Tuesday 30 September 2014

 Reflections by: Fr. Albert D'Souza














असीसीकर संत फ्रान्सिसचा सण
दिनांक : ०४/१०/२०१४.
पहिले वाचन : बेनसिराक ५०:१,३-४,६-७.
शुभवर्तमान : मत्तय ११:२५-३०.

प्रस्तावना :
     असीसीकर संत फ्रान्सिस हे १२ व्या शतकातले. हा काळ नैतिक, आध्यात्मिक, राजकीय व सामाजिक अस्थिरतेचा होता. श्रीमंत व गरीब ह्यात मोठी दरी होती. समाज्यात बदल घडवून आणण्यासाठी त्याने स्व:तापासून सुरवात केली. ह्या कारणास्तव ह्या महापुरुषाला प्रती ख्रिस्त म्हणतात. आजच्या घडीला विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होत आहे आणि हिच सर्वात मोठी समस्या आहे. असिसिकार संत फ्रान्सीस हे पर्यावरणाचे आश्रयदाते आहेत. त्यांच्या मध्यस्तीने ह्या मिस्सा बलिदानात सहभागी होत असताना आपल्याकडून पर्यावरणाची जतन व्हावी म्हणून प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

ह्या जगात येशू ख्रिस्ताव्यतिरिक्त जर कोणी सर्वात जास्त लोकांची मने जिंकला असेल तर तो आहे गरीबांचा कैवारी असीसीचा संत फ्रान्सिस. ह्या महान संताची निसर्गावरील आपुलकी व प्रेमाविषयी सर्व मोठ मोठे फ्रान्सिस्कन साहित्यीक मोठया ऐैक्याने उल्लेख करतात. ह्या विषयावर कोणाचे दुमत किंवा मतभेद नाही. ह्या संताचा देवाविषयी असा अनुभव होता की, देव हा फक्त मानवाचाच पिता नसून तो सा-या सृष्टीचा पिता आहे. ह्यासाठी निसर्गातील सर्व सजीव-निर्जीव वस्तू त्याच्यासाठी भाऊ व बहिणप्रमाणे होते. त्याने निर्मितीत ‘निर्मात्याला’ पाहिले. त्याच्यासाठी सारी निर्मिती एक आरसा बनला, ज्यात त्याला देवाची प्रतिमा दिसली. ह्यासाठी सर्व सजीव-निर्जीव वस्तूचे संरक्षण करण्यासाठी त्याच्या मनात तीव्र इच्छा निर्माण झाली. हात धुतल्यानंतर हातावरून खाली पडलेल्या पाण्याचा एक थेंबही कोणाच्या पायाखाली चिरडला जाणार नाही ना! तसेच दगड धोंड्यावर चालत असताना तो फारशी काळजी घेत असे. जेणेकरून त्यांना ईजा होणार नाही. सरपणासाठी जंगलात गेलेल्या बंधूंनी फक्त वाळलेल्या किंवा सुकलेल्या फांद्या आणाव्यात अशी आज्ञा करत. शेतात भाजीपाला लावत असताना शेताचा थोडा भाग मोकळा ठेवावा जेणेकरून जंगली गवताला पण वाढता येईल असा बोध ते आपल्या बंधूंना करीत. ऐके दिवशी एक व्यक्ती दोन कोकरू बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असता त्याची गाठ संताशी झाली, जेव्हा त्यानी हे पाहिले तेव्हा एखाद्या मातेला आपल्या चिमुकल्या रडत्या बाळाचा कळवळा येतो तसा संताना त्या कोकारांचा कळवळा आला. त्याने जाऊन त्यांना स्पर्श केला व त्यांस दया दाखविली. त्याने त्या व्यक्तीला विचारले तु माझ्या भावांचा छळ का करतोस. त्या व्यक्तीने उत्तर दिले मला पैश्याची गरज आहे. मी ह्यांची विक्री करीन व मला पैशे तर विकत घेणा-यांना ह्यांचे मास मिळेल. त्यावर फ्रान्सीस म्हणाला असे होऊ नये, ‘हा घे माझा अंगरखा व विक आणि त्याचे पैशे तू ठेव’. ह्या माझ्या भावांना(कोकरू) माझ्याकडे दे. ही काही ठळक उदाहरणे आपल्याला या महान संताचे निसर्गावरील प्रेम दाखवून देतात. ह्या महान संताचा सण साजरा करत असता आपल्या जीवनास उपयोगी असा काही संदेश आहे का? होय आहे. तो म्हणजे अशा महान संताचे अनुयायी म्हणून आपण निसर्गाशी प्रेमाने व शांतीने वागले पाहिजे. निसर्गातील समतोल बिघडू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. हीच काळाची गरज आहे.
पर्यावरणाचे अर्थशास्त्र ह्यात लिहित असताना A. V. Kneese म्हणतात जर का निर्मितीची व निसर्गाची संसद (Parliament) असती तर त्यांचा पहिला निर्णय मानव जातीला समजावून बाहेर हाकलून लावायचा असता; जी फार घातकी आहे. ह्यात किती सत्य आहे ना माझ्या प्रिय बंधु भागाणींनो. ह्या घटनेचा अनुभव आपणास खाली दिसून येतो:
  • अॅसीडचा पाऊस आपल्या अवती भवती असलेले कारखाने मोठ्या प्रमाणात सल्फर आणि नायट्रोजन ओक्साईड हा निसर्गात सोडत असतात. ह्यांचे रुपांतर हवेत अॅसीडमध्ये होते व ते पाऊसात मिसळतात व पाऊसाबरोबर खाली येतात. त्याचा दुष्परिणाम जंगलावर, तलावावर व वास्तूवर होतो.
  • ओझोन नाहीसा होणे: ओझोन हा पर्यावरणातील वरचा थर आहे परंतु हा जेव्हा नाहीसा होतो तेव्हा सूर्याची किरणे सरळ भूमीवर येतात व ह्याने कर्करोग होतो. हवेत सोडलेल्या रसायनामुळे ओझोनचा थर नाहीसा होतो. 
  • विषारी टाकाऊ घटक: भरपूर प्रमाणात औद्योगिक केंद्रातून विषारी टाकाऊ घटकांचे उत्पादन होते व ते न काळजी घेता फेकले जाते.
  •  प्रत्येक वर्षी अकरा मिलीयन हेक्टर जंगल नाहीसे करण्यात येत आहे. 
  •  जमिनीची धुप होत असल्या कारणाने सव्वीस बिलीयन टन जमिनीचा वरचा थर वाहून जात आहे.
  • प्रती वर्षी सहा मिलीयन हेक्टर वाळवंट निर्माण होत आहेत.
  • २०२५ पर्यंत पिण्यायोग्य असे पाणी दुर्मिळ होणार आहे.
  • जवळजवळ दरवर्षी आपल्या देशात दुष्काळ पडतो. प्रत्येक आठवड्याला कुठे ना कुठे जिल्हा-अधिका-याच्या कार्यालयासमोर मोर्चे काढले जातात. जेणेकरून त्यांचा भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर व्हावा.

ह्या सर्वास कारणीभूत कोण? ही परिस्थिती कोणी निर्माण केली? अश्या ह्या अवस्थेला कोणाकडे बोट करावं?
एके दिवशी मी एका गावात मिस्सा अर्पण करण्यास जात होतो. एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी उभा असताना एक शेतकरी म्हणाला या वर्षी पाऊस नाही. ह्या सरकारने काही भलं केलं नाही. हे सरकार पाडून टाकायला पाहिजे. ह्यावर मी माझ्या मनात म्हणालो, “ती त्याची चुक नाही, ही आपली सर्वांची चूक आहे.” आपण कशे झाडे तोडत आहोत. जंगल नाहीशे करत आहोत. आपल्या मनाला पटेल तसे वागत आहोत आणि देवाला व निसर्गाला दोषी ठरवत आहोत. जर आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेईल. नाही तर नसर्गच आपल्याला चांगले धडे घडवील. आज आपण अशे काही आजार पाहत आहोत जे आपल्या पूर्वजांच्या काळात अस्तित्वात नव्हते. त्याचे कारण म्हणजे त्यांनी निसर्गातील समतोल बदलला नाही. ह्या साठीच आपण काहीतरी केले पाहिजे. आज आपणास नव्या आध्यात्मिकतेची गरज आहे; ती म्हणजे निसर्ग केंद्रित आध्यात्मिकता (creation centric spirituality) ह्या साठी आपण आपल्या गाढ निद्रेतून जागे झाले पाहिजे. प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या मला काय करता येईल ह्याचा विचार करून त्याच रुपांतर कृतीत केलं पाहिजे.
एकदा एक अॅग्लीकन पास्टरने चांगली बाग तयार केल्याबद्दल त्यांची लोकांनी स्तुती केली. त्यावर ते उत्तरले माझ्या पुर्विच्याने ह्या बागेकडे दुर्लक्ष केले होते  कारण त्यांना संपूर्ण जग बदलायचं होत, परंतु त्या जगाचा चिमुकला भाग ते प्रथम बदलू शकले नाहीत. असं म्हणतात हजारो मैलाच्या प्रवासाची सुरवात उचललेल्या एका पावलाने होते. तर मग उचलुया एक पाउल निसर्ग सुरक्षेतेच्या ह्या प्रवासात!

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
संत फ्रान्सीसच्या मध्यस्थीने आपण साऱ्या सृष्टीचा पिता परमेश्वराचरणी आपल्या विनंत्या ठेवूया.
आपले उत्तर असेल :“हे पित्या संत फ्रान्सीसच्या मध्यस्तीने आमची प्रार्थना ऐकून घे”.
१.     पोप फ्रान्सीस, सारे बिशप, सर्व धर्मगुरू व उपधर्मगुरुंसाठी प्रार्थना करूया जेणेकरून ते निसर्गाच्या संगोपनाद्वारे ख्रिस्ताच्या प्रेमाचे प्रतिक बनावेत.
२.     सर्व प्रापंचीकासाठी प्रार्थना करूया; देव आपला पिता जो आपल्याला निसर्गाची निगा राखण्यासाठी आपणास आमंत्रिक करीत आहे त्याच्या आमंत्रणाला आपल्याला पूर्ण मनाने होकार देता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.     पर्यावरणाचा आश्रयदाता संत फ्रान्सीसप्रमाणे आपण देखील निसर्गाच संवर्धन कराव आणि ही पृथ्वी सगळ्यांना जगण्यासारखी करून सर्वांनी गुण्या गोविंदाने रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.     ज्या निष्पाप लोकांना वेगवेगळ्या कारणास्तव छळले जाते त्यांना परमेश्वराने धैर्यशक्ती प्रदान करावी व त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य तो मार्ग दाखवावा म्हणून आपण करूया.    

Wednesday 24 September 2014

Reflections for the homily by Xavier Patil.












“तुम्ही पश्चाताप केला नाही व विश्वासही ठेवला नाही”

सामान्य काळातील सव्विसावा रविवार
यहेज्केल १८:२५-२८
फिलिप्पिकरांस पत्र २:१-११
मत्तय २१:२८-३२
दिनांक २८/९/२०१४

प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सव्विसावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या भवर्तमानाचा विषय आहे “आज्ञाधारकपणा”, आज्ञा पाळणे म्हणजेच देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे. आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल सांगतो की, जर पापी लोकांनी दुष्कृत्ये सोडून सात्विकतेचे जीवन जगले तर त्यांचे तारण होईल व सात्विक लोकांनी सात्विकता सोडून दुष्कृत्ये करू लागले तर त्यांचा नाश होईल.
तसेच आजच्या दुस-या वाचनात संत पौल फिलिप्पिकरांस पाठवलेल्या पत्रामध्ये सांगतो की सर्वांनी एकमेकांवर प्रेम करून एकदिलाने व एकमनाने रहावे आणि ख्रिस्तासारखे जीवन जगावे.
तसेच आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त “दोन मुलांच्या” बोधकथेद्वारे आज्ञाधारकपणाचा संदेश आपणाला देत आहे.
जर आपण देवाच्या आज्ञेचे पालन केले नसेल तर पश्चातापी अंतकरणाने त्याची क्षमा मागूया व त्याच्या आज्ञेप्रमाणे चालण्यास त्याची कृपा व शक्ती लाभावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहेज्केल १८:२५-२८

लोकांना त्यांच्या आई-वडिलांच्या वा पूर्वजांच्या गुण दोषांची, अपराधांची शिक्षा भोगावी लागते ही यहूदी लोकांमध्ये असलेली गैरसमजूत कायमची काढून टाकणे व प्रत्येक व्यक्तीच्या तारणाची जबाबदारी स्वतःवरच अवलंबून असते, हा या वाचनाचा सरळ हेतू आहे, म्हणून एखाद्या दुष्टाने आपले पाप करणे सोडले व तो न्यायाने, सरळपणे वागू लागला तर तो जगेल आणि एखादा धार्मिक माणूस आपला सरळ मार्ग सोडून असत्याच्या मार्गावर चालू लागला व पापमय कृत्ये करू लागला तर तो मरणारच. प्रत्येकाने जे काही केले असेल ते लक्षात घेऊनच त्याचा न्याय केला जाईल, म्हणून पश्चाताप करा व देवाकडे वळा.

दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस पत्र २:१-११
२:१-४ “वैयक्तिक नम्रतेद्वारे ऐक्य राखण्याची विनंती”: आवाहन केले आहे व येशूच्या प्रीतीचा आशीर्वाद आम्हांला मिळाला आहे म्हणून आम्हीही तशीच प्रीती कोणताच भेदभाव न करता इतरांना दिली पाहिजे.
२:५-११ “ख्रिस्ताचे आदर्श उदाहरण”: नम्रपणे जीवन जगण्यासाठी पौलाने ख्रिस्ताचा आदर्श उदाहरणाचे पुन्हा स्मरण केले आहे. येशूने स्वीकारलेली नम्रता, मानहानी आणि मग सर्वांचा प्रभू म्हणून उच्चपदी बसवणे हे स्पष्टपणे सांगितले आहे.

शुभवर्तमान: मत्तय २१:२८-३२
ह्या येशूच्या दाखल्याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे. जे शास्त्री व परुशी होते त्यांनी देवाच्या आज्ञा काटेकोरपणे पाळण्याचे सांगुन त्या पाळल्याच नाहीत तर दुसरीकडे जे जकातदार व वेश्या ज्यांनी त्या काटेकोरपणे पाळण्याचे न सांगूनदेखील त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या.
हा दाखला खरंतर कोणाचीच स्तुती करण्यासाठी वापरलेला नाही तर हा दाखला फक्त आपल्यासमोर दोन प्रकारच्या अर्धवट किंवा अपूर्ण असणा-या लोकांची प्रतिमा आपल्यासमोर दर्शविण्यासाठी ठेवण्यात आला आहे, ह्याचा अर्थ असा की एक गट दुस-यापेक्षा श्रेष्ठ नाही. दाखल्यामधील एकही मुलगा वडिलांना आनंद देण्यासारखा नव्हता, दोघेपण असमाधानकारक होते; परंतु शेवटी ज्याने पश्चाताप करून वडिलांच्या आज्ञेचे पालन केले तो अनिश्चितपणे दुस-यापेक्षा चांगला होता.
ज्या मुलाने वडिलांच्या आज्ञेचे पालन कोणताच प्रश्न न विचारता किंवा त्याचा मान राखून केला असता तर तो परिपूर्ण किंवा उत्कृष्ट मुलगा म्हणून संबोधण्यात आले असते. परंतु दाखल्यातील सत्य आपल्याला वेगळीच परिस्थिती दाखवते. ही दाखल्यातील स्थिती ह्या जगात दोन प्रकारचे लोक असल्याचे आपल्याला सांगते. एक गट असा जो धार्मिक प्रकारचा दिसतो परंतु जेव्हा ती धार्मिकता आपल्या जीवनाद्वारे दाखविण्याची वेळ येते तेव्हा हे त्या धर्मिकतेमध्ये मागे पडतात आणि दुसरा गट जो धार्मिक नसूनदेखील काही अनपेक्षित क्षणाला धार्मिक असल्याचे आपल्याला दिसून येते. कृतीची जागा कोणीही दिलेले वचन कधीच घेऊ शकत नाही असे हा दाखला स्पष्ट करतो, बोललेले चांगले शब्द कोणत्याही केलेल्या चांगल्या कृत्यांची जागा घेऊ शकत नाही. ख्रिस्ती जीवन हे शब्दांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात घडणा-या कृतीला जास्त प्राधान्य देते.  


बोध कथा:

एका वेळी नरकामध्ये असणारया सर्वांची सभा भरली होती आणि त्या सभेचा विषय होता कि कश्याप्रकारे आपण लोकांना नरकामध्ये येण्यास पात्र करायचे. त्या सभेतील एकाने म्हटले कि मी पृथ्वीवर जावून लोकांना सांगेन कि स्वर्ग नाही. म्हणून देवाच्या आज्ञेचे पालन करून काय लाभ? त्यापेक्षा खावून पिऊन मजा करूया. तेव्हा सभेतील जो अध्यक्ष होता त्याने उत्तर दिले की लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत कारण सर्वांना माहित आहे की स्वर्ग आहे. नंतर दुस-याने सांगितले की मी जाऊन लोकांना सांगेन की नरक नाही म्हणून देवाच्या आज्ञा कश्याला पाळायच्या? घाबरायची काहीच काळजी नाही  खा-प्या आणि मजा करा. परत अध्यक्षाने म्हटले की तुझ्यावर देखील लोक विश्वास ठेवणार नाहीत कारण सर्वांना माहित आहे की नरक आहे. नंतर तिस-या व्यक्तीने सांगितले की मी जाऊन लोकांना सांगेन की देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी अजून खूप वेळ बाकी आहे. तोपर्यंत आपण स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगूया. अध्यक्ष आनंदित होऊन म्हणाला की तुला नक्कीच अनुयायी भेटतील.

मनन-चिंतन:
१. आजच्या युगामध्ये आपणाला अनेक अश्या व्यक्ती भेटतात की ज्या आपणाला वचन देतात परंतु त्यांचे पालन करीत नाही. अनेक प्रेमाच्या गोष्टीमध्ये अश्याप्रकारेच वचन तोडण्याचे वातावरण ऐकायला भेटते. तसेच निवडणुकीच्या अगोदर सर्व पक्षांचे उमेदवार लोकांना अनेक प्रकारची वचने देतात पण इलेक्शन संपताच ते सर्व विसरून जातात. अश्याप्रकारची माणसे आपणाला सर्व क्षेत्रांत दिसतात. हे लोक दुस-यांना मदत करण्याऐवजी स्वतःचेच खिशे भरतात. ते फक्त स्वतःच्याच भल्यासाठी जगतात. आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने अश्या लोकांविषयीची तुलना, “एका माणसाचे दोन मुलगे” ह्या बोधकथेद्वारे केली आहे.
ह्या बोधकथेत दोन प्रकारच्या व्यक्ती प्रस्तूत केल्या आहेत. ह्या दृष्टांतामध्ये दोघा मुलांची मनोवृत्ती चांगली नव्हती परंतु जो धाकटा मुलगा असतो त्याला नंतर कळून चुकले की त्याने वडीलांच्या आज्ञेचा भंग केलेला आहे म्हणून तो पश्चाताप करतो आणि वडीलांची आज्ञा पाळतो.
इथे प्रभू येशू यहूदी लोक व जकातदार ह्यामध्ये असलेली तुलना दर्शवली आहे. यहूदी लोकांनी ईश्वराच्या नियमांचे पालन केले नाही म्हणून ते देवाच्या शिक्षेस पात्र ठरले आहेत परंतु जे पापी लोक होते त्यांनी त्यांच्या जीवनाचा कायापालट करून देवाच्या शिक्षेस मुकले आहेत. म्हणून आपण इतरांच्या वाईट कृत्यांकडे लक्ष न देता ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालावे आणि हाच मार्ग आहे सु:खदायी जीवन जगण्याचा.
जर आपण सत्याच्या म्हणजेच देवाच्या मार्गावर आहोत तर आपण दुस-यांचे ऐकू नये कारण ज्याप्रकारे चांगले शब्द आपणाला प्रेरणा देतात त्याचप्रमाणे वाईट शब्द व विचार आपला आत्मविश्वास कमजोर करतात. म्हणून आपण काय ऐकायचे व काय नाही ह्यावर आपण विचार केला पाहिजे म्हणूनच असे म्हणतात: “ऐकावे जनांचे पण करावे मनाचे”.
२. अनेकदा आपण देवालाच दोषी ठरवतो. जीवनामध्ये घडणा-या सर्व वाईट गोष्टी देवामुळेच घडतात असा आपला विचार असतो. पण आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल सांगतो की देवाचा न्याय सर्वांसाठी समान आहे. प्रत्येकाच्या दुष्कृत्यामुळे त्यांचा नाश होतो व सत्कृत्यामुळे तारण होते. म्हणून आपण पापमय जीवनाचा त्याग करून धार्मिकतेच्या मार्गावर चालले पाहिजे. अनेकदा आपण वाईट गोष्टी, विचार व कृत्ये सोडण्यास तयार होत नाही. कधी-कधी दुष्कृत्य सोडण्यास आपण जास्त वेळ लावतो तर कधी प्रयत्नच करीत नाही. आणि मग असा प्रसंग आपल्यासमोर उभा राहतो की आपल्याला बदलण्याची इच्छा असते परंतु वेळ मात्र निघून गेली असते.
जर आपण देवाची आज्ञा पाळून धार्मिकतेच्या मार्गावर चाललो तरच समाज्यामध्ये ऐकता, प्रेम,बंधूभाव, सेवा, नम्रता व लीनता दिसून येणार. दुस-या वाचनात संत पौल सांगतो की आपली जी मनोवृत्ती आहे ती ख्रिस्तासारखी असली पाहिजे. ख्रिस्तासारखे आपण देखील लीन झालो पाहिजे. कारण येशू ख्रिस्त हा ईश्वर असूनही आपणामध्ये जन्म घेऊन दासाचे रूप धारण केले व शेवटी क्रुसावर मरून आपणाला पापमुक्त केले.
जगामध्ये जे पहिले पाप आदाम व ऐवा ह्यांच्याकडून घडले ते म्हणजे आज्ञाभंग होय. त्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही म्हणून पापांचे दुष्परिणाम त्यांच्या जीवनात एकामागोमग एक यायला लागले. आजच्या युगामध्ये देखील आज्ञाभंग होताना दिसून येते. प्रत्येक कुटुंबात, समाजात व देशात होणा-या लढाई, मारहाणी, भेदभाव ह्या सर्वांचे मूळ कारण आज्ञाभंग होय.
म्हणून आजच्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना येशूख्रिस्ताचे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर ठेवून जीवनामध्ये विनम्रता, लीनता, सेवाभाव, क्षमा, प्रेम व त्यागाची वाट निवडून ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया व ईश्वराचे प्रेम दुस-यापर्यंत पोहचवून आपले जीवन धन्य करावे म्हणून प्रार्थना करूया.   


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रेमळ पित्या, आमची प्रार्थना ऐक.
1.     ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांनी स्वतः सत्याच्या मार्गावर चालून इतरांना सत्याच्या मार्गावर चालण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.     सर्व ख्रिस्ती भाविकांनी स्वार्थाचे जीवन सोडून इतरांच्या अडचणीत त्यांना हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
3.     सर्व युवक-युवती व लहान मुलांनी त्यांच्या आईवडिलांच्या आज्ञेप्रमाणे वागावे व जीवनात चांगल्या गोष्टी आत्मसात करून वाईट गोष्टी टाळाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
4.     आपण सर्वांनी येशू ख्रिस्तासारखे सेवाभावी आणि विनम्र जीवन जगावे व देवाने दिलेल्या सर्व देणग्यांचा योग्य वापर करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
5.     थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा ईश्वर चरणी समर्पित करूया.   
           
  













































































































































































































































































































































































































































Tuesday 16 September 2014

 Reflections for Homily By: Allwyn Gonsalves






सामान्य काळातील पंचविसावा रविवार
दिनांक: 21/09/2014
पहिले वाचन: यशया; ५५:६-९
दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस पत्र; १:२०-२४,२७
शुभवर्तमान: मत्तय; २०:१-१६

मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय?








प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील पंचविसावा रविवार साजरा करीत आहे, तसेच आपणा सर्वांना जागतिक शांतीसाठी विशेष प्रार्थना करण्यासाठी आवाहन करीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात प्रवक्ता यशया आपल्याला सांगतो की, आपण देवाजवळ गेले पाहिजे, म्हणजे तो आपल्याला क्षमा करील. देवाच्या कल्पना ह्या आपल्या कल्पना नाहीत, त्याचे मार्ग हे आपले मार्ग नाहीत. तर दुस-या वाचनात संत पौल फिलिप्पीकरांस लिहिलेल्या पत्रातून सांगतो की, माझे जगणे किंवा मरणे हे फक्त ख्रिस्तासाठीच आहे. माझ्याद्वारे ख्रिस्ताचा महिमा केला जाईल. तसेच ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असे आचरण ठेवण्यास आपणा सर्वांना तो आवाहन करत आहे.   
संत मत्तयच्या शुभवर्तमानातून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना दाखल्याद्वारे सांगतो की, स्वर्गाच्या राज्यात सर्व लोक सारखे आहेत, कोणीही उच्च व निच्च नाही.
आजच्या ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असताना आपल्याला संत पौलाप्रमाणे जीवन जगता यावे तसेच व जगात शांती नांदावी म्हणून प्रार्थना करुया.

पहिले वाचन (यशया; ५५:६-९):

प्रवक्ता यशया इस्त्राएली जनतेला विनवणी करत सांगतो की, देवाचा शोध करा, देवाजवळ येण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला देवाजवळ जायचे असेल तर पापी माणसाने त्याचे अनैतिकतेचे मार्ग बदलले पाहिजेत. तसेच यशया सांगतो की, पापी माणसाने न घाबरता आपल्या पापांची क्षमा मागितली तर प्रभू परमेश्वर क्षमा करतो, कारण प्रभू परमेश्वर हा त्याच्या क्षमेसाठी सदोदीत तयार असतो. जरी देव अनंत (infinite) आणि श्रेष्ठ (transcendent) तसेच आपल्या आकलनाच्या पलीकडे  असला तरी तो आपल्या जवळ येतो व आपला खरा मित्र म्हणून आपल्याबरोबर तो जगात वावरत असतो.
तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा: ह्या ओवीद्वारे प्रवक्ता यशया सांगतो की, देव हा सदोदीत आपल्या सभोवताली असतो, परंतू आपले जीवन ह्या भूतलावर मर्यादित आहे, त्यामूळे ह्या थोड्या वेळात देव एका पित्याप्रमाणे किंवा एका मदतगारासारखा आपल्या जोडीला सदोदीत असतो. म्हणून ह्या थोड्या वेळात आपण देखील देवाच्या सानिध्यात जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दुर्जन आपला मार्ग सोडो: प्रवक्ता यशया इस्त्राएली लोकांना सांगतो की, जर आपल्याला देवाजवळ जायचे असेल तर प्रत्येक पापी माणसाने त्याच्या वाईट मार्गाचा त्याग केला पाहिजे. त्यांनी आपली वाईट वागणूक, वाईट विचार आणि वाईट ध्येय बदलले पाहिजेत जेणेकरून आपण देवाच्या जवळ येऊ शकतो. जर पापी मनुष्य आपल्या पापासाठी प्रायश्चित करण्यास तयार नसेल, तर देव त्याला त्याच्या पापांची क्षमा करणार नाही. परंतु जर पापी मनुष्य आपल्या पापांची क्षमा मागत असेल तर देव आंनदाने व उत्साहाने त्या माणसाला पापमुक्त करतो व त्याच्या जवळ येतो.
माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत: पापी मनुष्य विचार करतो की, माझे पाप इतके वाईट आहे की प्रभू परमेश्वर देखील मला माझ्या पापाची क्षमा करणार नाही. परंतू परमेश्वर म्हणतो, तुमच्या विचारांना, प्रेमाला आणि मायेला अंत आहे, पण माझ्या विचारांना, प्रेमाला आणि मायेला अंत नाही. कारण माझे विचार हे तुमच्या विचारांपेक्षा खूप वेगळे आहेत. त्याचप्रमाणे तुमचा मार्ग हा माझ्या मार्गापेक्षा खूप निराळा व वेगळा आहे.
आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग व कल्पना तुमच्या मार्ग व कल्पनाहून उंच आहेत: ज्याप्रमाणे आकाश हे पृथ्वीपेक्षा चांगले आहे व वरच्या दर्जाचे आहे, त्याचप्रमाणे माझा मार्ग व माझे विचार हे तुझ्या मार्गापेक्षा व विचारापेक्षा श्रेष्ठ आहेत.

दुसरे वाचन (फिलिप्पिकरांस पत्र; १:२०-२४,२७):

संत पौलाने ज्यावेळी फिलिप्पिकरांस पत्र लिहिले त्यावेळी ते रोममध्ये कैदेत होते. संत पौलाचे फिलिप्पिकरांबरोबर नाते फार चांगले होते, तेथील लोकांनी त्याला त्याच्या मिशनरी प्रवासासाठी खूप मदत केली होती, त्यामुळे त्याने हे पत्र लिहिले होते. संत पौल आपल्या कामाविषयीची माहिती फिलिप्पिकरास सांगतो. तसेच त्यांना उपदेश करतो की तुम्ही विश्वास बळकट करा व नतमस्त जीवन जगा.
माझ्या शरीराने ख्रिस्ताचा महिमा होईल: संत पौल फिलिप्पिकरांस सांगतो की, मला माहित नाही की माझे मरण कैदेत होईल किंवा माझी सुटका केली जाईल. दोन्ही पर्यायामध्ये मी येशू ख्रिस्ताचा गौरव व आदर करणे जरूरीचे मानतो. पुढे तो सांगतो की जर मला मरण यायचे असेल तर मी त्याचा आदराने स्विकार करेन आणि जर माझी सुटका झाली तर येशू ख्रिस्ताचे नाव व शुभर्वतमान जगाच्या कानाकोप-यात पसरविण्याचा प्रयत्न करेन.
जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे: संत पौल फिलिप्पिकरांस सांगतो, जर मी जगलो तर माझे जीवन ख्रिस्तासाठी अर्पण करणार, आणि जर मला मरण आले तर त्याचा लाभ आहे.
कोणते निवडावे हे मला समजत नाही: संत पौल फिलिप्पिकरांस सांगतो की मृत्युची मागणी करावी की ख्रिस्ताबरोबर जीवन जगण्याची मागणी करावी ह्यामध्ये मी गोंधळलेलो आहे, परंतू देहात राहण्यापेक्षा मरणे मला फार बरे होईल. तरी मी देहात राहणे हे तुम्हांकरिता अधिक आवश्यक आहे.
ख्रिस्ताच्या सुवार्तेला शोभेल असे जीवन जगा: संत पौल पुढे सांगतो की, मला मरण येऊ दे किंवा जीवनदान मिळू दे, ह्याचा विचार तुम्ही करू नका. परंतू तुम्ही तुमचे ख्रिस्ती जीवन चांगल्याप्रकारे जगत राहा व खरे ख्रिस्ती असल्याचे तुम्ही सिद्ध करून दाखवा, हीच तुमच्याकडून माझी एक अपेक्षा आहे.

शुभवर्तमान (मत्तय; २०:१-१६):

दररोजच्या जीवनामध्ये घडणा-या घडामोडीचे स्पष्टीकरण देण्यासाठी येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनात वेगवेगळ्या दाखल्याचा वापर केला. आजच्या शुभवर्तमानातदेखील येशू ख्रिस्ताने एक दाखला दिला आहे. जो येशू ख्रिस्ताने स्वर्गाचे राज्याचे वैशिष्ट पटवून देण्यासाठी आपल्या शिष्यांना सांगितला आहे.
मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि कामगारांची निवड केलीः त्यावेळेस अशी पध्दत होती की रोज सकाळी सर्व कामगार शहराच्या आणि गावाच्या एका कोप-यात एकत्र जमा होत. त्यांनतर शेतकरी किंवा द्राक्षामळ्याचे मालक येऊन, त्यांच्या कामासाठी काही माणसे गोळा करीत व त्यांच्या पगाराविषयी ठराव करून त्यांना कामासाठी घेऊन जात.
कामगाराबरोबर पगाराचा ठराव केलाः येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो की, द्राक्षमळ्याचा मालक आला व त्याने काही माणसाबरोबर संपूर्ण दिवसासाठी एक दिनारी इतका मोबदला देण्याचा ठराव केला.
जे योग्य ते मी तुम्हांला देईनः पुढे येशू ख्रिस्त सांगतो की, वेगवेगळ्या वेळेला त्या मालकाने आणखी काही कामगार आपल्या द्राक्षमळ्यात कामाला पाठवून दिले, परंतू त्यांच्या पगाराविषयीचा ठराव केला नव्हता. त्यांना आश्वासन दिले होते की तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला जरूर दिला जाईल.
शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतीलः त्यानंतर मालकाने आपल्या चाकराला सांगून सर्व कामगारांना त्यांचा पगार घेण्यास बोलावले. मालकाने कामावर जे सर्वात शेवटी रुजू झाले होते त्यांना बोलावून त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून एक दिनारी दिली. त्याचप्रमाणे त्याने सर्व कामगारांना एक दिनारी दिली, परंतु ज्या कामगारांनी संपूर्ण दिवस ऊन्हात राहून काम केले, त्यांना फार वाईट वाटले. त्यामुळे त्यांनी मालकाला प्रश्न केला, ‘आमच्या कामाचा मोबदला आणि जे कामगार उशिरा आले त्यांच्या कामाचा मोबदला सारखा कसा?, तुम्ही आमच्याशी अन्याय करता’ त्यावर मालक त्यांना म्हणाला, ‘मी तुमच्यावर कोणताही अन्याय करत नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर तुमच्या पगाराचा ठराव केला होता आणि तो तुम्हाला मिळाला आहे. माझ्या औदा-र्याद्वारे जे कामगार उशिरा आले त्यांना देखील मी तेवढाच पगार दिला आहे आणि मला तो देण्याचा पूर्ण हक्क आहे, तुम्ही तुमच्या कामाचा मोबदला घेऊन निघून जा.’ त्यानंतर येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो, ‘जे शेवटचे ते पहिले आणि पहिले ते शेवटचे.’

बोध कथाः 
      
एकदा एका श्रीमंत माणसाने एका उत्तम चित्रकाराला शांतीचे प्रतीक म्हणून प्रसिध्द होईल असे चित्र काढण्यास सांगितले. चित्रकाराने खूप विचार केल्यानंतर एक चित्र रंगवले त्यामध्ये त्याने एका गावाचे दृश्य दाखवले, तसेच गाय, आकाशात उडणारे पक्षी व गावातील लहान घरे दाखवली. चित्रकाराने ते चित्र त्या श्रीमंत माणसाला दिले, पंरतु तो माणूस उदास झाला व म्हणाला, हे चित्र शांतीचा संदेश देत नाही म्हणून परत जाऊन नवीन चित्र काढ.
चित्रकाराने परत जाऊन शांतीचा संदेश देणा-या चित्राविषयी विचार केला. तद्नंतर काही दिवसाने त्याने दुसरे एक चित्र काढले. त्या चित्रात सुंदर बाई आपल्या लहान बालकाला झोपवत होती आणि आपल्या बाळाला पाहून हसत होती. चित्रकाराला वाटले की हे शांतीचे एक उत्तम चित्र असू शकते पण जेव्हा ते चित्र श्रींमत माणसाला पंसत पडले नाही व त्या माणसाने दुसरे एक चित्र काढण्यास सांगितले त्या वेळेस मात्र चित्रकाराला खूप राग आला व त्याला आपल्या कला गुणांना नाकारल्या सारखे वाटले.
काही महिन्यानंतर चित्रकाराने एक चित्र काढले, आणि तो स्वतः विचार करू लागला की हे एक उत्तम शांतीचा संदेश देणारे चित्र असू शकते. ते चित्र त्यांने त्या श्रीमंत माणसाला दाखवले, थोडा विचार केल्यानंतर त्याने त्या चित्राचा स्वीकार केला. त्या चित्रात जोराचा वारा व पाऊस पडत होता. वीज व ढंगाचा गडगडाट होत होता, समुद्राच्या लाटांना फार वेग आला होता. ह्या सर्व दृश्यामध्ये एक छोटा पक्षी आपल्या घरट्यामध्ये शांतपणे झोपला होता.  

मनन-चिंतनः

१)                 देवाचे औदार्य: आजच्या पहिल्या वाचनात प्रवक्ता यशया, आपल्याला सांगतो की देवाचा मार्ग हा आपल्या मार्गापेक्षा खूप निराळा आहे. कधी-कधी तो मार्ग आपल्या विचाराप्रमाणे किंवा मनाप्रमाणे होत नसतो तर देवाच्या मनाप्रमाऩे होत असतो. आपले विचार मर्यादित, स्वार्थी असतात. आपले मार्ग अरुंद, काळोखी असतात. जेव्हा आपण स्वतः विचार करून थकतो आणि आपला मार्ग चुकतो, तेव्हा आपल्या समस्यांवर आपण देवाला विचार करू द्यावा. कधी-कधी आपण देवाला आपल्या कल्पनेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण विसरतो की देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेसारखे व त्याच्या कल्पनेनुसार निर्माण केले आहे व आपल्याला देवासारखे जीवन जगण्याचे आव्हान दिले आहे.
आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका सुदंर उता-याचे वर्णन करताना सांगतो की, देवाचे औदार्य व प्रेम अप्रतिम आहे. तसेच देवाची दया, करूणा व प्रेम सर्व लोकांवर सारखेच आहे. तो कोणाचा भेदभाव करत नाही. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की, कामगार हे रागावले आहेत आणि आपल्या मालकाबरोबर वाद घातला आहे, कारण जे कामगार उशिरा आले होते त्यांचा पगार व ज्यांनी संपूर्ण दिवस काम केले त्यांना पगार सारखा दिल्याबद्दल त्यांनी वाद निर्माण केला होता. त्यावेळी मालक त्यांना म्हणाला, मी तुमच्यावर कोणताही अन्याय करत नाही, कारण तुमच्या ठरावाप्रमाणे तुम्हाला पगार दिला आहे. माझा पैसा मी कसा वापरावा व कोणाला दयावा ह्याचे मला संपूर्ण हक्क आहे. त्यानंतर तो मालक म्हणाला माझ्या ह्या औदार्यदानामुळे तुम्ही रागावले आहात का? देवाचे औदार्य हे मानवाच्या औदार्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले असते. मानवी मनाला देवाचे औदार्य समजण्यापलिकडे आहे. कारण देवाचा मार्ग हा आपल्या मार्गापेक्षा निराळा आहे. आजच्या दाखल्याद्वारे आपल्याला कळून येते की, स्वर्गाचे राज्य हे सर्वांसाठी खुले आहे. आपल्या सर्वांना स्वर्ग राज्यात वाटा आहे, कारण देवाचे आपल्या सर्वांवर अपार प्रेम आहे. देवाच्या ह्या प्रेमाला कोणतीही मर्यादा नाही.
ज्याप्रमाणे उशिरा आलेल्या कामगारांना मालकाने विचारले की, तुम्ही संपूर्ण दिवस येथे का ऊभे आहात? ते म्हणाले की त्यांना कोणीही कामासाठी बोलावले नाही. येशू ख्रिस्ताने कसलाही विचार न करता (विशेषता त्यांचा काही उपयोग नव्हता, ते आळशी माणसे होती किंवा वेगळ्या जाती-जमातीचे होते) त्यांना कामासाठी बोलाविले. ते द्राक्षमळ्यात काम करण्यास तयार झाले होते. त्यांनी किती वेळ काम केले ह्यावर त्यांचा पगार आधारला नव्हता तर त्यांचे काम करण्याची क्षमता व आतुरता आणि मालकाच्या हाकेला होकार देऊन काम करण्याची तयारी दाखवली त्याबद्दल त्यांना मोबदला दिला जाईल ह्याची हमी मालकाने त्यांना दिली होती. अशाप्रकारे कामगार द्राक्षमळ्याचे भाग बनले व देवाने त्याच्या राज्यात सर्वांचा सारखा न्याय-निवाडा केला आहे. देव कोणत्याही मनुष्याला आपल्या स्वर्ग राज्याचे निमंत्रण कधीपण आणि कोठेपण देत असतो. परंतु जेव्हा आपण त्या निमंत्रणाला होकार देतो, तेव्हा आपला स्वर्ग राज्यात सामावेश केला जातो.

२)                 जागतिक शांती दिन: आज देऊळ माता जागतिक शांती दिन साजरा करत आहे. शांती पुष्कळ लोकांच्या ओठावर असते, पण अगदी थोड्या लोकांच्या अंतःकरणात ती आढळते. सारे जग शांतीसाठी भुकेलेले आहे. आपण सर्वजण शांती मिळविण्यासाठी खूप धडपडत असतो, कष्ट करीत असतो. संत आगुस्तीन म्हणतो, हे प्रभो आमची अंतःकरणे तुझ्यासाठी निर्माण केली आहेत. आणि तुझ्याकडे आल्यावाचून आमच्या अंतःकरणाला शांती मिळणार नाही. खरी शांती परमेश्वराच्या सान्निध्यात, परमेश्वराच्या सहवासात, परमेश्वराच्या शब्दांमध्ये आहे. म्हणूनच शांतीचा शोध आपण शब्दात व सहवासात करायला हवा. माशाचे खरे सुख पाण्यात असते, त्याचप्रमाणे आपले सुख परमेश्वराच्या सहवासात आहे. जसा मासा पाण्याबाहेर तडफडतो तसे आपण देखील देवापासून दूर गेल्यानंतर तडफडत असतो.
मत्तयच्या शुभवर्तमानात अध्याय ५ मध्ये प्रभू ख्रिस्ताने आठ धन्यवाद दिले आहेत. हे धन्यवाद वाचून त्यांच्यावर चिंतन करून ते आचरणात आणून अनेक लोकांना मनःशांती प्राप्त झाली आहे. महात्मा गांधी ज्या वेळेला संकटात असत, निराश होत असत त्यावेळेला हे धन्यवाद वाचून त्यांना मनःशांती प्राप्त होत असे.
आजच्या ह्या जागतिक शांतीदिनी आपल्या राष्ट्रामध्ये, गावामध्ये, कुटुंबामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित व्हावी म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे शांतीदाता प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे.
  1. आज आपण आपल्या पवित्र ख्रिस्तसभेसाठी विशेष प्रार्थना करूया. आपले पोप, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभागिनी व धर्मबंधू यांना प्रभुची सुवार्ता पसरविण्यासाठी भरपूर असा आशिर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व स्वतःला नाकारून जगातील आनंदापासून वंचित राहून जागतिक मोह-मायेचा त्याग करून आपण शुभवर्तमानाच्या मुल्यांप्रमाणे जगावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  3.  हे प्रभू परमेश्वरा, जी कुटूंबे तुझ्यापासून दुर गेली आहेत व तुझ्या शब्दाचा मान करत नाहीत, त्या सर्वांवर तुझा पवित्र आत्मा पाठव व तुझी कृपेने त्यांचे मनपरिवर्तन व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करतो; ह्या आपत्तीतून बाहेर येऊन नवीन जीवन सुरु करण्यास तू त्यांना मदत कर तसेच नव्याने जीवन जगण्यास त्यांना भरगोस अशी मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया