Monday, 20 April 2015


Reflections for the Homily on Fourth Sunday (26/04/2015) of Easter by John Mendonsa.





पुनुरुत्थितकाळातील चौथा रविवार.

दिनांक: २६/४/२०१५.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये : ४:८-१२.
दुसरे वाचन: १योहान : ३:१-१२.
शुभवर्तमान: योहान : १०:११-१८.



 

“मी उत्तम मेंढपाळ आहे”.



प्रस्तावना:

आज देऊळ माता पुनरुत्थित काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणा सर्वांस येशूख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ आहे, यावर आपला विश्वास दृढ करण्यास आवाहन करीत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, संत पेत्राने कश्याप्रकारे  पुनरुत्थित ख्रिस्ताच्या नावाने रोग्यांस आरोग्यदान दिले. तर संत योहान दुस-या वाचनाद्वारे ‘आपण सर्वजण देवाची लेकरे आहोत’ असे आपणांस आवर्जून सांगत आहे. आजचे शुभवर्तमान येशू ख्रिस्त हाच खरा उत्तम मेंढपाळ आहे व त्याच्यावर विश्वास ठेवणा-यांचा कधीही नाश होणार नाही याची हमी देते.
     ह्या पवित्र मिस्साबलीत सहभागी होत असताना, आपण आपल्या जीवनात उत्तम मेंढपाळाच्या सहवासातून भरकटून न जाता त्याच्या सहवासातच आपल्या जीवनाच्या वाटेवर चालावे म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये : ४:८-१२.

पेत्र व योहान ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी लोकांना शिकवण देत असतानाच सदुकी लोकांनी पेत्र व योहानास अटक केली व संध्याकाळची वेळ असल्यामुळे त्यांना रात्रभर कैदेत ठेवले (४:३). दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकारी वर्ग, वडील व शिक्षक यांची सभा यरुशलेमात भरली (४:५) त्या सभेला ‘सान्हेद्रिन’ असे म्हणत; त्या सभेने पेत्र व योहान ह्याची चौकशी प्रारंभीली. त्यांनी विचारले, “कोणाच्या सामर्थ्याने तुम्ही हा चमत्कार केला”? (४:७). तेव्हा पेत्र पवित्र आत्माने परिपूर्ण होऊन निर्भीडपणे त्याने घोषणा केली कि, ‘परात्पर देवाने येशूला मरणातून उठविले त्या नाझरेथकर येशूच्या नावानेच हा चमत्कार घडला, त्याच्या शिवाय दुसरे कोणीही तुमचे तारण करू शकणार नाही’. पेत्राच्या ह्या स्पष्टीकरणावरून ‘सान्हेद्रिन’ या महासभेला पेत्राविषयी व योहानाविषयी एक महत्वाची बाब समजली होती आणि ती म्हणजे ते दोघे ख्रिस्ताच्या सहवासात होते.

दुसरे वाचन: १ योहान ३:१-२.

‘आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा’ (३:१) ह्या वचनावरून योहान स्पष्ट करतो की, आपल्याला फक्त “देवाची मुले” हे नावच नव्हे तर आपण खरोखरच “देवाची मुले” आहोत. देव आम्हाला आपली मुले म्हणतो. याचा परिणाम म्हणजे जग आपणाला ओळखत नाही (३:१). जग ख्रिस्ताच्या अनुयायांना ओळखीत नाही, हे जगाचे उणेपण आहे, पण त्यात नवल करण्यासारखे काहीही नाही; कारण जगाने येशू ख्रिस्ताला ओळखलेले नाही.

शुभवर्तमान: योहान : १०:११-१८.

पॅलेस्टाईन मधील यहुदा प्रांत हा ओसाड खडकाळ असा प्रदेश होता. त्या ठिकाणचे लोक शेळ्या, मेंढ्या पाळीत असत. मेंढरांना खाण्यासाठी फारसा चारा नसल्याने ते भटकत असत, परंतु मेंढपाळ सतत आपल्या मेंढरांच्या कळपाबरोबर राहत असत. मेंढपाळांना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे लागत असे कारण मेंढरे नजरेआड होताच कोल्हे आणि लांडगे त्या मेंढरांवर हल्ले करीत असत. इतकेच नव्हे तर अशा मेंढरांना कधी काही लुटारू देखील चोरून नेत असत. ह्यास्तव त्या काळच्या मेंढपाळात सतत जागृत राहणे, निर्भयपणे आपल्या मेंढराची राखण करणे आणि प्रसंगी आपला जीव धोक्यात घालणे अशा प्रकारचे धाडसी गुणधर्म असणे अत्यंत आवश्यक होते. ह्याच धाडसी गुणधर्मामुळे पॅलेस्टाईनचा मेंढपाळ हा इतर मेंढपाळापेक्षा वेगळा ठरत होता. त्याच्याबरोबर कधीही राखणारे कुत्रे नसत फक्त त्याच्यासोबत त्याच्या खांद्याला कातड्याची झोळी व त्या झोळीत जेवणाची शिदोरी व गोफण इ. असे. त्या गोफणीत दगड टाकून कळपापासून दूर जात असलेल्या मेंढराच्या तोंडासमोर हा दगड फेकला जाई, त्यामुळे ते मेंढरू परत आपल्या कळपात येई. मेंढपाळाच्या हातात एक काठी असे. ही सर्व मेंढरे आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकून त्याच्याकडे येत असत. मेंढपाळ आपल्या मेंढरांना नावाने हाक मारी आणि मेंढरे त्याच्या आवाजाप्रमाणे वागत असत. मेंढपाळ पुढे चालत व मेंढरे त्याच्या मागोमाग येत. पॅलेस्टाईनचा मेंढपाळ स्वतः पुढे जाऊन रस्त्यात अथवा कुरणात कुठे धोका आहे काय ह्याची पाहणी करीत असे.
पॅलेस्टाईनमध्ये ही मेंढरे कोंडवाड्यात ठेवली जात असत. त्या कोंडवाड्याला एक मजबूत दरवाजा असे. संध्याकाळी सर्व मेंढरे त्या कोंडवाड्यात आणली जात असत आणि त्या दरवाजाची चावी फक्त गुराख्याकडेच असे. परंतु उन्हाळ्यात हि मेंढरे घरी न येता एखाद्या शेतात अथवा डोंगराच्या पायथ्याशी विश्रांती घेत. अशा परिस्थितीत त्यांच्या भोवती छोटेस कुंपण असे व आतमध्ये जाण्यासाठी एक छोटासा मार्ग असे आणि ह्याच येण्या-जाण्याच्या मार्गात मेंढपाळ स्वतः झोपत असे जेणेकरून कोणतेही मेंढरू आत किंवा बाहेर जाऊ शकत नव्हते.
जुन्या करारात देवालासुद्धा मेंढपाळाची उपमा दिलेली आहे. देव मेंढपाळ आणि सामान्य लोक कळप म्हणून ओळखला जाई. विशेष करून स्त्रोत्रकाराने अनेक स्त्रोत्रामध्ये त्याची नोंद केली आहे (२३:१; ८०:१; १००:३). यशया, यिर्मया व यहेज्केल या संदेष्ट्यांनी देवाच्या निवडलेल्या संदेष्ट्यांना मेंढपाळ म्हटले आहे (यशया ४०:११; यिर्मया २३:१-२). नव्या करारात (आजच्या शुभवर्तमानात) देखील ख्रिस्ताला ‘उत्तम मेंढपाळाची’ उपमा दिलेली आहे. हरवलेल्या मेंढरांना शोधण्यासाठी तो आपला प्राणदेखील देईल अशा प्रकारची साक्ष नव्या करारात दिलेली आहे.
येशु ख्रिस्त किती चांगला मेंढपाळ आहे, त्याचप्रमाणे मजुरीसाठी मेंढरे राखणारा व प्रीतीने मेंढरे राखणारा यांच्यातील फरक तुलनेने योहानाने (१०:११-१८) मध्ये दर्शिविला आहे. मेंढरांसाठी आपले प्राण देण्यास तयार असणे हा मेंढपाळाचा पहिला मुख्य गुणधर्म आहे. प्रभू येशू तो किती उत्तम मेंढपाळ आहे याचे आणखी एक विशेष कारण योहान स्पष्ट करतो, ते म्हणजे मेंढरांचे संरक्षण करताना मरण पत्करण्यास मी तयार आहे असे येशु ख्रिस्त म्हणत नाही तर तो म्हणतो, “मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो (योहान १०:१५). प्रभू येशू ख्रिस्ताची हि कृती आणि पळून जाणाऱ्या भाडोत्री मेंढपाळाचे भ्याडपणाचे कृत्य (योहान १०:१२) या दोन्ही कृतीचा भेद लक्षात घेतल्याने येशूच्या पवित्र यज्ञापर्णाचे स्वरूप अगदी सुस्पष्टपणे समोर येते. त्याचप्रमाणे भाडोत्री मेंढपाळामध्ये काळजीचा व आपुलकीचा असलेला अभाव हा मुद्दाही विशेष करून वचन १०:१३ मधून स्पष्ट होतो.
“मीच उत्तम मेंढपाळ आहे; उतम मेंढपाळ मेंढरांकारिता आपला प्राण देतो” (योहान १०:११), “मी उत्तम मेंढपाळ आहे; जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात; मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो” (योहान १०:१४-१५) ह्या दोन्ही वचनांवरून मेंढपाळ व मेंढरे ह्यांची परस्पर ओळख आणि जिव्हाळा व आपुलकी यावर भर दिला आहे. पिता आणि पुत्र ह्यांच्यातील परस्पर ओळख व आपुलकी सुद्धा अशीच आहे. याहून अधिक निकटचा संबध, जवळीक असणे शक्यच नाही. येथे भाडोत्री मेंढपाळाला अजिबात वाव नाही.

बोधकथा:

१. एक प्रसिद्ध असा राजा होता. ज्याच्याजवळ धन-दौलत, संपत्ती, नाव-नौलिक सर्व काही होते. त्याच्या राज्यात सर्व प्रजा सुःखी समाधानी होती. परंतु काही काळांनंतर त्याच्या राज्यावर शत्रूंचे हल्ले होण्यास सुरुवात झाली. ह्यावर उपाय-योजना म्हणून राजाने आपली शस्त्र सामुग्री व सैनिकी दल वाढविले. अनेक अशा प्रसिद्ध सैनिकी अधिकाऱ्यांची, त्याने शत्रूचा प्रभाव करण्यासाठी नेमणूक केली.
प्रत्येकवेळी रणांगणावर जाण्याअगोदर राजा मोठया-उत्साहाने सर्व सैनिकांस प्रोत्साहन प्रेरित भाषणाचे बाळकडू पाजत असे. रणांगणावर शत्रूंना न घाबरता शत्रूचा नायनाट कसा करावा, रणांगणावर कोण कोणत्या योजना अमलात आणाव्यात, अशा प्रकारचा सर्व आढावा तो आपल्या सैन्यासमोर सादर करीत असे.
राज्याच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी राजावर होती परंतु राजाने फक्त आपल्या सैन्यांना नेहमी प्रोत्साहन प्रेरित भाषणेच दिली, त्याने कधीही स्वतःचा जीव धोक्यात घालून, आपल्या सैन्यांबरोबर रणांगणावर शत्रूचा नाश करण्यास गेला नाही. जनतेच्या संरक्षणाऐवजी, तो नेहमी स्वतःच्या संरक्षणाची चिंता करीत असे. परिणामत: काळांतराने राजाने नेमलेले सैनिकी अधिकारी सुद्धा शत्रूंच्या आमिषाला बळी पडले व शत्रूने अगदी सहजरीत्या राज्यावर हल्ला करून राजाला पराभूत केले.
२. धार्मिक कुटंबातील एक मुलगा एका पायाला थोडासा अपंग असला तरी बुद्धीने अगदी चलाख होता. आपले शिक्षण पूर्ण करून तो एका नामवंत बँकेमध्ये महत्वाच्या हुद्यावर कामास लागला. त्याला भरगच्च असा पगार असल्यामुळे मित्रांची संगत वाढत होती. काळांतराने मित्रांनी त्याला मद्यपानाची, सिगारेटची सवय लावली. अनेक सद्गुहस्थांनी व कुटुंबातील सदस्यांनी त्याला समजावले परंतु तो कुणाचेच ऐकण्यास तयार नव्हता. त्याचे काही मित्र हे जागा-जमीन, मालमत्ता ह्याची दलाली करत असत. त्यांनी त्याची दिशाभूल करून सांगितले की, ह्या बँकेच्या नोकरीमध्ये काहीही अर्थ नाही, तू आमच्या व्यवसायामध्ये आमचा सहभागीदार हो. त्याने मागचा-पुढचा, चांगला-वाईट विचार न करता आपल्या बँकेच्या नोकरीला तिलांजली दिली. सरतेशेवटी एका वर्षाच्या आतच सर्व मित्रांनी त्याला धोका दिला. त्याने आपल्या लुटारू मित्रांची वाणी ऐकल्यामुळे त्याने त्याचे सु:खी समाधानी जीवन, दुःखाच्या खोल दरीत झोकून दिले.

मनन चिंतन:

“मी उत्तम मेंढपाळ आहे,” ह्या अभिवचानाद्वारे येशू ख्रिस्त आपणा सर्वांस एक आशादायक, सुखदायी अभिवचन देत आहे. इतकेच नव्हे तर तो आपणाला स्वर्गीय वाटेवर चालण्याचा “पासवर्ड” बहाल करीत आहे. जर आपण एकनिष्ठेने ह्या उत्तम मेंढपाळाच्या सानिध्यात राहिलो तर आपण नक्कीच त्याच्या स्वर्गीय राज्याचे वाटेकरी होऊ, ह्याची तो आपल्याला शास्वती देतो.
 येशू ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे कारण तो आपल्या मेंढरांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतो, तो आपल्या मेंढरांना त्याच्या नावाने हाक मारतो, तो त्यांना परस्पर ओळखतो, त्यांच्या सर्व गरजा पुरवितो इतकेच नाही तर तो आपल्या मेंढरांकरिता स्वत:चा प्राण देतो. प्रभू ख्रिस्ताची सर्व मेंढरे त्याची वाणी ऐकतात.
आजच्या ह्या आधुनिक युगात अनेक भाविकांना येशू ख्रिस्त हाच उत्तम मेंढपाळ आहे ह्याचा विसर पडत आहे व अनेक भाविक लुटारू उत्तम मेंढरांच्या वचनावर आपले जीवन मार्गक्रमण करीत आहेत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनातसुद्धा अनेकदा स्वतःला उत्तम मेंढपाळ संबोधणारे भेटत असतात. आपण आपल्या जीवनात काय करावे? काय करू नये? आपण कसे वागावे? ह्यासाठी ते आपली दिशाभूल करून  आपल्या जीवनाचे नियंत्रण करीत असतात व आपणांस चुकीच्या मार्गावर नेत असतात. अश्या सर्व कठीण परिस्थितीत आपणांस येशू ख्रिस्त हाच एकमेव उत्तम मेंढपाळ आहे ह्याचा विसर पडता कामा नये. आपण आपल्या दुविधा परिस्थितीत दुसऱ्या कोणाची वाणी न ऐकता आपल्या प्रभू ख्रिस्ताची वाणी ऐकली पाहिजे, जो उत्तम मेंढपाळ आहे.
आपला उत्तम मेंढपाळ आपली कधीच दिशाभूल करीत नाही, कितीही महाभयंकर संकटाची रांग आपल्या आपल्या जीवनात आली तरी तो कधीही आपणांस सोडून जात नाही , तो आपले आपुलकीने, प्रेमाने, संरक्षण करतो. येशू केवळ रक्षणाचे कार्य करीत नाही तर त्यांना हिरव्या कुरणात घेऊन जातो. जीवन, आनंद, कृपा, विविध कला आणि देणग्यांचा आपल्यावर तो वर्षाव करतो. आपल्या मेंढरांचा विकास व्हावा त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना सुवर्णकाळाचा अनुभव यावा, शांती-समाधानाने त्यांना जगता यावे म्हणून येशू त्यांची काळजी वाहतो. त्यांच्या मना-हृदयाचा, बुद्धीचा, इच्छेचा, भावनेचा, विचारांचा आणि आत्म्याचा विकास व्हावा ह्यासाठी येशू ख्रिस्त त्यांना हिरव्या कुरणात नेतो.
आज पुनरुत्थित येशूख्रिस्त, जो आपल्या सर्वांचा उत्तम मेंढपाळ आहे, तोच येशूख्रिस्त आपणांस आपल्याला प्रत्येकांच्या नावाने हाक मारीत आहे; आपण आधुनिक काळाच्या मोह-मायामध्ये न गुरफटता, आपण एकनिष्ठेने उत्तम मेंढपाळाची वाणी ऐकूया व सदा-सर्वदा त्यांच्या सानिध्यात एका चांगल्या मेंढराप्रमाणे राहूया. कारण जेव्हा उत्तम मेंढपाळ आपल्या सोबतीला असतो तेव्हा आपल्या हृदयातून अंतर्नाद येतो.
“परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती,
दिवस रात्र तो,  माझ्या संगती,
मजवर त्याची प्रीती”. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे उत्तम मेंढपाळा आमची प्रार्थना ऐकून घे.
१. आपल्या ख्रिस्तसभेने येशू ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ आहे त्याचा प्रेमाचा, दयेचा, व क्षमेचा संदेश जगजाहीर करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे निर्मुलन व्हावे व आपल्या देशात शांती-प्रेमाचे वातावरण पसरावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या कुटुंबातील गैरसमज दूर सारून आपण एकमेकांना प्रेमाने समजून घ्यावे व प्रत्येकाचा आदर राखावा व त्याद्वारे एका चांगल्या ख्रिस्ती कुटुंबाची साक्ष समाजाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळावी, त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या कामा-धंद्यावर प्रभूचा वरदहस्त असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या जीवनात स्व-मार्गाने बहकून न जाता नेहमी उत्तम मेंढपाळाच्या सानिध्यात रहावे व त्याची प्रेमळ वाणी सतत ऐकावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.







Monday, 13 April 2015


Reflections for the Homily on the Third Sunday of the Easter (19/04/2015) By Suresh Alphanso








पुनरुत्थित काळातील तिसरा रविवार


दिनांक: १९/०४/२०१५
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ३:१३-१५
दुसरे वाचन: १योहान २:१-५
शुभवर्तमान: लुक २४:३५-३८




प्रस्तावना:

आज आपण पुनरुस्थित काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची वाचने आपल्याला प्रभू येशु ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे महत्व पटवून देतात.
प्रेषितांची कृत्ये यातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण पेत्राचे शलमोनाच्या देवडीवरील भाषण ऐकतो. पवित्र आत्माने भरलेला पेत्र पुनरुत्थित प्रभू येशूची सुवार्ता पसरवितो. दुसऱ्या वाचनात योहान आपणास पापांपासून परावृत्त कसे व्हावे यासाठी सल्ला देतो. पुढे योहान म्हणतो की, जो कोणी देवाच्या वचनाप्रमाणे चालतो, त्यांच्यामध्ये देवाची प्रिती खरोखर पूर्णत्व पावली आहे. शुभवर्तमानात आपण पाहतो की, प्रभू येशु पुनरुत्थित झाल्यावर प्रथम दोन शिष्यांना अमाउसच्या वाटेवर दर्शन देतो जेणेकरून प्रभू पुनरुत्थित झाला आहे यावर त्यांनी विश्वास ठेवावा.
पुनरुत्थित प्रभू येशु आम्हा प्रत्येकाला त्याच्या पुनरुत्थानाची घोषणा आपल्या जीवनाद्वारे करण्यास पाचारण करत आहे. त्यासाठी लागणारी विशेष कृपा ह्या मिस्साबलीत मागुया.

सम्यक विवरण:  

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ३:१३-१५

येशूने आपल्या अध्यात्मिक शक्तीचा वारसा शिष्यांना दिला होता. त्या सामर्थ्याने शिष्य चमत्कार करत होते. त्याचे श्रेय त्यांनी कधीच स्वतःकडे घेतले नाही. येशू ख्रिस्ताची नाळ ही जुन्या कराराशी जोडलेली होती. म्हणूनच पेत्राने आपल्या भाषणात पुनरुस्थित प्रभू येशूची सुवार्ता गाजवताना अब्राहम, इसहाक व याकोब ह्यांच्या बरोबर प्रभू येशूची तुलना केली; कारण पेत्राचा मुख्य हेतू हाच होता की, लोकांना येशूची खरी ओळख व्हावी व तो पुनरुत्थित झालेला होता, इतकेच नव्हे तर तो देवाचा एकुलता एक पुत्र होता ह्यावर विश्वास ठेवावा! म्हणूनच पेत्र पुढे म्हणतो की, “देवाचा सेवक ‘येशू’ ह्याचा तुम्ही गौरव केला आहे” त्याला तुम्हीच धरिले व पिलाताने त्याला सोडण्याचा निश्चय केला असता, त्याच्यासमक्ष तुम्ही त्याला नाकारले आणि खुनी, लुटारुची (बराब्बा) मागणी केली. तुम्ही देवाच्या पुत्राला म्हणजेच ‘जीवनाच्या अधिपतीला’ जिवे मारिले, पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठविले ह्यांचे आम्ही साक्षी आहोत.
पेत्राचे पत्र अध्याय ३ मधील भाषण हे अतिशय सुप्त व अनुभवी होते, कारण ह्यात शुभवर्तमानाचा संदेश घेण्यास जमावातील काही लोकांना लायक आणि काहीतरी घेण्यायोग्य होते. पश्चाताप करणे म्हणजेच देवाकडे वळणे होय. ज्यू लोकांनी येशूचा स्विकार करावा आणि मूर्तींना देव न मानता येशूचा ‘उद्धारक’ म्हणून स्विकार करावा असा उपदेश पेत्राने केला.

दुसरे वाचन: १ योहान २:१-५

योहानाच्या पहिल्या पत्रात २ अध्यायात योहान चांगल्या प्रकारे पत्राची सुरुवात करतो. अगदी नम्रपणे व सेवामय वृत्तीद्वारे सर्वांना शुभेच्छा देतो. विशेषकरून ह्या शुभेच्छांद्वारे तो मुलांना प्रेमळपणाने उपदेश करतो, म्हणून योहान आपल्या पत्रात ‘प्रिय मुलांनो’, ‘तरुणांनो’ व ‘बापांनो’ असे शब्द वापरतो; अशासाठी की त्याला वाचकांना तीन निराळ्या पत्राद्वारे त्याच्या आध्यात्मिक जीवनाचे सादरीकरण करायचे होते. योहान पत्राच्या सुरुवातीलाच नम्रपणे मुलांना उपदेश करताना म्हणतो ‘माझ्या मुलांनो तुम्ही पाप करु नये म्हणून मी हे तुंम्हास लिहितो’. या पत्राचा मुख्य गाभा म्हणजे ‘देवाची ओळख’, ज्ञान म्हणजे देवाची आज्ञा पाळणे होय. ‘प्रीती’ ह्या शब्दावर पत्रात योहानाने जास्त भर दिला आहे. आपण जर देवाला खरोखर ओळखत असलो, तर त्याचा आपल्या रोजच्या जीवनावर निश्चितच परिणाम होतो. देवाच्या आज्ञा पाळणे व त्याच्या वचनाप्रमाणे चालणे म्हणजेच त्याच्या मध्ये ‘देवाची प्रीती’ पूर्णत्वास येणे होय. जर आपण असे केले नाही तर आपण लबाड व आपल्याठायी सत्य नाही असे योहान सांगतो.

शुभवर्तमान: लुक २४:३५-३८

     लूकच्या शुभवर्तमानात २४ व्या अध्यायात ‘प्रभू येशूचे पुनरुत्थान’ ह्या उताऱ्यात आपण प्रभू जिवंत झाला आहे हे पाहतो. पुढे ‘अमाउस गावच्या रस्त्यावर येशूचे दोन शिष्यांना दर्शन’ हा उतारा खूप प्रसिद्ध आहे. प्रभू येशुने पुनरुत्थित झाल्यावर प्रथम दोन शिष्यांना अमाउसच्या वाटेवर दर्शन दिले ह्यासाठी कि, त्याच्या शिष्यांनी प्रभू जिवंत झाला आहे यावर विश्वास ठेवावा. पुढे ओवी ३६-३८. मध्ये ‘येशूचे प्रेषितांना दर्शन’ हे पाहतो. लूक आपणास येशु पुनरुत्थित झाल्यानंतर त्याचे, त्याच्या शिष्यांना दर्शन कसे दिले ह्या गोष्टी कथित करतो. ओवी ३६-२८ आपण पाहतो प्रभू येशु त्यांच्यामध्ये उभा राहिला व म्हणाला “तुम्हांला शांती असो” पण शिष्य घाबरले व भयभीत झाले, कारण त्यांना भूत आहे असे वाटले. परंतु प्रभुने त्यांच्या मनातले विचार ओळखुन धीर देत म्हटले, “तुम्ही घाबरलात? तुमचा प्रभू पुनरुत्थित झाला आहे हे पहा, जसे मला हाडमांस आहे तसे भुताला नसते”. त्यांचा जास्त विश्वास बसावा म्हणून प्रभुने मांसाचा भाजलेला तुकडा खाल्ला, नंतर त्यांनी प्रभूला ओळखले व विश्वास ठेवला.

बोधकथा

     श्री. सिल्वेस्टर व त्यांचे कुटुंबीय कधीच मिस्साला जात नसे. थोडी श्रीमंती असल्याने ते फार स्व-केंद्रित जीवन जगत होते. स्वत:मध्ये व कुटुंबियांमध्ये खूप मी-पणा होता. मूलगामी चळवळ सुरु झाल्यानंतर त्यांच्या गावकीतील सेवक नेत्यांनी त्यांना गावपातळीवर सुरु असलेल्या कार्यक्रमास येण्यास व मिस्साला जाण्याचे आग्रहाने सांगीतले, पण त्यांच्या मी-पणा व गर्वामुळे ते उडवाउडवीची उत्तर देत. ‘लोक देवळात जाऊन काय फायदा करतात मला माहित आहे, तुम्ही आले मोठे मला शिकवायला’? वैगेरे उत्तर देऊन सेवक-नेत्यांची विनंती धुडकावून त्यांचा अपमान देखील करत.
     अचानक एक दिवस श्री. सिल्वेस्टर आजारी पडले. घरी कुणीच नव्हते. ते खूप घाबरले व देवाचा नामजप करु लागले. ज्या माणसांना त्यांनी उलट उत्तरे व अपमानास्पद वागणूक दिली होती तेच मुलगामी सेवकनेते त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी इस्पितळात नेण्यापासून तर अगदी तज्ञ वैद्यांना बोलावण्यापर्यंत श्रम घेतले. रक्ताची गरज भासल्यावर के.ई.एम. इस्पितळामधून रक्त आणण्यासाठी सेवक नेत्यांनी खूप धावपळ केली. हे सर्व पाहून सिल्वेस्टर यांचे मनपरिवर्तन झाले. त्यांनी इस्पितळाच्या भिंतीवर पुनरुत्थित प्रभू येशूचा फोटो पहिला व त्याच्या खाली लिहिले होते, “तुम्हांस शांती असो”. त्याकडे पाहून श्री. सिल्वेस्टर यांचे फक्त मनपरिवर्तनच झाले नाही, तर त्यांनी पुनरुत्थित प्रभू येशूवर विश्वास ठेवला, कारण पुनरुत्थित प्रभू येशूने त्यांच्या धर्मग्रामातील लोकांच्या सेवाकार्याद्वारे त्यांच्यात बदल घडवून आणला होता. प्रभूच्या सेवकनेत्यांनी प्रभूवरील असलेल्या विश्वासाच्या साक्षामुळे श्री. सिल्वेस्टर यांनी ख्रिस्त खरोखर अनुभवला.

मनन चिंतन   
   
     ख्रिस्तसभा आज पुनरुत्थित काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे आणि आजची वाचने आपणास प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची साक्ष देतात. प्रेषितांच्या कृत्यात आपण पाहतो कि, पेत्र हा प्रभू येशूचा एकदम जवळचा शिष्य होता. जरी प्रभूला त्याने तीन वेळा नाकारले तरी प्रभूचा त्याच्यावर विश्वास होता; म्हणूनच ख्रिस्ताने त्याच्यावर ख्रिस्तसभेची जबाबदारी सोपवली. पुनरुत्थित येशुचे त्यांच्या शिष्यांना दर्शन झाल्यावर पेत्राला नवचैतन्य प्राप्त होते, म्हणून पेत्र पुनरुत्थित ख्रिस्ताची सुवार्ता पसरवितो. ह्याच अध्यायात आपण सुरुवातीला पाहतो कि, पेत्र लंगड्या भिकाऱ्याला बरे करतो. हे बरे करण्याचे सामर्थ्य त्याला पुनरुत्थित येशुकडून प्राप्त होते आणि त्याचा उपयोग तो सुवार्तेसाठी करतो. त्यासाठी खूप काही संकटाना त्याला सामोरे जावे लागते व पुनरुत्थित प्रभू येशूच्या सुवार्तेसाठी तो सर्व सहन करतो.
     लूकने आपल्या शुभवर्तमानात स्रियांना नेहमी उजवे स्थान दिले आहे. येशूचे पुनरुत्थान झाले आहे, ही मंगलवार्ता स्रियांनाच प्रथम समजली. त्यांनी जाऊन ती अकरा शिष्यांना सांगितली. निराश झालेल्या व गोंधळून गेलेल्या शिष्यांना बाजूला घडणाऱ्या परिस्थितीचा वा स्रियांनी सांगितलेल्या मंगलवार्तेचा अनुभव घेता आले नाही किंवा त्या परिस्थितीचा प्रथम साक्षीदार होता आले नाही. तसेच त्यांचा गुरु प्रभू येशु ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे ह्या गोष्टीवर त्यांनी तत्काळ विश्वास ठेवला नाही. कारण  मेलेला माणूस कधीच जिवंत होत नाही  किंवा त्यास पुनरुत्थान नसते हे त्यांना ठाऊक होते.
     चर्चला, मिस्साला न जाणारे एक गृहस्थ म्हणतात, तुम्ही सर्वजण देवळात जातात पण कोणलाही देवळात जाण्यामुळे फरक पडत नाही. त्यापेक्षा देवळात न जाताही चांगले जीवन जगणारा मी काय वाईट आहे? त्याच्या बोलण्यात तथ्य आहे. आपण दररोज देवळात जातो. ख्रिस्ताला स्वीकारतो, पण आपणामध्ये काय फरक पडत नसेल तर आम्हीही ह्या शिष्यांप्रमाणे प्रभूला ओळखू शकणार नाही. प्रभुने जेव्हा भाकर मोडली तेव्हा शिष्यांनी त्याला ओळखले. आपल्या ख्रिस्ती धर्मातील सर्वात मोठा प्रार्थनाविधी म्हणजे मिस्सा होय. मिस्सामध्ये खुद्द येशूचे बलिदान आपण साजरे करत असतो. त्या बलिदानात प्रभू येशूची उपस्थिती असते, असा आपला विश्वास आहे. कॅथोलिक श्रध्येप्रमाणे भाकरीच्या रूपात येशु आमच्या मध्ये हजर असतो आणि येशूच्या उपस्थितीमुळे भाविकांच्या जीवनाला आशीर्वाद्युक्त कलाटणी मिळत असते.
     खुद्द येशु हजर असल्यामुळे आपल्या अंतकरणाला मिळणारा दिलासा व सार्वकालिक जीवनाविषयी वाटणारी शाश्वती आगळीवेगळी असते. आपण रोज मिस्सामध्ये हेच पाहत असतो. पण येशूला ओळखतो का? जोपर्यंत येशूने भाकर मोडली नव्हती, तोपर्यंत शिष्यामध्ये आध्यात्मिक अंधत्व आले होते. जर आपल्यामध्ये शिष्यांप्रमाणे अंधत्व आले असेल तर ते दूर केले पाहिजे. कारण त्यांची मने व अंतकरणे, जड झाले होते. परंतु येश हा देवाचा पुत्र होता व त्याने त्याच्या मरणाचे व पुनरूत्थानाचे त्याच्या समवेत वारंवार भाकीत केले होते. तरीही मानव असल्यामुळे त्यांना त्याचा विसर पडला होता. त्यांचा विश्वास वाढावा व त्यांनी त्याचा गुरु व प्रभू याला ओळखावे आणि प्रभू पुनरुत्थित झाला हे आहे त्यांना पटावे म्हणून येशु त्यांच्यामध्ये उभा राहतो व त्यांना शांती देतो.
पुनरुत्थित प्रभू अचानक येणे त्यांच्या विचारापलीकडचे होते. त्यामुळे ते भयभीत झाले, घाबरले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. परंतु प्रभूने त्यांचे विचार ओळखून म्हटले “तुम्ही घाबरलात का? मी तुमचा पुनरुत्थित प्रभू ख्रिस्त; मला स्पर्श करा जसे मला हाडमांस आहे तसे भुताला नसते.
इतके वर्ष येशूचे शिष्य त्याला पुनरुत्थित झाल्यावर ओळखू शकले नाही. आपल्या जीवनात सुद्धा त्या शिष्यांप्रमाणे स्थिती होते. कधी कधी आपली मने व अंतकरणे, शिष्यांप्रमाणे जड होतात व आपण आपल्या प्रभूला ओळखू शकत नाही. आपण रोज मिस्साला जातो. प्रभूला भाकरीच्या रुपात आपल्या अंतकरणात स्वीकारतो. म्हणूनच आपण आपल्या वागण्यावरून, बोलण्याद्वारे व कृतीतून ते दिसून यायला हवे. आपले जीवन ख्रिस्ताच्या पुनरुत्थित आगमनाने बदलले पाहिजे तेव्हाच आपण प्रभू येशूला ओळखू शकू. तेंव्हाच आपल्या खऱ्या ख्रिस्ती जीवनाला अर्थ प्राप्त होतो.
भाकर मोडल्यावर शिष्य अध्यात्मिकदृष्ट्या डोळस झाले. त्यांचे अंतकरण आनंदाने उचंबळून आले. जेव्हा मिस्साबलिदानाद्वारे आपण प्रभूला स्वीकारतो तेव्हा जर आपण प्रभूला ओळखण्यास कमी पडलो असलो, तसेच जर आपल्या वागण्यात बोलण्यात किंवा कृतीत काही फरक पडत नसेल तर त्या पुनरुत्थित प्रभूला सांगूया हे पुनरुत्थित प्रभो आमच्यात बदल घडव व आम्हाला तुझी नेहमी ओळख होऊ दे. पुनरुत्थित झाल्यानंतर येशूने शिष्यांना दर्शन दिले, यामुळे भयग्रस्त शिष्य प्रतिकूल परिस्थितीतही निर्भयपणे सर्वांना सुवार्ता सांगू लागले. त्यासाठी शिक्षा भोगण्यास आणि मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. पुनरुत्थित ख्रिस्ताने त्यांच्यात घडवून आणलेला हा प्रत्ययकारी बदल होता. हा बदल आपणामध्ये घडावा म्हणून विशेष प्रार्थना करूया.
               
विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे पुनरुत्थित प्रभू येशु आमचा विश्वास वाढव.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप, कार्डीनल्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व सर्व प्रापंचिक लोकांना देव राज्याची सुवार्ता पसरविण्यास कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या सर्व मिशनरी बंधुभगीनींवर व त्यांच्या कार्यावर देवाचा आशीर्वाद असावा तसेच ज्यांना छळाला सामोरे जावे लागत आहे त्यांना देवाच्या मदतीचा हात मिळून  मिशन कार्य चांगल्या प्रकारे पार पडावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्व राज्यकर्त्यांनी आपला स्वार्थ, भ्रष्टाचार व इतर सर्व वाईट मार्ग बाजूला ठेवून लोकांची निस्वार्थीपणे सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक देवापासून दूर गेले आहेत, जे अन्य धर्माकडे वळले आहेत व ज्यांचा देवावर विश्वास नाही अश्या लोकांवर पुनरुत्थित प्रभू येशूची कृपा यावी व त्यांनी पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक आजारी, दु:खी, कष्टी व निराश आहेत तसेच जे बेकार तरुण तरुणी आहेत अश्या सर्वांना पुनरुत्थित प्रभू येशूने त्यांच्या अडचणीत सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.






Tuesday, 7 April 2015

Reflections for the Homily on the Second Sunday (12/04/2015) of the Easter by Glen Fernandes.








दिनांक: १२.०४.२०१५
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ४:३२-३५
दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ५:१-६
शुभवर्तमान: योहान: २०:१९-३१

पुनरुत्थानकाळातील दुसरा रविवार
 “दैवी दयेचा रविवार”




“पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.”





प्रस्तावना:  

     आज आपण पुनरुत्थानानंतरचा दुसरा रविवार साजरा करीत आहोत. हा रविवार “दैवी दयेचा सणम्हणूनही साजरा केला जातो.

     प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, येशुवरील विश्वास धरणाऱ्याचा समुदाय एक दिलाचा व एकजीवाचा होता, त्यांच्यातील कोणालाही काही उणे नव्हते. तर आजच्या दुसऱ्या वाचनात, संत योहानाने लिहिलेल्या पत्रातून आपण ऐकतो की, येशू हा ‘ख्रिस्त’ आहे, असा विश्वास जो कोणी धरितो तो देवापासून जन्मलेला आहे. अविश्वासातून विश्वासाकडे झालेले थोमाचे परिवर्तन आजच्या शुभवर्तमानाचा आशय आहे.

      प्रभू येशू जिवंत झाला आहे, तो उठला आहे, ह्यावर विश्वास ठेवणे म्हणजेच त्याच्या नावाने प्रज्वलित होऊन त्याच्यात पूर्णपणे सामावून जाणे होय. येशूच्या पुनरुत्थानावरील आपला विश्वास अधिकाधिक वाढावा म्हणून ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

पार्श्वभूमी:

       दैवी दयेचा सण हा पुनरुत्थानाच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. पोप जॉन पॉल दुसरे यांनी ३० एप्रिल रोजी झालेल्या आपल्या प्रवचनात म्हटले की, “आपणाला पूर्ण संदेश प्राप्त झाला आहे, व त्यामुळे  पुनरुत्थानानंतरचा दुसरा रविवार ‘दैवी दयेचा’ सण म्हणून साजरा केला पाहिजे. त्याच दिवशी पोप महाशयांनी पोलंडची धर्मभगिनी फाँस्तीना हिला ह्या संतपद बहाल केले.

संत फाँस्तीनाला प्रभूने दर्शन दिले होते व तिने पाहिलेल्या प्रभूच्या चित्राद्वारे झालेल्या प्रकटीकरणाबाबत पोप म्हणाले, “फाँस्तीना हिने रेखाटलेल्या चित्रातून हे सिद्ध होते की, प्रभूच्या हृदयातून आशा आणि प्रकाशाची दोन किरणे संपूर्ण जगाला बदलून टाकील. ही दोन किरणे, प्रभू येशूने संत फाँस्तीनाला सांगितलेले येशूचे अतिपवित्र रक्त व पाणी”.

       ‘दैवी द्या’ म्हणजे परमेश्वराने एखाद्या न्यायाधिशाप्रमाणे केलेला न्याय नव्हे, तर आपल्या प्रभू येशूने, आपणाला स्वर्गीय पित्याला प्रेमाने अलिंगण देता यावे म्हणून दिलेले आमंत्रण होय. ईश्वर मानवावर पर्जन्यासारखा वर्षाव करत असतो. मानवाचे अगणित असे अपराध पोटात घालीत असतो. मानवाने दृष्टपणाचा कळस गाठला, तरी देवाची माया कधीच लयास जात नाही. आपण सर्व देवाच्या दयेचे व करुणेचे लाभार्थी आहोत. इतरांवर द्या करून आपण देवाच्या ऋणातून मुक्त होण्याचा अल्पसा प्रयत्न करू शकतो.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ४:३२-३५

      प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात आपण ऐकतो की, सर्व शिष्य आपली सर्व संपत्ती प्रेषितांच्या चरणाशी ठेवीत व त्यांना काहीही उणे पडत नसे. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात ख्रिस्ती धर्माचा व ऐक्याचा उगम कसा झाला, याबाबत आपणास ऐकायला मिळते. येशूच्या स्वर्गरोह्नानंतर शिष्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना छळ, अडचणी व मनस्ताप सहन करावा लागला. परंतु त्यांची प्रभूवरील श्रद्धा अटळ होती. त्यामुळे हा समुदाय एक मनाचा व एक जीवाचा होता. ख्रिस्ताठायी व ख्रिस्तामुळे त्यांच्यात ऐक्य होते आणि त्यामुळेच त्यांना जगातील कुठलीही शक्ती ख्रिस्तापासून दूर करू शकली नाही.

       उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयास असमर्थ आहे (रोमकरांस पत्र ८:३९) ख्रिस्ताने आपल्या जीवनात मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे सर्वांस एका छ्ताखाली एक कळप व देवाची  लेकरे म्हणून एकत्रित केले. त्यांना काही उणे पडले नाही ते सर्व आनंदित होते, कारण त्यांनी सर्वप्रथम देवाचा व इतरांचा विचार केला व प्रभू म्हणाला होता “जेथे दोघे वा तिघे एकत्रित येतात त्यांच्यामध्ये मी हजर आहे”. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपणाला वेगळे करील? (रोम ८:३५)

दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र: ५:१-६  
   
      संत योहान विश्वासू लोकांना सांगतो की, देवाच्या आज्ञा कठीण नाहीत; देवावरील आपल्या प्रीतीमुळे आपण त्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. संत योहानला ख्रिस्ती समूहास सामोरे आलेल्या अडचणीची जाणीव होती. आम्ही कोणावर विश्वास ठेवावा? व का ठेवावा? ह्या त्यांच्या प्रश्नास संत योहान उत्तर देत म्हणतो की, ‘प्रत्येकजण जो देवाचा मुल होतो, तो जगावर विजय मिळवतो आणि त्यामुळे आम्हाला जगावर आमच्या विश्वासाने विजय मिळाला. जग तुम्हाला आनंदित करील, प्रसन्न करील परंतु तुमचा आनंद सर्वकाळ टिकणारा नसेल. देवावरील विश्वासाने तुम्ही त्याच्या प्रीतीचा अनुभव घ्या’, अशी शिकवणूक संत योहान देतो. संत योहान आपल्या पत्रात म्हणतो की, ‘देव प्रीती आहे, जेव्हा आपण इतरांवर प्रेम करतो तेव्हा आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव होते व आपला देवावरील विश्वास दृढ होत असतो’.

शुभवर्तमान: योहान: २०: १९-३१

      शिष्य भयभीत झाले होते. आपल्या गुरुनंतर आपले काय होईल? ह्या प्रश्नाने त्यांच्या भित्र्या मनाने घर केले होते, लपून बसलेले असताना व दरवाजे बंद असताना प्रभू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहतो व दर्शन देताना म्हणतो, “तुम्हास शांती असो.” थोमा हा त्यांच्यामध्ये नव्हता. तो म्हणाला, “त्याच्या हातात ख्रिस्ताचे व्रण पाहिल्यावाचून व खिळे होते त्याजागी आपले बोट घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही”. आपल्या बंधुबरोबर एकत्र न राहिल्यामुळे त्याला पुनरुत्थित येशूला भेटण्याची संधी लाभली नाही.  तरीही विशेषरीत्या येशू, पुन्हा थोमाला दर्शन देतो. थोमाचे हृद्य, प्रीती व भक्तीने ओसंडून वाहते म्हणूनच तो उद्गारतो, “माझ्या प्रभू व माझा देव”. प्रभू भविष्यात येणाऱ्या आपल्या सर्व शिष्यांस उद्देशून म्हणतो की, ह्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत परंतु ‘पाहिल्यावाचून जे विश्वास ठेवतात ते धन्य होत’.

      थोमा हा प्रभू येशुबरोबर अनेक वर्षे होता. त्याने येशूच्या शक्तीचा अनुभव घेतलेला होता. येशूने अनेक चमत्कार केले होते ह्याचा तो साक्षीदार होता. इतकेच नव्हे तर जेव्हा येशूने लाझरसला मरणातून उठविले होते, तेव्हा थोमा इतर शिष्यांना म्हणाला होता की, आपणही येशुबरोबर जाऊ, जेणेकरून आपल्यालाही मरण प्राप्त होईल. परंतु जेव्हा त्याच्या विश्वासाची कसोटीची खरी वेळ आली तेव्हा थोमा गडबडला. विश्वास म्हणजे अंधारात विचार न करता मारलेली उडी (leap of faith) येशू आपल्या शिष्यांना जे पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे होते त्यांना ‘धन्य’ असे संबोधतो.

मनन चिंतन

       “जेव्हा जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मृतासारखी वागायला लागतात तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलाव लागतं” असं म्हणतात. पवित्र शास्रामध्ये आपण तीन प्रकारच्या व्यक्ती पाहतो. पहिले ज्यांनी अभूतपूर्व गोष्टी पाहिल्या तरी विश्वास ठेवत नाही. उदाह्र्णार्थ, इजिप्तचा फारो राजा. दुसऱ्या प्रकारच्या व्यक्ती म्हणजे ज्यांनी पाहिल्यावर विश्वास ठेवला. उदाह्र्णार्थ थोमा. ह्या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींपेक्षाही तिसऱ्या प्रकारच्या व्यक्तीमध्ये ज्या व्यक्ती न पाहता विश्वास ठेवतात त्यांचा समावेश होतो आणि त्यांनाच प्रभू ‘धन्य’ असे संबोधतो. नोहाने परमेश्वराची वाणी ऐकली त्याने पाहिले नव्हते तरी त्याने विश्वास ठेवून बोट तयार केली. अब्राहमाने आपले घरदार त्याला काय मिळणार होते हे माहित नसतानाही सोडले.

      जर थोमाने शिष्याची साक्ष ऐकून विश्वास ठेवला असता, तरी कदाचीत त्याचा विश्वास महान असा गणला गेला असता. कारण थोमाने अनेक वेळा प्रभूकडून ऐकले होते की, मानवाच्या पुत्राला जीवे मारले जाईल आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल. मेलेल्या लाझरसला प्रभूने कसे उठविले ह्याचाही तो साक्षीदार होता. थोमाला ‘मसीहा’ जो तारणारा येणारा होता त्याला अनेक दु:खाना सामोरे जावे लागणार होते हे पवित्र शास्त्राद्वारे माहित होते; परंतु थोमाला आपल्या इंद्रियांनी अनुभव घेऊन विश्वास ठेवायचा होता. थोमाला वाटले होते की, तो बरोबर वागत होता व विश्वास ठेवण्यासाठी आपल्या इंद्रियांनी अनुभव घेणे गरजेचे आहे हे त्याला वाटत होते.

      श्रद्धा ही सामर्थ्यवान असते; श्रद्धेचा घटक आपल्यात असल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. प्रभू जिवंत असताना सर्व शिष्यांची श्रद्धा प्रभू येशूवर होती. प्रभूपुढे प्रश्न होता अखिल मानवजातीचा. प्रश्न होता चिरंतन अशा अंतिम सत्याचा. प्रश्न होता अगणित कुंभ धारण करून राहणाऱ्या अमर आत्मत्वाचा. जगातील अंतिम व कधीही न बदलणारं शाश्वत सत्य आहे; कुणालाही त्याचा अनुभव आपल्या विलासी रंगमहालात राहून कधीच घेता येणार नाही. केवळ जगायचं या शुद्ध लोचट आसक्तीला, पाण्यातील हत्तीला मगर चिटकतो तस चिटकून त्याचा प्रत्यय कुणालाही कधीही घेता येणार नाही. त्यासाठी जशी दिवसामागून रात्र असते तसा जीवनामागून मृत्यू असतो याचा शरीरातील पेशिपेशिंना दाट आणि अमळ परिचय व्हावा लागतो. मन, शरीर, बुद्धी सर्व निकोप आत्मनिर्भर व्हावं लागत. मग सत्य कुणी दुसऱ्यानं सांगाव लागत नाही, पटवुन द्यावे लागत नाही तर ते आपोआपच शरीर-शरीरातून प्रकटून पावू लागतं. मुक्ति किंवा सर्वश्रेष्ठ आत्मानुभव हे कधीही विचारून विकत घेवून किंवा भिक्षा मागून मिळणारी वस्तू नव्हे. 

         आपला विश्वास हा आपल्या अंतकणातून असावा लागतो. ज्याप्रमाणे दुसऱ्यांनी अन्न खाऊन आपली भूक कधीच शमत नाही किंवा दुसऱ्यांनी पाणी प्राशन केल्याने आपली तृष्णा कधीच शमत नाही, अगदी त्याचप्रमाणे कुणाच्याही केवळ उपदेशामुळे कुणाचाही कधीच उध्दार होत नसतो. जिथं जिथं जीवन असत तिथं तिथं प्रकटनाचीही अनावर ओढ असते. मुक्तीची तळमळ असते. बाहेरून ती दिसत नसेल, पण आतून हे कार्य अखंडपणे चाललेलं असत म्हणून ‘जीवन म्हणजेच प्रकटण’ असे आपण म्हणू शकतो.

       कधी कधी या प्रकटनाचा प्रलख्ख देखावा मानवजातीपुढे यावा लागतो; कारण ग्रंथ, उपदेश नितीत्व आणि साक्ष यापलीकडे जाऊन ती आसक्त झालेली असते. जगात दृश्य वस्तूंच्या पलीकडे आणखी काही सूक्ष्म जगत आहे हे पहायलाही तिला अवसर नसतो. थोमाच्याही मनात युद्ध त्यामुळेच पडलं होत. त्याला व शिष्यांना भय वाटत होते, परंतु येशू त्यामध्ये येऊन म्हणतो, “तुम्हास शांती असो”.

      ‘एकदा भय संपल की, जो प्रदेश लागतो त्यालाच मुक्ति असे म्हणतात’. अनेकदा आपणही जीवनात असा अनुभव घेतो. धीर गळून पडतो. समोर मार्ग दिसत नाही. प्रभो समोर असला तरीही आपण खोल गर्तेत रुतलेलो असतो. संत कबीर म्हणतात, “आगे थे सदगुरू, दीपक दया हाथी.” गुरु नेहमीच आपल्या समोर काळजाचा दिवा लावून असतो, तो आपलं आयुष्य उजळवत असतो. दुःखाचा प्याला तो अगोदर पीतो आणि स्वतःच्या आयुष्याची खंडणी भरुन तो उभा असतो. बऱ्याचदा आपणालाही थोमाप्रमाणे प्रभू जो आपल्या सामर्थ्याचा मूळस्त्रोत आहे त्याचा विसर पडलेला असतो. आपणही शंका घेतो व शंका भयाचे कारण ठरते.

      थोमा आपल्या बुद्धीद्वारे आपल्या इंद्रियांचा अनुभव घेवून प्रभूचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होता. प्रभू त्याच्या सर्व शिष्यांना म्हणतो, “तुम्हास शांती असो”. संत पौल लिहितो, “सर्व बुद्धीच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमची मने ख्रिस्त येशूच्या द्वारे राखील (फिलीपैकरांस पत्र ४:७) व शांतीचा देव तुम्हाबरोबर राहील (४:९).

      प्रभू म्हणतो, “माझी शांती मी तुम्हांला देतो, तुमचं मन अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा भयभीत होऊ देऊ नका” (योहान १४:२७). प्रेम मानवाला स्वतःच्या पलीकडे पाहण्याची शक्ती देतो म्हणून ते प्रेम खरखुरं असावं. ते हृदयाच्या गाभाऱ्यातून उमलायला हवं. ‘प्रिती’ कोणत्याही भीतीतून किंवा दुःखातून मुक्त होण्याचा सहज सुलभ मार्ग आहे.

      आपल्या विश्वासाने आपल्या जीवनाला खऱ्या प्रेमाने अर्थ येतो. व हा ‘विश्वास अपेक्षित गोष्टींचा भरवसा व अदृश्य गोष्टींची खात्री असा आहे’ (इब्री ११:१).

१.      बोध कथा:

       अर्नाळा ह्या ठिकाणी काही वर्षाअगोदर, एक बोट मासेमारी करण्यासाठी अथांग सागरात गेल्यावर बेपत्ता झाले. पुष्कळ वर्षानंतर अनेक प्रयत्न केल्यावरही त्या बोटीचा काहीही थांगपत्ता लागला नाही. एक स्री जिचा पती त्या बोटीवर होता ती रोज रात्री समुद्रकिनारी जात असे व दूर सागरात एकटक लावून पाहत असे. तिने आपल्या घराचा दरवाजाही कधीही बंद ठेवला नव्हता. तिला अनेकजणांनी समजावण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व निष्फळ. तिने आशा सोडली नव्हती. तिचा विश्वास होता कि एकदिवस तिचा पती पुन्हा घरी येईल. जेव्हा ती मरण पावली तेव्हा तिच्या ओठावर शब्द होते, “माझे पती आले तर त्यांना सांगा मी त्यांची खुप वाट पाहिली”.

       त्या स्त्रीचा विश्वास होता, की तिचा पती जिवंत आहे व एकदिवस तो नक्कीच परत येईल. तिच्या विश्वास आणि प्रीतीमुळे तिने रोज तिच्या पतीला परत येताना पहिले होते. प्रभू उठला आहे व तो आजतागायत जिवंत आहे. त्याला पाहिल्यावर थोमा उत्तरला, “माझ्या देवा, माझ्या प्रभो!”. विश्वास हा अपेक्षित गोष्टीचा भरवसा व अदृश्य गोष्टींची खात्री असा आहे.

२. बोध कथा:

       एकदिवस आर्चबिशप फुल्टन जे. शीन एका मोठ्या इस्पितळात आजाऱ्यांना साक्रामेंत देण्यास गेले होते. त्या हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीने आर्चबिशपचा स्विकार केला नाही, उलट त्यांना अपशब्द बोलले. ती व्यक्ती देवावर नाराज होती. अनेक वर्षांपासून त्या व्यक्तीने साक्रामेंत व ख्रिस्तपसादाचा स्विकार केला नव्हता व अत्यंत पापमय आयुष्य तो जगला होता. अनेक दिवस प्रयत्न करुनही त्याने आर्चबिशपांना परतून लाविले होते.
       ज्या रात्री त्याची शेवटची घटका जवळ आली होती त्या रात्री आर्चबिशप त्या व्यक्तीजवळ गेले परंतु त्या माणसाने पुन्हा देवाचा धिक्कार करून ख्रिस्तप्रसाद घेण्यास नकार दिला. आर्चबिशप त्याला म्हणाले, “माझ्या मुला तुला जरी नको असेल तरी देवाची तुझ्यावर असलेली प्रिती, दया व करुणा ही अपार आहे”. काही तासांनी ती व्यक्ती मरण पावली, परंतु नर्सनी आर्चबिशपांना सांगितले की शेवटपर्यंत तो म्हणत राहिला “हे प्रभो मज पाप्यावर दया कर.”

        देवाने आपल्यावर केलेली दया म्हणजे माणसाने आपल्या पराकष्टाने मिळविलेले बक्षीस नव्हे तर देवाने माणसावर केलेले प्रेम व त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली. संत पेत्र म्हणतो, “तुम्ही तुमचे नव्हते. तुम्हाला आपल्या प्रभू येशूच्या रक्ताने विकत घेतले आहे.”


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:


प्रतिसाद: हे प्रभो, आमची पुनरुत्थित ख्रिस्तावरील श्रद्धा दृढ कर.

१. आपले परमगुरु पोप फ्रान्सीस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या विश्वासपुर्वक पार पाडाव्यात आणि लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
२. जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आणावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, त्यांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. शांती निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी आज जगभरात अनेक संघटना कार्यरत आहेत, त्यांच्या कार्यात प्रभूचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी तसेच प्रत्येक सदस्यातील बंधुभावाची भावना वृद्धिंगत होऊन एकमेकांतील जवळीकता वाढावी म्हणून आपण प्रार्थना करूया.