Reflection for the Homily for Presentation of the Lord (Fourth Sunday In Ordinary Time) (02/02/2020) By
Br. Isidore Patil
Br. Isidore Patil
येशूचे समर्पण (सामान्य काळातील
चौथा रविवार)
दिनांक: ०२/०२/२०२०
पहिले वाचन: मलाखी ३:१-४
दुसरे वाचन: इब्रीलोकांस पत्र २:१४-१८
शुभवर्तमान: लुक २:२२-४०
प्रस्तावना:
आज अखिल ख्रिस्तसभा बाळ येशूचे येरुशलेमच्या
मंदिरात समर्पण तसेच सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. यहुदी लोकांची
अशी परंपरा किंवा प्रथा होती की, पहिले मुल हे देवाला समर्पित करावे. व आपणाला
ठाऊकच आहे की, मरिया व योसेफ हे देवभिरू,
धार्मिक व रूढी परंपरांचे पालन करीत होते. त्यामुळेच यहुदी लोकांच्या परंपरे नुसार
बाळ येशूला देवालयात समर्पण करण्यासाठी त्यांनी येशूला नेले होते.
आजच्या
पहिल्या वाचनात संदेष्टा मलाखी आपल्याला सांगत आहे की, तुमच्या पुढे मी एक
संदेष्टा पाठवीन तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्याला पापांपासून तारील. तसेच
आजच्या दुसऱ्या वाचनात आपणास ऐकावयाला मिळेल की, देवाने आपल्या मरणाने व
पुनरुत्थांनाने मृत्यूवर विजय मिळविला आहे. तसेच आजचे शुभवर्तमान आपल्याला
येशूच्या भावी जीवनाचे भाकीत शिमोन संदेष्ट्याद्वारे भाकीत केलेले दिसून येते.
त्यासाठी मरिया हिला देवाची आई ह्या नात्याने कितीतरी हाल-अपेष्टांना सामोरे जावे
लागेल ह्या विषयी सांगण्यात आले आहे. आज ख्रिस्त सभा आपल्याला आपल्या तारणासाठी
आपल्या जीवनाचे समर्पण करण्यासाठी पाचारण देत आहे. ह्या समर्पणाने आपल्या
आध्यात्मिक, व सामाजिक तसेच नैतिक जीवनात अमुलाग्र बदल घडून यावा म्हणून लागणारी
कृपा व शक्ती ह्या मिस्साबलीदानात मागुया.
सम्यक
विवरण:
पहिले
वाचन: मलाखी ३:१-४
मलाखीद्वारे इस्त्राएलास
प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन असे होते की न्यायाचा दिवस समीप आहे, तो जवळ येत आहे. इस्त्राएली
बांधवांची तुच्छतेची वृत्ती आणि धार्मिक घुसफुस लक्षात घेऊन,
''जागे व्हा! उठा'' हा
भविष्य संदेश सांगून परमेश्वराबरोबर केलेल्या कराराशी पुन्हा एकदा नव्याने एकनिष्ठ
होण्याचे संदेष्टा मलाखी आवाहन देतो व ''ज्या
प्रभूला तुम्ही शोध करीत आहात, तो
एकाएकी आपल्या मंदिरात येईल'' असे
अभिवचन घोषित करतो. पण! दुर्दैवाने अपेक्षित
प्रतिसाद दुरच राहतो. इस्त्राएली लोकांनी आपल्या मनात येईल तशी अर्पणे परकीय
देवाच्या चरणांसी अर्पिले व उपासनेत दांभिक
उपचार आणून ख-या व सत्य देवाचा अपमान केला. ह्यास्तव
संदेष्टा मलाखी प्रखरपणे इस्त्राएली लोकांसमोर दोन महत्त्वपूर्ण प्रश्न मांडतो.
- त्याच्या
आगमनाच्या दिवशी कोण निभावेल?
- तो
प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल?
दुसरे वाचन: इब्रीलोकांस पत्र २:१४-१८
इब्री
लोकांस पत्र अध्याय १ आपल्याला ''देवपुत्र, देवदूताहून श्रेष्ठ आहे.'' ह्या विषयी जाणीव प्राप्त करून देते व
अध्याय २ आपल्याला त्या देवपुत्राने दिलेल्या संदेशात
दृढ होण्यास आव्हानीत करते. पुत्राचा
संदेश हा तारणाविषयी होता. पापी मानवजातीचे तारण कसे साधले गेले ह्याविषयीचा
उल्लेख व महत्त्व येथे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. ख्रिस्ताने संपूर्णरीत्या
मानवीरूपाला ग्रहण करून आम्हासाठी काय केले
ह्याचा पाठपुरावा आजचे दुसरे वाचन आपल्याला देते.
शुभवर्तमान: लुक २:२२-४०
संत
लूक आपल्याला ''यरूशलेम
मंदिरात येशूचे समर्पण'' तसेच
येशूची सुंता कशी झाली व त्याच्याविषयी कोणत्या प्रकारचे प्रकटीकरण करण्यात आले
ह्याविषयी माहिती पूरवितो.
यहूदी
नियमशास्त्रानुसार पुरूष मुलाच्या जन्मानंतर माता सात दिवस ''अशुध्द'' मानली जाते आणि
तिला आणखी तेहतीस दिवस घरीच राहावे लागते. त्यानंतर, चाळीसाव्या
दिवशी शुध्दीकरणासाठी फक्त यरूशलेम मंदिरात येऊन शुध्दीकरणाचे अर्पण समर्पित करावे
लागत असे(लेवीय; १२:१-८). यहूदी
शास्त्राप्रमाणे मुलाला नव्हे तर फक्त मातेला शुध्दीकरण्याची गरज असते. पण! संत
लूक ''त्यांचे शुध्दीकरणाचे दिवस
भरल्यावर'' ह्या वाक्याचा उल्लेख शुभवर्तमानात करतो
कारण, मरीयेचे आणि बाळ येशूचे शुध्दीकरणाचे अर्पण जर
का वेगवेगळ्या प्रकारे केले असते तर मरीयेस अर्पणाचा खर्च जास्त आला असता ह्यास्तव
त्यांनी दोघांचे अर्पण एकत्रित केले.
पुढे
ह्या वृतांतात आपल्याला शिमोन व हन्ना ह्यांच्या बाबतीत सांगितले जाते. शिमोन
एक भक्तिमान, सात्विक
व नितीमान इस्त्राएली होता (यशया; ४०:१;६१:२).
देव आपल्या लोकांचे सांत्वन, सुटका
व मुक्तता करील ह्या प्रतिक्षेची वाट पाहत होता. आपण
मसिहा-ख्रिस्त पाहिल्यावाचून मरणाला मुकणार नाही असे देवाचे अभिवचन त्याला मिळाले
होते. तो क्षण जेव्हा आला तेव्हा त्याने मुलाला उचलून कवटाळले आणि देवाचे आभार
मानून आपण मरण्यास तयार असल्याचे म्हटले. तथापि
शिमोनाने आणखी सांगितले की, या
मुलाचे येणे हे न्यायनिवाडा होण्यास व तारण होण्यास कारणीभूत ठरेल, कारण लोकांच्या अंत:करणाचा भेद उघड केला जाईल व
येशूला पुढे मिळणा-या वागणुकीमुळे मरियेला दु:ख सोसावे लागले.
हन्ना
ही एक संदेष्टी होती व ती देखील इस्त्राएलच्या सुटकेची व तारणाची वाट पाहत होती. हन्नाच्या
आगमनाने शिमोनाच्या शब्दांना दुजोरा मिळाला. देव
येशूद्वारे यहूदी लोकांची मुक्तता व तारण करील असे केलेले भाकीत पूर्णतेस आले आहे
ह्यासाठी, ती देवाचा महिमा व उपकार स्तूती करते.
मनन
चिंतन:
आज ख्रिस्तसभा येशूचे मंदिरात समर्पण हा सोहळा साजरा करीत आहे. ह्या सोहळ्याच्या दिवशी मेणबत्यांना आशीर्वाद दिला जातो. ज्या प्रमाणे आब्राहामाने इसाक ह्याच्या जागी कोकराचे
बलिदान केले होते त्याच प्रमाणे मरिया व योसेफ ह्यांनी देवाला आपल्या अय्पतीनुसार
पारव्यांची एक जोडी अर्पण केली. पारव्यांची जोडी ही सर्वात कमी किमतीची होती. ह्याचा
अर्थ असा की प्रभू येशू हा ह्या भूतलावर श्रीमंत म्हणून जन्माला आला नाही तर एक
गरीब कुटुंबात जन्माला आला. परंतु ह्या गरिबीतून त्याने देव राज्यासाठी आपली संपती
किंवा आपला खजिना म्हणजेच स्वतःचे आत्मसमर्पण जगाच्या तारणासाठी बहाल केले. प्रभू येशूच्या काळात यहुदी लोकांचा असा नियम होता की; पहिल्या मुलाचे समर्पण
नेहमी देवाला करावे. त्यामुळे मरिया व योसेफ नियमांचे पालन करून प्रभू येशू ख्रिस्ताचे समर्पण करण्यास ते येशूला
देवालयात म्हणजेच;
मंदिरात नेतात. शिमोन हा नीतिमान माणूस होता. “ख्रिस्ताला न पाहता तुला मरण येणार नाही” असे त्याला पवित्र आत्म्याद्वारे प्रकट केले होते. समर्पणावेळी मरियेला ख्रिस्ताच्या क्रूसावरील
मरणाचे
भाकीत केले गेले व “तिच्या हृदयातून तलवार भोसकून आरपार जाईल” असे तिला सांगण्यात आले. शिमोनाला जेव्हा येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले तेव्हा तो उदगारून म्हणाला, “हे प्रभू, आता
तू आपल्या वचनाप्रमाणे ह्या दासाला शांतीने जाऊदे, कारण माझ्या डोळ्यांनी आज तारण पाहिले आहे.” शिमोन संदेष्ट्याला ठाऊक होते की, प्रभू येशू ख्रिस्त जगाचा
तारणारा आहे.
त्याच्या विषयी
जे काही सांगण्यात आले होते ते समर्पणावेळी पूर्णत्वास
आले.
येशूचे समर्पण हे संदेष्ट्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण झाले. आज जगात आपण खूप प्रकारची अशी समर्पणे पाहतो. आपल्या देशाचे जे सैनिक भारताच्या सीमेवर राहून त्यांच्या जीवनाचे समर्पण देशाच्या
सुरक्षतेसाठी करत असतात. आपण जर समर्पण ह्या शब्दाचा बारकाईने विचार
केला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ सापडतील. त्याग करणे, शरण जाणे, इत्यादी. आज भरभरून असे अर्थ आपल्याला आढळतील, अनेक अशी उदाहरणे सुद्धा आपल्या
निदर्शनास येतील. उदाहरणार्थ कंपनीत काम करणारा कामगार आपल्या कंपनीच्या कामानिमित्त किती
त्याग करतो. आई-वडील आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी खूप त्याग करतात व त्यांच्या
इच्छा आकांशा ह्याना मुलांच्या भल्यासाठी समर्पण करून मुलांच्या इच्छांना
प्राधान्य देत असतात. कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी व राजकीय पुढाऱ्यांनी आपले जीवन देशाच्या
स्वातंत्र्यासाठी समर्पित
केले आहे.
त्यांच्या ह्या समर्पणामुळे आज आपल्याला स्वातंत्र्याचा आनंद लुटता येतो.
आपल्या ख्रिस्तसभेत सुद्धा अनेक
असे संत आहेत ज्यांनी आपल्या
जीवनाचे समर्पण करून दुसऱ्यांचे जीवन वाचविले आहे. उदाहरणार्थ माँक्सिमिलीयन कोलबे
ह्यांनी परमेश्वराला शरण जाऊन आपले जीवन परमेश्वराला समर्पित करून एका तुरुंगवासी
माणसाला जीवनदान बहाल केले. सेमिनरी किंवा कॉन्व्हेंट मध्ये शिकत असलेले धर्मबंधू, धर्मभगिनी व फादर ह्यांनी आपल्या जीवनाचे
समर्पण देवाला करून आपल्या आई-वडिलांचा त्याग करून, आपल्या तारुंण्याचा त्याग करून
ख्रिस्त सेवेसाठी सज्ज झाले आहेत. हेच पाचारण आपल्या सर्वांना देण्यात आले आहे.
ख्रीस्तासाठी आपले ख्रिस्ती जीवन जगावे व ख्रिस्ताची सुवार्ता सर्वत्र पसरवावी.
आपल्या दैनंदिन जीवनात आपले आध्यात्मिक जीवनाचे आचारण कश्याप्रकारचे आहे हे आपण
ओळखेले पाहिजे व नितीमानाने आपले जीवन जगण्यास आपल्याला परमेश्वरीय कृपा लाभावी
म्हणून प्रार्थना करू या.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “अर्पितो
मी प्रभूला जीवन हे माझे सारे.”
१. आपले
परमगुरूस्वामी फ्रान्सिस ह्यांना
प्रभूने उदंड आयुष्य व आरोग्य बहाल करावे व अखिल ख्रिस्तसभेची धुरा सांभाळण्यास
त्यांना मनोबल दयावे, म्हणून
आपण प्रार्थना करू या.
२. जे
कोणी आजारी आहेत, खाटेला खिळलेले आहेत, व निरनिराळ्या आजारांनी ग्रासलेले आहेत.
ह्या सर्वांना प्रभू ख्रिस्ताचा स्पर्श व्हावा तसेच त्यांना लागणारी कृपा व शक्ती
प्रभुने त्यांना बहाल करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आजच्या
तरूण पिढीला जीवघेण्या स्पर्धेला तोंड दयावे लागत आहे. प्रसंगी
ते निराश होत आहेत. या तरूण पिढीत असलेला उत्साह
कायम टिकून राहावा, म्हणून
आपण प्रार्थना करू या.
४. शांती
निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी आज जगभरात अनेक अशा संघटना कार्यारत
आहेत, त्यांच्या कार्यात प्रभूचा आर्शिवाद यावा व
त्यांना यश लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आपल्या
कुटूंबात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी, प्रत्येक सदस्यात बंधूभाव वाढावा, एकमेकांत जवळीक वाढावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
६. थोडावेळ शांत राहून
आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.