Monday, 18 April 2016

Reflection for the homily of 5th Sunday of Easter (24/04/2016) By: Nevil Govind.



पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार





दिनांक: २४/०४/२०१६ 
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: १४:२१-२७
दुसरे वाचन: प्रकटीकरण: २१:१-५
शुभवर्तमान: योहान १३:३१-३५


“तुम्ही एकमेकांवर प्रिती करावी.”






प्रस्तावना: 
आज आपण पुनरुत्थान काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात संत पौल आणि बर्नबा ह्यांनी मंडळींना विश्वासात टिकून राहा असा बोध करतात आणि आपण देवाच्या सहवासात असताना देवाने आपणाकरिता कायकाय केले हे त्यांना सांगत आहेत. तर प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात संत योहान म्हणतो की, ‘परमेश्वर त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून नवे आकाश आणि नवी पृथ्वी निर्माण करणार आहे’.
आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना परस्पर प्रीतीची नवीन आज्ञा देत आहे, “जसे मी तुम्हांवर प्रेम केले, तसे तुम्हीही एकमेकांवर प्रेम करावे”. आपण सर्वांनी येशू ख्रिस्ताद्वारे देव प्रेमाचा वारसा घेतलेला आहे. हे प्रेम स्वतःपुरते व आपल्या स्वकीयांपर्यंत मर्यादित न ठेवता सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी  येशू आज आपल्याला आवाहन करीत आहे.  
आपल्या प्रितीमध्ये स्वार्थ व दुजाभाव नसावा. सर्वांबरोबर समेत, शांती व सलोखा असावा. प्रभूसारखे गरजवंत, गरीब, अनाथ व अपंगांच्या साहाय्याला धावून जाण्यास आपणाला येशूची कृपा लाभावी म्हणून आपण आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: १४:२१-२७

पौल आणि बर्णबा ह्यांनी तेराव्या अध्यायात (प्रे. कृत्ये १३) म्हटल्याप्रमाणे अंत्युखिया, लुस्त्रे आणि इकुन्या येथील ख्रिस्ती मंडळींना ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली होती. पिसिदियांतील अंत्युखियामध्ये पौलाने यहुदियांना उपदेश केला होता. तेथे त्याने संपूर्ण घडलेला इतिहास त्यांना सांगितला होता आणि ख्रिस्ताला देवाने तारणाची वार्ता घेऊन पाठविले होते हे त्यास सांगतो.
ते सर्व त्यांच्यावर व त्यांनी सांगितलेल्या सुवार्तेवर विश्वास ठेवतात परंतु विरोधी यहुदी लोकांत फूट पडतात, त्यांच्यात निर्माण होतात आणि लोकसमुदाय त्यांना दगडमार करण्याकरीता त्यांच्यावर धावून येतात. संत पौलाला दगडमार करतात आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर काढतात.
ह्या नगरांत सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य मिळवून अंत्युखिया, लुस्त्रे आणि इकुन्या येथेपरत आले होते. अंत्युखियास पोहोचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने कायकाय केले आणि परराष्ट्रीयांकरीता विश्वासाचे दार कसे उघडले हे सांगितले.   
दुसरे वाचन: प्रकटीकरण २१:१-५
     योहान आपल्याला झालेल्या प्रकटीकरणात म्हणतो की, त्याने ‘नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली’(२१:१). योहान सर्व काही बदललेले आहे आणि बदलत आहे हे पाहत होता. ‘पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी निघून गेली होती’ (२१:१); म्हणजे देवाने निर्माण केलेली पृथ्वी आणि आकाश ह्यात नूतनीकरण घडून येत आहे आणि ते ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने (२१:२) त्यात नूतनीकरण घडून आलेले आहे. देव आपली वस्ती त्यांच्याबरोबर करील, ते लोक त्याचे आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. लोकांच्या डोळ्यांतील अश्रू तो पुसून टाकील, ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत. कारण ख्रिस्ताने सर्व गोष्टी नवीन केल्या आहेत.
शुभवर्तमान: योहान १३:३१-३५
परमेश्वर इस्त्राएल लोकांस आज्ञा करतो की, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर” (अनुवाद ६:५). ह्याच आज्ञेला ख्रिस्त नवीन अर्थ प्राप्त करून देतो. शास्त्र्यांपैकी एका शास्त्रीने विचारलेल्या प्रश्नाला, “गुरुजी, नियमशास्त्रांतील कोणती आज्ञा मोठी आहे? (मत्तय २२:३६) उत्तर देत ख्रिस्त त्याला सांगतो, “तू आपला देव  परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर” (अनुवाद ६:५), ही पहिली आणि सर्वात मोठी आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, “तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखी प्रीती कर” (मत्तय २२:३९), (लेवीय १९:१८), “जशी तुम्हीं स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा” (मार्क १२:३१).
आजच्या उताऱ्यात ख्रिस्त आपल्या शिष्यांना उद्देशून म्हणतो की, “मी तुम्हांस नवी आज्ञा देतो की, तुम्हीं एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी”(योहान १३:३४), (१५:१२).
जुन्याकरारामध्ये लेवीय ह्या पुस्तकात “तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखी प्रीती कर” (लेवीय १९:१८), ही परमेश्वराने दिलेली आज्ञा आपणांस आढळते. ख्रिस्त इथे स्वतःने केलेल्या प्रीतीवर भर देतो व म्हणतो, “जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हींही एकमेकांवर प्रीती करावी”(योहान १३:३४), (१५:१२).
ख्रिस्ताची प्रीती ही सर्व श्रेष्ठ होती कारण त्याने इतरांवर मरणापर्यंत प्रीती केली. “आपल्या मित्रांकरीता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही” (योहान १५:१३) हे ख्रिस्ताने आपल्या मरणाद्वारे दाखवून दिले. ख्रिस्त अशाचप्रकारची प्रीती करण्यास आपल्या शिष्यांस सांगत आहे.
मनन चिंतन:
पहिली आज्ञा जी आपणांस परमेश्वरावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती करण्यास सांगते ती अपूर्ण होती. ह्याच आज्ञेला ख्रिस्त नवीन अर्थ प्राप्त करून देतो. शास्त्र्यांपैकी एका शास्त्रीने विचारलेल्या, “गुरुजी, नियमशास्त्रांतील कोणती आज्ञा मोठी आहे? (मत्तय २२:३६) ह्या प्रश्नाला उत्तर देत ख्रिस्त त्याला सांगतो, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर” (अनुवाद ६:५), ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, “तू आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखी प्रीती कर” (मत्तय २२:३९), वरील ख्रिस्ताने काढलेले उद्गार हे जुन्याकरारातील लेवीय ह्या पुस्तकात आढळतात (लेवीय १९:१८), “जशी तुम्हीं स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा” (मार्क १२:३१).
येशू ख्रिस्ताचा क्रूस आपणांस दोन दिशा दर्शवतो: १) देवाकडे जाणारी म्हणजेच वरील दिशा दर्शवते आणि २) सभोवतालील दिशा दर्शवते. ख्रिस्ताच्या हा क्रुस आपणांस चारही दिशा दर्शवतो: पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. पूर्व दिशा देवाकडे लक्ष केंद्रित करते, पश्चिम दिशा मी कुठे आहे हे दर्शवते आणि दक्षिण आणि उत्तर आपणांस आपला शेजारी कोण आहे हे दर्शवते.  
आज ख्रिस्त आपल्या शिष्यांना उद्देशून म्हणतो की, “मी तुम्हांस नवीन  आज्ञा देतो की, तुम्हीं एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हींही एकमेकांवर प्रीती करावी” (योहान १३:३४), (१५:१२). ख्रिस्त इथे स्वतःने केलेल्या प्रीतीवर भर देतो व म्हणतो, “जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हींही एकमेकांवर प्रीती करावी”(योहान १३:३४), (१५:१२).
ख्रिस्ताची प्रीती ही सर्व श्रेष्ठ होती कारण त्याने इतरांवर मरणापर्यंत प्रीती केली. “आपल्या मित्रांकरीता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही” (योहान १५:१३) हे ख्रिस्ताने आपल्या मरणाद्वारे दाखवून दिले. ख्रिस्त अशाचप्रकारची प्रीती करण्यास आपल्या शिष्यांस सांगत आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
आज ख्रिस्त आपणांस आपल्या देवावर, स्वतःवर आणि जसे स्वतःवर तसेच आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्यास सांगत आहे. प्रेम हे मोजक्या प्रमाणात नसाव तर जीवापाड, सखोलपणे, मुबलक, खूप आणि त्यागमय प्रेम करावे. मुक्यांना, बहिऱ्यांना, आंधळ्यांना आणि गोरगरीबांना प्रेमाची भाषा पटकन कळते. इतकेच नव्हे तर प्रेमासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी तत्पर असलो पाहिजेत.    

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, परस्परांवर प्रेम करण्यास आम्हांला तुझी प्रेरणा दे.

१) आपले परमगुरुस्वामीमहागुरुस्वामी व सर्व धार्मिक अधिका-यांनी त्यांच्या जीवनाद्वारे  व कार्याद्वारे प्रभूचा अनुभव प्रत्येक भाविकांपर्यंत पोहोचवावा व सर्वांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
२) जे निराश होऊन देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून यावे. त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे आणि आपल्या जीवनाचे सार्थक करावे म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
३) आपणा प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. प्रेम ही काळाची गरज आहे. आज आपली प्रीती सर्वांचे हीत साधणारी असावी. त्यात स्वार्थ व दुजाभाव नसावा. सर्वांबरोबर समेट, शांती आणि सलोखा असावा म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
४) आपल्या सर्व मिशनरी बंधू-भगिनींना त्यांचे कार्य जोमाने सुरू ठेऊन प्रभूची सुवार्ता जगाच्या कानाकोप-यात पसरविण्यास सामर्थ्य व कृपा लाभावी म्हणून आपण पुनरुत्थित ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
५) थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा प्रभूचरणी ठेऊया.



Tuesday, 12 April 2016



Reflection for the Homily of 4th Sunday of Easter (17/04/2016) By:Wicky Bhavigar.








पुनरुत्थान काळातील चौथा रविवार 
                         





दिनांक: १७/०४/२०१६.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १३:१४, ४३-५२.
दुसरे वाचन: प्रकटीकरण ७:९, १४ब-१७.
शुभवर्तमान: योहान १०: २७-३०.


           “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो.”




प्रस्तावना:
     आज आपण पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत.  आजच्या उपासनेचा मुख्य विषय आहे, “माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात.”
     आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पौल आपणास सार्वकालिक जीवनाची आठवण करून देतो की, अनेकवेळा आपणास देवाचे वचन ऐकने जमले पाहिजे जेणेकरून आपण पवित्र आत्म्याने पूर्ण होऊ. प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की, स्वर्गात उद्धार पावलेल्या साक्षात्कार राजासनामध्ये ‘मेंढपाळ येईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल. तर शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपणा सर्वांचा उत्तम मेंढपाळ व आपण त्याची मेंढरे आहोत ह्याची जाणीव करून देत आहे.
     प्रभू येशूला लोकांचा कळवला आला कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते बहकले होते. आपले सर्वांचे जीवन कृपेने भरलेले असावे असे प्रभूला वाटते, मात्र आपण त्याला आपण जीवनाचा मेंढपाळ म्हणून स्वीकारायला हवे. ह्यासाठी लागणारी कृपा व सामर्थ्य ह्या पवित्र मिस्साबलिदानात मागूया. 

सम्यक विवरण
पहिले वाचन: प्रेषिताची कृत्ये १३:१४, ४३-५२

      लोकांनी केलेल्या विनंतीनुसार पुढल्या शब्बाथ दिवशी बहुतेक सर्व शहर देवाचे वचन ऐकण्यास जमले. ते पाहून यहुदी लोकांना पौल व बर्नाबास यांचा हेवा वाटला. तेव्हा पौल व बर्नाबास निर्भीरपणे म्हणाले, देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगायचे अगत्य आहे. अशी आज्ञा आम्हास प्रभूने दिली आहे. ह्याची ते लोकांना शाश्वती करून देत आहेत. (जितके सार्वकालीक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला, आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरले. (४८-४९) आणि शिष्य मात्र आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.)

दुसरे वाचन: प्रकटीकरण ७:९, १४ब-१७ 

     प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण ऐकतो की, आपणास कधीही तहान भूक लागणार नाही किंवा सूर्याचा किंवा कसल्याही उष्णतेचा त्यांना ताप होणार नाही कारण सिहाजवळ असलेले कोकरू त्यांचा मेंढपाळ होईल. तो त्यांना जीवनदायी झऱ्यावर नेईल आणि देव त्याचा डोळ्यातील प्रत्येक अश्रु पुसून टाकील. याचा अर्थ काळाच्या अंती साकारणाऱ्या भावी जीवनात सर्व प्रकारच्या दु:खाचा पूर्णपणे परिहार होऊन सुखाचा सुकाळ होईल. हे सूचित केले आहे.

शुभवर्तमान: योहान १०:२७-३०

     जगातील एकमेव सत्य म्हणजे, येशू उत्तम मेंढपाळ आहे. येशू पुनरुत्थित झाला आहे. जो कोणी देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल हा संदेश प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये देत आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढराकरता आपला प्राण वेचतो. हे योहान शुभवर्तमानात आपणास आढळून येते. “पिता माझ्यावर प्रेम करतो. कारण मी माझा जीव अर्पण करण्यास तयार आहे. असा आदेश येशू ख्रिस्त एका मेंढपाळाच्या दाखल्याद्वारे आपणास सांगत आहे.
     मेंढपाळ आणि कळप ही जुन्या करारातील संकल्पना आहे. जुन्या करारातील स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये (अध्याय २३) देवाला मेंढपाळ म्हटलेले आहे. त्या काळी राजा स्वत:ला मेंढपाळ म्हणवून घेत असे. दुर्बलांचे रक्षण करणे हे त्याचे आद्य कर्तव्य होते. संदेष्टा इजिकीएल ह्याने खरा आणि खोट्या संदेष्टांचे केलेले वर्णन (अध्याय ३४) शुभवर्तमानकाराला विशेष भावले होते. त्याने येशूला ‘उत्तम मेंढपाळ’ म्हणून संबोधले आहे. ख्रिस्ती धर्माच्या प्रारंभीच्या काळात खांद्यावर कोकरू घेतलेले येशूचे चित्र खूप लोकप्रीय होते. चित्रकलेत आणि साहित्यात या प्रतिमेचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आढळतो.
     येशूने खऱ्या मेंढपाळाची लक्षणे सांगितली आहेत. ती अशी: खरा मेंढपाळ स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या कळपाचे रक्षण करतो. तो त्यांना कुरणात नेतो, त्यांचे मार्गदर्शन करतो, तो जखमी मेंढराच्या जखमा बांधतो. तो त्यांना विपुल जीवन देतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो त्यांच्यासाठी आपले प्राण वेचतो. हे सर्व येशूने केले आहे. कारण येशू हा तारणाचा एकमेव स्तोत्र आहे. व सार्वकालीक जीवन देणारा आहे. म्हणून पोप बेनेडीक्ट म्हणतात की, मेंढपाळ आणि कळप ह्याचे नाते जीव्हाळाचे असते. ते मालक आणि मालकीची वस्तू ह्या स्वरूपाचे नसून पालक व पाल्य किंवा पती आणि पत्नी या नात्यासारखे आहे. म्हणून येशू ख्रिस्त ह्या शुभवर्तमानात सांगत आहे, जो माणसाला ह्या सार्वकालीक जीवनाच्या गोष्टी पुरवतो, तोच त्याला विपुल जीवन देऊ शकतो. कारण मी आणि पिता एक आहोत (१०:३०).

बोधकथा:
देवाची वाणी’

एका कुटुंबामध्ये पती-पत्नी व एक मुलगी असा त्यांचा छोटासा परिवार होता. पत्नी फार गर्विष्ठ, कडक व कुणाचेही ती ऐकत नसे. देवाचेही ती ऐकत नसे. अनेक चुकीचे निर्णय ती घेत असे. पण तिला जाब विचारण्याची कुणालाही हिंमत झाली नाही. देवधर्म हा तिच्या आवडीचा विषय नव्हता. फक्त गरजेपुरताच ती देवाकडे धाव घेत असे. एके दिवशी आपला देवभिरू पती अचानक आजारी झाला व मरणाच्या खाटेला टेकला. आठ दिवस झाले तरी पतीच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही म्हणून तिने आपला मोर्चा देवाकडे वळवला. तिने देवाला वचन दिले की, मी आजपासून तुझे ऐकेन. पतीचे ऐकेन, तू सांगशील तसे करीन, परंतू माझ्या पतीला जीवदान दे. परमेश्वराने त्याला स्पर्श केला व तो बरा झाला. व तिचे कठीण हृदय मऊ झाले.

तात्पर्य: आपण कितीही देवाकडून दूर गेलो तरी तो आपल्याला ओळखतो. व त्याच्याप्रमाणे मेंढरासारखी मेंढपाळाची हाक ऐकण्यास आपणास बोलावीत असतो.  
  
मनन चिंतन:
    सामान्य जनांना योग्य मार्गदर्शन करणारा नेता मिळणे कठीण आहे. दु:ख, संकटे, आजार, चिंता, अपयश व निराशा आली असताना नक्की कुणाचा सल्ला घ्यावा हे सुचत नाही. अशा परिस्थितीत माणसे बहकून जातात व त्याची स्थिती मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी बनते. प्रभू येशू ख्रिस्त आपला उत्तम मेंढपाळ असून आपले संरक्षण करणारा, मार्ग दाखवणारा, व सांभाळकर्ता मुक्तिदाता आहे. आपण जीवनात बहकलेले असताना तो त्याच्या शिकवणूकीद्वारे योग्य-अयोग्य, सत्य-असत्य आणि चांगल्या-वाईटाची जाणीव करून देतो. पापरूपी अंधकारातून बाहेर काढून प्रभू येशू आपल्याला सत्याच्या प्रकाशात आणतो. त्याच्या वचनाद्वारे प्रभू आपल्याला दु:खात, संकटात, आजारात व निराशेत असताना आधार देतो व मार्गदर्शन करीत असतो.
     आजच्या शुभवर्तमानात आपण पाहिले आहे की, प्रभू येशूला लोकांचा कळवला आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते बहकलेले होते. आपल्या सर्वांचा प्रभूला कळवला येतो. आपले सर्वांचे जीवन कृपेने भरलेले असावे असे प्रभूला वाटते, मात्र आपण त्याला आपल्या जीवनाचा ‘मेंढपाळ म्हणून स्वीकारायला हवे. त्याच्या वचनावर विश्वास ठेऊन त्याच्या कृपेच्या राजासनाजवळ जायला हवे. यामुळेच तर पुनरुत्थानातील आजचा चौथा रविवार सार्वकालीक जीवन देण्याची शक्ती फक्त प्रभू ख्रिस्ताकडे आहे हे आपल्याला उत्तम मेंढपाळ व मेंढराच्या उदाहरणाद्वारे सिद्ध करतो. सर्व प्रकारच्या भीतीची, समस्यांची, बंधने दूर सारून जीवनदायी प्रभू सदासर्वदा देव पवित्र आत्म्याच्या सानिध्यात जगून या जीवनामध्येच खऱ्या सुख-शांती समाधानाचा अनुभव घेण्यासाठी आपणास बोलावीतो. म्हणून हे प्रभू येशू, तूच उत्तम मेंढपाळ आहेस, सन्मार्गावर चालण्यास व तुझी वाणी ऐकण्यास आम्हाला कृपा व शक्ती दे. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या मेंढरांना तुझे साहाय्य दे.                                                                                                         १.    ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्म-भगिनी  व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जो ख्रिस्त आपल्या सर्व मानवजातीच्या पापांसाठी मरण पावला व जिवंत होऊन सर्वाना नवजीवन दिले तो ख्रिस्त मेंढपाळ आपणाला अधिक पवित्र बनवण्यास धैर्य व शक्ती देवो म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
३. जी मेंढरे मेंढपाळाची वाणी ऐकत नाही आणि जी माणसे मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे बहकलेले आहेत. अशांना परमेश्वराच्या मदतीने सन्मार्गावर चालण्यास कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. जी कुटूंबे वेगळी झाली आहेत. जेथे प्रेम, शांती व दया नाही अशा कुटुंबात प्रेम, शांती व दया प्रस्थापित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. हे प्रभू येशू, तूच उत्तम मेंढपाळ आहेस. आज आपण इथे एकत्रीत जमलो असताना आपण स्वत:साठी न जगता इतरांसाठी जगावे व आपले जीवन कृपेने भरलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.



  




Tuesday, 5 April 2016


Reflection for the Homily of 3rd Sunday of Easter (10/04/2016) By: Valerian Patil. 




पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार



दिनांक: १०/०४/२०१६.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ५:२७-३२, ४०-४१.
दुसरे वाचन: प्रकटीकरण ५:११-१४.
शुभवर्तमान: योहान २१:१-१९.


‘तू माझ्यावर प्रीती करतोस काय?




प्रस्तावना:

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आज देऊळमाता पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजचे पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले आहे. प्रेषितांना जेव्हा धर्मसभेपुढे उभे करण्यात आले तेव्हा त्यांना येशूच्या नावाने शिक्षण देऊ नका अशी ताकीद देण्यात आली. परंतू प्रेषितांनी त्यांना उत्तर दिले की, ‘आम्ही येशूची सुवार्ता सर्व ठिकाणी पसरू कारण आम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहोत.’ प्रकटीकरण ह्या पुस्तकात आपण ऐकतो की, स्वर्गात, पृथ्वीवर, पाताळात व सागरात प्रत्येक सृष्ट प्राणी, सर्व वस्तुजात देवाची स्तुती गात आहेत.
आजच्या संत योहानलिखित शुभवर्तमानात, येशु पेत्राला तीन वेळा प्रश्न विचारतो की ‘तू माझ्यावर प्रीती करतोस काय? असे विचारून येशू पेत्राची परीक्षा पाहत नाही तर त्याला जबाबदारी सोपवतो. आजच्या ह्या मिस्साबलीत भाग घेत असताना आपल्या सर्व पापांची आठवण करून परमेश्वराकडे क्षमा मागूया व आपण आपल्या जबाबदाऱ्या नीट पाळल्या नसतील तर त्याची सुद्धा आठवण करून देवाकडे क्षमा मागूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ५:२७-३२, ४०-४१.

प्रेषितांना मारहाण करण्यात आली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले हि वस्तूस्थिती पाहता, न्यायसभेने या प्रश्नातून एक पळवाट काढली. जमाव्यात खळबळ माजवल्याचा धोका व भय टाळले असेच दिसते. अटक झालेल्या प्रेषितांची तुरुंगातून अदभूत प्रकारे सुटका होते. हे पाहून प्रेषित गोंधळून जाणे साहजिकच होते. पण तसे झाले नाही. ते डगमगले नाहीत; उलट येशूच्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरलो म्हणून त्यांनी आनंद केला. वधस्तंभावर येशूला ठार मारण्यात ज्याचा हात होता, अशांना दोषी ठरवण्यावर येथे भर दिलेला आहे. येशूच्या बाबबीत माणसांनी केलेला न्याय निवाडा देवाने फिरवला हे पुन्हा ठामपणे येथे सांगितले आहे.

दुसरे वाचन: प्रकटीकरण ५:११-१४.

येथे देवदूतांच्या प्रचंड मोठया समुदायाने उच्चस्वराने कोकऱ्याच्या स्तुतीचे वर्णन गीत गाण्यास आरंभ केला. या ईश स्तुतीवर गीतामध्ये ख्रिस्ताच्या राजवटीच्या प्रारंभी असलेले आशीर्वाद आणि सामर्थ्य याचा उल्लेख आहे. हे गीत देवाला उद्देशून गायिलेल्या गीतासारखे आहे. स्वर्ग, पुर्थ्वी, पृथ्वीच्याखाली आणि समुद्रावर असलेला प्रत्येक जीव व वस्तुजात अखेर देवदूतांच्या व आद्य देवदूताच्या सुरात आपलाही सूर मिसळून हे गीत गाऊ लागले. स्वर्गात चाललेल्या स्तुतीमधून कोकऱ्याने तारणाच्या राज्याचा आरंभ केल्याचा उत्सव साजरा होत आहे. तथापि संपूर्ण विश्वाकडून देवाची आणि कोकऱ्याची उपासना होते.

शुभवर्तमान: योहान २१:१-१९

 येशु समुद्राकाठी आपल्या शिष्यांना दर्शन देतो. येथे फक्त ७ शिष्यांचा उल्लेख केलेला आहे. परंतू यात काही प्रतीकात्मक अर्थ आहे असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. जब्दीच्या पुत्राचा नावाने उल्लेख नाही त्यामुळे त्यांच्यापैकी एकजण योहान या शुभवर्तमानाचा लेखक असल्याच्या मताला पुष्टीच मिळते हे लक्षात घ्यावे. मासे धरण्याचा हा प्रसंग व लूक ५:१-११ मधील, असाच प्रसंग या दोघांमध्ये काही मार्मिक साम्य समारात आहे. त्यांनी रात्रभर कष्ट केले पण पदरी जाळ्यात काहीच पडले नाही असे योहान सांगतो यात काही प्रतीकात्मक अर्थ असावा. तथापी, हा तपशील प्रत्यक्ष पाहणाऱ्याने स्मरणातून दिला असल्याची शक्यता अधिक आहे. परंतू तेथे एक आध्यात्मिक तत्व दिसून येते. येशूच्या उपस्थितीमुळे ही परिस्थिती समर्थ पालटली.
या वृत्तामध्ये प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगावे तसे अनेक स्पष्ट चित्रदशी तपशील आहेत. विशेषता जाळ्यात सापडलेल्या माशांचा मोठा घोळका, किनाऱ्यापासून मचवा होता तेथपर्यतचे अंतर, कोळशाचा विस्तव, त्यावर भाजत असलेली मासळी आणि आणखी काही मासे आणा हे येशूचे सांगणे इत्यादी. तसेच मिळालेले मासे मोजले तेव्हा ते पाहून लक्षात ठेवणारे कोणी तेथे होते म्हणूनच हा तपशील दिला आहे.
     पेत्रावर सोपवलेल्या तीन जबाबदाऱ्या मध्येही वेगळेपण आहेच. यामध्ये मेंढरे पाळणे, राखणे या संबधातील सर्वच कर्तव्याचा, जबाबदाऱ्याचा समावेश केला आहे. 

मनन चिंतन:

     मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका ही आज्ञा ऐकून त्याप्रमाणे करिपर्यंत शिष्यांनी येशूला ओळखले नव्हते, याचे मोठे नवल वाटते. तो कोण आहे ते त्यांना माहित नव्हते तर त्यांनी त्याचे सांगणे का ऐकले? त्यांच्या आज्ञेला प्रतिसाद का दिला? रात्रभर कष्ट करूनही जाळी रिकामीच राहिली म्हणून बहुधा ते अगदी निराश झाले होते. आता काहीही करून पाहण्यास ते तयार होते. पण जाळ्यात भरपूर मासे अडकले. व त्यांनी येशूला ओळखले. ‘मासळीचा चमत्कार’ हा प्रसंग लुकने आपल्या शुभवर्तमानाच्या प्रारंभी पाचव्या अध्यायात दिला आहे.
     पूर्वीचे पोप सोळावे बेनेडिक्ट ह्यांनी या प्रसंगाचे पुढील प्रमाणे स्पष्टीकरण केले आहे. पेत्राचे व येशूचे संभाषण. ग्रीक भाषेत fileo म्हणजे हळुवार प्रेम. परंतू ते सर्व समावेशक असतेच, असे नाही. Agapae म्हणजे बिनशर्त, परिपूर्ण आणि निर्व्याज प्रीती. (या ठिकाणी fileo साठी प्रेम आणि Agapae साठी प्रीती हे शब्द योजले आहेत. येशूने पेत्राला प्रथम विचारले की,  ‘पेत्र... तू माझ्यावर प्रीती करतो’? त्याने उत्तर दिले “मी आपणार प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” येशूने दुसऱ्यांदा पेत्राला प्रश्न केला, “माझ्यावर प्रीती करतोस काय ? पेत्राने उत्तर दिले, “होय प्रभुजी, मी आपल्यावर प्रेम करतो हे आपल्याला ठाऊक आहे.” पेत्र ‘प्रीती’ हा शब्द उच्चारू शकत नव्हता, कारण तसे करण्यात आपणा कमी पडलो आहोत त्याची जाणीव त्याला होती. क्रियापद बदलून येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले, माझ्यावर प्रेम करतोस का? त्याचा अर्थ, तर माझ्यावर निर्वाडा नाही, परंतू निदान मित्रासारखे प्रेम करतोस का? त्याने उत्तर दिले, “मी तुझ्यावर प्रेम करतो, हे आपण जाणता.”
     पेत्राने येशूला तीनदा नाकारले होते, तरीही पुनरुत्थानानंतर येशूने पेत्राला त्याच्या  प्रमादाची मुळीच आठवण करून दिली नाही. मात्र त्याने त्याच्याकडून त्रिवार प्रेमाचे वाचन घेतले. प्रेमासाठी त्यागाची फार गरज आहे. आणि हे प्रेम आपल्याला येशूद्वारे प्राप्त झाले आहे. प्रेम गर्विष्ठ नाही तर प्रेमामध्ये शांती, करुणा व नम्रता असते. देव आपल्यावर जीवापार प्रीती करतो. देव आपल्याला त्याच्यावर एक मनाने प्रीती करण्यासाठी निमंत्रित करीत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: दयावंत देवा, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप, कार्डीनल्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व सर्व प्रापंचिक लोकांना देव राज्याची सुवार्ता पसरविण्यास कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या सर्व मिशनरी बंधुभगीनींवर व त्यांच्या कार्यावर देवाचा आशीर्वाद असावा तसेच ज्यांना छळाला सामोरे जावे लागत आहे त्यांना देवाच्या मदतीचा हात मिळून मिशन कार्य चांगल्या प्रकारे पार पडावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्व राज्यकर्त्यांनी आपला स्वार्थ, भ्रष्टाचार व इतर सर्व वाईट मार्ग बाजूला ठेवून लोकांची निस्वार्थीपणे सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक देवापासून दूर गेले आहेत, जे अन्य धर्माकडे वळले आहेत व ज्यांचा देवावर विश्वास नाही अशा लोकांवर पुनरुत्थित प्रभू येशूची कृपा यावी व त्यांनी पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक आजारी, दु:खी, कष्टी व निराश आहेत तसेच जे बेकार तरुण तरुणी आहेत अश्या सर्वांना पुनरुत्थित प्रभू येशूने त्यांच्या अडचणीत सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.