सामान्य काळातील
सतरावा रविवार
दिनांक :३०/०७/२०२३
पहिले वाचन: १ राजे ३:५, ७-१२
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२८-३०
शुभवर्तमान: मत्तय १३:४४-५२
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा सामान्य
काळातील सतरावा रविवार साजरा करीत असताना आजच्या उपासनेद्वारे आम्हाला स्वर्गाचे राज्य
हे देवाचे अमूल्य दान व मौल्यवान वरदान आहे या रहस्यावर मनन चिंतन करण्यास पाचारण करत
आहे. प्रभू येशूने आम्हाला स्वर्गाचे राज्य प्रकट केले.
आजच्या शुभवर्तमानात
प्रभू येशू स्वर्गाच्या राज्याची तुलना ठेव, मोती
व जाळे यांच्याशी करतो. या तिन्ही दृष्टांताद्वारे प्रभू येशूने स्वर्गाच्या राज्याचे
महत्त्व व मूल्य आम्हासमोर ठेवले आहे. पहिले दोन दृष्टांत: ठेव व मोती हे वर्तमान काळात
नमूद करण्यात आले आहेत. जेथे मनुष्यांसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला असून स्वर्ग राज्य
मिळविण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न करावे. तिसरा दृष्टांत: जाळे, हा भविष्यकाळात
नमूद करण्यात आला असून येथे देव आमच्या कृत्यानुसार आम्हाला स्वर्गाचे राज्य बहाल करणार
असा उल्लेख करण्यात आला आहे.
या स्वर्ग राज्याच्या
राज्यात जर आपल्याला प्रवेश करायचा असेल व ते मिळवायचे असेल तर प्रथम आम्ही देवाचा
शोध करावा, देवाचा
धावा करावा. जो देव आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणात वास करतो त्याचा अनुभव घ्यावा व
देवच आपली दैवी संपत्ती आहे हे स्वीकारावे. जर आपल्याबरोबर देव आहे तर मग आपल्याला
कशाचीही कमतरता वाटणार नाही. म्हणून आम्ही इतर गोष्टी सोडून देवाला चिकटून राहावे.
जागतिक गोष्टींना लाथ मारून आमच्या देवाला आलिंगन मारावे. म्हणजे आम्हाला स्वर्गाचे
वारस बनण्यास देवच लायक बनवेल. या मिस्साबलिदानात भाग घेताना देवाकडे हीच प्रार्थना
करूया की, हे देवा
आम्हाला तुझ्या सानिध्यात ठेव व आम्हाला स्वर्गाच्या राज्याचे सभासद होण्यास तुझ्या
आशीर्वादाने भर.
मनन चिंतन
शोधीशी मानवा राउळी
मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या
अंतरी
भेटतो देव का पूजनी
अर्चनी?
पुण्य का लाभते दानधर्मातूनी?
शोध रे दिव्यता आपुल्या
जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी
कुठवरी
एकदा एका मनुष्याने
देवाचा शोध करायचा मनात विचार केला. त्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी गेला. सुरुवातीला
तो मनुष्य एका मंदिरात गेला तेथे त्यांनी पूजा अर्चना केली परंतु तेथे त्याला देवाचा
शोध झाला नाही, तेथे
त्याला देव सापडला नाही.
मग तो एका जवळच्या
मस्जीत मध्ये गेला तेथे त्याने नमाज केली, परंतु
तेथे सुद्धा त्याला देवाचा शोध झाला नाही, देव
त्याला सापडला नाही. नंतर तो एका चर्चमध्ये गेला तेथे त्यांनी प्रार्थना केली. पण त्याला
तेथे सुद्धा देवाचा शोध लागला नाही. त्याला देव सापडला नाही. अशा परिस्थितीत हा मनुष्य
एकांकी जागेत गेला व तेथे बसून तो विचार करू लागला की, मी मस्जीत
मध्ये गेलो, चर्चमध्ये
गेलो, परंतु
मला देवाचा शोध झाला नाही. मला देव सापडला नाही. मग मी देवाचा शोध कुठे करावा? असा
विचार मनात असताना त्यांनी कुणाचा तरी आवाज ऐकला तो घाबरला कारण त्या ठिकाणी कोणीच
नव्हते. तो म्हणाला कोण आहे तेथे. तेव्हा देव उदगारला मी आहे, तुझा
देव. तू माझा शोध बऱ्याच ठिकाणी केला पण मी तुझ्या अंतकरणात आहे. माझा शोध तुझ्या अंतकरणात
कर. मी तुझ्याबरोबर आहे याची जाणीव कर.
या छोट्याशा गोष्टीचे
तात्पर्य हेच आहे की, हा मनुष्य
देवाच्या शोधात होता, परंतु
खुद्द देवानेच त्याचा शोध केला देवानेच त्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.
जरी देव सर्वव्यापी असला तरी तू आमच्या अंतकरणात वास करतो हे आम्ही विसरू नये.
आज आम्ही प्रत्येकाने
स्वतःला प्रश्न विचारावा; देव
मानवाच्या शोधात आहे की मानव देवाच्या शोधात आहे? किंवा
देव मानवाचा शोध करतो की मानव देवाचा शोध करतो?
सहाजिकच आपण तारणप्राप्तीच्या
इतिहासात ऐकले आहे की सुरुवातीपासून देव मानवाच्या शोधात आहे. कारण देवाचा एकमेव उद्देश
हाच होता की मानवाची पापांच्या बंधनातून मुक्तता व्हावी. त्याचं तारण व्हावं. हे देवाने
प्रत्यक्षात करून दाखवलं. आजही देव मानवाच्या शोधात आहे. हाच देव तुमच्या आणि माझ्या
शोधात आहे. हाच देव आम्हा बरोबर आहे. ह्याच देवाला आम्हा प्रत्येकाची काळजी आहे. तो
आम्हाला कधीच सांडू देणार नाही. हाच प्रभू परमेश्वर म्हणतो; पहा
मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन त्यास मी हुडकीन (यहेज्केल ३४-११). तसेच लूकलिखित
शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो; मनुष्याचा
पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे (लुक 19
-१०).
आज देवाने मानवावर
असंख्य असे उपकार केले आहेत. जरी या उपकाराची मानवाला परतफेड करता आली नाही तरी मानवाने
देवाच्या तारणप्राप्तीच्या मार्गात सहकार्य दाखवावे. ज्याप्रमाणे देव मानवाच्या शोधात
आहे त्याचप्रमाणे आजच्या घडीला प्रत्येक मानवाला देवाची गरज भासत आहे. देवाशिवाय मनुष्य
काहीच करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला वाटते की मला देवाचा साक्षात्कार व्हावा, देवाचा
जवळून अनुभव व्हावा, म्हणून आजही मानव देवाच्या शोधात आहे. प्रत्येकाला वाटते की देवाला
प्रत्यक्षरीत्या पहावे.
ख्रिस्त सभेच्या इतिहासात
अनेक असे संत होऊन गेले की ज्यांना देवाचा जवळून अनुभव आला त्यांना देवाचा साक्षात्कार
झाला व अशा प्रकारे त्यांच्या जीवनाच्या नौकेला नवीन दिशा मिळाली. या अनेक संतांपैकी
जर आपण असीसिकर संत फ्रान्सिस यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर असे दिसून येईल की त्यांनी
ख्रिस्तासाठी सर्वस्वाचा त्याग केला. त्यांनी ख्रिस्ताला मिठी मारून जगाला लाथ मारली
व ख्रिस्ताचा तो खरा अनुयायी बनला. अशाप्रकारे असिसिकर संत फ्रान्सिसने आत्मत्याग करून
देव हा त्याच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे असे मानून घेतले व आपले सर्वस्व
देवाला समर्पिले. म्हणूनच संत फ्रान्सिसला स्वर्गाच्या राज्याचे वतन मिळाले.
आपल्याला जे काही लाभले
आहे ते देवाचेच कृपा आशीर्वाद आम्हावर आहेत. ज्याला देवाचा अनुभव आला आहे त्याला जीवनात
उत्तम आणि श्रेष्ठ खजिना सापडला आहे. होय आपला देव आपली दैवी संपत्ती आहे. आम्ही प्रत्येकाने
या देवाचा शोध करावा म्हणजे तो आम्हाला स्वर्गाच्या राज्यात योग्य असे स्थान देईल.
म्हणूनच परमेश्वराने म्हटले आहे; तुम्ही
माझा धावा कराल. तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण
याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हास पावेन(यिर्मया २९: १२-१३).
खरे पाहिले तर देवाला
जाणीव आहे की मानव हा त्याचा शोध करतो. ज्यांनी देवाचा शोध केला त्यांना देवाने प्रकट
केले. खुद्द देवाने प्रभू येशूद्वारे स्वतःला प्रकट केले, याविषयी
पवित्र शास्त्र साक्ष देते. प्रभू येशू म्हणतो; मार्ग
सत्य व जीवन मीच आहे. माझ्या द्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही (योहान१४:६)
हाच ख्रिस्त देवाकडे जाण्याचा उत्तम मार्ग होईल. जो कोणी त्याच्या मागे जाईल त्याला
स्वर्गीय निवासस्थान लाभेल.
आजच्या शुभवर्तमानातील
तिन्ही दृष्टांताद्वारे: ठेव, मोती
व जाळे आपल्याला प्रभू येशू हाच संदेश देत आहे की स्वर्गाचे राज्य ही देवाने मानवाला
बहाल केलेली अनमोल भेट आहे, की जी
मिळवायची असेल तर परमेश्वर पित्याला आपल्या जीवनात पहिले स्थान देऊन देवाशिवाय जीवन
व्यर्थ आहे असे मानून देवाच्या सानिध्यात राहण्यास त्याचा जवळून अनुभव घेऊया.
आज जर आपल्याला देवाचा
अनुभव झाला असेल, त्याचा
साक्षात्कार झाला असेल, तर खरंच
आपण म्हणू शकतो की आम्हाला देवाला पाहण्याच भाग्य लाभल आहे.
परंतु आज मानव देवाचा
शोध करताना समाधानी आहे का? मानवाच्या
अनेक गरजा आहेत, त्याच्या
विविध भावना आहेत, त्याचे
निरनिराळे
संकल्प, योजना
आहेत. आज मानवाला जीवनात खरी मन शांती, खरा
आनंद, सुख
समाधानाची गरज आहे. या सर्व गरजा फक्त देव पूर्ण करू शकतो. कारण देवाला सर्व काही शक्य
आहे. अशक्य असे काहीही नाही.
या आधुनिक युगात माणसाने
फक्त देवावर अवलंबून राहावे. कारण जो देव आमचा शोध करतो तो आपल्याला कधीच टाकणार नाही,
नाकारणार नाही, तर आमच्या जीवनात नवीन दिशा देण्यास मदत करतो. हाच देव आम्हासमोर हेच
आव्हान ठेवत आहे की, आम्ही
आमचे ख्रिस्ती जीवन जगताना नीतिमानाने जगावे, व जे
चांगले आहे, योग्य
आहे, ते निवडावे म्हणजे
आपला देव आम्हाला स्वर्गाच्या राज्याचे इनाम देईल.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू
आम्हाला तुझे राज्य पाहण्यास मदत कर.
१) आपले परमगुरु फ्रान्सिस
पहिले सर्व बिशप्स धर्मगुरू आणि व्रतस्थ बंधू भगिनी ह्याच्याद्वारे प्रभू येशूची सुवार्ता
जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवताना त्यांना देवाचा अनुभव यावा व जे
लोक
देवाचा शोध करत आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यास प्रभू येशूची कृपा त्यांना लाभावी
म्हणून प्रार्थना करूया.
२) आपल्या सर्व राजकीय
पुढार्यांनी व नेत्यांनी जनकल्याणासाठी झटावे व जनतेला सेवा कार्याद्वारे मदत करावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) आज आपण मणिपूर मधील
सर्व बंधू-भगिनींसाठी विशेष प्रार्थना करूया की, त्यांच्यावर
होणारा अन्याय अत्याचार व छळ नष्ट व्हावा, व तेथे
शांतीचे वातावरण प्रस्थापित व्हावे. तसेच तेथील गरजू लोकांना न्याय मिळावा म्हणून प्रभुकडे
प्रार्थना करूया.
४) जे लोक देवाला मानत
नाहीत व जे लोक देवापासून दूर गेले आहेत अशा लोकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हावा, व त्याच्या
जीवनाचे परिवर्तन होऊन त्यांना देवाच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी म्हणून प्रभुजवळ
प्रार्थना करूया.
५) या मिस्साबळीदानात
सहभाग घेत असलेल्या आम्हा सर्व बंधू-भगिनी वरती देवाचा आशीर्वाद असावा, की त्याद्वारे
देवाने आम्हाला स्वर्गाचे राज्य पाहण्याचे भाग्य द्यावे म्हणून प्रार्थना करूया.
६) थोडा वेळ शांत राहून
आपल्या सर्व वैयक्तिक व सामुदायिक हेतूसाठी प्रभू चरणी प्रार्थना करूया.