Reflection for the Feast of Body and Blood of Christ (29-05-2016) By Baritan Nigrel.
ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा
दिनांक: २९-५-२०१६
पहिले वाचन: उत्पत्ती १४: १८-२०
दुसरे वाचन: १ करिंथ ११:२३-२६
शुभवर्तमान: लुक ९:११-१७
तेव्हा सर्व जण जेवून तृप्त झाले
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा प्रभू येशु ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व
रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभू येशु ख्रिस्ताने क्रूसावरील समर्पणाद्वारे
स्वतःचे रक्त सांडून, मानव आणि परमेश्वर पिता ह्यांच्यामध्ये नवीन कराराची स्थापना
केली. अखिल मानवजातीला सर्व पापांतून मुक्त केले.
संत पौल आपल्याला सांगत आहे की, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे
देवाने पापक्षमेचा नवा करार केला आहे. त्यामुळे देवाच्या सान्निध्यात येण्यास आपण
पात्र झालो आहोत. म्हणून ख्रिस्त आपला मध्यस्थ आहे याची आठवण देऊळमाता आज आपल्याला
करुन देत आहे.
प्रत्येक दिवशी ख्रिस्तशरीर संस्काराद्वारे आपण ख्रिस्ताबरोबर
एकरूप होतो व ख्रिस्त आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. म्हणून या मिस्साबलीदानात
भाग घेत असताना, प्रभू येशु ख्रिस्ताच्या पवित्र शरीराने व रक्ताने आपले अंतःकरण
पावन बनून आपण ख्रिस्तासारखे व्हावे, म्हणून देवाकडे विशेष प्रार्थना करु या.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: उत्पत्ती १४: १८-२०
उत्त्पतीच्या पुस्तकात भाकर व
द्राक्षारसाचा उल्लेख केला आहे. अब्राहमने कदालार्गोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे
यांस सामोरे जाऊन त्यांचा वध केला. ह्या कार्याबद्दल शालेमाचा राजा मलकीसदेक जो
देवाचा याजक होता, त्याने भाकर व द्राक्षरस घेऊन अब्राहामपाशी गेला आणि त्याला
आशीर्वाद दिला.
दुसरे वाचन: १ करिंथ ११:२३-२६
संत पौल, प्रभू
भोजनाचे महत्त्व व गांभीर्य करिंथ येथील मंडळीच्या नजरेसमोर आणतो. वल्हांडणाचे भोजन
चालू असता, ख्रिस्ताने मेजावरील बेखमीर भाकर घेतली. ही बेखमीर भाकर ख्रिस्ताचे
निष्कलंक व्यक्तिमत्व व जीवन दर्शविते. त्याने ती भाकर मोडली. ख्रिस्ताने स्वतः
भाकर होऊन स्वतःचे अर्पण केले. रक्त ओतल्यावाचून क्षमा होत नाही (इब्री ९:२२).
ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे देवाने पापक्षमेचा नवा करार केला आहे. प्रभूभोजन
ख्रिस्ताच्या मरणाची, गौरवी तारणाच्या महान योजनेची आणि ख्रिस्ताच्या पुनरागमनाची
घोषणा आहे (२६), असे संत पौल या वाचनात सांगत आहे.
शुभवर्तमान: लुक ९:११-१७
बारा जण आपली कामगिरी संपवून परत माघारी आले. त्यांना घेऊन
एकांतस्थळी विसाव्यासाठी जावे असा येशूची इच्छा होती. पण लोकांच्या गर्दीमुळे ते
जमले नाही. म्हणून येशूने ही संधी साधून लोकांना शिक्षण दिले. सायंकाळच्या सुमारास
शिष्यांना लोकांची चिंता वाटू लागली. खुद्द त्यांच्याकडे फारच थोडे अन्न होते आणि
सर्वांना पुरेल एवढे अन्न विकत घेण्यास पैसेही नव्हते.
त्यांच्या जेवणाचा प्रश्न मोठाच होता. तुम्ही त्यांच्या
जेवणाची व्यवस्था करा असे येशु ख्रिस्ताने म्हणताच, ते पेचात पडले. आमच्याजवळ
असलेल्या पाच भाकरी व दोन मासे एवढ्याने आम्ही काय करणार असा जणू उलट प्रश्न
त्यांनी प्रभूला विचारला (१३). जे होते तेवढे पुरे होते, कारण प्रभू येशूने ते
आपल्या हातात घेतले (१६). देव ज्यांवर आशीर्वाद ओततो त्यामुळेच इतर तृप्त होतात.
देवाच्या हातात दिलेले छोटेसे दान त्याच्या हातात विपुल होते.
मनन चिंतन:
मानवी जीवन हे चिन्हांनी भरलेलं आहे. आपलं बोलण, चालण,
वागण, धावण, आपली घर, वस्त्र ह्या साऱ्या गोष्टी बरच काही सांगून जातात. आपण
उपासना करतो, प्रार्थना करतो, भेटीगाठी देतो त्यामागे काहीतरी उद्देश असतो.
ख्रिस्ताच जीवन व मरण हे देखील चिन्ह आहे. ही चिन्हे बरच काही सांगतात व समजून
देतात. ह्या चिन्हांच्या मुलभूत अर्थाकडे आपण गेलो तर रहस्य समजण्यास ती मदत
करतात. ख्रिस्ताने चमत्कार केले व दाखले दिले. ती चिन्हे होती. त्याद्वारेही
येशूने मुलभूत अशी शिकवण आपल्याला दिली आहे.
आज आपण येशूच्या पवित्र शरीराचा व रक्ताचा सोहळा साजरा करीत
असताना, देऊळ माता आपल्याला सांगत आहे की, येशूने भाकर व द्राक्षारस ही पारंपारिक
चिन्हे वापरून आपले शरीर व रक्त स्वर्गीय पित्याला अर्पण केले. म्हणून ख्रिस्ताचे
क्रूसावरील शरीर व रक्त ही देखील ख्रिस्ताच्या आत्मसमर्पणाची, त्याच्या
आज्ञाधारकपणाची, व ईश्वरी इच्छेला दिलेल्या प्राधान्याची चिन्हे बनली.
स्वर्गीय पित्यावर त्याने जे प्रेम व्यक्त केले ते शरीर व
रक्त ह्याद्वारेच! व त्याद्वारेच त्याने पित्यावर परिपूर्ण निष्ठेने, संपूर्ण
आत्म्याने, संपूर्ण बुद्धीने प्रेम केले. दानशूर लोक दान करतात ते त्यांच्या
प्रेमाचे चिन्ह असते. वेळ देणे, पैसे अथवा वस्तू देणे, रक्त देण, सहवास देणे ही प्रेमाचीच
चिन्ह आहेत. हि चिन्हे/प्रतीके उपासनेत प्रेरणादायी ठरतात. ख्रिस्ताचे शरीर हे
स्वर्गीय अन्नाचे कृपासंस्कारात्मक प्रतिक बनले आहे. आध्यात्मिक पालन पोषणासाठी
ख्रिस्त आपणास त्याचे शरीर व रक्त देतो. हे शरीर व रक्त सार्वकालिक जीवनाची
कृपासंस्कारात्मक प्रतीके आहेत, “तुम्ही माझे शरीर खाल्ले नाही व माझे रक्त प्याला
नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही.”
जुन्या करारामध्ये द्राक्षारस आणि भाकर ही पृथ्वीच्या प्रथम
फळांचे अर्पण म्हणून देवाला वाहिली जात. त्यामागे देवाबद्दल कृतज्ञेची भावना होती.
निर्गमच्या घटनेत ह्या चिन्हांना नवीन अर्थ दिला गेला. दरवर्षी वल्हांडण सणाच्या
दिवशी, इस्रायल लोक, देवाने त्यांची इजिप्तच्या फारो राजाच्या गुलामगिरीतून सुटका
केली होती, ह्याचे स्मरण बेखमीर भाकर खाऊन करीत असत (अनुवाद ८:३).
ज्यू लोकांमध्ये भोजनसमयी यजमान कुटुंबप्रमुख भाकर मोडून
उपस्थितांना वाटीत असे. येशूने ह्याच पद्धतीचा अवलंब करून आपल्या अखेरच्या
भोजनासमयी भाकर घेतली (मार्क १५:३६) आभार मानून ती मोडली आणि आपल्या शिष्यांस दिली
(मत्तय २६:२६). आजच्या शुभवर्तमानामध्ये ऐकले की, पाच हजारांना भोजन देण्याअगोदर
येशूने भाकरी घेतल्या. देवाचे आभार मानून त्या मोडल्या आणि लोकांना वाढण्यासाठी
त्या आपल्या शिष्यांजवळ दिल्या. संत योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण बघतो की,
ह्या चमत्कारानंतर येशु ‘आपणच ती स्वर्गातून उतरलेली भाकर आहोत असे म्हणतो. तुमच्या
पूर्वजांनी मान्ना खाल्ला आणि ते मेले. ही भाकर खाणारा सर्वकाळ जगेल,’ असे म्हणतो
(६:४८-५१).
येशू ख्रिस्ताच्या मागोमाग आलेल्या मोठया समुदायाला, येशू
ख्रिस्ताने पाच भाकरी व दोन मासे घेऊन चमत्कार केला व पाच हजार लोकांना जेवू
घातले. ह्या चमत्काराद्वारे प्रभू येशूने पवित्र ख्रिस्तशरीर कृपासंस्कर व परस्पर
मानवी संबंध ह्यांच्यातल नात स्पष्ट केल. कारण तेथे जो लहान मुलगा होता
त्याच्याजवळच्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन येशूने हा चमत्कार घडवून आणला होता. या
छोटया मुलाने मोठया मनाने व स्वखुशीने आपल्याकडच्या भाकरी व मासे दुसऱ्यांसाठी
येशु ख्रिस्ताकडे दिल्या, म्हणून येशूने तो चमत्कार केला. जर त्या मुलाने भाकरी व
मासे दिले नसते, तर ख्रिस्ताने कदाचित तो चमत्कार केला नसता.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, मानवी परस्पर संबंध व
व्यक्ती-व्यक्तीमध्ये प्रेम ह्याचा पाया प्रभू येशूचे शरीर व रक्त आहे आणि हे
स्पष्ट करताना प्रभू येशु म्हणतो, ‘माझा देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे.
जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये
राहतो” (योहान ६:५५-५६).
आपण प्रत्येक मिस्सा बलिदानामध्ये येशूच्या पवित्र शरीराचे
व रक्ताचे सेवन करून आपण ख्रिस्तासारखे बनतो व ख्रिस्ताप्रमाणे आपणसुद्धा
इतरांसाठी आपले रक्त सांडायला व प्राण अर्पण करायला तयार असाव म्हणून आपल्या
सर्वांना आज प्रभू आव्हान करीत आहे. त्याने जशी अखिल मानव जातीवर प्रीती केली, तशी
प्रीती ख्रिस्ताचे शरीर स्वीकारणाऱ्या व्यक्तीने म्हणजे आपण सर्वांनी आपल्या
शेजाऱ्यावर व आपल्या सहवासात येणाऱ्या व्यक्तीवर दाखविली पाहिजे. त्यांची काळजी घेतली
पाहिजे व गरजेवेळी त्यांना सहाय्य केले पाहिजे.
बोधकथा:
मदर तेरेजा त्यांचा एक अनुभव सांगताना म्हणतात की, एकदा
त्यांना अनेक दिवस भुकेले असलेले एक हिंदू कुटुंब आढळले, त्यांनी त्या कुटुंबासाठी
थोडेसे तांदूळ आणून दिले. त्यावेळेला त्या हिंदू स्त्रीने त्या तांदळाचे दोन समान
भाग केले व त्यातील एक भाग शेजारच्या मुस्लीम कुटुंबासाठी बाजूला काढून ठेवला.
मदरांना या गोष्टीचा खूप अचंबा वाटला. त्यांनी त्या स्त्रीला म्हटले, “तुमच्या
कुटुंबामध्ये इतकी माणसे आहेत, हे सर्व तांदूळ तुम्हालाच पुरणार नाहीत.” तेव्हा
त्या स्त्रीने उत्तर दिले, “पण त्यांनीही अनेक दिवसात काहीही खाल्लेले नाही.” त्या
स्त्रीचे ते उत्तर ऐकताच मदर उद्दगारल्या, “असे कृत्य करण्यासाठी खूप मोठे मन
लागते.”
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
आपला प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या शरीर व रक्ताद्वारे आमचा विश्वास दृढ कर.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप
फ्रान्सीस, कार्डीनल्स, बिशप्स,
फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स
व इतर प्रापंचिक या सर्वांवर देवाचा विशेष आशीर्वाद यावा व त्यांना त्यांच्या पवित्र कार्यात प्रभूचे मार्गदर्शन व कृपा
मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील सर्व नेत्यांवर व अधिका-यांवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा, त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास परमेश्वराने मदत करावी तसेच सर्व वाईट वृत्तींपासून त्यांना दूर ठेवून चांगल्या मार्गावर चालण्यास सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील सर्व नेत्यांवर व अधिका-यांवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा, त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास परमेश्वराने मदत करावी तसेच सर्व वाईट वृत्तींपासून त्यांना दूर ठेवून चांगल्या मार्गावर चालण्यास सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आज
आपण प्रभू येशु
ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत असताना आपण आपल्या शरीररूपी मंदिरात देवाला
प्रथम स्थान द्यावे व आपले जीवन त्याच्याठायी समर्पित करावे, म्हणून
आपण प्रार्थना करूया.
४.
आपल्या धर्मग्रामात जे दु:खीत, पिडीत आहेत, तसेच जे असाध्य आजाराने
पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा व नवजीवनाची वात त्यांना
दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.
आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी थोडावेळ शांत
राहून प्रार्थना करूया.