Reflections for the homily of 26th Sunday
in Ordinary Time (29-09-2019)
by Br. Brian Motheghar.
सामान्य
काळातील सव्विसावा रविवार
दिनांक: २९/०९/२०१९
पहिले वाचन: अमोस:
६:१,४-७
दुसरे वाचन: १तीमथि:
६:११-१६
शुभवर्तमान:
लूक: १६:१९-३१
प्रस्तावना:
ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील सव्विसावा रविवार मध्ये
पदार्पण करत आहोत. आजची उपासना आपल्याला
शेजाऱ्या विषयी असणारी आपली आपुलकी याविषयी सांगत आहे.
आजच्या
पहिल्या वाचनात अमोस संदेष्टा आपल्याला अशा व्यक्तीं विषयी सांगत आहे,
की जे चैनीचे, मौजमज्जेचे जीवन जगत होते, परंतु
आपला शेजारी जो, दुःखात किंवा संकटात आहे त्याच्यावर नजर
सुद्धा टाकत नव्हते. त्यांची स्थिती व त्यांचा न्याय त्यांच्या वागण्या प्रमाणे
होणार होता. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल तिमथिद्वारे आपल्याला निष्कलंक
राहण्यास सांगत आहे. जोपर्यंत प्रभू परमेश्वर त्याच्या गौरवात येत नाही, तोपर्यंत निष्कलंक रहा. तर आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला श्रीमंत व
गरीब लाजरस ह्यांच्याविषयी दाखला देत आहे. ज्या मापाने आपण आपल्या शेजाऱ्याला देणार, त्याच मापाने आपल्याला परत मिळेल. ह्याचे उत्तम उदाहरण आजच्या शुभवर्तमानात आपल्याला दिलेले आहे. तर मग आपण
आपल्या शेजाऱ्याला आपल्या परीने होत असलेल्या कार्यापेक्षा अधिक पटीने देण्याचा
प्रयत्न करूया, व देवाकडे देण्याची वृत्ती आपणामध्ये आत्मसात
व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: अमोस:६:१,४-७
आजच्या
पहिल्या वाचनात आमोस संदेष्टा, श्रीमंत व गरीब यांच्यामधील
असलेल्या भेद बाबत आपल्याला सांगत आहे. संदेष्टा श्रीमंतांना त्यांच्या वास्तविक
स्थितीचे व येणाऱ्या घटनांचे वर्णन करीत आहे. कारण,
श्रीमंतांनी गरिबांना मदतीचा हात दिला नाही. याउलट त्यांच्यावर
अत्याचार व जुलूम केले. त्यांना अन्यायाने
वागवले. म्हणून संदेष्टा स्पष्टपणे
श्रीमंतांना सांगतो की, जे तुम्ही हस्तीदंत पलंगावर निजता व मंचकावर
ताणून पडतात व कळपातील गुरेढोरे खाता, त्यांचा नाश होणार. कारण, योसेफाच्या म्हणजेच
येरुसलेमचा नाश झालेला आहे, त्याचा तुम्ही खेद करत नाहीत. संदेष्ट्याने
देवाच्या नावाने हा संदेश दिला आहे, ही बाब ध्यानात घेतली
पाहिजे. देवाला गरिबांवर केलेला अन्याय मुळीच खपत नाही. यावरून अधोरेखित
केले गेले आहे की, दुर्बल घटकांचे शोषण होत
असल्यामुळे, परमेश्वराचा देशावर कोप होईल, परचक्राचे संकट ओढवले जाणार, असा इशारा संदेष्ट्याने दिला आहे. हिब्रि समाजात देव स्वतः गोरगरिबांचा संरक्षण
करता म्हणून उभा राहिला. कारण, देवाने त्यांना न्याय
मिळण्याबाबत शाश्वती दिली होती.
दुसरे वाचन: १
तिमथि ६:११-१६
संत पॉल तिमथिस आपले आचरण कसे असावे याबद्दल मार्गदर्शन करत आहे. आपले पत्र
लिहून झाल्यावर, संत पॉल शेवटचा मजकूर लिहिताना तिमथिस नीतीमत्व, सुभक्ती,
विश्वास, प्रिती, धीर,
व सौम्यता बाळगण्याचे आव्हान करत आहे. विश्वासासंबंधीचे जे सुयुध्द ते कर. युगानुयुगाच्या
जीवनाला बळकट धर. अशी लाख-मोलाची शिकवण संत पॉल तिमथिस देत आहे. अध्यात्मिक जीवनातील जडणघडण करत असताना संत पॉल ची आपल्या शिष्या
संबंधीची तळमळ ही वाखाणण्यासारखी आहे. पॉल क्रांतिकारक, समाज
सुधारक नव्हता. तर अध्यात्मिक मार्गदर्शक होता. तिमथिला अधिकाराचे व जबाबदारीचे ओझे जाणवत होते. अनेक संकटांना सामोरे जात असताना
पॉल त्याला देवावर श्रद्धा ठेवून हिंमत बाळगण्यास संदेश देत आहे.
शुभवर्तमान: लुक:
१६ १९-३१
आज
प्रभू येशू आपणासमोर श्रीमंत मनुष्य व गरीब लाजरस यांचा दाखला ठेवत आहे. ह्या दाखल्या द्वारे आपल्याला कळून चुकते
की,
येशूच्या वेळी गरीब व श्रीमंत यांच्यात भेदभाव होता. परंतु, येशू गरिबांची बाजू घ्यायचा. कारण, त्यांचा त्याला
कळवळा आला होता. दाखल्यात आपल्याला दिसून येते की, येशूने
गरीब लाजरस याचे नाव घेत आहे. परंतु, श्रीमंत व्यक्तीचे नाव
कुठेही नोंदविले गेले नाही. समाजात श्रीमंत व गरीब यांच्यामधील असलेल्या भेदभाव हा
कार्यरत असला तरी, हा भेदभाव येशूला किंचितही आवडला नाही.
म्हणून त्याने समतेचा आग्रह धरला.
इस्रायली
लोकांची अशी समजूत होती की, श्रीमंती हा देवाचा आशीर्वाद,
तर गरीबी हा शाप आहे. परंतु येशूने श्रीमंत व गरीब लाजरस ह्यांचा
दाखला सांगून, धनवानानंच्या डोळ्यात अंजन घातले आहे. लाजरस
या शब्दाचा अर्थ म्हणजे देव मदत करतो (God is my help) असा
आहे. दोघांमधील दुभागीता समजून, गरीबांचा छळ होतो याची
माहिती येशूला होती म्हणून श्रीमंतांना ह्याची किंमत मोजावी लागेल असे संत लूक
भाकीत करतो. ज्यांची जागा वेशी बाहेर होती, तेच लोक स्वर्गात
अब्राहामाच्या हृदयापाशी आहेत असा दिलासा या दाखल्यातून आपल्याला मिळतो.
बोधकथा:
एकदा एक गरीब आंधळा मुलगा रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत होता.
त्याच्यासमोर एक पाटी लिहिलेली होती. त्याच्यावर त्याने असे लिहिले होते, 'मी गरीब, आंधळा आहे. मला मदत करा.' परंतु त्या वाक्याने त्याच्या दान
पात्रात कमी दान पडत असे. असेच काही दिवस लोटल्यानंतर, एक
दिवस एक सज्जन मनुष्य येऊन, त्याच्याकडे लक्षपूर्वक बघून,
त्याच्या पाटीवरील शब्दांत बदल करून तो परत गेला. त्या वेळेनंतर
त्या गरीब, आंधळ्या मुलाच्या दानपात्रात भरपूर असे दान पडू
लागले. हे त्या मुलाला कळून चुकले. काही
दिवसानंतर तोच सज्जन मनुष्य परत येऊन त्या मुलाच्या बाजूला उभा राहिला. त्या
आंधळ्या मुलाला समजले की, हाच तो व्यक्ती ज्यांनी माझ्या
पाठीवर काही शब्दांचा बदल करून माझ्या दान पात्रात दानाचा बदल घडून आणला. तेव्हा
त्या मुलाने त्या सज्जन माणसाला विचारले, "अरे, भल्या सज्जन माणसा, तु माझ्या पाटीवर असे काय लिहिले,
की त्याद्वारे लोक माझ्याकडे आकर्षिले केले गेले? व माझ्या दान पात्रात जास्त दान येऊ लागले? त्यावर
त्या माणसाने त्याला उत्तर दिले, "मी तुझ्या पाटीवरील
काही शब्द बदलून टाकले. पूर्वी जे काही लिहिले होते ते असे होते, "मी गरीब, आंधळा मुलगा आहे. मला मदत करा."
त्याऐवजी मी असे लिहिले, "आज सुंदर असा दिवस आहे. तो दिवस पाहण्याचे भाग्य तुम्हाला मिळाले आहे. तेच
भाग्य मलापण लाभावे म्हणून, मला मदत करा."
बोध:
माझ्यासाठी श्रीमंती म्हणजे काय? पैसा धन-दौलत? ऐषो आराम? की इतरांना मदत करणे?
मनन चिंतन:
दुसरी व्हॅटिकन परिषद आपल्याला अशी शिकवण
देते की, देवाचे राज्य हे सर्वांसाठी आहे. परंतु आजच्या
शुभवर्तमानात आपण पाहिले तर असे दिसून येते की, देवाचे राज्य
हे फक्त गरिबांसाठी आहे. श्रीमंत हा अधोलोकात यातना भोगत आहे. तर मग, श्रीमंती हे आपले पाप आहे काय? आज समाजात सर्वजण
श्रीमंतीकडे ओढले जातात. म्हणजे ते पापाकडे ओढले जातात काय? दाखल्यात
दिलेल्या श्रीमंताचे काय पाप होते की, त्याच्यावरून तो नरकात
किंवा अधोलोखात यातना भोगत होता? आज ख्रिस्त सभा आपल्याला
आगळीवेगळी शिकवण देत आहे. तारण सर्वांचे होणार, परंतु ते
आपल्या सत्कृत्यांवर अवलंबून आहे. कुणाचे वाईट कराल तर, आपले
वाईट होते. कुणाचं भलं करणार तर, आपलं भलं होतं. दाखल्यात
श्रीमंत माणसाने लाजरससाठी काहीही भलं किंवा वाईट केलं नाही. तरीही त्याला नरकात
जावे लागले. त्याची ही अशी अवस्था काहीही नाही केलं म्हणून झाली होती.
समाजात वावरत असताना आपल्या डोळ्यासमोर अन्याय,
भ्रष्टाचार, पिळवणूक इत्यादी गोष्टी घडतात,
तरीसुद्धा आपण शांत व डोळस नजरेने त्याच्याकडे बघतो. हे सुद्धा एक
तऱ्हेचे पाप आहे, असे संत लूक आपल्याला सांगत आहे. गरिबांना
मदत करणे म्हणजे, आपल्या विपुलतेतून त्यांच्या उदर
निर्वाहासाठी पैसे किंवा साधन सामुग्री देणे हे नाही. तर त्यांच्यामधील असलेल्या
कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामधील असलेली कुवत जाणून, त्यांना
त्यांचा हक्काचा हक्क मिळवून देणे, म्हणजेच त्यांना मदत करणे
होय. त्यांना पैसे देऊन कमकुवत बनवण्यापेक्षा त्यांना त्यांचा हक्क देऊन ताकदवान बनवून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास
मदत करणे होय.
येशूने आपल्या जीवनात नेहमी सर्वांना समान लेखले. कोणाला उच्च
किंवा तुच्छ लेखले नाही. समानता हा धडा येशू आज
आपल्याला देत आहे. अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे किंवा इतरांच्या हक्कासाठी लढणे हा
धडा आज आपल्याला देण्यात आला आहे. देवाच्या राज्यात बसायचे असेल तर दुसऱ्याला खाली
पाडून बसता येणार नाही. याउलट दुसऱ्याला आपल्या बरोबरीने वागवण्यात देवाच्या
राज्यातील मेजवानीत सहभागी होता येईल. पैशाची गाठोडे डोक्यावर घेऊन खाली दाबले
जाण्याऐवजी, एकीची, समतेचे नाते जोडून
एक भावनेने जीवन जगण्यात आपले सार्थक आहे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे
प्रभू, तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.’
१. आपले परमगुरु,
महागुरू, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांच्यात,
ऐकीची भावना निर्माण होऊन, ती इतरांना देता
यावी व इतरांना त्याप्रमाणे मार्गदर्शन करता यावे, म्हणून
आपण प्रार्थना करूया.
२. सर्व राजकीय नेत्यांनी
प्रभू
येशू ख्रिस्ताचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून, त्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे, म्हणून
आपण प्रार्थना.
३. "त्यांनी सर्वांनी
एक व्हावे" अशी ही प्रभू येशूची भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी व
आपल्यामधील असलेला भेदभाव नष्ट व्हावा, म्हणून
आपण प्रार्थना करू या.
४. जे कोणी देवापासून
दुरावलेले आहेत, त्यांनी मागे वळून परत येशूला आपला राजा
म्हणुन स्विकारावे व आपले जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी
समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण ख्रिस्ताला
स्विकारावे व त्याच्या मुंल्यावर आपले जीवन जगून, तोच
ख्रिस्त इतरांच्या जीवनात आणण्याचा सदैव प्रयत्न करावा, म्हणून
आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून
आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.