Friday, 11 April 2025

Reflection for the Palm Sunday (13/04/2025) By Fr. Rakesh Ghavtya.


झावळ्यांचा रविवार

दिनांक: १३/०४/२०२५

पहिले वाचन: यशया ५०:४-७

दुसरे वाचन: फिलीपैकरांस पत्र २:६-११

शुभवर्तमान: लूक २२:१४-२३:५६


प्रस्तावना

आज आपण प्रभूयेशूच्या दुःखसहनाचा रविवार साजरा करत आहोत. ह्या रविवाराला झावळ्यांचा रविवार असेही संबोधले जाते. तसेच, आज आपण पवित्र आठवड्यात पदार्पण करतो. आजची उपासना आपल्याला प्रभू येशूच्या दुःख, मरण व पुनरुत्थान या रहस्यांवर मनन-चिंतन करण्यास आमंत्रित करत आहे. येशूने दुःख, यातना व मरण जगाच्या उद्धारासाठी सहन केले आणि पुनरुत्थानाचा मार्ग मोकळा केला.

आजच्या उपासनेचा हेतू हाच आहे की, आम्ही प्रभू येशूच्या नम्रता सहनशीलतेचा आदर्श अंगी बाळगावा. किंबहुना, प्रभूयेशूच्या नम्रता व सहनशीलतेच्या गुणांचा अनुभव घेऊन आम्ही आमचे जीवन ख्रिस्ताप्रमाणे जगावे.

या मिसा-बालिदानात सहभाग घेत असताना, प्रभूयेशुच्या दुःखसणावर सखोलपणे मनन-चिंतन करूया व  भक्तिभावाने त्याच्या रहस्यात समरस होऊन, आपल्या जीवनाची पडताळणी करून कृपेचे जीवन जगण्यासाठी विशेष कृपा व आशीर्वाद मागूया.

मनन चिंतन

प्रभूच्या नावाने येणारा राजा!
धन्यवादित असो!
स्वर्गात शांती, आणि उध्वलोकी गौरव! (लूक १९:३८)

आजचा हा रविवार म्हणजे आनंद आणि दुःख यांचे मिश्रण! आनंद यासाठी की, प्रभू येशूचा यहुदी लोकांनी जयजयकार केला आणि दुःख यासाठी की, याच लोकांनी येशूचा तिरस्कार केला व त्याला नाकारले. एका क्षणी जयजयकार आणि दुसऱ्या क्षणी धिक्कार, अपमान व विरोध! खरं पाहिलं, तर एकच दिवस प्रभूच्या सन्मानासाठी होता व  त्यानंतर त्याला दुःखाच्या दरीत टाकण्यात आले.

ख्रिस्त आमचा तारणकर्ता होता आणि तारणकर्ता म्हणून त्याला दुःख, मरण आणि पुनरुत्थान या अवस्थांतून जाणे अगत्याचे होते. याचसाठी ख्रिस्ताने मोठ्या विजयाने येरूसलेमच्या पवित्र नगरीत प्रवेश केला. ज्या प्रवेशाने आमच्या तारणकार्याला सुरुवात झाली. त्या प्रवेशाचे आपण भक्तिभावाने स्मरण करतो व ख्रिस्ताबरोबर श्रद्धेने मार्गक्रमण करतो, हे आपण आजच्या उपासनेत ऐकतो.

आजची उपासना आपल्याला प्रभू येशूच्या नम्रता सहनशीलता या दोन पैलूंवर चिंतन करण्यास पाचारण करते. त्याचबरोबर, आजच्या तिन्ही वाचनांमधून आपल्याला हाच संदेश मिळतो की, परमेश्वरासाठी सर्वकाही नम्रतेने सहन करावे, हीच परमेश्वराची इच्छा पूर्ण करणे आहे.

पहिल्या वाचनात, यशया संदेष्टा म्हणतो की, “मी परमेश्वरासाठी नम्रतेने व विनयशीलतेने सर्व अपमान व तिरस्कार सहन केला. कारण परमेश्वर माझ्या सहाय्यास आहे, यावर माझी श्रद्धा आहे.”

दुसऱ्या वाचनात, संत पौल फिलीपिकरास लिहिलेल्या पत्रात प्रभूयेशुविषयी सांगतो कि, प्रभू येशू, देव असूनही त्याने दास्यत्व स्वीकारले. तो आम्हासाठी रिक्त झाला, लीन झाला व  आम्हापुढे नम्रतेचे व सहनशीलतेचे उदाहरण ठेवले. म्हणूनच देवाने त्याला अत्युच्च केले.

आजच्या शुभवर्तमानात, संत लुक प्रभू येशूच्या दुःखसहनाबद्दलची घटना कथन करतो. जे शिष्य त्याच्याबरोबर राहिले, त्यापैकीच एकाने त्याला विकले, दुसऱ्याने नाकारले आणि तिसऱ्याने त्याचा घात केला. तरीही हे सर्व येशूने नम्रतेने सहन केले. प्रभू येशूने कोणालाही दोषी ठरवले नाही, परंतु त्यांना जीवन बदलण्याची संधी बहाल केली.

प्रभू येशूच्या संपूर्ण दुःखसहनाच्या मार्गात आपल्याला पुढील गोष्टी दिसून येतात:
१. प्रभू येशूचे स्वतःवर नियंत्रण होते.
२. त्याने देवाच्या इच्छेला प्राधान्य दिले.
३. देवासाठी नम्र अंतःकरणाने सर्व काही सहन केले.

प्रभू येशूने पापरहित असूनही, आम्हा पाप्यांकरिता स्वेच्छेने दुःख सहन केले. निर्दोष असूनही, आपल्याला दोषमुक्त करण्यासाठी त्याने मरण स्वीकारले. त्याच्या मरणाने आपली पापे नष्ट झाली. आपल्या पुनरुत्थानाने त्याने आम्हाला आध्यात्मिक नवजीवन मिळवून दिले. हाच तर आजच्या उपासनेचा खरा अर्थ आहे.

जरी प्रभू येशूला ठाऊक होते की, जी प्रजा "होसान्ना!" म्हणत जयजयकार करत होती, तीच लोकं पुढे पलटवार करणार, तरी येशूने त्यांना रोखले नाही. याच लोकांनी आपल्या मुखाने येशूची स्तुती केली, घोषणा करत म्हणाले, “होसान्ना, दावीदाचा पुत्र!” पण त्यांनीच पुढेत्याला वधस्तंभी खिळा!” “त्याला ठार मारा.” असे म्हटले. ज्या लोकांनी येशूचे स्वागत केले, त्याच लोकांनी त्याचा तिरस्कार केला. कारण त्यांनी येशूला अध्यात्मिक तारणारा मसीहा म्हणून ओळखले नाही. खरे पाहता ज्या तरणारयाची यहुदी लोक वाटत पाहत होते, त्यांची अपेक्षा अशी होती कि, येणारा मसीहा राजेशाही रुपात येईल, घोड्यावर राजेशाहि पद्धतीने थाटामाटात गाजत-वाजत येईल. परंतु येशूने राजासारखा घोडा न निवडता, येशू गाढवावर बसून आला व त्याने मंदिरात प्रवेश केला. हाच होता प्रभू येशूचा खरा नम्रपणा.

परंतु हे यहुदी लोकांच्या विचारसरणीच्या पलीकडे होते. त्यांना वाटायचं की, तारणारा मसीहा हा ऐश्वर्यात येईल. यास्तव , यहुदी लोकांनी येशूला आपला तारणारा मसीहा म्हणून स्वीकारले नाही.

आज ‘झावळ्यांचा रविवार’ आपल्याला हीच आठवण करून देतो की, ख्रिस्त हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा व हृदयाचा खरा राजा आहे. तो आपल्या कुटुंबाचा व संपूर्ण विश्वाचा राजा आहे.

पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे की, “ख्रिस्त एक नम्र व शांतीप्रिय राजा म्हणून येरुसलेमेत दाखल झाला व तोच सर्व द्वेष, हिंसाचारापासून मानवतेला वाचवू शकतो.”

आपले रोजचे जीवन जगताना, जरी आपल्याला असंख्य अशा त्रासांना, वेदनांना, त्रास, छळांना सामोरे जावे लागले, तरी ते आनंदाने सहन करावे व जीवनात खचून न जाता, “माझ्याबरोबर चाला” म्हणजे तुमच्या दुःखाचे सुखात व मरणाचे पुनरुस्थानात रुपांतर होईल. असे येशूला प्रकट करायचे असेल, यात शंका नाही

आज प्रभू येशूच्या दुःखसह्नाच्या रविवारच्या, उपासनेत सहभाग घेत असताना, प्रभू येशूच्या दु:ख, मरण व पुनरुस्थानावर मनन चिंतन करून नम्रता व सहनशीलतेचा आदर्श प्रभू येशुकडून घेऊन कृपेचे जीवन जगण्यास विशेष प्रार्थना करूया 

विश्वासू लोकांची प्रार्थना

आपला प्रतिसाद :-  हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

धर्मगुरू: प्रिय भाविकांनो, प्रभू येशूने येरूसलेममध्ये प्रवेश करून आपल्या दुःखसहणाच्या विधीला आरंभ केला. या पवित्र आठवड्यात प्रवेश करताना, आपण प्रभू येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊया व आपल्या सर्व विनंत्या व गरजा त्याच्या चरणाजवळ भेटूया.

१. आपले पोप महाशय फ्रान्सिस, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक यांना प्रभू येशूच्या दुःखसहनाच्या रहस्यातून शक्ती व सामर्थ्य लाभो. इतरांच्या दुःखांवर व अडचणींवर मात करण्यासाठी ईश्वरी प्रेरणा लाभो, म्हणून प्रार्थना करूया.

२. पवित्र आठवड्यातील सर्व धार्मिक विधींमध्ये सहभागी होताना, आम्हाला देवाच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी. त्याचबरोबर आमच्या विश्वासात व श्रद्धेत वाढ होवो, म्हणून प्रार्थना करूया.

३. जे लोक देउळमातेपासून दुरावलेले आहेत, जे जीवनात निराश व हताश झाले आहेत, त्यांना प्रभू येशूचा स्पर्श व्हावा की जेणेकरून त्यांच्या स्वभावात व आचरणात बदल होवो आणि ते प्रभू येशूच्या अधिक जवळ यावेत, म्हणून प्रार्थना करूया.

४. हे जुबिली वर्ष परमेश्वराच्या कृपेचे आहे. जे तरुण-तरुणी जीवनात योग्य मार्ग शोधत आहेत, त्यांना प्रभू येशूने योग्य दिशा दाखवावी व त्यांनी ईश्वरी हाकेला योग्य प्रतिसाद द्यावा, म्हणून विशेष प्रार्थना करूया.

५. या क्षणी आपण आपल्या वैयक्तिक व सामुदायिक गरजांसाठी विशेष प्रार्थना करूया (क्षणभर शांततेने व्यक्तिशः प्रार्थना करा).

धर्मगुरू:
हे दयावंत पित्या, आम्ही तुझ्यासमोर विश्वासाने व श्रद्धेने आमच्या काही गरजा व विनंत्या सादर केल्या आहेत. त्या तू दयेने स्वीकारून घे, व आम्हाला तुझ्या कृपाशिर्वादाने भर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो, आमेन.


Thursday, 3 April 2025

Reflection for the Fifth Sunday of Lent (06/04/2025) By: Fr. Pravin Bandya

दिनांक: ०६/०४/२०२५.

पहिले वाचन: यशया ४३:१६-२१.

दुसरे वाचन: फिलीपौकरांस पत्र ३:८-१४.

शुभवर्तमान: योहान ८:१-११.


प्रस्तावना

      आज आपण प्रायश्चित काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेत पुन्हा एकदा आपण परमेश्वराचे मानवावर असलेले प्रेम व दया ह्याविषयी ऐकत आहोत. परमेश्वराने आपणास त्याच्या  प्रतीरुपासारख निर्माण केले आहे (उत्पत्ती १:२७); म्हणून तो आपणावर अमर्यादित प्रेम करतो. आपण सर्वजण पापी आहोत, तरीही तो आपणास प्रायश्चित करण्याची आणखी संधी देतो. कि जेणेकरून आपण प्रायश्चित संस्कार स्वीकारून पुन्हा त्याच्याकडे जाऊ. 

       आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सांगतो कि, परमेश्वर आपला उद्धारकर्ता आहे. जो आपल्याला अंधारातून बाहेर काढतो आणि प्रकाशात आणतो; जो पाण्यातून आणि नद्यांतून मार्ग काढतो; आणि तोच परमेश्वर त्याच्या लोकांना बंदिवासातून बाहेर काढून एका नवीन भूमीत घेऊन जाईल.  हे आपणास आठवण करून देते कि, देव अगदी कठीण काळातही नेहमीच आपल्यासोबत असतो. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो कि, “खरोखर, माझा प्रभू ख्रिस्त येशूला ओळखण्याचा श्रेष्ठ मुल्यामुळे मी सर्वकाही तोटा मानतो”. हे आपणास आठवण करून देते कि ख्रिस्ताचा आपला पाठलाग हा आपला सर्वोच्च प्राधान्य असला पाहिजे आणि इतर गोष्टी दुय्यम मानल्या पाहिजे. तसेच आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त दाखल्याद्वारे आपणास परमेश्वराचे आपणावर असलेलं प्रेम दाखवत आहे. आपण पापी असून देखील परमेश्वर आपणावर प्रेम करतो; हे त्या व्यभिचारी स्त्रीला क्षमा करून ख्रिस्त परमेश्वराचे प्रेम व दया दाखवत आहे. ह्या उत्तम संधीचा लाभ घेऊया व प्रायश्चित संस्कार स्वीकारण्यास आपल्या मन-अंतःकरणाची तयारी करूया.

मनन चिंतन

      रविवारचा दिवस होता, आम्ही तीस ते पस्तीस मुल-मुली धर्मशिक्षणाच्या वर्गात गप्पा मारत होतो. तेव्हा फादर जेम्स आमच्या वर्गात आले; आम्ही सर्वांनी त्यांना सकाळच्या शुभेछ्या दिल्या. फादारांनी एक-दोन विनोद केले ज्यावर आम्ही सर्वजण हसलो. तेव्हा फादर बोलले कि, चला आपण एक खेळ खेळू. आम्ही सर्वांनी होकार दिला. फादर बोलले कि, “मी काही शब्द उचारणार आणि जर का तुम्ही त्या प्रमाणे वागत असणार, तर तुम्ही स्वःतावर बोट दाखवा आणि जर त्या प्रमाणे वागत नसाल तर जो कोणी तो किंवा ती व्यक्ती त्याप्रमाणे असेल त्यांच्यावर तुम्ही तुमचे बोट करा. पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी होकार दिला. तेव्हा फादर बोलले, “हुशार कोण आहे?”. आम्ही सर्वांनी आम्हा स्वतःवर बोट दाखवले. फादर बोलला, “शहाणा कोण आहे?” पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी आम्हा स्वतःवर बोट दाखवले. पुन्हा फादर बोलला, “चोर कोण आहे?” तेव्हा आम्ही इतरांवर बोट दाखवले. ह्यावर फादर बोलला कि, थोडावेळ तुमचे हात तशेच ठेवा आणि एकदा तुमच्या हाताकडे पहा. एक बोट तुम्ही इतरांकडे दाखवले आहे; परंतु तीन बोटे तुम्ही स्वतः तुम्हावर दाखवली आहेत; आता मला सांगा कि तुमच्यात चोर कोण? त्या वेळेला आम्हाला समजलं कि, जेव्हा आपण एक बोट इतरांवर दाखवतो तेव्हा तीन बोटे आपण स्वतःवर दाखवतो; म्हणजे जेव्हा आपण इतरांना दोषी ठरवतो, तेव्हा आपण स्वतः दोषी ठरतो. हा उत्तम धडा मी आठ ते नऊ वर्षाचा असतांना त्या फादरांकडून शिकलो.

       मत्तय ७:१ मध्ये ख्रिस्त सांगतो कि, “तुम्ही इतरांचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही”. तसेच मत्तय ७: १२ मध्ये ख्रिस्त सांगतो कि, “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र आणि संदेष्टग्रंथ ह्याचे सार हेच आहे.” मराठीत एक सुंदर म्हण आहे, “स्वतःच ठेवा झाकून आणि दुसऱ्यांच पहा वाकून.” म्हणजे आपण स्वतःचे दोष नेहमी झाकून ठेवतो व इतरांना दोषी ठरवतो. आपण स्वतःला संत समान समजतो व इतरांना पापी समजतो.

       आजच्या शुभवर्तमानात अशाच प्रकारच चित्र आपण पाहतो. काही शास्त्री व परुशी एका स्त्रीला येशूकडे आणतात व तिच्यावर दोषारोप करतात कि, “ही स्त्री व्यभिचार करत असता धरण्यात आली. मोशेच्या आज्ञे प्रमाणे हिला दगड मार केला पाहिजे; परंतु आपण तिच्याविषयी काय म्हणता?” ख्रिस्त त्यांचे विचार, त्यांचे अंतःकरण अगोदरच ओळखून होता. त्यांना एका दगडात दोन पक्षी मारायचे होते; एकाच वेळेला त्या स्त्रीला व ख्रिस्ताला देखील दोषी ठरवायचं होत. कारण जर का ख्रिस्ताने त्या स्त्रीला मोशेच्या आज्ञेप्रमाणे शिक्षा देण्यास सांगितले, तर तो स्वतःच्या शिकवणुकी विरूद्ध शिकवतो किंवा वागतो म्हणून त्याला दोषी ठरवतील (कारण ख्रिस्ताची शिकवण ही प्रेमाची शिकवण होती), आणि जर का त्याने देवप्रेमाखातर त्या स्त्रीला सोडलं तर मोशेच्या आज्ञे विरुद्ध जाण्यास ते त्याला दोषी ठरवतील. अशा प्रकारचं त्याचं षडयंत्र ख्रिस्त अगोदरच जाणून होता. म्हणून तो त्यांना प्रश विचारतो कि, “तुमच्या मध्ये जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड फेकावा?” ख्रिस्ताचे हे शब्द ऐकून लहानापासून ते थेट थोरांपर्यंत सर्व तेथून निघून गेले; फक्त ती स्त्री आणि ख्रिस्त हे दोघेच तिथे राहिले. कारण ह्या जगात असा एकही व्यक्ती नाही कि जो निष्पाप किंवा नीतिमान आहे. हेच संत पौल रोमकरांस ३:१० मध्ये म्हणतो कि, “शास्त्रात असे लिहिले आहे कि, ‘नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही.” परंतु आजचं शुभवर्तमान आपणास सांगत कि, “सर्व निघून गेले फक्त ख्रिस्त व ती स्त्री तेथे राहिली”. ह्याचा अर्थ ती स्त्री त्या घटकेपासून नीतिमान झाली. आणि हे आपणास दाखवून देते कि, जेव्हा आपण ख्रिस्ताकडे पश्चातापी अंतःकरणाने जातो, तेव्हा तो आपल्या सर्व अपराधांची क्षमा करतो; तो आपणास निष्पाप व नीतिमान बनवतो.

       शास्त्री आणि परुश्यांच्या दृष्टीने, ती स्त्री पापी होती, तिला मृत्युदंडाची शिक्षा देण्यास येशूकडे आणले होते, परंतु येशूच्या दृष्टीने, ती स्त्री निष्पाप होती. आपण पाप्यांशी कसे वागतो आणि देव त्यांच्याशी कसा वागतो यातील फरक यावरून अधोरेखित होतो. परुश्यांच्या हातातील दगड हे दाखवतात की मानव किती क्रूर असू शकतात, तर येशूच्या हृदयातील दया आपला देव किती प्रेमळ आहे हे दाखवते. आपल्याला दोन परस्परविरोधी वैशिष्ट्ये दिसतात: मानवी क्रूरता (दगडमार करून मारण्याची शिक्षा) आणि दैवी दया (बरे करणारे क्षमाशील प्रेम). परुशांकडे दोषी ठरवण्यासाठी कायद्याचे दगड होते, तर येशूकडे क्षमा करण्यासाठी प्रेमाचे हृदय होते. एक गोष्ट लक्षात ठेऊया, निर्जीव दगडापेक्षा प्रेमहीन हृदय अधिक हानिकारक असते.

 

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभोआम्हांला तुझ्या दयेचे प्रतिक बनव.”

१.आपले परमचार्यपोप फ्रान्सिसकार्डीनल्सबिशप्सधर्मगुरूधर्मबंधू-भगिनी व सर्व प्रापंचिक यांच्या कार्याद्वारेयेशू ख्रिस्ताच्या दयेची ओळख संपूर्ण जगाला मिळावी म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करूया.

२. ज्या विश्वासू लोकांनी कॅथोलिक संस्कार स्वीकारून देवाच्या कराराशी अतूट नाते जोडले आहेअशांना आप-आपल्या कुटुंबात प्रेमाने व दयेने राहण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.  नवीन विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांनी एकमेकांना दिलेल्या वचनांचे पालन करूनएक दुसऱ्यांना समजून घेऊन एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.  आपल्या गावातधर्मग्रामामध्ये व कुटुंबात जे लोक क्षमा करण्यास अशक्त आहेतअशांना व इतरांना क्षमा करण्यास प्रभूकडून प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.  थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.