Monday 26 December 2016

Reflections for the Homily on Mary the Mother of God  (01/01/2017) by  Lavet Fernandes.

देवमातेचा सोहळा

दिनांक – ०१/०१/२०१७
पहिले वाचन – गणना ६:२२-२७
दुसरे वाचन – गलतीकरांस पत्र ४:४-७
शुभवर्तमान – लूक २:१६-२१






“मरीयेने सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या”






प्रस्तावना
आज आपण नवीन वर्षात पदार्पण करीत असताना वर्षाच्या पहिल्याच दिवशी ख्रिस्तसभा आपल्याला ‘मरिया देवाची माता’ हा सोहळा साजरा करण्यासाठी बोलावत आहे. मरिया जरी साधी व भोळी स्त्री असली तरी ख्रिस्तसभेत तिचे स्थान महत्वाचे आहे. मरीयेने सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या, असे संत लुक आपल्याला सांगतो. तिचा आदर्श आपण आपल्या नजरेसमोर ठेवून नवीन वर्षात चांगले जीवन जगण्यासाठी ह्या पवित्र मिस्साबलीदानात देवमातेचे सहाय्य मागू या.

पहिले वाचन – गणना ६:२२-२७

आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराच्या सांगण्यावरून आशिर्वादाची प्रार्थना आहारोन व त्याचे पुत्र लोकांना देतात. कारण ते देवाने निवडलेले लोक होते; म्हणून देवाची पवित्र कृपा त्यांच्यावर होती.

दुसरे वाचन – गलतीकरांस पत्र ४:४-७

संत पौल स्पष्ट करतो कि, आपल्या सर्वांना नवजीवन मिळाले आहे. म्हणूनच आपण आतापासून गुलाम नाही, देवाचे नुसते पुत्र नाही तर देवाद्वारे वारस ही आहोत. कारण देवाला अब्बा, बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे.

शुभवर्तमान – लूक २:१६-२१

आजच्या शुभवर्तमानात देवदुताने पवित्र मरीयेला कशाप्रकारे संदेश दिला व मेंढपाळांनी येशू ख्रिस्ताला कशी भेट दिली ह्याविषयी आपण ऐकतो. ह्या संपूर्ण अध्यायामध्ये आपण विश्वासाचे अनेक गुण पाहत आहोत, ज्यामध्ये पवित्र मरीयेच्या विश्वासाला उत्तम स्थान प्राप्त होते; म्हणूनच आज ख्रिस्तसभेमध्ये पवित्र मरीयेला उत्तम स्थान दिले आहे.
मरीयेने या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या (२:१९).
गब्रियल दूताने मरीयेला दिलेल्या संदेशानुसार आपल्या उदरी जन्मला येणारे बाळ येशू दाविदाच्या वंशात जन्मला येणारा मसीहा देवाचा पुत्र असेल हे तिला माहिती होते. त्यानंतर अलिशिबेने पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन ‘माझ्या प्रभूची माता’ म्हणून तिला संबोधले. आता मेंढपाळामार्फत देवदुताने सांगितल्याप्रमाणे हे बाळ ‘तारणारा ख्रिस्त व प्रभू आहे’ हे तिला कळले. या सर्व गोष्टी ऐकून मरीयेच्या मनात विचार आला असेल कि, आपल्या उदरी जन्मला आलेले हे बाळ सर्व जगाचा प्रभू असूनही त्याने इतक्या सामान्य व गरीब परिस्थितीत जन्मला यावे यामागे ईश्वरी योजना काय असावी? ह्या व इतर सर्व प्रश्नांचे उत्तर मरीयेच्या ‘तुझ्या शब्दाप्रमाणे होवो’ या श्रद्धापूर्ण होकारातच सामावलेले आहे.
मेंढपाळ गरीब, बुद्धीने मंद व समाजात त्यांना कमी दर्जा दिला जात असे. ते जरी गरीब व बुद्धीने मंद असले तरी विश्वासाने भक्कम होते. जेव्हा देवदुताने त्यांना संदेश दिला तेव्हा आपल्याला जो देवदूत दिसला तो भास असेल किंवा आपली कोणीतरी फसवणूक करीत असेल अशी ते चिकित्सा करीत बसले नाहीत. तर ते ताबडतोब येशू ख्रिस्ताच्या भेटीसाठी निघाले.
योहानाची सुंता झाली तेव्हा त्याच्या भविष्याविषयीचे भाकीत केले होते. येशूला मंदिरात नेले तेव्हा त्याच्या बाबतीतही अशे भाकीत करण्यात आले होते.

बोधकथा

बायको सतत आईवर आरोप करत होती आणि नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहण्यास सांगत होता. पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती. ती जोरजोरात ओरडून सांगत होती, “मी अंगठी टेबलावरच ठेवली होती, आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच आलेले नव्हतं. अंगठी ही आईनेच उचलली आहे. गोष्ट जेव्हा पतीच्या सहनशक्तीच्या बाहेर गेली तेव्हा त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेवून दिली.
तीन महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं. पत्नीला ती चपात सहन झाली नाही. ती तर घर सोडून चालली होती आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला कि, तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का? तेव्हा पतीने जे उत्तर दिले, त्या उत्तरला ऐकून दरवाजामागे उभ्या असलेल्या आईचे मन भरून आले. पतीने पत्नीला सांगितले, “जेव्हा मी छोटा होतो, तेव्हा वडील वारले. आई आजूबाजूला परिसरात झाडू मारून थोडे पैसे आणायची ज्यात एक वेळचे पोट भरायचे.
आई एका ताटात भाकर वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकून ठेवायची आणि म्हणायची, माझ्या भाकरी या डब्यात आहेत. बाळा तू खा. मी पण नेहमी अर्धी भाकरी खाऊन म्हणायचो, आई माझे पोट भरले आहे. आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केले आणि मोठे केले. आज मी तीच भाकर कमवायच्या लायकीचा झालो पण हे कसं विसरू कि आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं. ती आई या स्तिथीत अशा साठी भुकेलेली असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही. तू तर तीन महिन्यापासून माझ्या सोबत आहे. मी तर आईच्या तपश्चर्येंला २५ वर्षापासून बघितलंय. हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती समझुच शकत नव्हती कि मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज फेडतोय कि, ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचे कर्ज!!!

मनन चिंतन

प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईला एक महत्वाचे स्थान असते. आईची माया व वात्सल्य वेगळ्या प्रकारची असते जी आपल्याला तिच्याकडे आकर्षित करते. दुसऱ्यांची आई कितीतरी प्रेमाळू व सुंदर असली तरी प्रत्येकाला आपलीच आई ही सर्व श्रेष्ठ वाटते. कारण प्रत्येकाने आपला आईचा अनुभव घेतलेला असतो. येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या आईमध्ये तिची माया व वात्सल्य अनुभवले होते.
     देवपित्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या विश्वात पाठविण्य्साठी एका कुमारिकेची नेमणूक विश्वाच्या सुरुवातीपासूनच करून ठेवली होती. तिच्या गर्भसंभावापासून देव पित्याने तिचा सांभाळ केला व तिला पवित्र ठेवले व जेव्हा तिची वेळ आली तेव्हा देवपित्याने तिच्या उदरी पुत्र वाढवला व तो तिच्याद्वारे ह्या भूतलावरती आला. म्हणूनच आज ख्रिस्त सभेमध्ये पवित्र मरीयेला देवाच्या आईच मान मिळाला आहे.  
          नम्रता व श्रद्धा या दोन गुणाची मनुष्याला सुखाच्या अनुभवासाठी अतिशय गरज आहे. मरीयेच्या जीवनात अपार दुखे होती. परंतु त्या दु:खात ती कधीच खचून गेली नाही. तर त्या दुखाचा तिने श्रद्धेने स्विकार केला. ‘ गर्विष्टांची भव्य आसने पाडी खालती तो पुरती’  असे मरीयेने आपल्या स्तोत्रात म्हटले आहे. मारिया नम्र होती. हे तिच्या स्तोत्रातून प्रगट होते (लुक १:४६-५५). देवदूताला उत्तर देताना ती म्हणाली,   ‘मी प्रभूची दासी आहे’ हीच खरी नम्रता. दुखाचा डोंगर कोसळला कि, मनुष्य खचून जातो. त्याचा विश्वास उडतो. मात्र मारीयेची देवावर अपार श्रद्धा होती.
     आपण पवित्र मरीयेच्या जीवनात आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या होत्या त्यांची तिला थोडी देखील कल्पना नव्हती. पवित्र आत्म्याच्या ओगाने तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल’ (लुक १:३१). हा देवदूताचा संदेश नावानिशी लिहून देण्यासाठी बेथेलेहमात जावे लागणे, तेथे त्यांना राहण्यास जागा न मिळणे, गोठ्यात बाळाचा जन्म होणे, मेंढपाळानी त्याला वंदन करण्यास येणे आणि ऐकलेल्या गोष्टी त्यांना सांगणे, ह्या सर्व गोष्टी तिच्या कल्पनेपलीकडच्या होत्या परंतु त्यामुळे ती भांबावून गेली नाही किंवा अवास्तव काळजी करीत बसली नाही. परंतु मरीयेने ह्या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात साठविल्या.
     मरीयेने आईची एक चांगली भूमिका पार पडली. जरी तिच्या जीवनात दुख व संकटे आली तरी तिने त्यांना सामोरे जाणे पसंत केले. तिचा देवावरचा विश्वास फार दृढ व बळकट होता. ती कोणत्याच गोष्टीला घाबरली नाही. “श्रद्धा माझी अविचल प्रभूवर सकल सुखाचा तू दातार काय घडेल ते घडो दे शेवटी लाभ आणि त्रास देव जाणे.
     आनंदाने ती बहकून गेली, दुखाने ती खचून गेली नाही म्हणून तिला गौरवाचा, स्वर्गाचा व देवाच्या आईचा मान व सन्मान मिळाला. आज नववर्षदिन साजरा करत आहोत. ह्या शुभदिनी पवित्र मारिया आम्हांला आपल्या जीवनाद्वारे संदेश देत आहे. ह्या वर्षात तसेच सहस्त्रकात जे घडले ते शांतपणे कृतज्ञतापूर्वक स्वीकारण्याचा आणि परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे पवित्र देवामाते आम्हासाठी विनंती कर.

१. ख्रिस्त सभेचे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. हे नवीन वर्ष २०१७ आपल्या सर्वांना सुखा-समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व चागल्या आरोग्याचे जावो म्हणून आपण मारिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. ह्या वर्षी आपल्या सर्वांना चांगले हवामान मिळावे व सर्व शेतीबागा पिकांनी व फळा-फुलांनी बहरून याव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी शांतता व न्यायासाठी एकत्र यावे तसेच संपूर्ण जगात शांतता पसरविण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया.





Sunday 25 December 2016

Reflection for the Feast of Holy Family (30/12/2016) By Camrello Dimekar.



पवित्र कुटुंबाचा सण
दिनांक: ३०-१२-२०१६
पहिले वाचन: बेनसिरा ३:२-६,१२-१४
दुसरे वाचन: कलस्सेकरांस पत्र ३:१२-२१
शुभवर्तमान: मत्तय २:१३-१५,१९-२३

“उठ, बालक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशात जा”


प्रस्तावना:

ख्रिस्तसभा आज मरिया, योसेफ व बाळ येशू ह्या पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहे. मरीयेच्या जीवन वेलीवर ख्रिस्तबाळ हे देवाचे फुल आहे. योसेफ व मरिया यांनी त्याला चांगल्या संस्कारात घडविले. सत्याचा व शांतीचा मार्ग दाखविणारा येशू ख्रिस्त गरीब कुटुंबाचा केंद्रबिंदू बनला.
कुटुंब ही संस्काराची आद्य शाळा आहे. ख्रिस्ती श्रद्धेची जोपासना कुटुंबातच होते. आपण कौटुंबिक जीवन जगत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अशा वेळी पवित्र कुटुंबात धार्मिक वातावरण निर्माण होण्यास, आदर्श कुटुंबाचे गुण आपण आचरणात आणावेत व मरीयेच्या छत्राखाली आनंदाने जगण्यास कृपा मिळावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: बेनसिरा ३:२-६,१२-१४

बेनसिराची बोधवचने हा ग्रंथ ‘एक्लेझीयास्तस’ ह्या नावानेही ओळखला जातो. ह्या पुस्तकाचा लेखक धार्मिक वृत्तीचा यहुदी व्यक्ती होता. त्याने यहुदी धर्मातील नियमावलींचा अभ्यास केला होता. त्याने यहुदी धर्मातील तत्ववेत्त्यांना सांगण्यासाठी आणि त्याचे असलेले देवावरील प्रेम दर्शविण्यासाठी हा ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे इतर लोक सुद्धा जीवनात आनंदी राहतील आणि त्यांच्यामध्ये देवाप्रित्यर्थ आदराची भावना निर्माण होईल. ह्या उताऱ्यात परमेश्वर, आपला प्रेमळ पिता ह्या नात्याने त्याच्या मुलांना नम्रपणे वागण्यास सल्ला देत आहे.

दुसरे वाचन: कलस्सेकरांस पत्र ३:१२-२१.

हे पत्र लिहिण्यामागील संत पौलाचा हेतू असा आहे कि, जे लोक ख्रिस्ती धर्मामध्ये आले आहेत त्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासात वाढ व्हावी. त्यांना संत पौल दर्शवितो कि येशुख्रिस्त हा ‘तारणारा’ आणि ‘ख्रिस्तसभेचा मुख्य’ आहे. पुन्हा संत पौल लोकांना सांगतो कि, आपण आपले जीवन येशू ख्रिस्ताने दिलेल्या शिकवणुकीवर आधारले पाहिजे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने नैतिक मुल्ये जोपासावीत त्यामुळे आपण समाजात इतरांबरोबर सलोख्याने राहू शकू.

शुभवर्तमान: मत्तय २:१३-१५,१९-२३.

दुसऱ्या अध्यायाच्या उरलेल्या भागात बाळ ख्रिस्ताच्या स्थलांतराचे उल्लेख आहेत. प्रथम त्याला बेथलेहेम येथील जन्म ठिकाणाहून इजिप्तला नेले, मग परत यहुदीयात परत आणले. तेथून त्याला गालीलात नेले. मग ते नाझरेथ गावात जाऊन राहिले. यावरून त्याला ‘नाझरेथकर येशू’ म्हणून लागले. ख्रिस्त गालीलातून येणार किंवा नाझरेथहून येणार या म्हणण्याला यहुदी लोकांनी जो उपदेश दिला त्यात याचे कारण दडले आहे. शास्त्रलेखाच्या आधाराने स्थलांतर करून अखेर गालीलात स्थिरावला म्हणून त्याला नाझरेथकर म्हणतील हे भाकीत पूर्ण झाले.

मनन चिंतन:

‘कुटुंब’ ही ईश-नियोजित अशी नैसर्गिक संघटना आहे कि, ज्याच्यादवारे राष्ट्राची आणि ख्रिस्तसभेची पायाभरणी होत असते. याच पायावर राष्ट्र व ख्रिस्तसभा उभी आहे. तिथेच प्रेमाचा आणि आशेचा कोंब विकसित होतो. याच पायावर जीवन खुलते. कुटुंब ही समाजजातीची पाठशाळा आहे. याच शाळेत मानवी मनाची जडण घडण होते. आपल्या आयुष्यात आपल कोणते पाचारण स्विकारावे या विचारावर पालवी फुटते. मानवी जीवनाची जडण-घडण करणारी कुटुंब-व्यवस्था ही पहिली शाळा होय. याच विद्यालयात बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत शिकत माणूस वरवर जातो. व विद्याविभूषित होत असतो. याच शाळेत त्याला माहिती मिळते. त्याची जडणघडण होते व त्याचे मन-परिवर्तनही होते. वेगवेगळी जीवनमुल्ये तो आपल्या कुटुंबातच आत्मसात करतो. बंधुत्व, निष्ठा आणि प्रिती ही जीवनसत्ये याच वातावरणात प्राशन करतो. कुटुंब म्हणजे ‘संस्काराचे केंद्र’.
माणूस एकटा राहू शकत नाही व त्याचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे कौटुंबिक गोतावळ्यातच तो स्वता:चा विकास घडवून आणतो. ह्याच वातावरणात तो एकमेकांशी संवाद साधायला शिकतो व यातून मिळणाऱ्या आनंदात व सुखात स्वतःचा आत्मविकास घडवून आणतो.
हे विश्वची माझे घर. माझे कुटुंब आहे. हे जग पवित्र आहे. सर्व वस्तुमात्रामध्ये जीवजंतूमध्ये आणि प्राणिमात्रामध्ये परमेश्वर वास करतो, ह्याची जाणीव होते. “प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.... सर्व काही त्याच्या द्वारे झाले. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली अन् आम्ही त्याचे गौरव पाहिले.” (योहान १:१-५,१४) योहानाच्या शुभवर्तमानातील ह्या शब्दाद्वारे आपल्याला जाणीव होते कि, देवाने अगदी सखोल प्रेमाने ह्या जगाची व मानवाची निर्मिती केली, देवाचे परिपूर्ण जीवन विपुल प्रमाणात ह्या जगात भरभरून ओतले. हे जग प्रकाशाने प्रकाशमान झाले होते. जरी पापाच्या अंधकाराने ह्या प्रकाशाला ग्रासण्याचा प्रयत्न  केला, तरी तो अयशस्वी ठरला. कारण प्रकाश परिपूर्ण व सार्वकालिक होता. हा प्रकाश जगामध्ये देही झाला व आम्हामध्ये त्याने वस्ती केली.
अशाप्रकारे हे जग पवित्र आहे. देव “इम्मॅन्युएल” म्हणजेच ‘देव आपल्यासह आहे’, अशी जागृती करून दिली. हे पावित्र्य जरी काही काळ अंधारात दडलेले होते; येशूच्या आगमनाने तसेच त्याच्या दुःखसहन, मरण आणि पुनरुत्थानाद्वारे ह्या पावित्र्याला नाविण्य व पूर्णता प्राप्त झाली आणि जगाचे तारण झाले. जग हे पवित्र आहे व त्यातील सर्व वस्तूमध्ये प्रकाश आहे. कारण परमेश्वराने हे जग निर्मिले व येशुख्रिस्ताद्वारे त्याचे तारण घडवून आणले. अशादवारे ह्या संपूर्ण सृष्टीला अर्थ प्राप्त झाला आहे.
     आपली समाजव्यवस्था ही डोंगरासारखी आहे. कुटुंब-व्यवस्था हा त्याचा पाया आहे. समाज सबळ असतात. डोंगर सबळ असतात. मग डोंगर का कोसळतात? दरडी का कोसळतात? याची महत्वाची कारणे आहेत. माणसेच डोंगर पोखरतात. त्यांचे पाये तेच उधवस्त करतात. भरणीसाठी डोंगर उताराचे लचके तोडले जातात. नद्यांच्या पात्रातील वाळू उपसली जाते. धूप थांबवणाऱ्या कल्पवृक्षाची व आधारवडाची बेसुमार वृक्षतोड केली जाते. हिरवळीचा बळी घेतला जातो. डोंगर-टेकड्यांचा मुळाधारच नष्ट केला जातो. डोंगराच्या मुळावरच आज जशी कुऱ्हाड उगारली जाते. धीरोदात्त डोंगराच्या मुळावरच आज जशी कुऱ्हाड उगारली जाते, तशीच ती परंपरागत धडधाकट कुटुंब-व्यवस्थेच्या भरभक्कम डोंगरावरही उगारली जाते. म्हणूनच कुटुंबव्यवस्थेत ‘दरडी’ कोसळतात. डोंगर ढासळतात. समाजात असे प्रताप जर होऊ द्यायचे नसतील तर डोंगराचा पाया जपला गेला पाहिजे. राष्ट्राचा व चर्चचा पाया जपला गेला पाहिजे. कुटुंब जपले गेले पाहिजे. कौटुंबिक वारसा जपला गेला पाहिजे.
     पोप फ्रान्सीस ह्यांनी लिहिलेल्या कुटुंबविषयक पत्रात ते प्रत्येक कुटुंबाला सांगू इच्छितात कि, ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी कुटुंबाकडे अनेक आव्हाने आहेत. अर्थात आज चर्चपुढे काही आव्हाने आहेत. ही आव्हाने कुटुंबाच्या माध्यमातून कशी पुरी करता येतील, हेच एक मोठे आव्हान आहे. कुटुंबाची सहमती आणि सहकार्य अत्यंत मोलाचे दान ख्रिस्तसभेसाठी असणार आहे. 
     पोप फ्रान्सीस पुन्हा एकदा कुटुंब सुरळीत चालण्यासाठी तीन शब्द देतात. त्या शब्दामध्ये जणूकाही जादूच आहे. कुटुंब चालवणे तसे सोपे नाही. कुटुंबातील प्रत्येक माणसाची मर्जी सांभाळणे, अत्यंत अवघड. कुटुंबातील कोणती व्यक्ती कधी दुखावली जाईल, हे सांगता येत नाही. त्याकरीता कुटुंबातील प्रत्येक माणसाला सावधगिरी बाळगायला हवी, काही पथ्ये पाळायला हवीत. या पथ्यात तीन शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचे आहेत. १. मी हे केलं तर चालेल का? २. धन्यवाद  ३. मला माफ कर
हे शब्द दिसायला तसे साधे, परंतु ते कृतीत उतरावयास कठीण आहेत. मात्र ते जर कृतीत उतरविले गेले तर त्याचा परिणाम दीर्घकाळ पर्यंत होऊ शकतो. कुटुंब सुखी होऊ शकते. वरील तीन शब्दप्रयोग आहेत लहान; पण त्यांचे कार्य आहे महान. ह्यांनी कुटुंब प्रसन्न व सुखी असते.
मुले जेव्हा लहानातून मोठी होतात तेव्हा त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या म्हातारपणासाठी आधाराची काठी संबोधले जाते. पण ही काठी आधारेवजी प्रहार ठरली तर उतारवयात त्यासारखं दु:ख नाही. ज्या कुटुंबात वृद्धांचा सांभाळ केला जातो तेथे देवाचा सहवास असतो. म्हातारपण हे दुसरे बालपण असते असे म्हणतात. मुलांना लहानाचे मोठे केले तेव्हा आनंद झाला. मुलांसाठी कष्ट, त्याग, केला जेणेकरून मुले मोठी व्हावीत, त्यांना चांगल शिक्षण द्यावं, नोकरीला लावावं, म्हातारपणी लाकडाच्या काठीचा नसून लहान मुलांच्या नाजूक हाताचा आधार हे स्वप्न खरं व्हावे.
सुप्रसिद्ध यहुदी अस्तित्ववादी विचारवंत मार्टिन बुबर म्हणतात, “मनुष्य प्रेमासाठीच जन्मलेला आहे आणि प्रेम हे दोन व्यक्तीतील एक नाजूक नाते आहे.” जर व्यक्तीचे प्रेम मिळाले नाही तर मनुष्य वस्तू अथवा विचारसरणी यांच्याशी संगनमत करण्याचा प्रयत्न करतो. “मी आणि व्यक्ती यापेक्षा मी आणि वस्तू अशी तडजोड करतो. ह्या वस्तूमध्ये दारू, ड्रग्स, लैगिंक स्वैराचार, जुगार, अधाशीपणा, अश्लीलता ह्यांचा समावेश होतो. क्वचित प्रसंगी त्यात परमेश्वराचाही अंतर्भाव होतो. परमेश्वरविषयक आपली त्यात विचारसरणी इतरांच्या माथी मारण्यासाठी किंवा त्यांच्या गळी उतरविण्यासाठी तो दुसऱ्याचा गळा घोटायलाही मागेपुढे पाहत नाहीत. गरिबी म्हणजे खायला अन्न न मिळणे किंवा उपाशी मरण नव्हे तर कुटुंबात प्रेमाचा अभाव असणे ही सर्वात मोठी गरिबी आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमच्या कुटुंबाला आशीर्वादित कर.

1. आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स ह्यांच्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा व त्यांच्या कार्यावर प्रभूचा सदैव वरदहस्त असावा म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
2. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सतत नांदावे, व सदासर्वदा सुखी कुटुंब असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
3. जी कुटुंब उध्वस्त होत आहेत, जेथे भांडण-तंटे होत आहेत, अशा कुटुंबांना पवित्र कुटुंबाचे मार्गदर्शन लाभून समजूतदारपणाचे, शांतीचे व प्रेमाचे वरदान मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
4. आपल्या वृद्ध आई वडिलांसाठी, आपण प्रेमाचे, मायेचे व करुणेचे छत्र होण्यास व त्यांना सदैव आनंदी ठेवण्यास परमेश्वराने आपणास कृपा द्यावी म्हणून प्रार्थना करूया.
5. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. 

      

Wednesday 21 December 2016

Reflection for the Homily of Christmas Day (25/12/2016) By: Br. Brandon Noon.




ख्रिसमस (सकाळची मिस्सा)
दिनांक: २५-१२-१६.
पहिले वाचन: यशया : ५२:७-१०.
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र : १:१-६.
शुभवर्तमान: योहान १:१-१८.





 शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला



प्रस्तावना:

“गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला,
पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला”
२५ डिसेंबर हा दिवस अजिंक्य सूर्याचा म्हणजेच ख्रिस्ताचा वाढदिवस. ख्रिस्त न्यायाचा सूर्य आणि जगाचा प्रकाश आहे. पापी जणांचे तारण करण्यासाठी गाईच्या गोठ्यात जन्म घेऊन पाप, अन्याय आणि अशांतीच्या अंधकाराचा नाश करून, दीन-दलितांचे जीवन तारणाच्या प्रकाशाने उजळून, जगाला प्रेम, दया आणि शांतीची सुवार्ता देणाऱ्या प्रभू ख्रिस्ताचा जन्म दिवस म्हणजेच ख्रिसमस.
माणसा-माणसामध्ये असलेली शत्रुत्वाची भावना व ताणतणाव कमी व्हावेत व त्याच्या मनामध्ये शांतीचे लक्ष-दीप उजळावेत म्हणून ख्रिस्त आपल्या हृदयरूपी गोठ्यात पून्हा पुन्हा जन्म घेतो. बाळ येशु आपल्या हृदय-मंदिरात जन्मास यावा व आपलं अंतःकरण त्याच्या सात्विक प्रेमाने व विपूल आशीर्वादाने सुगंधित करावे तसेच बाळ येशूची शांती, प्रीती व अखंड प्रेमाची ज्योत आपणा सर्वांच्या अंतःकरणात सतत पेटत रहावी म्हणून या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.


सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया : ५२:७-१०

सियोनातील लोक राजांच्या गुलामगिरीमध्ये होते, तेथे त्यांचा खूप छळ चालला होता. तेव्हा यशया संदेष्टा त्यांच्यासाठी चांगली बातमी घेऊन येतो. तो त्यांना ह्या उताऱ्याद्वारे प्रोत्साहन देतो. जी व्यक्ती चांगल्या बातम्या आणते त्या व्यक्तीचे नेहमी स्वागत केले जाते. निवेदकाची चांगली बातमी हीच कि, ‘तारण जवळ आलेले आहे ते अगदी तुमच्या समोर आहे’. पिलातासमोर उभा असलेला तोच राजा येणार आहे परंतु त्याचे राज्य ह्या जगाचे नाही.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र : १:१-६

देव प्राचीन काळी त्याच्या निवडलेल्या संदेष्ट्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला व काळाची पूर्तता झाल्यावर त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला ह्या भूतलावर पाठविले. देवाचा पुत्र देवदुतापेक्षा श्रेष्ठ गणला गेला व देवाने त्याला सर्व गोष्टीचे वारीस बनविले. तोच पुत्र ह्या सृष्टीची देखरेख देव-शब्दाच्या शक्तीद्वारे करतो.

शुभवर्तमान: योहान १:१-१८.

योहानाच्या शुभवर्तमानाची सुरवात हि ‘शब्दाने’ झालेली आहे. योहानाने ‘शब्दाला’ खूप महत्व दिलेले आहे. हाच ‘शब्द’ आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये वाचतो. ह्याचा अर्थ असा कि ‘शब्द’ हा वेळेच्या अगोदर होता. ग्रीक भाषेमध्ये ‘शब्दाला’ ‘लोगोस’ असे म्हणतात. हा ‘शब्द’ दैवी होता. येशु हा देवाचा पुत्र आहे. तो युगानुयुगापासून आहे, हे सांगण्यासाठी योहान म्हणतो, ‘प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता’. तोच प्रारंभी देवासह होता. ख्रिस्त हा विश्वाच्या सुरवातीपासून आहे, हे योहानाला झालेले प्रगटीकरण आहे. ‘शब्द’ हा सृष्टीच्या अस्तित्वा अगोदर होता. सृष्टी देवाच्या शब्दाने निर्माण झाली. म्हणून शब्द हा जीवनाचा उगम व सुरवात आहे. शब्दामध्ये व देवामध्ये खूप जवळीक आहे त्यामुळे ‘शब्द’ अनंत काळचे देणारे जीवन आहे.

मनन चिंतन:

आज आपण नाताळचा म्हणजेच आनंदाचा व हौशेचा दिवस साजरा करीत आहोत. हवेत गारवा आहे, मात्र आमच्या अंतःकरणात खूप उब आहे. कारण शांतीचा व प्रेमाचा राजा जन्माला आला आहे. ‘परमेश्वराने आपल्यावर इतके प्रेम केले की, त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या तारणासाठी अर्पण केला. जसे मेंढपाळ व राजांना संदेश मिळाला व कुडकुडत्या थंडीत ते येशु बाळाला भेटायला गेले, त्याचप्रमाणे आपल्यालाही हाच संदेश मिळालेला आहे म्हणूनच आज आपण येशुबाळाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. मेंढपाळासारखे व राजासारखे आपल्यालाही देवदुताचा संदेश मिळाला आहे.
नाताळ म्हणजे नक्की काय? नाताळचा खरा अर्थ आपण विसरलो आहोत. नाताळ म्हणजे आपल्याला वाटते कि ख्रिसमस ट्री, नवीन कपडे, पकवाणे, गव्हाणी इत्यादी. परंतु खरा ख्रिसमस किंवा नाताळ म्हणजे “येशुबाळाचा जन्म”, जो शांतीचा, प्रेमाचा, क्षमेचा, आनंदाचा आणि मायेचा राजा आहे. आपण हे सर्व विसरून भलत्याच गोष्टींकडे लक्ष देत आहोत. आपण ह्या सर्व गोष्टींचा स्विकार करण्याअगोदर त्या देवापुत्राचा स्विकार करायला हवा आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला बहाल केल्या जातील.
एकदा एक श्रीमंत माणूस होता. त्याला एक मुलगा होता. त्या माणसाचे त्याच्या मुलावर खूप प्रेम होते. त्या मुलाला खुश ठेवण्यासाठी त्याने चित्रकलेचा छंद जोपासला. कालांतराने त्या मुलालाही तो छंद जडला. ते दोघेही त्यांच्या जीवनात खूप आनंदी होते परंतु अचानक त्या मुलाला लढाईसाठी सैन्यात भरती व्हावे लागले. जेव्हा तो मुलगा सीमारेषेवर सेवा करत असे तेव्हा तो रोज त्याच्या वडिलांना पत्र पाठवत असे. परंतु काही दिवसानंतर त्या वडिलांना फोन आला कि तुमचा मुलगा एका सैन्याला वाचवत असता मरण पावला.
मग एक दोन महिन्यानंतर दरवाजाची बेल वाजली व तेव्हा सैन्यातून एक सदगृहस्थ त्याच्या मुलाच्या काही वस्तू द्यावयास आला होता. त्या गृहस्थाने स्वतःचा परिचय करून दिला कि, ‘मीच तो सैनिक ज्याला तुमच्या मुलाने वाचवले व तो माझा चांगला मित्र होता. मी तुमच्या कलासंग्रहाविषयी खूप ऐकले होते व तुमचा मुलगा तुमच्यावर खूप प्रेम करत होता. म्हणून मी तुमच्यासाठी एक रेखाचित्र आणले आहे, हे मी स्वतः बनवले आहे. जेंव्हा ते वडील ते रेखाचित्र उघडतात तेव्हा त्या रेखाचीत्रावरील त्याच्या मुलाची हसती प्रतिमा पाहून त्याचे डोळे भरून येतात. ते चित्र त्याच्या कायम स्मरणात रहावे म्हणून ते घराच्या प्रवेश द्वाराशी ठेवतात. काही वर्षानंतर हे वडील मरतात व त्या चित्राचा लिलाव केला जातो. अनेकजण वेगवेगळी चित्रे घेतात परंतु फक्त एकच व्यक्ती ते त्याच्या मुलाचे हसतमुख असलेले रेखाचित्र घ्यायला धजतो. त्या चित्राचा लिलाव झाल्यानंतर वकिल त्या व्यक्तीच्या मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे त्या पित्याची सर्व धनदौलत त्या गृहस्थाला देतात. त्यावर त्या व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसतो.
     आज ह्या गोष्टीद्वारे आपल्याला एकच संदेश मिळतो कि, जो कोणी पित्याच्या पुत्राला (येशु ख्रिस्ताला) स्वीकारील त्याला इतर सर्व गोष्टी न मागता मिळतील. जेव्हा येशुख्रिस्त आपल्या जीवनात येईल तेव्हा आपण आनंदाने भरून जाऊ. आपल्या जीवनात शांती, प्रेम, द्या सदैव वसती करेल. जेव्हा आपण आपल्या गावात, मंदिरात, घरात किंवा कुटुंबात वावरू तेव्हा हेच प्रेम, शांती, द्या व आनंद इतरांना देऊ.
आज ह्या नाताळच्या सणाच्या दिवशी आत्मपरीक्षण करूया कि, मी ख्रिस्ताला माझ्या जीवनात स्थान देतो का? जर आपण ख्रिस्ताला जो प्रेमाचा, दयेचा, शांतीचा राजा आहे त्याला आपल्या जीवनात स्वीकारण्यास कमी पडलो असेल तर बाळयेशुजवळ प्रार्थना करूया आणि त्यास आपल्या हृदयी जन्मी घेण्यास विनंती करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे बाळ येशु आमच्या हृदयात जन्म घे.

१.     आपले परमगुरु, बिशप, धर्मगुरू आणि ख्रिस्ती प्रजाजण यांना बाळ येशूचे मार्गदर्शन मिळावे व त्याद्वारे ख्रिस्तसभेची अधिकाधिक भरभराट व्हावी म्हणून प्रार्थना करूया.
२.     राज्याराज्यात व प्रांताप्रांतात सलोखा निर्माण व्हावा आणि सर्वत्र शांतीचे राज्य पसरावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३.     आपल्या धर्मग्रामात मूलगामी समूहाद्वारे समाज-बांधणीस वेग मिळावा, प्रत्येक गावात असलेले दुरावे दूर होऊन आपण सर्वांनी एक कुटंब व्हावे म्हणून आपण प्रार्थाना करूया.
४.     आपल्या धर्मग्रामातील आजारी, दुःखी व पिडीत लोकांना येशु बाळाचा आशीर्वाद मिळावा व त्यांचा आजार व दुःख हलके व्हावीत म्हणून प्रार्थना करूया.
५.     आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.