Tuesday, 5 November 2013




Amol Gonsalves hails from St. Gonsalo Gracia Church, Gass, Vasai. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province, Maharashtra. Presently, he is pursuing his theological studies at JDV, Pune. He is passionate about music and singing. This homily appears with his faith and theological insights.  





सामान्यकाळातील बत्तीसावा रविवार
१०/११/२०१३
वर्ष-क
मक्काबीचा दुसरा ग्रंथ;  ७:१-२,९-१४.
थेस्सलनीकाकरांस पत्र; २:१६-३:५.
लूक; २०:२७-३८.

"तो मेलेल्यांचा देव नसून जिवतांचा देव आहे."
प्रस्तावना:
आयुष्याची सुरवात जन्माने तर अंत मरणाने होतो. या घटना सत्य आहेत. पण अनेकदा त्यांना सामोरे जाणे किंवा त्यांचे आव्हान स्विकारणे आपल्याला कठीण जाते. असे म्हणतात की; "मरण हे अटळ आहे." "जीवनाच्या पुस्तकात लिहिलेला तो एक अखेरचा धडा आहे." परंतु आपला ख्रिस्ती विश्वास व श्रद्धा आपल्याला शिकवतात की, "मरणात माणसाच्या जीवनाचा अंत सामावलेला नाही!." आजच्या उपासनेतील तिन्ही वाचने मरण व विशेषता पुनरूत्थान ह्या दोन महत्त्वपूर्ण पैलूवर प्रकाश-झोत टाकत आहेत. बायबल आपल्याला आवर्जून सांगत आहे की,"आपला देव हा मृतांचा देव नसून तो जिवंताचा देव आहे." आजच्या उपासनेद्वारे आपण जीविताचा प्रभू येशू ख्रिस्ताकडे मरणावर विजय मिळविण्यासाठी प्रार्थना करू या.

पहिले वाचन:
आजच्या पहिल्या वाचनात आपण सात भावांची व त्यांच्या आईची बंदिवासात असताना घेण्यात आलेल्या परिक्षेविषयी ऎकत आहोत. बंदिवासात असताना त्यांना चाबकांनी आणि आसुडांनी मारून निषिद्ध असलेले  डुकराचे मांस त्यांना खावयास राजा प्रवृत्त करतो. राजाने दिलेल्या आदेशाचे पालन त्यांना त्यांच्या वाड-वडिलांनी दिलेल्या नियमांचे आज्ञाभंग करण्यास भाग पाडणार होते. पण, त्यांनी तसे न करता मरण पत्कारण्यास सज्ज झाले कारण "जीवनाच्या अंनत नुतनीकरणासाठी विश्वाचा राजा आम्हाला उठवील" ह्यावर त्यांच्या घनिष्ठ विश्वास होता.

दुसरे वाचन:
आजच्या दुस-या वाचनात संत पौल प्रार्थनेची विनवणी करत असताना म्हणतो की, "आम्हासाठी प्रार्थना करीत जा की तुम्हामध्ये झाल्याप्रमाणे ख्रिस्ताच्या वचनाची प्रगती त्वरेने व जोमाने इतरांमध्ये व्हावी व प्रभूचा गौरव व महिमा सर्वत्र पसरावा. कारण, सर्वाच्या ठायी श्रद्धा आहे असे गृहीत धरून चालणार नाही." संत पौलाचा देखील ठाम विश्वास होता की, "आपला ख्रिस्त प्रभू आपल्या सर्व दुष्टापासून आपल्याला राखील व श्रद्धेत आपल्याला स्थिर करील."

शुभवर्तमान:
संत लुकलिखित शुभवर्तमानात आपण ऐकतो की, "परमेश्वर हा मृतांचा देव नसून जिवंताचा देव आहे." नव्या करारात आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येते की ख्रिस्ताला पकडण्यासाठी ख्रिस्ताचे शत्रू - सदूकी, शास्त्री व परुशी - योग्य वेळेची वाट पाहत होते आणि संभ्रमात टाकणारे प्रश्न विचारत होते. पुनरूत्थानाच्या प्रश्नावरून येशूला संभ्रमात  टाकण्याचा प्रयत्न आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहत आहोत. 

बोध कथा:
एकदा बिशप फुल्टन शिन एका गावात भेट देण्यासाठी गेले होते. असेच घरांना भेटी देत असताना ते एका छोट्याश्या झोपडीसमोर आले तेव्हा त्या गावाच्या अधिका-याने बिशप महाशयांना सांगितले की कृपया त्या घरात जाऊ नका कारण त्या घरात एक क्रुष्टरोगी स्त्री राहत आहे. तिचे संपूर्ण शरीर घायाने भरलेले असून त्यातून दुर्गंधी व रक्त येत आहे. ते ऐकून बिशप फुल्टन शिन ह्यांनी निर्धार केला की ते त्या क्रुष्टरोगी स्त्रीला भेट देणारच. थोड्या वेळेतच बिशप महाशय त्या स्त्रीच्या दारात हजर होते. तिच्या शरीरातील घायातून रक्त वाहत होते व संपूर्ण घराला दुर्गंधी पसरली होती परंतु ह्या परिस्थितीत सुद्धा तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य व एक वेगळाच आनंद होता. हे पाहून बिशप महाशयांना आश्चर्य वाटले आणि बिशप महाशयांनी त्या स्त्रीला विचारले "तुमचे शरीर इतके घायांनी भरले असून  त्यातून रक्त वाहत आहे, तरीसुद्धा तुमच्या चेह-यावर हे स्मितहास्य कसे?"  ह्यावर त्या स्त्रीने उत्तर दिले "जरी माझे शरीर घायाने भरलेले असले व त्यांतून रक्त वाहत असले तरी मला प्रभू येशु ख्रिस्ताच्या शब्दावर पूर्ण विश्वास आहे.  मला तो शेवटच्या दिवशी पुन्हा उठवील व ह्या क्रुष्टरोगी शरीराचे रुपांतर अविनाशी, निरोगी शरीरात करील आणि मी प्रभू येशूच्या पुनरूत्थानाच्या विजयामध्ये सहभागी होईन."

सम्यक विवरण:
शुभवर्तमानात आपण पुनरूत्थानाविषयी विचारलेल्या प्रश्नाविषयी ऐकतो. सदूकी हा यहुदी लोकांचाच एक गट होता. हे लोक याजकांच्या घराण्यातील श्रीमंत व प्रतिष्ठीत वर्गातील होते. रोमन शासनाच्या राजवटीत ते अगदी सुखी-समाधानी होते. ते पारंपारिक सनातनी मोशेच्या पाच पुस्तकावर आधारित धर्माचे आचारण करीत परंतु त्यांचा हा धर्म व आचरण केवळ पोकळ व औपचारिक होता. त्यांची विचारसरणी व मते परुश्याहून भिन्न होती. पुनरुत्थान, दूत व आत्मे ह्या गोष्टीवर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता (प्रेषिताचे कृत्ये;२३:८).
पुनरुत्थानाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना येशूने प्रथमच सांगितले की, पुनरुत्थानातील  ख्रिस्ती व्यक्ती पृथ्वीवरल्या अवस्थेप्रमाणे नाही. तेथे मरण नाही, वंश-सातत्य राखण्याची गरज नाही. म्हणून प्रजोत्पादन करण्याची गरज नाही. विवाहासारखी पार्थीव नातीगोती स्वर्गात उरणार नाहीत. पण, स्वर्गात सर्वच मानवी नाती एवढी उन्नत व उच्च केली जातील की विवाह्सबंधाचे नाते जेवढे पृथ्वीवर महत्त्वाचे आहेत तसे ते स्वर्गात असणार नाहीत. म्हणूनच, संत पौलने थेस्सलनीकरांस पाठविलेल्या पहिल्या पत्रातील ४:१७ मध्ये म्हणतो, "जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ, तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू." 
आजचे शुभवर्तमान आपल्यासमोर अजून एका सत्याची आठवण करून देते. आपण जरी शरीराने मरण पावलो तरी आत्म्याने मरत नाही. आत्मा अमर आहे. शारिरिक मृत्युनंतर आत्म्याला विवाहाची किंवा वैवाहिक सुखाची आवश्यकता राहत नाही. मृत्युनंतर आपला आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. आत्म्याला मरण नाही आणि आत्म्याला वैवाहिक सुखाची आवश्यकता नसते हे सत्य जर आपण मान्य केले तर आजच्या पहिल्या वाचनातील सात भाऊ व त्यांच्या आईप्रमाणे आपण देखील प्रभुने दिलेल्या आज्ञाचे पालन करू व त्यांचा स्वीकार करण्यास सैदव तत्पर असू.
परमेश्वराची आज्ञा मोडण्यापेक्षा त्यांनी मरण का पत्करले असावे? याचे उत्तर आपण आजच्या प्रतिसाद स्तोत्रात एकतो. "हे प्रभो, मला तुझ्या दर्शनाने तृप्त कर." परंतू, असे ठामपणे उत्तर देण्यास आपल्या परमेश्वर पित्याच्या "सांत्वनाची आणि चांगल्या आशेची आपणाला आवश्यकता आहे. आजच्या दुस-या वाचनात संत पौल थेस्सलनीकरांस म्हणतो की, "प्रभू विश्वसनीय आहे, तो तुमच्या मनाचे सांत्वन करील, तो तुम्हाला स्थिर करील व सर्व शत्रूपासून राखील."

जीवन बोध:
                              ख्रिस्ती व्यक्ती असूनही कधी-कधी ज्या गोष्टी आपल्या आकलेनेच्या पलिकडे आहेत त्यावर विश्वास ठेवण्यास आपण दचकून जातो. आपल्याला "पुनरूत्थानाविषयी" अनेक प्रश्न भेडसावत असतात. जसे, मला शाश्वत जीवनाचे वरदान मिळेल का? शाश्वत जीवन म्हणजे काय? तेथे कोण असणार व आपण काय करणार?
संत पौल कंरिथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात १५:१२ मध्ये म्हणतो की, "ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठविला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरूत्थान  नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे? जर मेलेल्यांचे पुनरूत्थान  नाही तर ख्रिस्त हि उठविला गेला नाही; आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ आहे." पुनरूत्थान  म्हणजे नव-जीवनाचा अनुभव. जो मनुष्य विचाराने, भावनेने, हृदयाने शुद्ध असतो, तो पुनरूत्थानाचा अनुभव घेत असतो. ख्रिस्तामधील जीवनालाच पुनरूत्थान  म्हटले आहे.
ख्रिस्तच मानवी जीवनाचा आंनद आणि सुख आहे. मानवी जीवनाचे तारण करण्यासाठी ख्रिस्त ह्या जगात आला व अदृश्य देवबापाची ओळख आम्हाला करून दिली. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, हे आम्हाला पटवून दिले. येशूच्या जीवनातील दु:खसहन, मरण व पुनरूत्थान  या प्रमुख रहस्यावर आज ख्रिस्तसभा कार्य करीत आहे. प्रभुने लाजरसाला मेलेल्यातून उठण्यापूर्वी मार्था व मरीयेच्या घरी असताना म्हटले,"पुनरूत्थान  व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी तो जगेल आणि जीवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही."
मानवी जीवनाला श्रध्दा ही आवश्यक असते. श्रध्देत महान शक्ति आहे. पवित्र आचरणातून श्रध्दा निर्माण होते. म्हणूनच पवित्र मिस्सा बलिदानामध्ये आपण आभार घोषणेत येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाची श्रध्दापूर्वक अंत:करणाने आठवण करतो. जर आम्ही परमेश्वरावर पूर्ण मनाने श्रध्दा ठेवली; त्याला पूर्णपणे शरण गेलो तर तो आमचेसुध्दा सांत्वन व तारण करील आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे, आज्ञेप्रमाणे वागण्यास आवश्यक शक्ती, कृपा आणि धैय तो आम्हांस नक्कीच देईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: प्रभू आमची श्रध्दा बळकट कर.
१. आपले पोप महाशय, सर्व कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू-भगिनी, जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांची श्रध्दा बळकट व्हावी व इतरांची श्रध्दा त्यांनी आपल्या कार्यद्वारे बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपण आज अंधारलेल्या जगात राहत आहोत. निराशेने वैफल्यग्रस्त झालो आहोत. ख्रिस्ताच्या आशेचा संदेश सर्व जगभर पोहोचवावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या. 
३. आपण इतरांना चांगले कार्य करण्यासाठी प्रवृत्त करावे व परमेश्वराने आपणांस स्वर्गसुखाचा अनुभव दयावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या सर्व देणग्याचा आपण योग्य प्रकारे वापर करावा व इतरांची सेवा करून नव-जीवनाचा व पुनरूत्थानाचा अनुभव आपल्या जीवनात घ्यावा; म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
. आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा ईश्वर चरणी समर्पित करू या.


    

8 comments:

  1. Dear Amol, thought provoking and inspiring homily. Good thoughts too...May this Homily inspire the faithful and increase their faith. Br. Michael Fernad

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you very much dear Father.. May Good God Bless you abundantly for your support and encouragement...

      Delete
  2. Great work, please do continue... Thanks !

    ReplyDelete
  3. good bro.............good work.

    ReplyDelete
  4. Well done, Amol. Keep it up.

    ReplyDelete
  5. hey Amol ...congras nice homily dear. it is thought provoking.... God bless you ...

    ReplyDelete