Reflections for the Homily on Fourth Sunday (26/04/2015) of Easter by John Mendonsa.
पुनुरुत्थितकाळातील चौथा रविवार.
दिनांक: २६/४/२०१५.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये : ४:८-१२.
दुसरे वाचन: १योहान : ३:१-१२.
शुभवर्तमान: योहान : १०:११-१८.
“मी उत्तम मेंढपाळ आहे”.
प्रस्तावना:
आज देऊळ माता पुनरुत्थित काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे.
आजची उपासना आपणा सर्वांस येशूख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ आहे, यावर आपला विश्वास
दृढ करण्यास आवाहन करीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की,
संत पेत्राने कश्याप्रकारे पुनरुत्थित
ख्रिस्ताच्या नावाने रोग्यांस आरोग्यदान दिले. तर संत योहान दुस-या वाचनाद्वारे ‘आपण
सर्वजण देवाची लेकरे आहोत’ असे आपणांस आवर्जून सांगत आहे. आजचे शुभवर्तमान येशू
ख्रिस्त हाच खरा उत्तम मेंढपाळ आहे व त्याच्यावर विश्वास ठेवणा-यांचा कधीही नाश
होणार नाही याची हमी देते.
ह्या पवित्र मिस्साबलीत सहभागी होत
असताना, आपण आपल्या जीवनात उत्तम मेंढपाळाच्या सहवासातून भरकटून न जाता त्याच्या
सहवासातच आपल्या जीवनाच्या वाटेवर चालावे म्हणून प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये : ४:८-१२.
पेत्र व योहान ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी लोकांना शिकवण
देत असतानाच सदुकी लोकांनी पेत्र व योहानास अटक केली व संध्याकाळची वेळ असल्यामुळे
त्यांना रात्रभर कैदेत ठेवले (४:३). दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकारी वर्ग, वडील व शिक्षक
यांची सभा यरुशलेमात भरली (४:५) त्या सभेला ‘सान्हेद्रिन’ असे म्हणत; त्या सभेने
पेत्र व योहान ह्याची चौकशी प्रारंभीली. त्यांनी विचारले, “कोणाच्या सामर्थ्याने
तुम्ही हा चमत्कार केला”? (४:७). तेव्हा पेत्र पवित्र आत्माने परिपूर्ण होऊन निर्भीडपणे
त्याने घोषणा केली कि, ‘परात्पर देवाने येशूला मरणातून उठविले त्या नाझरेथकर
येशूच्या नावानेच हा चमत्कार घडला, त्याच्या शिवाय दुसरे कोणीही तुमचे तारण करू
शकणार नाही’. पेत्राच्या ह्या स्पष्टीकरणावरून ‘सान्हेद्रिन’ या महासभेला
पेत्राविषयी व योहानाविषयी एक महत्वाची बाब समजली होती आणि ती म्हणजे ते दोघे
ख्रिस्ताच्या सहवासात होते.
दुसरे वाचन: १ योहान ३:१-२.
‘आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने
आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा’ (३:१) ह्या वचनावरून योहान स्पष्ट करतो की,
आपल्याला फक्त “देवाची मुले” हे नावच नव्हे तर आपण खरोखरच “देवाची मुले” आहोत. देव
आम्हाला आपली मुले म्हणतो. याचा परिणाम म्हणजे जग आपणाला ओळखत नाही (३:१). जग
ख्रिस्ताच्या अनुयायांना ओळखीत नाही, हे जगाचे उणेपण आहे, पण त्यात नवल
करण्यासारखे काहीही नाही; कारण जगाने येशू ख्रिस्ताला ओळखलेले नाही.
शुभवर्तमान: योहान : १०:११-१८.
पॅलेस्टाईन मधील यहुदा प्रांत हा ओसाड खडकाळ असा प्रदेश
होता. त्या ठिकाणचे लोक शेळ्या, मेंढ्या पाळीत असत. मेंढरांना खाण्यासाठी फारसा
चारा नसल्याने ते भटकत असत, परंतु मेंढपाळ सतत आपल्या मेंढरांच्या कळपाबरोबर राहत
असत. मेंढपाळांना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे लागत असे कारण मेंढरे नजरेआड होताच
कोल्हे आणि लांडगे त्या मेंढरांवर हल्ले करीत असत. इतकेच नव्हे तर अशा मेंढरांना
कधी काही लुटारू देखील चोरून नेत असत. ह्यास्तव त्या काळच्या मेंढपाळात सतत जागृत
राहणे, निर्भयपणे आपल्या मेंढराची राखण करणे आणि प्रसंगी आपला जीव धोक्यात घालणे
अशा प्रकारचे धाडसी गुणधर्म असणे अत्यंत आवश्यक होते. ह्याच धाडसी गुणधर्मामुळे पॅलेस्टाईनचा
मेंढपाळ हा इतर मेंढपाळापेक्षा वेगळा ठरत होता. त्याच्याबरोबर कधीही राखणारे
कुत्रे नसत फक्त त्याच्यासोबत त्याच्या खांद्याला कातड्याची झोळी व त्या झोळीत
जेवणाची शिदोरी व गोफण इ. असे. त्या गोफणीत दगड टाकून कळपापासून दूर जात असलेल्या
मेंढराच्या तोंडासमोर हा दगड फेकला जाई, त्यामुळे ते मेंढरू परत आपल्या कळपात येई.
मेंढपाळाच्या हातात एक काठी असे. ही सर्व मेंढरे आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकून
त्याच्याकडे येत असत. मेंढपाळ आपल्या मेंढरांना नावाने हाक मारी आणि मेंढरे
त्याच्या आवाजाप्रमाणे वागत असत. मेंढपाळ पुढे चालत व मेंढरे त्याच्या मागोमाग
येत. पॅलेस्टाईनचा मेंढपाळ स्वतः पुढे जाऊन रस्त्यात अथवा कुरणात कुठे धोका आहे
काय ह्याची पाहणी करीत असे.
पॅलेस्टाईनमध्ये ही मेंढरे कोंडवाड्यात ठेवली जात असत. त्या
कोंडवाड्याला एक मजबूत दरवाजा असे. संध्याकाळी सर्व मेंढरे त्या कोंडवाड्यात आणली
जात असत आणि त्या दरवाजाची चावी फक्त गुराख्याकडेच असे. परंतु उन्हाळ्यात हि
मेंढरे घरी न येता एखाद्या शेतात अथवा डोंगराच्या पायथ्याशी विश्रांती घेत. अशा
परिस्थितीत त्यांच्या भोवती छोटेस कुंपण असे व आतमध्ये जाण्यासाठी एक छोटासा मार्ग
असे आणि ह्याच येण्या-जाण्याच्या मार्गात मेंढपाळ स्वतः झोपत असे जेणेकरून कोणतेही
मेंढरू आत किंवा बाहेर जाऊ शकत नव्हते.
जुन्या करारात देवालासुद्धा मेंढपाळाची उपमा दिलेली आहे.
देव मेंढपाळ आणि सामान्य लोक कळप म्हणून ओळखला जाई. विशेष करून स्त्रोत्रकाराने
अनेक स्त्रोत्रामध्ये त्याची नोंद केली आहे (२३:१; ८०:१; १००:३). यशया, यिर्मया व
यहेज्केल या संदेष्ट्यांनी देवाच्या निवडलेल्या संदेष्ट्यांना मेंढपाळ म्हटले आहे
(यशया ४०:११; यिर्मया २३:१-२). नव्या करारात (आजच्या शुभवर्तमानात) देखील
ख्रिस्ताला ‘उत्तम मेंढपाळाची’ उपमा दिलेली आहे. हरवलेल्या मेंढरांना शोधण्यासाठी
तो आपला प्राणदेखील देईल अशा प्रकारची साक्ष नव्या करारात दिलेली आहे.
येशु ख्रिस्त किती चांगला मेंढपाळ आहे, त्याचप्रमाणे
मजुरीसाठी मेंढरे राखणारा व प्रीतीने मेंढरे राखणारा यांच्यातील फरक तुलनेने योहानाने
(१०:११-१८) मध्ये दर्शिविला आहे. मेंढरांसाठी आपले प्राण देण्यास तयार असणे हा
मेंढपाळाचा पहिला मुख्य गुणधर्म आहे. प्रभू येशू तो किती उत्तम मेंढपाळ आहे याचे
आणखी एक विशेष कारण योहान स्पष्ट करतो, ते म्हणजे मेंढरांचे संरक्षण करताना मरण
पत्करण्यास मी तयार आहे असे येशु ख्रिस्त म्हणत नाही तर तो म्हणतो, “मेंढरांसाठी
मी आपला प्राण देतो (योहान १०:१५). प्रभू येशू ख्रिस्ताची हि कृती आणि पळून
जाणाऱ्या भाडोत्री मेंढपाळाचे भ्याडपणाचे कृत्य (योहान १०:१२) या दोन्ही कृतीचा
भेद लक्षात घेतल्याने येशूच्या पवित्र यज्ञापर्णाचे स्वरूप अगदी सुस्पष्टपणे समोर
येते. त्याचप्रमाणे भाडोत्री मेंढपाळामध्ये काळजीचा व आपुलकीचा असलेला अभाव हा
मुद्दाही विशेष करून वचन १०:१३ मधून स्पष्ट होतो.
“मीच उत्तम मेंढपाळ आहे; उतम मेंढपाळ मेंढरांकारिता आपला
प्राण देतो” (योहान १०:११), “मी उत्तम मेंढपाळ आहे; जसा पिता मला ओळखतो व मी
पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात;
मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो” (योहान १०:१४-१५) ह्या दोन्ही वचनांवरून मेंढपाळ
व मेंढरे ह्यांची परस्पर ओळख आणि जिव्हाळा व आपुलकी यावर भर दिला आहे. पिता आणि
पुत्र ह्यांच्यातील परस्पर ओळख व आपुलकी सुद्धा अशीच आहे. याहून अधिक निकटचा संबध,
जवळीक असणे शक्यच नाही. येथे भाडोत्री मेंढपाळाला अजिबात वाव नाही.
बोधकथा:
१. एक प्रसिद्ध असा राजा होता. ज्याच्याजवळ धन-दौलत, संपत्ती, नाव-नौलिक सर्व
काही होते. त्याच्या राज्यात सर्व प्रजा सुःखी समाधानी होती. परंतु काही काळांनंतर
त्याच्या राज्यावर शत्रूंचे हल्ले होण्यास सुरुवात झाली. ह्यावर उपाय-योजना म्हणून
राजाने आपली शस्त्र सामुग्री व सैनिकी दल वाढविले. अनेक अशा प्रसिद्ध सैनिकी
अधिकाऱ्यांची, त्याने शत्रूचा प्रभाव करण्यासाठी नेमणूक केली.
प्रत्येकवेळी रणांगणावर जाण्याअगोदर राजा मोठया-उत्साहाने
सर्व सैनिकांस प्रोत्साहन प्रेरित भाषणाचे बाळकडू पाजत असे. रणांगणावर शत्रूंना न
घाबरता शत्रूचा नायनाट कसा करावा, रणांगणावर कोण कोणत्या योजना अमलात आणाव्यात,
अशा प्रकारचा सर्व आढावा तो आपल्या सैन्यासमोर सादर करीत असे.
राज्याच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी राजावर होती परंतु
राजाने फक्त आपल्या सैन्यांना नेहमी प्रोत्साहन प्रेरित भाषणेच दिली, त्याने कधीही
स्वतःचा जीव धोक्यात घालून, आपल्या सैन्यांबरोबर रणांगणावर शत्रूचा नाश करण्यास
गेला नाही. जनतेच्या संरक्षणाऐवजी, तो नेहमी स्वतःच्या संरक्षणाची चिंता करीत असे.
परिणामत: काळांतराने राजाने नेमलेले सैनिकी अधिकारी सुद्धा शत्रूंच्या आमिषाला बळी
पडले व शत्रूने अगदी सहजरीत्या राज्यावर हल्ला करून राजाला पराभूत केले.
२. धार्मिक कुटंबातील एक मुलगा एका पायाला थोडासा अपंग असला तरी बुद्धीने अगदी
चलाख होता. आपले शिक्षण पूर्ण करून तो एका नामवंत बँकेमध्ये महत्वाच्या हुद्यावर
कामास लागला. त्याला भरगच्च असा पगार असल्यामुळे मित्रांची संगत वाढत होती.
काळांतराने मित्रांनी त्याला मद्यपानाची, सिगारेटची सवय लावली. अनेक सद्गुहस्थांनी
व कुटुंबातील सदस्यांनी त्याला समजावले परंतु तो कुणाचेच ऐकण्यास तयार नव्हता.
त्याचे काही मित्र हे जागा-जमीन, मालमत्ता ह्याची दलाली करत असत. त्यांनी त्याची
दिशाभूल करून सांगितले की, ह्या बँकेच्या नोकरीमध्ये काहीही अर्थ नाही, तू आमच्या
व्यवसायामध्ये आमचा सहभागीदार हो. त्याने मागचा-पुढचा, चांगला-वाईट विचार न करता
आपल्या बँकेच्या नोकरीला तिलांजली दिली. सरतेशेवटी एका वर्षाच्या आतच सर्व मित्रांनी
त्याला धोका दिला. त्याने आपल्या लुटारू मित्रांची वाणी ऐकल्यामुळे त्याने त्याचे सु:खी
समाधानी जीवन, दुःखाच्या खोल दरीत झोकून दिले.
मनन चिंतन:
“मी उत्तम मेंढपाळ आहे,” ह्या अभिवचानाद्वारे येशू ख्रिस्त
आपणा सर्वांस एक आशादायक, सुखदायी अभिवचन देत आहे. इतकेच नव्हे तर तो आपणाला स्वर्गीय
वाटेवर चालण्याचा “पासवर्ड” बहाल करीत आहे. जर आपण एकनिष्ठेने ह्या उत्तम मेंढपाळाच्या
सानिध्यात राहिलो तर आपण नक्कीच त्याच्या स्वर्गीय राज्याचे वाटेकरी होऊ, ह्याची
तो आपल्याला शास्वती देतो.
येशू ख्रिस्त हा
उत्तम मेंढपाळ आहे कारण तो आपल्या मेंढरांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी
स्वतःवर घेतो, तो आपल्या मेंढरांना त्याच्या नावाने हाक मारतो, तो त्यांना परस्पर
ओळखतो, त्यांच्या सर्व गरजा पुरवितो इतकेच नाही तर तो आपल्या मेंढरांकरिता स्वत:चा
प्राण देतो. प्रभू ख्रिस्ताची सर्व मेंढरे त्याची वाणी ऐकतात.
आजच्या ह्या आधुनिक युगात अनेक भाविकांना येशू ख्रिस्त हाच
उत्तम मेंढपाळ आहे ह्याचा विसर पडत आहे व अनेक भाविक लुटारू उत्तम मेंढरांच्या
वचनावर आपले जीवन मार्गक्रमण करीत आहेत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनातसुद्धा अनेकदा
स्वतःला उत्तम मेंढपाळ संबोधणारे भेटत असतात. आपण आपल्या जीवनात काय करावे? काय
करू नये? आपण कसे वागावे? ह्यासाठी ते आपली दिशाभूल करून आपल्या जीवनाचे नियंत्रण करीत असतात व आपणांस चुकीच्या
मार्गावर नेत असतात. अश्या सर्व कठीण परिस्थितीत आपणांस येशू ख्रिस्त हाच एकमेव
उत्तम मेंढपाळ आहे ह्याचा विसर पडता कामा नये. आपण आपल्या दुविधा परिस्थितीत
दुसऱ्या कोणाची वाणी न ऐकता आपल्या प्रभू ख्रिस्ताची वाणी ऐकली पाहिजे, जो उत्तम
मेंढपाळ आहे.
आपला उत्तम मेंढपाळ आपली कधीच दिशाभूल करीत नाही, कितीही
महाभयंकर संकटाची रांग आपल्या आपल्या जीवनात आली तरी तो कधीही आपणांस सोडून जात
नाही , तो आपले आपुलकीने, प्रेमाने, संरक्षण करतो. येशू केवळ रक्षणाचे कार्य करीत
नाही तर त्यांना हिरव्या कुरणात घेऊन जातो. जीवन, आनंद, कृपा, विविध कला आणि
देणग्यांचा आपल्यावर तो वर्षाव करतो. आपल्या मेंढरांचा विकास व्हावा त्यांचा
उद्धार व्हावा, त्यांना सुवर्णकाळाचा अनुभव यावा, शांती-समाधानाने त्यांना जगता
यावे म्हणून येशू त्यांची काळजी वाहतो. त्यांच्या मना-हृदयाचा, बुद्धीचा, इच्छेचा,
भावनेचा, विचारांचा आणि आत्म्याचा विकास व्हावा ह्यासाठी येशू ख्रिस्त त्यांना
हिरव्या कुरणात नेतो.
आज पुनरुत्थित येशूख्रिस्त, जो आपल्या सर्वांचा उत्तम
मेंढपाळ आहे, तोच येशूख्रिस्त आपणांस आपल्याला प्रत्येकांच्या नावाने हाक मारीत
आहे; आपण आधुनिक काळाच्या मोह-मायामध्ये न गुरफटता, आपण एकनिष्ठेने उत्तम मेंढपाळाची
वाणी ऐकूया व सदा-सर्वदा त्यांच्या सानिध्यात एका चांगल्या मेंढराप्रमाणे राहूया.
कारण जेव्हा उत्तम मेंढपाळ आपल्या सोबतीला असतो तेव्हा आपल्या हृदयातून अंतर्नाद
येतो.
“परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती,
दिवस रात्र तो, माझ्या संगती,
मजवर त्याची प्रीती”.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे उत्तम मेंढपाळा आमची प्रार्थना ऐकून घे.
१. आपल्या ख्रिस्तसभेने येशू ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ आहे त्याचा प्रेमाचा,
दयेचा, व क्षमेचा संदेश जगजाहीर करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे निर्मुलन व्हावे व आपल्या
देशात शांती-प्रेमाचे वातावरण पसरावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या कुटुंबातील गैरसमज दूर सारून आपण एकमेकांना प्रेमाने समजून घ्यावे व
प्रत्येकाचा आदर राखावा व त्याद्वारे एका चांगल्या ख्रिस्ती कुटुंबाची साक्ष
समाजाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळावी,
त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या कामा-धंद्यावर प्रभूचा वरदहस्त असावा म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या जीवनात स्व-मार्गाने बहकून न जाता नेहमी उत्तम मेंढपाळाच्या
सानिध्यात रहावे व त्याची प्रेमळ वाणी सतत ऐकावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment