Thursday, 21 June 2018


Reflections for the homily of Solemnity of John the Baptist 
(24-06-2018) by: Br Jackson Nato.




कारण प्रभू त्याच्याबरोबर होता







योहान बाप्तिस्तचा जन्मदिन

दिनांक : २४-०६-२०१८
पहिले वाचन : यशया:- ४९:१-६
दुसरे वाचन : प्रेषिताची कृत्ये:- १३:२३-२६
शुभवर्तमान : लुक:- १:५७-६६,८०

प्रस्तावना

     ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण योहान बाप्तीस्ता ह्याचा जन्म दिन साजरा करत आहोत. योहान हा बायबल मधील शेवटचा संदेष्टा. त्याने आपले संपूर्ण जीवन देवराज्याच्या तयारीसाठी समर्पित केले. साधेपणा, नम्रता व सत्याशी एकनिष्ठता, ह्या गुणाद्वारे तो देवाशी विश्वासू राहिला.
     आजची तिन्ही वाचने आपल्याला योहानाची विशेष ओळख करून देतात. पहिल्या वाचनात यशया संदेष्टा योहानाचा जन्म व त्याचे कार्य ह्याबद्दल भाकीत करतो. दुसरे वाचन आपल्याला परमेश्वराने योहानाद्वारे पाठविलेल्या तारणाबदल माहिती करून देते. तसेच शुभवर्तमान योहानाच्या रहस्यमय जन्माबद्दल आपल्याला सागत आहे.
     योहान हा देवभिरू होता. देवासाठी जगणे हे त्याचे आद्य ध्येय होते आणि त्यासाठी तो प्राणास मुकला. ह्या मिस्साबलिदानात भाग घेत असताना आपण देवाशी अधिकाधिक विश्वासू होण्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन : यशया:- ४९:१-६

     हा उतारा आपल्याला देवाचा सेवक कोण असेल व त्याचे कार्य काय असेल ह्याविषयी स्पष्टपणे सांगत आहे. इतिहासात जर आपण पहिले तर इस्त्राईल जनता परकीय राष्ट्राच्या छळाला बळी पडली. त्यांच्या जीवनाचा केंद्र बिंदू म्हणजे मंदिरपडले गेले. त्यांना बाबिलोन देशात गुलाम म्हणून नेले. अशा परिस्थितीत आपला समूळ नायनाट होईल काय, ह्या विचाराने इस्त्राईल जनता ग्रासली आहे. अशावेळी यशया संदेष्टा त्यांना त्याच्या आशेचा किरण दाखवतो. त्यांचे दुख यातना, गुलामिगिरी हा फक्त मर्यादित आहे, कारण परमेश्वर त्यांच्यामध्ये एक संदेष्टा पाठवील. त्याची ओळख म्हणजे त्याचे मंदिर तो पुन्हा उभारिल, त्यांनी हरवलेली प्रतिष्ठा तो पुनस्थापित करील, आणि हे तारण फक्त इस्त्राईल पुरतेच नव्हे तर दिगंतापर्यंत पसरविल. म्हणजेच परमेश्वराच्या तारणात संपूर्ण जगाचा समावेश असेल.

दुसरे वाचन : प्रेषिताची कृत्ये:- १३:२३-२६

     ह्या उताऱ्यात संत पौल, देवाचे भय बाळगणाऱ्यांना उदेशून सांगतो कि, आपल्याला तारणाची वार्ता पाठवलेली आहे. तो ह्या उताऱ्यात योहानाविषयी सांगतो कि, योहानाने स्वताः त्याची साक्ष दिली. योहान हा एक प्रतीचीत संदेष्टा लोकनी जवळून पहिला होता. त्याने लोकांना बाप्तिस्मा दिला. त्याकाळात बाप्तिस्मा घेणे म्हणजे, यहुदी धर्म व त्याद्वारे याहावेहाच देव आहे, असे मत अंगीकारने. पण योहानाने हो घोषणा इस्त्राईल लोकांमध्येसुधा केली म्हणजे जरी ते निवडलेल्या लोकांचे वंशज असले तरीसुद्धा त्यांनी परिवर्तन करून स्वतःला निवडलेले असे पुनर्घोषित करावे. इथे संत पौल एकाच गोष्टीचे तुणतुणे वाजवतो ती म्हणजे येशूहा ख्रिस्त आहे आणि त्याची साक्ष योहानाने दिली आहे. आणि जर योहानास आपण खऱ्या देवाचा संदेष्टा मानत असू तर त्याच्या मुखातून येणारे शब्द सुद्धा खरे मानण्यास आपण संकोचू नये.    

शुभवर्तमान : लुक:- १:५७-६६,८०

     ह्या उताऱ्यात लुक आपणास योहानाचा जन्म कथित करत आहे, पण ह्या उताऱ्याचा प्रमुख मुद्दा असा कि देव तारण कार्यास स्वताः सुरुवात करणार आहे आणि ती सुद्धा आपणामध्ये उपस्थित राहून करणार आहे. आणि ह्या तारणात आपणास सहभागी व्हायचे असेल तर आपण पश्चाताप करायला हवा. योहानाचा जन्म रहस्यमयरीत्या झाला. त्याच्या जन्माद्वारे त्याच्या आईवडिलांना आनंद प्राप्त झाला. मग त्याच्या कार्याने तो परमेश्वराच्या आगमनाच्या तयारीची भूमिका बजावणार होता.

मनन चिंतन

     मजकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे, म्हणून मी तुला प्रकाश असे नेमितो.”(यशया:४९:६)
     परमेश्वराने ह्या सृष्टीची निमिती केली आणि सर्व वस्तूवर व जीवांवर मनुष्याचे वर्चस्व प्रस्थापित केले. आदाम व हव्वा ह्या दोन व्यक्तीस त्याने सर्व सजीव व अजीव गोष्टीवर अधिकार दिला. कारण ते देवास प्रिय होते. देव त्याच्याबरोबर, त्याच्यामध्ये होता. सर्व काही सुरळीत होते. पण ह्या सुखाचे दिवस काही कालावधीपुरतेच उरले; कारण परमेश्वराने निषिद्ध केलेल्या झाडाचे फळ त्यांनी खाल्ले. देवाच्या आज्ञेचा भंग केला व जगात पाप अवतरले. देव आणि मानवामध्ये दुरावा निर्माण झाला. परमेश्वराने मानवास जवळ आणण्यासाठी वेगवेगळी युक्त्या चालविल्या पण मनुष्य मात्र पापाच्या जाळ्यात अधिकाधिक अडकला गेला. परंतु संपूर्ण जगाचे तारण व्हावे म्हणून परमपित्याने एक योजना आखली व काळाच्या पूर्ततेनंतर येणाऱ्या प्रत्येक पिढीने तारणाचे फळ चोखावे यासाठी योहान बाप्तीस्त्यास बोलाविले.
     आज आपण योहानाचा जन्म दिन साजरा करत आहोत. ख्रिस्ताच्या जन्माने नवीन पर्वाला सुरुवात झाली. पण ह्या पर्वाची पूर्व तयारी करण्यासाठी परमेश्वराने योहानाला निवडिले. योहान हा ख्रिस्ताचा सुकून होता. ख्रिस्त देवराज्य घोषित करणार आहे, त्या अगोदर लोकांना त्याबद्दल जाणीव व्हावी, हे गरजेचे होते. ख्रिस्त ज्यासाठी ते अनेक वर्षे थांबले होते, त्यास स्वीकारण्यास इस्रायेल जनता पात्र असावी म्हणून योहान बाप्तीस्मा देत सर्व ठिकाणी फिरला. पश्चाताप करा आणि देवाकडे वळाहा संदेश त्याने गळा फोडून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा पर्यंत केला.     
     योहानाच्या जीवनावर जर आपण प्रकाश टाकला तर देव किती दयाळू व कनवाळू आहे हे आपल्याला कळून चुकते. खुद्ध योहानह्या नावाचा अर्थ म्हणजे कृपा किंवा द्या. योहानाच्या नावातच परमेश्वराची द्या आपल्याला पाहण्यास मिळते. त्याच्या जन्माने परमेश्वराने त्यांच्या आईवडिलांवर नव्हे तर संपूर्ण जगावर दया केली. आजच्या शुभवर्तमानावर जर आपण नजर फिरविली तर आपल्यला समजतें कि, योहान हा त्याच्या आईवडिलांना त्यांच्या उतारवयात झालेला मुलगा. योहानाची आई अलिशिबा हिला समाजाने वांझ म्हणून ओळखले. यहुदी समाजात वांझपण हे फक्त शारीरिक दोष नव्हे तर पूर्वजाच्या किंवा स्वतःच्या पापामुळे मिळालेला एक शाप. आणि त्यामुळे तिला लोकांपासून होणाऱ्या निंदेला सामोरे जावे लागले. पण त्या टीकेची परमेश्वराने जाणीव घेतली. व उतारवयात आई होण्याचे भाग्य तिच्या पदरात पडले. समाजाने लावलेला शापित ठसा पुसून काढला. लुक १:४८ परमेश्वराने आपल्या दासीच्या दैन्यावस्तेचे अवलोकन केले.हे वचन तिच्या जीवनात पूर्णत्वास आणले. योहान ह्या नावामुळे त्याचा पिता जखाऱ्या ह्याची मुखी वाचा उघडली.
     परमेश्वराची दया फक्त योहानाच्या कुटुंबांपुरती मर्यादित नव्हती. तर येणाऱ्या प्रत्येकाला संपूर्ण जगासाठी दयेची दारे उघडी होणार होती. आदम व हव्वाच्या पापामुळे परमेश्वर मनुष्यापासून दूर गेला. तेव्हापासून मनुष्य पापाच्या कचाट्यात सापडला होता. हे दुरावलेले नाते पुन्हा एकदा जुळावे म्हणून परमेश्वराने खुद्ध आपला पुत्र ह्या जगात पाठविण्याचे ठरविले. परमेश्वर आपल्या जवळ येणार आपल्या मध्ये राहणार त्यासाठी पापाची घाण साफ करावी. कारण देव आपल्या घरी येणार आहे. त्याला स्विकारण्यास आपली हृदये तयार असावी म्हणून योहान लोकांना बाप्तिस्मा देत जागोजागी फिरला.
     योहानाच्या जीवनातील महत्वाचा पैलू म्हणजे तुरुंगात असताना त्याच्या मनात संशयाने प्रवेश केला. जो बाहेर देवाच्या नावाने चमत्कार, सत्कृते करत आहे तो नक्कीच मसीहा आहे ना? आपण ज्याला बाप्तिस्मा दिला तो ख्रिस्तच आहे ना? ह्या संशायाशी दोन हात करत असताना तो आपला विश्वास गमावून बसला नाही उलट शिष्यांना पाठवून तो खरोखरच ख्रिस्त आहे अशी चौकशी करून तो अधिक दृढ केला.
     आपले दैनंदिन जीवनावर जर आपण मनन चिंतन केले तर ते योहानापेक्षा काही आगळेवेगळे नाही. अलीशिबेप्रमाणे आपण सुद्धा समाजाच्या निंदेला विनाकारण बळी पडतो. आदम आणि हव्वाप्रमाणे पापासमोर गुडघे टेकतो. योहानाप्रमाणे ख्रिस्तावरील संशय आपल्यामनात घर करून बसतो. अशा वेळी परमेश्वराने आपले तारण केले आहे. आपल्या दैन्यावस्थेतचे परमेश्वर नक्कीच अवलोकन करील. ह्या आशेने पुढे पाऊल टाकून जगलो पाहिजे. योहानाने दिगंतापर्यंत प्रकाश पोहोचवला. ख्रिस्ताची ओळख करून देण्यास शेवटपर्यंत झटला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा ख्रिस्त दुसऱ्यांना द्यावा, परमेश्वराच्या तारणकार्यात सहभागी व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

1.       हे परमेश्वरा तुझ्या सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप, फादर्स व सर्व व्रतस्त बंधूभगिनी, ह्यांना तुझे कार्य करण्यास शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे. तुझ्याशी एकनिष्ठ राहून जगाला तुझी ओळख द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
2.       जे लोक देवापासून दूर गेले आहेत. त्या सर्वाना दैवी दयेचा स्पर्श व्हावा व त्यांनी देवाकडे वळून एक नवीन, विश्वासू जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया.
3.       जी कुटुंबे दैनिक वाद-विवादाला बळी पडून मोडकळीस आली आहेत, त्या कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला भर यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
4.       जी दांपत्ये, असून बाळाच्या देणगीसाठी वाट पाहत आहेत, त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व बाळाच्या देणगीने त्याचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून प्रार्थाना करूया.
5.       ह्या पावसाळी हंगामात चांगला पाऊस पडावा व सर्व प्राणी, पक्षी व शेतीची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून प्रार्थना करूया.  
6. थोड्या वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.






No comments:

Post a Comment