दिनांक: 30/10/2022
पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ११:२२-१२:२.
दुसरे वाचन: थेस्सलोनिकाकरांस दुसरे पत्र १:११-२:२.
शुभवर्तमान: लूक १९:१-१०.
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील एकतिसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना
आपल्याला येशुला स्वीकारून जीवनात आमुलाग्र बदल घडून आणण्यासाठी आमंत्रित करीत
आहे. शलमोनाचा ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात देव हा साऱ्या
सृष्टीचा निर्माता आहे व तो त्याची चांगल्याप्रकारे निगा राखतो ह्याची आपणास
कल्पना येते. दुसऱ्या वाचनात संत पौल थेस्सलोनिकाकरांस प्रार्थनेचे आश्वासन देऊन
सांगतो की, ‘तुम्ही देवाच्या पाचारणाला प्रामाणीक असा व
देवाची महिमा सदैव गात रहा; परमेश्वर तुम्हांवर कृपा
दृष्टीचा वर्षाव करील.’ तर संत लुकलिखित शुभवतामानामध्ये येशू जक्कय नावाच्या
जकातदाराला त्याच्या पापांची क्षमा करतो आणी त्याचे व त्याच्या कुटुंबाचे तारण
करतो. येशूच्या आगमनाने जक्कयच्या जीवनात परिवर्तन घडून आले व त्याच्या जीवनाचे
सार्थक झाले. आपणसुद्धा जक्कय प्रमाणे येशूला आपल्या जीवनामध्ये स्थान देऊया आपण
चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील राहूया. ह्यासाठी लागणारी कृपा व शक्ती
ह्या पवित्र मिस्सासाबलीदानात सहभागी होत असताना
मागुया.
बोधकथा:
जॉन न्यूटन
हा गुलामाचा व्यापारी होता. १७४८ मध्ये आफ्रिकन लोकांना गुलाम
म्हणून घेऊन जात असताना उत्तर अटलांटिका महासागरात वादळ निर्माण झाले. जहाजात
अचानक पाणी शिरू लागले; त्या जहाजातील लोकांनी पाणी बाहेर
काढण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली; परंतु सर्व काही निष्फळ ठरत होते. ते हे सर्व काही चाललेले पाहून न्यूटन
त्याचा जीव मुठीत आणून ओरडला, " हे परमेश्वरा दया
करा". आणि काय चमत्कार महासागरातील वादळ काही वेळानंतर शांत झाले आणि
त्याच्या सहकाऱ्यांना जहाजात शिरलेले पाणी काढण्यात यश आले. अशाप्रकारे दोन
आठवड्यानंतर त्यांचे जहाज सागर किनारी लागले.
ह्या सर्व कृत्यांचा आढावा घेत असता, त्याच्या लक्षात आले की, तो चमत्कारिकरित्या बचावला
होता आणि त्याचा कर्ता- करविता दुसरा- तिसरा कोणी नसून खुद्द परमेश्वरच आहे. ही
जाणीव झाल्यावर त्यांनी बायबल वाचन सुरू केले. त्याच्यात परिवर्तन झाले परंतु
त्यांनी त्या क्षणी गुलामाचा व्यापार करणे सोडले नाही तर आणखी सात वर्षे त्यांनी
तो कारभार चालू ठेवला. ह्या वर्षात त्यांनी गुलामांना माणुसकीच्या नात्याने वागणूक
दिली. नंतर जॉर्ज वाईटफिल्ड आणि जॉन वेलची ह्याच्या संपर्कात राहून त्यांनी
ख्रिस्ती धर्माचा सखोल अभ्यास केला आणि १७६४ साली त्यांनी अँगलिकन धर्मगुरू पदाची
दीक्षा घेतली. १७७२ मध्ये त्यांनी जगभर प्रसिद्ध आणि नावाजलेलं भक्ती गीत लिहिलं,
"Amazing Grace" ( आश्चर्यकारक कृपा).
ज्याप्रमाणे जक्कयचे हृदयपरिवर्तन झाल्यावर त्यांने ख्रिस्ताला स्वीकारले अगदी त्याच प्रकारे जॉन न्यूटन ह्याच्या जीवनातही घडले.
मनन चिंतन:
देव पापी मनुष्याच्या शोधात येतो व त्याचे तो तारण
करतो. बायबल मध्ये जुन्या करारापासून ते नव्या करारापर्यंत देवाने वेगवेगळे
संदेष्टे ते मानवाच्या शोधात पाठवले. सर्वात शेवटी देवाने स्वतःच्या पुत्राला
भूतलावर मनुष्याच्या तारणासाठी व पापमुक्तीसाठी पाठविले. ह्याला कारण एकच ते
म्हणजे देवाचे अपार प्रेम. संत आगुस्तीन म्हणतात. “ज्या देवाने तुझ्या
परवानगीशिवाय तुझी निर्मिती केलेली आहे तो देव तुझ्या सहकार्याशिवाय तुला वाचू
शकणार नाही”. याचा अर्थ असा की प्रत्येक मनुष्याला स्वतःच्या तारणासाठी देवाच्या
सानिध्याची नितांत गरज असते. त्याने स्वतःला विसरून देवाला अंगीकारले पाहिजे. कारण
देव प्रेमळ आहे. तो आपल्याला कधीच सोडणार नाही म्हणूनच शलमोनच्या ज्ञानग्रंथात
देवाला अखंड सृष्टीची काळजी आहे असे सांगितले आहे.
संत पौल सांगतात की आपण देवाची स्तुती गायला पाहिजे. कारण आपले पाचारण हे देवाचे दान आहे. आपल्या पाचारणास देवाची गरज
आहे. प्रत्येक संताला भूतकाळ असतो, तर प्रत्येक पापी
मनुष्याला भविष्यकाळ असतो असे म्हणतात. जक्कयचे जीवन पाप व भोगाने व्यापून गेलेले
होते. फक्त पैसा त्याच्या नजरेस येत होता. इतर लोकांच्या नजरेसमोर तो पापी होता. त्याला बहुतेक वेळा अपमानास तोंड द्यावे लागे. अशा
परिस्थितीला कंटाळून त्याला तारण प्राप्ती करून घ्यायची होती. येशु बद्दल त्याने
ऐकले होते म्हणून त्याला पाहण्यासाठी तो झाडावर चढला आणि प्रत्यक्षात येशूने
जक्कच्या घरी जाऊन त्याचे तारण केले.
आपल्या ख्रिस्ती जीवनात बहुतेक वेळा आपण सुद्धा धन-दौलत
मान-सन्मान फसवा-फसवी त्याच्या आहारी गेलेलो आहोत. जक्कयप्रमाणे आपल्या जीवनाचे
तारण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण येशूला स्वीकारले पाहिजे. फक्त येशूच आपले
तारण करू शकतो. म्हणून ह्या मिस्साबलित येशूने आपल्या ह्या
हृदयरूपी घरात यावे आणि आपले तारण करावे अशी प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: “हे प्रभू येशू, आमचे तारण कर.”
१. आपले पोप फ्रान्सिस, महागुरुस्वामी, धर्मगुरू व सर्व व्रतस्थांनी सर्व लोकांना प्रभूजवळ येण्यास प्रोत्साहीत करावे व त्यांच्या दैनंदिन आचरणातून ख्रिस्ती राहणीमानाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक जीवघेण्या आजाराने ग्रासलेले आहेत, त्यांना प्रभूच्या प्रेमाचा व आरोग्याचा स्पर्श व्हावा. हे आजार त्यांना सहन करण्यास शक्ती व सामर्थ्य लाभावे व परत एकदा त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी भारत देशाची सेवा करीत असताना त्यांनी अहंकार, धन-दौलत, मान-सन्मान
ह्यांच्या आहारी न जाता, प्रामाणिकपणे देशाच्या
उन्नतीसाठी व भरभराटीसाठी सदैव झटावे म्हणून प्रार्थना करूया.
४. आज ख्रिस्ती लोकांना खून, बलात्कार, छळवणूक व पिळवणूक असे बरेच अत्याचार सहन करावे लागत आहेत तसेच ख्रिस्ती समाजाविरुद्ध बॉम्बस्फोट व दंगली घडवून आणल्या जात आहेत. परमेश्वर कृपेने ते सर्व थांबावे व सर्वत्र प्रेम व शांती निर्माण व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. जे संपत्ती, धनदौलत ह्यांच्या मोहामुळे देवापासून दुरावलेले आहेत, देवाची जागा त्यांच्या ह्या द्रव्याने घेतली आहे अशांना परमेश्वराची महती कळावी व त्यांनी परमेश्वराकडे साधर्म परतावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपण
आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक हेतूंसाठी
प्रार्थना करूया.