Tuesday 25 August 2015


Reflections for the Homily on 22nd Sunday Of Ordinary Time  (30/08/2015)   by John Mendonsa.





                     सामान्यकाळातील बाविसावा रविवार 


दिनांक: ३०/०८/२०१५.
पहिले वाचन: अनुवाद ४: १-२, ६-८.
दुसरे वाचन: याकोब १:१७-१८, २१-२२, २७.   
शुभवर्तमान: मार्क: ७:१-८, १४-१५,२१-२८. 

   
  
प्रस्तावना:             
ख्रिस्ताच्या सान्निध्यात जमलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आज आपण सामान्यकाळातील बाविसावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणा सर्वांस देवाच्या प्रेमावर व देवाच्या नियमांवर विचार-विनिमय करण्यास आवाहन करत आहे.  
आजच्या उपासनेतील तिन्ही वाचने आपणांस धार्मिक विधी व नियम ह्यांची जाणीव करून देत आहेत. हे धार्मिक विधी व नियम आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात कशाप्रकारे आचरणात आणले पाहिजेत ह्याचे सुस्पष्टीकरण देत आहेत.
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला, धार्मिक विधी व नियम ह्यांचे केवळ ज्ञान न जोपासता हे धार्मिक विधी व नियम ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे सत्याने आचरणात आणावे म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये प्रार्थना करू या.

पहिले वाचन: अनुवाद ४: १-२, ६-८
देवाबरोबरच्या कराराच्या नात्यामध्ये इस्रायल लोकांकडून देवाला नेमके काय अपेक्षित होते, ते ह्या अध्यायातून स्पष्ट केले आहे. अनुवादाच्या पुस्तकात, ‘नियमशास्र’ या शब्दाचे वेगवेगळे अर्थ योजिले आहेत. उदा. विधी व नियम. अनुवाद ४:१-२ मध्ये नियमशास्रासाठी असे तीन वेगवेगळे शब्द योजिले आहेत. उदा. विधी, नियम आणि आज्ञा.
देवाच्या आज्ञा पाळणारेच देवाच्या आशीर्वादात राहतात व त्यांनाच जीवन लाभते हे ४:१ वरून स्पष्ट होते. इस्त्राएल जनतेने देवाच्या आज्ञेत तसेच काहीही अधिक उणे न करता देवाचे विधी व नियम काळजीपूर्वक पाळावेत.

दुसरे वाचन: याकोब १:१७-१८, २१-२२, २७.   
वचन १७ मध्ये याकोब ‘देवाला’ ज्योतीमंडळाचा पिता असे संबोधतो. तो विश्वाचा निर्माता व नियंत्रक आहे. त्याने निर्माण केलेले ग्रह, तारे बदलतात परंतु देव कधीही बदलत नाही. तो नेहमी होता तसाच आहे व असणार. म्हणूनच प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्ण दान आपल्याला पित्याकडून लाभते. पित्याने प्रेमाने आणि सत्य वचनाने आपल्याला नवजन्म दिला आहे. ह्यात पित्याचा उद्देश हाच आहे की, आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जणु काय प्रथम फळ व्हावे.
     याकोबने केवळ शास्त्रलेखाचे बौद्धिक ज्ञान असणे, भक्तीपर शिक्षण मिळालेले असणे एवढेच पुरेसे नाही तर “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. वचन २७ नुसार शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे खरे धर्माचरण होय. ह्यामध्ये प्रीतीकर्मांचा समावेश असावा. उदा. अनाथांची काळजी घेणे, विश्वाची काळजी घेणे आणि स्वत:ला जगापासून निष्कलंक ठेवणे होय.  

शुभवर्तमान: मार्क: ७:१-८, १४-१५,२१-२८.      
     यहुद्यांच्या अनेक रूढी होत्या व त्या ते काटेकोरपणे पाळीत असत. काही मौखिक हस्तगत रूढी वाड-वडीलांपासून चालत आल्या होत्या. त्यातीलच एक परंपरा म्हणजे जेवणापूर्वी हात धुणे.
     यहुदी लोक हात स्वच्छ व्हावेत म्हणून ते धूत नव्हते तर ‘हात स्वच्छ धुणे म्हणजे विधीपूर्वक स्वच्छ होणे असे होते व जर अशुद्ध हातानी, म्हणजे हात न धुता जेवण केले तर जेवणही अशुद्ध होते असा त्यांचा विश्वास होता. ह्याच हेतूने यहुदी लोक प्याले, घागरी, पितळेची भांडी व इतर पात्रे विधी म्हणून धूत असत (मार्क: ७:४).
त्याचप्रमाणे यहुदी लोक बाजारात जात तेव्हा चुकून त्यांना इतर लोकांचा स्पर्श होत असे मग ते स्वत:ला अशुद्ध मानत असत. त्यांना जेवणापूर्वी विधिवत स्नान करावे लागत असे. अशाप्रकारचे शेकडो नियम होते. ह्या नियमांच्या आधारावरच परुशी व शास्री यांनी येशूला व त्याच्या शिष्यांना ते वाड-वडीलांच्या परंपरा पाळीत नाहीत म्हणून दोष दिला कारण जेवणापूर्वी त्यांनी हात धुतले नव्हते.
     आपल्या शिष्यांनी परंपरा मोडल्या हे येशूने नाकारले नाही. परंतु या परंपरा केवळ मानवनिर्मित आहेत, देवनिर्मित नाहीत ह्या मुद्द्याद्वारे त्याने आपल्या शिष्यांचे समर्थन केले. कारण प्रभू येशूला परुशी व शास्री यांचा ढोंगीपणा माहित होता. ते बाहेरून शरीर जरी स्वच्छ करीत असले तरी त्यांचे हृद्य मात्र मलीन होते. येथे त्यांचा गर्विष्टपणा येशू त्यांना दाखवून देतो. त्यांच्यात देवाबद्दल प्रीती नव्हती. ओठांनी ते मोठ्या प्रार्थना करीत होते, पण अंत:करणपूर्वक ते देवाची भक्ती करीत नव्हते व त्याला सन्मान देत नव्हते. ते खरोखर ढोंगी होते. (यशया २९:१३) संदेष्ट्याच्या ग्रंथातील एका मर्मभेदक वाचनाने प्रभू ख्रिस्ताने हा मुद्दा सिद्ध केला आहे. (मार्क:७:६-७).
     यहुद्यांनी वाड-वडीलांपासून चालत आलेल्या चालीरीतींना देवाच्या वाणीपेक्षा जास्त महत्व दिले. यामधील अनेक रूढी देवाच्या आज्ञेविरुद्ध होत्या, ह्या रूढी पाळत असताना यहुदी लोक देवाची आज्ञा मोडीत होते, म्हणूनच प्रभू येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता” (मार्क: ७:४).
     यहुदी वाड-वडीलांच्या परंपरा लक्षात ठेवून अशुद्ध हातांनी जेवण न करण्यासंबंधी काळजी करीत होते. अशुद्ध हातांनी जेवण केले तर जेवणही अशुद्ध होईल व असे अशुद्ध जेवण खाल्ल्यामुळे ते स्वत: अशुद्ध होतील असे त्यांना वाटत होते. परंतु येशू म्हणतो की, ‘बाहेरून माणसाच्या आत जाणाऱ्या गोष्टी त्याला भ्रष्ट करते असे नाही तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते’. मार्क: ७:१५. ह्या वचनाचे समर्थन येशू ख्रिस्त २०,२१ आणि २३ ह्या वचनामधून करतो.

बोधकथा:
1. एका गावात एक श्रीमंत साधू राहत होता. तो आणि त्याचे कुटुंब अगदी धार्मिक प्रवृत्तीचे होते. घरात आणि मंदिरात रोज पूजा-अर्चना करणे, धार्मिक रिती-रिवाज रोज आचरणात आणणे, हा त्यांचा नेहमीचाच नित्यक्रम झाला होता. गावामध्ये कोणताही समारंभ असल्यास धार्मिक विधीचा खर्च तो अगदी आनंदाने दानधर्म करत असे.
     ह्याच कुटुंबाच्या अगदी शेजारी एक गरीब कुटुंब राहत होते. रोजची शिदोरी मिळविण्यासाठी त्यांना अतोनात कष्ट करावे लागत असत. वेळप्रसंगी त्यांना अनेकदा उपाशीच धरणी मातेच्या उराशी झोपावे लागे. ह्या गरीब कुटुंबाजवळ एक गाय होती, ह्या गायीसाठी श्रीमंत साधू दररोज त्याच्या धार्मिक विधीचा भाग म्हणून चार भाकऱ्या खायला घालत असे. तो जेव्हा-जेव्हा त्या भाकऱ्या गायीसाठी घेऊन येत असे, तेव्हा-तेव्हा त्या गरीब कुटुंबातील मुले त्यांना काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने लागलीच धावत येत असत, परंतु हा साधू त्याच्या धार्मिक रिती-रिवाजामध्ये इतका रमलेला असायचा कि, त्याला कधीच त्या गरीब कुटुंबाचा कळवळा आला नाही.

२. एक मध्यमवर्गीय सु:खी-समाधानी धार्मिक कुटुंब होते. स्वत:च्या कष्टाच्या घामावर आपला उदरनिर्वाह अगदी आनंदाने भागवत होते. बऱ्याच वर्षापासून ह्या कुटुंबाने त्यांच्या उराशी एक स्वप्न बाळगून ठेवले होते, ते म्हणजे, त्यांना तीर्थ-यात्रेला जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे होते.
     प्रत्येक वर्षी अपुऱ्या निधिस्तव त्यांचे स्वप्न जणूकाही काळ्या-कुट्ट ढगाआड दडले जाई, म्हणूनच त्यांनी मनाचा ठाम निर्धार केला कि, प्रत्येक महिन्यात थोडीफार पोटाची काटकसर करून त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे. दोन वर्षाच्या कालावधीतच त्यांच्याजवळ आता तीर्थयात्रेला जाण्यापुरता पुरेशा निधी जमलेला होता. तीर्थयात्रा अगदी एक आठवड्याच्या कालावधीवर येऊन ठेपलेली होती, इतक्यातच त्यांच्या शेजारील छोट्या मुलाला “ब्रेन-टुमर” चा आजार जडला आणि त्याला लागलीच ओपरेशनची(शस्रक्रियेची) नितांत गरज होती. अश्या बिकट परिस्थितीत त्या धार्मिक कुटुंबाने त्यांच्या स्वप्नांचा विचार न करता त्यांच्याकडील जमवलेला तीर्थ-यात्रेचा सर्व निधी त्या मुलाच्या ओपरेशनसाठी त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्त केला. अश्या रितीने त्यांना दुसऱ्यांच्या आनंदाद्वारे तीर्थ-यात्रा न करता, खऱ्या अर्थाने देवाचे दर्शन घडले होते.

मनन चिंतन:
     परुश्यांच्या धर्मामध्ये देवावरील प्रीती, प्रेमळ वृत्ती, मायाळू स्वभाव आणि वर्तन यांना काहीच स्थान नव्हते. ह्या उलट काही विशिष्ठ धार्मिक आचार-विचार आणि धार्मिक विधी ह्यांनाच सर्वोच्च स्थान ते देत. हे धार्मिक विधी ते अगदी काटेकोरपणे पाळीत असत. जेवणापूर्वी ते आपले हात स्वच्छ धुवत कारण हातांच्या अशुद्धतेने अन्नही धार्मिक दृष्ट्या अशुद्ध होते असा त्यांचा समज होता. पण आपल्या अंत:करणातील दुसऱ्याविषयीचा वैरभाव, वाईट विचार व दृष्टपणा काढून आपले अंत:करण धुण्याचे व शुद्ध करण्याचा विचार त्यांच्या मनाला कधी स्पर्शही करीत नसे. आपल्या दुकानातून किंवा बाजारांतून घरी आले कि तत्काळ ते हात पाय धूत, स्नान करीत कारण जगातील व्यवहाराने व जगातील इतर व्यवहारिक व्यक्तींच्या स्पर्शाने आपण अशुद्ध होतो असे ते मानत, पण दुसऱ्यांशी न्यायाने, प्रामाणिकपणे आणि सत्याने व्यवहार करावा याची त्यांना काळजीच नव्हती. घरातील सारी भांडी, ताट सर्व सजावटीचे सामान वैगेर विधिवत शुद्ध करण्यावर त्याचा कटाक्ष होता. पण आपले अंत:करण शुद्ध आहे का? ते देवाला वस्ती करण्याजोगे आहे का? हे पाहण्यास मात्र त्यांना क्षणाचीही फुरसत नव्हती.
     आपले दैनंदिन धर्माचरण सुद्धा परुश्यांच्या धर्माचरणासारखे होऊ नये म्हणून आपण नेहमी सावध असले पाहिजे. आज आपण आपल्या समाजात पाहतो की, कित्येक लोक ख्रिस्ती धर्माचे व देऊळ मातेचे नियम अगदी काटेकोरपणे पाळतात अनेक लोक दररोज प्रार्थना करीत असतात, पवित्र शास्राचे वाचन करतात, विविध संतांच्या नोव्हेनाची प्रार्थना करतात, उपवास करतात परंतु ह्या लोकांच्या हातून एक क्षणभरही, कणाएवढेही सत्य धर्माचरण(शेजाऱ्याबद्दल प्रेमभावना) होत नसेल तर ह्या लोकांना प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात म्हणतो, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंत:करण माझ्यापासून दूर आहे, ते व्यर्थ  माझी उपासना करतात’.
     आपला स्वभाव, वृत्ती आणि अंत:करण यांच्यामध्ये जर का ख्रिस्ताचा आत्मा, ख्रिस्ताची वृत्ती आणि ख्रिस्ताचे प्रेम नसेल तर आपले सर्व प्रकारचे धार्मिक आचरण हे व्यर्थ आहे. कारण ख्रिस्ती धर्माची कर्तव्यपुर्ती ही देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर  प्रेम करणे यात सामावलेली आहे. ‘ख्रिस्ती प्रीती’ ही एकेरी नसून दुहेरी आहे आणि ही दुहेरी प्रीती (देव+शेजारी) आमच्या अंत:करणात नसेल व आपले जीवन आणि आपला स्वभाव यांच्यामधून ती प्रीती व्यक्त होत नसेल तर आमचे धर्माचरण आणि आपली धार्मिकता व्यर्थ आहे. हाच मुद्दा संत याकोब आजच्या दुसऱ्या वाचनाद्वारे स्पष्ट करीत असताना म्हणतो, ‘देव पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वत:ला जगापासून निष्कलंक ठेवणे होय’ (याकोब: १:२७).
म्हणूनच आपले स्वच्छ हात, चकाकणारे घर, लखलखणारी भांडी, ताटे-वाट्या यांनी नियमग्रस्त धर्माचरण असूनही जर का आपल्या अंत:करणात देवाविषयी आणि आपल्या शेजा-याविषयी प्रीतीचा लवशेषही नसेल तर आपले नियमग्रस्त धर्माचरण देवाला कधीही मान्य होणार नाही. म्हणूनच प्रभू येशू म्हणतो, ‘जे कोणी अंत:करणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहातील’ (मत्तय: ५:८).

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ऐकावी प्रार्थना, करतो मी याचना
१. आपल्या धार्मिक नेत्यांनी, देऊळ मातेची शिकवणूक सर्व ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवावी व त्यांना ती योग्यरीतीने आचरणात आणण्यासाठी योग्य ती मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने एकमेकांच्या सु:खदुःखात सह्भागी होऊन एकमेकांस साह्य करावे व प्रभू ख्रिस्ताचा प्रेमाचा, दयेचा आणि क्षमेचा संदेश आपल्या आचरणात आणावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आपल्या पॅरीशमधील आजारी माणसांना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात सापडल्यांना प्रभूचे धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, अश्या लोकांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभू परमेश्वराचे सामर्थ्य व धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



Thursday 20 August 2015


Reflections for Homily By: Suresh Alphanso.













सामान्यकाळातील एकविसावा रविवार



दिनांक: २३/०८/२०१५.
पहिले वाचन: यहोशवा २४:१-२,१५-१८.
दुसरे वाचन: इफिस ५: २१-३२.
योहान: ६:६०-६९.



प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपल्याला देवाचे महत्व पटवून देतात.
     पहिल्या वाचनात यहोशवा आपल्या लोकांना देवापासून दूर गेल्याची आठवण करून देतो व लोकांना त्याची जाणीव होते. पौलाचे इफिसकरांस पत्र ह्यातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात आपण पाहतो, संत पौल हा ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम कसा असावा याविषयी आपणास माहिती देतो. योहानकृत शुभवर्तमानात आपण ऐकतो, संत पेत्राने येशू हा ‘ख्रिस्त’ असल्याची दिलेली कबुली ह्याविषयी ऐकतो. पेत्राने पूर्ण विश्वासाने येशूला उत्तर दिले, ‘प्रभूजी सार्वकालिक जीवनाची वचने आपणाकडे आहेत तर तुम्हाला सोडून आम्ही कुणाकडे जावे?’
     पेत्राला धैर्य व विश्वासाने तारले. तेच धैर्य व विश्वास पेत्राप्रमाणे आपल्यालाही प्राप्त व्हावा, तसेच खरा ख्रिस्ती जीवनक्रम कळून व चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रभूची प्रेरणा मिळावी म्हणून आपण ह्या मिस्साबलीत प्रार्थना करूया.

सम्यक-विवरण
पहिले वाचन: यहोशवा २४:१-२, १५-१८.
यहोशवा हा मोशेच्या काळातला इस्रायलच्या अनेक नेत्यांपैकी एक महान धाडसी नेता होता. तो साधा, सरळ, धाडसी, निर्भय, पारदर्शक, लढवया नेता म्हणून प्रसिद्ध होता. त्याची निर्भयता केवळ त्याच्या व्यक्तिमत्वामुळे नव्हे तर परमेश्वराचे अस्तिव त्याच्या बरोबर होते म्हणून त्याला निर्भयता प्राप्त व यश मिळत गेले. ज्यावेळेला लोकांनी परमेश्वराच्या इछेकडे दुर्लक्ष केले आणि ते वाईट मार्गाला लागले तेव्हा यहोशवाने परखड भूमिका घेऊन लोकांना मार्गावर आणले. ईश्वरइच्छेपुढे त्याने कोणतीही तडजोड केली नाही.
यहोशवाने आपल्या लोकांना एकत्र करून त्यांना अखेरचा संदेश देण्याचे ठरविले. कोणत्याही कर्तबगार पुरुषाने तसेच केले असते. एखाद्या नेत्याने समाज एका विशिष्ट शिखरावर पोहचविल्यानंतर त्याच दिशेने व गतीने वाढ व्हावी ही त्याची अपेशा असते. यहोशवाने आपल्या सर्व श्रेष्ठींना, प्रसारकांना आणि प्रजेला बोलावून त्यांना परमेश्वराच्या चांगुलपणाची आठवण करून दिली.
     परमेश्वराने इस्रायलच्या दुधा-मधाच्या प्रदेशात कसे नेले हे दाखवून दिले. यहोशवाने आपल्या लोकांना हिंमत दिली. धर्मशास्त्र पाळावे व प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे चालावे म्हणजे परमेश्वर त्यांना यशस्वी करील असा आदेश दिला.

दुसरे वाचन: इफिस ५: २१-३२.
दुसऱ्या वाचनात संत पौल हा आपणास ख्रिस्ती जीवन कसे असावे, तसेच पती-पत्नींनी त्याची जबाबदारी कुटुंबात कशी पार पाडावी ह्याचे महत्व पटवून देतो. आपल्याला माहित आहे. संत पौल व सर्वाना तो बदलवितो. कारण त्याचे परिवर्तन झाले होते व तेच परिवर्तन तो सर्व ठिकाणी प्रगट करतो व अनेकांना ख्रिस्ता जवळ आणतो. इफिस पत्रात तो आपणास ख्रिस्ती जीवनक्रम कसा असावा ह्याविषयी मार्गदर्शन करतो. विशेष करून पती-पत्नीचे जीवन कसे असावे ह्याविषयी कानउघडणी करतो.

बोधकथा:
1. रेखा व सुनील ह्याच चांगले कुटुंब होते. त्याच्या संसारवेलीवर देवाने दोन गोंडस मुले दिली होते. त्यांचा चांगला संसार होता. सुनीलला देवाच्या कृपेने चांगली नोकरी होती. रेखा घरकाम मुलाचा अभ्यास व इतर कामे करायची. सर्व काही व्यवस्थित चालले होते. दिवसमागून दिवस भरत होते. अचानक एक दिवस सुनील रात्री कामावरून येत असताना त्याला भरधाव गाडीने धडक दिली. त्याचा अपघात होऊन तो मरण पावला. होत्याचे नव्हते झाले रेखावर खूप मोठे संकट आले. घरातला कर्ता-पुरुष गेला. मागे दोन मुले व त्याची पत्नी एकटी राहिली.
हळूहळू दु:खाचे दिवस सरले. रेखाला खूप एकाकी वाटू लागले. त्यात तिचा भाऊ तिला व मुलांना त्याच्या घरी घेऊन आला. माहेरी आल्यावर रेखा दु:खातून अद्याप सावरली नव्हती तोच, तिला तिच्या वहिनीकडून खूप काही बोलणी ऐकावी लागली. कारण एकतर ती विधवा होती आणि पदरी दोन मुले होती, शिवाय ती भावाच्या घरी आली होती. कारण खूप महिने ती भावाकडे राहिली होती व तिच्या वहिनीला त्याचा भार वाटत होता.
एकदिवस रेखा मोठ्या धैर्याने तिच्या भावाच्या पाया पडते व रडू लागते व म्हणते `भाऊ मला तुझ्याशिवाय कोणीच नाही, तुला सोडून कोठे जाऊ?” माझा कर्ताकरविता तुच आहेस. भावाला तिच्या भावना कळतात. त्या सुद्धा खूप वाईट वाटते. काही दिवसांनी रेखा तिच्या घरी येते. तिचा भाऊ शेवटपर्यंत त्याच्या कर्तव्याला जागतो व तो तिची शेवट पर्यंत काळजी घेतो.
आजच्या शुभवर्तमानात काही शिष्य येशुस सोडून निघून जातात परंतु पेत्र शेवटपर्यंत प्रभूवर श्रद्धा ठेवून धैर्याने त्याच्या सोबतीस राहतो.

मनन-चिंतन
आज शुभवर्तमानात अध्याय ६:६०-६९ ह्या वचनावर आपण चिंतन करत आहोत. परंतु ह्या वचनाचा संदर्भ वचन २२ पासून सुरु होतो.  त्यात येशु मी ‘स्वर्गातून उतरलेली जीवनाची भाकर आहे असे म्हणतो.’ ख्रिस्ताने पाच भाकरी व दोन मासाचा चमत्कार केल्यानंतर लोकांनी त्याचे चिन्हे बघितली व “हा खरोखर एक संदेष्टा आहे, जो ह्या जगामध्ये आला आहे म्हणू लागले. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याला त्यांचा संदेष्टा मानू लागले – इथपर्यंत ठीक आहे. परंतु ख्रिस्ताने सांगितले की “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे” त्याच्याही पलिकडे जाऊन ख्रिस्ताने सांगितले, ‘तुम्ही मनुष्यांच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हांला जीवन नाही.’
जो माझे देह खातो व रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवील कारण माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो व मी त्याच्यात राहतो. आता मात्र लोकांना हे वचने कठीण वाटू लागली होती. त्यांनाच नाही तर त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले हे वचने कठीण आहे. हे कोण ऐकून घेऊ शकतो? ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले. आणि ते पुन्हा कधी ह्याच्याबरोबर चालले नाही. कारण त्यांना ख्रिस्ताची वचने खूप काही कठीण वाटली. ते कुरकुर करु लागले व येशूने त्याच्या मनातील विचार ओळखले व त्यांच्या बारा शिष्यांना म्हणाला ‘तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?’
     हाच प्रश्न ख्रिस्त आपणा सर्वांना विचारत आहे, आज आपले उत्तर काय आहे? आपण ह्या पेत्राप्रमाणे धाडस करु काय? पेत्राने धर्याने उत्तर दिले. पेत्र म्हणाला “प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाजवळ आहेत” आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे कि, देवाचे पवित्र पुरुष आपण आहात किती धैर्याने व विश्वासाने त्याने ख्रिस्ताला ओळखले. म्हणून आपण चिंतन करूया कि, आपण आपल्या जीवनात कसे वागलो. पेत्राप्रमाणे कि, इतर शिष्यांप्रमाणे कुरकुर करतो व पळून जातो? कधी कधी त्या शिष्यांप्रमाणे आपल्यालाही वचने कठीण वाटू लागतात.
     येशूने आपले शरीर व रक्त हे आपल्या बलिदानाद्वारे आपणास दिले, मरणाअगोदर येशूने भाकर घेतली व द्राक्षरस घेतला व ते रक्त म्हणून आपणास अर्पण केले. त्याच दिवशी मिस्सा बलिदान स्थापना केला. म्हणूनच रोज मिस्साद्वारे त्याची आठवण करतो. पवित्र मिस्सा हे आज सुद्धा मोठे आव्हान आहे. पवित्र मिस्सा ख्रिस्तावरील आपल्या श्रद्धेचे प्रतिक आहे. पवित्र मिस्सा  हा एक संस्कार आहे व आपल्या सर्व विश्वासू ख्रिस्ती लोकांचे आव्हान आहे. जी ख्रिस्तसभा रोज साजरी करतो
          पेत्राप्रमाणे आपण विश्वास धरीला पाहिजे व धैर्याने कार्य केले पाहिजे. आपण आपला विश्वास पेत्राप्रमाणे मजबूत केला पाहिजे. विश्वास हा वैयक्तिक निर्णय आहे. तो नुसताच कोणाला खुश करण्यासाठी किंवा बाहेरून पाठींबा देणारा नसावा. तरख्रिस्ताची निवड करणारा असावा व देवाची कबुली देणारा असावा. म्हणजे एखादा बिकट प्रसंग आला व जर आपला विश्वास दृढ व मजबूत असेल तर त्याचा फायदा जसा पेत्राला झाला होता तसाच आपल्यालादेखील व्हावा. म्हणून आपला विश्वास मजबूत असला पाहिजे.
ख्रिस्त आज आपल्याला पेत्रासारखे जीवन जगण्यासाठी व त्याच्या विश्वासाने व धैर्याने वाढण्यास बोलावीत आहे ख्रिस्त आपल्याला जो मार्ग दाखवीत आहे. पेत्राप्रमाणे आपला विश्वास व धैर्य वाढावे म्हणून आपणा प्रभूकडे प्रार्थना करूया.
“तुज सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी राहू कुठे”.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद : हे येशू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१.ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप, फादर्स, सिस्टर्स व ब्रदर्स व इतर सर्व मिशनरी बंधू-भगिनींना देवाचे कार्य करण्यास कृपा व प्रेरणा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील व राज्यातील सरकारने चांगल्या प्रकारे लोकांची सेवा करावी व निस्वार्थीपणे कार्य करण्यास त्यांना परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून प्रार्थना करूया.
३. ह्या वर्षी चांगला पाऊस पडावा व शेतकऱ्यांना चांगले पीक घेता यावे तसेच त्यांच्या शेती-बागायतीवर देवाचा आशिर्वाद सदैव असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेले आहेत, जे व्यसनाच्या आहारी गेले आहेत, ज्यांना नोकरी नाही, अश्या सर्वांना प्रभूने त्याच्या प्रकाशात आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक आजारी आहेत, दु:खी व कष्टी आहेत, ज्यांच ह्या जगात कुणीच नाही व जे जीवनाला कंटाळले आहेत अश्या सर्वावर देवाचा कृपाशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.



  
       


Wednesday 12 August 2015

Reflections for Homily By: Allwyn Gonsalves.










सामान्य काळातील विसावा रविवार



दिनांक: १६/०८/२०१५.
पहिले वाचन: नीतिसुत्रे ९:१-६.
दुसरे वाचन: इफिस ५:१५-२०.
शुभवर्तमान: योहान ६:५१-५८.


प्रस्तावना
आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील विसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला परमेश्वर न्यायी आहे ह्या विषयावर मनन-चिंतन करण्यास आमंत्रण देत आहे.
नितिसुत्रे ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात, परमेश्वर त्याच्या प्रजेला भोळेपण सोडून देऊन सुज्ञतेच्या मार्गाने चालावयास सांगत आहे. इफिसीकरांस पाठवलेल्या पत्रतून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात, संत पॉल इफिस येथील लोकांना ज्ञानाचा आणि वेळेचा सदुपयोग करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करण्यास आवाहन करत आहे. तसेच संत योहानलिखित शुभवर्तमाना येशू, मी तुम्हाला माझे शरीर व रक्त तुमचे आध्यामिक भोजन म्हणून देतो’ असे म्हणतो.
आजच्या ह्या पवित्र मिस्साबलिदानात भाग घेत असता, आपण आपल्याला दिलेल्या ज्ञानाचा आणि वेळेचा सदुपयोग करावा, म्हणून देवाकडून सुबुद्धी व शहाणपण ह्यासाठी प्रभू चरणी प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: नीतिसूत्रे: ९:१-६
बायबलमधील नीतिसूत्रे हे पुस्तक राजा शलमोनाला संबोधून लिहिलेले आहे कारण राजा शलमोनाने देवाकडे ज्ञानासाठी विशेष प्रार्थना केली होती. ह्या पुस्तकात उत्तम अशी सूत्रे माडंलेली आहेत जे आपणास देवावरील व आपल्या ज्ञानावर कसे प्रेम करावे हे शिकवतात. माणसाने माणसाशी कसे वागावे, सामाजिक व्यवहार कसे पार पाडावेत आणि नीतीचे जीवन कसे जगावे, ह्याविषयी इस्त्रालमधील षितुल्य व्यक्तींनी देवावरील श्रद्धेच्या प्रकाशात केलेले हे मार्गदर्शन आहे. सर्व ज्ञानाचा आणि सुज्ञपणाचा उगम देव आहे, असा इस्त्राएलचा विश्वास होता. नीतीसूत्रे हा सुभाषितांचा आणि सुविचारांचा संग्रह आहे. नीतीसूत्रे हा ग्रंथ म्हणजे अनेक शतकांच्या ज्ञानवचनांचा संग्रह  आहे. प्रारंभीची ज्ञानसूत्रेही व्यवहारी जीवनासंबंधी असून अधूनमधून एखाद दुसरे आध्यात्मिक स्वरूपाचे सूत्रही दिसून येते. देव सज्जनाला बक्षीस देतो, परंतु द्रूष्टाला दंड देतो, अशा प्रकारचा उपदेश ह्या वचनांतून केलेला आहे.
नीतिसूत्रे हा नीतिवचनांचा संग्रह आहे. त्यांच्या परिशीलनामुळे वाचकाच्या ज्ञानात भर पडते आणि त्याला मार्मिक वचनांचा अर्थ समजतो. सुज्ञपणे कसे वागावे, आपले वर्तन प्रामाणिक, न्याय्य आणि स्वच्छ कसे ठेवावे, ह्याचा हा वस्तुपाठ आहे. तसेच ह्या वचनांच्या अभ्यासामुळे साध्या-भोळ्यांच्या शहाणपणात वाढ होते. तरुणांना दिशा मिळते आणि विद्वानांना व शिकलेल्यांना कूट प्रश्नांचे मर्म समजण्यास मदत होते.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र; ५:१५-२०
आजच्या ह्या दोन्ही वाचनात साम्य आहे. ते म्हणजे संत पॉल इफिसकरांस सांगतो कि, ज्ञान तुम्हाला सत्याच्या मार्गावर चालण्यास शिकवेल, तसेच ख्रिस्ती ज्ञान तुम्हाला देवाच्या इच्छेनुसार राहण्यास प्रोत्साहन करी. तुम्ही द्राक्षरसाच्या नशेत राहू नका तर पवित्र आत्म्याच्या सहवासात राहा व येशू ख्रिस्ताचे धन्यवाद आभार माना कारण त्याने आपल्याला भेट वस्तु दिलेली आहे ती म्हणजे, त्याने स्वत:चे शरीर रक्त आपल्यासाठी दिले आहे, जे आपल्याला येशू ख्रिस्ताशी देवपित्याशी एकनिष्ठ करते जे आपल्याला एक ख्रिस्ती कुटुंब म्हणून एकत्रित ठेवते.
    
शुभवर्तमान: योहान; ६:५१-५८
देव स्वत: ज्ञानदाता आहे. तो ज्ञानाचा आणि सुज्ञतेचा उगम आहे. ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करील. विद्या तुझ्या आत्म्याला आनंद देईल. ज्याला ज्ञानाचा खजिना गवसतो, तो खरा सुज्ञ आणि सुखी मनुष्य होय. ज्ञानप्राप्ती सोन्यारुप्यापेक्षा, हिऱ्या-माणकांपेक्षा अधिक मौल्यवान आणि अतुलनीय आहे. ज्ञान तुला एका हाताने दीर्घायुष्य आणि दुस-या हाताने धनसंपदा व मानसन्मान बहाल करते. ज्ञानाच्या आश्रयाला येणारे भक्त जीवनाच्या वृक्षासारखे असतात. जे त्याच्या सावलीत विसावा घेतात, ते सुखी होतात. देवाने ज्ञानाच्या खडकावर पृथ्वीचा पाया घातला आहे. आकाश हा त्याच्या बुद्धिविलासाचा विष्कार आहे.
येशू ख्रिस्त हा पवित्र मिस्साबलिदानातील भोजन बनतो. येशू ख्रिस्ताला माहिती होते की, तो जे काही शिकवत आहे ते त्याच्या शिष्यांना व लोकांना कळणार नाही, त्यामुळे येशूने सर्व प्रथम भाकरीचे चमत्कार करून त्यांना दाखवून दिले कि, मी तुम्हां सर्वांना भोजन पुरवू शकतो. पुढे येशू त्यांना म्हणतो की मी स्वत: जीवनाची भाकर आहे. जी देवाने तुमच्यासाठी स्वर्गातून पाठवली आहे.''I am the living bread which has come down from heaven'' ज्याप्रमाणे भोजन हे आपल्या जीवनाची भाकर आहे, त्याप्रमाणे आपल्या विश्वासाद्वारे येशू ख्रिस्त हा आपल्या जीवनाची भाकर आहे. 
शुभवर्तमानामध्ये आपण वाचलेले आहे कि, प्रभू येशू ख्रिस्त खूप ठिकाणी भोजनाच्या वेळेस उपस्थित होता. उदा. काना गावातील लग्न, जेथे येशूने पाण्याचा द्राक्षरस केला, येशूने जेव्हा लाजरसला मरणातून उठविले आणि त्याच्या समवेत भोजन घेतले, त्यानंतर जक्कयच्या घरी येशू ख्रिस्त भोजनास उतरला होता आणि विशेष म्हणजे शेवटचे भोजन जेथे येशू ख्रिस्ताने भाकरीचे व द्राक्षरसाचे रुपांतर त्याच्या शरीरात व रक्तामध्ये केले होते (लूक २२:१९).

बोध कथा:
एकदा एका शाळेमध्ये शिकवल्यानतंर एका शिक्षिकेचे २५ वर्षानंतर निवुत्ती झाली म्हणून शाळेमार्फत त्यांच्यासाठी समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता १०वी ची मुले हा कार्यक्रम करणार होते, त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शिक्षिकेकडे जात विचारले, बाई आपणाला काय भेट वस्तू हवी आहे? त्यावर त्या बाई म्हणाल्या, मी ह्या शाळेत २५ वर्षे शिकविले आहे. मला पुष्कळ भेट वस्तू मिळाल्या आहेत परंतु माझी एक इच्छा आहे’. तेव्हा मुले त्या बाईंना म्हणाली, ती काय आहे? तेव्हा त्या म्हणाल्या, मी तुम्हाला ह्या शाळेत २५ वर्षे जी चागली शिकवण दिली ती शिकवण तुम्ही नेहमी तुमच्या जीवनात वापरावी’ असे बोलू त्या निघून गेल्या. त्यावेळी सर्व मुलानी त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

मनन चिंतन:
आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले कि, आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे शरीर व रक्त ह्याचे स्मारक आपल्यापुढे ठेवले आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जी भाकर देईन ती माझा देह असून ती जगाच्या कल्याणासाठी पोषक आहे व जो मला खातो तो माझ्यामुळे जगेल. सर्वांना प्रेम, शांती व जीवनदान देणा-या प्रभू ख्रिस्ताने पवित्र क्रुसावर स्वत:च्या प्राणाची आहुती दिली.
परमेश्वर न्यायी, दयाळू व कवाळू आहे. येशू ख्रिस्ताने जगातील सर्व प्रकारच्या बंधनातून आपल्याला मुक्त केले आहे. मात्र आज सुध्दा स्वार्थ, भ्रष्टाचार व अन्याय सर्वत्र जाणवत आहे. ख्रिस्तसभा आज आपल्या सर्वाना समानतेची वागणूक मिळावी म्हणून प्रार्थना करत आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजांची पूर्तता, धर्म पाळण्याचा अधिकार, नीतिमुल्यांचा व स्वतंत्रेचा आदर-सन्मान, अशा गोष्टींना प्राधान्य मिळावे म्हणून आज ख्रिस्तसभा सर्वांना आणि सर्वांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करीत आहे.
ख्रिस्ती धर्माचे पूर्ण सार देवप्रीती’ आणि बंधूप्रीतीच्या आज्ञेत सामवलेले आहे. देवाने दिलेल्या आज्ञापालनावरूनच देवावरील विश्वासाचे प्रमाण समजले जाते. अखिल मानवांच्या तारणासाठी वधस्तंभावरील मरणापर्यंत प्रभू येशूने देवाच्या आज्ञांचे पालन केले आणि देवप्रीती आणि परस्परप्रीतीचा उच्च आदर्श आपल्याला घालून दिला.
परमेश्वर मानवार अनंत प्रीती रतो. आपल्या जीवनासाठी उपयुक्त अशा सर्व गोष्टी देवाने आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. नीतिमान व अनीतिमान असा भेदभाव देवाकडे नाही म्हणूनच तो सर्वांवर सारखाच पाऊस पाडतो. परमेश्वर जसा प्रेमळ व दयाळू आहे तसेच आपणसुध्दा असावे असे ख्रिस्ताने म्हटले आहे. आपण प्रार्थना, उपासना, श्रध्दा याद्वारे देवावरील आपली प्रीति दर्शवितो, पण त्याचबरोबर आपल्या बंधु-भगिनींवर मनाने आणि कृतीद्वारे प्रेम करणे महत्वाचे आहे. तू जशी स्वत:वर प्रीती करतो तशीच शेजा-यावर कर’, म्हणजे स्वत:साठी आपण जसा विचार व कृती करतो तसेच इतरांसाठी करावी. स्वत:प्रमाणे इतरांच्या भल्याचा विचार करावा.
धर्म, जात, शिक्षण, गरिब-श्रीमंत अशा प्रकारे कोणताच भेदभाव न करता ख्रिस्ताठायी आपण सर्वांनी एक व्हावे. आले जीवन जगत असताना अन्यायग्रस्तांसाठी आपल्याला कशा प्रकारे सहाय्य करता येईल यावर चिंतन करूया. आपल्यापरिने ख्रिस्तानुकरण करुन आपण सर्वांना न्यायाने, शांतीने व प्रीतिने वागविण्याचा प्रयत्न करुया.
संत पेत्र म्हणतो, एकमेकांवर मनापासून प्रेम करा (पेत्र १:२२), तर संत पॉल म्हणतो, 'प्रीति हे तुमचे ध्येय असू द्या' (१करिंथ १४:१). प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवणूक आज्ञा आचारणात आणून ती प्रमाणिकपणे पाळण्यासाठी आणि परस्परांवर मनापासून कृतीशील प्रेम करण्यासाठी ह्या मिस्साबलीत कृपा मागूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे न्यायी व प्रेमळ परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐकून घे.
१. आमचे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-धर्मभगिनी यांनी त्यांच्या आचार-विचारातून श्रद्धावंतांपुढे चांगला आदर्श ठेवावा तसेच त्यांच्या कामात प्रभूचा वरदहस्त त्यांना सतत लाभावा व त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या ख्रिस्ती धर्माची प्रगती होत राहावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. हे परमेश्वरा तू दैवी वैद्य आहेस, आजारामुळे ज्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिडले आहे अशांना तू आधार व दिलासा दे तसेच तुझ्या सुखद हाताचा स्पर्श करून त्यांना तू चांगले आरोग्य द्यावेस, म्हणून आम्ही तुजकडे प्रार्थना करतो.
३ जेथे दहशतवाद, आंतकवाद, ताणतणाव निर्माण झाले आहेत अशा ठिकाणी परमेश्वराने त्याची शांती निर्माण करावी युद्ध राष्ट्रांमध्ये समेट घडवून आणण्यास जगभर ज्या अनेक संघटना कार्यरत आहेत, त्यांच्या कार्याला यश प्राप्त व्हावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.