Thursday 31 May 2018



Reflection for the Homily of Feast of Body and Blood of Christ (03/06/2018) By Br. Godfrey Rodriques







प्रभू येशूच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा





दिनांक: ३/०६/२०१८
पहिले वाचन: निर्गम: २४: ३-८
दुसरे वाचन: इब्री ९: ११-१५
शुभवर्तमान: मार्क १४: १२-१६२२-२६

प्रस्तावना:

     आज आपण प्रभू येशूच्या शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहोत. भाकररूप ख्रिस्त शरीर हे ख्रिस्ती धर्मातील एक महान रहस्य आहे. ख्रिस्ताचे आम्हाला दिव्य दर्शन घडावे, आमचे आत्मिक पोषण व्हावे, त्याच्या मायेचा ओलावा आम्हांला सदैव मिळावा, त्याची सोबत आम्हांला नित्य लाभावी म्हणून ख्रिस्त भाकररूप बनला.
     निर्गम या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, इस्त्रायल लोकांनी देवाचे वचन ऐकावे व त्याच्या आज्ञा पाळाव्यात म्हणून मोशे रक्त शिंपडून करार करतो. इब्री लोकांस लिहिलेल्या दुस-या पत्रातून घेतलेल्या वाचनात, ‘ख्रिस्ताने स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानांत गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविलीअसे ऐकतो. तर शुभवर्तमानात ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना भाकर व द्राक्षारस देऊन स्वतःला प्रकट केले, असा बोध करण्यात येतो.
प्रभू येशूच्या शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करत असताना आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा आणि रक्ताचा एक घटक होता यावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये भक्तिपूर्वक सहभागी होऊया.

पहिले वाचन: निर्गम: २४: ३-८

     इस्त्रायली लोकांनी मिसर देश सोडल्यापासून बराच काळ लोटला होता. या काळात देवाने त्यांचा सांभाळ करून त्यांना नियमशास्त्र दिले. देवाने मोशेद्वारे अभिवचन देऊन लोकांनी पवित्र्यात राहावे म्हणून मार्गदर्शन केले व मोशेने रक्त शिंपडून देव व त्याची जनता ह्यामध्ये करार केला. देवाचे आज्ञापालन अंतकरणपूर्वक केले पाहिजे. इस्त्रायली लोकांना लीन व नम्र करण्यासाठी रानातला अनुभव त्यांना दिला होता आणि हा अनुभव खडतर असला तरी तोही एक देणगीदायकच होता व लोकांनी या अनुभवाचे स्मरण करावे अशी योजना केली होती. मोशेने यज्ञ व अन्नार्पण करण्यासाठी युवकांना पाचारण केले. मांस व रक्त अर्पण करून देवाला प्रसन्न करण्यासाठी मोशेने नियम तयार केले.

दुसरे वाचन: इब्री ९:११-१५

     ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक होऊन आला. ख्रिस्ताने स्वतःचे समर्पण केले. त्याने आपला आत्मयज्ञ करून व आपले शरीर व रक्त बलीदान करून मोशेने दिलेले यज्ञमार्ग रद्द केले. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्वकाही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून क्षमा होत नाही. बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच ख्रिस्त परमपवित्रस्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली.
ख्रिस्त हा एकदाच युगांच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला. ज्या अर्थी माणसांना, एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेविले आहे, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.

शुभवर्तमान: मार्क १४: १२-१६, २२-२६

     आपल्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करण्याची येशूची उत्कट इच्छा होती. भोजन कोठे करायचे ते त्याने सांगितले व आज्ञा दिल्या. तो आपला जीव यज्ञ म्हणून अर्पिण्यास सिद्ध झाला होता. तो काय करणार होता त्याचे स्मरण त्याच्या शिष्यांनी सदोदित ठेवावे म्हणून त्याने हे भोजन स्थापिले. त्याचे शरीर त्याने अर्पिले. त्याच्या रक्ताद्वारे नवा करार केला गेला. त्याच्या कृतज्ञतेचे स्मरण आपण करावे व त्याची प्रीती आपणास मिळावी म्हणून तो म्हणतो, ‘हे माझ्या आठवणीसाठी कराम्हणून लोकांच्या पापासाठी प्रतिदिनी यज्ञ करणे योग्य नाही कारण त्याने स्वतःला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच अनंतकालीन परिपूर्ण असे बनले आहे.

बोधकथा:

       १४ ऑगस्ट १७३० रोजी इटलीतील सिएना येथील कॅथोलिक लोक सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये सण साजरा करत असताना चोरांच्या टोळीने चर्च मध्ये प्रवेश करून चोवीस सोनेरी सिबोरियम चोरून नेले ज्याच्यात अभिषिक्त केलेले ख्रिस्तप्रसाद (ख्रिस्ताचे शरीर) होते.
       दोन दिवसांनंतर, कोणीतरी सिएनामधील एका दुसऱ्या चर्चमधील दान पेटीमधून काहीतरी पांढरे बेशुद्ध असल्याचे पाहिले. धर्मगुरुनी पेटी उघडली आणि पाहिले तर त्यांना अभिषिक्त केलेले ख्रिस्त शरीर सापडले. ख्रिस्तप्रसाद (ख्रिस्ताचे शरीर) साफ केल्यावर,  नवीन सिबोरियममध्ये ठेवण्यात आले आणि पुनर्निर्माण आणि प्रार्थना करण्यासाठी सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये परत नेले.
      ख्रिस्तप्रसाद (ख्रिस्ताचे शरीर) गलिच्छ असल्यामुळे, धर्मगुरुनी त्यांचे  सेवन करण्यास नकार दिला व त्यांना तसेच  ठेवावे अशी आज्ञा केली. पुढील काही वर्षात त्यांना कळून चुकले कि ,ख्रिस्तप्रसाद (ख्रिस्ताचे शरीर) खराब होत नाही, तर प्रत्यक्षात ते ताजे दिसते. एवढेच नाही तर 285 वर्षांनंतर आजही, इटलीतील सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये ते आपल्याला पाहायला भेटते. १४ ऑगस्ट १७३० पासून तर आज पर्यंत इटली राज्यात खूप अशी युद्धे होऊन गेली व त्यात नामवंत अश्या वस्तूंचा नाश होऊन गेला, परंतु त्या अभिषिक्त केलेल्या ख्रिस्त प्रसादाचा नाश आजही झाला नाही.

मननचिंतन :
     पूर्वी लोकांची अशी श्रद्धा होती की, माणसाचे जीवन हे त्याच्या रक्तात असते. त्यामुळे ते कुठल्याही मांसाचे रक्त प्राशन करत असत. रक्त हे त्यांच्यासाठी पावन होते. त्यामुळे रक्ताचे अर्पण केल्यावर देव प्रसन्न होतो अशी त्याची श्रद्धा होती. त्यामुळे पशुबळी दिले जात असत आणि त्यासाठी अनेक कारणे असत. देवाला प्रसन्न करून अनिष्टापासून टाळण्यासाठी. देवाकडून काहीतरी मागण्याच्या हेतूने. तसेच दिलेल्या वरदानांमुळे देवाचे आभार मानण्यासाठी उदा. चांगलं पीक आल्यामुळे, ते विविध देवांना रक्त सांडून यज्ञ करीत असत. हे सर्व करण्यासाठी लोकांनी याजक नेमलेले असत. तसेच कुठलाही करार करण्यासाठी रक्त सांडले जात असे. दोन व्यक्ती कुठलाही करार करण्याअगोदर आपल्या बोटातून थोडं रक्त सांडून ते मिसळत व करार झाल्याचे साध्य होत असे.
     आजच्या वाचनात आपण ऐकतो की, मोशेने देवाबरोबर करार करून घेण्यासाठी प्राण्यांचा बळी देऊन त्यांचे रक्त शिंपडले ते प्राणी निरागस असे. तसेच शुभवर्तमानात आपण ऐकतो की, प्रभू स्वतःला समर्पण करतो. ख्रिस्त स्वतः सार्वकालिक जीवन देणारा होता. हे जीवन त्याच्यावर विश्वास ठेऊन प्राप्त होते. सार्वकालिक जीवन जगाला देता यावे यासाठी ख्रिस्ताला वधस्तंभावर मरण पत्कारावे लागले, त्याचा देह वधस्तंभावर खिळला गेला. त्याचे रक्त बहुतांच्या खंडणीसाठी त्या वधस्तंभावर वाहण्यात आले.
     अर्पणाच्या कोकराचा वध केल्यावर ते रक्त वेदीच्या सभोवती ओतीत व कोंकराचा देह सेवन करीत; ‘सेवन करणेआणि पिणेहे उद्गार ख्रिस्ताच्या मरणाद्वारे तो जे सार्वकालिक जीवन देऊ शकणार होता याचे सूचक आहेत. या अर्थाने जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळते.
     ख्रिस्ती धर्मात मिस्साबलीदानाला अतिशय महत्व आहे. ख्रिस्ती लोकांसाठी मिस्साबलीदानातून जीवनासाठी आवश्यक असलेले दान मिळते व श्रद्धा बळकट होऊन आध्यात्मिक जीवनात वाढ होते आणि त्यामुळेच ख्रिस्तसभेत ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण आपण साजरा करतो. ह्या सणाची सुरुवात सर्वप्रथम बेल्जियम ह्या देशात झाली. पोप उर्बन चौथे ह्यांनी संपूर्ण कॅथलिक देऊळमातेत हा सण साजरा करण्यास सातशे वर्षापूर्वी सुरुवात केली.
     भाकररूप ख्रिस्त शरीर हे ख्रिस्ती धर्मातील एक महान रहस्य आहे. रासायनिक प्रयोग शाळेत जे सिद्ध करता येत नाही ते आपल्याला आत्मिक प्रेरणेने त्याचे अस्तित्व मान्य करावे लागते ह्यालाच ख्रिस्ती श्रद्धा म्हणतात. ख्रिस्ताचे आपल्याला दिव्य दर्शन घडावे, आपले आत्मिक पोषण व्हावे, त्याच्या मायेचा ओलावा आम्हांला सदैव मिळावा, त्याची आम्हांला नित्य सोबत लाभावी म्हणून ख्रिस्त भाकररूप बनला. भाकररूपी ख्रिस्त आपल्या दृष्टीच्या पलिकडे आपल्या स्पर्शाच्या पलिकडे, आपल्या इंद्रियांच्या पलिकडे आहे तरी आपली श्रद्धा आहे की, भाकर ही ख्रिस्त-शरीर आहे. ग्रहण इंद्रिया ही हो गुढ, गोचर केवळ श्रद्धेलाइंद्रियाला गुढ आणि बुद्धीला अगम्य असलेल्या ख्रिस्ताचे हे शरीर आम्ही श्रद्धारुपी डोळ्यांनी पाहत आहोत.
आज आपण ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण साजरा करीत असताना आपण त्याचा स्वीकार करण्यास आणि त्याच्याशी एकजीव होण्यास पात्र ठरावे म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या शरीर व रक्ताद्वारे आमचे नितांत पोषण कर.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व इतर प्रापंचिक या सर्वांवर देवाचा विशेष आशिर्वाद यावा व त्यांना त्यांच्या पवित्र कार्यात प्रभूचे मार्गदर्शन व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील सर्व नेत्यांवर व अधिका-यांवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा, त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास परमेश्वराने मदत करावी तसेच सर्व वाईट वृत्तींपासून  त्यांना दूर ठेवून चांगल्या मार्गावर चालण्यास सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज हा पवित्र सण साजरा करीत असताना आपण आपल्या शरीररूपी मंदिरात देवाला प्रथम स्थान द्यावे व आपले जीवन त्याच्याठायी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या धर्मग्रामात जे दु:खीत, पिडीत आहेत, तसेच जे असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा व नवजीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी थोडावेळ शांत राहून प्रार्थना करूया.  


Thursday 24 May 2018

Reflection for the feast of Most Holy Trinity  (27/05/2018) By: Br. Isidore patil












पवित्र आत्म्याचा सण

दिनांक: २७/०५/२०१८
पहिले वाचन: अनुवाद ४:३२-३४; ३९-४०
दुसरे वाचन: रोमकरास पत्र- ८:१४-१७
शुभवर्तमान: मतय् : २८:१६-२०




प्रस्तावना: 
“जय बापा, जय पुत्र, जय आत्म्या देवा
आशीर्वाद कृपेचा आम्हाला गा द्यावा; जय देव जय देव”

आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत आहोत. अतिपवित्र त्रैक्याचे रहस्य हे ख्रिस्ती श्रद्धेचा आणि जीवनाचा मुलभूत पाया आहे.
आजच्या पहिल्या वाचनात मोशे परमेश्वर हाच खरा देव आहे व सुखी समृद्धीने राहण्यासाठी त्याच्या आज्ञेचे पालन करा असे म्हणतो, तर दुसऱ्या वचनात संत पौल पवित्र आत्म्याचे महत्व पटवून देत आहे. शुभवर्तमानात पिता, पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्याच्या आज्ञेद्वारे आपल्या जीवनातील पवित्र त्रैक्याचे महत्व पटवून देत आहे.
अगदी प्रारंभापासून पवित्र त्रैक्याचे रहस्य हे ख्रिस्तसभेच्या जिवंत श्रद्धेचा मुलभूत घटक आहे. स्नानसंस्काराच्या श्रद्धेत, धर्मप्रचारात, धर्मशिक्षणात आणि प्रार्थनेत त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवत असते. उपासनेतही ह्या रहस्याचा समावेश आहे. ह्या रहस्याद्वारेच प्रभू येशु ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणाबरोबर असतो व हाच पवित्र त्रैक्याचा सहवास आपणाबरोबर सदा असावा म्हणून ह्या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: अनुवाद ४:३२-३४; ३९-४०

     पहिल्या वाचनात मोशे देवाने निवडलेल्या लोकांना त्यांचे जुने दिवस आठवण्यास सांगत आहे. जी महान कृत्य देवाने केली त्या सर्व कृत्यांची आठवण करा. पूर्वी ज्यांनी देवाचा शब्द ऐकला, सर्व साधारणपणे असा समज होता की ते मरत होते, परंतु देवाच्या निवडलेल्या लोकांनी देवाचा शब्द ऐकला ते जिवंत राहिले. जे देवाचे लोक आहेत तेच देवाचे महत कृत्य आणि देवाच्या प्रेमाचे साक्षीदार आहेत. म्हणून तो लोकांना सांगतो, देवाला विसरू नका. देव सर्वोच्च आहे; आणि त्याच्या शिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून देवाच्या आज्ञेप्रमाणे वागण्यास सांगत आहे. आणि जर देवाच्या आज्ञा पाळल्या तर देव तुम्हास सर्वकाही पुरवील.

दुसरे वाचन: रोमकरास पत्र: ८:१४-१७

     संत पौल सांगत आहे की पवित्र आत्म्याने आपल्याला चालविले पाहिजे. हा अनुभव आपण देवाची मुले आहोत अशी खात्री देतो. आपण एखाद्या गुलामगिरीत आहोत व या स्थितीत भीत-भीत वागायचे आहे असे समजू नका. देव आपला स्वर्गिय पिता आहे. आपण आनंदाने त्याच्या सहभागीतेत येऊन लहान मुलाप्रमाणे त्याच्याशी बोलू शकतो.
     आपण ख्रिस्ताबरोबर वारीस झालो आहोत आणि जर त्याच्याबरोबर गौरव प्राप्त करून घ्यायचे असल्यास आपण त्याच्यासाठी दु:ख सोसले पाहिजे. कारण जे ख्रिस्ताचे आहेत त्याचा जग व्देष करीलच.

शुभवर्तमान: मतय्: २८:१६-२०

     येशू ख्रिस्ताच्या पुन:रुत्थानानंतर काही दिवसांनी ११ शिष्य गालील प्रांतातील डोंगरावर गेले. या अगोदर येशू ख्रिस्ताची व त्यांची येरुशलेमेत भेट झाली होती. त्या डोंगरावर त्यांनी ख्रिस्ताला नमन केले. तरी कितेकांच्या मनांत संशय होता. प्रभू येशूला त्यांच्या मनातील संशय समजला. तो त्यांच्या जवळ त्यांच्याशी बोलू लागला. त्यांची दुर्बळता व भय प्रभूला माहित होते, कारण पुनरुत्थित प्रभू त्यांच्याबरोबर पूर्वीप्रमाणे राहत नसे. ख्रिस्ताने त्यांना स्व:ताच्या अधिकाराविषयी सांगितले. तो स्वर्गाचा व संपूर्ण पृथ्वीचा अधिकारी आहे. कैसर राजा किंवा सर्व धर्मपुढारयापेक्षा तो श्रेष्ठ अधिकारी आहे.
     या अधिकाराने, ख्रिस्ताने त्यांना आज्ञा दिली की शिष्यांनी सर्व लोकांस ख्रिस्ताचे अनुयायी करावे. हे काम, शिष्य, फक्त ख्रिस्ताची सुवार्ता सांगून पार पाडू शकतात. आणि जे ख्रिस्ताचे अनुयायी होण्याची इच्छा ठेवतात त्यांना पाण्याने बाप्तिस्मा देणे हे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले होते. देव जो पिता, देव जो पुत्र व देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाशी एकनिष्ठ राहण्याची ही साक्ष आहे. ख्रिस्त त्यांच्याबरोबर आत्म्याने सदासर्वदा राहणार.

बोधकथा:

संत अगुस्तीन पवित्र त्रैक्याचे रहस्य समजण्याचा प्रयत्न करत होते व ह्या रहस्यावर एकांतात विचार करण्यासाठी एक दिवस समुद्रकिनारी फेरफटका मारत होते. किनाऱ्यावर चालत असताना त्याला एक मुलगा किनाऱ्यावर खेळत असताना दिसला. तो काय करत आहे हे पाहण्यासाठी संत अगुस्तीन त्या मुलाजवळ गेले. त्या मुलाने किनाऱ्यावर एक छोटासा खड्डा केला होता व तो पाण्यापाशी जाऊन आपल्या ओंजळीत समुद्राचे पाणी घेत होता व ते पाणी त्याने केलेल्या खड्ड्यात ओतत होता. हे पाहिल्यावर संत अगस्तीन त्या मुलाला म्हणाला, ‘तू काय करत आहेस?’ तेव्हा तो मुलगा म्हणाला की, ‘मला संपूर्ण समुद्र ह्या खड्ड्यात रिकामा करायचा आहे.हे ऐकून संत अगुस्तीन स्मितहास्य देत म्हणाले, ‘ते कस काय शक्य आहे? एवढा मोठा अथांग सागर ह्या छोट्याश्या खड्यात रिकामा करणे अशक्य आहे.तेव्हा तो मुलगा म्हणाला, जर तुम्हाला वाटत असेल की, आपल्या बुद्धीसामर्थ्यापलीकडील हे पवित्र त्रैक्याचे रहस्य तुम्ही समजू शकता तर मी का नाही ह्या खड्ड्यात समुद्र रिकामा करू शकणार?’ एवढे म्हणून ते बाळ तिथून अदृश्य झालं, तेव्हा पवित्र त्रैक्याचे संपूर्ण रहस्य आपल्या बुद्धिचातुर्यापलीकडीचे आहे हे संत अगुस्तीनला समजले.

मनन चिंतन:

संत अगुस्तीनप्रमाणे कदाचित आपल्यालासुद्धा पवित्र आत्म्याचे रहस्य कसे आहे हे समजणार नाही परंतु आपण ते काय आहे ह्यावर विचार विनिमय करू शकतो. मनात प्रश्न येतो कि, देवाने हे पवित्र त्रैक्याचे रहस्य आपल्याला का दिले? कदाचित त्याचे कारण हे असू शकते: देवाने आपल्याला त्याच्या प्रतीरुपात निर्माण केले आहे. ह्या पवित्र त्रैक्याच्या रहस्याद्वारे जेवढे आपण देवाला समजू शकू तेवढे जास्त आपण आपल्या स्वत:ला समजू शकू. कारण प्रत्येक सर्व-साधारण माणूस हा आपल्या देवासारखा होण्याचा प्रयत्न करत असतो. जे भक्त रागवणाऱ्या व शिक्षा देणाऱ्या देवास भजतात ते सुद्धा लवकर शिक्षा करतात, जे प्रेमळ देवाला भजतात ते आपल्या जीवनातून प्रेम देतात, जे न्यायी देवाला भजतात त्यांच्यासाठी न्याय मिळणे व मिळवून देणे महत्वाचे असते. जसा देव तसे त्याचे भक्त. असे असेल तर आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न यायला हवा की, ‘हे पवित्र त्रैक्याचे रहस्य आपल्याला आपल्या देवाबद्दल तसेच आपणाबद्दल काय सांगत आहे?
पवित्र त्रैक्याच्या रहस्यातून आपल्याला समजते की, आपला देव हा विभक्त राहत नाही तर तो एकत्र राहतो. व आपल्याला सुद्धा एकाकी जगापासून दूर न राहता, आपल्या समाजात राहण्यास सांगतो. पवित्र त्रैक्यातील ऐक्य, समतोल, प्रीतीबंधुत्व अतुलनीय आहे. हे पवित्र त्रैक्य एक आदर्श कुटुंबाचे प्रतिक आहे. एक उत्तम कुटुंब कसं असावं ह्याचा आदर्श पवित्र त्रैक्य आपणासमोर ठेवत आहे.
खऱ्या प्रेमासाठी तिघांची गरज असते व हे खरे प्रेम कुटुंबात आढळते. कुटुंबात आई वडील व मुलं असे तिघे असतात. आपला देव आपल्याला आपल्या जीवनातील कुटुंबाचे महत्व प्रदर्शित करत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा एकमेकांत समन्वय राखून आपले कार्य व्यवस्थीत पार पाडतात. आपल्या देवाचे उदाहरण समोर ठेऊन आपण आपल्या कुटुंबात समन्वय राखणे गरजेचे आहे. कुटुंबात प्रत्येकाने स्वतःचे स्थान जाणून घेऊन आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे निरंतर पालन करणे गरजेचे आहे.
आपण सर्व देवाचे प्रतिरूप आहोत. जसे देवाचे खरे दैवीपण त्रैक्यात दिसून येते तसेच आपले खरे मानवी रूप त्रैक्यात दडलेले आहे. जेव्हा एखादा माणूस जगातील आपल्या इतर बांधवांशी व देवाशी नाते जोडतो तेव्हा देव, माणूस व त्याचे इतर बांधव ह्यामध्ये त्रैक्यात त्याचे खरे मानवी रूप दिसून येते. त्रैक्याचे जीवन हे परीपुर्णतेचे जीवन आहे, हे परीपुर्णतेचे जीवन जगण्यासाठी जीवनात आपल्या प्रत्येकाला देवाची व आपल्या इतर बांधवांची गरज आहे. पवित्र त्रैक्याचा हा आदर्श समोर ठेवून आपणसुद्धा आपले देवाबरोबर व आपल्या बांधवांबरोबर असलेले नाते दृढ करूया व खऱ्या जीवनाचा आस्वाद घेऊया. म्हणून आपण शेवटी म्हणूया: “हे रूप ईश्वराचे, हे रूप ख्रीस्ताचे, सर्वाहुनी पवित्र हा एक देवपुत्र.”

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे पवित्र त्रैक्या आम्हांला आमच्या कुटुंबातील व समाजातील एकरूपता वाढविण्यास मदत कर.

1. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्त बंधू-भगिनी, जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, त्यांची त्रैक्यावरील श्रद्धा बळकट व्हावी व इतरांनाही त्याच श्रद्धेत दृढ करण्यास त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.  आज पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत असताना त्रेक्यातील समन्वयातून आपण प्रेरणा घेऊन आपल्या कुटुंबात, धर्मग्रामात व समाजात समन्वय राखून सुखा-समाधानाने आपल्याला जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
3. ख्रिस्ती ह्या नात्याने जी श्रद्धा आम्हाला मिळाली आहे ती श्रद्धा अधिक दृढ करण्यास आम्हाला कृपा मिळावी व हीच श्रद्धा आम्हाला दुसऱ्यांना देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
4. लवकरच मुले नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात करणार आहेत. ह्या नवीन वर्षात अधिक जोमाने अभ्यास करून त्यांना त्यांचा सर्वांगीन विकास करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक कौटुंबिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.

Thursday 17 May 2018


Reflection for the homily of the Feast of Pentecost (20/5/2018) By Br. Amit D'Britto 




पेन्टेकॅास्टचा सण

दिनांक: २०/०५/२०१८
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: २: १-११
दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र १२: ३-७, १२-१३
शुभवर्तमान: योहान: २०: १९-२३




प्रस्तावना:

            आज देऊळमाता पवित्र आत्म्याचा सण साजरा करीत आहे. आजच्या दिनी शिष्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला व पवित्र आत्म्याच्या वरदानांनी परिपूर्ण होऊन त्यांनी प्रभूची सुवार्ता पसरविण्याच्या कार्यास सुरुवात केली.
     येशू ख्रिस्ताच्या क्रुसावरील मरणानंतर सर्व शिष्यांनी घाबरून स्वतःला एका खोलीत कोंडून ठेवले होते. येशूप्रमाणे छळ होऊन त्यांना देखील क्रूसावरील मरण सोसावे लागेल ह्या विचाराने ते भयभीत झाले होते. पंरतु आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे ख्रिस्त त्यांना पवित्र आत्म्याच्या दानांचे अभिवचन देतो. पवित्र आत्मा सदैव त्यांच्या बरोबर राहून त्यांना त्यांच्या कार्यात सहाय्य करील असे आश्वासनही देतो. ह्याच प्रभूवचनांवर विश्वास ठेऊन त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता जगाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवली.
     शिष्यांप्रमाणे आपलादेखील पवित्र आत्म्यावरील विश्वास दृढ व्हावा व आपण ख्रिस्ताची सुवार्ता इतरापर्यंत पोहचविण्यास पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आपणास लाभावे म्हणून ह्या मिस्साबलीदानात आपण विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: २: १-११

     बारा प्रेषित व त्यांच्यासोबत असलेल्या शिष्यगण एकचित्ताने प्रार्थना करीत पवित्र आत्म्याच्या आगमनाची वाट पाहत होते. पेंन्टेकाँस्टच्या दिवशी म्हणजे पास्कानंतरच्या पन्नासाव्या दिवशी ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात स्वर्गातून आवाज आला. तो सोसाट्याच्या वाऱ्यासारखा होता. त्या आवाजाने ज्या घरात ते सर्व बसले होते ते घर भरून गेले; आणि त्यांना अग्नीच्या जीभासारख्या जीभा दिसल्या. त्या वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर बसल्या व नंतर सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. तसेच आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.

 दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र १२: ३-७, १२-१३

     पवित्र आत्मा एकच आहे. विविध प्रकारची कृपादाने एकाच उगमापासून, देवापासून येतात. देवानेच ती सर्वांच्या समान हितासाठी दिली आहेत. हाच आत्मा प्रभू व देव ह्याच्या कडून विविध प्रकारची कृपादाने, देणग्या व सेवाकार्य होत असते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी नव्हे तर सार्वजनिक हितासाठी आत्म्याचे प्रकटीकरण होते.
     कृपादाने विविध आहेत, तरी ती एकाच आत्म्यापासून मिळतात. आत्म्याने एकाच शरीरात बाप्तिस्मा होतो. त्यात वांशीक भेदाभेद, लौकिक दर्जा- प्रतिष्ठा वैगेरेमुळे काहीच फरक पडत नाही. आपण सर्वजण पवित्र आत्म्याठायी एकच आहोत. कारण आत्माच आपल्या आध्यत्मिक जीवनाचा उगमस्त्रोत आहे.

शुभवर्तमान: योहान: २०: १९-२३

     येशू शिष्यांना दर्शन देतो. येथे भयाची भावना मावळून आनदांचा भाव झपाट्याने पुढे आल्याचे आपणास दिसून येते. पुन्हा उठलेल्या प्रभुने उच्चारलेले शांतीचे वचन हेच त्यांच्या आनंदाचे कारण आहे. “तुम्हास शांती असो” – येशूच्या मुखातून आलेल्या ह्या शब्दातून त्याने आपली स्वतःची शांती शिष्यांना दिल्याचे दिसून येते. शिष्यांना आपले हात व क्रुसावरचे खिळल्याचे घाय दाखवून त्यांच्या मनातील शंका काढून टाकली.
     “शांती असो” हे वचन महत्त्वपूर्ण आहे. कारण येशूला पित्याकडून शांती पसरविण्याची जी कामगिरी मिळाली होती तीच शिष्यांमार्फत पूर्ण करण्यासाठी हे शांतीवचन सांगितले आहे.

मनन चिंतन:

     आज आपण पवित्र आत्म्याचा सण साजरा करत आहोत. ‘पेंन्टेकाँस्ट' ह्या शब्दाचा अर्थ पन्नास असा आहे आणि हा यहुदी लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे. यहुदी लोकांसाठी हा सण मिळालेल्या पिकाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. परंतु ख्रिस्ती लोक हा सण येशूच्या पुनरुत्थानानंतर पवित्र आत्म्याचा सण म्हणून साजरा करतात. कारण ह्या दिवशी पवित्र आत्मा येशूच्या शिष्यांवर उतरलेला व ते वरदानाने परिपूर्ण झाले. पेंन्टेकाँस्ट हा एक क्षण आहे जेव्हा देव स्वतःला अतिशय शांतपणे प्रगट करतो.
     पवित्र आत्मा हा त्रैक्यामधील तिसरा व्यक्ती आहे. पिता व पुत्र ह्या प्रमाणे तो सुद्धा परिपूर्ण असा देव आहे. तसेच तो पिता व पुत्र ह्यापासून वेगळा आहे. प्रभू येशू अनेक वेळा पवित्र आत्मा पाठवण्याचे वचन देतो व त्याने जाहीर केल्याप्रमाणे तो हे वचन पूर्तीस आणतो.
     दृढीकरण हा संस्कार विशेषकरून पवित्र आत्मा स्विकारण्याचा संस्कार आहे. ह्या संस्काराद्वारे आपण पवित्र आत्म्याने भरून जातो व आपण ख्रिस्ताचे साक्षीदार बनतो. तसेच आपल्याला पवित्र आत्म्याची अनेक ‘दाने’ व ‘फळे’ मिळतात.
     पवित्र आत्म्यासाठी अनेक प्रतिके वापरण्यात येतात. ‘पाणी’ हे प्रतिक पवित्र आत्म्याचे स्नानसंस्कारातील कार्य सूचित करते. तसेच ‘अग्नि’ हे प्रतिक आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणते. तसेच ‘कबुतर’, ‘वारा’ अशी सुद्धा प्रतीके बायबलमध्ये पवित्र आत्म्यासाठी वापरण्यात आलेली आहेत.
     प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पाठविण्यात आलेल्या पवित्र आत्म्याद्वारे ह्या भूतलावावर अनेक व्यक्तीमध्ये परिवर्तन घडून आले आहे व ह्या गोष्टी आपण स्वतःहून ऐकल्या आहेत. पुष्कळ व्यक्तींना पवित्र-आत्म्याचे वरदान प्राप्त झालेले आहे. तसेच आपणास  बायबलमधील संत पौलाच्या परिवर्तनाच्या गोष्टीबद्दल परीचय आहे. संत पौलाला ख्रिस्ती महासभेचा एक भक्कम असा पाया म्हणून समजले जाते. त्यांच्याद्वारे अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले. आज सुद्धा समाजात पवित्र आत्म्यामुळे अनेक बद्दल घडून येत आहेत आणि ह्या अनेक लोकांपैकी आपण सुद्धा त्यांच्यामधील एक असू शकतो.
     पवित्र आत्म्याचे वरदान प्राप्त करण्यासाठी पुढील तीन गोष्टींची गरज आहे.
१.     समजूतदारपणा – पवित्र आत्मा हे काही काल्पनिक गोष्ट नाही तर तो प्रत्येक्षात व खरेपणाने हजर आहे हे आपण समझून घेतले पाहिजे व मान्य केले पाहिजे.
२.     शरण जाणे – आपण पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यासाठी त्यास शरण गेले पाहिजे व त्यासाठीच पापमुक्त होणे गरजेचे आहे.
३.     विश्वासामध्ये चालणे – आपण आपल्या जीवनात पापामध्ये मरून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जिवंत झालो पाहिजे व आपले जीवन देवावरील विश्वासात बळकट केले पाहिजे.
तसेच आपल्या जीवनात पवित्र आत्म्याची वरदाने लाभण्यासाठी आपण प्रभूकडे नेहमी प्रार्थना करावयास फार गरजेचे आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभू, आम्हांस तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर”.

१.     प्रभू येशूची सुवार्ता घोषित करणारे आपले पोप महाशय, महागुरु, धर्मगुरू, धर्मबंधू- भगिनी व सर्व व्रतस्त यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव सदैव होत रहावा व त्यांच्या कार्यावर लागणाऱ्या सर्व गरजा त्यांना मिळाव्या म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.     प्रभू येशू ह्या भूतलावावर शांतीचे साम्राज्य पसरविण्यास आला होता. हीच शांती आपल्या कुंटुंबात यावी व आपले जीवन सुखमय बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.     आज पवित्र आत्म्याचा सण साजरा करीत असताना आपल्या सर्वावर पवित्र आत्म्याचा भरपूर असा वर्षाव व्हावा व आपले जीवन अधिक पवित्र होण्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४.     ज्या लोकांचा विश्वासामुळे छळ होत आहे अश्या लोकांना प्रभूची कृपा लाभावी व ते पवित्र आत्म्याच्या द्वारे अधिक सामर्थ्यवान व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५.     थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.