Thursday 27 September 2018


Reflection for the Homily of 26th Sunday of Ordinary Time 
(30-09-18) By Br. Jackson Nato 




सामान्य काळातील सव्विसावा रविवार


दिनांक – ३०-०९-२०१८
पहिले वाचन गणना ११:२५-२९
दुसरे वाचन याकोब ५:१-६
शुभवर्तमान - मार्क ९:३८-४८




 "जो आपल्याविरुद्ध नाही तो आपल्याला अनुकूल आहे." 


प्रस्तावना

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होण्यास आमंत्रण देत आहे. ख्रिस्ताचे कार्य नक्की काय आहे? व ते कशाप्रकारे पूर्णत्वास नेले पाहिजे ह्याची जाणीव ख्रिस्तसभा आपल्याला करून देत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो कि, देवाने मोशेचे काम हलके करण्यासाठी सत्तर जणांची निवड केली. दुसरे वाचन आपल्याला धन व त्याचा गैरवापर कशाप्रकारे रसातळाला घेऊन जाऊ शकतो हे स्पष्टपणे सांगते. तसेच आजचे शुभवर्तमान आपल्याला ख्रिस्त हा सर्वव्यापी आहे व त्याचे दर्शन आपल्याला चांगल्या व्यक्तीमध्ये व त्यांच्या कार्यामध्ये दिसून येते हे सांगत आहे.
दैनंदिन जीवन जगत असताना आपण अनेक लोकांच्या संपर्कात येतो जी निःस्वार्थीपणे दुसऱ्यांची सेवा करतात. त्यांच्या कार्याद्वारे दुसऱ्यांच्या जीवानात आशेचा किरण जागवतात. ह्या लोकांच्या कार्याचा कधी-कधी चुकीचा अर्थ काढला जातो. अशा लोकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या कार्यास दुजोरा द्यावा व त्याद्वारे ख्रिस्त लोकांपर्यंत पोहचवण्यास आपणांस कृपा मिळावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.


साम्यक विवरण
पहिले वाचन गणना -११:२५-२९

 ह्या वाचनात आपण पाहतो की, मोशेला संपूर्ण इस्त्राईल लोकांचा योग्य प्रकारे सांभाळ करणे कठीण वाटत होते, म्हणून परमेश्वराने सत्तर जणाची निवड केली. त्या सत्तर जणांमध्ये  दोघे जण भाकीत करत होते कारण देंवाचा आत्मा त्यांच्यावर होता, पण यहोशवाला मोशेच्या नेतेपणाला धोका आहे असे वाटले व मोशेने त्यास बंदी घालावी म्हणून बातचीत केली. पण मोशेने यहोशवाला बजावून सांगितले की, देवाचा आत्मा हा त्यांच्या लोकावर यावा हे योग्य नाही काय? कारण देवाचे कार्य करण्यास जे पुढाकार घेतात त्यांस पदाची अपेक्षा नसते तर त्याचा हेतु फक्त, हाती सोपविलेले कार्य योग्य प्रकारे पार पडण्याचा असतो.


दुसरे वाचन याकोब ५:१-६

ह्या वाचनात संत याकोब धनवानाच्या स्वार्थी वृत्तीवर ताशेरे ओढत आहे. धनवानांनी त्यांच्या धनावर भिस्त ठेवली आहे.  त्यांच्या धनला वाळवी लागली आहे. तरी सुद्धा हे धन गरजवंताबरोबर वाटून घ्यावे ह्याचा विचार त्यांना कदापि पडत नाही. ह्याच वृत्तीद्वारे त्यांनी गरिबांस लुटले, देवाच्या अर्पणाचा हिस्सा सोडण्यास सुद्धा त्यांना भय वाटले नाही. निर्दोषी लोकांस त्यांनी दोषी ठरविले. हे सर्व फक्त धनाच्या लोभामुळे झाले म्हणून याकोब त्यांना आकांत करण्यास सांगत आहे, कारण हीच लोभी वृत्ती त्यांना देवाच्या न्यायासमोर उधडी करील व पापिष्ठ ठरवील.


शुभवर्तमान मार्क ९:३८-४८

आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपण कुणाला पापास प्रवृत्त करू नये ह्याविषयी सांगत आहे. येशूच्या शिष्यांनी येशूच्या नावाने भुते काढणाऱ्या एका मनुष्याला बजावले, कारण तो त्यांच्या पैकी नव्हता पण येशूने त्यास सांगितले की, जो आपल्या विरुद्ध नाही तो आपल्या बरोबर आहे. म्हणून आपण त्यास विरोध करू नये. पुढे येशू लोकांना उद्देश करून सांगतो की, आपण ज्या लोकांचा विश्वास दुर्बल आहे त्यांस पापास प्रवृत्त करू नये. आपल्यामुळे जर कोणी पापाच्या कचाट्यात सापडत असेल तर आपण शिक्षेस पात्र ठरणे योग्य आहे.


बोधकथा:

एकदा एक मन विचलित झालेला किंवा गोंधळून गेलेला मुलगा धर्मगुरूकडे आला. त्याच्या हातात एक तुटलेला क्रूस होता. कुठल्यातरी व्यक्तीने तो अपमानित केला होता व तोडला होता. त्या क्रूसावरील ख्रिस्ताच्या मूर्तीचे हात, पाय, व मुखवटा तोडला होता. गोंधळलेल्या परिस्थितीत मुलाने धर्मगुरुना विचारले फादर ह्या क्रुसाचे आता काय करायचे? हा उडवून द्यायचा का?त्यावर धर्मगुरू उत्तरला नाही.घरी जा आणि भिंतीवर लाव जेव्हा पण तू ह्या क्रुसाकडे पाहशील तेव्हा तू त्या ख्रिस्ताचे हात, पाय, व मुखवटा आहेस ह्याची तुला आठवण होऊ दे. तान्हेने व्याकुळ झालेल्या मनुष्याला तू पाणी द्यावे. जेणेकरून  ख्रिस्ताचे तू हात होशील, आजाऱ्याना भेट दे म्हणजे तू ख्रिस्ताचे पाय होशील, व दुखीताचे सांत्वन कर म्हणजे तू ख्रिस्ताचा मुखवटा होशील.


 मनन चिंतन

इन्सान खाली बदन कि मुरत नहीं
बल्की खुदा कि सुरत है|

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधु-भगिनीनों आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होण्यास बोलावत आहे. ख्रिस्ताचे कार्य हे फक्त ख्रिस्तीयांसाठी मर्यादित नाही तर अख्रिस्ती सुद्धा ह्याचा भाग आहेत. ह्याचा प्रत्यय आपल्याला आजच्या शुभवर्तमानात पाहायला मिळतो. एक मनुष्य ख्रिस्ताच्या नावाने भुते काढत होता. कदाचित ह्या मनुष्याने ख्रिस्ताविषयी ऐकले असेल. कारण येशूची ख्याती सर्व ठिकाणी पसरली होती. त्यावेळी प्रख्यात देवमनुष्याचे नाव घेऊन लोकांस बरे करणे हि प्रथा पॅलेस्टाईन प्रदेशात प्रचलित होती. आणि म्हणून हा मनुष्य येशू हा एक दैवी रूप आहे हे जाणून येशूच्या नावाने लोकांस बरे करणे व भुते काढण्यास यशस्वी ठरतो. येशूचे शिष्य हे दृश्य पाहून थक्क झाले. आपण येशूच्या अधिक जवळ असून सुद्धा लोकांना बरे करण्यास असफल ठरलो ह्या गोष्टीची त्यांना ईर्ष्या वाटली म्हणून योहानाने येशूकडे तक्रार केली. पण येशूने त्याला सरळ शब्दांत त्याच्या चुकुची जाणीव करून दिली. येशू म्हणाला, “जो आपल्या विरुद्ध नाही तो आपल्या बरोबर आहे.” ह्याचाच अर्थ म्हणजे त्या मनुष्याला लाभलेले सामर्थ्य हे देवाकडून होते. देव त्याच्याद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता पसरवित होता.
ख्रिस्ताचे कार्य हे फक्त प्रवचन करणे, बाप्तिस्मा देणे किंवा इतरांना ख्रिस्ती धर्मात आणणे ह्यापुरता मर्यादित नाही तर त्याही पलीकडे आहे. माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाला माणूस म्हणून वागविणे हे आहे. जेव्हा एखादी अख्रिस्ती व्यक्ती तहानलेल्या व्यक्तीस पाणी पाजते, रोग्यांना औषध देते, दिन-दुबळ्यांची सेवा करते, दुःखितांचे सांत्वन करते, खिन्नतेने ग्रासलेल्या लोकांबरोबर प्रेमाचे दोन शब्द बोलते तेव्हा ती ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होते. दुसऱ्या व्हॅटीकन सभेने ख्रिस्ताचे वास्तव्य हे सर्वव्यापी आहे ह्याची जाणीव अखिल ख्रिस्तसभेला करून दिली. ‘संवाद आणि घोषणा’ ह्या ख्रिस्तसभेच्या लेखानुसार “ख्रिस्ताचे राज्य हे ख्रिस्तसभेपुरते मर्यादित नाही तर त्याच्या सीमा पवित्र आत्म्याचे संकेत कृतीत उतरविण्यास तत्पर असणाऱ्या प्रत्येक ख्रिस्तेतर व्यक्तीच्या हृद्यात विस्तारित आहेत.” अशा ख्रिस्ताच्या कार्यास दुजोरा देणे म्हणजे मानवजातीस मिळणाऱ्या अमानुषपणाचे भूत काढणे होय.
ख्रिस्त आपल्याला आज निरागस व्यक्तीच्या विश्वासात भर घालण्यास सांगत आहे. ह्या व्यक्ती निष्पाप बाळाप्रमाणे असतात. त्यांना प्रत्येक गोष्ट सत्य वाटते. म्हणून जर आपले वर्तन हे त्यांच्या ख्रिस्तांवरील विश्वासाला तडा पाडत असेल तर आपल्या गळ्यात दगड बांधून आपणांस समुद्रात फेकलेले बरे. इथे आई-वडिलांच्या जबाबदारीची सुद्धा येशू ख्रिस्त आठवण करुन देतो. पालकांनी आपल्या मुलांना विश्वासात वाढवावे. येशू ख्रिस्त कोण आहे ह्याची ओळख करून द्यावी जेणेकरून ते जगातील वाईटांचा सामना करतील. गेल्या रविवारची, आजची व येणाऱ्या रविवारची उपासना बालकांबद्दल बोलत आहे. बालकांना येशूकडे येण्यास आपण थांबवू नये तर त्यांच्या निरागस विश्वासात भर घालावी.
आजच्या शुभवर्तमानातील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर आपला कुठलाही अवयव आपणास पापांस प्रवृत्त करत असेल तर तो आपण उपटून टाकावा. कारण आपला संपूर्ण नाश होण्याऐवजी आपण अपंग स्वर्गात गेलेले बरे. ह्या वाक्याचा आपण तंतोतंत अर्थ घेऊ नये. आपले शाररीक अवयव हे आपल्यासाठी जगातील सर्व संपत्तीहून अनमोल आहेत. म्हणून जर आपल्या अनमोल गोष्टी ज्या अधिक महत्वाच्या वाटतात त्या जर आपल्याला पापाकडे नेत असतील, ख्रिस्त व आपल्यामध्ये दरी निर्माण करीत असतील तर त्या पापांचा आपण त्याग करावा. स्वर्गराज्यां पेक्षा अधिक महत्व दुसऱ्या गोष्टीस देऊ नये हे आज आपल्याला येशू ख्रिस्त पटवून देत आहे.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद – हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

1.    हे परमेश्वरा तुझ्या सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिस, बिशप्स, फादर्स व सर्व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांना तुझे कार्य करण्यास शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे. व तुझ्याशी एकनिष्ठ राहून जगाला तुझी ओळख द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.    जे लोक देवापासून दूर गेले आहेत. त्या सर्वाना दैवी दयेचा स्पर्श व्हावा व देवाकडे वळून एक नवीन, विश्वासू जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया.
3.    जी कुटुंबे दैनिक वादविवादाला बळी पडून मोडकळीस आली आहेत, त्या कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला उधान यावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
4.    जी दापत्ये अजून बाळाच्या देणगीची वाट पाहत आहेत, त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व बाळाच्या देणगीने त्याचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून प्रार्थान करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

Friday 21 September 2018



Reflection for the Homily of 25th Sunday of Ordinary Time 
(23-09-18) By Br. Rahul Rodrigues




सामान्य काळातील पंचविसावा रविवार

दिनांक – २३-०९-२०१८
पहिले वाचन – शलमोनचा ज्ञानग्रंथ २:१२;१७-२०
दुसरे वाचन – याकोब  ३:१६,४:३
शुभवर्तमान – मार्क ९:३०-३७



 ‘जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे.’

प्रस्तावना
            आज आपण सामान्य काळातील पंचविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपल्याला नम्रता, लीनता,व सौम्यता ह्या विषयावर चिंतन करण्यास आमंत्रण देत आहे.
            असं म्हटलं जाते की, जी झाडे सरळ उंच वाढतात ती प्रथम कापली जातात. अर्थात, आजच्या ह्या आधुनिक जगात एक चांगलं नम्रतेच जीवन जगणे फार कठीण आहे. परंतु प्रभू येशू तरीही आपणाला त्याच्या सारखे जीवन जगण्याचा ध्यास करण्यास सांगत आहे.
            शलमोनच्या ज्ञानग्रंथातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, सद्गुणी मनुष्य देवाचा पुत्र असेल तर देव त्याची बाजू घेईल आणि त्याची शत्रूच्या तावडीतून सुटका करील. तर दुसऱ्या वाचनात संत याकोब आपल्याला ह्या जगातील ऐहिक गोष्टींचा मोह न धरता, ख्रिस्ताच्या वचनाचा ध्यास आपल्या जीवनात कसा उतरावा ह्या विषयी उपदेश करत आहे. पुढे शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या शिष्यांना नम्रते विषयी धडा देत आहे. तो म्हणतो, “ जो कोणी पहिला होऊ इच्छितो त्याने प्रथम सेवक झाले पाहिजे.
            आज आपण समाजाकडे पहिले तर आपल्याला समजून येते की, आज सर्वाना मोठ व्हावसं वाटते व ते त्यांना अहंकारमय बनवते व देवाच्या वचनापासून दूर नेते. तर ह्या पवित्र बलिदानामध्ये, आपणही ख्रिस्तासारखे नम्र बनावे व त्यासाठी लागणारी कृपा-दृष्टी आपल्याला प्रभूने द्यावी यासाठी आपण प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन - शलमोनचा ज्ञानग्रंथ २:१२;१७-२०

            शलमोनचा ज्ञानग्रंथ आपल्याला सांगत आहे की, नीतिमान मनुष्य ह्या त्याच्या चांगल्या कार्यामुळे त्याच्या शत्रूंना सतत अडथळा आणत असतो. व त्या कारणामुळे ते त्याला जीवे मारण्यास तयार असतात. हा नीतिमान मनुष्य इतरांनाही चांगले जीवन जगण्यास आव्हान करीत असतो. परंतु ते त्यांना पटत नाही. त्यांना हे ही माहित असते की, देव त्याच्या सहाय्यास येतो तरीही ते त्याला जीवे मारण्याचा कात रचतात.
            परंतु आपण पुढे पाहतो की, नीतिमान हा त्याच्या चांगल्या कार्यामुळे शाश्वत जीवनास योग्य ठरतो. तो वाईटापासून व ऐहिक मोहापासून दूर राहतो. अशा नीतिमान व चांगल्या लोकांची कसोटी वेळो-वेळी केली जाते; परंतु देवावर पूर्ण विश्वास ठेवल्याने नीतिमान मनुष्याची विरोधकाराच्या तावडीतून सदैव सुटका होत असते. कारण त्याची चांगली कार्ये व सौम्यपणा त्याच्या मदतीला येत असतात.

दुसरे वाचन - संत याकोबाचे पत्र ३:१६,४:३

            संत याकोब आपल्या पत्राद्वारे ख्रिस्ती जनांसमोर खोटे व खरे ज्ञान कुठचे हे सांगतो. मुळात ज्ञान कधीच घमेंड करत नाही. जेथे मत्सर असतो आणि तट-फुटी पाडण्याचा प्रयत्न केलेला असतो, तेथे खरे ज्ञान नसेत. ज्याला ज्ञान म्हटले जाते ते देवापासून नसते, तर ऐहिक जगापासून असते. ते पापी स्वभावापासून व इंद्रियजन्य असते. ते सैतानाने पुरविलेले असते व यामुळे गोंधळ व अव्यवस्था माजते व सर्व प्रकारचे वाईट घडते.
            परंतु जे ज्ञान देवापासून मिळते ते १००% शुद्ध असते. ते पवित्र असते. या ज्ञानाने तट न पडता शांतीची स्थापना होते.
            पुढे संत याकोब म्हणतो, आपण का भांडतो, तर आपणा प्रत्येकामध्ये पापी स्वभाव असतो. या पापी  स्वभावाचे प्रमुख गुणलक्षण “स्वार्थ” हा आहे. आपण सदा आपल्या फायद्याचे पाहतो व त्यामुळे आपल्याला हवे ते मिळत नाही पण जर का आपण निस्वार्थी जीवन जगलो. दुसऱ्याच्या भल्याचे केले तर नक्कीच आपलेही भले होईल.

शुभवर्तमान - मार्क ९:३०-३७

            मार्क लिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू पुन्हा एकदा आपल्या मरणाविषयी शिष्यांना सांगत आहे. व नेहमी प्रमाणे शिष्यांना काही समजत नाही. आपण पाहतो की, येशूला त्यांच्या मरणाची पूर्व खबर होती व तो आपल्या शिष्यांना त्यासाठी तयार करीत होता. येशूला माहिती होते की, आपले राज्य इथले नाही तर स्वर्गाचे आहे. परंतु शिष्यांना ह्याची जाणीव होत नाही व ते येशूचे राज्य इथले  समजतात व त्या अनुशंगात ते स्वःताच्या मोठेपणाची चर्चा करतात.
            परंतु येशू त्यांचा गैरसमज दूर करतो व सांगतो, देवाच्या राज्यात जो अधिकार गाजवितो तो मोठा असतो असे नाही तर मोठा तो असतो जो स्वतःला दुसऱ्याच्या सेवेसाठी नमवितो. पुढे येशू त्यांना लहान बालकाचे उदाहरण देतो. बालके हे स्वभावाने निर्मळ, स्वाभिमानी व वागण्याने नितळ असतात. ह्यास्तव जो कोणी बालकाप्रमाणे आपल्या जीवनात स्वाभिमान व नितळपणा ह्यांचा स्विकार करतो, तो ख्रिस्ताचाच नव्हे तर ज्याने ख्रिस्ताला पाठवले आहे त्याचा स्विकार करतो.

बोधकथा

एका खेडेगावात शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले एक वृद्ध होते. त्यांची शांती कशामुळेही, अगदी मोठा अपमानास्पद प्रसंग असला तरीही ढळत नसे. अर्थातच त्यामुळे तो गावातील प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय झाले होते.
एके दिवशी काही कुटाळ तरुणांनी त्यांना संतापायला लावण्याचे ठरवले. त्यांनी एका आडदांड माणसाला सामील करून घेतले, काय करायचे हे त्याला सांगितले, आणि जर त्या वृद्धाची सहनशीलता संपवून राग आणून दाखवला तर पाचशे रुपये देण्याचे कबूल केले.
ते वृद्ध गृहस्थ रोज सकाळी गावाजवळच्या नदीकाठी स्नानासाठी जायचे. ते कुटाळ तरुणही गेले आणि नदीकिनाऱ्यावरच्या झुडपांमध्ये लपून बसले. ते वयस्कर गृहस्थ जेव्हा स्नान करून नदीवरून परतू लागले, तो आडदांड तरुण त्याच्याजवळ गेला आणि त्यांच्या तोंडावर थुंकला. त्या वयस्कर गृहस्थाने त्याच्याकडे बघून स्मित हास्य केले आणि पुन्हा डुबकी मारायला नदीकडे गेले. ते जेव्हा दुसऱ्यांदा स्नान करून परतू लागले, तेव्हा तो आडदांड पुन्हा त्यांच्या तोंडावर थुंकला. त्या गृहस्थाने पुन्हा स्मित हास्य केले आणि डुबकी मारायला गेले. हीच घटना अनेक वेळा घडली. शेवटी त्याला आपल्या कृतीचा पश्चाताप झाल्यामुळे त्याने त्या वृद्धाकडे क्षमा मागितली. ते पाहून झाडीत लपलेले सारे कुटाळ तरुणही बाहेर आले आणि त्यांनी त्या वृद्धाची क्षमा मागितली.
त्यातील एका तरुणाने त्यांना विचारले, “महाराज तुम्ही या आडदांड माणसाचे हे दुष्ट कर्म कसे सहन करु शकलात? त्या वृद्धाने शांतपणे उत्तर दिले, “आपण मुलांवर प्रेम करतो, आणि त्यांच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना क्षमा करतो. जर आपण जगातल्या प्रत्येकाविषयी प्रेम आणि आपुलकी दाखवली तर रागवण्याचा प्रसंग येणार नाही. अशा संयमाच्या स्तरावर पोहचणे खरं तर सोपे नाहीच. त्यासाठी सततचा अभ्यास आणि कठोर परिश्रम हवे असतात.”

मनन चिंतन

आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो कि, येशू आपल्या मरणाविषयी दुसऱ्यांदा शिष्यांना भाकीत करीत आहे; परंतु शिष्य हे आपल्यामध्ये सर्वात मोठा कोण ह्याविषयी चर्चा करीत आहेत. त्यांना येशूच्या मरणाविषयी काळजी किंवा कुतुहूल वाटत नाही तर आपल्यात सर्वश्रेष्ठ कोण हे ठरवण्यात ते मग्न आहेत. ते स्वतःचा विचार करत आहेत. स्वतःच्या स्वार्थाचा विचार करीत आहेत. माझ्या वाट्याला काय येईल? मला काय मिळेल? अश्या गोष्टीमध्ये त्यांना अधिक रस आहे.
हाच नजारा व वृत्ती आपणाला आजच्या समाजात पहावयास मिळतो. आजच्या ह्या आधुनिक व धावपळीच्या जगामध्ये सर्वजण स्वतःचा मोठेपणा स्पष्ट करण्यासाठी धडपडत आहेत. मला कसे मोठे होता येईल? मला मान-सन्मान कसा मिळेल? अश्याप्रकारच्या गर्वरूपी आणि अहंकाराच्या जाळ्यात आपण अडकून गेलो आहोत.
परंतु मी मोठा होण्यासाठी दुसऱ्यांना खाली पाडणे किंवा त्यांची बदनामी करणे हे कितपत योग्य आहे? आपल्यामध्ये ‘खेकड्याची-मानसिकता’ शिरकाव करत आहे. खेकडे कधीच दुसऱ्यांना वर जाऊ देत नाहीत. तर ते वर जाणाऱ्याला सतत खाली खेचतात. शिष्य हे येशुबरोबर राहिले. त्यांनी येशूच्या शिकवणुकीचा परस्पर अनुभव घेतला व तरीही ते येशूच्या विचार-सरणी प्रमाणे किंवा शिकवणुकीनुसार वागत नव्हते. त्यामुळेच येशू त्यांना लहान बालकाचे उदाहरण देतो. कारण लहान बालके हि मनाने निर्मळ व पवित्र असतात. ते कधीही स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत नाही. ते आपले जीवन आनंदाने जगतात. जे काही वाट्याला येईल ते अनुभवतात. ते कधीही हे असे का? किंवा तसे का? ह्याचा विचार न करता निरागसपणे आपले जीवन जगतात.
हेच प्रभू येशू आपल्या शिष्यांना व आपल्याला सांगू इच्छितो कि आपण सुद्धा त्या बालकाप्रमाणे होणे गरजेचे आहे. आपले जीवन हे निःस्वार्थीपणे दुसऱ्यांच्या सेवेसाठी वापरणे गरजेचे आहे. आज आपल्या समोर संत मदर तेरेजा, संत मॅक्सिमिलीयन कोलबे ह्यांसारखे अनेक आदर्श आहेत; ज्यांनी आपले संपूर्ण जीवन दुसऱ्यांच्या सेवेसाठी व उद्धारासाठी पणाला लावले. आज त्यामुळे ते संत म्हणून गणले जातात. त्यामुळेच जर का आपल्याला सुद्धा श्रेष्ठ व्हायचे असेल तर आपण सुद्धा दुसऱ्यांची सेवा केली पाहिजे. ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रभूकडे प्रार्थना करूया कि, त्याने आपल्याला लहान बालकाप्रमाणे निर्मळ व नम्र होण्यास मदत करावी जेणेकरून आपणही श्रेष्ठत्व प्राप्त करू.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१) आपल्या ख्रिस्तसभेत अखंडरीत्या कार्य करणारे परमगुरु, महागुरू, धर्म-गुरु आणि धर्म-भगिनी व इतर सर्व ख्रिस्ती-बांधव जे देवाचे कार्य पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने ख्रिस्तामध्ये नम्र होऊन करत आहेत या सर्वांना देवाने चांगले व निरोगी आरोग्य बहाल करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लोक रस्त्यावर आलेले आहेत, त्यांची पुष्कळ अशी हानी झाली आहे. ह्या सर्वांना प्रभूने दिलासा द्यावा व त्यांना नव्याने जगण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) जे लोक आजारी आहेत अश्यांना प्रभूचा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांना त्यांचा आजार सहन करण्यास सहनशीलता व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी कार्य करणारे आपले राजकीय पुढारी व नेत्यांनी नम्रता हा गुण अंगी बाळगून देशाच्या हितासाठी कार्यरत रहावे व जनतेच्या कल्याणासाठी निःस्वार्थीपणाने झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.