Friday, 18 September 2026

Reflections for the Homily of 25th Sunday in Ordinary Time (20-09-2026) By Fr. Glen Fernandis

सामान्य काळातील पंचविसावा रविवार

दिनांक: २०/०९/२०२६
पहिले वाचन: यशया ५५:६-९
दुसरे वाचन: फिलीपीकरांस १:२०-२४,२७
शुभवर्तमान: मत्तय २०: १-१६

प्रस्तावना:

आजची पवित्र उपासना आपल्याला देवाच्या उदार दयेची आठवण करून देत आहे. जेव्हा दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त मिळते, व आपल्याला कमी मिळते तेव्हा आपल्याला अन्याय झाल्यासारखा वाटतो. पण आजची पवित्र वाचने आपल्याला सांगतात  की देवाचा न्याय आपल्या मानवी न्यायापेक्षा वेगळा आहे. तो सर्वांना समान प्रेम करतो आणि उशिरा आलेल्यांनाही पूर्ण आशीर्वाद देतो. ह्या पवित्र मिस्सात आज आपण प्रार्थना करूया की आपल्याला हेवा सोडून देवाच्या उदारतेवर विश्वास ठेवण्याची आणि त्याच्यासारखी दया दाखविण्याची कृपा मिळावी.

मनन चिंतन:

हा अन्याय आहे!” आपण किती वेळा हे शब्द ऐकतो किंवा स्वतः म्हणतो? खेळाच्या मैदानावर मुले, घरातील कामाबाबत भाऊ-बहीण, पगाराची तुलना करणारे कर्मचारी, किंवा दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त आशीर्वाद मिळालेला पाहून आपणही म्हणतो, “हा अन्याय आहे!” आजच्या पवित्र शुभवर्तमानात प्रभू येशू एक गोष्ट सांगतो जी आपल्या या “न्याय” आणि “योग्य” या कल्पनेला थेट आव्हान देते. एक द्राक्षमळ्याचा मालक दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी कामगारांना कामावर घेतो आणि सर्वांना एकसारखा पूर्ण दिवसाचा पगार देतो. जे जास्त वेळ काम केले त्यांना राग येतो. आणि मालक फक्त इतकेच म्हणतो, “मी उदार असल्यामुळे तुम्हाला हेवा वाटतो का?” आजची तीनही वाचने आपल्याला सांगतात की देवाचा न्याय आणि त्याची दया आपल्या मानवी कल्पनेपेक्षा खूप वेगळी आहे. देवाची दया त्याच्या न्यायापेक्षाही मोठी आहे.

आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा बाबिलोनमध्ये असलेल्या लोकांना अनेक वचने सांगतो. ते लोक आपल्या पापांमुळे निर्वासित झाले होते. तरीही देव त्यांना शिक्षा देण्याऐवजी म्हणतो, “परमेश्वराला शोधा, तो त्याना सापडेल त्या वेळी वाईट माणसाने आपला मार्ग सोडावा परमेश्वराकडे परत या, कारण तो विपुल प्रमाणात क्षमा करील.”मग तो महत्त्वाचे वचन सांगतो, “माझे विचार तुमच्या विचारांसारखे नाहीत आणि माझे मार्ग तुमच्या मार्गांसारखे नाहीत.” देव आपल्या गणितानुसार क्षमा करत नाही. तो मुक्तपणे क्षमा करतो. ज्यांनी त्याला दुःख दिले त्यांनाही तो पुन्हा घरात बोलावतो. हाच आजच्या संदेशाची पाया आहे. देवाचा न्याय खरा आहे, पण त्याची दया त्याहूनही मोठी आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल जो तुरुंगात आहे व त्याला कदाचित फाशीची शिक्षा होऊ शकते, तो म्हणतो जगणे म्हणजे सुवार्तेसाठी अधिक काम, आणि मरणे म्हणजे ख्रिस्तासोबत राहणे. संत पौलाने देवाच्या इच्छेनुसार पाहणे शिकले.  हीच वृत्ती आजची सुवार्ता आपल्याला शिकवते, हेवा न करता, तुलना न करता, फक्त देवाची इच्छा पूर्ण करण्याची वृत्ती.

आजच्या पवित्र शुभवर्तमानात प्रभू येशू एका द्राक्षमळ्याच्या मालकाची गोष्ट सांगतो. तो सकाळी सहा वाजता, नऊ वाजता, बारा वाजता, तीन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजताही कामगारांना कामावर घेतो. दिवस संपला की तो सर्वांना एकसारखा पूर्ण दिवसाचा पगार देतो. सकाळपासून काम केलेल्यांना राग येतो. ते म्हणतात, “आम्ही पूर्ण दिवस कष्ट केले, उन्हात राबलो. हे शेवटचे फक्त एक तास काम केले, तरी त्यांना आम्हांसारखाच पगार का?” मालक उत्तर देतो, “मी तुमच्याशी अन्याय केला नाही. तुम्ही ज्या पगारावर सहमत झाला होता तोच मी दिला. मी उदार असल्यामुळे तुम्हाला हेवा वाटतो का?” 

ही गोष्ट पगार किंवा कामगारांच्या हक्कांबद्दल नाही. ही देवाच्या राज्याबद्दल आहे. सकाळपासून काम करणारे म्हणजे जे फार काळ देवाचे अनुसरण करतात, धार्मिक लोक, जे स्वतःला “जास्त पात्र” समजतात. उशिरा आलेले म्हणजे ज्यांनी उशिरा पश्चात्ताप केला, जे पापी होते, जे शेवटच्या क्षणी देवाकडे आले.  देव कोणाला किती वेळ काम केले यावरून बक्षीस देत नाही. तो सर्वांना जीवन देऊ इच्छितो. त्याचा प्रश्न “या लोकांना किती मिळायला हवे?” असा नसून “मी त्यांना कसे वाचवू?” असा आहे. म्हणूनच पहिल्या तासाला आलेल्यांना आणि शेवटच्या तासाला आलेल्यांनाही एकसारखे शाश्वत जीवन दिले जाते.

 दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त आशीर्वाद मिळालेला पाहून रागावू नका. आपण लक्षात ठेवले पाहिजे की देवाने आपल्यालाही आपल्या पात्रतेपेक्षा खूप जास्त दिले आहे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानला पाहिजे. देवाच्या प्रेमाची तुलना मानवी तराजूने करता कामा नये. आपल्याला देवाच्या द्राक्षमळ्यात स्थान मिळाले हे आपण कमावलेले नाही. बाप्तिस्मा, विश्वास, क्षमता, संधी हि सर्व काही देवाची मोफत देणगी आहे. म्हणून कृतज्ञता व्यक्त करा, प्रार्थनेत, पाप टाळण्यात, दुसऱ्यांची सेवा करण्यात आणि जे मिळाले आहे ते गरजूंना वाटण्यात.

ह्या गोष्टीच्या शेवटी येशू म्हणतो, “शेवटचे पहिले होतील आणि पहिले शेवटचे होतील.” देवाच्या राज्यात ज्येष्ठतेची यादी नाही. फक्त एक उदार पित्याचा हात आहे, जो सर्वांना पूर्ण दिवसाचा पगार म्हणजे शाश्वत जीवन देऊ इच्छितो. जो देव आपल्याला दिवसाच्या कोणत्याही वेळी बोलावतो, तोच देव दिवस संपला की आपल्याकडे पाहून म्हणेल, “ये, जे माझे आहे ते घे. कारण मी उदार आहे.”  आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: प्रभु, आमची प्रार्थना ऐक.

१.    आपले परम-गुरुस्वामी, महा-गुरूस्वामी, कार्डिनल्स, सर्व धर्मगुरू आणि व्रतस्थ; तसेच येशूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे सर्व प्रापंचिक या सर्वांवर प्रभूचा आशीर्वाद राहावा. त्यांना त्यांचे पवित्र काम व्यवस्थितरित्या आणि धैर्याने पार पाडण्याकरिता देवाची कृपा नेहमीच लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. 

२.  इथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या कुटुंबात शांती, प्रेम आणि एकोपा सतत नांदावा. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवर देवाचा आशीर्वाद नेहमी राहावा आणि प्रत्येक घर देवाच्या उपस्थितीने भरून जावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 

३. आपल्या घरात असलेल्या वृद्ध आई-वडिलांना चांगले आरोग्य आणि शांती लाभावी. त्यांच्या आजारपणात त्यांना परमेश्वराच्या कृपेने चांगले स्वास्थ्य मिळावी आणि त्यांना प्रेमळ काळजी व सांत्वन मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. 

४. जे तरुण-तरुणी योग्य साथीदाराच्या शोधामध्ये आहेत, त्यांना देवाच्या इच्छेनुसार योग्य आणि विश्वासू साथीदाराची जोड मिळावी. त्यांच्या भावी वैवाहिक जीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि आशीर्वाद राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया. 

५. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपल्या हृदयातील सर्व गरजा आणि इच्छा परमेश्वरासमोर सादर करूया. 

समाप्ती प्रार्थना: हे दयाळू आणि उदार पित्या, तू आम्हांला तुझ्या द्राक्षमळ्यात बोलावले आहेस. आमच्या या सर्व प्रार्थना कृपापूर्वक ऐक आणि आम्हांला तुझ्या इच्छेनुसार जगण्याची कृपा दे. आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही ही प्रार्थना करतो.आमेन.


Friday, 11 September 2026

Reflections for the Homily of 24th Sunday in Ordinary Time (13-09-2026) By Fr. Suhas Pereira

सामान्य काळातील चोविसावा रविवार

दिनांक: १३/०९/२०२६
पहिले वाचन: बेनसिरा ची बोधवचने २७:३३-२८:९
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १४:७-९

शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील चोवीसावा रविवार साजरा करत आहोत आणि आजची उपासना आपल्याला क्षमाशीलतेच्या, दयेच्या आणि समेटाच्या मार्गाची आठवण करून देऊन त्या मार्गावर आपल्या जीवनात चालण्याचे आव्हान देत आहे. क्षमाशीलतेसाठी आपण आपल्या जीवनात दोन प्रकारच्या मापाचा वापर करत असतो: एक माप दयेचे जे आपण स्वत:साठी वापरतो आणि दुसरे माप न्याय-निवडायचे जे आपण इतरांसाठी वापरत असतो. परंतु परमेश्वर हा सर्वांना समान मापाने दया आणि क्षमा देतो. परमेश्वराची दया आणि क्षमा ही अमर्याद असल्यामुळे आपणसुद्धा इतरांना दया दाखवण्यात आणि क्षमा देण्यात दैवी उदारता दाखवावी असं आजची उपासना आपल्याला सांगत आहे. आजच्या शुभवर्तमानात, पेत्र येशूला विचारतो की, माझ्या बंधूने माझ्या विरुद्ध अपराध केला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? सात वेळा? येशू उत्तर देतो, "सात वेळा नव्हे, तर सातच्या सत्तर वेळा." क्षमा करणाऱ्या सेवकाच्या दृष्टान्ताद्वारे येशू आपल्याला आठवण करून देतो की, आपल्याला देवाची विपुल दया लाभली आहे आणि म्हणूनच आपणसुद्धा इतरांबरोबर  दयाळू वृत्तीने वागलो पाहिजेत.

या पवित्र मिस्साबलीच्या सुरुवातीला आपण आपल्या हृदयाची झडती घेऊ या. आणि स्वतःला विचारूया: माझ्या जीवनात अशी व्यक्ती आहे का जिला जिला क्षमा करणे आपल्याला कठीण जात आहे? माझ्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी कटुता, राग किंवा दुखावणारी भावना अजूनही घर करून राहिली आहे का? आपण हे सर्व प्रभूच्या चरणी अर्पण करूया आणि ज्याप्रमाणे आपल्याला क्षमा मिळाली आहे, त्याचप्रमाणे इतरांना क्षमा करण्याची कृपा त्याच्याकडे मागूया. हा पवित्र मिस्साबली संस्कार आपली हृदये कोमल करो, आपले नाते-संबंध सुधारो आणि आपल्याला देवाच्या दयेची शांतीची साधने बनवो.

मनन चिंतन:

आजच्या उपासनेची तिन्ही वाचने आपल्यापुढे एक आव्हानात्मक आणि आपल्याला रोजच्या जीवनात अनुभवायास मिळणारे वास्तव सादर करतात. हे वास्तव आहे दोष, शांती आणि समेटाचं वास्तव. आपण अनेक वेळा शांतीबद्दल वाचतो, ऐकतो परंतु एक महान सत्य विसरतो: शांतीची सुरुवात आपल्या जीवनापासून, आपल्या झाली पाहिजे. संत मदर तेरेसा म्हणतात, कि "शांती आणि युद्धाची सुरुवात घरातूनच होते; त्यामुळे जर आपल्याला जगात खरोखरच शांतता हवी असेल, तर आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबात एकमेकांवर प्रेम करण्यापासून त्याची सुरुवात केली पाहिजे." ज्या गोष्टीद्वारे आपला समाज तेजोमय झाला पाहिजे असं आपल्याला वाटते, त्या गोष्टीचा उगम आपल्या घरात झाला पाहिजे.

          माझ्या वैयक्तिक, खाजगी जीवनात शांती आहे हा? मी समेटासाठी सदैव तयार असतो का? त्या ऐवजी आपण आपला स्वतःचा राग आणि असंतोष नगण्य-योग्य मानतो, आणि सदैव दुसऱ्यांमध्ये दोष शोधात नाहीत का? स्वतःच्या चुका झाकून ठेवणे किंव्हा त्यांकडे डोळेझाक करणे आपण सहसा पसंत करतो. परंतु, राग आणि क्रोधाबाबत तर, आजची उपासना एक वेगळेच मत मांडत आहे. पहिलं वाचन आपल्याला सांगते: “राग आणि क्रोध हे घृणास्पद आहेत; केवळ पापीच त्यांना धरून राहतो. जो माफ करत नाही, त्याचा बदला प्रभूच घेतो; त्याची पापे प्रभूच्या स्मरणात राहतात.” पहिलं वाचन आपल्या पापांच्या वास्तविक स्वरूपाचे जणूकाही वर्णन करत आहे. आपले वाद, राग आणि द्वेष यांच्याकडे क्षुल्लक गोष्टी पहिलं वाचन क्षुल्लक नाही, तर पाप मानते. आणि हे पाप आपल्या आध्यात्मिक मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच, आपण आपल्या  अंताचा विचार केला पाहिजे, मृत्यूचा विचार केला पाहिजे आणि द्वेष सोडून दिला पाहिजे!” असे पहिलं वाचन आपल्याला सांगते.

          आजच्या शुभवर्तमानत आपण वाचतो, “मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूंही आपल्या सोबतीचा दासावर करावयाची नव्हतीस काय? देवाने आपल्याला अगणित वेळा क्षमा केली आहे. देवाकडून मिळणाऱ्या उदार क्षमादानामुळेच आपण जिवंत आहोतआपल्या प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजेजर देवाने आपल्या सर्व चुकांचा हिशोब ठेवला असता आणि आपल्याला क्षमादान दिले नसते  तर आपण आज कुठे असतो? आपली परिस्थिती काय असती? परंतु देव असा नाही! तो क्षमाशील आहे आणि सदैव दया आणि क्षमा देतो. वारंवार तो आपल्याला जीवनाची नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. हे सत्य आपण कदापि विसरता कामा नये.

 देवाने आपल्याला आपल्या सर्व पापांची प्रत्येक वेळेला क्षमा करतो. म्हणून  आपणसुद्धा त्याचप्रमाणे वागलो पाहिजेत. आपणसुद्धा इतरांना क्षमा करण्यास तयार असलो पाहिजेत. आजच्या पहिल्या वाचनातील शब्द आपण लक्षात ठेवूया: “तुझ्या अंतिम घटकेची आठवण ठेव, आणि द्वेष करण्याचे सोडून दे. मृत्यूचा विचार कर आणि वैरभाव सोडून दे."

आपलं जीवन हे परमेश्वर पित्याच्या संयमी आणि दयाळू वृत्तीवर आणि प्रेमावर विसंबून आहे, हे आपण सदैव स्मरणात ठेवावे. आणि जेव्हा आपल्याला इतरांना क्षमादान देणे कठीण जाते, तेव्हा परमेश्वराने आपल्याला आपल्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे, या सत्याची आठवण ठेवू या. स्तोत्रसंहितेमधील आजचं स्तोत्र आपलं स्तुतिगीत करूया: हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको."

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

परमेश्वर आपल्या दयाळू पित्याकडे आता आपण आपल्या सर्व गरजांसाठी प्रार्थना करू या.

प्रतिसाद: हे परमेश्वरा आम्हाला तुझ्या दयेने भर.

) आपले परमगुरुस्वामी. सर्व महागुरुस्वामी, धर्मगुरू, धर्मभगिनी, व्रतस्थ आणि सर्व ख्रिस्ती भाविकांनी दया आणि क्षमाशीलतेचं जीवन जगून आपल्या जीवनाद्वारे परमेश्वराच्या दयेचे साक्षीदार व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

) अनियमित पावसामुळे पिकांचं सतत नुकसान होत असल्यामुळे जीवनात खचून जात असलेल्या आपल्या शेतकरी बांधवाना सरकारकडून आणि त्याचप्रमाणे सेवाभावी संस्था आणि लोकांकडून मदत मिळावी आणि त्यांच्या जीवनातील आशेची ज्योत प्रफुल्लित व्हावी म्हणून आपण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया.

) शिक्षणातील भ्रष्टाचार आणि गोंधळामुळे उज्वल आणि सुखी भविष्याची आशा सोडून देत आहेत अशा तरुण-तरुणींसाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या जीवनात धैर्याने आणि चिकाटीने पुन्हा एकदा अभ्यास करून उज्ज्वल यश त्यांनी मिळवावं आणि त्याचप्रमाणे शिक्षणातील अनियमितता आणि भ्रष्टाचार समुळ नष्ट करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यासाठी सरकारला सुबुद्धी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

) आपल्या कुटुंबातील आणि समाजातील सर्व आजारी व्यक्तींना परमेश्वराने कृपेच्या स्पर्शाने बरे करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

) आपल्या सर्व वयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.

हे परमेश्वरा तुझ्या चरणी आणलेल्या आमच्या विनंत्या आणि गरजांचा दयेने स्वीकार कर आणि तुझी दया आणि तुझा आशीर्वाद आम्हावर सदैव राहू दे. हि प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन