दिनांक:२३/३/२०१४.
पहिले
वाचन:
निर्गम १७:३-७.
दुसरे
वाचन:
पौलाचे रोमकरांस पत्र ५:१-२,५-८.
शुभवर्तमान: योहान ४:५-४२.
“मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही.”
प्रस्तावना:
आज आपण
उपवास काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात इस्त्रायल लोक पाण्यासाठी मोशेकडे तक्रार करताना आढळतात व
त्यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून देव मोशेद्वारे चमत्कार करतो. दुस-या वाचनात संत पौल म्हणतो, ‘आपण विश्वासामुळे नितिमान ठरलेलो आहोत’. येशू ख्रिस्ताद्वारे आपणाला शांती मिळालेली आहे
आणि पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतकरणात देवाच्या प्रितीचा वर्षाव झाला आहे.
तसेच शुभर्वतमानात येशू ख्रिस्त एका शोमरोनी स्त्रीला
पापमुक्त करून जिंवत पाण्याविषयी मार्गदर्शन करताना दिसतो. येशू ख्रिस्त आज आपली
आत्मिक तहान भागविण्यासाठी आपणास बोलावत आहे. आपल्याला देवाची निवडलेली प्रिय मुले
बनता यावी म्हणून ह्या उपवास काळात आपण येशू ख्रिस्ताबरोबर असलेली आपली सहभागीता,
श्रध्दा आणि एकनिष्ठा तपासून पाहू या आणि त्याच्या वचनानुसार आचरण करण्यासाठी
प्रयत्नशील बनू या.
पहिले
वाचन: निर्गम १७:३-७.
निर्गम ह्या शब्दाचा अर्थ आहे ‘बाहेर निघणे’. इस्त्रायली लोक मिसर देशात गुलामगिरीत
होते, मोठ-मोठ्या चमत्काराने व पराक्रमाने
देवाने त्यांना मुक्त करून मिसर (इजिप्त) देशातून बाहेर काढले होते. देवाच्या
आज्ञेनुसार मोशेला त्यांना कनान देशात न्यायचे होते. इस्त्रायल लोकांच्या सुटकेवेळी घडलेल्या
एका महत्वपूर्ण घटनेचा संदर्भ आजच्या वाचनात येतो. आपल्या सुटकेच्या प्रवासामध्ये
इस्त्रायली प्रजा तहानेने व्याकुळ होते. अशा कठीण वेळी देवाच्या कृपासार्मथ्याने
मोशे दगडातून आपल्या प्रजेसाठी पाण्याचा झरा निर्माण करतो आणि त्यांची तहान
भागवितो. देव आपल्या निवडलेल्या लोकांबरोबर सतत असतो व स्वतः तो त्यांची सर्व
काळजी वाहतो ह्याची साक्ष ही घटना देते.
दुसरे
वाचन: पौलाचे रोमकरांस पत्र ५:१-२,५-८.
पौलाने हे पत्र इ.स.५८ मध्ये रोम येथील
मंडळीला लिहिले. तो या मंडळीला भेटण्यास व रोममध्ये सुवार्ता सांगण्यास उत्सुक
होता. रोम हे रोमन साम्राज्याचे राजधानीचे शहर होते.
या पत्राचा विषय नीतिमान ठरणे व नीतिमान राहणे हा आहे. हा विषय पौलाने
पुढील प्रकारे मांडला: १) कोणी मनुष्य नितीनाम नाही. २) देवाचे नीतिमत्व प्रकट
झाले आहे. ३) जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना देव निर्दोष ठरवितो, पापाच्या
सत्तेपासून मुक्त करतो, त्यांना ख्रिस्तामध्ये जीवन मिळते व त्यांचा व देवाचा समेट
होतो.
शुभवर्तमान:
योहान ४:५-४२.
आजचे शुभवर्तमान येशू ख्रिस्त व शमरोनी स्त्री यांच्यामधील एक
अर्थपूर्ण असा संवाद प्रस्तुत करते. या संवादाद्वारे निर्मळ पाण्याचा झरा असलेला
ख्रिस्त स्वत: आपला मुक्तिदाता कसा आहे याचा अनुभव त्या शमरोनी स्त्रीला येतो. आपल्या
जीवनातील या आगळ्या वेगळ्या येशूच्या प्रेमळ अनुभवाने ती इतकी भारावून जाते की,
ख्रिस्त हा फक्त संदेष्टाच नव्हे तर साक्षात आपला मुक्तिदाता आहे याची शुभवार्ता
ती आपल्या समाजामध्ये घोषविते.
सम्यक विवरणः
यहुदिया
प्रांताच्या उत्तरेला सुमारे ५० कि.मी अंतरावर गालील प्रांत आहे. ह्या दोन प्रांतामध्ये
शोमरोन हा प्रदेश आहे. यहुदिया मधून गालीलात जाण्यासाठी दोन वाटा होत्या.
यार्देनच्या पूर्व बाजूने विदेशीयांच्या देशातून जाणारी वाट लांब पल्ल्याची होती.
जवळची वाट शोमरोनातून होती. यहुदी आणि शोमरोनी यांच्यात वैरभाव होता तरीपण याच
वाटेने लोकांची ये-जा मोठ्याप्रमाणात चालू असे. सुमारे दीड दिवस पायी प्रवास करून
येशू भर दुपारी सुखार गावाला पोहोचला(योहान ४:५). तो चालून चालून दमला होता,
तेथील एका विहिरीच्या कड्यावर तो बसला(योहान ४:६). इतक्या कडक उन्हात एक शोमरोनी स्त्री
पाणी काढावयास आली(योहान;४:१८). येशूने तिच्याजवळ पाणी मागितले तेव्हा तिला
आर्श्चय वाटले. “आपण यहुदी आणि माझ्या हातचे पाणी पिणार? तिने चकित होऊन विचारले(योहान;४:९).”
तिची आत्मिक तहान येशू ख्रिस्ताने ओळखलेली होती. ती भागविण्यासाठी येशू कोण आहे व
तोच तिचे खरे समाधान करू शकत होता हे समजण्यासाठी गरज होती.
शोमरोनी
स्त्री सुखी का नव्हती हे येशू ख्रिस्ताला पक्के ठाऊक होते. या शोमरोनी स्त्रीचे
दुस-याबरोबर पटत नव्हते, तिच्या तापट व तुसड्या स्वभावामुळे तिचे विवाह टिकले
नाहीत. ख्रिस्ताला आपल्या परिस्थितीविषयी माहित आहे हे समजताच ती त्याला संदेष्टा
मानते(योहान;४:१९). येशू ख्रिस्ताने मोठ्या नम्रतेने तिला ख-या उपासनेविषयी
सांगितले. आपण उपासना कोठे करतो यापेक्षा कोणाची उपासना करतो तेच महत्वाचे आहे (योहान;४:२१-२४).
देवाकडे येण्याचा म्हणजे तारणाचा मार्ग यहुदी लोकांतून येणार होता, देव आत्मा आहे
व त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करता येईल अशी वेळ येत आहे असे तो म्हणाला.
येशू ख्रिस्त फक्त थोर पुरूष नव्हता तर तो ख्रिस्त आहे असे तिने आपल्या साक्षीने
सुचविले(योहान;४:२९).
अन्न
सामुग्री आणण्यासाठी गावात गेलेले शिष्य परत आले. येशू एका स्त्रीशी बोलत आहे हे
पाहून शिष्य आर्श्चयचकित झाल्याचे योहान सांगतो(योहान;४:२७) यहुदी धर्मगुरूंना रस्त्यात स्त्रीयांशी बोलण्याची परनवागी नव्हती.
स्त्रीयांबरोबर कोणतेही संभाषण त्यांच्या दृष्टीने नियमशास्त्राच्या अभ्यासाला अडथळा
होते. त्याला प्रश्न विचारण्याचे धैर्य शिष्यांना नव्हते(योहान;४:२७). त्यावरून
येशूच्या त्या कृतीमुळे ते खूपच भांबावले होते असे दिसते. शिष्यांना ऐहिक अन्नाचीच
चिंता होती. ऐहिक अन्नापेक्षा देवाची इच्छा पूर्ण करण्यालाच अग्रक्रम दिला पाहिजे
हाच येशूच्या म्हणण्याचा मथितार्थ आहे. (योहान;४:३४) पण ऐहिक अन्नाकडे दुर्लक्ष
करावे असे येशूचे सांगणे नव्हते.
शोमरोनामधील
येशूच्या सेवाकार्याचा समारोप व शेवट आध्यात्मिक पीक गोळा करण्याच्या एका
उदाहरणातून दाखवला आहे (योहान;४:३५-३८). हे दोन टप्यात घडून आले. त्या स्त्रीने
सांगितले ते ऐकून अनेकांनी विश्वास ठेवला. येशू सुक्ष्म अंतज्ञानी आहे, तो
दुस-याच्या मनातले जाणतो हाच तिच्या साक्षीत मुख्य मुद्दा होता(योहान;४:३९) परंतु खुद्द
येशूबरोबर वैयक्तिक संपर्क आल्याने त्यांचा विश्वास अधिक भक्कम झाला(योहान;४:४२). येशू यहुदी असूनही त्याने आपल्याकडे मुक्काम
करावा, (योहान;४:४०) ही शोमरोन्याची इच्छा असाधारणच होती. तथापि तो केवळ याहुद्यांचाच
नव्हे तर सर्व जगाचा तारणारा आहे हे ह्यावरून
स्पष्ट होते.
बोध
कथा:
पाकिस्तानच्या एका माजी गृहमंत्र्याची पत्नी बेगम बिल्कवीस शेख, भगवंताच्या
दर्शनासाठी तहानलेली होती. ख-या देवाचा शोध घेण्यासाठी तिने आकाश, पृथ्वी धुंडाळीली! शेवटी तिच्याच विनंतीनुसार
तिच्या ख्रिस्ती नोकराने तिला आणून दिलेल्या पवित्र शास्त्रात तिला प्रभूचे दर्शन
घडले. ख्रिस्त हाच दया सागर परमेश्वर आहे ही खात्री पटल्यानंतर तिने धर्मांतराचा निर्णय
घेतला. तिच्या ह्या निर्णयाच्या विरोधात मुस्लिम समाजाने बंड उभारले. वृत्तपत्रातून
तिच्यावर आरोप करण्यात आले,
तिच्यावर
टिकास्त्र झोडले गेले, कुटुंबियांनी तिचा छळ केला. तिला अंधार कोठडी भोगावी लागली, परंतू ख्रिस्तासाठी ती तहानलेली होती, ख्रिस्तासारखे दु:ख सहन करण्याची संधी
मिळाली ह्यातच तिने प्रभूचे आभार मानले.
मनन चिंतनः
१. पाणी हे जीवनावश्यक असते. रात्रंदिवस आपणास पाणी लागते, पिण्यासाठी, आंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी, बागायतीसाठी पाणी लागते, पाण्याविना जगणे कसे कठीण आहे हे
प्रत्येकाला ठाऊक आहे. येशू जिवंत पाण्याचा झरा आहे. आपल्याला पाण्याइतकीच
किंबहुना अधिक आवश्यकता येशूची आहे, जीवनातील विविध प्रसंगी आपणास येशूची गरज भासते. पाणी म्हणजे जीवन, ख्रिस्त हा जीवन आहे. दु:खात, संकटात, वैतागलेल्या मनाला विसावा देण्यासाठी ख्रिस्ताची गरज असते, अंधारात आणि भिती प्रसंगी येशूची गरज
भासते. अडचणीत, अपयशात, परिक्षा काळी आपणास येशूची गरज भासते.
ज्याप्रमाणे
पाणी नदीच्या
तीरावरील सर्व वृक्ष-वेलींना टवटवीत व तेजस्वी ठेवते त्याचप्रमाणे ख्रिस्ताचा
आत्मा जेव्हा आपल्यामध्ये वास्तव्य करतो तेव्हा आपल्या जीवनाचा कायापालाट होतो व आपणास
आध्यात्मिकता प्राप्त होते. देव पित्याशी एकजीव होणे, इतरांवर प्रेम करणे, दया आणि क्षमाभावनेने इतरांशी सलोखा
करणे ह्यासाठी आपल्या जीवनात जिंवत पाणी लागते, म्हणूनच येशू ख्रिस्त म्हणतो, जे पाणी मी देईन ते सार्वकालिन जीवनाचा झरा बनेल. यशयाच्या शब्दात सांगायचे म्हणजे परमेश्वर तुम्हाला सतत मार्गदर्शन
करील व चांगल्या वस्तूने तुमच्या इच्छा पूर्ण करील, ह्याचा अर्थ ख्रिस्त आपणास त्याचा पवित्र आत्मा देवून नवजीवन देतो, ख्रिस्त आपल्या अंतरआत्म्यात शिरतो, आपले विचार, आपल्या भावना,
आपली तत्वे, आपला दृष्टीकोन सर्वकाही शुध्द बनून
त्यास स्फूर्ती मिळते.
२. ज्या पाण्याला भावना नसतात, मरण नसते व स्व:ताच्या हालचाली नसतात ते पाणी
जिंवत कसे असू शकेल? ख्रिस्त जिंवत आहे आणि ख्रिस्ताद्वारे माणवास
जीवन प्राप्त होते. ख्रिस्ताद्वारे येणारे जीवन माणसाला जगवते. ख्रिस्ताद्वारे
मिळणा-या जीवनातून माणसाच्या जीवनाचे तारण होते. सर्वसाधारणपणे जीवनात पाणी
प्याल्याने माणसाला परत तहान लागतेच, म्हणजेच तो नेहमी अतृप्त असतो. एखादया माणसाने कितीही पैसा कमावला असला तरी त्याला पैशाची तहान
लागते. एखादया माणसाकडे अनेक वस्तू असल्या तरी त्याला नवनवीन वस्तूंची तहान लागतेच,
उदा. दाग-दागिन्यांच्या बाबतीत, कपड्यांच्या
बाबतीत, घर अथवा गाडी ह्या बाबतीत. ख्रिस्त जे
जीवन देतो त्याबाबतीतही माणसाला पूर्ण आनंद अथवा समाधान असते. पूर्णतेच्या पलिकडे
तो आनंद मिळवू शकत नाही, तो तृप्त होतो.
माणसाची तहान परमेश्वर भागवतो पण परमेश्वराची तहान माणूस भागवू शकेल
का? पवित्र, कृपापूर्ण जीवन जगून परमेश्वरास तो तृप्त करू शकेल का? परमेश्वर माझ्या जवळ येऊ शकणार नाही, त्याची कृपा मला मिळणार नाही, मी त्यासाठी पात्र नाही अश्या संभ्रमात
माणसाने राहू नये, जेव्हा आम्ही विहिरीतील आणि जीवनाचे
पाणी ह्यातील फरक लक्षात घेऊन जीवनाच्या पाण्यासाठी प्रामाणिकपणे आसुरलेले असू
तेव्हाच आम्हाला जीवनाचे पाणी मिळेल जीवनाचे पाणी पिण्यासाठी देखील माणसाला आव्हान
स्विकारावे लागते, शोमरोनी स्त्रीने ते आव्हान स्विकारले, व तिच्या जीवनाचा कायापालट झाला. आज
तोच प्रभू येशू आपल्याला जीवनाचे पाणी पिण्यासाठी बोलावत आहे. आमची कष्ट, दु:खे आणि यातना या सर्व सोडवण्यासाठी तो आमंत्रण करीत
आहे, त्याच्या सान्निध्यात बसण्यासाठी आम्ही
तयार आहोत का?
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद:
हे प्रभो, तुझ्या जीवनदाई पाण्याने आमची तहान भागव.
१. ख्रिस्तसभेचे धुरा पाहणारे पोप, बिशप्स, फादरर्स, सिस्टर्स व इतर प्रापंचिक या सर्वांवर
देवाचा आर्शिवाद यावा व क्षमा आणि शांतीचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. जे शारिरीक सुखासाठी तहानलेले आहेत, ज्यांना पैशाचा लोभ आहे, जे वाईट मार्गाला लागलेले आहेत, अश्या सर्व लोकांना प्रभू येशू
ख्रिस्ताचा स्पर्श होऊन त्याच्या जीवनाला नवी दिशा मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. शोमरोनी स्त्रीसारखे आम्ही सुध्दा
जिवंत पाण्यासाठी व्याकुळ व्हावे, आमचे
आचार-विचार शुध्द व्हावे व देवाचा महिमा वर्णविण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न
करावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. आमचा देवावरील विश्वास अधिक मजबूत
व्हावा, आमच्या सुख-दु:खात आम्ही फक्त त्याचाच
गौरव करावा व या उपवास काळात आम्ही आमच्या मनाची चांगली तयारी करावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. सर्व युवक-युवतीना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोक-या मिळाव्यात व त्याचे भावी आयुष्य उज्वल व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
Well done Malcolm! May the Lord always quench the thirsts of our soul! - Ajit Tellis
ReplyDeletevery good ...keep it up
ReplyDeleteGOOD REFLECTIONS
ReplyDeleteThanks
ReplyDeleteInspiring homily