Tuesday, 15 April 2025

Reflection for the Maundy Thursday (17/04/2025) By Dn. Jostin Pereira

आज्ञा गुरुवार


दिनांक १७--२०२५

पहिले वाचन: निर्गम १२:१-८, ११-१४

दुसरे वाचन: १ करिंथ. ११:२३-२६

शुभवर्तमान: योहान १३:१-१५

प्रस्तावना

प्रिय भाविकांनोआज आपण आज्ञा गुरुवार म्हणजेच पवित्र गुरुवार साजरा करत आहोत. या विधीसाठी तुमचे हार्दिक स्वागत. आजच्या उपासनेमध्ये आपण तीन गोष्टी प्रामुख्याने साजऱ्या करतोत्या म्हणजे

१) पवित्र मिस्साबलीची स्थापना

२) धर्मगुरूपदाची स्थापनाआणि 

३) प्रेमाची नवीन आज्ञा.

आपण पवित्र आठवड्यामध्ये पदार्पण केले आहे. आणि पुढचे तीन दिवस आपण येशूचे दुःखमरणव पुनरुत्थान हे जवळून अनुभवणार आहोत. आजच्या पहिल्या वाचनाद्वारे मेंढराचे रक्त शिंपडल्यावर देवाच्या लोकांची रक्षा कशाप्रकारे होते हे आपण ऐकणार आहोत. तरदुसरे वाचन आणि शुभवर्तमान ह्याद्वारे आपण पहिल्या वचनातील मेंढराचे स्थान हे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः घेऊन आपल्या प्राणाची आहुती देण्यापूर्वी आपल्या बलिदानाची पूर्वकल्पना शिष्यांना देतो. मृत्यूला न डगमगताधैर्याने व नम्रतेने आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा जाणून घेऊन येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत शेवटचे सहभोजन घेतो. या सहभोजनाच्या वेळी प्रेमाची एक नवीन आज्ञा आज या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर ठेवत आहे.

त्याच्या प्रेमाचा स्वीकार करून आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी इतरांवर प्रेम करावे आणि देवाच्या आज्ञेमध्ये राहून नेहमी इतरांची सेवा करावी म्हणून आजच्या मिस्साबलिदानामध्ये विशेष प्रार्थना करूया.

मनन चिंतन

“हे माझ्या आठवणीसाठी करा.”

ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन केले. त्यावेळेस तो जुन्या करारातील वल्हांडणाचा सण साजरा करत होता. ‘हे माझे शरीर आहे हे तुम्ही घ्या व खा, हे माझे रक्त आहे हे तुम्ही घ्या व प्या.’ या पवित्र शब्दाने येशूने वल्हांडणाच्या भोजनाचे परिवर्तन त्याच्या शरीर व रक्ताचा सोहळ्यात केले. त्याच्या स्मरणार्थ हा सोहळा दररोज साजरा केला जातो. प्रभू येशूच्या पुनरागमनापर्यंत त्याच्या मृत्युची घोषणा केली जाईल, व या भक्तीतून सार्वकालिक जीवनाचा करारच आपण साजरा करत असतो. त्याचा समय जवळ आला असता त्याने त्याच्या शिष्यांवर शेवट पर्यंत प्रेम केले. आपल्या मित्रांकरिता त्याने आपला प्राण दिला व मित्रांवर म्हणजेच त्याच्या शिष्यांवर असलेले प्रेम त्याने प्रकट केले. जशी त्याने प्रीती केली तशी आपणही प्रीती करू या.

“तू याजक युगा-युगाचा जगतातुनी मी तुला निवडीले.”

संत अगस्तीन म्हणतो, मा‍झ्या समोर देवदूत व धर्मगुरू आले तर प्रथम मी धर्मगुरूंना व नंतर देवदूतांना वंदन करीन कारणधर्मगुरू प्रतिख्रिस्त आहेत. त्यांच्या हाताने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते येशूला उपस्थित करतात. ख्रिस्तीजनांना तेच हात कम्युनियन देत असतात. खरोखर आपलं भाग्य आहे की आपल्यासाठी धर्मगुरू आहेत. ते आपल्यासाठी साक्रामेंत साजरे करतात व परमेश्वराची अदृश्य कृपा घेऊन येत असतात. त्यांचे दुर्बल हातच कृपेचा झरा बनतात.  अपात्र असूनही ईश्वरी कृपेमुळे ते उपासना विधी साजरा करतात. आपण धर्मगुरूंसाठी प्रार्थना करायला हवी. जे आजारी आहेतएकाकी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करायला हवी. आपल्या धर्मग्रामात सेवा करतात त्यांना सहकार्य करायला हवे. आज खरोखर धर्मगुरूंसाठी प्रार्थना करणे, त्यांची काळजी घेणे, त्यांना सहकार्य करणे, हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य आहे. एक बाई बिशपांकडे आली. स्थानिक धर्मगुरूबद्दल त्यांच्याकडे तिने तक्रार केली व म्हटले, आमच्या धर्मग्रामासाठी तरुण व तडफदार धर्मगुरू पाठवा. बिशपांनी त्या महिलेला म्हटले, तरुण, तडफदार धर्मगुरू माझ्याकडे नाही, तुम्ही तुमचा मुलगा मला देऊ शकता का?. त्या बाईने उत्तर दिले की 'मला एकच मुलगा आहे, मी त्याला फादर होण्यासाठी कसे पाठवू.' बिशपही त्या बाईला म्हणाले 'माझ्याकडे जे धर्मगुरू आहेत त्यांनाच मी पाठवू शकतो. तुम्ही त्यांना सहकार्य करा तुमच्या धर्मग्रामात नवचैतन्य नांदेल.

"नवीन आज्ञा तुम्हास माझी..."

आजच्या दिवशी ख्रिस्ताने आपल्याला नवीन आज्ञा दिली आहे: “तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली आहे, तशीच तुम्हीशी एकमेकांवर प्रीती करा.” (योहान: १२:३४) त्याहीपेक्षा त्याने आपल्याला प्रभू भोजन व गुरुपदाची उत्तम देणगी दिली आहे. पवित्र मिस्सा हाच आपल्याला एकमेकांची सेवा करण्यास कृपा देत असतो. जसे झऱ्यातून पाणी वाहत असते, तशी प्रीती व सेवा पवित्र मिस्सातून सतत पाझरत असते.

ख्रिस्ताने प्रेमाचा हा संदेश संपूर्ण जगासमोर ठेवला. जेव्हा त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. आज ख्रिस्ताच्या प्रेमाची व सेवेची शिकवण आत्मसात करून चांगले खिस्ती जीवन जगण्यास प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.”

१. ज्या प्रमाणे ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुवून एक आदर्श सेवेचा महामंत्र दिलात्याचप्रमाणे पोप सर्व महागुरू व धर्मगुरू ख्रिस्तसभेची सेवा करुन आपल्या समोर सेवामय जीवन जगुन एक आदर्श ठेवत आहेत. ख्रिस्ताप्रमाणे त्यांनी ख्रिस्तसभेची सेवा अखंडित करत असता आपणास त्यांच्यात ख्रिस्त दिसावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.   सर्व जगातील ख्रिस्ती व विविध पंथातील लोकांनी जरी आपण वेगवेगळ्या पंथाचे असलो तरी ख्रिस्ताने दिलेला सेवेचा मूलमंत्र अंगीकारून तो आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्या सर्व भारत देशवासीयांनी ख्रिस्ताप्रमाणे बंधू-प्रेमाची भावना जोपासून आपापसातील असलेले वादगैरसमज विसरून शांती व सलोख्याने एकत्रीत जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आपल्या मुलांना ख्रिस्ताने केलेल्या सेवेची ओळख व्हावी व त्यांनीही प्रभूसेवेसाठी देवाच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी स्वखुशीने पुढे यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आता आपण आपल्या सामाजिककौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.




Friday, 11 April 2025

Reflection for the Palm Sunday (13/04/2025) By Fr. Rakesh Ghavtya.


झावळ्यांचा रविवार

दिनांक: १३/०४/२०२५

पहिले वाचन: यशया ५०:४-७

दुसरे वाचन: फिलीपैकरांस पत्र २:६-११

शुभवर्तमान: लूक २२:१४-२३:५६


प्रस्तावना

आज आपण प्रभूयेशूच्या दुःखसहनाचा रविवार साजरा करत आहोत. ह्या रविवाराला झावळ्यांचा रविवार असेही संबोधले जाते. तसेच, आज आपण पवित्र आठवड्यात पदार्पण करतो. आजची उपासना आपल्याला प्रभू येशूच्या दुःख, मरण व पुनरुत्थान या रहस्यांवर मनन-चिंतन करण्यास आमंत्रित करत आहे. येशूने दुःख, यातना व मरण जगाच्या उद्धारासाठी सहन केले आणि पुनरुत्थानाचा मार्ग मोकळा केला.

आजच्या उपासनेचा हेतू हाच आहे की, आम्ही प्रभू येशूच्या नम्रता सहनशीलतेचा आदर्श अंगी बाळगावा. किंबहुना, प्रभूयेशूच्या नम्रता व सहनशीलतेच्या गुणांचा अनुभव घेऊन आम्ही आमचे जीवन ख्रिस्ताप्रमाणे जगावे.

या मिसा-बालिदानात सहभाग घेत असताना, प्रभूयेशुच्या दुःखसणावर सखोलपणे मनन-चिंतन करूया व  भक्तिभावाने त्याच्या रहस्यात समरस होऊन, आपल्या जीवनाची पडताळणी करून कृपेचे जीवन जगण्यासाठी विशेष कृपा व आशीर्वाद मागूया.

मनन चिंतन

प्रभूच्या नावाने येणारा राजा!
धन्यवादित असो!
स्वर्गात शांती, आणि उध्वलोकी गौरव! (लूक १९:३८)

आजचा हा रविवार म्हणजे आनंद आणि दुःख यांचे मिश्रण! आनंद यासाठी की, प्रभू येशूचा यहुदी लोकांनी जयजयकार केला आणि दुःख यासाठी की, याच लोकांनी येशूचा तिरस्कार केला व त्याला नाकारले. एका क्षणी जयजयकार आणि दुसऱ्या क्षणी धिक्कार, अपमान व विरोध! खरं पाहिलं, तर एकच दिवस प्रभूच्या सन्मानासाठी होता व  त्यानंतर त्याला दुःखाच्या दरीत टाकण्यात आले.

ख्रिस्त आमचा तारणकर्ता होता आणि तारणकर्ता म्हणून त्याला दुःख, मरण आणि पुनरुत्थान या अवस्थांतून जाणे अगत्याचे होते. याचसाठी ख्रिस्ताने मोठ्या विजयाने येरूसलेमच्या पवित्र नगरीत प्रवेश केला. ज्या प्रवेशाने आमच्या तारणकार्याला सुरुवात झाली. त्या प्रवेशाचे आपण भक्तिभावाने स्मरण करतो व ख्रिस्ताबरोबर श्रद्धेने मार्गक्रमण करतो, हे आपण आजच्या उपासनेत ऐकतो.

आजची उपासना आपल्याला प्रभू येशूच्या नम्रता सहनशीलता या दोन पैलूंवर चिंतन करण्यास पाचारण करते. त्याचबरोबर, आजच्या तिन्ही वाचनांमधून आपल्याला हाच संदेश मिळतो की, परमेश्वरासाठी सर्वकाही नम्रतेने सहन करावे, हीच परमेश्वराची इच्छा पूर्ण करणे आहे.

पहिल्या वाचनात, यशया संदेष्टा म्हणतो की, “मी परमेश्वरासाठी नम्रतेने व विनयशीलतेने सर्व अपमान व तिरस्कार सहन केला. कारण परमेश्वर माझ्या सहाय्यास आहे, यावर माझी श्रद्धा आहे.”

दुसऱ्या वाचनात, संत पौल फिलीपिकरास लिहिलेल्या पत्रात प्रभूयेशुविषयी सांगतो कि, प्रभू येशू, देव असूनही त्याने दास्यत्व स्वीकारले. तो आम्हासाठी रिक्त झाला, लीन झाला व  आम्हापुढे नम्रतेचे व सहनशीलतेचे उदाहरण ठेवले. म्हणूनच देवाने त्याला अत्युच्च केले.

आजच्या शुभवर्तमानात, संत लुक प्रभू येशूच्या दुःखसहनाबद्दलची घटना कथन करतो. जे शिष्य त्याच्याबरोबर राहिले, त्यापैकीच एकाने त्याला विकले, दुसऱ्याने नाकारले आणि तिसऱ्याने त्याचा घात केला. तरीही हे सर्व येशूने नम्रतेने सहन केले. प्रभू येशूने कोणालाही दोषी ठरवले नाही, परंतु त्यांना जीवन बदलण्याची संधी बहाल केली.

प्रभू येशूच्या संपूर्ण दुःखसहनाच्या मार्गात आपल्याला पुढील गोष्टी दिसून येतात:
१. प्रभू येशूचे स्वतःवर नियंत्रण होते.
२. त्याने देवाच्या इच्छेला प्राधान्य दिले.
३. देवासाठी नम्र अंतःकरणाने सर्व काही सहन केले.

प्रभू येशूने पापरहित असूनही, आम्हा पाप्यांकरिता स्वेच्छेने दुःख सहन केले. निर्दोष असूनही, आपल्याला दोषमुक्त करण्यासाठी त्याने मरण स्वीकारले. त्याच्या मरणाने आपली पापे नष्ट झाली. आपल्या पुनरुत्थानाने त्याने आम्हाला आध्यात्मिक नवजीवन मिळवून दिले. हाच तर आजच्या उपासनेचा खरा अर्थ आहे.

जरी प्रभू येशूला ठाऊक होते की, जी प्रजा "होसान्ना!" म्हणत जयजयकार करत होती, तीच लोकं पुढे पलटवार करणार, तरी येशूने त्यांना रोखले नाही. याच लोकांनी आपल्या मुखाने येशूची स्तुती केली, घोषणा करत म्हणाले, “होसान्ना, दावीदाचा पुत्र!” पण त्यांनीच पुढेत्याला वधस्तंभी खिळा!” “त्याला ठार मारा.” असे म्हटले. ज्या लोकांनी येशूचे स्वागत केले, त्याच लोकांनी त्याचा तिरस्कार केला. कारण त्यांनी येशूला अध्यात्मिक तारणारा मसीहा म्हणून ओळखले नाही. खरे पाहता ज्या तरणारयाची यहुदी लोक वाटत पाहत होते, त्यांची अपेक्षा अशी होती कि, येणारा मसीहा राजेशाही रुपात येईल, घोड्यावर राजेशाहि पद्धतीने थाटामाटात गाजत-वाजत येईल. परंतु येशूने राजासारखा घोडा न निवडता, येशू गाढवावर बसून आला व त्याने मंदिरात प्रवेश केला. हाच होता प्रभू येशूचा खरा नम्रपणा.

परंतु हे यहुदी लोकांच्या विचारसरणीच्या पलीकडे होते. त्यांना वाटायचं की, तारणारा मसीहा हा ऐश्वर्यात येईल. यास्तव , यहुदी लोकांनी येशूला आपला तारणारा मसीहा म्हणून स्वीकारले नाही.

आज ‘झावळ्यांचा रविवार’ आपल्याला हीच आठवण करून देतो की, ख्रिस्त हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा व हृदयाचा खरा राजा आहे. तो आपल्या कुटुंबाचा व संपूर्ण विश्वाचा राजा आहे.

पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे की, “ख्रिस्त एक नम्र व शांतीप्रिय राजा म्हणून येरुसलेमेत दाखल झाला व तोच सर्व द्वेष, हिंसाचारापासून मानवतेला वाचवू शकतो.”

आपले रोजचे जीवन जगताना, जरी आपल्याला असंख्य अशा त्रासांना, वेदनांना, त्रास, छळांना सामोरे जावे लागले, तरी ते आनंदाने सहन करावे व जीवनात खचून न जाता, “माझ्याबरोबर चाला” म्हणजे तुमच्या दुःखाचे सुखात व मरणाचे पुनरुस्थानात रुपांतर होईल. असे येशूला प्रकट करायचे असेल, यात शंका नाही

आज प्रभू येशूच्या दुःखसह्नाच्या रविवारच्या, उपासनेत सहभाग घेत असताना, प्रभू येशूच्या दु:ख, मरण व पुनरुस्थानावर मनन चिंतन करून नम्रता व सहनशीलतेचा आदर्श प्रभू येशुकडून घेऊन कृपेचे जीवन जगण्यास विशेष प्रार्थना करूया 

विश्वासू लोकांची प्रार्थना

आपला प्रतिसाद :-  हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

धर्मगुरू: प्रिय भाविकांनो, प्रभू येशूने येरूसलेममध्ये प्रवेश करून आपल्या दुःखसहणाच्या विधीला आरंभ केला. या पवित्र आठवड्यात प्रवेश करताना, आपण प्रभू येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊया व आपल्या सर्व विनंत्या व गरजा त्याच्या चरणाजवळ भेटूया.

१. आपले पोप महाशय फ्रान्सिस, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक यांना प्रभू येशूच्या दुःखसहनाच्या रहस्यातून शक्ती व सामर्थ्य लाभो. इतरांच्या दुःखांवर व अडचणींवर मात करण्यासाठी ईश्वरी प्रेरणा लाभो, म्हणून प्रार्थना करूया.

२. पवित्र आठवड्यातील सर्व धार्मिक विधींमध्ये सहभागी होताना, आम्हाला देवाच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी. त्याचबरोबर आमच्या विश्वासात व श्रद्धेत वाढ होवो, म्हणून प्रार्थना करूया.

३. जे लोक देउळमातेपासून दुरावलेले आहेत, जे जीवनात निराश व हताश झाले आहेत, त्यांना प्रभू येशूचा स्पर्श व्हावा की जेणेकरून त्यांच्या स्वभावात व आचरणात बदल होवो आणि ते प्रभू येशूच्या अधिक जवळ यावेत, म्हणून प्रार्थना करूया.

४. हे जुबिली वर्ष परमेश्वराच्या कृपेचे आहे. जे तरुण-तरुणी जीवनात योग्य मार्ग शोधत आहेत, त्यांना प्रभू येशूने योग्य दिशा दाखवावी व त्यांनी ईश्वरी हाकेला योग्य प्रतिसाद द्यावा, म्हणून विशेष प्रार्थना करूया.

५. या क्षणी आपण आपल्या वैयक्तिक व सामुदायिक गरजांसाठी विशेष प्रार्थना करूया (क्षणभर शांततेने व्यक्तिशः प्रार्थना करा).

धर्मगुरू:
हे दयावंत पित्या, आम्ही तुझ्यासमोर विश्वासाने व श्रद्धेने आमच्या काही गरजा व विनंत्या सादर केल्या आहेत. त्या तू दयेने स्वीकारून घे, व आम्हाला तुझ्या कृपाशिर्वादाने भर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो, आमेन.