सामान्य काळातील तेरावा रविवार
पहिले वाचन- २ राजे ४:८-११, १४-१६अ
दुसरे वाचन - रोमकरांस पत्र ६:३-४, ८-११
शुभवर्तमान - मत्तय - १०:३७-४२
“अतिथी देवो भव!
प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील तेरावा रविवार साजरा करत आहोत.
आजच्या वाचनाचा मुख्य विषय म्हणजे ख्रिस्ताठायी नवजीवन. जो मनुष्य ख्रिस्ताबरोबर
उठवला गेला आहे त्याने आपल्या जीवनात देवाला आणि देवाप्रितीला प्राधान्य देण
आवश्यक आहे. जो कोणी ख्रिस्ताच्या जीवनात सहभागी होतो त्याने आपलं जीवन आणि आचरण ख्रिस्ताप्रमाणे, शेजारप्रीती, आदरातिथ्य, औदार्यता, आणि सेवा अश्या गुणांनी सजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला
पाहिजे. ह्या मिस्साबलीत अश्याप्रकारच ख्रिस्तीय जीवन जगण्यास आपल्याला देवाची
भरपूर कृपा आणि शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
मनन-चिंतन:
“अतिथी देवो
भव!’, अर्थात अतिथी हा देवाप्रमाणे असतो. देव कोण
कोणत्या स्वरुपात, केव्हा तुमच्या दारात येईल हे सांगता येत
नाही. म्हणून जो आपल्या दारात येतो त्याचे यथाशक्ती आदरातिथ्य करणे हि हिब्रू
लोकांची परंपरा होती. आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो कि शुनेममध्ये राहणाऱ्या
एका वृद्ध, निपुत्रिक जोडप्याने संदेष्टा एलीशाचे स्वागत
केले. पत्नीने एलीशाचे पावित्र्य ओळखले. त्याच्यासाठी राहायची, खाण्या-पिण्याची व्यवस्था करून त्याचा मान-सन्मान केला आणि प्रेमळ
आदरातिथ्य दाखवले. प्रत्युत्तरादाखल, एलीशाने तिला वचन दिले,
“पुढच्या वर्षी या वेळी तू एका बाळाला जन्म देशील आणि हे वचन देवाने
पूर्ण केले.
ह्यावरून
आपणास असा बोध मिळतो कि तुम्ही कीती देता याला महत्व नाही, परंतु किती भक्तीभावनेने, निस्वार्थीपणे देता, हे ईश्वर पाहत असतो.
दुसऱ्याबद्दल तुमच्या मनात किती दया आणि प्रेम उत्पन्न होते, हे तो पाहतो. व त्याच प्रतिफळ अनंत हस्ते देत असतो. त्या दाम्पत्याने केलेल्या आदरातिथ्यामुळे
त्यांनी आपल्या पदरात पुण्य मिळविले आणि ते शुभाशीर्वादाचे धनी झाले.
आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या महान "मिशनरी
प्रवचनाचा" समारोप करतो, ज्यामध्ये तो बारा प्रेषितांना, शिष्यासाठी आवश्यक असलेल्या वचनबद्धतेची किंमत आणि प्रतिफळ याविषयी सूचना
देतो. शुभवर्तमानाच्या पहिल्या भागात ख्रिस्त ठामपणे सांगतो कि जो कोणी, येशूला आणि देवप्रितीला प्राधान्य देत नाही,व जी व्यक्ती आपला वधस्तंभ उचलून येशूच्या मागे जाण्यास
नाकारते, तसेच जे कोणी ख्रिस्तासाठी आपला प्राण देण्यास मागे सरतात
ते त्याचे खरे शिष्य बनण्यास योग्य नाहीत. ख्रिस्ती जीवनाचा मुख्य विरोधाभास हा
आहे की जीवन शोधण्यासाठी आपण जीवन गमावले पाहिजे आणि प्रेम मिळविण्यासाठी आपण
देवावरील प्रीतीने प्रेरित होऊन आपल्या बंधू-भगिनींवर प्रेम केलं पाहिजे.
तर, शुभवर्तमानाच्या दुसऱ्या भागात येशू इतरांकडून आपल्या
शिष्यांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल बोलतो. जे लोक ख्रिस्ताला त्याच्या शिष्यामध्ये
तसेच दिन, दरिद्री, आणि गरजवंतामध्ये ओळखतात, पाहतात, त्याचा
प्रेमभावनेने, औदार्याने
पाहुणचार करतात ते प्रतीफलाला मुकणार नाही ह्याची हमी देताना खुद येशू म्हणतो कि
“जी व्यक्ती तुम्हाला स्वीकारते ती मला स्वीकारते. जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार
त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतात, त्याला संदेष्ट्यांचे प्रतिफळ मिळेल. तसेच, जो कोणी शिष्याच्या नावाने या लहानातील एकाला केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला
देईल तो आपल्या प्रतीफाळला मुळीच मुकणार नाही.”
ह्यावरून आपणास कळते कि येशू औदार्याच्या, अतिथीप्रेम, आणि
आदरातिथ्याच्या या मानवी हावभावाला खूप महत्त्व देतो आणि एक महान वचन देतो आणि
म्हणूनच बांधवाचे स्वागत करणे म्हणजे काय हे चांगले जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या
भावाचे/बहिणीचे चांगले स्वागत करणे म्हणजे आपल्या स्वार्थातून बाहेर पडून
त्याला/तिला आपला थोडासा वेळ, आपली एकता आणि आदर आणि त्याआधीही धीराने त्याचे ऐकण्यासाठी त्याच्यामध्ये
सक्रिय रस घेणे होय. भुकेल्यांना अन्न देणे, आजारी लोकांना भेटणे, पीडितांचे सांत्वन करणे. ही दयाळूपणाची कार्ये आहेत, जी स्वीकृतीचे ठोस प्रकटीकरण बनवतात.
ख्रिस्ताचे खरे शिष्य बनण्यासाठी आपण आदरातिथ्य आणि उदार असणे आवश्यक आहे:
आदरातिथ्य म्हणजे इतरांमध्ये देवाची उपस्थिती मान्य करणे आणि त्यांच्यामध्ये
त्याची सेवा करणे, विशेषत: ज्यांच्यामध्ये आपण त्याला शोधण्याची किमान अपेक्षा करतो. आम्ही, व्यक्ती म्हणून आणि एक समुदाय म्हणून, हर एक गरजवंतामध्ये “अतिथी देवो भव” ह्या भावनेने त्यांची
सेवा, आदर, आणि सन्मान मोठ्या हृदयाने, आनंदाने आणि निस्वार्थीपणे करण्याचा निश्चय करूया आणि परमेश्वरी कृपा मागुया.
आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रभु, तुझ्या नावाच्या गौरवासाठी, आमचे ऐक.
1. ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले परमगुरु, आणि सर्व महागुरू, धर्मगुरू आणि धर्माभागीनि, ह्यांना ख्रिस्ताच्या
प्रेमाच्या आणि सेवेच्या सुवार्तेचा प्रकाश ह्या जगात पसरविण्यास पवित्र आत्म्याची
शक्ती आणि कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
2. आपल्या देशात जे बेघर, बेकार आहेत, तसेच जे रंजले गांजले बंधू भगिनी मुलभूत गोष्टीपासून वंचित
आहेत अश्या सर्वाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी राजकीय पुढाऱ्यांनी
प्रामाणिकपणाने आणि शहाणपणाने आपले राजकीय कार्य करावे आणि, समाजात न्याय आणि शांतता
प्रस्थापित करण्यासाठी सुबुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
३. आपल्या समाजातील आणि धर्माग्रमातील जे लोक वेगवेगळ्या
शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक
आजारांनी त्रस्त आहेत आणि संकटांनी ग्रासलेले आहेत, त्यांना आरोग्यदायी ईश्वरी स्पर्श मिळावा आणि त्यांची संकटे
दूर करण्यास सहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना करूया.
४. ह्या जगात जे ख्रिस्ती बांधव छळ, द्वेष, अन्यायाला बळी पाडले आहेत, त्यांना न्याय मिळावा, ख्रिस्ती बंधू-भगिनींकडून
त्यांना आर्थिक मदत मिळावी, मानसिक सांत्वन लाभावं आणि परमेश्वराने त्याचं सर्व
वाईटापासून आणि शत्रूपासून सर्वक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. येथे मिस्साबलीत सहभागी झालेल्या सर्वांनी आपल्या कुटुंबात
आणि धर्मग्रामात जे वयस्कर, आजारी आणि गरजवंत आहेत त्यांची प्रेमाने सेवा करावी, त्यांना आदराने, आणि दयेने वागवण्यास
ईश्वरी सहाय्य आणि कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.