Reflections for the 26th Sunday in Ordinary Time (01/10/2023) By. Br. Benjamin Alphonso.
सामान्य काळातील सव्विसावा
रविवार
दिनांक: ०१-१०-२०२३
पहिले वाचन: यहेज्केल १८:२५-२८
दुसरे वाचन: फिलिप्पिकरांस पत्र २:१-११
शुभवर्तमान: मत्तय २१:२८-३२
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सव्विसावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या काळात
आपल्याला आढळते की भरपूर लोक मोज - मजेचे जीवन जगत आहेत व देवाच्या आज्ञेचे जास्त
पालन करीत नाहीत. आज देऊळ माता आपणास आज्ञाधारकपणा ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास
बोलावीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात यहेज्केल सांगतो की जर पापी लोकांनी दुष्कर्मे
सोडून सात्विकतेचे जीवन जगले तर त्याचे तारण होईल. दुसऱ्या वाचनात संत पॉल फिलिप्पिकरांस लिहिलेल्या पत्रामध्ये सांगतो की
सर्वांनी एकमेकांवर प्रेम करून एक दिलाने व एक मनाने राहावे व ख्रिस्ता सारखे जीवन
जगावे. आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त दोन मुलांच्या बोधकथेवर आज्ञाधारकपणाचा
संदेश आपणाला देत आहे. आज देऊळ माता संत तेरेजा ह्यांचा सण साजरा करीत आहे. ज्या
आपल्या जीवनात नेहमी आज्ञाधारक राहिल्या. आपण नेहमी देवाच्या आज्ञेत रहावे म्हणून
ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.
मनन चिंतन:
आज जगात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या
व्यक्ती आढळतात काही व्यक्ती ज्या नेहमी आपल्याला “हो” म्हणतात पण काम कधीच करीत
नाहीत. काही व्यक्ती ज्या “नाही” म्हणतात पण नंतर आपले काम करतात. आपल्याला मदत
करतात. निवडणुकीच्या अगोदर सर्व पक्षांचे उमेदवार लोकांना अनेक प्रकारची वचने
देतात पण निवडणूक संपताच हे सर्व विसरून जातात. अशा प्रकारची माणसे आपल्याला सर्व
क्षेत्रात दिसतात. ही लोक दुसऱ्यांना मदत करण्याऐवजी स्वतःचेच खिशे भरतात. ते फक्त
स्वतःच्याच भल्यासाठी जगतात. आजच्या शुभवर्तमनामध्ये येशू ख्रिस्ताने अशा
लोकांविषयी तुलना "एका माणसाचे दोन मुलगे" ह्या बोधकथेद्वारे केली आहे. ह्या
बोधकथेत दोन प्रकारच्या व्यक्ती प्रस्तुत केल्या आहेत. ह्या दृष्टांतामध्ये दोन
मुलांची मनोवृत्ती चांगली नव्हती परंतु जो धाकटा मुलगा असतो त्याला नंतर कळून
चुकले की त्यांनी वडिलांच्या आज्ञेचा भंग केलेला आहे म्हणून तो पश्चाताप करतो आणि
वडिलांची आज्ञा पाळतो.
इथे प्रभू येशू यहुदी व जकातदार ह्यामध्ये
असलेली तुलना दर्शवली आहे. यहुदी लोकांनी ईश्वराच्या नियमाचे पालन केले नाही
म्हणून ते देवाच्या शिक्षेस पात्र ठरले आहेत परंतु जे पापी लोक होते त्यांनी
त्याच्या जीवनाचा कायापालट करून देवाच्या शिक्षेस मुकले आहेत. म्हणून आपण
इतरांच्या वाईट कृत्याकडे लक्ष न देता ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे चालावे आणि हाच
मार्ग आहे सुखदायी जीवन जगण्याचा. जर आपण सत्याच्या म्हणजेच देवाच्या मार्गावर
आहोत तर आपण दुसऱ्याचे ऐकू नये कारण ज्या प्रकारे चांगले शब्द आपणाला प्रेरणा
देतात त्याचप्रमाणे वाईट शब्द व विचार आपला आत्मविश्वास कमजोर करतात म्हणून आपण
काय ऐकायचे व काय नाही ह्यावर आपण विचार केला पाहिजे म्हणूनच असे म्हणतात. “ऐकावे
जनाचे पण करावे मनाचे”.
जर आपण देवाची आज्ञा पाळून
धार्मिकतेच्या मार्गावर चाललो तर समाजामध्ये ऐकता, प्रेम, बंधुभाव, सेवा, नम्रता व
लीनता दिसून येणार. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की आपली जी मनोवृत्ती आहे ती
ख्रिस्तासारखी असली पाहिजे. ख्रिस्तामध्ये आपण देखील लीन झालो पाहिजे. कारण येशू
ख्रिस्त हा ईश्वर असूनही आपणामध्ये जन्म घेऊन दासाचे रूप धारण केले व शेवटी कृसावर
मरून आपल्याला पापमुक्त केले.
संत व महान नेते हे नेहमी आपल्या जीवनात
देवाच्या इच्छेला आज्ञेला प्राधान्य देताना आढळतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आब्राहम
लिंकन ह्यांच्या जीवनात घडलेली एक घटना. जेव्हा अब्राहम लिंकन अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा अमेरिकेत शीत्तयुद्ध सुरू होते. त्यावेळेला त्यांनी
आपल्या सर्व नेत्यांची बैठक बोलावली होती. तेव्हा चर्चा सुरू असताना एक नेता
म्हणाला मला शंका येत की देव आपल्या बरोबर आहे की नाही? तेव्हा लिंकन उद्गारले मला
त्याची भीती वाटत नाही पण मला शंका येते की आपण देवाबरोबर आहोत की नाही.
आपण आपल्या आज्ञाधारकाद्वारे देवाबरोबर
असणे फार महत्त्वाचे आहे म्हणून आजच्या मिस्साबलिदानात सहभागी होत असताना येशू
ख्रिस्ताचे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवून जीवनामध्ये विनम्रता, लीनता, सेवाभाव,
क्षमा, प्रेम व त्यागाची वाढ निवडून ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न
करूया व ईश्वराचे प्रेम दुसऱ्यांपर्यंत पोहोचवून आपले जीवन धन्य करावे म्हणून
प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे देवा दया कर व
आमची प्रार्थना ऐक.
१) ख्रिस्तसभेचे अधिकारी व पोप महाशय
सर्व बिशप्स, धर्मगुरू, व्रतस्त बंधू-भगिनींनी ह्यानी सत्याच्या मार्गावर चालून
इतरांना सत्याचा मार्गावर चालण्यास मदत करावी म्हणून प्रार्थना करूया.
२) हे दयाळू परमेश्वरा आम्ही सर्व
ख्रिस्ती लोकांसाठी प्रार्थना करतो की त्यांनी आपला स्वार्थ सोडून सत्याच्या व
प्रेमाचा मार्गाचा अवलंब करावा म्हणून प्रार्थना करूया.
३) हे प्रेमळ परमेश्वरा आम्ही सर्व युवक
युवती, लहान मुलांसाठी प्रार्थना करतो त्यांनी आपल्या आई वडिलांच्या, वडीलधाऱ्या
मंडळींच्या, आज्ञा पाळाव्यात व त्याचे भविष्य उज्वल व्हावे म्हणून प्रार्थना करूया
४) हे सर्व समर्थ परमेश्वरा आज आम्ही
आजारी लोकासाठी व जे अडचणीत व संकटात आहेत
अशांसाठी प्रार्थना करतो. त्यांना आशीर्वादित कर व त्यांच्या अडचणी दूर कर म्हणून प्रार्थना
करूया.
५) आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी
प्रार्थना करूया.