(01-08-2018) by: Br Robby Fernandez
सामान्य काळातील तेरावा रविवार
मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे
दिनांक
– १-८-२०१८
पहिले
वाचन – ज्ञानग्रंथ :- १:१३-१५; २:२३-२४
दुसरे
वाचन - कारीथकरांस दुसरे पत्र :- ८:७.९.१३-१५
शुभवर्तमान
- मार्क :- ५:२१-४३
प्रस्तावना
आज आपण सामान्य काळातील तेरावा रविवार साजरा
करीत आहोत. आजची उपासना आम्हांस मरण, स्पर्श, आणि विश्वासाची जाणीव करून देत आहे.
आजच्या वाचनामधून आपल्याला समजते कि, देव हा सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा-जेव्हा मानव
परमेश्वरापासून दूर गेला, तेव्हा-तेव्हा देवाने मानवाला पुन्हा त्याच्या जवळ आणले
आहे. अनेक प्रकारच्या संकटातून, अडीअडचणीतून देवाने मानवाचा बचाव केला. त्याला
आपल्या करुणेचा व मायेचा स्पर्श केला. आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानात आम्हास दोन
दाखले दिलेले आहेत. दोन्ही दाखल्यामध्ये विश्वासाला प्रथम प्राधान्य दिले आहे,
म्हणूनच आपल्याला शुभवर्तमानामध्ये असे दिसून येते कि, ह्याच विश्वासामुळे त्या
दोन्ही व्यक्ती बऱ्या होतात.
आपल्या ही जीवनात विश्वासाची नितांत गरज
आहे. व तो विश्वास टिकवून ठेवण्यासाठी प्रभूच्या स्पर्शाची गरज आहे. ह्या मिस्साबलीत
सहभागी होत असताना, आपण प्रभूकडे विश्वासाची याचना करूया आणि त्याच्या कृपेचा
वर्षाव आम्हावर व्हावा म्हणून प्रार्थना करूया.
सम्यक
विवरण
पहिले
वाचन - न्यानग्रंथ :-१:१३-१५; २:२३-२४
आजचे पहिले वाचन आपल्याला मरणाकडे नव्या दृष्टीकोनातून
पाहायला बोलावत आहे. मरण हे परमेश्वराने निर्माण केले नाही, तर ते माणसाच्या वाईट
कर्मा मुळे या जगामध्ये आले. परमेश्वराने माणसाला त्याच्या प्रती रुपा प्रमाणे बनविले, पण माणूस हा स्वःताच्या स्वार्थापायी
त्याने स्वःताचे स्वतंत्र गमावले. आणि त्या मुळे सर्वांना मरणाचा अनुभव घ्यावा
लागला.
दुसरे
वाचन - करीथकरांस दुसरे पत्र :- ८:७.९.१३-१५
संत पौल आपणा सर्वांना वाचनातून दानशूर
होण्यास पाचारण करत आहे. कारण ज्या परमेश्वराने सर्व काही निर्माण केले व तो धनवान
असूनही आम्हासाठी गरीब झाला, अशा हेतूने कि आम्ही सर्व धनवान होऊ.
शुभवर्तमान
- मार्क :- ५:२१-४३
आजच्या
शुभवर्तमानातून मार्क दोन व्यक्तीची प्रतिमा आपल्या समोर मांडत आहे. एक म्हणजे ‘याईर अधिकारी’ व दुसरी म्हणजे ‘रक्तत्स्रावी
स्त्री’. ह्या दोन व्यक्तीच्या विश्वासाची प्रचिती दिसून येते. ह्या विश्वासामुळे
त्यांना जे हव होतं ते परमेश्वराने बहाल केले. याईरची मुलगी मरण पावली तेव्हा येशू
त्याला म्हणाला, “भिऊ नकोस, विश्वास धर”. त्याच विश्वासापायी त्याच्या मुलीला नवजीवन
मिळाले, तसेच त्या स्त्रीचा विश्वास सुद्धा खूप प्रबळ व सखोल असा होता, जेव्हा
तिने येशूच्या कपड्यांना स्पर्श केला, लागलीच ती बरी झाली आणि सगळ्यानां तिने येशू
विषयी साक्ष दिली. या दोन्ही व्यक्ती आपणा सर्वांना एक नवीन आशेचा किरण दाखवतात,
आपल्या जीवनामध्ये कितीही अडी-अडचणी आल्या तरी आपला विश्वास दृढ असायला पाहिजे.
बोधकथा
हि
एक सत्य घटना आहे. जी मुंबई मध्ये घडलेली होती. एका तरुण मुलगा असतो. त्याचे नाव
दिनेश असते. तो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असतो. अभ्यासामध्ये खूप हुशार.
तसेच तो ख्रिस्ती कुटुंबामध्ये वाढलेला असतो. पण त्याचा परमेश्वरावर अजिबात
विश्वास नसतो. त्याचे आईवडील त्याला चर्च मध्ये जायला सांगायचे पण तो काही त्यांचे
ऐकत नव्हता. एकदा कॉलेज मध्ये असताना तो जमिनीवर कोसळला. शिक्षकांनी त्याला
हॉस्पिटल मध्ये हलवले, व त्याच्या आईवडिलांना कळवले. त्याचे आईवडील खूप चिंतेत
होते. पण ह्या सर्वांचा परिणाम त्या मुलावर काहीही झाला नाही.
आईवडिलांनी
जेव्हा डॉक्टरकडे विचारले तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले कि, दिनेशला ब्रेन ट्युमर
असल्याने त्याला असे होत आहे. तर लवकरच त्याचे ऑपरेशन नाही केले तर मुलगा दगावू
शकतो. दिनेशच्या आईवडीलांच्या हृदयावर
दुखाचा डोंगरच कोसळला. त्यांनी काय करावे ते त्यांना समजत नव्हते. ऑपरेशनसाठी पैसे
गोळा केले. ऑपरेशन होऊन सुद्धा तो ट्युमर तसाच होता. त्यांनी मुंबई येथील ताबोर या
ठिकाणी जायचे ठरवले. आणि दुसऱ्या दिवशी ते ताबोरला प्रार्थना सेंटरवर गेले व त्या
ठिकाणी दोन तीन दिवस राहिले. जेव्हा प्रार्थना चालू होती तेव्हा फादरांनी सागितले
कि, परमेश्वर एका तरुणाचा ब्रेन ट्युमर बरा करत आहे, पण त्यासाठी त्याने त्याचा
विश्वास दृढ करायला हवा. जेव्हा दिनेश व त्याचे आईवडील ताबोर वरून आले तेव्हा
त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांजवळ जाऊन चौकशी केली पण त्याचा काहीही उयोग झाला नाही
तो ट्युमर तसाच होता. तेव्हा त्याच्या आईला त्या फादारांचे शब्द आठवतात, तेव्हा ती
आई तिच्या मुलाकडे जाऊन सांगते कि, जर तू परमेश्वरावर विश्वास दृढ नाही केला तर
तुझा हा ट्युमर बरा होऊ शकत नाही. तेव्हा त्या दिनेशला त्याच्या कृतीचा खूप
पश्चाताप झाला. व त्याने त्याच्या आईला जोराने मिठी मारून रडू लागला. व तो बोलला होय
मी विश्वास ठेवितो. थोड्या वेळा नंतर त्याला
ऑपरेशन साठी पुन्हा ऑपरेशन थेटर मध्ये नेले तेव्हा काय चमत्कार झाला, त्या मुलाला
असलेला तो ट्युमर त्या ठिकाणी नव्हताच. हे सर्व पाहून डॉक्टराना विश्वास बसत
नव्हता. हे सर्व घडले कारण त्याच्या विश्वासामुळे आणि याच विश्वासाने त्याला
मरणाच्या दारातून ओढून आणून नवीन जीवन दान दिले.
मनन चिंतन
“नीतिमान
जगे विश्वासाने स्वर्ग त्या मिळे. म्हणून जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत आपला
विश्वास असायला हवा.”
आजच्या ह्या आधुनिक युगात आपण एवढे गुरफटून
गेले आहोत की, आपल्याला दुसऱ्याचा नव्हेच, पण स्वतःचा
विचार देखील करायला वेळ नाही. अशा वेळी आपण सर्वजण एकच विचार करतो की, कमी वेळात जास्त कसे मिळवावे किंवा सर्वकाही आपल्याला जलद कसे मिळेल यावर
आपला केंद्र बिंदू असतो. जेव्हा परमेश्वरावर श्रद्धा ठेवण्याची वेळ येते तेव्हा
सुद्धा आपणाला सर्वकाही जलद हवे असते. जो पर्यंत परमेश्वर चमत्कार करत नाही
तोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही. गावात अशी म्हणायची प्रथा आहे कि, “जोपर्यंत चमत्कार होत नाही तोपर्यंत आपण नमस्कार करत नाही.’ परमेश्वराला
आपण ATM प्रमाणे मानले असते. आपण आपल्या स्वार्थासाठी त्याचा
पुरेपूर उपयोग करत असतो. आपण सर्वजण दुःखाचा, कष्टाचा,
पापांचा व मरणाचा अनुभव ह्या दैनंदिन जीवनात घेत असतो. आपणा
सर्वांना ठाऊक आहे की, परमेश्वर हा दयाळू व कृपाळू आहे. जरी
आपण त्याला अन्य दृष्टीकोनातून पाहीले, तरी तो आपल्याला
त्याच्या बालकाप्रमाणे पाहत असतो. ह्या जीवनात दुःख, कष्ट व
मरण ह्याच अनुभव येतो कारण माणूस परमेश्वरा विरुद्ध गेला, त्यामुळे मरणाने प्रवेश
केला. शलमोनाचा ज्ञानग्रंथ २:२३-२४ मध्ये असे नमूद केले आहे की,
“देवाने मानवाला अविनाशी असे निर्माण केले
आणि त्याला शाश्वत प्रतीरुपाप्रमाणे बनवले; पण सैतानाच्या
द्वेषामुळे मरणाने जगात प्रवेश केला आणि त्याच्या पक्षाच्या असणाऱ्या साऱ्यांना
मरणाचा अनुभव येतो.”
या मरणावर विजय मिळवण्यासाठी येशूने स्वतःचे बलिदान दिले व सैतानाच्या
मोहातून सुटका करून दिली व आम्हाला सर्वांना नवजीवन प्राप्त करून दिले.
आजचे वाचन हे
मार्क ह्या शुभवर्तमानातील असून याला “ मार्कन सेंडविच” म्हणून हा उतारा प्रसिद्ध
आहे. आता हे “मार्कन सेंडविच” म्हणजे काय? बायबलच्या उताऱ्यामध्ये दुसरी घटना,
पहिल्या घटनेला व्यत्यय आणते व त्यानंतर पहिल्या घटनेचा किंवा गोष्टीचा अंत होतो, यालाच
म्हणतात “मार्कन सेंडविच”. शुभवर्तमनामध्ये येशू चमत्कार करताना दिसत आहे;
त्यामुळे त्याच्या अवती-भवती गर्दी जमलेली दिसते. हे लोक त्याला पाहण्यासाठीच
नव्हे, तर त्याच्या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी आले होते. कारण तो त्यांना एका
अदभूत माणसासारखा दिसत होता. त्यामुळे लोकं त्याच्या जवळ आकर्षिली किंवा खेचली
जायची, त्यामळे येशू ख्रिस्त खूप लोकप्रिय झाला होता. जर आपण त्याच्या जीवनावर
दृष्टीकोन टाकला तर त्याच्या जीवना मध्ये
तीन P’S आढळतात. १) preaching (प्रचार) 2)power (शक्ती) 3)parables(दृष्टांत) ह्या
तीन गोष्टीमुळे लोकांचा झुंडी त्याच्या मागे जायच्या. त्याच्या ह्या मधुर वाणीमुळे
लोकांना त्याची आस वाटायची. त्याच्या त्या अधिकारयुक्त शब्दापुढे सैतानी शक्ती
सुद्धा नतमस्तक व्हायची. तो लोकांना बरे करायचा, त्याने सागितलेल्या सर्व
दृष्टातामुळे लोक भारावून जायचे.
आजच्या
वाचनामध्ये सुद्धा त्याच प्रकारचे वातावरण पाहायला मिळते. येशू ख्रिस्त दोन
व्यक्तींना बरे करतो. पहिली म्हणजे याईराची कन्या आणि दुसरी म्हणजे रक्तस्त्राव झालेली स्त्री. जर ह्या दोन्ही
व्यक्तीची तुलना एकमेकाशी केली तर असे दिसून येते कि, याईर हा नामवंत अधिकारी होता
पण त्या स्त्रीचा काहीही दर्जा समाजामध्ये नव्हता. एक बाजूला तो खूप श्रीमंत होता
तर दुसरीकडे हि स्त्री आर्थिक दृष्ट्या दुर्बलझाली होती. तसेच यहुदी धर्माच्या
परंपरे प्रमाणे ती एक अशुद्ध स्त्री होती. जर तिने कोणाला शिवले तर ते अशुद्ध होत
असे. याईर हा मोठा अधिकारी असला तरी त्याने येशू पुढे स्वतःच्या कन्येसाठी भिक
मागितली, व त्याच्या पाया पडून त्याने विनंती केली. जेव्हा हि स्त्री तिच्या
रोगातून बरी झाली तेव्हा तिने सुद्धा येशूच्या पाया पडून त्याला व जमलेल्या सर्व
लोकांना त्या ठिकाणी घडलेली घटना सांगितली. अशा प्रकारे आपल्याला दिसून येते कि,
येशू ख्रिस्त हा देव आहे. त्याचे सामर्थ्य रोगावरच नव्हे, तर मरणावर सुद्धा आहे;
म्हणून तो याईरच्या मुलीला मरणाच्या दाढेतून उठवतो, व नवजीवन बहाल करतो. असे
म्हणतात कि, ‘निद्रा हे तात्पुरते मरण आहे
व मरण हे कायमस्वरुपाची झोप आहे.’ ह्याच कायमस्वरूपी निद्रावर, त्याने कायमस्वरूपी
विजय मिळवून आम्हाला अजिंक्याचे दिवस पाहण्यास भाग्य दिले आहे.
परमेश्वर त्याच्या
चमत्कारी स्पर्शाने आपल्याला नविन रूप देतो. हे नविन रूप त्याने याईराच्या कन्येला
व स्त्रीला बहाल केले. ह्या ठिकाणी दोन चमत्कारी स्पर्श आढळतो. दैवी स्पर्श व
मानवी स्पर्श. दैवी स्पर्श- या ठिकाणी खुद्ध परमेश्वर आपणाला भेटायला येतो,
उदाहरणार्थ- ‘याईराची कन्या’ व मानवी स्पर्श- या ठिकाणी आपण परमेश्वरा जवळ जातो,
उदाहरण म्हणजे-‘रक्तस्त्राव स्त्री’. विश्वास हा आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाया
असला पाहिजे, आपण फक्त चमत्कारावर न अवलंबून राहता, आपला विश्वास दृढ करणे फार
गरजेचे आहे. तर देऊळमाता आपल्याला आवर्जून सांगत आहे कि, चमत्कार पाहून नमस्कार
करण्यापेक्षा विश्वास वाढवून चमत्कार अनुभवूया! म्हणून जेव्हा आम्ही परमेश्वरावर खरा विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला त्याच्या प्रेमाची, दयेची अनुभूती येते.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे
सामर्थ्यशाली प्रभू आमचा विश्वास मजबूत कर.
1.
आपले परमगुरु
फ्रान्सीस, महागुरू, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी यांना देवाचे काम करण्यासाठी विपुल असा आशीर्वाद
मिळवा. ते जे निस्वार्थी काम करतात त्यांच्या त्या कामामध्ये परमेश्वराचे सहाय्य लाभावे व त्यांनी
त्याच्या कार्य द्वारे सर्व ख्रिस्ती लोकांना देवाकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
2.
आपल्या सर्व राजकीय
नेत्यांनी आपला राजकीय धूर्तपणा सोडून निस्वार्थीपणे लोकांची व देशाची सेवा करावी, म्हणून आपण प्रार्थना
करूया.
3.
जे आजारी आहेत अश्या
सर्वांना सदृढ, शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे व त्यांचे सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
4.
जे कोणी देवापासून
दूर गेले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करूया, जेणेकरून त्यांनी मागे वळून
परत एकदा सामर्थ्यशाली येशूला आपला देव म्हणून स्वीकारावे व आपले संपूर्ण जीवन प्रभूची
सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
5.
आपण आपल्या वैयक्तिक
गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करूया.