Tuesday, 25 March 2014

Reflections for the Homily By:- Xavier Patil.









उपवास काळातील चौथा रविवार




  त्याने डोळे धूतले आणि त्यास दृष्टी मिळाली


दिनांक: ३०/३/२०१४.
पहिले वाचन: १ शमुवेल १६:१,६-७,१०-१३.
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ५:८-१४.

शुभवर्तमान: योहान ९:१-१४.

प्रस्तावनाः

आज आपण उपवास काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजची पवित्र वाचने आपणाला येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे आणि आपला प्रभू आपणा सर्वांना ह्या प्रकाशाचे शिष्य बनून परमेश्वराचा प्रकाश जगाच्या कानाकोप-यापर्यंत पोहचविण्यास आमंत्रण करत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये इस्त्रायली लोकांचे नेतृत्व करण्यासाठी दाविदाची निवड होते. तर दुस-या वाचनामध्ये आपण पाहतो की सर्व प्रकारची वाईट व निष्फळ कृत्ये सोडून प्रकाशाचे शिष्य म्हणून जीवन जगण्यासाठी देवाने आम्हाला आर्शिवादीत केले आहे.
आजच्या शुभर्वतमानामध्ये येशू ख्रिस्त जन्मापासून आंधळा असलेल्या एका मनुष्याला दृष्टिदान देतो. परमेश्वराने आपणातील आध्यात्मिक अंधकार काढून आपल्याला त्याच्या प्रकाशाने भरावे व तोच प्रकाश दुस-यापर्यंत पोहचविण्यास आपणाला येशू ख्रिस्ताची कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. 

पहिले वाचन: १ शमुवेल १६:१,६-७,१०-१३.

शौल राजा स्वौराचाराने वागत होता, त्याच्या एकंदर वागण्यामुळे इस्त्रायलात पुन्हा देवाविरोधी वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. शौलाला राजा मांगून त्या लोकांनी जी घोडचूक केली होती, त्याचे परिणाम त्यांना सोसावे लागत होते. अशावेळी देव शमुवेलाला म्हणतो, “शिंगात तेल भरून चल. मी तुला इशाय बेथलेहेमकर याच्याकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे”(१शमुवेल१६:). शमुवेलाला अलियाब हाच देवाने निवडलेला राजा आहे असे वाटले, कारण अलियाब उंच व देखणा होता आणि तो शरीराने मजबूत असा होता, परंतु देवाने त्याला नापसंत केले होते. दाविदाची राज्यपदासाठी केलेली निवड एक मोलाचा संदेश देऊन जाते; मानव बाह्य स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ५:८-१४.

संत पौल सर्व श्रध्दावंताना विनंती करतो की निषेधपूर्ण व लज्जास्पद अशा गोष्टी सोडून देऊन ख्रिस्ताच्या प्रकाशात जीवन जगून यशस्वी व्हा. कारण सर्व प्रकारची वाईट व निष्फळ कृत्ये सोडून देऊन प्रकाशाचे शिष्य म्हणून जीवन जगण्यासाठी देवाने आम्हाला आर्शिवादीत केले आहे.

शुभवर्तमान: योहान ९:१-१४.

     आजच्या शुभर्वतमानामध्ये येशू ख्रिस्त जन्मापासून आंधळा असलेल्या एका मनुष्याला दृष्टिदान देतो. नकळतपणे या चमत्काराव्दारे प्रभू आमच्या आध्यात्मिक अंधत्वावर बोट ठेवतो व सर्व प्रकारच्या अंधत्वातून बाहेर पडण्याचे आव्हान करतो. येशू ख्रिस्ताच्या पवित्र स्पर्शाने त्या जन्मांध माणसाला सर्व काही दिसू लागले.

सम्यक विवरण:

         येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे:
हे योहानाने एका जन्मापासून आंधळ्या माणसाच्या उदाहरणाने स्पष्ट केले आहे. येशूने अंध लोकांना दृष्टी दिल्याची उदाहरणे इतर शुभर्वतमानकारांनी नमूद केली आहेत. पण अशी दृष्टी दिल्याने खूद्द येशूच्या व्यक्तिमत्वाविषयीचा वादविवाद सूरु झाला हेच योहानकृत शुभर्वतमानातील या प्रसंगाचे वेगळेपण आहे.
·         हा जन्मापासून आंधळा का? (९:१-१२):
जन्मापासून आंधळा असलेल्या मनुष्याला पाहून शिष्यांना यहुदी विचारसरणी आठवली; त्याच्या किंवा त्याच्या आई-बापांच्या पापामुळे तो आधंळा जन्मला असे लोक म्हणत. यातील कोणते खरे? असा प्रश्न शिष्यांनी येशू ख्रिस्ताला विचारला, त्यांचे विचारच चुकीचे होते. देवाला त्याच्यामध्ये कार्य करायचे होते त्यामुळे तो आंधळा जन्माला आला, हे येशू ख्रिस्ताचे उत्तर ऐकून शिष्यांना किती नवल वाटले असेल! प्रत्येक व्यक्तीत देवाला कार्य करायचे आहे व त्या व्यक्तीला ख-या प्रकाशात न्यायचे आहे. हेच कार्य प्रभू येशू ख्रिस्त करीत होता.
·         तुमच्या दृष्टीत येशू कोण आहे? (९:१३-२३):
ज्याला दृष्टी मिळाली त्याला येशू नावाचा एक मनुष्य कोण आहे हे माहित होते, पण परूश्यांनी त्याला जेव्हा येशूविषयी विचारले तेव्हा त्याने जे काही घडले ते थोडक्यात व स्पष्ट शब्दांत सांगितले परंतु एक परूशी येशू ख्रिस्तावर टिका करू लागला व म्हणाला, ‘“तो देवापासून मुळीच नव्हे, कारण तो शब्बाथ पाळीत नाही”. हे विधान दुस-यांना पटले नाही, “पापी मनुष्य अशी चिन्हे करूच शकत नाही”. आत्मिक दृष्टी देण्याचे कार्य केवळ देवच करू शकतो.’ ह्याच विचारसरणीवरून त्यांच्यात वाद-विवाद सुरू झाला. तेव्हा त्या माणसाचे मत परूश्यांनी विचारले. त्यांचा वाद ऐकून त्याची खात्री पटली होती की, येशू हा संदेष्टा आहे. तो देवाच्या सार्मथ्याने कार्य करतो.
·         आता मला दिसते (९:२४-३४):
येशू कोण आहे याविषयी ह्या माणसाला जसे अधिक कळत गेले तसे त्याला  मत्सराने भरलेले परूशी अधिकच तूच्छ लेखू लागले. परुशीयांच्या मतानुसार येशू हा पापी आहे व तो देवाकडचा नसल्यामुळे तो असल्याप्रकारचे कार्य करू शकत नाही. कोणाच्याही पापाने देवाचे गौरव होत नाही कारण देव पवित्र आहे. तो मनुष्य त्यांच्या विचाराशी सहमत नव्हता.
येशू किती थोर आहे हे तो पुन्हा साक्ष देऊन सांगतो(ओ.२५). दृष्टी प्राप्त झालेल्या त्या माणसाला धर्मपुढा-यांनी सभास्थानातून हाकलून दिले परंतु प्रभू येशू त्याला विसरला नाही. त्याने त्याला शोधून काढले. अजून संपूर्ण सत्य समजले नसल्यामुळे कदाचित तो मनुष्य घोटाळ्यात पडला होता. त्याने येशू ख्रिस्त हा देव आहे हे ओळखणे गरजेचे होते.
प्रभू येशूने त्याला स्वतःची ओळख करून दिली(ओ.३५). ज्याने त्याला दृष्टी दिली होती तोच त्याच्याबरोबर बोलत होता हे येशू ख्रिस्ताने त्याच्या ध्यानात आणले व मनुष्याचा पुत्र आपणच आहोत हे सांगितले(ओ.३७). येशू देवापासून आला होता ही साक्ष देणा-या ह्या माणसाला येशू प्रत्यक्ष देवाचा पूत्र आहे हे लगेच समजले. तो येशूला प्रभू म्हणतो व त्याला नमन करतो.

बोध कथाः

१.   एकदा एक वृद्ध व्यक्ती आपल्या हातात एक कंदील घेऊन रस्त्याने जात होता. संध्याकाळची वेळ होती आणि तो मनुष्य आपल्या वाटेने चालला होता. अचानक एक व्यक्ती त्या वृद्ध माणसाला धडकते आणि तो मनुष्य त्या वृद्ध माणसास म्हणतो, ‘दिसत नाही का तुला? आंधळा आहेस का?’ तेव्हा तो वृद्ध माणूस त्या व्यक्तीस सांगतो, ‘मी आंधळा आहे, इतरांना दिसावे आणि रात्रीच्यावेळी कोणी मला धडक न द्यावी  म्हणून मी माझ्या हातात हा कंदील घेऊन रस्त्यावरून जात आहे.’ मग त्या मनुष्याने त्या वृद्ध माणसास सांगितले की, ‘तुमचा कंदील विझून गेला आहे आणि त्याचा प्रकाश कुणालाही दिसत नाही.’ मग त्या वृद्ध माणसाने तो कंदील पुन्हा पेटवला व आपल्या मार्गावर चालू लागला.

.    एकदा मदर तेरेसा एका घरी भेट देण्याकरीत्या गेल्या होत्या, त्या घरी भरपूर पसारा पडलेला होता. ते पाहून मदर तेरेसांनी त्या व्यक्तीजवळ त्याचे घर साफ करण्यासाठी परवानगी विचारली. सुरुवातीस त्याने ती नाकारली परंतु नंतर त्याने हो म्हटले. पसारा आवरत असताना मदर तेरेसांच्या दृष्टीस एक सुंदरसा दिवा पडला, तो सुता-याने व धुळीने भरून गेला होता. मदरांनी तो दिवा आपल्या हातात घेऊन त्याला म्हटले, ‘हा सुंदर दिवा तुम्ही कधी तरी लावता का?’ तेव्हा त्या माणसाने उत्तर दिले, ‘कुणासाठी लावावा हा दिवा? कोणीही मला अजूनपर्यंत बघण्यासाठी आलेले नाही?’ मग त्याला मदरांनी सांगितले, ‘जर मी माझ्या सिस्टरांना तुमच्या घरी पाठवून दिले तर तुम्ही हा सुंदरसा दिवा लावणार का?’ ‘हो मी लावणार’, तो मनुष्य उदगारला. मग मदरांनी तो दिवा पुसून साफ केला आणि त्या दिवसापासून सिस्टरांनी त्याला भेटण्यास सुरुवात केली. तदनंतर तो दिवा कधीही विजवला गेला नाही. काही काळानंतर त्याने मदर तेरेसांना निरोप पाठवला की, ‘त्यांनी लावलेला दिवा अजून हृदयात पेटत आहे.  

·         मनन चिंतन:

प्रकाश व अंधकार हे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहेत. ह्या दोन्ही घटकांचा वापर संपूर्ण बायबलमध्ये केला आहे. पण संत योहान प्रकाश आणि अंधकार ह्याचा वापर वेगळ्याच प्रकारे करतो. योहानाच्या मते प्रकाशाचे चिन्ह आनंदासाठी, आरोग्यासाठी, पावित्र्यासाठी, चांगल्यासाठी... थोडक्यात देवाला संबोधून वापरले आहे. तर अंधकार हे चिन्ह पाप, मोह, वाईट, मरण आणि सैतानी कृत्य दर्शवण्यासाठी वापरले आहे. प्रकाश व अंधकार ह्या दोन विरूध्द गोष्टी आहेत कारण जेथे प्रकाश असतो तिथे अधंकाराला जागा मुळीच नसते व जेथे अधंकार पसरलेला असतो तिथे प्रकाश सापडत नाही.
 आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे हे आपणाला जन्मापासून आंधळ्या माणसाच्या साक्षेवरून समजते. येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये त्याचा प्रकाश पसरवण्यास आला होतो. जेणेकरून जे पापामध्ये व अधंकारात डगमगत आहेत अशा सर्वांना ख्रिस्ताचा प्रकाश लाभावा व त्यांनी ख्रिस्तामध्ये नवजीवन प्राप्त करावे. येशू ख्रिस्त आंधळ्या माणसाला जेव्हा दृष्टी प्रधान करतो तेव्हा त्या माणसाला येशू ख्रिस्त हा कोण आहे हे समजून येते. त्या आधंळ्या माणसाप्रमाणे आपण देखील आध्यत्मिकरित्या आंधळे झालो आहोत. आपल्या डोळ्यांवर संपत्तीची, मोहाची, हेवेची, निष्टूरतेची पट्टी बांधली आहे. डोळे असून देखील आपण आंधळे झाले आहोत. आपला ख्रिस्ती विश्वास आपणाला अंधाराने भरलेल्या जगामध्ये प्रकाश पसरविणारे दिप होण्यासाठी पाचारण करत आहे. जेव्हा आपण ख्रिस्तासारखे जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आपल्या जीवनाचे नेतृत्व ख्रिस्ताकडे सोपवितो, तेव्हा नक्कीच आम्ही ख्रिस्तमय होतो व आत्मस्वरूपी बनून ख्रिस्त हा देवपुत्र आहे हे ओळखतो. यासाठी कोणत्याही व्यक्तीच्या बाह्य स्वरूपाकडे न पाहता सर्वप्रकारची बंधने ओलांडून प्रत्येक व्यक्तीवर आपण स्वतःसारखेच प्रेम केले पाहिजे यातच आपले मोठेपण आहे.
जन्मापासून आंधळ्या माणसाला दृष्टीदान देणे हा चमत्कार एक साधा-सूधा चमत्कार नसून प्रत्येक ख्रिस्ती भाविकाने मिळवावयाच्या आध्यात्मिक दिव्य दृष्टीचे प्रतिक आहे. या चमत्काराद्वारे ‘मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहिल.’ या ख्रिस्त वचनाचे महत्व स्पष्ट होते. जो कोणी या प्रकाशाचा अनुभव घेतो तो स्वतःच प्रकाशमान होतो व इतरांनाही प्रकाशीत करतो.
संत तुकाराम आपल्या एका अभंगात म्हणतात,“दीप न देखे अंधात! आता हेची जतन करा!” जिथे दीप पेटत असतो तिथे अंधाराचा प्रवेश होवूच शकत ऩाही. तो दीप पेटत ठेवण्यासाठी आपण कष्ट घेतले पाहिजेत, सतत त्याची जोपासना केली पाहिजे. प्रार्थना, उपवास, ध्यान, पवित्र वाचन करीत धार्मिक व नैतिक जीवन जगून आम्ही आमच्या जीवनाचीही अशीच जोपासना केली पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थनाः

प्रतिसादः “हे प्रभो तुझ्यावरील आमचा विश्वास दृढ कर.”
. अखिल ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, सर्व कार्डिनल्स, बिशप, धर्मगुरू व धर्मभगिणी ह्यांच्या प्रेषित कार्यावर देवाचा आर्शिवाद असावा व ख्रिस्ताचा प्रकाश त्यांनी जगाच्या कानाकोप-यात पोहोचवावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी आपला राजकीय धूर्तपणा सोडून तसेच भष्टाचार व इतर सर्व वाईट मार्ग सोडून निस्वार्थीपणे लोकांची व देशाची सेवा करावी, म्हणून प्रभूकडे प्रार्थना करू या.
. जे लोक आध्यात्मिकरित्या दृष्टिहीन झालेले आहेत त्या सर्वांना येशू ख्रिस्ताचा प्रकाश लाभावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
. आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने आजारी आहेत त्यांना परमेश्वराच्या कृपेचा अनुभव यावा आणि नवजीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
. आपण आपल्या वयक्तिक गरजा प्रभू चरणाशी ठेवूया .

Tuesday, 18 March 2014


Reflections for homily By:- Malcom Patil







उपवास काळातील तिसरा रविवार


दिनांक:२३/३/२०१४.
पहिले वाचन: निर्गम १७:३-७.
दुसरे वाचन: पौलाचे रोमकरांस पत्र ५:१-२,५-८.
शुभवर्तमान: योहान ४:५-४२.


मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही.

प्रस्तावना:

आज आपण उपवास काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात इस्त्रायल लोक पाण्यासाठी मोशेकडे तक्रार करताना आढळतात व त्यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून देव मोशेद्वारे चमत्कार करतो. दुस-या वाचनात संत पौल म्हणतो, आपण विश्वासामुळे नितिमान ठरलेलो आहोत. येशू ख्रिस्ताद्वारे आपणाला शांती मिळालेली आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतकरणात देवाच्या प्रितीचा वर्षाव झाला आहे.
तसेच शुभर्वतमानात येशू ख्रिस्त एका शोमरोनी स्त्रीला पापमुक्त करून जिंवत पाण्याविषयी मार्गदर्शन करताना दिसतो. येशू ख्रिस्त आज आपली आत्मिक तहान भागविण्यासाठी आपणास बोलावत आहे. आपल्याला देवाची निवडलेली प्रिय मुले बनता यावी म्हणून ह्या उपवास काळात आपण येशू ख्रिस्ताबरोबर असलेली आपली सहभागीता, श्रध्दा आणि एकनिष्ठा तपासून पाहू या आणि त्याच्या वचनानुसार आचरण करण्यासाठी प्रयत्नशील बनू या.

पहिले वाचन: निर्गम १७:३-७.

            निर्गम ह्या शब्दाचा अर्थ आहे बाहेर निघणे’. इस्त्रायली लोक मिसर देशात गुलामगिरीत होते, मोठ-मोठ्या चमत्काराने व पराक्रमाने देवाने त्यांना मुक्त करून मिसर (इजिप्त) देशातून बाहेर काढले होते. देवाच्या आज्ञेनुसार मोशेला त्यांना कनान देशात न्यायचे होते. इस्त्रायल लोकांच्या सुटकेवेळी घडलेल्या एका महत्वपूर्ण घटनेचा संदर्भ आजच्या वाचनात येतो. आपल्या सुटकेच्या प्रवासामध्ये इस्त्रायली प्रजा तहानेने व्याकुळ होते. अशा कठीण वेळी देवाच्या कृपासार्मथ्याने मोशे दगडातून आपल्या प्रजेसाठी पाण्याचा झरा निर्माण करतो आणि त्यांची तहान भागवितो. देव आपल्या निवडलेल्या लोकांबरोबर सतत असतो व स्वतः तो त्यांची सर्व काळजी वाहतो ह्याची साक्ष ही घटना देते.

दुसरे वाचन: पौलाचे रोमकरांस पत्र ५:१-२,५-८.

     पौलाने हे पत्र इ.स.५८ मध्ये रोम येथील मंडळीला लिहिले. तो या मंडळीला भेटण्यास व रोममध्ये सुवार्ता सांगण्यास उत्सुक होता. रोम हे रोमन साम्राज्याचे राजधानीचे शहर होते.
या पत्राचा विषय नीतिमान ठरणे व नीतिमान राहणे हा आहे. हा विषय पौलाने पुढील प्रकारे मांडला: १) कोणी मनुष्य नितीनाम नाही. २) देवाचे नीतिमत्व प्रकट झाले आहे. ३) जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना देव निर्दोष ठरवितो, पापाच्या सत्तेपासून मुक्त करतो, त्यांना ख्रिस्तामध्ये जीवन मिळते व त्यांचा व देवाचा समेट होतो.

शुभवर्तमान: योहान ४:५-४२.

आजचे शुभवर्तमान येशू ख्रिस्त व शमरोनी स्त्री यांच्यामधील एक अर्थपूर्ण असा संवाद प्रस्तुत करते. या संवादाद्वारे निर्मळ पाण्याचा झरा असलेला ख्रिस्त स्वत: आपला मुक्तिदाता कसा आहे याचा अनुभव त्या शमरोनी स्त्रीला येतो. आपल्या जीवनातील या आगळ्या वेगळ्या येशूच्या प्रेमळ अनुभवाने ती इतकी भारावून जाते की, ख्रिस्त हा फक्त संदेष्टाच नव्हे तर साक्षात आपला मुक्तिदाता आहे याची शुभवार्ता ती आपल्या समाजामध्ये घोषविते.  

सम्यक विवरणः

यहुदिया प्रांताच्या उत्तरेला सुमारे ५० कि.मी अंतरावर गालील प्रांत आहे. ह्या दोन प्रांतामध्ये शोमरोन हा प्रदेश आहे. यहुदिया मधून गालीलात जाण्यासाठी दोन वाटा होत्या. यार्देनच्या पूर्व बाजूने विदेशीयांच्या देशातून जाणारी वाट लांब पल्ल्याची होती. जवळची वाट शोमरोनातून होती. यहुदी आणि शोमरोनी यांच्यात वैरभाव होता तरीपण याच वाटेने लोकांची ये-जा मोठ्याप्रमाणात चालू असे. सुमारे दीड दिवस पायी प्रवास करून येशू भर दुपारी सुखार गावाला पोहोचला(योहान ४:५). तो चालून चालून दमला होता, तेथील एका विहिरीच्या कड्यावर तो बसला(योहान ४:६). इतक्या कडक उन्हात एक शोमरोनी स्त्री पाणी काढावयास आली(योहान;४:१८). येशूने तिच्याजवळ पाणी मागितले तेव्हा तिला आर्श्चय वाटले. “आपण यहुदी आणि माझ्या हातचे पाणी पिणार? तिने चकित होऊन विचारले(योहान;४:९).” तिची आत्मिक तहान येशू ख्रिस्ताने ओळखलेली होती. ती भागविण्यासाठी येशू कोण आहे व तोच तिचे खरे समाधान करू शकत होता हे समजण्यासाठी गरज होती.
शोमरोनी स्त्री सुखी का नव्हती हे येशू ख्रिस्ताला पक्के ठाऊक होते. या शोमरोनी स्त्रीचे दुस-याबरोबर पटत नव्हते, तिच्या तापट व तुसड्या स्वभावामुळे तिचे विवाह टिकले नाहीत. ख्रिस्ताला आपल्या परिस्थितीविषयी माहित आहे हे समजताच ती त्याला संदेष्टा मानते(योहान;४:१९). येशू ख्रिस्ताने मोठ्या नम्रतेने तिला ख-या उपासनेविषयी सांगितले. आपण उपासना कोठे करतो यापेक्षा कोणाची उपासना करतो तेच महत्वाचे आहे (योहान;४:२१-२४). देवाकडे येण्याचा म्हणजे तारणाचा मार्ग यहुदी लोकांतून येणार होता, देव आत्मा आहे व त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करता येईल अशी वेळ येत आहे असे तो म्हणाला. येशू ख्रिस्त फक्त थोर पुरूष नव्हता तर तो ख्रिस्त आहे असे तिने आपल्या साक्षीने सुचविले(योहान;४:२९).
अन्न सामुग्री आणण्यासाठी गावात गेलेले शिष्य परत आले. येशू एका स्त्रीशी बोलत आहे हे पाहून शिष्य आर्श्चयचकित झाल्याचे योहान सांगतो(योहान;४:२७) यहुदी धर्मगुरूंना  रस्त्यात स्त्रीयांशी बोलण्याची परनवागी नव्हती. स्त्रीयांबरोबर कोणतेही संभाषण त्यांच्या दृष्टीने नियमशास्त्राच्या अभ्यासाला अडथळा होते. त्याला प्रश्न विचारण्याचे धैर्य शिष्यांना नव्हते(योहान;४:२७). त्यावरून येशूच्या त्या कृतीमुळे ते खूपच भांबावले होते असे दिसते. शिष्यांना ऐहिक अन्नाचीच चिंता होती. ऐहिक अन्नापेक्षा देवाची इच्छा पूर्ण करण्यालाच अग्रक्रम दिला पाहिजे हाच येशूच्या म्हणण्याचा मथितार्थ आहे. (योहान;४:३४) पण ऐहिक अन्नाकडे दुर्लक्ष करावे असे येशूचे सांगणे नव्हते.
शोमरोनामधील येशूच्या सेवाकार्याचा समारोप व शेवट आध्यात्मिक पीक गोळा करण्याच्या एका उदाहरणातून दाखवला आहे (योहान;४:३५-३८). हे दोन टप्यात घडून आले. त्या स्त्रीने सांगितले ते ऐकून अनेकांनी विश्वास ठेवला. येशू सुक्ष्म अंतज्ञानी आहे, तो दुस-याच्या मनातले जाणतो हाच तिच्या साक्षीत मुख्य मुद्दा होता(योहान;४:३९) परंतु खुद्द येशूबरोबर वैयक्तिक संपर्क आल्याने त्यांचा विश्वास अधिक भक्कम झाला(योहान;४:४२). येशू यहुदी असूनही त्याने आपल्याकडे मुक्काम करावा, (योहान;४:४०) ही शोमरोन्याची इच्छा असाधारणच होती. तथापि तो केवळ याहुद्यांचाच  नव्हे तर सर्व जगाचा तारणारा आहे हे ह्यावरून स्पष्ट होते.

बोध कथा:

पाकिस्तानच्या एका माजी गृहमंत्र्याची पत्नी बेगम बिल्कवीस शेख, भगवंताच्या दर्शनासाठी तहानलेली होती. ख-या देवाचा शोध घेण्यासाठी तिने आकाश, पृथ्वी धुंडाळीली! शेवटी तिच्याच विनंतीनुसार तिच्या ख्रिस्ती नोकराने तिला आणून दिलेल्या पवित्र शास्त्रात तिला प्रभूचे दर्शन घडले. ख्रिस्त हाच दया सागर परमेश्वर आहे ही खात्री पटल्यानंतर तिने धर्मांतराचा निर्णय घेतला. तिच्या ह्या निर्णयाच्या विरोधात मुस्लिम समाजाने बंड उभारले. वृत्तपत्रातून तिच्यावर आरोप करण्यात आले, तिच्यावर टिकास्त्र झोडले गेले, कुटुंबियांनी तिचा छळ केला. तिला अंधार कोठडी भोगावी लागली, परंतू ख्रिस्तासाठी ती तहानलेली होती, ख्रिस्तासारखे दु:ख सहन करण्याची संधी मिळाली ह्यातच तिने प्रभूचे आभार मानले.

मनन चिंतनः

. पाणी हे जीवनावश्यक असते. रात्रंदिवस आपणास पाणी लागते, पिण्यासाठी, आंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी, बागायतीसाठी पाणी लागते, पाण्याविना जगणे कसे कठीण आहे हे प्रत्येकाला ठाऊक आहे. येशू जिवंत पाण्याचा झरा आहे. आपल्याला पाण्याइतकीच किंबहुना अधिक आवश्यकता येशूची आहे, जीवनातील विविध प्रसंगी आपणास येशूची गरज भासते. पाणी म्हणजे जीवन, ख्रिस्त हा जीवन आहे. दु:खात, संकटात, वैतागलेल्या मनाला विसावा देण्यासाठी ख्रिस्ताची गरज असते, अंधारात आणि भिती प्रसंगी येशूची गरज भासते. अडचणीत, अपयशात, परिक्षा काळी आपणास येशूची गरज भासते.
ज्याप्रमाणे पाणी नदीच्या तीरावरील सर्व वृक्ष-वेलींना टवटवीत व तेजस्वी ठेवते त्याचप्रमाणे ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा आपल्यामध्ये वास्तव्य करतो तेव्हा आपल्या जीवनाचा कायापालाट होतो व आपणास आध्यात्मिकता प्राप्त होते. देव पित्याशी एकजीव होणे, इतरांवर प्रेम करणे, दया आणि क्षमाभावनेने इतरांशी सलोखा करणे ह्यासाठी आपल्या जीवनात जिंवत पाणी लागते, म्हणूनच येशू ख्रिस्त म्हणतो, जे पाणी मी देईन ते सार्वकालिन जीवनाचा झरा बनेल. यशयाच्या शब्दात सांगायचे म्हणजे परमेश्वर तुम्हाला सतत मार्गदर्शन करील व चांगल्या वस्तूने तुमच्या इच्छा पूर्ण करील, ह्याचा अर्थ ख्रिस्त आपणास त्याचा पवित्र आत्मा देवून नवजीवन देतो, ख्रिस्त आपल्या अंतरआत्म्यात शिरतो, आपले विचार, आपल्या भावना, आपली तत्वे, आपला दृष्टीकोन सर्वकाही शुध्द बनून त्यास स्फूर्ती मिळते.

२. ज्या पाण्याला भावना नसतात, मरण नसते स्व:ताच्या हालचाली नसतात ते पाणी जिंवत कसे असू शकेल? ख्रिस्त जिंवत आहे आणि ख्रिस्ताद्वारे माणवास जीवन प्राप्त होते. ख्रिस्ताद्वारे येणारे जीवन माणसाला जगवते. ख्रिस्ताद्वारे मिळणा-या जीवनातून माणसाच्या जीवनाचे तारण होते. सर्वसाधारणपणे जीवनात पाणी प्याल्याने माणसाला परत तहान लागतेच, म्हणजेच तो नेहमी अतृप्त असतो. एखादया माणसाने कितीही पैसा कमावला असला तरी त्याला पैशाची तहान लागते. एखादया माणसाकडे अनेक वस्तू असल्या तरी त्याला नवनवीन वस्तूंची तहान लागतेच, उदा. दाग-दागिन्यांच्या बाबतीत, कपड्यांच्या बाबतीत, घर अथवा गाडी ह्या बाबतीत. ख्रिस्त जे जीवन देतो त्याबाबतीतही माणसाला पूर्ण आनंद अथवा समाधान असते. पूर्णतेच्या पलिकडे तो आनंद मिळवू शकत नाही, तो तृप्त होतो.
माणसाची तहान परमेश्वर भागवतो पण परमेश्वराची तहान माणूस भागवू शकेल का? पवित्र, कृपापूर्ण जीवन जगून परमेश्वरास तो तृप्त करू शकेल का? परमेश्वर माझ्या जवळ येऊ शकणार नाही, त्याची कृपा मला मिळणार नाही, मी त्यासाठी पात्र नाही अश्या संभ्रमात माणसाने राहू नये, जेव्हा आम्ही विहिरीतील आणि जीवनाचे पाणी ह्यातील फरक लक्षात घेऊन जीवनाच्या पाण्यासाठी प्रामाणिकपणे आसुरलेले असू तेव्हाच आम्हाला जीवनाचे पाणी मिळेल जीवनाचे पाणी पिण्यासाठी देखील माणसाला आव्हान स्विकारावे लागते, शोमरोनी स्त्रीने ते आव्हान स्विकारले, व तिच्या जीवनाचा कायापालट झाला. आज तोच प्रभू येशू आपल्याला जीवनाचे पाणी पिण्यासाठी बोलावत आहे. आमची कष्ट, दु:खे आणि यातना या सर्व सोडवण्यासाठी तो आमंत्रण करीत आहे, त्याच्या सान्निध्यात बसण्यासाठी आम्ही तयार आहोत का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या जीवनदाई पाण्याने आमची तहान भागव.
१. ख्रिस्तसभेचे धुरा पाहणारे पोप, बिशप्स, फादरर्स, सिस्टर्स व इतर प्रापंचिक या सर्वांवर देवाचा आर्शिवाद यावा व क्षमा आणि शांतीचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. जे शारिरीक सुखासाठी तहानलेले आहेत, ज्यांना पैशाचा लोभ आहे, जे वाईट मार्गाला लागलेले आहेत, अश्या सर्व लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताचा स्पर्श होऊन त्याच्या जीवनाला नवी दिशा मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. शोमरोनी स्त्रीसारखे आम्ही सुध्दा जिवंत पाण्यासाठी व्याकुळ व्हावे, आमचे आचार-विचार शुध्द व्हावे व देवाचा महिमा वर्णविण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. आमचा देवावरील विश्वास अधिक मजबूत व्हावा, आमच्या सुख-दु:खात आम्ही फक्त त्याचाच गौरव करावा व या उपवास काळात आम्ही आमच्या मनाची चांगली तयारी करावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. सर्व युवक-युवतीना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोक-या मिळाव्यात व त्याचे भावी आयुष्य उज्वल व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.