Thursday 24 September 2020

      Reflections for the 26th Sunday in Ordinary Time (27/09/2020) by Dn. Robby Fernandes








सामान्य काळातील सव्विसावा रविवार

 

दिनांक: २७/०९/२०२०

पहिले वाचन: यहेज्केल १८:२५-२८

दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस पत्र २:१-११

शुभवर्तमान: मत्तय २१:२८-३२

 



प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील सव्विसावा रविवार साजरा करीत आहोत. आज देऊळमाता ‘पश्चाताप करा व आज्ञाधारक राहा’ हा शुभ संदेश आपणा सर्वांना देत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल संदेष्टा असे सांगतो की, देवाचा न्याय सर्वांसाठी समान आहे. प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या कृत्यामुळे – ‘दुष्कृत्यामुळे नाश व सत्कृत्यामुळे तारण’ –  असा न्याय केला जाईल. म्हणून पापमय जीवनाचा त्याग करून, पश्चाताप करून धार्मिकतेच्या मार्गावर चालाण्यास परमेश्वर आपणास बोलावित आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात फिलिप्पीकरास पाठविलेल्या पत्रात संत पौल असे सांगतो की, सर्वांनी एकमेकावर प्रेम करून एक दिलाने व मनाने राहावे व ख्रिस्ता सारखे जीवन जगावे. शुभवर्तमानात येशू ख्रिस्त दोन पुत्रांच्या दृष्टांताद्वारे, पश्चातापाचे व आज्ञाधारकतेचे जीवन जगण्यास आपणास आमंत्रण देत आहे.

परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालण्यास व पश्चाताप करण्यास आपण कमी पडलो असाल तर क्षमा मागूया व आज्ञाधारकतेचे व पश्चातापाचे जीवन जगण्यास कृपा-शक्ती आपणास लाभावी म्हणून ह्या मिसा बलिदान आपण प्रार्थना करूया.

 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यहेज्केल १८: २५-२८

बाबिलोन देशांत बंदिवासात असलेल्या इस्त्राएल लोकांना मुक्त करण्यासाठी देवाने यहेज्केलची निवड केली. यिर्मयाप्रमाणे यहेज्केलही संदेष्टा होता जो लोकांना विश्वासाने देवाचे वचन सांगत असे. देवाची सुवार्ता लोकापर्यत पोहवचण्याचे काम करत असे. यहेज्केल लोकांना चागले जीवन कसे जगायचे याबद्दल उपदेश करतो. जेणेकरून ही लोक चांगले जीवन जगून देवाकडे वळू शकतात.

 

दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस पत्र  २:१-११

वैयक्तिक नम्रतेद्वारे ऐक्य राखण्याची विनंती: आवाहन केले आहे व येशूच्या प्रीतीचा आशीर्वाद आम्हांला मिळाला आहे म्हणून आम्हीही तशीच प्रीती कोणताच भेदभाव न करता इतरांना दिली पाहिजे.

ख्रिस्ताचा आदर्श: नम्रपणे जीवन जगण्यासाठी पौलाने ख्रिस्ताचा आदर्श उदाहरणाचे पुन्हा स्मरण केले आहे. येशूने स्वीकारलेली नम्रता, मानहानी आणि मग सर्वांचा प्रभू म्हणून उच्चपदी बसवणे हे स्पष्टपणे सांगितले आहे.

 

शुभवर्तमान: मत्तय २१:२८-३२

ह्या येशूच्या दाखल्याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे. शास्त्री व परुशी ह्यांनी  देवाच्या आज्ञा काटेकोरपणे पाळण्याचे सांगुन त्या पाळल्याच नाहीत. दुसरीकडे आपण पाहतो की जकातदार व वेश्या लोकांनी त्यांनी देवाच्या आज्ञा न सांगता पाळल्या.

हा दाखला कोणाचीच स्तुती करण्यासाठी वापरलेला नाही तर तो फक्त दोन प्रकारच्या अर्धवट किंवा अपूर्ण असणा-या लोकांची प्रतिमा दर्शविण्यासाठी आपल्यासमोर ठेवण्यात आला आहे. ह्याचा अर्थ असा की एक गट दुस-यापेक्षा श्रेष्ठ नाही. दाखल्यामधील एकही मुलगा वडिलांना आनंद देण्यासारखा नव्हतादोघेपण असमाधानकारक होतेपरंतू शेवटी ज्याने पश्चाताप करून वडिलांच्या आज्ञेचे पालन केले तो अनिश्चितपणे दुस-यापेक्षा चांगला होता.

ज्या मुलाने वडिलांच्या आज्ञेचे पालन कोणताच प्रश्न न विचारता किंवा त्याचा मान राखून केला असता तर तो परिपूर्ण किंवा उत्कृष्ट मुलगा म्हणून संबोधण्यात आले असते. परंतू दाखल्यातील सत्य आपल्याला वेगळीच परिस्थिती दाखवते. ही दाखल्यातील स्थिती ह्या जगात दोन प्रकारचे लोक असल्याचे आपल्याला सांगते. एक गट असा जो धार्मिक प्रकारचा दिसतो परंतू जेव्हा ती धार्मिकता आपल्या जीवनाद्वारे दाखविण्याची वेळ येते तेव्हा हे त्या धर्मिकतेमध्ये मागे पडतात आणि दुसरा गट जो धार्मिक नसूनदेखील काही अनपेक्षित क्षणाला धार्मिक असल्याचे आपल्याला दिसून येते. कृतीची जागा कोणीही दिलेले वचन कधीच घेऊ शकत नाही असे हा दाखला स्पष्ट करतो. बोललेले चांगले शब्द कोणत्याही केलेल्या चांगल्या कृत्यांची जागा घेऊ शकत नाही. ख्रिस्ती जीवन हे शब्दांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात घडणा-या कृतीला जास्त प्राधान्य देते.  

 

मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,

प्रत्येक मनुष्याच्या जीवनात खाच-खळगे, चढ-उतार, असतात कारण या परिस्थितीतून जात असताना आपणा सर्वांना स्वतःच्या व दुसऱ्याच्या अस्तित्वाची जाणीव होत असते. कित्येक वेळा आपण दुसऱ्या व्यक्तीचे ऐकून आपला निर्णय घेत असतो; म्हणून जर आपण सत्याच्या म्हणजे देवाच्या मार्गावर चालत असाल, तर आपण दुसऱ्याचे न ऐकता देव शब्द ऐकण्याचा व त्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्या प्रकारे चांगले शब्द आपल्याला प्रेरणा देतात, घडवतात व जोपासतात त्याचप्रमाणे वाईट शब्द व विचारदेखील आपला आत्मविश्वास कमजोर व ठिसूळ बनवतात. म्हणून आपण काय ऐकावे व काय नाही ह्यावर स्वतः विचार केला पाहिजे म्हणूनच अशी एक म्हण आहे, ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे.’

आज देऊळमाता आपणासमोर दोन प्रकारच्या व्यक्तीचा दृष्टांत ठेवत आहे. दृष्टांतात सांगितल्याप्रमाणे दोघाही मुलांची मनोवृत्ती चांगली नव्हती, परंतु जो छोटा मुलगा असतो त्याला नंतर कळून चुकते की त्यांने वडिलांच्या आज्ञेचा भंग केला आहे आणि म्हणून त्याला पश्चाताप होतो आणि त्या पश्चातापी अंत:करणाने तो मुलगा वडिलांची आज्ञा पाळतो. शास्त्री परुशी व अधिकारी गर्वाने फुलले होते. कारण त्यांना परमेश्वराने निवडलेले होते, ते मोशेचे नियम तंतोतंत पाळत होते आणि म्हणून आपण स्वर्गाचे वारसदार आहोत असे त्यांस वाटत होते. परंतु येशू ख्रिस्त ही त्यांची खोटी समजूत दूर करण्यासाठी दोन मुलांचा दाखला त्यांच्यासमोर ठेवतो आणि त्यांस सांगतो, तुमच्या गर्वामुळे व पश्चाताप न केल्यामुळे तुम्हाला स्वर्गराज्याच्या बाहेर टाकण्यात येईल. पण जकातदार व कसबिणी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातील कारण त्यांनी संपूर्ण मनाने पश्चाताप करून ते खरेखुरे स्वर्गाच्या राज्याचे वारसदार बनले आहेत.

१. आज येशू ख्रिस्त आपल्यासमोर दोन पुत्रांची मनोवृत्ती समजावून देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा पहिल्या मुलाला विचारले; तेव्हा तो म्हणाला मी ताबडतोब जातो, पण गेला नाही. ह्या प्रकारची माणसे आपल्याला आपल्या समाजामध्ये भेटतात. ह्या मुलाप्रमाणे ते सुद्धा आपल्याला खूप काही गोड शब्दाने सांगतात. उदाहरणार्थ पॉलिटिशन खूप काही आश्वासन देतात, परंतु जे शब्दाने सांगितलेले आहे ते कृतीमध्ये कधीच आणत नाहीत किंवा पाळत नाहीत.

२. दुसरा मुलगा ज्याला विचारलं होतं की, आज तू द्राक्ष मळ्यात काम कर पण त्यांने नकार दिला,  त्यानंतर त्याला पश्चाताप झाला व तो गेला. ह्या प्रकारची माणसेसुद्धा आपल्याला समाजामध्ये दिसून येतात. जे शब्दांनी नव्हे, तर कृतीमधून आपल्याला त्यांच्या चांगुलपणाची जाणीव करून देतात. अशी लोकं किंवा माणसे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालतात, वागतात व कृतीतून ते सिद्ध करतात. येशू ख्रिस्ताने कित्येक अशे दृष्टांत आपल्यासमोर मांडलेले आहेत. ह्या दृष्टांतामधून आपण आपल्या जीवनासाठी काहीतरी शिकलं पाहिजे. हे दृष्टांत आपणा सर्वांच्या जीवनात दोन गोष्टी करतात: एक म्हणजे ‘आपलं जीवन चांगलं जगण्यासाठी ते आपणा समोर एक प्रकारे आव्हान ठेवतात. दुसरं म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास प्रेरणा देतात.

‘हो’ आणि ‘नाही’ हे दोन छोटे शब्द आहेत. पण ह्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण बऱ्याच गोष्टी गमावतो, ‘नाही’ लवकर बोलल्यामुळे आणि ‘हो’ उशिरा बोलल्यामुळे. कारण आपल्या शब्दांमध्ये व कृतीमध्ये खूप फरक असतो. जे आपण बोलतो ते करत नाही व त्याचा आपल्याला पश्चाताप होतो. बहुतेक वेळा आपणसुद्धा यहुदी शास्त्री-परुशी व अधिकाऱ्यासारखे होतो. आपण फक्त आश्वासने देतो, पण कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करीत नाही किंवा कृतीमध्ये आणत नाही. आपण त्या शास्त्री पुरुषांप्रमाणे गर्वाने चालतो, वागतो. पण आपण किती मोठे पापी आहोत हे मात्र विसरत असतो. असे असूनही परमेश्वराच्या दयेचा दरवाजा आपणा सर्वांसाठी खुला आहे. दुसऱ्या मुलाप्रमाणे मी द्राक्षमळ्यामध्ये काम करण्यास जात नाही असे म्हटले असाल, तरीपण परमेश्वर आपणाला अजून एक संधी पश्चाताप करण्याची देत आहे. ज्याप्रमाणे परमेश्वराच्या दये व करूणेमुळे जकातदार, कसबिणी, येशू ख्रिस्ताबरोबर ख्रुसावर टांगलेला चोर, माग्दलाची मरिया, तसेच हिप्पोचा अगस्तीन हे संत झाले, त्याचप्रमाणे तोच परमेश्वर आपल्यालादेखील त्याच्या स्वर्गराज्यात प्रवेश देऊन संताच्या मंडळात समावेश करू शकतो, केवळ पश्चाताप करणे आवश्यक आहे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रेमळ पित्या, आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांनी स्वतः सत्याच्या मार्गावर चालून इतरांना सत्याच्या मार्गावर चालण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. सर्व ख्रिस्ती भाविकांनी स्वार्थाचे जीवन सोडून इतरांच्या अडचणीत त्यांना हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. सर्व युवक-युवती व लहान मुलांनी त्यांच्या आईवडिलांच्या आज्ञेप्रमाणे वागावे व जीवनात चांगल्या गोष्टी आत्मसात करून वाईट गोष्टी टाळाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आपण सर्वांनी येशू ख्रिस्तासारखे सेवाभावी आणि विनम्र जीवन जगावे व देवाने दिलेल्या सर्व देणग्यांचा योग्य वापर करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आज संपूर्ण जग कोरोना विषाणूंच्या संसर्गाने भयभीत झाले आहे. सामाजिक व आर्थिक जीवन विस्कळीत झाले आहे. हे भय पवित्र आत्म्याच्या धैर्याने दूर व्हावे व संपूर्ण जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा ईश्वर चरणी समर्पित करूया.   

 

Friday 18 September 2020


    Reflections for the 25h Sunday in Ordinary Time (20/09/2020) by Dn. Jackson Nato 









सामान्य काळातील पंचविसावा रविवार

 

दिनांक: २०/०९/२०२०

पहिले वाचन: यशया ५५:६-९

दुसरे वाचन: फिलीपीकरांस १:२०-२४,२७

शुभवर्तमान: मत्तय २०: १-१६

 




‘परमेश्वराचे मार्ग व कल्पना या मानवी मार्ग व कल्पनेपेक्षा उंच व खूप वेगळ्या आहेत.’ 

 प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील पंचविसाव्या आठवड्यात पदार्पण करत आहोत.आजची उपासना आपल्याला परमेश्वराचा ‘न्याय व करूणा’ यावर मनन चिंतन करण्यास आमंत्रण देत आहे. आपल्या आजूबाजूला, देशात, जगात सर्व लोक न्यायाने वागण्यास तसेच कुठलाही गैरवापर किंवा भ्रष्टाचार न होता प्रत्येकाला न्याय मिळावा ह्याची अपेक्षा करतात. ‘चांगल्या कृत्याला चांगल्या मोबदल्याची देण व दुष्कार्माला शिक्षेची’ देण ह्या सूत्रावर आपण याची व्याख्या करतो; परंतु देवाच्या व्याख्येत न्यायाचे स्पष्टीकरण एवढ्या पुरतेच उरत नाही, तर त्यात करुणेचीसुद्धा भर पडते. म्हणूनच परमेश्वर करूणेने न्याय करतो तेच आजची उपासना आपल्याला सांगू इच्छिते.

आजच्या उपासनेवर नजर टाकली, तर पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सांगतो की, ‘परमेश्वराचे मार्ग व कल्पना या मानवी मार्ग व कल्पनेपेक्षा उंच व खूप वेगळ्या आहेत.’ दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगू इच्छितो की, प्रत्येक कृत्याने आपण ख्रिस्त प्रगट केला पाहिजे. तसेच शुभवर्तमानात द्राक्ष-मळ्याचा दाखला देऊन ख्रिस्त परमेश्वराची ‘करुणाबद्ध न्यायता’ याची ओळख करून देतो.

आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात ‘जशास तसे न वागता, त्यात करुणेची भर घालावी.’ यासाठी लागणारी कृपा आपणास मिळावी म्हणून आपण या मिस्सा बलिदानात प्रार्थना करूया.

 पहिले वाचन : यशया ५५:६-९

आजच्या पहिल्या वाचनात प्रेरक गणला जाणारा देवाचा संदेष्टा यशया ह्याच्याद्वारे देव सर्वांसाठी त्याच्याजवळ येण्याचा मार्ग मोकळा करत आहे व त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्यास प्रोस्ताहन देत असून, पापी लोकांस पाप सोडून नितीमत्व अंगी बाळगण्यास तसेच स्वत:च्या कल्पना सोडून देवाचे विचार व कल्पना सिद्धीस नेण्यास जणू प्रेरणादायी उपदेश करत आहे. यशया संदेष्ट्याद्वारे देव सर्वाना स्वत:कडे बोलावत असून, देव म्हणतो की, “तुम्ही मजकडे या, मी क्षमाशील आहे; माझ्या विचारांना, माझ्या कल्पनांना तुमच्या जिवनात स्थान द्या, माझ्या मार्गावर चाला, म्हणजे स्वर्गराज्यात तुमचा समावेश केला जाईल.येथे आपणास देवाची उदारता दिसून येते. आपल्या प्रत्येकाच्या तारणासाठी खुद्ध देव यशया संदेष्ट्याद्वारे तारणदायी संदेश आजच्या पहिल्या वाचनात देत आहे.  

 दुसरे वाचन : फिलीपीकरांस १:२०-२४,२७

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल फिलिपीकरांस ख्रिस्ताला पांघरण्याचा, ख्रिस्तामध्ये जीवन जगून खुद्ध ख्रिस्त बनण्याचा इशारा देत आहे. ख्रिस्ताची सुवार्ता अंगी धारण करून जगणे किवा मरणे हे केवळ ख्रिस्तासाठीच असले पाहिजे, व शेवटी जगताना ख्रिस्तासमवेत जगावे तर मरताना ख्रिस्त इतरांना देणे ह्या दोन बाबींचे अतिशय उत्कृष्टपणे वर्णन केलेले आपणाला दिसून येते. आपल्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा हा नक्कीच होतो. परंतू, आपल्या चांगल्या कार्याने मरणानंतर देखील त्याचा गौरव होऊ शकतो म्हणून संत पौल आवर्जून सांगतो की मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे.

 शुभवर्तमान : मत्तय २०:१-१६

मत्तयलिखीत शुभवर्तमानातून घेतलेल्या आजच्या वाचनात प्रभू येशू ख्रिस्त एका दाखल्याद्वारे स्वर्गराज्याचे भागीदार होण्यास आमंत्रण देत आहे, तसेच नीतिमान व पापी ह्यांच्यातील भेदाची तफावत नष्ट करित आहे. देव कधीच भेदभाव करीत नाही. सर्वाना तो समानतेने वागवतो. अशाप्रकारे प्रेमाच्या व क्षमेच्या उदारतेने व दानशूरतेने देव आपणा प्रत्येकास स्वर्गराज्याचे हक्कदार होण्यास पात्र ठरवत आहे. शुभवर्तमानाच्या दुसऱ्या भागात स्वतःची दुसऱ्याबरोबर तुलना न करता, स्वतःला श्रेष्ठ न समजता, दुसऱ्याच्या कमीपणात स्वतःचे योगदान देऊन समाजात जणू समानता प्रस्थापित करण्याचा संदेश ख्रिस्त आपणास देत आहे. अशाप्रकारे उदारता, दानशूरता व समानता ह्या तत्वाच्या माध्यमातून ख्रिस्त आपणास स्वर्गराज्यासाठी झटण्यास आव्हान देत आहे.    

 बोधकथा:

काही महिन्या अगोदर मी एका फादरांकडे अनुभवासाठी गेलो होतो. ते फादर चर्चच्या  कमाबरोबर शेतीचीसुद्धा पाहणी करत. शेतं खूप मोठं नव्हतं, त्याच्यातून येणार वार्षिक उत्पन्न सुमारे 30 ते 35 हजारच्या आसपास असेल. उत्पन्नातून सर्व खर्च वीस ते बावीस हजार होता. त्यात फादरांनी एक मजूर ठेवला होता ज्याला दिवसाला पाचशे रुपये प्रतिदिन मजुरी होती. अशाप्रकारे त्या मजुराची एकूण मजुरी सात ते आठ हजारपर्यंत जात असे व जो वरील नफा उरत असे तो फक्त पाच ते सहा हजार. पण या सर्व गोष्टीत माझ्या लक्षात आले की मजुराला कामावर ठेवणे जरुरी नव्हते, कारण त्याचे काम फक्त एक किंवा दोन दिवसाचे होते, उरलेले दिवस फक्त शुल्लक काम असे जे आपणही करू शकतो असे. जेव्हा हे मी फादरांच्या कानावर घातले, तेव्हा फादर म्हणाले, ब्रदर मला समजते पण मी मुद्दामहून ह्या मुजराला कामावर बोलावितो जेणेकरून त्यामुळे त्याच्या घरात चूल पेटेल.

 मनन चिंतन:

माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, आजची उपासना आपल्याला ‘न्याय व करुणा’ या विषयावर मनन चिंतन करण्यास बोलावत आहे. न्याय म्हणजे काय? न्याय म्हणजे लोकांना दिलेली उचित वागणूक होय. परंतु आजच्या शुभवर्तमानावर जर आपण नजर टाकली, तर देव अन्यायी असल्याचं आपल्या कल्पनेला भासते. जर आपण न्यायाची व्याख्या, दुसऱ्यांना उचित वागणूक देणे किंवा त्याला त्याचा योग्य मोबदला देणे ह्या प्रमाणे केली, तर आजच्या शुभवर्तमानातील दाखल्यात देव नक्कीच अन्यायी आहे किंवा त्याची वागणूक अनुचित आहे. यावर आपण शिक्का  मारल्याशिवाय राहणार नाही. शुभवर्तमानाची सुरुवात स्वर्गाचे राज्य हे द्राक्ष मळ्याच्या धन्यासारखे आहे अशी केलेली आहे. जो दिवसाच्या सुरुवातीला आलेल्या व अखेरीस आलेल्या मजुरांना सारखाच मोबदला देतो आणि म्हणून जर परमेश्वराची तुलना आपण या द्राक्ष मळ्याच्या धन्या बरोबर केली, तर नक्कीच परमेश्वर अन्यायी आहे हे आपल्या मानवी कल्पनेला भासते.

पण देव मानवाप्रमाणे विचार करत नाही, ख्रिस्ताला आजच्या दाखल्यातून सांगायचे आहे. याचाच प्रत्यय आपल्याला आजच्या पहिल्या वाचनात येतो. तेथे परमेश्वर म्हणतो की, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत. म्हणून आपण परमेश्वराचे मार्ग किंवा त्याच्या कल्पना काय आहेत हे समजायला पाहिजे.

आजचा दाखला हा देव राज्याविषयी आहे. जेथे धनी म्हणजे परमेश्वर मजूर म्हणजे आपण मानव व मोबदला किंवा मजुरी म्हणजे सार्वकालिक जीवन. जर आपण ह्या प्रमाणे विचार केला, तर नक्कीच ‘देव अन्यायी नाही’ हे आपल्याला उमगते. कारण जेव्हा आपण सार्वकालिक जीवनाची अपेक्षा करतो, तेव्हा ते आपण मिळविले आहे असा दावा करू शकतो का? कारण चिरंतन जीवन ही परमेश्वराकडून आपणांस मिळालेली एक मोफत भेट आहे. ते परमेश्वराच्या उदारतेच एक उदाहरण आहे. म्हणून ते आपण मिळवू शकतो असा दावा आपण करू शकत नाही, तर त्याचा स्वीकार करण्यास फक्त तयारी करू शकतो. कारण ते त्याच्याकडून आपल्याला मोफत मिळते. अशाप्रकारे परमेश्वराच्या करुणेची आपल्याला जाणीव होते.

आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की द्राक्षमाळ्याचा धनी मजुरांवर करुणा दाखवितो. दिवसाअखेरीस शेवटच्या तासाला तो मजुरांना मळ्यात कामास लावितो व त्यांना प्रमाणापेक्षा जास्त वेतन देतो; कारण त्या धन्याला माहित आहे की, जर त्यांना कामावर घेतले नाही, तर त्यांचा दिवस व्यर्थ जाईल. एवढेच नव्हे, तर त्यांच्यासमोर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहील. कारण त्यांचे कुटुंब त्यांवर आवलंबून आहे. म्हणून त्यांच्यावर करुणा दाखवून तो त्यांस कामावर ठेवितो व त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेस पुरेल एवढेवेतन त्यास देतो. हेच आहे न्याय व करुणेचे उदाहरण.

परमेश्वर आपणा सर्वांना न्याय देतो. न्यायाने वागवितो पण त्याचा तो उचितपणा करुणेविना अपुरा आहे. परमेश्वराच्या न्यायाचं आपण मानवी शब्दात स्पष्टीकरण करू शकत नाही. कारण त्याच्या न्यायात करुणा ओसंडून वाहते. त्याच्या न्यायाच्या शिक्क्याची दुसरी बाजू करुणा आहे.

अशाप्रकारे आपणसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात फक्त न्यायास धरून नव्हे, तर त्यास करुणेची सुद्धा साय असावी. ज्याप्रमाणे देव आपला न्याय करुणेने करतो, त्याचप्रमाणे आपणसुद्धा दुसऱ्यांचा न्याय करताना त्यांना योग्यतेने वागविताना दुसऱ्यांवर करुणा करावी.      

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐकून घे.

१. आज आपण आपल्या पवित्र ख्रिस्तसभेसाठी विशेष प्रार्थना करूया. आपले पोपसर्व महागुरूधर्मगुरूधर्मभागिनी व धर्मबंधू यांना प्रभुची सुवार्ता पसरविण्यासाठी भरपूर असा आशिर्वाद मिळावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांवर ख्रिस्ताचा आशीर्वाद यावा व स्वतःला नाकारून जगातील आनंदापासून वंचित राहून जागतिक मोह-मायेचा त्याग करून आपण शुभवर्तमानाच्या मुल्यांप्रमाणे जगावेम्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

 ३. हे प्रभू परमेश्वराजी कुटूंबे तुझ्यापासून दुर गेली आहेत व तुझ्या शब्दाचा मान करत नाहीतत्या सर्वांवर तुझा पवित्र आत्मा पाठव व तुझ्या कृपेने त्यांचे मनपरिवर्तन व्हावेम्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे कोणी कोरोना व्हायरस या आजाराने आजारी आहेत अशांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेतत्याचप्रमाणे ह्या व्हायरसवर लवकरच औषध मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या वैयक्तिककौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

 

Friday 11 September 2020


Reflections for the
24th Sunday in Ordinary Time (13/09/2020) by Dn. Rahul Rodrigues

सामान्य काळातील चोविसावा रविवार

 

दिनांक: १३/०९/२०२०

पहिले वाचन: बेन सिरा ची बोधवचने २७:३३-२८:९

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १४:७-९

शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५


 


‘विनाअट क्षमा करा’

 

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील चौविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्या शत्रूला क्षमा करावयास संबोधित आहे. आपण ‘आमच्या बापा’ ह्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, ‘जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर.’ जर आपण क्षमा केली नाही, तर आपणालाही परमेश्वर क्षमा करणार नाही.

आजची तिन्हीही वाचने आपल्याला हेच समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजच्या पहिल्या वाचनात बेन सिराची बोधवचने आणि मत्तय लिखित शुभवर्तमानात आपणास सांगण्यात येते की, ‘इतरांना क्षमा करा, म्हणजे तुम्हालाही देव क्षमा करील.’ तर पौलचे रोमकरांस पत्र ह्या आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, बाप्तिस्माद्वारे आपण ख्रिस्ताशी एक झालो आहोत आणि आपले जगणे किंवा मरणे हे ख्रिस्ताठायी असावे.

क्षमा हा ख्रिस्त सभेचा एक महत्त्वाचा भाग किंवा मुलभूत घटक आहे. ख्रिस्ताने आपल्याला क्षमा करावयास शिकविले आहे. त्याच ख्रिस्ताकडे आपण मागूया की, ‘हे ख्रिस्ता आम्हाला तुझ्या सारखे इतरांना क्षमा करण्यास शिकव’.

 

पहिले वाचन: बेन सिराची बोधवचने २७:३३-२८-९

आजच्या पहिल्या वाचनात बेन सिरा आपल्याला सांगतो की, जर परमेश्वराने आपल्याला क्षमा करावी असे आपल्याला वाटत असेल, तर आपणही दुसऱ्यांना, इतरांना क्षमा करणे गरजेचे आहे. जर आपण इतरांविषयी सूड भावना ठेवली, तर परमेश्वरसुद्धा आपल्याविषयी सूडाची भावना ठेवील. जर आपणाला आपला शेवट समजला, तर आपण नक्कीच देवाच्या आज्ञा पाळू.

 

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १४:७-९

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की, तुम्ही तुमच्या भावाला तुच्छ मानू नये. खाणे-पिणे किंवा एखादा दिवस पाळणे याविषयी आपण एकमेकांचा अन्याय करीत बसू नये. ही गोष्ट आपल्या अधिकारात येत नाही. कारण आपण प्रभूसाठी जगण्याचा प्रयत्न करीत आहोत. काहीजणांना एखाद्या गोष्टीविषयी अजून पूर्ण शिक्षण मिळाले नसेल, किंवा त्यांच्या अनुभवांची त्यांच्या भावनेवर परिणाम झाले असतील. आपल्या जीवनात प्रमुख हेतू प्रभूकरिता जगणे असावा. हा विचार मनावर बिंबवा व ज्या शुल्लक गोष्टी आहेत त्याबद्दल इतरांवर टीका करीत बसू नका.

 

शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५

विनाअट क्षमा करा. आपल्या बंधुचा दोष दाखविण्याची जबाबदारी पार पाडताना त्याला क्षमा करण्यास विसरु नकोस. सात वेळा पापक्षमा करून मी फारच उदारपणा दाखवित आहे असे पेत्राला वाटले. कारण फक्त तीनदा क्षमा करावी, असे शास्त्री शिकवीत होते. ख्रिस्ताने त्याला धक्काच दिला. सात वेळा नव्हे, तर सत्तर पट सातवेळा क्षमा कर.

ख्रिस्ताने ह्या विशाल क्षमेचे कारण एका उदाहरणाने सांगितले. एका मनुष्याला लाखो रुपयाचे कर्ज होते. ते त्याला करता येत नव्हते. तेव्हा राजाने त्याचे संपूर्ण कर्ज माफ केले. यानंतर त्या कर्जदाराला त्याचा एक सोबती भेटला, त्यांनी शंभर रुपये उसणे घेतले होते. त्याला जरासुद्धा दया न दाखविता व आपल्याला किती प्रचंड कर्जमाफी झाली आहे याचा विचार न करता, त्यांने आपल्या सोबत्याला तुरुंगात टाकले. या कर्जदाराची ही कृती दृष्टाइची होती. स्वतःवर जे उपकार झाले आहेत, त्याबद्दल तू कृतज्ञ-उपकार शील नव्हता. त्याच्या कृतीनेच त्याने दाखविले. जशी ख्रिस्ताने आपल्याला क्षमा केली, तशी क्षमा करण्यास तो आपणालाही आव्हान करत आहे.

 

बोधकथा:

एकदा पोप बेनेडिक्ट सोळावे आपल्या व्हॅटिकनच्या बाल्कनीतून आशीर्वाद देत असताना, एका डोकेफिरू माणसाने बंदुकीतून पोप साहेबांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्याने आपली बंदूक काढून पोप साहेबांवर नेम धरला आणि बंदुकीचा चाप दाबला, दुर्दैवाने त्यातून गोळी झाडली गेली नाही, मग शिपायांनी त्याला धरले व तुरुंगात टाकले. जेव्हा त्याला पोप साहेबा समोर उभे केले, तेव्हा तो म्हणाला की, मला खंत आहे की, माझी बंदूक खराब झाली. पोप साहेबांनी त्याला चांगल्या भाषेत म्हटले, तुझी बंदूक चालली नाही; कारण तू गर्दीत उभा होतास व मी लोकांबरोबर तुलासुद्धा आशीर्वाद दिला होता. तू घरी जा व पुन्हा असे करू नकोस. तुझी मुलं व पत्नी या गोष्टीने घाबरले असतील व तुझी वाट पहात असतील.

 

मनन चिंतन:

‘चुकणे हा मानवी स्वभाव आहे, परंतु क्षमा करणे हा दैवी स्वभाव आहे.’

आज जेव्हा आपण समाजाकडे पाहतो, तेव्हा आपल्याला दिसून येते की आज प्रत्येक नात्यांमध्ये दरार पडलेली आहे. नवरा बायकोशी बोलत नाही, भाऊ बहिणीची बोलत नाही, मुलगा आईशी, मुलगी बाबाशी आणि सर्वांचं कारण एकच कोणीही एक दुसऱ्याला समजून घेण्यास तयार नाही. कोणीही क्षमा करण्यास तयार नाही. जर मी क्षमा मागितली, तर मला कमी लेखातील. माझी चूकच काय आहे? अशा प्रकारच्या विचारांनी कोणीही इतरांनाक्षमा करण्यास पुढे जात नाही. परंतु या सर्वात कोणाचा तोटा होत असतो, तर आपलाच. आपण दुसऱ्यांना क्षमा करत नाही, म्हणून कोणी आपल्याला क्षमा करत नाही.

मराठी मध्ये एक म्हण आहे, ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण.’ म्हणजे आपण जर मनात क्रोध, मत्सर, हेवा ठेवला, तर तो आपल्याला त्रास होणे हे निश्चितच आहे. आणि म्हणूनच काही व्यक्तीची अशी परिस्थिती झालेली आढळते: ‘दिवसा आपल्याला चैन पडत नाही, रात्री आपल्याला झोप लागत नाही.’ परंतु आजची उपासना आपल्याला आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या एका मूलभूत पाया आहे तो म्हणजे क्षमा यावर/किंवा याविषयी आठवण करून देत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आणि शुभवर्तमानातसुद्धा हेच आपल्याला सांगितलेले आहे की, दुसऱ्यांना समजून घ्या, क्षमा करा. संत पौल म्हणतो, आपलं जीवन ख्रिस्ताचे जीवन आहे. आपण जगलो, तर ख्रिस्तासाठी आणि मेलो तरी ते ख्रिस्तासाठीच. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केली, त्याचप्रमाणे आपणही तशी क्षमा करणे गरजेचे आहे. आपण ख्रिस्ताचे हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाला एक नवीन कलाटणी द्यायला हवी.

आज समाजामध्ये अशी बरीचशी उदाहरण आहेत जी आपल्या ख्रिस्ताची शिकवण अनुसरण्यास मदत करतात. सिस्टर राणी मरियेच्या आईने आणि बहिणीने तिच्या मारेकऱ्याला तुरुंगात जाऊन क्षमा केली, एवढेच नव्हे तर त्याला भाऊ देखील मानले. तुम्ही नुसती क्षमा करणे इतक्यात संतुष्ट राहायला नको, तर ती क्षमा अनुभवायला सुद्धा हवी. आपण कितीवेळा क्षमा करतो हे गरजेचे नाही, तर कशाप्रकारे आपण क्षमा करतो हे फार महत्त्वाचे आहे. क्षमा करणे फक्त शब्दात नाही, तर ते आपल्या कृतीत उतरविणे देखील फार गरजेचे आहे. आपण जेव्हा इतरांना क्षमा करतो, तेव्हा परमेश्वरही आपल्याला क्षमा करत असतो व त्यामुळे आपण आपल्या जीवनात एक प्रकारची सुख, शांती अनुभवतो. आपले जीवन तेव्हाच सुखमय होते जेव्हा आपण ख्रिस्ता सारखे वागतो. परंतु क्षमा करणे तितकेच सोपे नाही, तर ते कठीण किंवा अवघड आहे. ते आपल्या सामान्य शक्तीने आपल्याला शक्य होणार नाही, तर त्यासाठी देवाची कृपा असायला हवी. जो कोणी ख्रिस्तामध्ये एकरूप आहे तोच मनुष्य हे करू शकतो. त्यासाठी लागणारी कृपा शक्ती या पवित्र मिसा बलिदानात मागुया. 


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

 

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरु, व्रतस्थ बंधू-भगिनी व इतर प्रापंचिक यांनी सतत ख्रिस्ताची शिकवण अंगीकारावी. आपल्या जीवनात उतरवावी, तसेच आपल्यासाठी एक चांगला आदर्श निर्माण करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

२. आज कोरोना व्हायरसमुळे बरेचशे लोक बेरोजगार झाले आहेत व मानसिक तणावाखाली आहेत अशांना प्रभूची कृपा लाभावी लवकरात लवकर त्यांना काम-धंदा मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

३. जे कोणी कोरोना व्हायरस या आजाराने आजारी आहेत अशांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत, त्याचप्रमाणे ह्या व्हायरसवर लवकरच औषध मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

४. या वर्षी आपल्याला चांगला पाऊस परमेश्वराच्या कृपेने लाभला आहे. येणाऱ्या दिवसातही चांगला पाऊस व्हावा व सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपला बचाव व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

५. आज जगभर मरियेच्या नोवेना चालू आहेत, तर मरिया मातेच्या मध्यस्थीने आपल्या प्रत्येकाला चांगले आरोग्य लाभावे व पुन्हा एकदा आपले जीवन सुरळीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

 






Monday 7 September 2020


Reflections for the Nativity of Our Lady (08/09/2020) by Dn. Lipton Patil






मरीयेचा जन्मदिवस सोहळा

 

दिनांक: ८/०९/२०२० 

पहिले वाचन: मीखा ५:१-४

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२८-५०

शुभवर्तमान: मत्तय १:१-१६, १८-२६

 




प्रस्तावना:

हे पवित्र मरीये;

आज्ञाधारक बनलीस होऊनी प्रभूची दासी;

शिष्य झालीस बनुनी ख्रिस्ताची जन्मदाती!

पापमुक्त केलेस जगाला करुनी त्याग पुत्राचा;

मुकुट परिधान केलास होऊनी नम्र, लीन व सौम्य!

म्हणूनच आज तुला स्वर्गाचा व साऱ्या जगाचा मान मिळाला आहे. आजच्या दिनी संपूर्ण ख्रिस्त सभा पवित्र मरीयेचा जन्म दिवस सोहळा साजरा करीत आहे. पवित्र मरिया साधी, भोळी, निर्मळ, निष्कलंक व पापविरहित स्त्री होती म्हणूनच अखिल ख्रिस्तसभा व मानवजात पवित्र मरीयेला महत्वाचे स्थान देऊन तिचा गौरव करीत आहे. प्रभू ख्रिस्ताला जगात आणून त्यची जडण घडण केली व त्याच्या प्रत्येक कार्यात सहभागी झाली व आजसुद्धा स्वर्गातून आपणासाठी प्रार्थना करीत आहे. दुःखात व अपयशात कृपेचा वर्षाव करीत आहे. अंधाराच्या वाटेवर ती ज्योतिमय बनत आहे. आजची उपासना आपणास मरीयेप्रमाणे देवाच्या इच्छेला प्राधान्य देण्यास आमंत्रण करीत आहे व चांगले जीवन जगण्यास आव्हान करीत आहे.   

 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: मीखा ५:१-४

आता नवीन केलेल्या सियोनेकडून नवीन केलेल्या दावीदाच्या घराण्याकडे लक्ष वळवले आहे. ‘आता’ ह्या शब्दाने हा संदेश पूर्वीच्या संदेशाशी जोडला आहे (४:९, ११). नाकेबंदी केलेल्या नगराची आध्यात्मिक दृष्टीने मजबुती करण्यासाठी मीखाने आज्ञा केलेली आहे. बेथलेहेमा, एफ्राथा आणि यहूदा या नावांवरून दावीदचा पिता इशया ह्याच्या काळाचे स्मरण होते. बेथलेहेममध्ये मसीहाचा जन्म झाल्याने सियोनाच्या नवयुगाचा प्रारंभ होईल या अभिवचनाच्या आधारे मीखा सांगतो की, इस्राएलला सोडून देण्यात येईल. त्यांना कोणी मानवी राजा नसेल. जी वेदनेत आहे, ती प्रसवेपर्यंत, मसीहाला जन्म देईपर्यंत अशीच स्थिती राहील. मग पुढे सुमारे सातशे वर्षांनतंर हे भाकीत मारीयेद्वारे उरण होईल. तसेच सत्ताधीश, राज्यकर्ता, मसीहा उभा राहील म्हणजे सर्वकाळ कायम राहील. तो आपला कळप चारील. त्यांची प्रत्येक गरज भागविल. त्यांना आध्यात्मिक अन्न देईल आणि त्यांचे संरक्षण करील. तो मानवी योजना, रचना व हातचलाखी यांनी नव्हे, तर विश्वासाच्याद्वारे, देवाच्या सामर्थ्याने राज्य करील.त्याची प्रजा वस्ती करून सुरक्षित राहील, कारण सैतानाला जिंकून तो आपल्या राज्याचा दिगंतापर्यंत विस्तार करील.        

 

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२८-३०

देवाने आपल्या योजनेनुसार, प्रत्येक विश्वासणऱ्याला म्हणजेच नवजन्म पावलेल्या व्यक्तीला बोलाविले आहे. आपल्यावर कठीण परिस्थिती येत राहतात, परंतु या सर्वांवर देवाचे नियंत्रण आहे; व तो कार्य करीत असतो. अशा प्रकारे देव त्याच्या योजना आपणा प्रत्येकाच्या जीवनात पूर्ण करीत असतो.

 

शुभवर्तमान: मत्तय १:१-१६, १८-२६

आजच्या शुभवर्तमानामध्ये देवदूत योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन सांगतो कीमरियेच्या उदरी पवित्र आत्माच्या सामर्थ्याने आलेल्या बाळचे नाव तू येशू ठेवकारण तो आपल्या लोकांचे पापापासून तारण करील.मरियेच्या उदरी येणारा येशू हा दाविद राजाच्या वंशात जन्माला येणारा तारणारा अभिषिक्त (हिब्रु-मसिहाग्रीक-ख्रिस्त) आहे. दाविदाचा पुत्र येशू ख्रिस्तह्याची वंशावळ  हा या शुभवर्तमानाचा गाभा आहे. देवाने आब्राहाम व दावीद ह्यांच्याशी दोन करार केले होते. हे करार ख्रिस्तामध्ये पूर्ण झाल्याचे दिसून येते. येशू ख्रिस्तआब्राहाम व दावीद ह्यांच्या कुळातलाच होता हे या उताऱ्यातून कळते. तसेच योसेफ व मरीयेचा वाड़निश्चय झाला (वाग्दत्त) होता. ख्रिस्ताला मानवी देह धारण करता यावा याकरिता देवाने मरीयेची निवड केली. तिचा योसेफाशी सहवास येण्यापूर्वीच ती पवित्र आत्माने गर्भवती होती. अशारितीने ख्रिस्ताने मानवी देह धारण केला. येशू ख्रिस्त सनातन देव आहे व तो देह्धारी होणारा होता हे या घटनेपूर्वी सुमारे ६०० वर्षापूर्वी यशया संदेष्ट्याने लिहून ठेवले होते.  

मनन चिंतन:

भगवान बोलते है की,

तू वही करता है जो तू चाहता है,

फिर वही होता है जो मै चाहता हुँ|

इसलिए तू वही कर जो मै चाहता हुँ,

फिर वही होगा जो तू चाहता है|

मरियेने ईश्वराच्या वाणीला प्राधान्य दिले, स्वतःच्या इच्छेला नव्हे तर, ईश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगली. स्वतःचे संपूर्ण जीवन ईश्वराच्या हाती समर्पित करून घेतले ह्याच कारणास्तव आज ख्रिस्तसभा मरीयेला निरनिराळ्या शीर्षकांनी संबोधित आहे. खरोखरच पवित्र मारीयेचे मातृत्व, तिचे वात्सल्य माझ्या प्रवचानातून फेडता येणार नाही कारण आज कोणाला ती प्रेमस्वरूप वाटते, कोणाला वात्सल्यमय वाटते, कोणाला गुरु तर कोणाला कल्पतरू. कितीतरी रुपात ती आपली पाठ राखण करीत असते. तिच्या मायेच्या पंखाखाली संरक्षणाची, क्षमेची व करुणेची ऊब मिळत असते. तिच्या प्रेमाची सावली सदैव आपल्या बरोबर असते. ज्याप्रमाणे होकायंत्रे व मार्गदर्शक तारा भटकलेल्या लोकांना मार्ग दाखवतो तशाच प्रकारे पवित्र मरिया ख्रिस्तभक्तांना ख्रिस्ताचा मार्ग व रस्ता दाखवते; अर्थात ती तिच्या पुत्राकडे घेऊन जाते. कारण तिला ठाऊक आहे की सर्वकाही येशूला मिळत आहे. आज कितीतरी लोक दुखी, अपयशी व निरागस असताना मरीयेचा धावा करतात, कारण त्यांचा विश्वास सांगतो की पवित्र मरिया आपल्या सहाय्याला धावत येते व तिच्या पुत्राकडे मध्यस्थीची याचना करून तिची झोळी आपल्या तारणासाठी पसरविते. पवित्र मरिया जणूकाही आपला आधारस्तंभ आहे. एवेच्या आज्ञाभंगामुळे निर्माण झालेला गुंत्ता सोडवण्याचे काम मरीयेच्या आज्ञापालनाने केले. कुमारी मातेने तिच्या श्रद्धेने जगाला तारणहार दिला. ‘एवेद्वारे मृत्यू, तर मरियेद्वारे जीवन’.

आज आपण पवित्र मरीयेचा जन्मदिवस (सोहळा) साजरा करीत आहोत, म्हणजेच मरीयेचा सन्मान गौरव व आदरभाव करीत आहोत. एका बाजूला मरीयेला वंदन करतो व दुसऱ्या बाजूला स्त्रियांची विटंबना करतो. स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, बलत्कार, स्त्रियांची भ्रुणहत्त्या, स्त्रियांवर अॅसिड फेक, स्त्रियांचे लैंगिक शोषण जे काही अगोदरच्या शतकात घडून येत ते आजच्या शतकात सुद्धा पहायला मिळत आहेत. स्त्री घरामध्ये व घराबाहेर सुरक्षित नाही हिंस्त्र प्राण्यासारखे लोक स्त्रियांवर डाव रचून उभे असतात. ह्या लॉकडाऊनच्या काळात कितीतरी लहान बालिकेवर व स्त्रियांवर लैंगिक शोषण झाले. त्यांचा क्रूररित्या छळ केला जात आहे. आजसुद्धा मुलींना शिकण्याचा अधिकार मिळत नाही.  हुंड्याच्या भीतीपायी आईवडील स्वतःच्या पोटातील रक्ताच्या गोळ्याला मारून टाकतात, मग जेवणात विष घालतात तर विहिरीत ढकलून देतात. अशी ही दयनीय अवस्था स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी आपण स्त्रियांना एक माणूस म्हणून समाजात वागवत नाहीत.        

पवित्र मरीयेचे आज्ञापालन, तिची नम्रता, तिची सेवावृत्ती, तिची ख्रिस्ताशी असलेली निष्ठा, ख्रिस्ताशी असलेले तिचे आध्यात्मिक ऐक्य, तिची ख्रिस्त मंडळावरील प्रीती, तिचा आध्यात्मिक आशावाद, तिची अपार सहनशीलता व सर्वांकरिता करीत असलेली मध्यस्थी इत्यादि सदगुणांनी भरलेली ही आपली आई पवित्र मरिया. जर आपण पवित्र मरीयेची भक्ती करत असणार व स्त्रियांना तुच्छ लेखत असणार तर आपली भक्ती व्यर्थ आहे. आपल्या भक्तीबरोबर कृतीसुद्धा दिसली पाहिजे. आपण जेव्हा स्त्रीचा सन्मान करणार तेव्हाच आपण पवित्र मरीयेचा गौरव करणार. आज आपण पवित्र मरीयेकडून खूप काही शिकून घेऊ शकतो. ती ख्रिस्ताची पहिली शिष्य होती, तिने ख्रिस्ताच्या प्रत्येक कार्यात महत्वाची जवाबदारी बजावली आहे. ख्रिस्त जे काही सांगत होता ते तिने आज्ञाधाराकतेपणे, प्रामाणिकपणे, समजूतदारपणे व आनंदाने केले. ख्रिस्ताच्या दुःखात ती सहभागी झाली त्याच्याबरोबर दुःखाचीवाट चालली, व शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या पुत्राबरोबर राहिली म्हणूनच तिला  एक धाडसी स्त्री असे म्हणतात.

पवित्र मरीयेच्या या गुणांचा मान सन्मान व गौरव करीत असताना आपणास असा दिलासा मिळतो की, ही आपली वैभवशाली आई आम्हा दुर्बळ लेकरांकरीता सतत मध्यस्थी करते आणि तिच्या मायेची, ममतेची व वात्सल्याची नजर आपल्यावर कायम ठेवते. ती आपली नित्यसहाय्य करणारी आई आहे म्हणून आपण तिच्याकडे धाव घेतो व तिच्यापुढे नतमस्तक होतो.

          

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: पवित्र माते आम्हासाठी विनंती कर.

१. आपले परमगुरुस्वामी पोप फ्रान्सिस, आपले आध्यात्मिक मेढ़पाळ व आपल्या धर्मप्रांतात कार्यरत असलेले सर्व धर्मगुरु व व्रतस्थ ह्यांच्यावर परमेश्वराने भरपूर आशीर्वाद पाठवावा व त्यांचे आरोग्य चांगले रहावे, तसेच ख्रिस्तसभेचे कार्य करण्याकरिता त्यांना योग्य मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 

 

२. देवमातेच्या मध्यस्थीने  आम्ही अनाथ, निराधार, परक्या आणि पोरक्यांसाठी आशीर्वाद मागतो. आमच्या दानशूर वृत्तीमुळे त्याचे जीवन सदोदित आशीर्वादमय ठरो म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

 

३. सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी प्रार्थना करूया. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. खाजगी व सार्वजनिक क्षेत्रात प्रामाणिकपणे त्या कार्यरत आहेत. त्याची छळणूक होऊ नये म्हणून पवित्र मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याजवळ प्रार्थना करूया.

 

४. ज्या स्त्रिया मातृपदाची अपेक्षा आपल्या मनात बाळगून आहेत अशांवर देवाचा आशीर्वाद यावा व त्यांना मातृपद प्राप्त व्हावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

 

५. आज मरीयेच्या मध्यस्थीने विशेष प्रार्थना करूया कोरोनाच्या विषाणूने पिडीतझालेल्या लोकांसाठी. अशा लोकांना देवाचा स्पर्श व्हावा व लवकरात लवकर त्यांना चांगले स्वास्थ्य लाभावे, तसेच लवकरात लवकर ह्या रोगावर लस शोधण्यास संशोधकांना यश लाभावे, व जे लोक विशेषकरून डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आणि इतर लोक जे निस्वार्थीपणे कोरोनाग्रस्त लोकांची सेवा करत आहेत त्यांना विशेष आशीर्वादाने भरावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूसमोर ठेवूया.