Tuesday 5 April 2016


Reflection for the Homily of 3rd Sunday of Easter (10/04/2016) By: Valerian Patil. 




पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार



दिनांक: १०/०४/२०१६.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ५:२७-३२, ४०-४१.
दुसरे वाचन: प्रकटीकरण ५:११-१४.
शुभवर्तमान: योहान २१:१-१९.


‘तू माझ्यावर प्रीती करतोस काय?




प्रस्तावना:

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आज देऊळमाता पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजचे पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले आहे. प्रेषितांना जेव्हा धर्मसभेपुढे उभे करण्यात आले तेव्हा त्यांना येशूच्या नावाने शिक्षण देऊ नका अशी ताकीद देण्यात आली. परंतू प्रेषितांनी त्यांना उत्तर दिले की, ‘आम्ही येशूची सुवार्ता सर्व ठिकाणी पसरू कारण आम्ही त्या घटनेचे साक्षीदार आहोत.’ प्रकटीकरण ह्या पुस्तकात आपण ऐकतो की, स्वर्गात, पृथ्वीवर, पाताळात व सागरात प्रत्येक सृष्ट प्राणी, सर्व वस्तुजात देवाची स्तुती गात आहेत.
आजच्या संत योहानलिखित शुभवर्तमानात, येशु पेत्राला तीन वेळा प्रश्न विचारतो की ‘तू माझ्यावर प्रीती करतोस काय? असे विचारून येशू पेत्राची परीक्षा पाहत नाही तर त्याला जबाबदारी सोपवतो. आजच्या ह्या मिस्साबलीत भाग घेत असताना आपल्या सर्व पापांची आठवण करून परमेश्वराकडे क्षमा मागूया व आपण आपल्या जबाबदाऱ्या नीट पाळल्या नसतील तर त्याची सुद्धा आठवण करून देवाकडे क्षमा मागूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ५:२७-३२, ४०-४१.

प्रेषितांना मारहाण करण्यात आली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले हि वस्तूस्थिती पाहता, न्यायसभेने या प्रश्नातून एक पळवाट काढली. जमाव्यात खळबळ माजवल्याचा धोका व भय टाळले असेच दिसते. अटक झालेल्या प्रेषितांची तुरुंगातून अदभूत प्रकारे सुटका होते. हे पाहून प्रेषित गोंधळून जाणे साहजिकच होते. पण तसे झाले नाही. ते डगमगले नाहीत; उलट येशूच्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरलो म्हणून त्यांनी आनंद केला. वधस्तंभावर येशूला ठार मारण्यात ज्याचा हात होता, अशांना दोषी ठरवण्यावर येथे भर दिलेला आहे. येशूच्या बाबबीत माणसांनी केलेला न्याय निवाडा देवाने फिरवला हे पुन्हा ठामपणे येथे सांगितले आहे.

दुसरे वाचन: प्रकटीकरण ५:११-१४.

येथे देवदूतांच्या प्रचंड मोठया समुदायाने उच्चस्वराने कोकऱ्याच्या स्तुतीचे वर्णन गीत गाण्यास आरंभ केला. या ईश स्तुतीवर गीतामध्ये ख्रिस्ताच्या राजवटीच्या प्रारंभी असलेले आशीर्वाद आणि सामर्थ्य याचा उल्लेख आहे. हे गीत देवाला उद्देशून गायिलेल्या गीतासारखे आहे. स्वर्ग, पुर्थ्वी, पृथ्वीच्याखाली आणि समुद्रावर असलेला प्रत्येक जीव व वस्तुजात अखेर देवदूतांच्या व आद्य देवदूताच्या सुरात आपलाही सूर मिसळून हे गीत गाऊ लागले. स्वर्गात चाललेल्या स्तुतीमधून कोकऱ्याने तारणाच्या राज्याचा आरंभ केल्याचा उत्सव साजरा होत आहे. तथापि संपूर्ण विश्वाकडून देवाची आणि कोकऱ्याची उपासना होते.

शुभवर्तमान: योहान २१:१-१९

 येशु समुद्राकाठी आपल्या शिष्यांना दर्शन देतो. येथे फक्त ७ शिष्यांचा उल्लेख केलेला आहे. परंतू यात काही प्रतीकात्मक अर्थ आहे असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. जब्दीच्या पुत्राचा नावाने उल्लेख नाही त्यामुळे त्यांच्यापैकी एकजण योहान या शुभवर्तमानाचा लेखक असल्याच्या मताला पुष्टीच मिळते हे लक्षात घ्यावे. मासे धरण्याचा हा प्रसंग व लूक ५:१-११ मधील, असाच प्रसंग या दोघांमध्ये काही मार्मिक साम्य समारात आहे. त्यांनी रात्रभर कष्ट केले पण पदरी जाळ्यात काहीच पडले नाही असे योहान सांगतो यात काही प्रतीकात्मक अर्थ असावा. तथापी, हा तपशील प्रत्यक्ष पाहणाऱ्याने स्मरणातून दिला असल्याची शक्यता अधिक आहे. परंतू तेथे एक आध्यात्मिक तत्व दिसून येते. येशूच्या उपस्थितीमुळे ही परिस्थिती समर्थ पालटली.
या वृत्तामध्ये प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगावे तसे अनेक स्पष्ट चित्रदशी तपशील आहेत. विशेषता जाळ्यात सापडलेल्या माशांचा मोठा घोळका, किनाऱ्यापासून मचवा होता तेथपर्यतचे अंतर, कोळशाचा विस्तव, त्यावर भाजत असलेली मासळी आणि आणखी काही मासे आणा हे येशूचे सांगणे इत्यादी. तसेच मिळालेले मासे मोजले तेव्हा ते पाहून लक्षात ठेवणारे कोणी तेथे होते म्हणूनच हा तपशील दिला आहे.
     पेत्रावर सोपवलेल्या तीन जबाबदाऱ्या मध्येही वेगळेपण आहेच. यामध्ये मेंढरे पाळणे, राखणे या संबधातील सर्वच कर्तव्याचा, जबाबदाऱ्याचा समावेश केला आहे. 

मनन चिंतन:

     मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका ही आज्ञा ऐकून त्याप्रमाणे करिपर्यंत शिष्यांनी येशूला ओळखले नव्हते, याचे मोठे नवल वाटते. तो कोण आहे ते त्यांना माहित नव्हते तर त्यांनी त्याचे सांगणे का ऐकले? त्यांच्या आज्ञेला प्रतिसाद का दिला? रात्रभर कष्ट करूनही जाळी रिकामीच राहिली म्हणून बहुधा ते अगदी निराश झाले होते. आता काहीही करून पाहण्यास ते तयार होते. पण जाळ्यात भरपूर मासे अडकले. व त्यांनी येशूला ओळखले. ‘मासळीचा चमत्कार’ हा प्रसंग लुकने आपल्या शुभवर्तमानाच्या प्रारंभी पाचव्या अध्यायात दिला आहे.
     पूर्वीचे पोप सोळावे बेनेडिक्ट ह्यांनी या प्रसंगाचे पुढील प्रमाणे स्पष्टीकरण केले आहे. पेत्राचे व येशूचे संभाषण. ग्रीक भाषेत fileo म्हणजे हळुवार प्रेम. परंतू ते सर्व समावेशक असतेच, असे नाही. Agapae म्हणजे बिनशर्त, परिपूर्ण आणि निर्व्याज प्रीती. (या ठिकाणी fileo साठी प्रेम आणि Agapae साठी प्रीती हे शब्द योजले आहेत. येशूने पेत्राला प्रथम विचारले की,  ‘पेत्र... तू माझ्यावर प्रीती करतो’? त्याने उत्तर दिले “मी आपणार प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे.” येशूने दुसऱ्यांदा पेत्राला प्रश्न केला, “माझ्यावर प्रीती करतोस काय ? पेत्राने उत्तर दिले, “होय प्रभुजी, मी आपल्यावर प्रेम करतो हे आपल्याला ठाऊक आहे.” पेत्र ‘प्रीती’ हा शब्द उच्चारू शकत नव्हता, कारण तसे करण्यात आपणा कमी पडलो आहोत त्याची जाणीव त्याला होती. क्रियापद बदलून येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले, माझ्यावर प्रेम करतोस का? त्याचा अर्थ, तर माझ्यावर निर्वाडा नाही, परंतू निदान मित्रासारखे प्रेम करतोस का? त्याने उत्तर दिले, “मी तुझ्यावर प्रेम करतो, हे आपण जाणता.”
     पेत्राने येशूला तीनदा नाकारले होते, तरीही पुनरुत्थानानंतर येशूने पेत्राला त्याच्या  प्रमादाची मुळीच आठवण करून दिली नाही. मात्र त्याने त्याच्याकडून त्रिवार प्रेमाचे वाचन घेतले. प्रेमासाठी त्यागाची फार गरज आहे. आणि हे प्रेम आपल्याला येशूद्वारे प्राप्त झाले आहे. प्रेम गर्विष्ठ नाही तर प्रेमामध्ये शांती, करुणा व नम्रता असते. देव आपल्यावर जीवापार प्रीती करतो. देव आपल्याला त्याच्यावर एक मनाने प्रीती करण्यासाठी निमंत्रित करीत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: दयावंत देवा, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप, कार्डीनल्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व सर्व प्रापंचिक लोकांना देव राज्याची सुवार्ता पसरविण्यास कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या सर्व मिशनरी बंधुभगीनींवर व त्यांच्या कार्यावर देवाचा आशीर्वाद असावा तसेच ज्यांना छळाला सामोरे जावे लागत आहे त्यांना देवाच्या मदतीचा हात मिळून मिशन कार्य चांगल्या प्रकारे पार पडावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्व राज्यकर्त्यांनी आपला स्वार्थ, भ्रष्टाचार व इतर सर्व वाईट मार्ग बाजूला ठेवून लोकांची निस्वार्थीपणे सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक देवापासून दूर गेले आहेत, जे अन्य धर्माकडे वळले आहेत व ज्यांचा देवावर विश्वास नाही अशा लोकांवर पुनरुत्थित प्रभू येशूची कृपा यावी व त्यांनी पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक आजारी, दु:खी, कष्टी व निराश आहेत तसेच जे बेकार तरुण तरुणी आहेत अश्या सर्वांना पुनरुत्थित प्रभू येशूने त्यांच्या अडचणीत सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment