Tuesday 24 March 2020


Reflections for the Homily of 5th Sunday Of Lent (29-03-2020) By Br. David Godinho.




प्रायश्चित काळातील पाचवा रविवार




दिनांक: २९/०३/ २०२०.
पहिले वाचन: यहेज्केल ३७:१२-१४.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:८-११.
शुभवर्तमान: योहान ११:१-४५.



विषय: पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे.
प्रस्तावना:
          आज आपण उपवास काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. थोड्या दिवसानंतर आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हा सोहळा साजरा करणार आहोत. आजची उपासना पुनरुत्थानावर विचार विनिमय करण्यास, पुनरूत्थानावरील आपला विश्वास बळकट करण्यास बोलावीत आहे.
          ‘पुनरुत्थान व जीवन मीच आहे.’ ही प्रभू येशूची वचने आजच्या ह्या परिस्थितीत आपणास दिलासा देतात. आपले सांत्वन करतात. कुठलीही वाईट परिस्थिती, कुठलाही वाईट प्रसंग आपणावर विजय मिळवू शकणार नाहीत. हीच गोष्ट आजची तिन्ही वाचने आपणा समोर मांडीत आहेत.
          यहेज्केल प्रवाद्याच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात परमेश्वर म्हणतो की, ‘मी तुमच्या काबरा उघडीन व तुम्हास कबरेतून बाहेर काढीन,’ असे आश्वासन देतो, म्हणजेच मरणावर देवाचा ताबा आहे हे दाखवून देत आहे.
          रोमकरांस लिहिलेल्या पत्रात देहा प्रमाणे नव्हे, तर आत्म्या प्रमाणे चालण्यास आपणा प्रत्येकास आग्रह करण्यात येत आहे. पुढे शुभवर्तमानात येशू हाच खरा पुनरुत्थान व जीवन आहे, असे सांगण्यात आले आहे.
          ह्या सर्व सामर्थ्यशाली परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास आणि आपलं सर्वस्व त्यास समर्पित करण्यास व सर्व परिस्थितीत विशेषता अतिशय कठोर किंवा कठीण परिस्थितीत त्याच्यावर विसंबून राहण्यास परमेश्वराची कृपा ह्या पवित्र मिसाबलिदानात परमेश्वराजवळ मागूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यहेज्केल ३७:१२-१४
          येरूशलेमचा पाडाव झाल्यानंतर तेथील लोक विखुरले गेले असते. त्यांचा आशाभंग झाला असता. ह्या दिव्य वाणीचा संदेश सरळ आहे. इस्राएलचे हे मृत राष्ट्र एक दिवस पुनरजीवित होऊन आपल्या स्वतःच्या देशात परत जाईल. शुष्क अस्थी सजीव, जिवंत लढाऊ सैनिक होतील. एक दिवस इस्राएलचे असेच रूपांतर होईल, ते समर्थ होईल. इस्राएल लोकांकरीता चांगले दिवस येणार आहेत असे आश्वासन परमेश्वर इस्राएली लोकांना देत आहे.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:८-११
          संत पौल ‘देह आणि आत्मा’ ह्या दोन्ही गोष्टीवर विचार मांडत आहे. तो म्हणतो की, देहा प्रमाणे किंवा देह स्वभावाने चालण्यासाठी खटपट करावी लागत नाही. तो आपला स्वभावच आहे. परंतु पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यास निश्चयपूर्वक त्याचे नियंत्रण स्वीकारावे लागतील. म्हणून देहाप्रमाणे नव्हे, तर आत्म्याप्रमाणे जीवन जगण्यास पौल आपणास पाचारण करीत आहे. देह स्वभाव आपणास पापाच्या मोहात पाडतो, आणि मरणाकडे किंवा विनाशाच्या मार्गावर नेतो, याउलट, आत्मा देवाकडे नेतो, जीवनाकडे आपली पावले वळवीत असतो, असे सांगण्यात आले आहे.

शुभवर्तमान: योहान ११:१-४५
          येशूच्या पुनरुत्थानात सहभागी होण्यासाठी, त्याच्या मरणात, कष्टात, दुःखात सहभागी होणे गरजेचे आहे. हे लाजारच्या कथेतून किंवा घटनेतून आपणास कळून येते. परमेश्वराला कोणतीही गोष्ट अशक्य नाही ह्याचे जिवंत उदाहरण लाजारच्या दृष्टांतद्वारे आपणासमोर ठेवण्यात आलेले आहे.
          ‘लाजारला मरणातून उठविणे’ हा प्रभू येशूचा शेवटचा आणि सर्वात महान असा चमत्कार किंवा चिन्ह होते ह्या चमत्कारा मागे दोन उद्देश आहेत.
          पहिला उद्देश म्हणजे; येशू हा ख्रिस्त आहे किंवा मसीहा किंवा अभिषेक केलेला आहे. ज्या विषयी पिता परमेश्वर लाजाराला पुन्हा जिवंत करून येशू विषयी सर्व लोकांसमोर साक्ष देत आहे.
          दुसरा उद्देश म्हणजे; शास्त्री आणि परुशी यांनी येशूला मारण्याची केलेली योजना पुढे नेण्यासाठीची आहे.
          तसेच ह्या उताऱ्यात आपणास प्रभू येशू ख्रिस्ताची खरी ओळख करून दिलेली आहे की, तोच खरा पुनरुत्थान व जीवन आहे. हे शब्द त्याच्या तोंडून आपण ऐकत आहोत. आपल्या आजारात, दुःखात व जेव्हा काही गोष्टी आपल्या विचारा पलीकडे असतात, तेव्हा देवावर विश्वास ठेवण्यास आणि त्याच्याकडे धावा घेण्यास संत योहान आपणास प्रोत्साहित करीत आहे, किंवा उत्तेजित करीत आहे.

मनन चिंतन
          आजचा रविवार आपणास पवित्र आठवड्याच्या जवळ आणतो आणि आजची उपासना पुनरुत्थान व जीवन ह्या ख्रिस्ती जीवनातील दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर भर देत आहेत.
          जुन्या करारात आपल्या निवडलेल्या लोकांस परमेश्वराने शब्दानेच नव्हे, तर आपल्या कृतीद्वारे स्वतःस प्रकट केले. परंतु इस्राएली लोक देवाने केलेल्या उपकाराचे ऋणी होण्यापेक्षा; ते देवाच्या विरुद्ध गेले. त्यांच्या सुखात, आनंदात ते परमेश्वराला विसरले. फक्त अडीअडचणीत, दुःखात, कष्टात त्यानी परमेश्वराकडे धाव घेतली. इ.स.वी.सन ५८७ मध्ये जेरुसलेम मंदिराचा नाश झाला होता. इस्राएल लोक निराशेत होते, तेव्हा परमेश्वर त्यांना पुन्हा एकदा नवजीवन देण्याचे आश्वासन देतो.
          दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, संत पौल रोमकरांस आपल्या देहाचे पुनरुत्थानाबद्दल सुचित करत आहे. जो कोणी ख्रिस्तामध्ये जगतो, तो ख्रिस्तामध्ये पुनर्जीवित होणार आहे. ख्रिस्तामध्ये जीवन जगणे म्हणजे; ख्रिस्ताने दिलेल्या आत्म्याने परिपूर्ण होऊन आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगणे होय.
          शुभवर्तमानात आपणास लाजारच्या घटनेविषयी सांगितलेले आहे. ‘लाजार’ या नावाचा अर्थ ‘देव मदत करतो.’ म्हणजे आपला देव हा आपणास मदत करण्यास सतत तयार असतो. अगदी कठीण परिस्थितीत, प्रसंगातही आपण असलो आणि जर आपण त्यास हाक मारली, तर तो आपल्या मदतीस धावून येतो. हेच आपण यिर्मयाच्या पुस्तकात वाचतो. परमेश्वर म्हणतो, “मला हाक मार, म्हणजे मी तुला उत्तर देईन.”(यिर्मया ३३:३)
          ह्याच विश्वासाने मरिया व मार्थाने येशूला लाजारच्या आजारा विषयी निरोप दिला होता. आणि त्याच्या येण्याची त्या दोघी विश्वासाने व आतुरतेने वाट पाहत होत्या. त्यांना माहीत होते की, येशू येऊन लाजारला आजारातून बरे करील. त्यांना येशूचा स्वभाव माहीत होता की, येशू दुसऱ्यांच्या मदतीला सतत धावत असतो, तयार असतो. आणि म्हणूनच त्या दोघी बहिणी येशूच्या येण्याची मोठ्या आतुरतेने, मोठ्या आशेने वाट पाहत होत्या. परंतु लाजारच्या जीवनाची पेटती ज्योत हळूहळू आजारामुळे बंद होत चालली होती व शेवटी बंद झाली. आजारामुले तो मरण पावला. परंतु येशू काही तिकडे पोहोचला नाही. त्याच्या दफन क्रियेला देखील येशू पोहोचला नाही. आणि सर्व आशा आता संपल्या होत्या. सर्व काही संपलं होतं. जीवनाचा जणूकाही सूर्यास्त झाला होता. आणि अशावेळी नवीन पहाटे प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त तिकडे पोहोचतो. लाजारला कबरेत बंद करून चार दिवस लोटले होते.
          जेव्हा मार्थाला येशूच्या येण्याची चाहूल लागते; तेव्हा लागलीच ती धावत जाऊन येशूला भेटली. येशूच्या उशिरा येण्याने ती थोडी नाराज होती. परंतु तिचा विश्वासही तेवढाच होता, म्हणून ती म्हणते, “प्रभुजी, आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता.” आणि पुढे विश्वास प्रकट करून म्हणते की, “आताही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल.” अशा शब्दात ती आपली खात्री, विश्वास प्रकट करते. ह्यावरून आपणास मार्थाच्या दृढ किंवा अटळ अशा विश्वासाची प्रचिती होते. ह्या तिच्या विश्वासामुळेच तेथील सर्व लोक प्रभू येशूचा महिमा पाहू शकतात. आणखी नवीन एक चमत्कार ते पाहतात. मृत शरीराला प्रभु येशू जिवंत करतो. मृत्यूच्या जबड्यातून तो लाजारला मुक्त करतो.
          प्रभू येशू आपणास आज जाणीव करून देत आहे की, कुठल्याही कठीण प्रसंगी परमेश्वरावरील श्रद्धा किंवा विश्वास आपण ढळू देता कामा नये. कारण परमेश्वराचे विचार, त्याच्या कल्पना, आपले विचार, आपल्या कल्पना नाहीत. त्याचे मार्ग आपले मार्ग नाहीत. (यशया ५५:८) 
          पुनरुत्थान हे फक्त आपल्या शारीरिक मृत्युनंतर नाही किंवा देहाच्या मृत्यूनंतर नव्हे, तर ते आपल्या आयुष्याच्या प्रत्येक परिस्थितीत अनुभवण्यास आजची उपासना आपणास बोलावीत आहे. दैनंदिन जीवनातील दुःख, ताटातूट, बेरोजगारी, आजार, आपल्यावर होणारे अत्याचार, संशय, शंका, ह्या सर्व परिस्थिती म्हणजे; आपणावर येणारे मरणाचे अनुभव आहेत. ह्या सर्व परिस्थितीवर जेव्हा आपण ख्रिस्ताच्या सहाय्याने व प्रेमाने विजय मिळवितो; तेव्हाच आपण खऱ्या रीतीने पुनरुत्थानाचा आणि अमोल जीवनाचा अनुभव घेत असतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: “हे दयावंत प्रभू आमची प्रार्थना ऐक.”
१. पवित्रे ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू, व व्रतस्थ जे येशूच्या मळ्यात कार्य करत असताना त्यांनी श्रद्धावंतांची पुनरुत्थानावरील श्रद्धा बळकट करण्यासाठी सतत कार्यरत राहण्यास पवित्र आत्म्याची कृपा त्यास लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. सरकारी पुढाऱ्यांनी जनतेच्या फायद्यासाठी कार्य करण्यास व शांतीचे, नीतीचे, एकोप्याचे राज्य बांधण्यासाठी झटण्यास लागणारी कृपा त्यांस मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आज संपूर्ण जगात कोरोना वायरस मुळे हजारों लोक या रोगास बळी पडले आहेत, आणि बहुसंख्य लोक मरण पावले आहेत. ह्या रोगावर लवकरात लवकर औषधोपचार मिळावा व जे लोक ह्या रोगास बळी पडले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत आणि सर्वत्र चांगले आरोग्य प्रस्तापित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जेव्हा-जेव्हा आपल्या जीवनात कष्ट, दु:ख येते आणि आपले सर्व प्रयत्न व्यर्थ होतात, सर्व आशा-निराशा होतात, तेव्हा प्रभूवरील विश्वास आणि श्रद्धा भक्कम करण्यासाठी त्याच्या योजनेला प्राधान्य देण्यास लागणारी कृपा आपण परमेश्वराजवळ मागुया.
५.आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व व्ययक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.

Wednesday 18 March 2020


Reflections for the Homily of 4th SUNDAY OF LENT (22-03-2020) By 
Br. Julius Rodrigues.


प्रायश्चित काळातील चौथा रविवार


दिनांक: २२/०३/२०२०
पहिले वाचन: १ शमुवेल १६:१ब, ६-७,१०-१३अ
दुसरे वाचन: एफीसकरांस पत्र ५:८-१४
शुभवर्तमान: योहान ९:१-४१



विषय: “अंधकार धिक्कारा, प्रकाश स्विकारा.”
प्रस्तावना:
          आज आपण प्रायश्चित काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. ह्या रविवाराला आनंदोल्हास रविवार असे सुद्धा संबोधले जाते. उपवास काळात आनंदोत्सव आमच्यामध्ये दोन परस्पर विरोधी भावना निर्माण करतात. पहिली, आपला प्रभू येशूला दुःख सहन आणि क्रूसावरील मरण पत्करावे लागते याबद्दल दुःख तर, मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थीत प्रभू आम्हाला सुद्धा त्याच्या वैभवशाली पुनरुत्थानात सहभागी होण्यास पाचारण करतो म्हणून आनंदोत्सव. आजच्या उपासनेद्वारे प्रभू येशू आपणामध्ये असलेल्या प्रकाशाची ओळख करून देऊ इच्छित आहे व त्याद्वारे तो प्रकाश इतरांस देण्यास आमंत्रण देत आहे. म्हणून त्याच्या भेटीसाठी आपण ह्या मिस्साबलीदानामध्ये आपल्या पापांची आठवण करून ह्या परमेश्वराकडून आपल्या पापांची क्षमा याचना मागुया.

सम्यक विवरण:
 पहिले वाचन: १ शमुवेल १६:१ब, ६-७,१०-१३अ
          शौलाला दूर करण्याची प्रक्रिया देवाने कशी आरंभीली ते आपणास १६व्या अध्यायात सांगितले आहे. मानवाचा आणि परमेश्वराचा बघण्याचा दृष्टिकोन कसा विरोधात असतो ह्याची सांगड ह्या ठिकाणी आपल्याला घालून देण्यात आली आहे. देवाची निवड ही मानवी निवडी पेक्षा भिन्न असते. इस्रायल लोकांची अशी अपेक्षा होती की, आपले पुढारी देखणे, प्रभावी व्यक्तिमत्वे, दुसऱ्यांवर प्रथम दर्शनी छाप पाडणारे असावेत. परंतु त्यांच्या ह्या अपेक्षेचा भंग होत असल्याचे आपणास देवाच्या आवडी नुसार दिसून येत आहे.

दुसरे वाचन: इफीसकरांस पत्र ५:८-१४
          प्रकाश हा मानवी जीवनातील अगदी महत्वाचा भाग आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात ह्या दोन  बाजूंचा आसरा घेऊन आपले जीवन जगत असतो. ते म्हणजे प्रकाश आणि अंधार. संत पौल हा इफीसकरांस प्रकाशाचे महत्त्व पटवून देत आहे. पुढे तो म्हणतोय की, तुम्ही ख्रिस्तात प्रकाशित झाला आहात आणि म्हणून तुम्ही अंधकाराला धिक्कारा. ख्रिस्ताचा प्रकाश आपणास सत्याचा मार्ग दाखवील ह्या विषयी पौल आपणास कान उघडणी करून देत आहे.

शुभवर्तमान: योहान ९:१-४१
          आजच्या शुभर्वतमानामध्ये येशू ख्रिस्त जन्मापासून आंधळा असलेल्या एका मनुष्याला दृष्टिदान देतो. नकळतपणे या चमत्काराव्दारे प्रभू आमच्या आध्यात्मिक अंधत्वावर बोट ठेवतो व सर्व प्रकारच्या अंधत्वातून बाहेर पडण्याचे आव्हान करतो. येशू ख्रिस्ताच्या पवित्र स्पर्शाने त्या जन्मांध माणसाला सर्व काही दिसू लागले.

मनन चिंतन:
“आता आपण कुठे आहोत याचा आत्मशोध घ्या.
          जो मला अनुसरतो... त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. आजच्या उपासनेमध्ये आपण विशेष करून दोन गोष्टी ऐकणार आहोत. अंधकार आणि प्रकाश. विशेष करून ह्या विषयांवर मनन चिंतन करणार आहोत. प्रथम प्रकाश माझ्या जीवनात किती महत्त्वाचा आहे? प्रकाशाविना आम्ही काय केले असते? वर्षभरातील प्रत्येक दिवशी डोळे उघडताच २४ तासांसाठी अंधकार असल्याची जरा कल्पना करा. अशा एका जगाची कल्पना करा जिथे रंगच नाहीत, कारण प्रकाशावीना कोणताच रंग असू शकत नाही. खरोखर जर प्रकाश अस्तित्वात नसता, तर आपणही नसतो. आमचे अस्तित्वही आज नसते. हे झाले प्रकाशाविषयी.
          अंधार म्हणजे संपूर्ण काळोख, प्रकाशाची उणीव. अशा ह्या अंधारात कोणतेही काम आपण करू शकत नाही. कारण आपली दृष्टी त्याठिकाणी हरवलेली असते. आपण कोणतेही चांगले कार्य ह्या ठिकाणी करू शकत नाही. हतबल झालेलो असतो, नीराश असतो, बेचेन असतो, हताश झालेलो असतो, व त्या अंधकारात आपले जीवन व्यथीत करत असतो.
          माझ्या प्रिय भाविकांनो, आजच्या उपासनेमध्ये आपणास प्रकाश ह्या विषयी कान उघडनी करून  दिली आहे. पहिल्या वाचनात आपणास सांगण्यात येत आहे की, देवाची निवड कशी असते आणि त्यामागे देवाचा काय हेतू आहे, हे समजून येते. खऱ्या राजाची निवड करणे म्हणजे प्रजेचा विकास, त्याची उन्नती व संगोपन. जर राजा विश्वासू असेल तर त्यांची प्रजा देखील विश्वासू राहते. म्हणूनच आपल्याला आज पहिल्या वाचनाद्वारे सांगून देण्यात आले आहे की, देव आपल्या प्रजेला प्रकाशाकडे नेत आहे. त्याचे संरक्षण करत आहे. म्हणूनच तो दाविदाची निवड आपल्या प्रजेसाठी करत आहे.
“अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची देवाची वाटचाल.”
          तर दुसऱ्या वाचनात आपणास संत पौल सांगत आहे की, प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. जे पापमार्गाने जात आहेत. ते अध्यात्मिक अंधारात चालत आहेत. त्यांचे भागीदार होऊ नका. तुम्ही ख्रीस्तात प्रकाशित झालेला आहात. ख्रिस्ताच्या प्रकाशित किरणांचा भारा तुमच्या जीवनावर झालेला आहोत आणि म्हणून तुम्ही त्या ख्रिस्ताच्या प्रकाशाने, प्रकाशात उज्वलीत झाला आहात. म्हणूनच जो ख्रिस्त प्रकाश आहे तो तुमच्यात वस्ती करीत आहेत. म्हणूनच सर्व अंधकार सोडून द्या, आणि त्या प्रभूमध्ये त्या प्रकाशात विलीन व्हा. आपल्या जीवनात आपल्याला प्रकाशाची जाणीव होत नसते. आम्ही मग आपण त्या अंधारात आपले जिवंत घालवत असतो. परंतु आज ह्या रविवारी ख्रिस्ताच्या प्रकाशाचा अनुभव घेऊया. हेच आपल्याला सांगण्यात आले आहे.
          शुभवर्तमानावर मनन चिंतन करत असताना मला दिवाळीचा सण साजरा होत आहे असे वाटते. कारण आज त्या अंध व्यक्तीला प्रकाश मिळालेला आहे. जन्मापासून ह्या व्यक्ती अंधकार काय आहे आणि कसा असतो ह्याचा अनुभव घेत होता, रडत होता व शोक करीत होता. परंतु आज येशू ख्रिस्त त्याला दृष्टी बहाल करीत आहे. प्रकाशाची तेजस्वी ज्योत त्याच्या डोळ्यात टाकत आहे. आणि म्हणूनच जणू काही तो आनंदोत्सव साजरा करीत आहे. असे म्हणतात “तमसो मा जोतीर्गमया” म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल. अंधारावर प्रकाशाने मिळविलेला विजयाचा उत्सव. जणू तो आज साजरा करत आहोत. अशा ह्या परिस्थितीमध्ये तो परमेश्वराला ओळखत आहे. आपला विश्वास त्यात प्रबल करीत आहे.
          परुशी आणि शास्त्री ह्यांना देखील देवाचा प्रकाश बहाल करण्यात आला होता. परंतु त्यांना त्या प्रकाशाची जाणीव झालेली नव्हती. ते अंधकारात आपले जीवन सारीत होते. ख्रिस्ताची खरी ओळख त्यांना झालेली नव्हती. अशी म्हण आहे की, झोपलेल्या व्यक्तीला उठविणे शक्य आहे. परंतु झोपण्याचे सोंग केलेल्या व्यक्तीला उठविणे कठीण. होय खरोखरच शास्त्री आणि पुरुशी ह्यांनी सोंग केले होते. म्हणूनच त्यांना ख्रिस्ताची दैवीपणाचा अनुभव आला नाही. तथापि त्या अंध व्यक्ती त्या ख्रिस्ताचा स्पर्श झाला आणि त्याचा विश्वास वाढला.
          आज आपण उपवास काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. म्हणूनच स्वतःला विचारूया; मी ख्रिस्ताचे जीवन जगत आहे का? अंधकाराचा प्रभाव माझ्या जीवनावर किती आहे? ख्रिस्त जो खरा प्रकाश आहे त्याची ओळख मला झाली आहे का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे परमेश्वरा लोकांची प्रार्थना ऐक.”
१. हे परमेश्वरा तुझ्या लोकांची सेवा करण्यासाठी तू आपले पोप फ्रान्सिस,बिशप्स, धर्मगुरू, व व्रतस्थ ह्यांची निवड केली आहेस. त्यांनी तुझ्या प्रेमाचा संदेश जगातील सर्व लोकांना द्यावा म्हणून तू त्यांना शक्ती प्रदान कर म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ह्या उपवास काळात आपण प्रत्येकाने चांगले सहकार्य करावे तसेच कार्य परमेश्वराची गोड्वी गोरगरीब पर्यंत पोहोचवावी म्हणून त्या दयाधना कडे प्रार्थना करूया.
३. आपल्या पॅरिश मधील जे लोक आजारी आहेत, दुःखात आहेत, संकटात आहेत, त्यांस परमेश्वरिय साहाय्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जगभरात अनेक लोक करोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श लागून त्यांचे ह्या रोगापासून मुक्तता मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.


Thursday 12 March 2020



Reflections for the Homily of 3rd SUNDAY OF LENT

(15-03-2020) By Br. Robby Fernandes










प्रायश्चित काळातील तिसरा रविवार



दिनांक: १५/०३/२०२०
पहिले वाचन:  निर्गम १७:३-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१-२,५-८
शुभवर्तमान: योहान ४:५-४२


प्रस्तावना:

          आज आपण सर्वजण उपवास किंवा प्रायश्चित काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आज देऊळमाता आपल्याला देवावर संपूर्ण मनाने, हृदयाने व अंत:करणाने विश्वास ठेवायला बोलावत आहे. तसेच त्याच्या वचनांवर चालायला आमंत्रण करीत आहे.
          पहिल्या वाचनात परमेश्वर मोशेच्या मध्यस्थीने खडकातून पाणी काढून इस्रायली लोकांची तहान भागवतो. तर दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, "ख्रिस्ताच्या मरणाने आपण नीतिमान झालो आहोत." पुढे शुभवर्तमानात आपल्याला शोमरोनी स्त्री व येशू मधील सार्वकालिक जीवनाविषयी झालेले संभाषण ऐकावयास मिळते. जर आपल्याला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती करायची असेल तर, आपल्याला आपली परमेश्वरावरील श्रध्दा आणि विश्वास वाढवण्याची गरज आहे. जेव्हा आपण देवावरील श्रद्धा व विश्वास बळकट करतो तेव्हा, देवाच्या दैवी दानांचा व सामर्थ्यांचा आपल्याला आपल्या जीवनात अनुभव येत असतो. आजच्या मिस्साबालीदानामध्ये आपणास सार्वकालिक जीवनाची व दैवी दानांची देणगी प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन:  निर्गम १७:३-७

          पहिले वाचन हे निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेले आहे. अरण्यातून चालत असताना लोक पाण्यासाठी कासावीस झाले होते. त्यामुळे ते मोशे विरुद्ध कुरकुर करत होते. ते म्हणाले, आम्हांला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुले-बाळे, गुरेढोरे ह्यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून तू आम्हांला येथे आणले आहेस का? तेव्हा मोशेने परमेश्वराकडे धाव घेतली व त्यांची व्यथा परमेश्वराला सांगितली. तेव्हा इस्रायली प्रजेची तहान भागवण्यासाठी परमेश्वराने खडकातून त्यांना पाणी प्यावयास दिले. अशाप्रकारे परमेश्वराने त्याच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव करुन दिली.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१-२,५-८

          दुसरे वाचन हे संत पौलाच्या रोमकरांस पत्र यातून घेतलेले आहे. संत पौल सांगत आहे की, विश्वासामुळे आपण सर्वजण परमेश्वरापुढे नीतिमान ठरवलेले आहोत. जेव्हा आम्ही स्वतःचे तारण करण्यासाठी अशक्त होतो, तेव्हा आम्ही पापी असताना देखील ख्रिस्ताने स्वतःचा प्राण आम्हांसाठी दिला त्याद्वारे त्याने असे दाखवून दिले आहे की, त्याचे आपल्यावर खूप प्रेम आहे.

शुभवर्तमान: योहान ४:५-४२

          आजचे शुभवर्तमान योहानाच्या पुस्तकातून घेतलेले आहे. योहान आपल्यासमोर एक आगळ्यावेगळ्या दुष्टाचे चित्रीकरण करत आहे. जिथे येशू ख्रिस्त व शोमरोनी स्त्री व त्यांच्या मधील संभाषण आपल्या समोर मांडत आहे. येशू शोमरोनातील सुखार गावातून जात असताना; येशू याकोबाच्या विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी येतो. त्याच ठिकाणी शमरोनी स्त्री पाणी भरण्यासाठी येते. त्याच वेळेस येशू त्या शोमरोनी स्त्रीला जिवंत पाण्याविषयी सांगतो व "हे जिवंत पाणी कोणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही" आणि येशू  पुढे म्हणतो, "मी दिलेले पाणी अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे  जीवन मिळेल." अशापकारे येशूने स्वतः कोण आहे हे उघडपणे सांगितले. तेव्हा तिने आपली पाण्याची घागर तशीच विहिरीजवळ सोडून परत गावात जाऊन येशूविषयी लोकांना सांगितले व लोक येशूला भेटावयाला आले.

मनन चिंतन:

          ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण सर्वजण प्रायश्चित्त काळाच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आहोत. परमेश्वर आपणा सर्वांना स्वतःच्या हृदयाची तयारी करावयास अजून एक संधी देत आहे. परमेश्वराला आपल्या तन-मन-धनामध्ये घेण्यास व पश्चातापी जीवन जगण्यास बोलावत आहे. आपण प्रायश्चित काळाची सुरुवात आपल्या कपाळाला राख लावून केली. कारण आपण राखेद्वारे स्वतःला बजावून सांगतो की, आपण सर्वजण नश्वर आहोत, मातीचा भाग आहोत. तसेच ह्या प्रायश्चित काळात आपण तीन गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर भर द्यायला देऊळ माता सांगत आहे. ती म्हणजे प्रार्थना, उपवास व दानधर्म.
           असं म्हणतात की, 'जेव्हा आपण एक पाऊल उचलून देवाकडे जातो तेव्हा देव आपल्या जवळ येण्यासाठी नव्यानव पावले उचलतो.' पण आजच्या वाचनातून आपल्याला असे दिसून येईल की, परमेश्वर स्वतः हरवलेल्या त्याच्या लेकरांजवळ येण्यासाठी शंभर पावले उचलतो. हेच चित्रीकरण आपण शोमरोनी स्त्री व येशू यांच्या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळते. आज देऊळमाता आपणासमोर शोमरोनी स्त्रीचा दाखला ठेवत आहे.
          यहुदी लोक शोमरोनी लोकांचा फार तिरस्कार करत असत. कारण ते एका देवाची पूजा न करता अनेक देवाची पूजा करत असत. तसेच त्यांनी इतर लोकांशी लग्ने जुळवून घेत. त्यामुळे इस्त्रायली लोक त्यांना तुच्छ मानीत असत. शोमरोनी लोकांना स्वतःची अस्मिता नव्हती, खरे रूप नव्हते. त्यांना यहुदी लोक एका वस्तू समान मानायचे किंवा वागणूक द्यायचे. हे सर्व शोमरोनी स्त्रीला माहीत होते. म्हणून ती म्हणते, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्री जवळ प्यावयास पाणी मागता हे कसे? (योहान ४:९)  येथे येशू शोमरोनी लोकं जी हरवलेली मेंढरे आहेत, त्यांना शोधावयास आला होता. कारण ती देवापासून अलिप्त झाली होती, बहकून गेली होती. या ठिकाणी येशू स्वतः येऊन शोमरोनी स्त्री बरोबर वार्तालाप करत आहे व येशू दोन गोष्टींची प्रचिती करून देत आहे. ते म्हणजे, एक देवाचे दान म्हणजे काय? आणि दुसरे म्हणजे येशू स्वतःची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे. या दोन गोष्टी समजल्या तर त्याने तिला जिवंत पाणी दिले असते. हे जिवंत पाणी म्हणजे, ‘सार्वकालीक जीवन’.
          हे सार्वकालीक जीवन केव्हा प्राप्त होईल? जेव्हा आपण प्रार्थना करतो, बायबल वाचतो, मिस्सामध्ये येशूच्या शरीराचे सेवन करतो. तसेच परमेश्वराजवळ स्वतःच्या अपराधांची क्षमा मागतो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात सार्वकालीक जीवनाची प्राप्ती होते. हा उपवास काळ आपल्या सर्वांना आणखी एक संधी देतो. ती संधी म्हणजे जिवंत पाण्याचा आस्वाद घेण्यासाठी तसेच सार्वकालीक जीवन मिळविण्याची!
          अशाप्रकारे त्या शोमरोनी स्त्रीला समजून येते की, तिला कशाची तहान लागली होती? ती तहान म्हणजे परमेश्वराच्या प्रेमाची. ह्या ठिकाणी खुद्द प्रभू येशू मानवी ह्रदयाची तहान आहे आणि जो कोणी त्याला पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही.  (योहान ४:१४)  ही तहान फक्त  ख्रिस्तच भागवू शकतो. हे ख्रिस्त स्वतः आपल्याला स्पष्ट करून देत आहे.
          येशूने तिला तिच्या नवऱ्या विषयी विचारले असता तिने म्हटले की, "मला नवरा नाही." तर ज्ञानी किंवा विद्वान असे म्हणतात की, येशू ख्रिस्त तिच्या नवऱ्याविषयी नाही तर पाच देवा विषयी बोलत होता.  (निर्गम ३:८) शोमरोनी लोक बाबिलोनच्या बंदिवासातून परत येताना त्यांच्यासोबत त्यांनी पाच देव आणले व त्यांनी त्या पाच देवांची पूजा केली. पण त्यापैकी कुठल्याही देवाने तिला जीवनात दान दिले नाही. परंतु येशूने फक्त जीवनच नव्हे तर, सार्वकालिक जीवन देण्याचे वचन दिले. हे केव्हा शक्य आहे जेव्हा आपण येशूला खऱ्या देवाचा पुत्र म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकार करतो. तसेच सत्याने व आत्म्याने एकाच देवाची उपासना करतो.

बोधकथा:

          काही वर्षांपूर्वी एक माणूस राजासाठी नदीतून पाणी वाहत असे. त्या मनुष्याजवळ दोन मातीचे मडके होते. त्यामधील एक चांगलं तर दुसरे भेगाळलेलं होत. त्याने आणलेल्या पाण्याच्या प्रमाणात त्याला राजाकडून पैसे मिळायचे. दुर्दैवाने त्याच्या तडा गेलेल्या मडक्यातून बरेचसे पाणी वाया जायचे. या कारणास्तव त्या मनुष्याला कमी पैसे milaayache. पण हे सर्व त्या तडा गेलेल्या भांड्याला माहित होते. त्यामुळे त्या भांड्याला वाईट वाटत असे. तेव्हा ते भांडे त्याच्या धन्याला म्हणते, “धनी मला तडा गेला आहे, त्यामुळे मी जास्त पाणी आणू शकत नाही. मला तुम्ही टाकून द्या व माझ्या ऐवजी एक नविन भांडे ठेव, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबदल्याचे फळ मिळेल.” पण त्या मनुष्याने त्या भांड्याला म्हटले नाही. पुढच्या वेळेस तू तुझ्या जवळची बाजू काळजीपूर्वक पहा. तडा गेलेले भांडे त्याच्या बाजूला सौंदर्य पाहून आश्चर्यचकित झाले. तेव्हा त्या मनुष्याने त्याला  समजावले. मला माहित होतं की तुला तडा गेला आहे.  तुझ्यातून मला कमी पाणी मिळते. पण मी तुझ्या बाजूने फुलांच्या बिया पेरल्या होत्या व तू त्यावर पाणी शिंपडले. तुझ्यामुळे राजाच्या राजवाड्याचा रस्ता शुशोभित झाला आहे. हे सर्व ऐकल्यावर त्या तडा गेलेल्या भांड्याला चांगले वाटले.
          आपल्याला आजच्या वाचनातून तीन प्रकारच्या व्यक्ती पहायला भेटतात. ते म्हणजे येशू, शोमरोनी स्त्री आणि मोशे. या तीन प्रकारच्या व्यक्तींची तुलना आपण गोष्टींमधील पाणी आणणार्‍या व्यक्तीशी, चांगल्या भांड्याशी, तसेच तडा गेलेल्या भांड्याशी करू शकतो. पाणी आणणारा व्यक्ती येशू. चांगले भांडे मोशे व तडा गेलेले भांडे म्हणजे शोमरोनी स्त्री, जी परमेश्वरापासून दूर गेली होती. पण जेव्हा येशूच्या सानिध्यात ती येते तेव्हा तिच्या जीवनाचे परिवर्तन होते. ज्या शोमरोनी स्त्रिच्या भांड्याला तडा गेला होता, त्याच शोमरोनी स्त्रीने परमेश्वराचा अनुभव स्वतःला न ठेवता तिने येशूचा संदेश व त्याची ओळख संपूर्ण गावाला दिली. अशाप्रकारे शोमरोनी स्त्रीने खऱ्या देवाची ओळख संपूर्ण लोकांना दिली.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.”

१. आपल्या ख्रिस्तसभेचे दूरा वाहणारे पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ यांना परमेश्वराने शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य द्यावे व योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे कोणी जीवनात निराश आहेत, हताश आहेत, अशांना परमेश्वराच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व आपले ख्रिस्ती जीवन त्यांनी विश्वासाने जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३ जे कोणी देवापासून दुरावलेले आहेत; त्यांना ह्या प्रायश्चित काळात देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. या प्रायश्चित काळात आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण देऊन परमेश्वराच्या शाश्‍वत जीवनाच्या पाण्याचा आस्वाद दुसऱ्यांना द्यावा व ह्याद्वारे परमेश्वराची प्रचिती आपल्या जीवनाद्वारे दुसऱ्यांना व्हावी म्हणून आपण प्रभुचरणी प्रार्थना करूया.
५. आज जग बर कोरोना व्हायरस नावाच्या आजाराने हाहाकार माजला आहे. सर्वत्र लोकाच्या मनात भीतीची भावना निर्माण झाली आहे. अश्या ह्या गंभीर परीरीस्थितीत परमेश्वरी सहाय्याने औषध मिळावे व ह्या आजारापासून मुक्त्तता मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक हेतू प्रभू चरणी मांडूया.


Thursday 5 March 2020


Reflections for the Homily of 2nd SUNDAY OF LENT
(08-03-2020) By Fr. Wilson Gaikwad










प्रायश्चित काळातील दुसरा रविवार
येशूचे रूपांतर




दिनांक: ०८/०३/२०२०
पहिले वाचन: उत्पती १२:१-४
दुसरे वाचन: तीमथी १:८-१०
शुभवर्तमान: मत्तय १७:१-९

प्रस्थावना:
“चिंतन करीत रहा मानवा चिंतन करित राहा, मी सत्याचा मार्ग दावितो माझे रूप पहा.”
          आज आपण प्रायश्चित काळातील दुसऱ्या रविवार मध्ये पदार्पण करत आहोत. ह्या कृपेच्या काळात आम्हां सर्वांचे एकच ध्येय. त्याग, प्रार्थना, उपवास, प्रायश्चित करून देवाला आपलं करून घ्यायचं. जीवनात परिवर्तन व बदल करून किंवा घडवून आणणे. देवाची कृपा ग्रहण करायची व स्वर्गीय वैभव अनुभवायचे.
          आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो कीआब्राहामाने देवाच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि विश्वासाने तो देवाच्या वचनाला जागला. देवाच्या कृपेमुळे आणि आशीर्वादमुळे आब्राहाम जणू रुपांतरीत जीवन जगला. दुस-या वाचनाद्वारे संत पौल आपल्याला दाखवून देतो की, देवाचे पाचारण हे आपल्या स्वत:च्या गुणवत्तेवर अवलंबून नाही तर ते सर्वस्वी देवाच्या कृपेवर अवलंबून आहे.
          शुभवर्तमानात प्रभू येशूचे रुपांतर कसे झाले आणि शिष्यांना प्रभू येशूचे सामर्थ्यशाली आणि गौरवमय प्रकाशाचे दर्शन कसे घडले हे सांगितले आहे. प्रभू येशूचे रुपांतर म्हणजे जणू आपल्याला केलेले पाचारण आहे. प्रभू येशूठायी आपण रुपांतरीत व नवीन जीवन जगावे म्हणून आज प्रभू येशू आपल्याला बोलावित आहे. आब्राहामाची देवावरील अढळ श्रद्धा व संत पौलाची सुवार्ता प्रसाराची जिद्द आपल्यात निर्माण व्हावी आणि आपण ख्रिस्ताचे खरे अनुयायी बनण्यास पात्र ठरावे म्हणून या मिस्साबलीत प्रभू चरणी प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: उत्पती १२:१-४
          आम्हांस अब्राहामाच्या अटळ विश्वासा बद्दल बोध करीत आहे. देव अब्राहामाशी  बोलतो, त्याची आज्ञा पाळतो. देव सुद्धा अब्राहामावर प्रसन्न होतो व त्याच्या वंशातून नवीन राष्ट्रांची निर्मिती करतो. परंतु अब्राहामाच्या विश्वासाचा एक खडतर प्रवास होता.

दुसरे वाचन: २ तीमथी १:८-१०
          यात पौल तीमथीला धैर्याने व निर्भीडपणे ख्रिस्ताच्या सेवेसाठी पाचारण करतो, विश्वासू राहण्याचे आव्हान करतो, व सांगतो देवाने मरण नष्ट करून नवजीवन प्रदान केले आहे.

शुभवर्तमान: मत्तय १७:१-९
          प्रभू येशू पेत्र, योहान, याकोब ह्यांना उंच डोंगरावर प्रार्थनेसाठी घेऊन जातो व तेथे त्यांना त्याचे दैवी दिव्य तेजाने भरलेले रूप ह्याचे दर्शन घडवतो. त्याद्वारे तो पुनरुत्थान याची महती प्रदर्शित करतो. पुनरुत्थान व दैवी रूप कसे असणार ह्यांची झलक दाखवतो. त्याच दर्शनाद्वारे शिष्यांचा येशूवरील विश्वास बळकट झाला, ते बदलले, त्यांचे परिवर्तन झाले. जुन्या करारात सुद्धा मोशे, एलिजा, ह्यांना डोंगरावरच देवाचे रूप बघण्यास मिळाले. आपण सुद्धा ह्या प्रायचित्त काळात देवाचे रूप पाहण्याचा प्रयत्न करूया, पपांच्या शृंखलातून मोकळे होऊया.

मनन चिंतन:
          एक कविता करावीशी वाटते.
‘चढत आहे मी उंच डोंगर माथ्यावर ।
मार्ग खडतर, काट्यांचा, ख्रिस्त सारथी मजबरोबर ।
खाली वळून बघतो आश्चर्याने । कसे शक्य झाले मजला ।
क्षणात वाटले, चढलो याकोबाच्या शिडीने उंचावर ।
परंतू, पहिले तेजस्वी मुख प्रभूचे त्या डोंगरावर ।
धन्य झालो देखुनी रूप येशूचे मनोहर’ ।
          बंधू-भगिणींनो खरोखर येशूचे रूपांतर म्हणजे पेत्र,योहान, याकोब यांच्या दैनंदिन जीवनाला कलाटनी देणारे. त्याच्या जीवनात एक विलक्षण, अविस्मरणीय, विलोभणीय, तेजपुंज अनुभव. शिवाय देवाचे बोल त्यांनी ऐकले, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्यावर मी संतुष्ट आहे.” ह्याच क्षणी त्यांनी येशूचे अतुलणीय प्रकाशमय रूप पाहिले. शिष्यांना कदाचित ह्या स्वर्गीय अनुभवाची पुसट कल्पना सुद्धा नव्हती. ते फक्त येशूच्या सांगण्यावरून डोंगरावर प्रार्थनेसाठी गेले होते. डोंगर चढून थकल्यावर ते झोपले पण होते. परंतू येशूचे खरे तेजमय रूप पाहून ते ‘खडकन’ जागे झाले. पेत्र तर म्हणाला आपण येथेच राहु, मी तीन तंबू बांधतो, एक मोशे, दुसरा एलिया व तिसरा येशूसाठी.
          खरेच! ख्रिस्त अनुभव घेण्यासाठी ह्या प्रायश्चित काळात आम्हांला पापांचा डोंगर पार करायचा आहे. आध्यात्मिकतेच्या डोंगरावर जायचे आहे. मार्ग खडतर, खडकाळ, घसरट, काट्यांचा, वेडावाकडा आहे. प्रभू येशूच्या दर्शनासाठी ह्या खडतर मार्गावर चालण्याची आम्हांला नितांत गरज आहे. पण जर आम्ही निर्धार केला तर नक्कीच ख्रिस्ताचे रूप पहावयास मिळेल, मग देवाचे रूप कसे आहे? एका गाण्यात म्हटले आहे, “हे रूप ईश्वराचे, हे रूप ख्रिस्त साचे, सर्वाहुनी पवित्र हा एक देवपुत्र.” खरंच देवाचे रूप गोड । देवाचे नाम गोड । जर अथक प्रयत्नाने ख्रिस्ताचे खरे रूप पाहिल्यावर; आपणामध्ये आमूलाग्र बदल व परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रभू येशूचे रूप हे पुनरुत्थानाचे रुप व चिन्ह आहे. आपल्या रूपांतराच्या दर्शनाद्वारे, तो पेत्र, योहान, याकोब यांना पुनरुत्थानाचा संदेश देत आहे.
          म्हणूनच प्रायश्चित काळ आम्हांस पाचारण करत आहे की, आपण सर्वांनी, त्याग, प्रार्थना करुन ख्रिस्त रूप पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिवर्तन झाले पाहिजे, आपल्या पापी जीवनाचे पवित्र जीवनात रूपांतर झाले पाहिजे. मगच आपल्याला देवाची वाणी ऐकावयास मिळेल, ‘हा माझा परमप्रिय पुत्र, परमप्रिय कन्या आहे.’ चला तर देवाच्या डोंगरावर चढूया. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद परमेश्वरा ये आणि आमचे परिवर्तन कर.
१. ख्रिस्तसभेच्या सर्व अधिकाऱ्यांनी घेतलेला ख्रिस्ताचा अनुभव सर्व लोकांपर्यंत पोहचवावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपल्या देशातील पुढाऱ्यांनी भ्रष्टाचारापासून दूर राहावे आणि प्रामाणिकपणे देशाची सेवा करावी,  म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने चांगल्या कार्यक्रमाचे प्रसारण करावे व जनतेला योग्य मार्गदर्शन करावे,  म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. जे देवापासून दुरावलेले आहेत त्यांना प्रभुने स्पर्श करावे व तोच जीवनाचा मार्ग व सत्य आहे ह्याची जाणीव करून द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.