Thursday, 23 August 2018


Reflections for the homily of 21st Sunday
 in Ordinary time (26-08-2018) by: Br Amit D’Britto.





सामान्य काळातील २१ वा रविवार

दिनांक: २६-०८-२०१८
पहिले वाचन: यहोशवा २४:१-२, १५-१८.
दुसरे वाचन: इफिस ५: २१-३२.
शुभवर्तमान: योहान ६:६०-६९



प्रभुजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.

प्रस्तावना:

आज आपण सामान्यकाळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपल्याला देवाचे महत्व पटवून देतात.
     पहिल्या वाचनात यहोशवा आपल्या लोकांना देवापासून दूर गेल्याची आठवण करून देतो व लोकांना त्याची जाणीव होते व ते परमेश्वराची सेवा करण्याचा निश्चय करतात. पौलाचे इफिसकरांस पत्र ह्यातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात संत पौल हा ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम कसा असावा याविषयी आपणास माहिती देतो. योहानकृत शुभवर्तमानात आपण पेत्राने येशू हा ख्रिस्तअसल्याची दिलेली कबुली ह्याविषयी ऐकतो. तसेच पेत्राने पूर्ण विश्वासाने येशूला उत्तर दिले की, ‘प्रभूजी सार्वकालिक जीवनाची वचने आपणाकडे आहेत तर तुम्हाला सोडून आम्ही कुणाकडे जावे?’
     पेत्राला धैर्य व विश्वासाने तारले. तेच धैर्य व विश्वास पेत्राप्रमाणे आपल्यालाही प्राप्त व्हावा, तसेच खरा ख्रिस्ती जीवनक्रम कळून चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रभूची प्रेरणा मिळावी म्हणून आपण ह्या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

सम्यक-विवरण
पहिले वाचन: यहोशवा २४:१-२, १५-१८.

     यहोशवा हा मोशेच्या काळातला इस्रायलच्या अनेक नेत्यांपैकी एक महान धाडसी नेता होता. तो साधा, सरळ, धाडसी, निर्भय, पारदर्शक नेता म्हणून प्रसिद्ध होता. त्याची निर्भयता केवळ त्याच्या व्यक्तिमत्वामुळे नव्हे तर परमेश्वराचे अस्तित्व त्याच्या बरोबर होते म्हणून त्याला निर्भयता प्राप्त झाली व यश मिळत गेले. ज्यावेळेला लोकांनी परमेश्वराच्या इच्छेकडे दुर्लक्ष केले आणि ते वाईट मार्गाला लागले तेव्हा यहोशवाने परखड भूमिका घेऊन लोकांना मार्गावर आणले. ईश्वरइच्छेपुढे त्याने कोणतीही तडजोड केली नाही.
     यहोशवाने आपल्या लोकांना एकत्र करून त्यांना अखेरचा संदेश देण्याचे ठरविले. कोणत्याही कर्तबगार पुरुषाने तसेच केले असते. एखाद्या नेत्याने समाज एका विशिष्ट शिखरावर पोहचविल्यानंतर त्याच दिशेने व गतीने वाढ व्हावी ही त्याची अपेक्षा असते. यहोशवाने आपल्या सर्व श्रेष्ठींना, प्रचारकांना आणि प्रजेला बोलावून त्यांना परमेश्वराच्या चांगुलपणाची आठवण करून दिली.
     परमेश्वराने इस्रायलच्या दुधा-मधाच्या प्रदेशात कसे नेले हे दाखवून दिले. यहोशवाने आपल्या लोकांना हिंमत दिली. धर्मशास्त्र पाळावे व प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे चालावे म्हणजे परमेश्वर त्यांना यशस्वी करील असा आदेश दिला.

दुसरे वाचन: इफिस ५: २१-३२.

     दुसऱ्या वाचनात संत पौल हा आपणास ख्रिस्ती जीवन कसे असावे, तसेच पती-पत्नींनी त्यांची जबाबदारी कुटुंबात कशी पार पाडावी ह्याचे महत्व पटवून देतो. आपल्याला माहित आहे की संत पौलाच्या जीवनात परिवर्तन झाले होते व तेच परिवर्तन तो सर्व ठिकाणी प्रगट करतो व अनेकांना ख्रिस्ता जवळ आणतो. इफिस पत्रात तो आपणास ख्रिस्ती जीवनक्रम कसा असावा ह्याविषयी मार्गदर्शन करतो. विशेष करून पती-पत्नीचे जीवन कसे असावे ह्याविषयी कानउघडणी करतो.

शुभवर्तमान: योहान ६:६०-६९

       प्रभू येशू जेव्हा आपल्या जीवनाची भाकरह्या विषयावरील प्रवचनाची शेवट करत असतात तेव्हा पुष्कळ शिष्यांना त्याची शिकवण कठीण वाटते. म्हणून ते येशूला सोडून जात असतात. परंतु शुभवर्तमानाच्या शेवटी असे लक्षात येते कि, पेत्र आणि इतर सर्व प्रेषित हे येशू बरोबर राहण्याचे व आपले जीवन व्यतीत करण्यास ठरवितात.
       ‘मांस-देह खाणेहे प्रभूचे शब्द, मनुष्याचा पुत्र स्वर्गात चढून जाईल, त्याला दुःख भोगून मरण सोसावे लागेल हे सर्वच समझण्यास अवघड होते. आणि हेच कदाचित शिष्याच्या अडथळ्याचे कारण ठरले असेल.
       तसेच लोकांमध्ये विश्वासाचा अभाव आहे हे येशूला ठाऊक होते. तसेच पित्याकडून सर्व गोष्टीचा पुढाकार घेतला जातो ह्या मुद्द्यावर प्रभू येशू पुन्हा एकदा भर देत आहे. शिमोन पेत्र हा त्या बारा जणाचा प्रवक्ता होता व त्याच्या बोलण्यातून येशुवरील त्याचा विश्वास अधिक गाढ असल्याचे दिसून येते.  

बोधकथा

एकदा एक ख्रिस्ती उपदेशक मध्य भारतातून जाणाऱ्या एका रेल्वे गाडीमध्ये मोफत बायबल वाटप करीत होता. तेव्हा एका व्यक्तीने  रागाच्या भरात मिळालेली बायबलची प्रत फाडली व ती खिडकीतून बाहेर  फेकून दिली.
       ह्या प्रसंगाचा शेवट येथेच झाला नाही तर हि घटनेमुळे एका व्यक्तीच्या जीवनाचा आरंभ होतो. त्या रेल्वे मार्गाला समांतर असलेल्या बाजूच्या रस्त्यावरून एक अतिशय उदास, निराश व हतबल झालेला श्रीमंत सुनील नावाचा तरुण जीवनाचा शेवट करण्याच्या इच्छेने तेथून जात होता. तेव्हा त्याला एक कागद मिळते ज्यावर लिहलेले असते, “मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला  कधीही भूक लागणार नाही.तो तरुण इतराच्या मदतीने जाणून घेतो कि, हे बायबलमधील प्रभू येशूचे शब्द आहेत.
       मग सुनील एक बायबल विकत घेतो आणि वाचण्यास सुरुवात करतो. तेव्हा तो प्रभू येशूकडे व त्याच्या शिकवणीकडे इतका आकर्षित होतो कि, तो आपले जीवन संपुष्टात आणण्याचा विचार विसरून जातो व पुन्हा एकदा नव्याने जीवन जगण्यास सुरुवात करतो.
आकाश व पृथ्वी हि नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.तसेच शुभवर्तमानात आपण पाहतो कि, काही शिष्य प्रभू येशूच्या वचनास नाकारून त्याला सोडून जातात तर काही त्याचा स्विकार करून पाठलाग करतात. त्याचप्रमाणे ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला जे काही कडू वाटले तेच सुनीलला जीवन जगण्यास नवी आशा, आनंद व प्रेम प्राप्त करून देते.

मनन-चिंतन

       आजच्या शुभवर्तमानात आपल्याला असे लक्षात येते कि, काही शिष्य येशूची शिकवण न समजल्यामुळे व ती त्यांना अमान्य असल्यामुळे ते प्रभू येशूला सोडून जातात. तेव्हा प्रभू येशू तेथे अजूनही त्यांच्या सोबत असलेल्या त्याच्या बारा शिष्यांना विचारतो कि, “तुमचीही जाण्याची इच्छा आहे का?”  तेव्हा शिमोन पेत्र म्हणतो कि, “प्रभुजी आम्ही कोणकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.इतकेच नव्हे तर पेत्र पुढे अजून म्हणतो कि, “आम्ही विश्वास ठेविला आहे, व ओळखिले आहे कि देवाचा पवित्र तो पुरुष आपणच आहात (योहान ६: ६८-६९). ह्या त्याच्या उद्गारात पेत्राने पुढील तीन निश्चित विधाने केली.
१)      प्रभू येशू शिवाय आम्ही कोणाकडे जाणार?
पेत्र व त्याचे शिष्य येशुबरोबर बराच काळ राहिले होते. त्यांनी प्रभू येशूची प्रेमाची, क्षमेची व दयेची शिकवण ऐकली होती. त्यांनी प्रभूने केलेले चमत्कार पहिले होते. त्यांनी प्रभूचा उदात्त व थोर स्वभाव जाणून घेतला होता. तसेच त्यांनी प्रभू येशूचे मानवी, आध्यात्मिक व सामाजिक जीवन अगदी जवळून पहिले होते. म्हणूनच पेत्र म्हणाला, “प्रभू आम्ही कोणाकडे जाणार ?”
       आपणही जीवनात काय शोधात आहोत. प्रभू येशू हाच मार्ग, सत्य व जीवन आहे’. तोच आपल्याला प्रेमाची व क्षमेची जीवन-किल्ली देत आहे. तो आपल्याला प्रेमाने आमंत्रित करून म्हणतो कि, “अहो, कष्टी आणि भाराक्रंती जनहो तुम्ही मजकडे या; मी तुम्हाला विसावा देईन.प्रभूकडे सर्वकाही आहे, फक्त आपण त्याचा शोध घेत त्याच्या मागे गेले पाहिजे.
२)      सार्वकालिक जीवनाची वचने प्रभू येशू जवळ आहेत.
पेत्राच्या उद्गारातून आपल्या लक्षात येते कि, बायबल मध्ये सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी अर्थपूर्ण वचने आहेत. बायबल हे आपल्या साठी अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. बायबल वाचन करून आपल्या जीवनात परिवर्तन होऊ शकते. आपले जीवन बदलून आणण्याची शक्ती प्रभू शब्दामध्ये आहे. प्रभू येशू म्हणतो कि, “ जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन” (योहान ६: ५४).
       आपणही प्रभू येशू द्वारे मिळणाऱ्या सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी त्याच्या अधिक जवळ येऊया.
३)      देवाचा पवित्र पुरुष प्रभू येशू ख्रिस्त आहे.
     मोशे हा जुन्या करारातील महान संदेष्टा होता व येशूला दुसरा मोशे संबोधले जाते. परंतु प्रभू येशू संदेष्ट्या पेक्षा अतिशय महान होता. तो मसीहा होता. आणि हीच बाब पेत्राने ओळखली होती. पेत्राने येशूच्या स्पर्शामध्ये देवाचा स्पर्श जाणून घेतला होता. त्याने प्रभू येशू मध्ये अनंतकालीन जीवनाचे ओझरते दर्शन घेतले होते. त्याला प्रभूच्या थोरवीची व पवित्र्याची जाणीव झाली होती. म्हणूनच तो प्रभूला देवाचा पवित्र पुरुषअसे घोषित करतो.
       पेत्राप्रमाणे आपणही प्रभू येशू मधील पावित्र्याची जाणीव करून घेऊया. आणि त्याच्या अधिक जवळ येऊन तो किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहूया! (स्त्रोत्रसंहिता ३४: ८).

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ऐकावी प्रार्थना, करतो मी याचना


१. आपल्या धार्मिक नेत्यांनी, देऊळ मातेची शिकवणूक सर्व ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवावी व त्यांना ती योग्यरीतीने आचरणात आणण्यासाठी योग्य ती मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने एकमेकांच्या सु:खदुःखात सह्भागी होऊन एकमेकांस साह्य करावे व प्रभू ख्रिस्ताचा प्रेमाचा, दयेचा आणि क्षमेचा संदेश आपल्या आचरणात आणावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आपल्या पॅरीशमधील आजारी माणसांना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात सापडल्यांना प्रभूचे धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, अश्या लोकांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभू परमेश्वराचे सामर्थ्य व धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment