Wednesday 30 December 2015


Reflections for the Homily on Feast of Epiphany (03/01/2016) By: Sadrick Dapki.










प्रकटीकरणाचा सण
 
दिनांक: ०३/०१/२०१६       
पहिले वाचन: यशया ६०:१-६
दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र ३:२-३अ, ५-६
शुभवर्तमान: मत्तय: २: १-१२

‘ताऱ्याने दाखविले बाळ येशू’


प्रस्तावना:
आज आपण ‘प्रकटीकरणाचा सण’ साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपणास येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आहे व तो आपले तारण करावयास आला आहे ह्या रहस्याबद्दल सांगत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा भाकीत करतो की, ‘अनेक राष्ट्रे देवाचा जयजयकार करण्यासाठी येतील व त्याच्यापुढे नतमस्तक होतील’. दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास सांगतो की, ‘देवाची गुपित योजना व त्याचे रहस्य ज्याची आपण वर्षानुवर्षे वाट पाहत होतो ती येशू ख्रिस्त येण्याने परिपूर्तीत झाली आहे’.
तर शुभवर्तमानात संत मत्तय आपणास सांगतो की, तीन ज्ञानी लोक पूर्वेकडून ताऱ्याचा पाठलाग करत येशू बाळाचे दर्शन घेण्यासाठी येतात. त्या तीन ज्ञानी लोकांनी आकाशात ताऱ्याचे चिन्ह पाहून येशू ख्रिस्ताचा शोध केला आणि त्यांस ख्रिस्त बाळ सापडला. आपल्या जीवनात आपण सुद्धा येशू ख्रिस्ताचा शोध घ्यावा व त्याचे दर्शन आपणा प्रत्येकाला व्हावे म्हणून ह्या मिसाबलीदानात परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ६०:१-६
     यशया संदेष्टा हा भाकीत करणारा संदेष्टा होता. येशू ख्रिस्ताबद्दल व त्यास निगडीत असणाऱ्या दुसऱ्या बाबिंबद्द्ल यशया संदेष्ट्याने भाकीत केले आहे. कुमारी मरिया गर्भवती होण्याची व येशू ख्रिस्त जन्माला येण्याची भाकिते यशया संदेष्ट्यानेच केलेली आहेत.
     आजच्या उताऱ्यात सुद्धा यशया संदेष्टा भाकीत करतो की, ‘अनेक राष्ट्रे येशूचा जयजयकार करण्यासाठी येत आहेत. ‘अनेक राष्ट्रे’ म्हणजे ‘तीन मागी लोक’ जे दुसऱ्या राष्ट्रांतून राजांच्या राजास जयजयकार करण्यासाठी आले होते. यशया संदेष्टा सियोनीकरांस उत्तेजून सांगत आहे की, “उठा, प्रकाशमान व्हा, कारण प्रकाश तुमच्याकडे आला आहे” (यशया ६०:१). ‘तुमचा प्रकाश’ हा ‘देवाच्या ऐश्वर्याबद्दल’ सूचित करतो. यशया पुढे म्हणतो, ‘तुमचे डोळे वर करून चोहोबाजूंकडे पाहा! तुमचे पुत्र बंदिवासातून परत येत आहेत. तू त्यांस पाहून आनंदित होणार कारण ते उंटावर बसून धन-संपत्ती, सोने व उद घेऊन येत आहेत. आणि आज मागी लोक उंटावर बसून सोने, उद व गंधरस घेऊन आले.

दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र ३:२-३अ, ५-६
 परराष्ट्रीयांना ख्रिस्ताचा आशीर्वाद आणण्याकरिता पौल ख्रिस्ताचा बंदिवान झाला आहे. संत पौल हा रोमी तुरुंगात बंदिवान असताना इफिसिकारंस पत्र लिहितो व देवाची सुवार्ता पसरवितो. संत पौल म्हणतो, ‘तुम्ही कदाचित् ऐकलेले असेल की देवाने त्याचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहचविण्याचे काम माझ्याकडे सोपविले आहे. ह्याच्यावरून आपणास असे स्पष्ट होते की, ‘देवाच्या योजना पौलाला प्रगट झाल्या आहेत. तो आपल्या मनातले काही विचार सांगत नव्हता. तो सत्य सांगत होता. देवानेच त्याला ही सत्ये प्रगट केली’.
संत पौल हा ख्रिस्तासमवेत नव्हता तरीपण तो आज प्रेषित म्हणून गणला जातो. कारण येशू ख्रिस्ताने देवाच्या योजना त्याच्यामध्ये प्रगट केल्या होत्या. देवाने त्याला अतिमानवी ज्ञान बहाल केले होते आणि हे ज्ञान पूर्ण व उत्कृष्ट होते. पूर्ण कारण ख्रिस्ती रहस्ये त्यास प्रगट केली होती आणि उत्कृष्ट कारण हे शिष्यांना सुद्धा असाधारण होते.

शुभवर्तमान: मत्तय २:१-१२
            मत्तयलिखित शुभवर्तमानात येशूच्या जन्मानंतर लगेच मागी लोकांच्या भेटीची नोंद केलेली आहे. मागी लोकांनी पूर्वेस एक तर उगवताना पहिला, त्यांनी त्या ताऱ्याचा अभ्यास केला कारण ते खगोल शास्त्रज्ञ होते. जेव्हा त्यांस कळले की तो तर यहुदियांचा राजा जो जन्माला येणारा आहे त्याचा आहे, तेव्हा ते लगेच त्या ताऱ्याच्या शोधात निघाले व राजांचा राजा येशू ख्रिस्त ह्यास नमन करावयास येरुशालेमेत आले.
     ते मागी लोक पहिले हेरोद राजाकडे गेले व त्याच्याकडे यहुदियांच्या राजाच्या जन्मा विषयी विचारपूस केले; ‘यहुदियांचा राजा कुठे जन्माला आला आहे?’ हे एकून हेरोद राजा घाबरून गेला कारण हेरोद हा इस्राएल लोकांच्या वंशातील नव्हता. ख्रिस्त जन्माला येणार आहे याची हेरोद्ला कल्पना होती व तो कोठे जन्मेल हे जुन्या करारात मिखा संदेष्ट्याने अगोदरच लिहिले होते. मिखा संदेष्टा म्हणतो की, “त्याचा जन्म बेथलेहेम गावात होईल” (मिखा ५:२). ख्रिस्ताला नमन करण्याचे कारण सांगून त्याला ठार करण्याचा निश्चय हेरोद्ने तेव्हाच केला.
     जेव्हा मागी लोक बाळ येशूला गव्हाणीमध्ये बघतात तेव्हा त्यांना फार आनंद होतो. ते प्रत्यक्षात त्याचापुढे शरण जाऊन त्याला नमन करतात व त्यांनी आणलेल्या भेट वस्तू: सोने, सुवासिक उद व गंधरस त्यास अपर्ण करतात.

बोधकथा:
     एकदा काही कोळी बांधव मासळी पकडण्यासाठी खोल समुद्रात गेले होते. तेव्हा आकाशवाणीवर अशी बातमी आली की थोड्या वेळानी मोठे वादळ होण्याची शक्यता आहे, म्हणून सर्व कोळी बांधवांनी समुद्रात जाऊ नये. हे एकूण घरची माणसे घाबरली आणि विचारात पडली की जे आता समुद्रात गेलेले आहेत त्यांना बोलवायचे कसे.
     रात्र झाली आणि अचानक वारा वाहण्यास सुरवात झाली. थोड्या वेळांनी त्या वाऱ्याचे रुपांतर वादळात झाले, समुद्र खवळला, मोठ-मोठ्या लाटा फुटू लागल्या. रात्र झाल्यामुळे कोळी लोकांना समुद्राच्या लाटांशिवाय दुसरे सर्व काही दिसेनासे झाले. काही वेळांनी त्या कोळी बांधवांनी एक मोठा दिवा पहिला व असे सूचित केले की कदाचित तिथे किनारा आहे. आपण आपली नाव त्या दिशेने वळून व सुखरूप समुद्र किनारी पोहचू.
     भल्या पहाटे जेव्हा ते समुद्र किनाऱ्याकडे पोहचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ते आपल्याच किनारी पोहचले होते आणि जेव्हा मोठ्या दिव्या बद्दल विचारले तेव्हा लोकांनी उत्तर दिले. ‘तुम्हांस दिशा मिळावी व सुखरूप समुद्र किनारी पोहोचावे म्हणून एक महिलाने तिच्या झोपडीला आग लावली होती. तिच्या ह्या बलिदानामुळे तुम्ही सुखरूप येथे पोहोचलात.

मनन-चिंतन:
     होय माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो कोळी बांधव दिव्याच्या दिशेने आले आणि त्यांस जीवनदान प्राप्त झाले. तसेच मागी लोकांनी तर पहिला त्याचा खगोल अभ्यास केला, त्याच्या शोधात निघाले. म्हणूनच राजांचा राजा येशू ख्रिस्त त्यांस सापडला. कोळी लोकांना जसा दिव्याने दिशा दाखवली तसेच मागी लोकांस ताऱ्याने तारणारा दाखवला. ते मागी लोक आनंदित झाले, त्यांनी येशू बाळाला नमन करून आणलेल्या भेट वस्तू त्यास अपर्ण केल्या.
     तारा हा विश्वासाचे प्रतिक म्हणून संबोधित केले जाते आणि हे प्रतिक पूर्वेकडून आलेल्या मागी लोकांच्या विश्वासाचे प्रतीनिधित्व करते. हे मागी लोक खूप अंतरावरून प्रवास करून येतात. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, त्या काळचा प्रवास आजच्या प्रवासारखा नाही. त्याकाळी नीट रस्ता नव्हता किंवा नकाशा नव्हता आणि अशा सुविधांचा अपवाद असून सुधा हे मागी लोक उंटाच्या पाठीवर बसून प्रवास करतात. परंतु त्यांचा शोध व्यर्थ जात नाही. शेवटी ते नेमक्या जागेवर पोहोचतात. जेव्हा मागी लोक येशू बाळाला बेथलेहेम गावात गाईच्या गोठ्यात पाहतात तेव्हा त्यांना कळून चुकते की त्यांनी एकच खरा देव येशू ख्रिस्ताच्या रुपात पहिला आहे. त्यांनी जगाचा तारणारा पहिला व आनंदित झाले आणि आणलेल्या भेटवस्तू: सोने, उद आणि गंधरस अपर्ण केले.
     सोने हे ऐश्वर्य व श्रीमंतीचे प्रतिक आहे, तसेच ते कधीच नाश न पावणारे आहे. अशी ही मौल्यवान वस्तू असण्याची परिस्थिती फक्त श्रीमंताकडेच असायची. हे सोने मागी लोक येशू बाळाला अपर्ण करतात कारण हे सोने येशू ख्रिस्त हा राजांच्या राजा आहे असे चिन्हांकित करते. हा राजा विश्वाचा निर्माता, प्रभूचा प्रभू आहे असे त्यांना कळून चुकले होते. मागी लोकांना येशू ख्रिस्ताच्या राजेपणाची जाणीव झाली आणि त्या महान राजाचे या जगात स्वागत केले. जरी येशू ख्रिस्त राजा असला तरी आपणास ठाऊक आहे की त्याने आपल्या राजेपणाची कधीच बढाई मारली नाही परतू विनयशील राहून आपल्या पवित्र पित्याचे कार्य पूर्ण केले.
     येशू बाळास दुसरी भेटवस्तू दिली होती ती म्हणजे ‘उद’. उद हे एक प्रकारची धूप आहे, जिचा फक्त विशेष कारणासाठी वापर केला जातो. हे धूप एक प्रकारच्या  झाडापासून काढले जाते, आणि त्या धूपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सुगंध येत असतो. हे धूप वेगवेळ्या धर्मामध्ये फक्त देवालाच अपर्ण केले जाते. ह्यावरून आपणास कळते की येशू बाळ हा ‘ख्रिस्त’ (तारणारा) आहे. तो सार्वकालिक देव आहे आणि म्हणूनच फक्त त्याचीच आराधना केली पाहिजे. सोने ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचे राजेपण दर्शविते तसेच उद सुद्धा त्याचे देवत्व दर्शविते.
     तिसरी भेटवस्तू म्हणजे ‘गंधरस’. गंधरस हा एक द्रव पदार्थ आहे जो मृत शरीर जतन करण्यासाठी वापरला जातो, जेणेकरून मृत शरीराचा दुर्गंध येण्यास व ते   कुजण्याचे टाळण्यास मदत होते.
     आपण कदाचित आश्चर्य चकित होऊ शकतो किंवा गोंधळात पडू शकतो की अशी भेटवस्तू जी मरण पावल्यावर दिली जाते ती येशू बाळाच्या जन्माच्या वेळी त्या तीन राजांपैकी एका राजाने का दिली? सोने व उद हे येशू ख्रिस्ताचे ऐश्वर्य व देवत्व दर्शविते; मग गंधरस का? तो अशासाठी की, ‘येशू ख्रिस्त हा आपल्या तारणासाठी व पापांतून मुक्त करण्यासाठी आला होता. असे करण्यासाठी त्याला स्वताला क्रुसावर मरण पत्कारावे लागले.
     प्रिय बंधू-भगिनिंनो जर आपणास आजच्या दिवसाचे सार्थ कळायचे असेल तर सर्व प्रथम आपण मागी लोकांचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आणूया ज्यांनी विश्वासाने ताऱ्याकडे पाहून येशू बाळाचा शोध लावला व तो त्यांस सापडला. आब्राहामाने सुद्धा देवावर विश्वास ठेवला म्हणून त्यास विश्वासू पिता म्हणून नेमून दिले आणि संपूर्ण राष्ट्रे त्याचा नावाखाली केली. म्हणून अशा प्रकारे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे सर्व करण्यासाठी आपणामध्ये विश्वास असणे गरजेचे आहे. कारण देव आपल्याला अनेक चिन्हांद्वारे त्याचाकडे येण्याचा मार्ग दाखवीत असतो. हा देवाचा मार्ग आपणास दाखवण्यासाठी ख्रिस्त आज जन्मला आहे आणि तोच आपला मार्ग, सत्य व जीवन आहे.  
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू, आम्हांला तुझे दर्शन घडव.
१.  ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशस्प, धर्मगुरू व तसेच धर्म-भगिनी ह्यांना देवाचे प्रेम, द्या व शांती इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी कृपा व शांती लाभावी म्हणून आपण प्राथर्ना करूया.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने देवाची मुळे म्हणून जीवन जगावे व ख्रिस्ताच्या व वचनांचे आज्ञाधारकपणे पालन करून देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आज जगात अशांतता असल्यामुळे वैरीपणाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जगात शांती पसरावी व एकात्मतेचे वर्चस्व स्थापन व्हावे म्हणून आपण प्राथर्ना करूया.
४. हे नवीन वर्ष चांगले, सुखा-समाधानाचे, शांतीचे व भरभराटीचे जावे म्हणून आपण प्राथर्ना करूया.
५. आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक गरजांसाठी प्राथर्ना करूया.  




Monday 28 December 2015


Reflections for the Homily on Mary the Mother of God By: Br. Wilson D'souza.










देवमातेचा सण (नवीन वर्ष २०१६)


दिनांक: १/१/२०१६.
पहिले वाचन: गणना ६:२२-२७
दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ४:४-७
शुभवर्तमान: लूक २:१६-२१

‘देवाचा आशीर्वाद घेऊन दुसऱ्यांसाठी आशीर्वाद बन’


प्रस्तावना:
     आज आपण नवीन वर्षाला सुरुवात करत आहोत. देऊळमाता वर्षाचा पहिलाच दिवस पवित्र मरियेला समर्पित करून त्या देवमातेचा सण साजरा करीत आहे.
     आजची तिनही वाचने आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळवून तोच आशिर्वाद एकमेकांना देण्यासाठी आमंत्रित करीत आहे.  
आजच्या मिस्साबलीदानात आपण विशेष करून हे वर्ष प्रत्येकाला सुखा-समाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि एकेमकांवर परमेश्वराची दया आणि काकळूत दाखविण्याचे जावो म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: गणना ६:२२-२७
     प्रस्तुत उताऱ्यात देव मोशेला सांगत आहे की, ‘तू आरोनामार्फत त्यांच्या मुंला-बाळांवर आणि इस्रायल देशावर परमेश्वराचा विपुल आशिर्वाद माग. अडीअडचनीच्या आणि दु:खाच्यावेळी देव त्यांचा सांभाळ करो, त्याची कृपा आणि परमेश्वराच्या मुख प्रकाशात तुम्हीं परावर्तीत होवोत. विशेष म्हणजे युद्धात गुंतलेल्या आणि अंत:करांत शांती नसलेल्या ह्या जगात आणि मानवात सदोदित शांतीचा आशीर्वाद नांदो हेच परमेश्वराचे नवीन नाव आहे. ह्याच नावाने परमेश्वर सदोदित त्याच्या जनतेला आणि लेकरांना आशीर्वाद देत असतो.

दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ४:४-७
     परमेश्वराने अनेकप्रकारे मानवत राहण्याचा प्रयत्न केला. त्यांना सृष्टीद्वारे आणि संदेष्टयाद्वारे आशीर्वादित केले. जगात पाप वाढल्यामुळे आशीर्वादाची जागा शापाने घेतली. परंतु दयाळू देवाने मानवाला सोडले नाही. काळाची पूर्तता होताच मरीयेच्या उदरी त्याने स्वत:चा पुत्र येशू ख्रिस्त ह्याला आशीर्वाद म्हणून पाठविले. तो जगाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर मानवा होऊन आला. त्याने पापांचे आणि नियमांचे साम्राज्य नष्ट करून, देवाला “आब्बा बापा” ह्या नावाने हाक मारण्यास शिकविले. देवबापाने पुत्राच्या सामर्थ्याने गुलामाचे राज्य नष्ट करून पुत्राचे राज्य अस्तिवात आणले. अशाप्रकारे मरीयेच्या उदरी जन्मलेला येशू लोकांसाठी आशीर्वाद म्हणून ह्या पृथ्वीवर उतरला.

शुभवर्तमान: लूक २:१६-२१
     लूक शुभवर्तमानकार आजच्या शुभसंदेशात येशू जन्माची पुनरावृत्ती आपल्या समोर सादर करत आहे. देवदुताने दिलेला संदेश घेऊन मेंढपाळ गाईच्या गोठ्याजवळ जमले असताना मरिया, योसेफ आणि बाळ येशू त्यांच्या नजरेस पडले. येशूच्या दर्शनाने मेंढपाळ आशीर्वादित झाले आणि येशूचे गुणगान त्यांनी मरिया आणि योसेफासमोर गायले. देवपुत्राच्या आशीर्वादाने आश्चर्यचकित झालेले मेंढपाळ मरियेला म्हणाले, ‘सर्व खजिन्यामध्ये उत्तम असा खजिना पृथ्वीवर आणणाऱ्या माते तू धन्य’, त्यांनी देवाची स्तुती आणि गौरव गायले. ह्या सर्व गोष्टी मरीयेने आपल्या हृदयात देवाचा आशीर्वाद आणि साध्या मेंढपाळाचा आशिर्वाद म्हणून साठवून ठेवल्या. यहुदी धर्माचे रितीरिवाज पाळत आठव्या दिवशी योसेफ आणि मरिया ह्यांनी येशूची सुंता केली आणि देवाच्या देवदुताने दिलेले नाव ‘येशू’ म्हणजेच ‘देवाच्या मुक्ततेचा आशीर्वाद’ हे ठेविले.

बोधकथा:
पहिल्याच वेळेला मी मंगळूर(कर्नाटक) येथे गुरुदिक्षीय शिक्षण घेण्यासाठी गेलो होतो. एके संध्याकाळी एका घरामध्ये प्रार्थना करण्याचे भाग्य मला लाभले. प्रार्थनेनंतर मुल आपल्या आई वडिलाकडून आणि आजी आजोबाकडून ‘माय पाय बेसांव दि’ (आई-वडील/आजी-आजोबा ह्यांच्याकडे जाऊन आशीर्वाद मागत होते). मला ही गोष्ट समजली नाही म्हणून माझ्या सोबत्याला मी प्रश्न विचारला, ‘ही लोकं आई-वडिलाचा आजी-आजोबांचा आशीर्वाद का मागत होते’? त्याने मला थोडक्यात आणि सोप्या भाषेत त्याचे स्पष्टीकरण दिले. प्रत्येक वेळेला प्रार्थना झाल्यानंतर वरिष्ठांचे आशीर्वाद घेणे, हा रीतीरिवाज आम्ही पाळत असतो. देवाचा आशिर्वाद मानवाद्वारे आपल्याला मिळत असतो हा आमचा विश्वास आहे. सकाळच्या प्रार्थनेनंतर आणि घरातून बाहेर पडताना, आमच्या आई-वडिलाचे आशीर्वाद घेतो. देवाचा आशीर्वाद मानावाद्वारे आम्हाला मिळतो ही आमची खात्री आहे.

मनन चिंतन:
आशीर्वाद ह्या शब्दाचा अर्थ काय?
     ‘आशीर्वाद’ हा शब्द मुळता हिब्रू भाषेतून जन्मलेला आहे. तो म्हणजे ‘brk’ ‘बाराक’ ह्या शब्दांचे अनेक अर्थ निघतात: १) दोन व्यक्तीमधील किंवा संघामध्ये असलेले अनुकूल संबंध (favourable relationship between two individuals or parties). २) देवाचे आभार मानने (thanksgiving) आणि ३) देवाने केलेल्या महतकृत्यांबद्दल देवाची स्तुती व आराधना करणे (praise and worship of God).
     जुन्याकरारात ‘आशीर्वाद’ हा शब्द ४०० वेळेस ऐकण्यास मिळतो. उत्पत्ती आणि स्तोत्रसंहिता ह्या पुस्तकांत त्याची अनुक्रमे ८८ आणि ८३ वेळेला नमूद केलेले आपणास आढळते. राहिलेले सर्व आपल्याला संपूर्ण जुन्याकरारातील पुस्तकांत आढळतात. 
जुन्याकरारात आशीर्वाद: ‘आशीर्वाद देणे’ म्हणजे ‘एखाद्याला जीवन बहाल केल्यासारखे आहे’. ज्याद्वारे आपल्या मनाला शांती लाभत असते. आशीर्वाद देणे म्हणजेच आपलं सर्वस्व, आपला अधिकार व शक्ती दुसऱ्यांना देणे. दिलेला
आशीर्वाद परत घेता येत नाही: आशीर्वाद डोक्यावर हात ठेऊन दिला जातो. नतमस्तक होऊन किंवा गुडघे टेकून स्वीकारला जातो. डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद देणे ह्याचा अर्थ असा की, ‘आशीर्वाद देण्याऱ्याचे सर्वस्व आशीर्वाद घेणाऱ्याकडे जाते असते.
आशीर्वाद कोण देऊ शकतो?
     देव केवळ माणसाला आशीर्वाद देऊ शकतो. पण देवाला मनुष्य आशीर्वाद देऊ शकत नाही. तो फक्त देवाला धन्यवाद, गौरव, आराधना व स्तुतीसुमने गाऊ शकतो. देवाचा आशीर्वाद माणसाच्या जीवनाला दिशा आणि गती देत असतो.
मनुष्य हा मनुष्याला आशीर्वाद देऊ शकतो. पण त्यांची वर्तणूक आणि क्षमता वेगळी असली पाहिजे. उदा. आई-वडील, गुरुवर्य आणि समाजातील प्रतिष्ठीत लोक.
आशीवाद केव्हा दिला जातो?
     प्रवास सुखाचा जाण्यासाठी, जीवनात यश मिळवण्यासाठी, चांगले आरोग्य लाभण्यासाठी, धंद्यात आणि कामात उन्नती होण्यासाठी, मुलाबाळांची प्राप्ती होण्यासाठी, जीवनातील संकटे व अडीअडचणी दूर होण्यासाठी. थोडक्यात संपूर्ण जीवनभर आपण देवाचे आणि एकमेकांचे आशीर्वाद घेत असतो.
     उत्पत्ती २:३ मध्ये देवाने दिलेला आशीर्वाद ‘फलद्रूप व्हा, द्विगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका’. आब्राहामाने दिलेला आशीर्वाद ‘मी तुला आशीर्वादित करीन व तुझे नाव मोठे करीन. इतके की, तुझ्या नावाने आशीर्वाद दिले जातील. जे तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, पण तुला शाप देतील त्यांना मी शाप देईन. तुझ्यामुळे मी सर्व राष्ट्रे आशीर्वादित करीत’ हे आपण १२:२-३ मध्ये वाचतो. इसाहाला दिलेला आशीर्वाद ‘मी तुझ्या मुक्कामास राहीन तुला सांगात देईन. तुझे वंशजन अनेक पटीने वाढवून आकाशातील ताऱ्या इतकी व भूतलावरील समुद्रातील वाळू इतकी करील’ हे आपण उत्पत्ती २६:३-४ मध्ये आपण ऐकतो. याकोबाला इसाहाने दिलेला आशीर्वाद ‘तू जिथे जाशील तिथे मी तुला संरक्षण देईन आणि तुझ्या जीवनाच्या अंतापर्यंत मी तुला अंतर देणार नाही’ हे आपण उत्पत्ती २८:१३-१५ मध्ये वाचतो. इस्राएल लोकांना देवाने दिलेला आशीर्वाद ‘साऱ्या राष्ट्रापेक्षा तुम्हांला अधिक आशीर्वाद लाभेल. तुमच्यातले कुणीही स्त्री-पुरुष निसंतान राहणार नाही किंवा गुरेढोरे वस्साविना असणार नाही’ हे अनुवाद ७:१४ मध्ये नमूद केलेले आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात दिलेला आशीर्वाद हा पुरोहिताचा आशीर्वाद म्हणून समजला जातो आणि तो आशीर्वाद मिस्साबलीत दिला जातो. संत फ्रान्सिस, ब्रदर लिओ ह्यांना मरण्याअगोदर तोच आशीर्वाद देतात. एक मुसलीम व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भेटल्यावर ‘सलाम वालेकुम’ असे अभिवादन करतो. मग ती व्यक्ती ‘वालेकुम सलाम’ हे प्रतिउत्तर देते. यहुदी लोक ‘शालोम’ ह्या नावाने अभिवादन करतात तर महाराष्ट्रीयन ख्रिस्ती बंधू-भगिनी ‘जय येशू’ ह्या शब्दाने संबोधीतात.
नव्याकरारात ‘आशीर्वाद’ हा शब्द ग्रीक भाषेतून येतो. ज्याचे नाम (evalogia) ‘एवलोगिया’ आणि क्रियापद ‘एवलोगेईन’ (evalogein) आहे. येशूने भाकरीला आशीर्वाद दिला ‘पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन स्वर्गाकडे पाहून देवाचे आशीर्वाद मागले, मग ते तुकडे शिष्यांजवळ दिले व त्यांनी ते लोकांस वाटून दिले’ असं आपण मत्तय १४:१९ मध्ये वाचतो. पुनरुत्थित ख्रिस्ताने स्वर्गात जाण्याअगोदर आपले हात उंचावून शिष्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद देत असताना येशू त्याच्यापासून अलग स्वर्गात घेतला गेला (लूक २४:५०-५१).
     नववर्ष हे आशीर्वादच वर्ष. आज आपण नव्या वर्षाला सुरुवात करत आहोत. २०१६ हे वर्ष आपणाला आशीर्वादाच वर्ष जावं म्हणून ख्रिस्तसभेने देवाचा आशीर्वाद म्हणून देवमाता, मरिया माता दिलेली आहे. तिच्या मध्यस्तीने तिचा पुत्र स्वर्गांतून उतरलेली जिवंत भाकर तुमचं कुटुंब, आयुष्य, उद्योग धंदे आणि तुमचे सर्वस्व आशीर्वादित करो म्हणून ह्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे देवा, ह्या नव्या वर्षात आम्हांला आशीर्वादित कर’.
१. हे सर्वसमर्थ परमेश्वरा आमच्या परमगुरुंना, महागुरूंना, धर्मगुरूंना व धार्मिकांना, ख्रिस्तसभा योग्य मार्गाने चालावण्यासाठी आणि अखिल जगात आशीर्वादाचे प्रतिक होण्याचं भाग्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. हे सर्वसमर्थ परमेश्वरा तू जीवनाचा दाता व त्राता आहेस. ह्या नव्या वर्षी आपणा सर्वांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे व देवाने आपणास आशीर्वादित करावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
३. देवमातेच्या मध्यस्थीने  आम्ही अनाथ, निराधार, परक्या आणि पोरक्यांसाठी आशीर्वाद मागतो. आमच्या दानशूर वृत्तीमुळे त्याचे जीवन सदोदित आशीर्वादमय ठरो म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. ज्या स्त्रिया मातृपदाची अपेक्षा आपल्या मनात बाळगून आहेत अशांवर देवाचा आशीर्वाद यावा व त्यांना मातृपद प्राप्त व्हावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया.






Tuesday 22 December 2015


Reflection on the Feast of Holy Family By: Minin Wadkar.











पवित्र कुटुंबाचा सण


दिनांक: २७/१२/२०१५  
पहिले वाचन: १ शमुवेल १:२०-२२, २४-२८
दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र ३:१-२, २१-२४
शुभवर्तमान: लूक: २: ४१-५२


प्रस्तावना:
आज आपण ‘पवित्र कुटुंबाचा सण’ साजरा करीत आहोत. हा सण विशेषकरून योसेफ, मरिया, आणि येशू यांच्या जीवनावर आधारलेला आहे. कारण ह्या कुटुंबाने सदैव देवाच्या सानिध्यात राहून देवाच्या योजनेप्रमाणे जीवन जगून आपलं कुटुंब पवित्र केले. याच कारणामुळे ‘पवित्र कुटुंब’ देऊळ मातेच्या नजरेसमोर सर्व कुटुंबांसाठी एक आदर्श कुटुंब ठरलेले आहे. आदर्श कुटुंब बनविण्यासाठी विश्वास, कठीण परिश्रम, एकमेकांना स्वीकारून घेण्याची क्षमता, क्षमा, देवावर विश्वास आणि शेजाऱ्यांवर प्रिती ह्या सर्व मुल्यांची अत्यंत गरज असते.
कुटुंब हे मानवी जीवनाचे उगमस्थान आहे. म्हणून समाजाच्या उभारणीसाठी चांगल्या कुटुंबाची फार आवश्यकता असते. जर आपण कुटुंबाची पावित्रता सांभाळली नाही, तर मानवी जीवनाला अर्थच उरणार नाही. ‘देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये’ ही देवाची आज्ञा प्रत्येक कुटुंबाने आचरणात आणावी तसेच पवित्र कुटुंबाप्रमाणे आपणसुद्धा आपल्या कुटुंबाची पावित्रता सांभाळण्यासाठी चांगल कार्य करावे म्हणून त्यासाठी लागणारी कृपा-शक्ती, पवित्र कुटुंबाच्या सहाय्याने परमेश्वराकडे  ह्या मिसाबलीदानात मांगुया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: १ शमुवेल १:२०-२२, २४-२८
हन्ना परमेश्वराकडे पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करते. परमेश्वर हन्नाची प्रार्थना ऐकतो आणि तिला पुत्र होतो ज्याचे नाव ती शमुवेल म्हणजेच ‘परमेश्वराकडे मागितला’ असे ठेवते. जेव्हा हन्ना बालकास घेऊन वार्षिक होमबली अर्पिण्यास व नवस फेडण्यास परमेश्वराच्या मंदिरी जाते, तेव्हा ती एलीला आपण बालकासाठी परमेश्वराकडे केलेल्या प्रार्थनेची कबुली देते आणि हन्ना शमुवेलला परमेश्वराच्या स्वाधीन करते.

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र ३:१-२, २१-२४
 योहान आपल्या पत्राद्वारे आपणास सांगतो की ‘आपण देवाची मुले आहोत आणि हे देवाने आम्हांला दिलेले प्रीतीदान आहे.’ त्याची आज्ञा हीच आहे, ‘त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे, आपण एकमेकावर प्रीती करावी’. कारण त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो व देव त्या माणसाच्या ठायी वास करतो.

शुभवर्तमान: लूक: २:४१-५२
लूक शुभवर्तमानकार प्रस्तुत उताऱ्यात आपल्याला येशूची ओळख करून देतो. येशूची ओळख करत असताना लूक, खालील बाबींचा उल्लेख करतो: ‘येशूचे कार्य, स्वर्गीय पिता व येशू ह्यांच्यातील नाते, येशूचे आई-वडील आणि येशूचा आज्ञाधारकपणा. ह्या बाबींचा उल्लेख करून लूक आपणाला येशूच्या समजूतदारपणाचे व कार्याचे कौतुक करण्यास सांगतो. तसेच लूक वल्हांडण सणाच्यावेळी येशूच्या आई-वडिलांनी येशूला शोधण्यासाठी केलेली धडपड याचेही वर्णन करतो.
     यहुदी लोक वल्हांडणाचा सण प्रत्येक वर्षी साजरा करतात. वल्हांडण सणाचे नियम जुन्या करारामध्ये निर्गम २३:१७; ३४:२३; लेवीय २३:४-१४ तसेच १ शमुवेल १:३, २१; २:१९ मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. हा सण साजरा करण्यासाठी मरिया, योसेफ व येशू येरुशलेमला जातात. वल्हांडण सण साजरा करून झाल्यानंतर, परतीच्या मार्गावर असता, बारा वर्षाचा येशू मागे राहतो. हे त्याच्या आई-वडीलांच्या लक्षात येत नाही. परंतु तिसऱ्या दिवशी मरिया व योसेफ येरुशलेमला परत जातात आणि त्यांना तेथे येशू, मंदिरात शास्त्री व परुशी ह्यांच्याशी संवाद करताना सापडतो.

बोथकथा:
एक राजा शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. तेव्हा तिथे त्याने एका साधूला झाडाखाली मनन-चिंतन करताना पाहिले. राजा साधू जवळ जाऊन नतमस्तक झाला आणि विचारले, ‘साधू महाराज! तुम्ही ह्या घनदाट व भयानक जंगलात एकटे कशाला राहतात?’ तुम्हांला जंगली प्राण्यांची भिती वाटत नाही का? साधू म्हणाला, ‘माझ्या मुला मी एकटा नाही, माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे. राजाने आजूबाजूला पाहिलं पण त्याला कोणीच दिसलं नाही. म्हणून राजाने आश्चर्याने साधूला विचारले, ‘तुमचे कुटुंब कुठे आहे?’ साधूने शांतमनाने उत्तर दिले, अहो राजे महाराज! जगात सर्व गोष्टी दिसतातच असे नाही; काही दिसतात, काही दिसत नाही. गोंधळून गेलेला राजा पुन्हा साधूला विचारतो, ‘महाराज तुम्ही कशाबद्दल बोलत आहात ते मला अजून समजलेलं नाही. कृपा करून तुम्ही तुमच्या कुटुंबाविषयी सांगाल का?’ साधू म्हणाला, ‘सय्यम माझे वडील आहेत, ‘क्षमा माझी आई आहे, ‘शांती माझी साथीदार आहे, सत्य माझा मुलगा आहे, करूणा व अहिंसा माझ्या बहिणी आहेत, ज्ञान माझे जीवन आहे. ज्यांचे हे सर्व नातेवाईक आहेत तो कसा काय घाबरणार?’ साधूचे उत्तर राजाला रहस्यमय वाटले. राजा साधूकडे आश्चर्याने पाहू लागला.

[ जी व्यक्ती आध्यात्मिक आणि कौटुंबिक जीवन जगते ती व्यक्ती कशालाही घाबरत नाही. आपण कौटुंबिक जीवन नेहमीच जगतो, पण आध्यात्मिक कुटुंबाचं काय? आपण आध्यात्मिक कुटुंबाची निर्मिती केलेली आहे का? कौटुंबिक जीवनात अनेक संकटे येतात. पैसा, उदयाची चिंता व नोकरी या सर्व गोष्टींसाठी माणूस धडपडत असतो. तसेच विविध कारणांमुळे कौटुंबिक जीवन नाश होण्याच्या मार्गावर आहे. जर आपण आध्यात्मिक कुटुंबाची निर्मिती केली असेल, तर आपणाला कशालाही घाबरण्याचे कारण नाही. कारण कौटुंबिक जीवन हे आध्यात्मिक कुटुंबावर अवलंबून आहे. त्यामुळे कौटुंबिक जीवनाव्यतिरिक्त, आध्यात्मिक कुटुंबाची फार गरज आहे. जर दोन्ही कुटुंब मजबूत आणि एकमेकांना साहाय्य करणारे असतील तर माणूस बलवान व बलिष्ट होतो. योसेफ, मरिया व येशू यांचे जीवन सुद्धा आध्यात्मिक जीवनाने परिपूर्ण होते. कौटुंबिक जीवन जगण्यासाठी लागणारे आध्यात्मिक कुटुंब त्यांच्याकडे होते. सय्यम, क्षमा, करून, अहिंसा हे सारे गुण त्यांच्या अंगी होते. याच आध्यात्मिक जीवनाच्या बळावर त्यांनी कौटुंबिक जीवनात येणाऱ्या संकटावर मात केली. ]

मनन–चिंतन:
‘पवित्र कुटुंबाचा सण’ हा ‘कुटुंबांचा’ दिवस आहे. हा दिवस आहे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा. हा दिवस आहे कुटुंबातील प्रत्येक माणसाचे, मोठया मनाने कौतुक व अभिनंदन करण्याचा. कुटुंबात आजी-आजोबा, आई-वडील, मुले, नातेवाईक असतात. त्यांच्या कष्टांमुळे, त्यागामुळे व प्रेमामुळे कुटुंबातील प्रत्येकाचे जीवन सुखरूप बनत असते. म्हणूनच संत योहान म्हणतात, ‘आपण देवाची मुले आहोत आणि हे देवाने आपणाला दिलेले प्रीतीदान आहे’. हेच प्रीतीदान टिकवून ठेवण्यासाठी देव आपल्याला त्याच्या आज्ञा सांभाळण्यासाठी सांगतो.   
सर्व कुटुंबांनी पवित्र कुटुंबाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेऊन चांगले कौटुंबिक जीवन जगावे. योसेफाने चांगले जीवन जगून एका चांगल्या वडिलाची भूमिका चोखपणे बजावली. त्याने साधं सुताराचं काम करून, काबाडकष्ट करून, आपल्या कुटुंबाला म्हणजेच मरिया व येशूला साभाळून त्यांचे पालनपोषण केले. योसेफाने देवाच्या आज्ञाचे तंतोतंत पालन करून, मरियेशी तो प्रामाणिक राहिला. जर आम्ही देवाने दिलेले कार्य प्रामाणिकपणे किंवा विश्वासाने पार पाडले तर खरोखरच देवाचा आशिर्वाद आम्हावर राहील.
संत बहिणाबाई चौधरी म्हणतात, ‘अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर.’ हे बहिणाबाईंचे शब्द आईच्या जीवनाला साजेसे व योग्य आहेत. ‘आईचे काळीज’ ह्या चित्रपटामध्ये मुलगा आपल्या खडूस, क्रूर व लोभी पत्नीला हवं असलेल आईच काळीज तो तिचा खुण करून, त्याच्या पत्नीला देतो. आईचा खुण करून मुलगा तिचे काळीज घेऊन बायकोला द्यायला जात असता, तो वाटेवर पडतो आणि लगेच हळूच ‘हृद्यातून’ आईचा आवाज येतो, ‘बाळा तुला लागलं का?’ हे खरोखर सत्य आहे. आई म्हणजे माया. आईचे घरातील प्रत्येक व्यक्तींवर अपार प्रेम व माया असते. मरियेने देवाच्या पुत्राला जन्म देऊन त्याचे जीवन फलद्रूप केले. येशूच्या जन्मापासून ते मरेपर्यंत ती त्याच्या सोबत राहिली. त्याच्या सुखात तसेच दुःखातही सहभागी झाली. मरियेने सदैव नम्रतेचे, शांतीचे व एकोप्याचे जीवन जगुन, योसेफाला विश्वासू राहिली. याप्रकारे देवाने सोपविलेले कार्य मरीयेने सुद्धा निष्ठेने पार पाडले. तिच्या सारखे पवित्र जीवन जगण्यासाठी देव आपणास आज बोलावीत आहे. आपले कौटुंबिक जीवन सुखरूप आणि सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यासाठी आपल्याला येशूच्या आईचे मन जोपासण्याची अत्यंत गरज आहे.
जर घरामध्ये मुले असली तर घर आनंदाने भरून जाते. आई-वडिलांचे आपल्या मुलांवर प्रेम असते आणि ह्याच मुलांकडून त्यांच्या आई-वडिलांची अपेक्षा असते की, त्यांनी मोठं होऊन चांगलं जीवन जगावं. मुलांचे कुटुंबातील कर्तव्य म्हणजे, ‘प्रेम करणे, पालकांचा सन्मान व आदर करणे हे होय’. येशूचे बालपणातील जीवन मुलांनी आपल्या जीवनात आचरणात आणून त्यांच्यासारखे जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. मुलांनी सर्वप्रथम आई-वडिलांना विसरता कामा नये. त्यांनी घेतलेले कष्ट विनामुल्य असून, मुलांचेही कार्य विनामुल्य असावे. आई-वडिलांचे आभार, चुकलं तेव्हा माफी मागण्याची क्षमता आणि प्रेमाची भाषा इत्यादींची गरज आहे. आई-वडिलांच्या आपल्या मुलांवरील असलेल्या मर्यादा व नियम हे मुलांच्या उन्नतीसाठी असतात हे मुलांनी ध्यानात ठेवले पाहिजे व चांगले जीवन जगण्यासाठी सदैव प्रयत्नशील असावे.
 आई ही कुटुंबाचा श्वास आहे. वडिल हे कुटुंबाचे धड आहे तर मुलं-मुली त्या कुटुंबाचे हात-पाय आहेत. एकमेकांना कोणीच दुसऱ्यांपासून अलिप्त करू शकत नाही. ज्याप्रमाणे श्वासाशिवाय शरीर निर्जीव आहे, त्याचप्रमाणे धडाशिवाय श्वासाला काही अर्थ नाही. कुटुंबामध्ये आई-वडील आणि मुलं-मुली एकमेकावर तशाच पद्धतीने अवलंबून असतात. 
एक चांगलं कुटुंब घडवणे, हे एखाद्या मूर्तिकाराच्या कलाकुशलतेपेक्षाही फार कठीण आहे, कारण कुटुंबात आई-वडील हे दगडाच्या किंवा मातीच्या अथवा लाकडाच्या मुर्त्या घडवून त्यांना आकार देत नसतात, तर रक्ता-मासाच्या असलेल्या माणसांवर चांगले संस्कार करत असतात. त्यांना ते घडवत असतात आणि एक चांगले भावी आयुष्य जगण्यासाठी सज्ज करत असतात. म्हणूनच म्हणतात: ‘कुटुंब हा भावी आयुष्याचा पाळणा आहे’. हे सर्व जरी खरं असलं तरी आजच्या संगणक युगात आपण पाहतो की, कुटुंब–संस्था ही नाश पावत आहे. आज आपल्या समाजात बरीचशी कुटुंब आहेत, जी दुभागली आहेत. याला कारणे आहेत अनैतिक जीवन, वाईट वागणे, शिल्लक कारणांवरून भांडणे, घटस्पोट इत्यादी.
आपण स्वत:ला प्रश्न विचारूया: आपलं कुटुंब पवित्र आहे का? आपल कुटुंब पवित्र करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे?
१. प्रार्थनामय जीवन: कुटुंबामध्ये प्रार्थना करणे खूप गरजेचे आहे. ‘कशा विषयीही चिंताक्रांत होऊ नये, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार-प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवावी’ (फिलीपैकरांस पत्र ४:६). ‘जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्या मध्ये मी हजर आहे’ (मत्तय १८:२०). ‘प्रार्थनेत तप्तर असावे व तिच्यात उपकार-स्तुती करीत जागृत असावे’ (कलसैकारांस ४:२). 
२. एकमेकांचा आदर करणे: ‘माझ्या मुला, तु आपल्या आई-बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको’ (नीतीसुत्रे ६:२०). ‘तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देव तुझा देव परमेश्वर तुला जीवन देतो त्यात तु चिरकाळ राहशील आणि तुझे कल्याण होईल’ (अनुवाद ५:१६).
आपले सारे जीवन परमेश्वराच्या चरणी ठेऊया. आपल्या कौटुंबिक व आध्यात्मिक जीवनाच्या उन्नतीसाठी व भरभरासाठी देवाजवळ त्याची कृपा व सामर्थ्य मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे पवित्र कुटुंबा, आंम्हासाठी मध्यस्थी कर.
1.     आपले परमगुरुस्वामी, कार्डीनल्स, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी-धर्मबंधू ह्यांच्यावर व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा, तसेच त्यांच्या कार्याद्वारे त्यांनी लोकांना एक पवित्र कुटुंब उभारण्या मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.     आपल्या प्रत्येकांच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सतत नांदावे व आपल्या त्यागमय जीवनातून एका सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा अनुभव सदोदित आपणास मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
3.     जी कुटुंबे अनैतिक वागणूक, गैरसमज अशा कारणांमुळे उध्वस्त झाली आहेत, अशांना पवित्र कुटुंबाचे मार्गदर्शन लाभून त्यांना समजूतदारपणाचे, शांतीचे व प्रेमाचे वरदान लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
4.     आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्या प्रेमाचे, मायेचे व करुणेचे छत्र लाभून त्यांना आनंदी ठेवण्यास परमेश्वराने आपणास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
5.     आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.