Friday 20 September 2019


Reflection for the Homily of 25th SUNDAY IN ORDINARY TIME (22-09-2019) By Br Suhas Fereira .

सामन्य काळातील पंचविसावा रविवार


दिनांक: २२/०९/२०१९                          
पहिले वाचन:  अमोस ८:४-७
दुसरे वाचन: तीमथ्यीला दुसरे पत्र २: १-८
शुभवर्तमान: लुक १६: १-१३

प्रस्तावना:

          ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो आज देऊळ माता सामान्य काळातील पंचविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना हि आपल्या प्रत्येकाला देवाशी एकनिष्ठ व सलग्न राहण्यासाठी उपदेश करीत आहे.
          आजचे पहिले वाचन आपणास न्यायाचा धडा शिकवित आहे. प्रवक्ता अॅमोस हा त्या काळी चालत असलेल्या अन्यायाविषयी विशेषतः गरीब आणि गरजवंतावर होणाऱ्या अन्याया विरुध्द लोकांना ताकीद देतो. दुसऱ्या वाचनाद्वारे आपल्याला प्रार्थने विषयी सांगण्यात येते. प्रार्थना हे एक मौल्यवान आणि शक्तिशाली साधन आहे. प्रार्थनेद्वारे आपल्या सर्वांचे जीवना सुखमय बनत असते. देव हा एकच आहे आणि आपण त्याच देवाची प्रार्थना करीत राहिलो पाहिजे. आजचे शुभवर्तमान हा एकच उपदेश देत आहे की, आपण एकाच धन्याची चाकरी करायला हवी. एकाच वेळी आपण दोन धन्याची चाकरी करू शकत नाही.
          परमेश्वर जो स्वर्गीय पिता, एकच महान देव आहे त्याची नित्यनियमित पणे सेवा करण्यासाठी आपण सर्वाना विशेष कृपा लाभावी. तसेच आपण सर्वजण प्रभूची चांगली मुले-मुली बनून एक चांगली  ख्रिस्तीव्यक्ती म्हणून आदर्श जीवन जगावे यासाठी परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: अमोस ८:४-७

          आजचे पहिले वाचन  हे अमोस ह्या संदेष्टाच्या पुस्तकातून घेतले आहे. ह्या वाचनाद्वारे आपण ऐकतो की, जे धनी, मोठे व्यापारी होते ते गोरगरीबांना फसवत असत. व्यापारी हे मुद्दाम पूर्णिमा संपल्यानंतर म्हणजेच अमावस्येच्या काळामध्ये व्यवहार करोत असत. जेणेकरून त्यांना मालाच्या मोल-तोल करण्यामागे तसेच किमतीमध्ये घोटाळा करण्यात यश येत असे.

दुसरे वाचन: तीमथ्यीला  दुसरे पत्र २: १-८

          दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल आपणास प्रार्थने विषयी सांगताना म्हणतो की, प्रार्थना हि सर्वांसाठी करायला हवी, जेणेकरून आपण सर्वजण सुखमय आणि चिंताहीन जीवन जगू शकतो. आपण कोठेही असलो तरी आपण आपले दोन्ही हात परमेश्वराकडे उंचावून मनात कोणताही संकोच, राग, मत्सर न ठेवता  प्रार्थना केली पाहिजे.

शुभवर्तमान: लुक १६: १-१३

          आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त आपल्याला ‘बेईमानी’ चाकराचा दाखला सांगत आहे. जो कोणी लहान गोष्टीमध्ये एकनिष्ठ राहू शकत नाही तो मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा एकनिष्ठ राहू शकत नाही आणि जो कोणी लहान गोष्टीमध्ये एकनिष्ठ असतो तो मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा एकनिष्ठ असतो. तसेच प्रभू येशू सांगत आहे की, आपण एकच वेळी ‘देव’ आणि ‘संपत्ती’ दोघांची सेवा करण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे एकाच धन्याची चाकरी करा. देवा जो सर्व सामर्थ्याचा परमेश्वर आहे  त्याच्याशी एकनिष्ठ राहा.

मनन चिंतन:

          जर आपल्याला जीवनामध्ये एखादी गोष्ट करायची असेल,  तर त्या गोष्टीची सुरुवात हि लहान कामाद्वारे करावी लागते. उदाहरणार्थ, जर आपल्याला एखाद्या डोंगराचा कळस गाठायचा असल्यास सर्व प्रथम आपल्याला लहान लहान पाउलाद्वारे डोंगराच्या पायथ्याने सुरुवात करावी लागते. तसेच एक-दोन पावलांनी डोंगरचा कळस गाठता येत नसतो. अगदी तसेच आपल्या जीवनात हि घडत असते. आपल्याला जर का एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडवायची असेल, उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या क्षेत्रात करिअर घडवायचे आहे, तर त्यासाठी लहान लहान गोष्टी करून सुरुवात करावी लागते. कुणीही एका रात्रीमधून श्रीमंत होत नसतो.
          मोठ्या मोठ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी करत असलेल्या लहान-सहान गोष्टीमध्ये आपण नेहमी प्रामाणिक असणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपण लहान-लहान गोष्टीमध्ये सुद्धा प्रामाणिक नसलो तर मोठ्या गोष्टीमध्ये प्रामाणिक पणाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
          एकदा एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो. त्याला ती मुलगी खूप आवडत असते. ती  ही त्याच्या प्रेमाला होकार दर्शविते थोड्याच दिवसात तो मुलगा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो. ती ही मुलगी त्याच्या प्रेमाला होकार देते. थोड्याच दिवसात दोन्ही मुलीना आपला  प्रियकर एकच असल्याचे  समजते आणि दोन्ही ही मुली त्याला दिसून येतात .
          ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो, आपण एकच वेळी दोन धन्याची नोकरी करू शकत नाही. पाय ठेवायचा असल्यास दोन्ही पाय एकाच बोटीमध्ये ठेवा. एक पाय ऐका बोटीत  आणि दुसरा पाय दुसऱ्या बोटीत  ठेवल्यास त्याचा परिणाम काय होणार आपल्याला ठाउकच आहे.        
          आजच्या शुभवर्तमानात येशू हि आपल्याला तोच बोध देत आहे. येशू म्हणतो, तुम्ही एकाच वेळी देवाला आणि संपत्तीला महत्व देऊ शकत नाही. एकतर देवाला तुमचा वेळ दया नाहीतर संपत्तीच्या मागे जा. आजकालची परिस्थिती अशीच झाली आहे.आपण एकाच वेळी भरपूर गोष्टी करायला शिकलो आहोत. इग्रजी मध्ये म्हणतात कि, (multitasking) आपण चर्च मध्ये दर रविवारी येतो. परंतु आपले थोडे लक्ष फादरांवर थोडे इतरांवर, थोडे घरी काय चालले असेल त्याच्यावर आणि सर्वात जास्त लक्ष म्हणजे जिवलग मित्र मोबाइलवर. वॉटसप, फेसबुक, इंस्टाग्राम, टिक टॉक, हे जणू आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक झालेले आहेत. आपण शरीराने देवळामध्ये प्रवेश तर करतो पण मन मात्र इतर गोष्टींवरच वेधलेले असते. आपण आपल्या स्वत:चीच फसवणूक करत असतो.
          आज देऊळ माता आपल्याला कणखरपणे सांगत आहे, जगातील ऐहिक गोष्टीमध्ये गुरफटून आयुष्य कमी बनविण्यापेक्षा आपल्या संपूर्ण हृदयाने, मनाने व शरीराने देवाला समर्पित व्हा. तोच एक परमेश्वर तोच एक आपला तारणकर्ता आहे. आणि त्याच्याद्वारे आपणाला सार्वकालीन जीवन प्राप्त होणार आहे. त्याच एका धन्याची चाकरी करा, त्यालाच शरण जा.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: ‘हे प्रभू मारिया मातेसह आम्ही विनवितो’

(१)  आपले पोप फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी तसेच ख्रिस्ती धर्माची धुरा वाहणारे सर्व मिशनरी कार्यकार्त्यावर प्रभूचा आशिर्वाद नेहमी राहावा, तसेच त्यांना त्याच्या कामामध्ये नेहमी प्रभूचे सामर्थ व शक्ती लाभावी म्हणून प्रार्थना करूया.
(२) आपल्या धर्म ग्रामातील युवक-युवती जे देऊळ माते पासून दूर गेलेले आहेत, ते देवाच्या जवळ यावे, देवाच्या दैवी कृपेचा अनुभव त्यांना यावा व त्यांनी त्यांचे जीवन देऊळमातेच्या नियमाप्रमाणे जगावे आणि इतरांना आदर्श दयावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
(३) आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तींना प्रभूच्या आत्म्या द्वारे चांगले आरोग्य लाभावे व त्यांचा आजार बरा व्हावा, तसेच त्यांच्या आजारामध्ये त्यांनी नेहमी परमेश्वाचा धावा करून परमेश्वराच्या अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
(४) आज विशेषता प्रार्थना करूया आशा लोकांसाठी ज्यांना पावसाच्या पाण्यामुळे अतिशय हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. पुरामध्ये अनेक लोकांची विविध प्रकारची हानी झाली आहे. या सर्व लोकांना योग्य ते सहकार्य लाभावे व इतर सर्व प्रकारच्या आपत्ती पासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
(५) आज ज्या ज्या लोकांचे वाढदिवस आहेत त्या त्या लोकांना परमेश्वराचा विशेष असा आशिर्वाद मिळावा व अशा प्रकारचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये नेहमी यावा म्हणून प्रार्थना करूया.
(६) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.




                                                   

No comments:

Post a Comment