Reflection for the Homily of Solemnity of Epiphany of the Lord (05-01-2025) by Fr. Benjamin Alphonso
प्रकटीकरणाचा सण
दिनांक: ०५/०१/२०२५
पहिले वाचन: यशया ६०:१-६
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ३:२-३,५-६
शुभवर्तमान: मत्तय २:१-१२
प्रस्तावना
आज पवित्र देऊळमाता प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा म्हणजेच तीन राजांचा सण (सोहळा) साजरा करत आहे. प्रभू येशू जगाचा प्रकाश आहे. यशया संदेष्टा आजच्या पहिल्या वाचनात आपणास सांगतो, सर्व राष्ट्रे एक होऊन प्रभूच्या प्रकाशाकडे येतील. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला देवाच्या प्रकटीकरणाविषयी सांगतो. हे प्रकटीकरण सर्व लोकांसाठी आहे आणि म्हणूनच विदेशीयांना सहवास व सहसभासद करून संत पौल त्यांचा उल्लेख करीत आहे. तर आजचे शुभवर्तमान आपल्याला तीन राजांची ख्रिस्ताला दिलेली भेट याविषयी सांगत आहे. तीन राजांनी, ज्याप्रमाणे आपली दाणे ख्रिस्ताला समर्पित केली. त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या तेजस्वी प्रकाशाला शरण जाऊन, आपले सर्वस्व त्याच्या चरणी समर्पित करूया. तसेच आपल्या व इतरांच्या जीवनात आनंद व प्रकाश निर्माण व्हावा म्हणून, आजच्या या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.
मनन चिंतन
संत
मदर तेरेजा यांच्या जीवनात घडलेली सुंदर अशी बोधकथा आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबॉन या
शहरात तिकडच्या आर्चबिशपने मदर तेरेजा आणि त्यांच्या सिस्टरला कार्य करण्यासाठी
आमंत्रित केले होते. मदर तेरेजा व त्यांच्या भगिनींनी त्या शहरातील लोकांना (कुटुंबांना)
भेट दयायचे ठरवले. त्याप्रमाणे तिकडच्या घरांना भेट देत होत्या.
एक
दिवस मदर तेरेजा व त्यांच्या सिस्टर्स एका
ठिकाणी भेट देत होत्या, तेव्हा त्या एक घर (रूम) आढळली, जी बऱ्याच दिवसापासून बंद
होती. त्यांनी त्या घराचा दरवाजा ठोठावला, तेव्हा एका वृद्ध व्यक्तीने तो दरवाजा
उघडला. आतमध्ये अंधार होता व घर जाळ्याने व धुळीने भरलेले होते. तेव्हा मदर तेरेजानी
त्या व्यक्तीला विचारले की, आम्ही तुझे घर साफ स्वच्छ करू का? तेव्हा त्या
व्यक्तीने हो म्हटले. मदर तेरेजा व सिस्टरांनी ते घर स्वच्छ केले. तेव्हा त्यांना
एक सुंदर दिवा सापडला. मदर तेरेजानी त्या व्यक्तीला विचारले की, तुम्ही हा दिवा का
पेटवत नाही? तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिले: मी एकटा आहे आणि मला कोण भेटायला
येत नाही, मग कोणासाठी दिवा लावू. तेव्हा मदर तेरेजानी त्याला विचारले, जर आमच्या
दोन सिस्टर्स रोज तुम्हाला भेटायला आल्या तर, तुम्ही तो दिवा रोज लावाल का? त्यानी
हो म्हटले. त्या दिवसापासून रोज दोन सिस्टर्स त्या व्यक्तीला भेटायला जायच्या व तो
व्यक्ती दिवा लावायचा. मदर तेरेजा भारतात परत आल्या, तेव्हा त्या व्यक्तीकडून मदर तेरेजाला
पत्र आले. तुमच्या सिस्टर्स मला रोज भेटायला येतात त्याबद्दल आभारी. आता मला त्या
भेटायला आल्या नाहीत तरी चालेल कारण मला ‘ख्रिस्त खरा प्रकाश’ मिळाला आहे. मी रोज
दिवा लाविन.
प्रभू
ख्रिस्त खरा जीवनाचा प्रकाश आहे. ज्यांना ख्रिस्त सापडतो. त्यांना खरा प्रकाश व
मार्ग मिळतो. तीन मागी राजांना ख्रिस्तबाळाचा प्रकाश सापडला. तसेच मेंढपाळांना
सुद्धा प्रकाश व तारा सापडला. त्यांना जीवनाचा खरा अर्थ व मार्ग सापडला.
येशू
ख्रिस्त हा ‘प्रकाशाचा प्रकाश’ व ‘राजांचा राजा’ आहे. हे तीन मागी राज्यांना समजले होते. म्हणून
कुठलाही विचार न करता, ते लगेच ख्रिस्ताच्या दर्शनासाठी आपले दाणे घेऊन बेथलहेम
गावाकडे निघतात. बायबल मध्ये आपल्याला त्यांच्याविषयी जास्त काही सांगण्यात आलेले
नाही, ती तीन राजे ज्ञानवंत, गुणवंत व यशवंत होते. ते येशु बाळाचे दर्शन
घेण्यासाठी पूर्वेकडून आले. असे सांगतात की, त्या तीन राज्यांची नावे आस्थर, रूफस
आणि मेलकीओर होते. येशु बाळाला भेटण्यासाठी ते रिकाम्या हाताने न येता, ते
आपल्याबरोबर सोने, धूप व गंधरस आणून ते येशू बाळाला दान म्हणून भेट करतात. त्या
तीन दानांचा खालील प्रमाणे होता. सोने म्हणजे राजांचा सुवर्ण मुकुट. येशू हा
राजांचा राजा आहे. म्हणून सोने येशूचा राजेपणा दर्शवितो. धूप म्हणजे येशूचे देवपण.
जरी शब्द मनुष्य झाला, तरी तो देवाचा पुत्र होता आणि गंधरस येशूच्या मृत्यूशयेवर
शिपडण्यासाठी आणले होते.
परमेश्वर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आणि ठिकाणी दर्शन देत असतो. आपण परमेश्वराला ओळखले पाहिजे. ज्याप्रमाणे तीन राजाने देवाला येशू बाळामध्ये ओळखले. तसेच आपण सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देवाने प्रकट केलेल्या रूपात देवाला ओळखणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण नम्र होऊन प्रार्थना केली पाहिजे. आपणही येशु बाळासमोर नतमस्तक होऊया. ह्या पवित्र मिस्साबलीत प्रार्थना करूया की, आपला विश्वास मजबूत व्हावा व दररोजच्या जीवनात देवाला ओळखावे. आमेन.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐकून घे.’
१. आपले परमगुरु स्वामी पोप फ्रान्सीस, महागुरू स्वामी, धर्मगुरू व व्रतस्थ ह्या सर्वांना
देवाचा आशीर्वाद लाभाव व त्यांच्या पवित्र जीवनाद्वारे त्यांचा प्रकाश इतरांपर्यंत
पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या राजकीय पुढाऱ्यांना देवाचा आशीर्वाद
मिळावा व आपल्या सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठी करावा व खरी शांती जगात प्रस्थापित
करावी त्यासाठी त्यांना कृपया शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारांसाठी
आपण प्रार्थना करूया त्यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या कार्याने समाजाची प्रगती
व्हावी व वाईट गोष्टींचा धिक्कार करून चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यात त्यांना यश
प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या सर्वांसाठी आपणा प्रार्थना करूया की, जसे ज्ञानी पुरुष बाळ येशूला भेटायला गेले होते, त्याच प्रमाणे आपल्या समाजातील उपेक्षित व आजारी व्यक्तींना बाळ येशूचा संदेश
आपल्या जीवनाद्वारे देण्यास आपण तयार असले पाहिजे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.