Reflection for the Homily of 34th SUNDAY IN ORDINARY TIME (20-11-2022) By Br. Jeoff Patil.
“मी तुला खरे
सांगतो, आज तू माझ्या बरोबर स्वर्ग राज्यात असशील.”
दिनांक: २०/ ११/२०२२
पहिले वाचन: २ शमुवेल ५: १-३
दुसरे वाचन: संत पौलचे कलस्सैकरांस पत्र १: १२-२०
शुभवर्तमान: लुक २३: ३५-४३
प्रस्तावना:
ख्रिस्त दयेचा
राजा
आज आपण ख्रिस्त राजाचा
सण साजरा करत असून, सामान्य काळातील शेवटच्या आठवड्यात आपण पदार्पण करत आहोत.
देऊळमाता आज आपल्याला आठवण करून देत आहे कि प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त विश्वाचा
राजा नसून, तो आपल्या हृदयाचा, आत्म्याच्या, शांतीचा, शरीराचा व आपल्या कुटुंबाचा
राजा आहे. त्याचे हे राज्य हे अनंत काळचे राज्य आहे.
आजच्या पहिल्या
वाचनात आपण पाहतो की ईस्राएलच्या लोकांनी दाविदाला आपला राजा म्हणून निवडले. आजच्या दुसऱ्या वाचनात
संत पौल, ख्रिस्ताला विविध अशी उपमा देऊन ख्रिस्ताची श्रेष्ठता आपल्याला पटवून देत
आहे. लुक लिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त, एका विश्वासू चोराला स्वर्ग राज्याचे
आश्वासन देत आहे
ख्रिस्त हा अखिल
विश्वाचा व आपल्या प्रत्येकाचा राजा आहे. वधस्तंभावरील त्या चोराप्रमाणे आपल्याला
सुद्धा तारणाचा मार्ग प्राप्त व्हावा, आपल्याही जीवनात बदल व्हावा. आपण सर्वजण एक
धार्मिक व आध्यात्मिक कळप बनून, इतरांची सेवा करण्यासाठी व दुसऱ्यांना दया
दाखवण्यासाठी आपल्याला देवाची कृपा मिळावी म्हणून विशेषतः या मिस्साबलीदानात आपण
प्रार्थना करू या.
मनन चिंतन:
आज आपण ख्रिस्त राजाचा
सण साजरा करत आहोत. जेव्हा आपण राजा हे शीर्षक ऐकतो तेव्हा आपल्या समोर कोणती
प्रतिमा झळकते ? आपल्या समोर विशेषतः
मुकुट, सामर्थ्य, अधिकार, श्रीमंती तसेच अनेक शाही वेश परिधान केलेले सैनिक असे
चित्र आपल्या समोर निर्माण होते असते. परंतु आज आपण ज्या राज्याचा
सण साजरा करीत आहोत, तो याप्रकारचा राजा नव्हता. आपला राजा येशू ख्रिस्त
दोन अपराध्या बरोबर क्रुसावर टांगून मरण पावला. आपला राजा हा करुणेचा
राजा आहे. आपला राजा हा प्रेमाचा व शांतीचा आहे.
आजच्या पहिल्या
वाचनात आपण पाहतो की दावीद इस्रायलाचा राजा होतो. दावीदाचे राज्य
आपल्याला ख्रिस्ताच्या राज्याकडे निर्देशित करते आणि जगातील राज्य आणि दावीदाचे राज्य
यांच्यातील फरक प्रकट करते. सौल राजा स्वतःचे हित साधतो तर दावीद राजा देवाचें
इच्छेनुसार राज्य करतो. दाविदाला राजा म्हणून अभिषेक करण्यासाठी इस्रायलचे सर्व
वंश आले होते. त्याचप्रकारे ख्रिस्त राजा हा सर्व लोकांचा राजा आहे. आपल्या सर्वांना
ख्रिस्ताच्या राज्य राज्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
संत पौलाने कलसीकरांस
लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात ख्रिस्ताच्या सर्व अधिकारांची चांगल्या प्रकारे वर्णन
केलेले आपणास दिसून येते. ख्रिस्ता मध्ये देवाच्या दयाळूपणाचा व प्रेमाचा आपल्याला
अनुभव येतो. आपण सर्व अंधारात पापांच्या राज्याला आधीन होत असतो पण ख्रिस्तामुळे
आपण सर्व प्रकाश्याची मुले बनलो आहोत.
पोप फ्रांसिस
फ्रान्सिस असे म्हणतात येशू ख्रिस्त हा सर्व सृष्टीचा केंद्रबिंदु आहे ख्रिस्ती या
नात्याने आपले विचार, ख्रिस्ताच्या विचारा सारखे असले पाहिजेत, आपले कार्य ख्रिस्ताच्या
कार्यसारखे असले पाहिजेत, आपले शब्द हे ख्रिस्ताच्या शब्दाप्रमाणे पाहिजेत.
आजच्या लुक लिखित
शुभवर्तमानात आपल्यासमोर एक वेगळाच राजा प्रदर्शित केला आहे, तो आपल्या राजवाड्यात
नाही, तर काल्वारीच्या डोंगरावर आहे तो सिंहासनावर बसला नाही तर क्रुसावर नीरबळ
होऊन टांगला आहे. तो लोकांचा न्याय करत नाही, तर क्रुसाखाली जमलेली लोक
त्याची थट्टा व निंदानालस्ती करत आहे. मग हा कसा आपला राजा? तर
ख्रिस्त हां शांतीचा, प्रेमाचा, दयेचा राजा आहे. ख्रिस्ताचे राज्य बळाने पसरलेले
नाही, तर ख्रिस्ताच्या प्रेमाच्या सामर्थ्यांने पसरलेले आहे.
येशूचे राज्य भूतलावरचे
नाही तर त्याचे राज्य हे स्वर्गाचे आहे (योहान १८:३६). येशूचे राज्यपद हे सौम्यता,
नम्रता, प्रेम व सेवा या मूल्याने भरलेले आहे. तो स्वतः जरी राजा असला तरी तो सेवक
म्हणून जीवन जगला. प्रभू येशूने त्याच्या प्रजेवर खूप प्रेम केले व अजुनही
करत हे. तो त्यांच्यावर मरेपर्यंत प्रेम करतो कारण त्याचा हेतू व स्वप्न हे आहे की
आपण नेहमी त्याच्या बरोबर असावे. त्याचप्रमाणे एखादा मेंढपाळ आपल्या मेंढरांची
काळजी घेतो किंवा एखादा पक्षी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली एकत्र गोळा करून
ऊब देतो किंवा जशी एखादी आई आपल्या बाळाचे पालनपोषण करते यासर्वांपेक्षा अधिकतम
रीतीने येशू ख्रिस्त त्याच्या प्रजा जनावर प्रेम करून त्यांना जवळ आणतो.
जर आपला राजा
आपल्यावर इतके प्रेम करत असेल, तर आपण सुद्धा त्याला योग्य तो प्रतिसाद दिला
पाहिजे कारण हे प्रेमाचे दळण-वळण एकेरी मार्गाने होत असेल तर त्याला काही अर्थ राहत
नाही, उलट जी आई आपल्या मुलांवर प्रेम करते तीच आई वृद्धावस्थेत तेच प्रेम परत
मिळवण्यासाठी वाट पाहत असते, तसा आपला प्रेमळ राजा आपल्या प्रेमाची आशेने वाट पाहत
असतो. आपण त्याला सकारात्मक प्रतिसाद देतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला
हवा. येशू ख्रिस्ताने कोणाचे शोषण केले
नाही, तर लोकांची सेवा केली व त्यांना धीर दिला. इतकेच नाही तर
मरते वेळीसुद्धा आपल्या मारेकरांना त्याने क्षमा केली व आपल्या उजव्या बाजूच्या चोराला
स्वर्गाचे आश्वासन दिले, कारण त्याने येशूची करुणेने भरलेले राज्य ओळखले. त्याला
कळून चुकले की येशू दयेचा व करूणेचा राजा आहे. आपण आज त्याच राजाचा सण साजरा करत
असताना आपल्याला सुद्धा स्वर्ग राज्याचा अनुभव यावा व आपणास येशूच्या दयेचा व
करुणेचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: ’हे प्रभू तुझे राज्य आम्हांवर येवो.’
१.आपल्या ख्रिस्त सभेचा
कारभार पाहणारे पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ
ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभू सेवेसाठी अर्पण केले आहे त्यांना देवाची
कृपा-आशीर्वाद मिळावा व त्यांनी येशूची सुवार्ता सर्वत्र पसरवली म्हणून आपण
प्रार्थना करूया.
२.आपले सर्व राजकीय
पुढारी व नेते ह्यांनी येशू प्रमाणे जनहितासाठी झटावे व जनतेची अधिकाधिक सेवा
करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.जे कोणी आजारी, दुःखी व संकटांनी
ग्रासलेले आहेत, आयुष्याला कंटाळलेले आहेत
अशांना प्रभुचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४.आज ख्रिस्त राज्याचा सण
साजरा करत असताना प्रभू येशूला आपल्या जीवनाचा राजा बनवून त्याचे राज्य आपल्या
हृदयात यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. देशात परदेशात अनेक लोक
अन्यायाला, हिंसेला, युद्धेला, अत्याचाराला, राजनीती व कुटनीती ह्यास बळी पडत आहेत,
अश्या सर्व लोकांवर ख्रिस्ताचे न्यायचे व करुणेचे राज्य यावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
६.थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment