Tuesday, 11 March 2014

Reflections By: Nevil Govind








उपवास काळातील दुसरा रविवार

















येशूचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले.
दिनांक: १६/३/२०१४.
पहिले वाचन: उत्पत्ती :-.
दुसरे वाचन: तिमथ्याला दुसरे पत्र :-१०.
शुभवर्तमान: मत्तय १७:१-९.

प्रस्तावना:
      आज आपण उपवास काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत.आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, आब्राहामाने देवाच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि विश्वासाने तो देवाच्या वचनाला जागला. देवाच्या कृपेमुळे आणि आशीर्वादमुळे आब्राहाम जणू रुपांतरीत जीवन जगला. दुस-या वाचनाद्वारे संत पौल आपल्याला दाखवून देतो की, देवाचे पाचारण हे आपल्या स्वत:च्या गुणवत्तेवर अवलंबून नाही तर ते सर्वस्वी देवाच्या कृपेवर अवलंबून आहे.
 शुभवर्तमानात प्रभू येशूचे रुपांतर कसे झाले आणि शिष्यांना प्रभू येशूचे सामर्थ्यशाली आणि गौरवमय प्रकाशाचे दर्शन कसे घडले हे सांगितले आहे. प्रभू येशूचे रुपांतर म्हणजे जणू आपल्याला केलेले पाचारण आहे. प्रभू येशूठायी आपण रुपांतरीत व नवीन जीवन जगावे म्हणून आज प्रभू येशू आपल्याला बोलावित आहे. आब्राहामाची देवावरील अढळ श्रद्धा व संत पौलाची सुवार्ता प्रसाराची जिद्द आपल्यात निर्माण व्हावी आणि आपण ख्रिस्ताचे खरे अनुयायी बनण्यास पात्र ठरावे म्हणून या मिस्साबलीत प्रभू चरणी प्रार्थना करू या.
         
पहिले वाचन: उत्पत्ती :-४.

सर्वसमर्थ परमेश्वर आब्राहामास सांगतो की, 'तू तुझ्या पूर्वजांची जमीन व तुझा देश सोडून मी दाखवीन त्या देशात जा'. परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे आब्राहाम सर्व काही सोडून विश्वासाने दुस-या देशात निघून जातो. आब्राहाम आपल्या जीवन श्रद्धेद्वारे आपण कश्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुकरण केले पाहिजे याची साक्ष देतो.

दुसरे वाचन: तिमथ्याला दुसरे पत्र :-१०.

तीमथ्याला हे दुसरे पत्र लिहिताना पौल रोम येथे तुरुंगात होता. हे पत्र लिहिताना आपली सुटका होणार नाही व आपण लवकरच मरणार आहोत याची पौलाला जाणीव होती म्हणून त्याने हे पत्र लिहून घेतले व तीमथ्याकडे पाठविले. पौलाला तीमथ्याला भेटण्याची उत्कंठा लागली होती. त्याने प्रभूचे कार्य पुढे चालू ठेवावे यासाठी त्याला उत्तेजन देण्यास त्याने हे पत्र लिहिले.
     संत पौल तिमथीला लिहिलेल्या दुस-या पत्रात देवाच्या पवित्र पाचारणाचे महत्व समजावून सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा प्रकाश व सुवार्ता प्रकट झाली आणि ती पसरविण्यासाठी प्रभू प्रत्येकाला पाचारण करीत आहे.

शुभवर्तमान: मत्तय १७:१-९.

जुन्या करारात देवाने आब्राहामाबरोबर करार केला होता: ‘तुझी संतती रेतीप्रमाणे वाढवीन. तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादीत होतील’. मत्तय शुभवर्तमानात येशूची वंशावळ थेट आब्राहामापर्यंत दाखवतो; म्हणजेच आब्राहामाला देवाचे जे वचन दिले होते, त्याची पूर्तता कालाच्या ओघात येशूत झाली. शुभवर्तमानात प्रभू येशू प्रार्थना करीत असताना त्याच्यात कायापालट होतो; त्याचा चेहरा प्रकाशित होतो, त्याचे कपडे देदिप्यमान होतात. त्या ठिकाणी प्रभू येशू देव आहे, ह्याचे चिन्ह ह्या रूपांतराद्वारे स्पष्ट होते. 
   
सम्यक विवरण:
कालावधी:
  • मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले(मत्तय १७:१).
  • ह्या बोलण्यानंतर असे झाले की, सुमारे आठ दिवसांनी पेत्र, योहान व याकोब ह्यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला(लूक ९:१).
  • मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकीकडे नेले व तेथे त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले(मार्क ९:२).
येथे काळाचा, (सहा दिवसानंतर), (सुमारे आठ दिवसांनी), नेमका असाधारणपणे उल्लेख केला आहे, तरीसुद्धा ही घटना ऐतिहासिक आहे हे आपल्याला संत पेत्राच्या दुस-या पत्रातून कळते; त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वत: ऐकली(पेत्राचे दुसरे पत्र १:१८).
पर्वत:
फिलिप्पा कैसरीया हा प्रदेशाबद्दल उल्लेख आपणास (मत्तय १६:१३-२०) ह्या उता-यात ऐकण्यास भेटतो. ह्या उता-यात येशू आपल्या शिष्यांना विचारतो, "मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? आणि तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? ह्या प्रश्नांना शिमोन पेत्राने उत्तर दिले, ‘आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा’"(मत्तय १६:१३ब, १५-१६). ह्यावरून येशू हा ‘ख्रिस्त’ आहे आणि तो ‘जिवंत देवाचे पुत्र’ आहे हे आपणास शिमोन पेत्राद्वारे कळते.
फिलिप्पा कैसरीया या प्रदेशात हार्मोन नावाचा पर्वत आहे. हार्मोन पर्वत हा ९,४०० फूट उंच आणि ११,००० फूट यार्देन दरीच्या वर आहे. या पर्वतातील एका उंच डोंगरावर येशू ख्रिस्त आपल्या तीन शिष्यांसह गेला. ‘तो प्रार्थना करीत असता त्याचे रूपांतर झाले’(लूक ९:२९). हार्मोन पर्वतावर पित्याने येशू हा त्याचा परम प्रिय पुत्र आहे ह्याबद्द्ल शिक्कामोर्तब केले. तो बोलत आहे तो, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघांतून अशी वाणी झाली की, हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; ह्याचे तुम्ही ऐका” (मत्तय १७:५). 
येशू ख्रिस्त व तीन शिष्य:
प्रत्येक मोठे कार्य किंवा घटना घडली तेव्हा येशूने त्याच्या निवडक शिष्यांना बरोबर घेतले. नव्याकारात आपणास हे दोन उतारे सापडतात, जिथे येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपणाबरोबर घेतले. एक म्हणजे रूपांतराच्या; (मत्तय १७:१); आणि दुसरा म्हणजे गेथसेमाने बागेत (मार्क १४:३३).
आजच्या घटनेतही येशू पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपणाबरोबर घेऊन एका डोंगरावर जातो. आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होवून त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले(लूक ९:२९). येशूच्या शिष्यांसाठी हा एक साक्षात्कार होता. ह्या साक्षात्काराद्वारे येशूच्या देवत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले. येशूची सत्ता केवळ पृथ्वीवर नसून संपूर्ण विश्वावर असल्याचे ह्या घटनेतून दर्शविले गेले.
मोशे व एलीया:
"तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले(मत्तय १७:३). जसे पित्याच्या सानिध्यात असताना येशू ख्रिस्ताचे रूपांतर झाले होते; तसेच देवाच्या सानिध्यात असताना मोशेचे रूप बदलले होते. मग मोशे सीनाय पर्वतावून उतरला; आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हाती घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेह-यांतून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते(निर्गम ३४:२९). मोशे व एलीया ह्या दोघांना देवाचा अनुभव उंच पर्वतावर आलेला होता. परमेश्वराने मोशेबरोबर सीनाय पर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेले पाषोणाचे दोन साक्षपट त्याला दिले” (निर्गम ३१:१८). ‘एलीयाला होरेब पर्वतावर देवाचा अनुभव आला’(१राजे १९:१-१३). जणू काही मोशे व एलीया ह्या दोघांना देवाने येशू ख्रिस्ताला त्याच्या दु:खसहनाचा मार्ग चालण्यास ख्रिस्ताचे मार्गदर्शक म्हणून पाठवले होते. ‘मोशे एकदा मृत्यूला भ्याला होता’ आणि ‘वैतागून मला एकदा मारून टाक असे देवाला म्हणाला होता’ (निर्गम १७:४, निर्गम ११:१५). ‘एलीयाही एकदा जीव घेऊन पळाला होता’आणि ‘वैतागून देवाला म्हणाला होता माझा जीव घे’ (१राजे १९:३, १राजे १९:४).
तेजस्वी मेघ:
     "तो बोलत आहे तो, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली(मत्तय १७:५अ). सर्व शुभवार्तिक असे सांगतात की, इस्रायल लोकांवर तेजस्वी मेघाची सावली सदोदित होती. तेजस्वी मेघ हा इस्रायल लोकांच्या इतिहासातील अविभाज्य घटक होता. इस्रायल लोकांच्या इतिहासामध्ये तेजस्वी मेघ हा सर्वशक्तीशाली देवाचा वैभव होता. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असे; दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत(निर्गम १३:२१-२२). मग दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला(निर्गम ४०:३४). याजक पवित्रस्थानांतून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापिले(१राजे ८:१०).      
आकाशवाणी:येशू ख्रिस्ताच्या बाबतीत पित्याद्वारे झालेल्या आकाशवाणी.
(अ) आकाशवाणीचा पहिला प्रसंग ख्रिस्ताच्या बाप्तीस्माचा होता. "आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे"(मत्तय ३:१७). "तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की, ‘तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे"(मार्क १:११). "आणि आकाशांतून अशी वाणी झाली की, ‘तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे(लूक ३:२२ब). ख्रिस्ताच्या बाप्तीस्म्यातील आकाशवाणीचा उल्लेख आपणास तिन्ही शुभवर्तमनामध्ये सापडतो.
(ब) आकाशवाणीचा हा दुसरा उतारा योहानाच्या शुभवर्तामानामध्ये आहे. हे बापा, तू आपल्या नावांचे गौरव कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की, मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन(योहन १२:२८).
(क) आकाशवाणीचा तिसरा प्रसंग (ख्रिस्ताचे रूपांतर): "तो बोलत आहे तो, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघांतून अशी वाणी झाली की, हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; ह्याचे तुम्ही ऐका(मत्तय १७:५). ह्या तिन्ही आकाशवाणीद्वारे देवाने येशू हा खरोखरच त्याचा पुत्र आहे हे ठामपणे शिक्कामोर्तब केले.

बोध कथा:
एके दिवशी अमेरिकेतील एक रहिवाशी पॅरीस मध्ये गेला. तेथे त्याला आपल्या पत्नीसाठी एक भेटवस्तू घेण्याची इच्छा झाली. त्याने तिच्यासाठी जादुई दिवा घेतला, त्याची सुंदरता हि होती की, ‘तो काजवासारखा रात्री चकाकत असे’. त्या माणसाने ते गिफ्ट गुंडाळले आणि आपल्या सोबत अमेरिकेत घेऊन गेला. पत्नीचा वाढदिवस असल्याकारणाने त्याने पार्टी दिली त्या पार्टीत त्याने हे गिफ्ट देण्यासाठी लाईट बंद करण्यास सांगितले. अंधारामध्ये त्या माणसाने आपल्या पत्नीस गिफ्ट देण्याकरिता आपल्या खिश्यातून तो जादुई दिवा बाहेर काढला, परंतु त्याचा उजेड कुठेच पडला नाही वा कुणीही त्याचा चकाकणारा प्रकाश पहिला नाही. तो माणूस निराश झाला आणि म्हणाला, ‘परदेशी माणसाची फसवणूक करतात ही लोकं! ह्या माणसांनी माझी सुद्धा फसवणूक केली’.
दुस-या दिवशी ते गिफ्ट पाहण्यासाठी त्याची पत्नी उत्सुक होती, तिने ते गिफ्ट आपल्या हातात घेतले व त्याच्यावर आपली एक नजर टाकली, इतक्यात तिला त्या गिफ्टवर काही शब्द आढळले,परंतु ते फ्रेंच भाषेत असल्या कारणास्तव तिला वाचता आले नाहीत. तिने ते गिफ्ट आपल्या शेजारी फ्रांसमधील कामावर असलेल्या एका युवतीकडे दिले व म्हटले, ‘ह्या गिफ्टवर जे वाक्य लिहिले आहे त्याचा मला अर्थ काय? त्या मुलीने ते वाक्य वाचून त्या वाक्याचा अर्थ सांगितला,‘जेव्हा हा ‘जादुई दिवा’ तुम्ही संपूर्ण दिवस सूर्यप्रकाशात ठेवाल तेव्हाच तो संपूर्ण रात्रभर चमकत राहील व त्याचा प्रकाश दुस-यांना दिसेल’.
            
मनन- चिंतन:
१९८४ च्या उपवास काळातील परिपत्रकामध्ये धन्यवादित पोपमहाश जॉन पौल दुसरे ह्यांनी असे विवरण केले होते की,‘उपवास करणे म्हणजे उपाशी माणसाला अन्नदान करणे’. उपवास या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे: उप=जवळ; वास=राहणे, म्हणून उपवास म्हणजे,‘देवाच्या अधिकाधिक जवळ राहणे’. जुन्या करारात उपवास काळात गोणपाट नेसून अंगाला राख लावली जात असे परंतु आज उपवासकाळाचा अर्थ अधिक विस्तृत स्वरुपात देऊळमातेने लोकांपुढे मांडला आहे;‘उपवास काळात शारीरिक उपवासापेक्षा आत्मिक उपवासाची गरज आहे’.
जसा ‘प्रत्येक वर्षी पावसाळा येतो; तसाच उपवासकाळ’ असा काही लोकांनी उपवास काळाचा अर्थ करून घेतला आहे. पावसाळ्यात जोराचा पाऊस पडतो, या पावसाळ्यात भिजत असलेला दगड फोडून पाहिला तर आत कोरडाच असतो. त्याचप्रमाणे काही ख्रिस्ती माणसं संपूर्ण उपवास काळ सरून गेल्यानंतर देखील अगदी कोरडीच असतात.
आज आपण रुपांतराच्या उता-यात ऐकले की, ‘सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले व त्यांच्यादेखत त्याचे रूप पालटले’(मत्तय १७:१-२अ). हेच तीन शिष्य आपण पुन्हा गेथसेमनी बागेत येशूबरोबर पाहतो. येशू शिष्यांबरोबर जगला, फिरला व वावरला;परंतु शिष्यांनी त्याला ओळखले नाही. (मत्तय १६:१३-२०) ह्या उता-यात येशू आपल्या शिष्यांना प्रश्न विचारतो, "मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलीया, कित्येक यिर्मया, किंवा संदेष्ट्यांतील कोणी एक, असे म्हणतात. पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?"(मत्तय १६:१३ब-१५). यावरून आपणास कळते की,येशूच्या शिष्यांनी येशूला त्यांच्यातील एक म्हणून मानले होते. परंतु शिमोन पेत्राने येशूच्या प्रश्नाला दिलेले उत्तर, आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा(मत्तय १६:१६); शिष्यांस येशू हा ख्रिस्त व जिवंत देवाचे पुत्र आहे हे समजते. येशूला आपल्या शिष्यांस ह्या दोन प्रश्नांतून ते कोणाचे शिष्य आहेत आणि येशू कोण आहे हे स्पष्ट करायचे होते. ख्रिस्ताने शिष्यांस पटवून दिले, मी तोच आहे, ज्याची तुम्ही वाट पाहता. जसे जरी आज एखाद्याने सांगितले की, मी अमुक आणि तमुक ठिकाण्यावरून आहे, तरी लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही; तशीच शिष्यांचीही मनोवृत्ती झाली होती.
आजच्या शुभवर्तमानात आपण पित्याने केलेली आकाशवाणी ऐकली; तो बोलत आहे तो, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघांतून अशी वाणी झाली की हा माझा ‘पुत्र’ मला ‘परमप्रिय आहे ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे ह्याचे तुम्ही ऐका(मत्तय १७:५). ह्या पित्याच्या येशू ख्रिस्ताबद्दल झालेल्या आकाशवाणीवरून शिष्यांच्या मनातील शंका दूर सारवल्या आणि ठामपणे शिष्यांनी येशू हा ख्रिस्त व जिवंत देवाचे पुत्र आहे हे मानले.      
शिष्यांना झालेल्या या साक्षात्कारामध्ये एक प्रकारे येशूचे रहस्यमय स्वरूपच प्रकट झाले होते. प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वसमर्थ परमेश्वराचा पुत्र आहे. इस्रायली प्रजेमधील मोशे आणि एलीया या सर्वश्रेष्ठ संदेष्ट्यांबरोबर तो एकरूप झालेला आहे. देवाचा परमप्रिय पुत्र या नात्याने आम्ही त्याचे ऐकले पाहिजे. त्याने सांगितलेल्या मार्गावरून प्रेम, दया, क्षमा व शांती यासारख्या शाश्वत मूल्यांची जोपासना करीत प्रवास केला पाहिजे. हा प्रवास अवघड आहे. दु:खांनी आणि संकटांनी ओतप्रोत भरलेला आहे. परंतु मुक्तीचा अनुभव घेऊन अनंतकाळाचे सुख मिळविण्यासाठी हा मार्ग स्वीकारलाच पाहिजे हा खडतर मार्ग स्वीकारण्याच्या आव्हानामध्येच तर शिष्यांना झालेल्या आजच्या साक्षात्काराचे गुपीत दडलेले आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद:  परमेश्वरा ये आणि आमचे परिवर्तन कर.
१. ख्रिस्तसभेच्या सर्व अधिका-यांनी घेतलेला ख्रिस्ताचा अनुभव सर्व लोकांपर्यंत पोहचवावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील पुढा-यांनी भ्रष्टाचारापासून दूर राहावे आणि प्रामाणिकपणे देशाची सेवा करावी,  म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने चांगल्या कार्यक्रमाचे प्रसारण करावे व जनतेला योग्य मार्गदर्शन करावे,  म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. जे देवापासून दुरावलेले आहेत त्यांना प्रभुने स्पर्श करावे व तोच जीवनाचा मार्ग व सत्य आहे ह्याची जाणीव करून द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.








5 comments: