त्यांच्याद्वारे यहुद्यांचे तारण व्हावे. परंतु हे सत्य जरी पौलाने मायेने सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी त्यात कटुता आणि ताठरपणा अनुभवला. यहुद्यांना देवाबद्दल आस्था व लगाव आहे, ह्याची जरी पौलाला जाणीव होती, तरी त्यांची ही आस्था चुकीचे मार्गक्रमण करत होती हे त्याला ठाऊक होते. यहुदी पंत हा नियम व रूढी पाळण्यात अतिशय चाणक्ष होता. ह्या नियमांनी त्यांचे जीवन विस्कळीत झाले होते. कारण लहान सहान नियम पाळणे त्यांना यथायोग्य वाटे, ज्यामध्ये मृत पावलेल्या मनुष्यास स्पर्श करण्यास व त्यास पुराण्यासही त्यांना मुभा नव्हती. त्यांची अशी खात्री होती की, हे सर्व नियम कटाक्षाने पाळल्याने त्यांना देवाची कृपावरदाने लाभेल व ते देवाच्या अगदी जवळ जातील.
यहुद्यांनी नियमानुसार, लोकांनी केलेल्या चांगल्या वाईट वर्तणुकीवरून त्यांची वर्गवारी केली होती. ह्या सर्वांना अंत म्हणून संत पौल सांगतो, की, येशू ह्या नियमांचा शेवट किंवा अंत असा आहे. तो म्हणतो, ‘ख्रिस्तानुमते देवाला समाधानी करण्यासाठी अशा नियमांचे पालन करणे रास्त नाही तर देवाचे प्रेम, दया आणि कृपा ह्यांचे अंत:करणात जतन करून कृतीत उतरविणे योग्य आहे’. संत पौल येथे, संदेष्ट्याने परमेश्वरावरील प्रकट केलेल्या विश्वासाची पुनरुजळणी करण्यास सांगतो आणि देवावरील विश्वासाने आपले तारण होईल असे म्हणतो.

शुभवर्तमान:  लूक ४:१-१३.
     ह्या परीच्छेदात शुभवार्तिक संत लूकने येशूची जनसमुदयासमोर कामगिरी करण्यापूर्वीची तयारी लिखित केली आहे. ह्याचीच तयारी/पुनरावृत्ती आपल्याला मार्क आणि मत्तय च्या शुभवर्तमानात संक्षिप्त स्वरुपात वाचावयास मिळते. यार्देन नदीत योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतल्यानंतर नभातून झालेल्या पित्याच्या वाणीने त्यास त्याचा परमप्रिय पुत्र व मसीहा म्हणून घोषित केले. हाच यशया ४०-५३, मधील देवाचा सहनशील सेवक होता. तद्नंतर पवित्र आत्म्याने त्यास यार्देन जवळील अरण्यात परीक्षा घेण्यास नेले. तेथे येशूने चाळीस दिवस रात्र उपवास केला आणि नंतर सैतानाने त्याची परीक्षा घेतली. हा मोहप्राय प्रसंग येशूनेच त्याच्या शिष्यांना कथित केला असावा कारण तेव्हा अरण्यात त्याच्याबरोबर १२ शिष्यांपैकी कोणीही हजर नव्हते. पहिल्या ख्रिस्ती समूहाने ह्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता हा प्रसंग तीनही शुभवर्तमानात मुख्य स्वरुपात मांडलेला आहे. ही घटना विशेष आणि महत्वाची आहे कारण ह्यात येशूचा मानवी स्वभाव दिसून येतो. त्यामुळेच येशूला एक देवपुत्र म्हणून नव्हे तर एक साधारण मनुष्य म्हणून शारीरिक भूक आणि मानसिक छळ किंवा अपमानास्पद वागणूकीला सामोरे जावे लागले.
     ह्याद्वारे येशू आपल्या सर्व मानवजातीसाठी आदर्श बनला आहे. ह्यातून येशू स्वर्गराज्य - जे येशू ह्या पृथ्वीतलावर प्रस्थापित करण्यासाठी आला होता ते कसे असावे ह्याविषयीची कल्पना देतो.
तो भुकेला होता : येथे येशू खरोखर मानव होता हे स्पष्टपणे मांडण्यात आले आहे व ते ‘तो भुकेला होता’ ह्या वाक्यावरून दिसून येते. कारण तो जर मानवी रूपातील देव असता तर त्यास भूक लागणे असाधारण व असामान्य असे होय.
चाळीस दिवस : परमेश्वराकडून कराराची वचने (दहा आज्ञा) स्वीकारण्यापूर्वी मोशेने सिनाय पर्वतावर चाळीस दिवस रात्र उपवास केला (निर्गम ३४:२८). होरेब पर्वतावर पोहोचण्यापूर्वी एलिया ह्या अत्युच्च मानल्या जाणाऱ्या संदेष्ट्याने चाळीस दिवस व रात्र उपवास केला (१राजे १९:८). अगदी त्याचप्रमाणे नवीन आज्ञा घालून देणारा प्रभू व अत्युच्यातील उच्च, प्रेम व करुणेचा संदेष्टा प्रभू येशू ख्रिस्त ह्याने तारणकार्यास सुरुवात करण्यापूर्वी अरण्यात चाळीस दिवस व रात्र उपवास केला.
सैतानाने त्याची परीक्षा घेतली : सैतानाने केलेल्या परीक्षेत येशू खालील तीन विशेष मोहांवर विजय मिळवितो.
१) स्वार्थासाठी दैवी शक्तीचा वापर. २) ऐहिक (एैश्वर्य) गोष्टींचा मोह. ३) स्वत:ला महान ठरवून इतरांना गुलाम बनविण्यासाठी दैवी शक्तीचा दुरुपयोग
परंतु येशू उचित बायबल मधील ओव्यांनी किंवा देवाच्या वचनांद्वारे ह्या सर्वांवर मात करतो व त्यावर विजय मिळवतो. उदा: अनुवाद ८:३; ६:१३; ६:१६.
सैतान परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत तेथून निघून गेला: सैतान येशूला मोहात पाडण्यात अपयशी ठरला परंतु तो पुन्हा काहीतरी अशाच गोष्टींची संधी शोधत होता. सैतानाला खोटे बोलणाऱ्यांचा पिता संबोधतात म्हणूनच येशूला क्रुसावर मारण्यासाठी त्याने त्याच्या दुष्ट गुलामांचा वापर केला.


बोधकथा:
१. एक राजा त्याच्या संपत्तीवर अतिशय गर्विष्ठ होता. तो एकदा शहरातून फेरफटका मारत असता, वाटेत त्याला एका ऋषीने अडवले आणि त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यावी म्हणून त्याला कटोरीमध्ये काहीतरी टाकायला सांगितले. परंतु एक अट घातली. ऋषी म्हणाले की, ‘राजे तुम्ही ह्यात असे काहीतरी टाका ज्याने ती पुर्णत: भरेल’. त्यावर राजाने होकारात्मक मान हलवून, त्यात काही मोहरा टाकल्या; परंतु ती कटोरी अपूर्णच राहिली. राजा एका ऋषीबरोबर हरला, असे लोकांना वाटू नये, म्हणून अधिकाधिक त्याची संपत्ती त्याने त्या कटोरीत ओतली, परंतु ती काही भरेना. शेवटी राजाने त्या ऋषीला विचारले, ‘महाराज मी तुमच्या आव्हानापुढे हरलो; पण मला एक सांगा ही कटोरी भरत का नाही’? त्यावर ऋषी म्हणाले, ‘महाराज ही कटोरी मानवाची कवटी आहे, तुम्ही ह्यात कितीही जरी टाकले, तरीही ते अपूर्णच आहे ती कधीही भरत नाही’. राजाला त्याची चूक कळली आणि तेथे त्याचा संपत्तीवर असलेला गर्विष्ठपणा संपुष्टात आला.
तात्पर्य: मानव कधीही असलेल्या गोष्टींवर संतुष्ट नसतो. त्याला अधिकाधिक मिळविण्याची हाव असते आणि त्यामुळेच तो मोहाला बळी पडतो. परंतु येशूने मोहावर मात करून, ‘धनाची’ नव्हे तर देवाची चाकरी करणे पसंत केले’.
२. राजाच्या राजवाड्यात त्याच्या प्रजेतील एक सैन्य कायम राजाविरुद्ध तक्रार करायचा की, राज्यासाठी आम्ही आमचा जीव अर्पण करतो परंतु येथे आम्हांला इतक्याश्या घरात सर्व सुख मुरडून राहावे लागते’. राजाच्या हे कानावर गेल्यावर राजाने राज्यात दवंडी पिटवली कि, ‘ज्यांना कुणाला अधिक संपत्ती पाहिजे असेल त्यांनी उद्या राजदरबारात हजार राहावे’. दुसऱ्या दिवशी सगळे आल्यावर सदा तक्रार करणारा सैन्य पुढे आला. राजाने त्याला सांगितले की, ‘तुला जितकी जमीन तू पादाक्रांत करशील किंवा जेवढ्या जमिनीला तुझ्या पायांचा स्पर्श होईल, तेवढ्या जमिनीवर तुझा हक्क असेल’. तो सर्वप्रथम चालू लागला, त्याने विचार केला असा मला फार थोडक्या जमिनीवर कब्जा मिळेल; म्हणून तो धावायला लागला, हळूहळू त्याने त्याची गती वाढवली. त्याच्या मोहामुळे त्याची मती धुंद झाली होती. शेवटी अन्न-पाण्यावाचून धावल्याने तो मरण पावला. त्याला तेथेच ६x३ ची खाच खोदून पुरण्यात आले.
तात्पर्य: कधी कधी माणसाचा मोह त्याच्या जीवाचा अंतही करू शकतो. म्हणून अधिक मोह करण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानायला शिकले पाहिजे.

मनन चिंतन:
येशूचे चाळीस दिवस उपवास आणि मोहप्राय परीक्षा हा येशूच्या आत्मपरीक्षणाचा काळ होता. ‘Docetism’ विचारसरणीचे तत्ववेत्त्यांची येशू पूर्ण मानव आहे, ह्यावर शंका होती. ते म्हणतात, ‘येशू फक्त दिसण्यात मानव होता, परंतु अस्तित्वात नाही’. आजचा संत लुक शुभवर्तमानलिखित उतारा त्यांस उत्तर असे होईल, कारण अरण्यात झालेली येशूची परीक्षा तो पुर्णत: मानव होता, ह्याची पोचपावती होय. त्याचा मानवी स्वभाव येथे प्रत्यक्षात स्पष्टपणे दिसून येतो. जर तो मानव नसून फक्त देव असता तर त्याला भूक लागलीच नसती व तो तेथून त्याच्या दैवी शक्तीने सैतानाच्या परीक्षेपूर्वीच निसटला असता.
·        पवित्र आत्म्याने येशूला अशा एकांतात (अरण्यात) का नेले असावे?
अ) शुभवर्तमान अभ्यासक म्हणतात की, येशू हा देवाचा परमप्रिय पुत्र आहे असा बाप्तीस्म्याने व नभोवाणीने त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला होता. दुसरे म्हणजे, तो काळ त्याच्या मिशन कार्याच्या सुरुवातीचा काळ होता, म्हणून त्याने जुन्या करारातील एलिया, मोशे (चाळीस दिवस रात्र उपवास) ह्या संदेष्ट्यांप्रमाणे चाळीस दिवस उपवास करून पवित्र आत्म्याने परिपक्व होऊन, अरण्यात परीक्षेसाठी गेला. मोशे आणि एलिया हे एकांतात असता, देवाने त्यांना त्यांचा देवावरील असलेला विश्वास आशा आणि प्रेम ह्यांत अधिकाधिक दृढ केले व त्यांना सोपविलेल्या कार्यात सुदृढ बनविले. अगदी त्याच प्रमाणे येशूनेही केले असावे.
ब) येशूला प्रत्येकवेळी, क्षणोक्षणी पवित्र आत्म्याचा सहवास लाभला, कारण येशूने सर्वदा पित्याच्या इच्छेला प्राधान्य दिले. म्हणून बाप्तीस्मेवेळी, येशूच्या रुपांतराच्या वेळी आणि त्याच्या कार्याच्या सुरवातीला पवित्र आत्म्याने त्याच्याबरोबर असल्याची शाश्वती दिली होती. अरण्यात सुद्धा तो एकटा नसून पवित्र आत्म्याचा सहवास त्याला लाभला. पुष्कळदा आपण देवापासून दूर जातो, परंतु देव आपल्याला एकटे सोडत नाही तर तो आपली सदैव पाठराखण व संरक्षण करत असतो. ह्याचीच प्रचिती आपल्याला पहिल्या वाचनात येते. इस्रायल जनतेच्या पुजार्पणाचा महत्वाचा हेतू म्हणजे देवाला धन्यवाद देणे व देवाशी ऋणानुबंध जोडणे हा होता. कारण देव सदैव त्यांच्या दु:खात ते गुलामगिरीत असताना त्यांच्या बरोबर होता.
येशूही त्याच्या पित्याशी संलग्न होता. त्याचा पिता सदैव त्याच्याबरोबर आहे ह्याची त्याला जाणीव होती. म्हणूनच सैतानाला दिलेल्या त्याच्या  प्रत्येक उत्तरातून पित्यावरील प्रेम व विश्वास प्रकट होतो (father-son relationship). ‘मानव जेंव्हा दुर्बळ असतो तेंव्हा सैतान सबळ असतो’ असे म्हणतात; जेंव्हा येशू शारीरिकदृष्ट्या दुर्बळ होता तेंव्हा सैतानाने त्याच्यावर झडप घातली.
१) सैतानाने येशूला दगडाचे रुपांतर भाकरीत करावयास सांगितले. कारण येशू भुकेला होता. आपल्या मनात प्रश्न उद्भवेल, ‘पवित्र आत्म्याने अरण्यात येशूला मारावयास नेले होते का’? नाही. जुन्या करारातील इस्रायली जनता वाळवंटातून इजिप्त मधून इस्रायलच्या वाटेवर जात असता, भुकेने व्याकूळ झाली होती, तेंव्हा देवाने त्यांस ‘मान्ना’ खावयास दिला, हे येशूस ठाऊक होते. येशूचे अन्न हे परमेश्वराची इच्छा पूर्ण करणे हेच होते. म्हणूनच तो उत्तरला, ‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वाणीने जगेल.
२) सैतानाने येशूला ऐश्वर्याचा मोह घातला. येशूचे एैश्वर्य खुद्द त्याचा पिताच होता. तोच ह्या सर्वांचा निर्माता आहे, मग निर्माण केलेल्या गोष्टींपेक्षा निर्मात्याला जास्त महत्व द्यायला हवे. ‘जेथे आपला खजिना असतो, तेथे आपले संपूर्ण हृद्य असते’. म्हणून येशूने सैतानापुढे मान झुकविण्याऐवजी, देवाची सेवा करणे योग्य मानले.
     रविंद्रनाथ टागोरलिखित गीतांजली मध्ये ते म्हणतात, ‘वस्तू वापरण्यासाठी आणि प्रियजन प्रेम करण्यासाठी असतात. परंतु आजच्या चंगळवादाच्या (Consumerism) युगात ‘प्रियजनांचा उपयोग केला जातो आणि वस्तूंवर प्रेम केले जाते. संत फ्रान्सिस असिसिकरने पैसा, धनसंपत्ती, एैश्वर्य, ह्याला लाथाडले आणि तो प्रभू येशूस्तव दीन झाला. त्याने ‘सेवकाची नव्हे तर मालकाची चाकरी करणे पसंत केले’.
३) सैतानाने येशूला परमेश्वराची परीक्षा पाहण्यास आवाहन केले. कारण स्तोत्र ९१:११-१२ मध्ये आपण वाचतो, ‘परमेश्वर तुझे संरक्षण करावयास दूत पाठवील, ते तुला त्यांच्या तळहातावर ठेवतील व ठेच लागण्यापासून वाचवतील. येथे सैतान येशूला ‘देवपुत्राला’ ‘मरण नाही’, असे सिद्ध करण्यास सांगतो. परंतु येशूला त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करायची होती सैतानाची नव्हे. देवाची त्याच्यासाठी असलेली योजना तो जाणून होता.
जुन्या करारात निर्गम १७:७ मध्ये, जेंव्हा इस्रायल जनता वाळवंटात तान्हेने व्याकूळ होऊन मरणप्राय यातना सोसत होती, तेंव्हा देव त्यांच्याबरोबर असल्याचा त्यांचा विश्वास डळमळीत झाला आणि देवाविषयी ते दुर्भाष्य करून त्यांनी देवाची परीक्षा पाहिली की, खरोखर देव त्याचे तारण करील की त्यांना शाप देईल. येशू हा नवीन इस्रायल म्हणून ओळखला जातो. म्हणून त्याचा देवावरील विश्वास डळमळला नाही. दुसऱ्या वाचनात संत पौल असाच अढळ विश्वास आत्मसात करण्यास सांगतो. अशाप्रकारे येशूने देवाची परीक्षा घेण्यास नाकारले. हा मोह येशूचे ‘देवपुत्रत्व’ सिद्ध करण्याचा होता, परंतु येशूने हे सैतानासमोर सिद्ध करणे गौण मानले.
येशूने मोहांवर मिळवलेल्या विजयावरून आपण आपल्या जीवनासाठी काही निष्कर्ष काढू शकतो.
  A.  अरण्य किंवा वाळवंट (जेथे सैतानाने येशूची परीक्षा पाहिली) हि ऐतिहासिक जागा, ठिकाण नसून ते सर्व येशूच्या मनातील बऱ्या-वाईटचा संघर्ष किंवा चलबिचल होती. त्याचे ते आत्मपरीक्षण होते. प्रत्येक व्यक्ती अशा ह्या वळणावर येत असत जेथे त्या व्यक्तीची द्विधावस्था होत असते. ह्यात आपण सैतानाचा मार्ग निवडायचा की देवाचा, ह्याचे स्वातंत्र्य देवाने आपल्याला दिलेले आहे.
  B.  येशू आपल्या सर्वांचा एक मानव म्हणून आदर्श आहे. जर तो देवपुत्र असूनही एक सर्वसाधारण मानावाप्रमाणे, त्याच्या मोहांवर, देवावर असलेल्या विश्वासामुळे  मात करू शकतो, तर मी का नाही? देव आपल्याबरोबर सदैव असतो पण आपण कितपत देवाबरोबर राहतो ह्याची जाणीव असायला हवी. ‘देव आपल्यापासून नव्हे तर आपण देवापासून दूर जातो’. तसेच आपण निवडलेल्या पर्यायांमुळेच स्वत:वर दु:ख ओढवून घेत असतो. म्हणून देवाच्या सानिध्यात राहणे कधीही योग्यच असते.
  C. येशू ख्रिस्त हा ‘पुर्णत: मानव’ व ‘पुर्णत: देव’ होय. तो देवपुत्र असुनही मानव होऊन त्याने आपल्या भावना, त्रास, वेदना, कमकुवतपणा स्वत: ने अनुभवला व जाणला. म्हणून तोच आपल्याला ह्याबाबत योग्य मार्गदर्शन करू शकतो. तो प्रेमळ पित्याचा सदृश चेहरा व पृथ्वीवरील अस्तित्वात असलेले स्वर्गराज्य आहे.              
  आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, मोहांवर मात करण्यास आम्हाला सहाय्य कर.
१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना ख्रिस्ताशी व ख्रिस्तसभेशी विश्वासू राहण्याचा जो वारसाहक्क प्राप्त झाला आहे, तो त्यांनी इतरांसमोर त्यांच्या जीवनाद्वारे आदर्श म्हणून ठेवावा ह्यासाठी आपण प्रार्थना करूया.
२. ‘पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे’, ह्या आजच्या नवीन पिढीच्या धारणेमुळे अनेक लोकांचा देवावरील व येशूवरील विश्वास लयास जात आहे, अशांना नव्याने प्रभूने त्यांच्या सानिध्यात आणून त्यांचा विश्वास बळकट करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ‘देव आपल्यापासून नव्हे, तर आपण देवापासून दूर जात असतो’. ह्याची जाणीव आंम्हा प्रत्येकाला व्हावी व ह्या प्रायश्चित काळात आम्ही सर्वांनी देवाच्या अधिकाधिक जवळ येण्याचा प्रयत्न करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या समाजातील, धर्मग्रामातील जे लोक व्यसनाधीन झाले आहेत, त्या सर्व लोकांना प्रभूच्या आशेचा किरण दिसावा व देवाने सोपवलेली त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या धर्मग्रामातील ज्या व्यक्ती आजारीनिराशा आणि बऱ्याच व्याधींनी पिडलेल्या आहेत ह्या सर्वांनी हताश किंवा हतबल न होता दैवीदयेवर विसंबून प्रभूच्या सानिध्यात रहावे व त्यांचे जीवन प्रभूप्रेमाने प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. ‘पापांस बळी पडणे म्हणजे देवापासून विभक्त होणे’, म्हणून आपल्या मोहांवर विजय मिळवता यावा ह्यासाठी प्रभू येशूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण ‘प्रार्थना’ व ‘बायबल वाचन’ ह्यामध्ये सातत्य राखावे म्हणून प्रार्थना करूया.
७. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.