सामान्य काळातील अठरावा
रविवार
पहिले वाचन: यशया ५५:१-३
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५, ३७-३९
शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१
“आमच्याजवळ केवळ पाच भाकरी
आणि दोन मासे आहेत.”
प्रस्तावना:
प्रिय भाविकांनो आज आपण सामान्यकाळातील अठरावा रविवार साजरा
करीत असताना आजची उपासना आपणास स्वर्गीय मेजवानीसाठी आमंत्रण देत आहे. आजच्या
पहिल्या वाचनाद्वारे यशया संदेष्टा ह्याच मेजवानीचे आमंत्रण देत असताना म्हणतो की,
‘माझे लक्षपुर्वक ऐका आणि उत्तम ते खा, तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून
संतुष्ट होवो’. तर आजच्या दुस-या वाचनात संत पौल, ह्या जगातील कोणतीही दृश्य वा
अदृश्य शक्ती आपल्याला देवाच्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाही असे आपणास सांगत
आहे.
यशयाने केलेल्या घोषणेची पूर्तता येशूद्वारे आजच्या
शुभवर्तमानामध्ये होताना आपण पाहतो. आजच्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत
असताना आपण आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि गरजा सर्व सामर्थ्यशाली प्रभूकडे
विश्वासाने समर्पित करूया व त्याने दिलेल्या आमंत्रणाला होकार देऊन त्याच्या
सार्वकालिक मेजवानीत सहभागी होऊया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५५:१-३
यशया संदेष्टा ह्या अध्यायात लोकांना भव्य
पंचपक्वान्नांच्या मेजवानीसाठी आमंत्रण देत आहे, ह्या शब्दांनी यशया जे इस्रायली
लोक बंदिवासात होते त्यांना दिलासा देत परमेश्वरामध्ये आनंदोस्तव करण्यासाठी
बोलावत आहे कारण तोच त्यांच्या गरजा भागवून त्यांना त्यांच्या होणा-या दु:खातून व
वेदनांतून सोडवू शकतो.
हे आमंत्रण गरीब आणि श्रीमंत ह्या सर्वांसाठी आहे. ‘या’, ‘घ्या’
आणि ‘खा’ हे परमेश्वराचे स्वर्गीय भोजनासाठी आमंत्रण करण्यासाठी वापरलेले शब्द
आहेत. परमेश्वर त्यांना ‘अन्न’ आणि ‘पाणी’ ह्या मुलभूत गरजांचाच पुरवठा न करता
‘दूध’ आणि ‘द्राक्षरस’ ह्या पदार्थांचे देखील विनामुल्य आनंद घेण्यास बोलावत आहे.
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५, ३७-३९
वचन ३५-३९ ख्रिस्ताचे आमच्यावर असलेल्या प्रीतीचे वर्णन करतो.
ह्या प्रितीपासून आम्हांला कोणीही वेगळे करू शकत नाही. पृथ्वीवरील कोणत्याही
संकटाला अगर आपत्तीला हे करणे शक्य नाही, कारण ज्याने आपणावर प्रीती केली आहे
त्याच्यायोगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. तसेच देवाच्या प्रितीपासून
आम्हांला विभक्त करणे कोणत्याही आत्मिक शक्तीला शक्य नाही (देवदूत, अधिपती ८:३८).
शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१
येशूने एकांतात जाण्याचा प्रयत्न केला हे आपण तेराव्या ओवीत
वाचतो परंतु येशू आतापर्यंत खूप लोकप्रिय झाला असल्यामुळे असे कोणाला न समजता
एकांतात जाणे अशक्य होते. लोकांचे त्याच्या मागे येणे व येशूने पाच हजार हजारांना
जेवू घालणे हे येशूच्या दैविपनाचे व त्याच्या आपल्यावर असलेल्या आपलुकीचे चिन्ह
आहे.
काही अडचणीवर मात करण्यास देवाच्या मध्यस्तीची गरज असते.
येशूच्या शिष्यांना कल्पना होती की लोक भुकेले आहेत
व लोकांची भूक भागवण्याची त्यांना चिंता होती परंतु लोकांची भूक कशी भागवायची ह्या
अडचणीवर त्यांनी एकदम साधा मार्ग निवडला आणि तो म्हणजे लोकांना शेजारच्या गावात
पाठवून स्वत:साठी अन्न विकत घेण्यास सांगणे. कधी कधी देव आपल्यासाठी काय करू शकतो
ह्याची आपल्याला पूर्ण कल्पना नसते. त्या निर्जन जागेत पाच हजारांना जेवू घालणे
तसे अशक्यच होते परंतु लोकांची भूक भागवण्यासाठी देवाने या अगोदर मोशे, एलिया व
एलीशाचा वापर केला होताच.
ज्या जागेत सर्व लोक जमले होते त्याचा शेजारी काही गावं होती परंतु ती खूप छोटी
गावं होती. ह्या छोट्या गावांना एवढ्या मोठ्या जनसमुदायाची गरज भागवणे जवळ जवळ
अशक्य होते. अश्या परिस्थितीत आपल्याला एलीशाच्या शिष्यांनी विचारलेला प्रश्न व
त्यावर त्यांना मिळालेल्या उत्तराची आठवण येते.
“शंभर लोकांना हे कसे काय वाढायचे?...लोकांना वाढ तर खरं! प्रभू म्हणतो ते
खाऊन देखील काही उरेल!” (२ राजे ४:४३).“एलीयाद्वारे प्रभूने दिलेल्या संदेशानुसार तेचे पीठाचे गाडगे रिकामे झाले
नाही किंवा तेलाची बुधली रिकामी पडली नाही”(१राजे १७:१६). येशूचे व एलीयाच्या
शिष्यांना आपपल्या गुरूंकडे किती दैवी शक्ती आहे व ते त्या दैवी शक्तीने काय करू
शकतात ह्याची कल्पना होतीच व ह्यावेळी इस्रायेलचा देव ज्याने समुद्राचे पाणी
दुभंगून त्यात कोरडी जमीन तयार केली(निर्गम १४:२१, २राजे २:८), स्वर्गातून खाण्यास
मान्ना दिला (निर्गम १६:१४-१८) तोच देव परत एकदा आपल्या प्रजेसाठी चमत्कार करण्यास
तयार झाला होता.
बहुतेकदा प्रभू आपल्याजवळ जे आहे त्यापासून सुरवात करतो.
प्रभू आपल्याजवळ जे आहे ते घेऊन अनेक पटीने वाढवतो हे आपण
आजच्या शुभवर्तमानातील १६-१९ व्या ओवीत पाहतो तर जेव्हा देवाने मोशेला यहुदी
प्रजेकडे पाठवायचे ठरवले तेव्हा मोशेने देवाकडून त्याच्या प्रजेला दाखवण्यासाठी
चिन्ह मागितले अश्यावेळी त्या वेळेला जी काठी मोशेच्या हातात होती त्याच काठीचे
रुपांतर देवाने त्याच्या चिन्हात केले हे आपण निर्गमच्या पुस्तकात चौथ्या
अध्यायातील एक ते तीन ह्या ओव्यांमध्ये पाहतो. त्याच काठीचा वापर पुढे समुद्राच्या
पाण्याचे दोन भाग करण्यास वापर करण्यात आला.(निर्गम१४:१६). जेव्हा एका विधवा बाईने
एलीशाकडे मदत मागितली तेव्हा एलीशाने तिला विचारले की ‘तुझ्या घरात काय आहे?’ व
तिने उत्तर दिले “फक्त एका भांड्यात तेल आहे’ तेव्हा एलीशाने तिला आपल्या
शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी उसनी म्हणून आणायला सांगितली आणि ते सर्व भांडी
भरेपर्यंत तेलाची पटीने वाढ केली.(२राजे ४:१-७).
येशूने भाकरी व मासे पटीने वाढवण्यासाठी प्रार्थना केली
नाही कारण त्याचा पूर्ण विश्वास होता की असलेले जेवण पटीने वाढवून जनसमुदायाची भूक
भागवणे हीच पित्याची इच्छा आहे. त्याने त्या भाकरी व मासे घेऊन भोजनागोदर फक्त
आपल्या पित्याचे आभार मानले कारण यहुदी लोकांत जेवणा अगोदर देवाचे आभार मानण्याची
प्रथा होती.
बोध कथा
एका देवाभिरू ख्रिस्ती कुटुंबात दररोज संध्याकाळी प्रार्थना
होत असे व त्यांच्या प्रथेनुसार प्रार्थनेच्या वेळेला कुटुंबातील एक व्यक्ती
पवित्र बायबल मधील छोटासा उतारा वाचत व त्यावर थोडे मनन-चिंतन करून छोटासा उपदेश
देत. त्या ठराविक दिवशी त्या कुटुंबातील जॉनी नावाच्या ८ वर्षाच्या छोट्या मुलाची
बायबल मधील उतारा वाचून त्यावर उपदेश करण्याची पाळी होती. त्या दिवशी त्याने मत्तयच्या
शुभवर्तमानातील १४वा अध्याय १३-२१ ‘येशूचे पाच हजारांना भोजन’ हा उतारा वाचला. तो
उतारा हळुवारपणे वाचत असताना कुटुंबातील सर्वजण विचार करीत होते की येशूच्या ह्या
चमत्काराविषयी हा छोटा जॉनीआमाला काय उपदेश देणार?
उतारा वाचून झाल्यानंतर थोडा वेळ शांत राहून जॉनीने उपदेशास
सुरवात केली. “येशूकडे पोहोचेपर्यंत त्या पाच भाकरी व दोन मासे तसेच राहिले परंतु जेव्हा
त्या भाकरी व मासे येशूकडे पोहचल्या तेव्हाच त्यांची अधिक पटीने वाढ होऊ लागली. त्याचप्रकारे
आपल्याकडे जे काही आहे ते आपण देवाच्या हाती सोपविले पाहिजे. ते कितीही साधे अथवा
छोटे असले तरी एकदा का ते देवाच्या हाती पोहचले की ते अनेक पटीने वाढण्यास सुरवात
होते व इथेच खऱ्या चमत्काराला सुरवात होते.” त्या छोट्या जॉनीचा हा उपदेश ऐकून सर्वांना
कुतूहल वाटले व त्यांनी ह्या उपदेशाबद्दल त्याचे अभिनंदन केले.
मनन चिंतन
शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशूच्या शिष्यांना लोकांची
काळजी आहे. प्रभू येशुलासुद्धा लोकांची काळजी आहे. लोकांनी आपआपली गरज भागवावी अशी
शिष्यांची इच्छा आहे. त्यांनी स्वतः आपले
जेवण विकत घ्यावे असे शिष्यांना वाटते. त्यांच्यापुढे केवळ आकडेवारी आहे. पाच हजार
लोकांना जेऊ कसे घालायचे? हा त्यांना भार करतो. पण येशू निराळ्या तऱ्हेने पाहतो. लोकांची
मुलभूत गरज म्हणजे भूक भागवायची आहे. हे कर्तव्य ज्यांना भूक लागली आहे त्यांचेच
नाही तर ज्यांची पोट भरली आहेत त्यांचेही आहे. म्हणून येशू त्यांना सांगतो तुम्हीच
त्यांना खावयास दया.
येशू ख्रिस्त आपला देव आहे. तो आपल्याला हुसकावून लावणारा
देव नाही तर आपल्या गरजात आपल्याबरोबर राहणारा देव आहे. आपण त्याच्या मागे गेलो तर
तो आपल्याला टाकून देणार नाही. ही माणसे आपल्या पोटापाण्याचा विचार न करता
येशुमागे गेली होती. त्यांना येशू वाऱ्यावर सोडणार नाही हीच श्रद्धा महत्वाची आहे.
पण त्याआधी आपण काट्या-कुट्यातून, अडी-अडचणीतून, उन्हा-तान्हातून येशुमागे जाण्यास
तयार असावे. येशू आपल्या मुलभूत गरजा भागविल आणि त्या विपुल प्रमाणात भागविल.
येशू या गरजा कसा भागवतो? या प्रसंगी तो पाच भाकरी व दोन
मासे घेतो. आशीर्वाद देतो आणि पुन्हा शिष्याकडे वाटण्यासाठी देतो. सर्व पोटभर
जेवतात आणि सर्वांना पुरून उरते. चमत्काराचा विचार करण्यापेक्षा ही जी प्रक्रिया
आहे तिचा विचार व्हायला हवा. ह्या प्रक्रियेची जगाला विशेषतः विकसनशील देशांना गरज
आहे.
आपल्याकडे जे थोडेफार आहे ते देवाच्या नावात देत राहावे.
त्यामुळे इतरांनाही उदार होण्याची प्रेरणा मिळेल. या देवाण-घेवनीतून आपल्या गरजा
भागत राहतील. असं देण्यासारखं आपल्याकडे काय आहे? माणसाच्या गरजा भागवण्यासारखे सगळेच
आहे. काहीकडे पैसा आहे तर काहीकडे धान्य आहे. काहीकडे कपडे आहेत तर काहीकडे इतर
गोष्टी आहेत. वेळ तर सर्वांकडे आहे. सहानभूती सर्वांठायी आहे. या गोष्टींचा आपण
योग्य प्रकारे वाटप केला तर आपल्या अनेक गरजा भागवल्या जातील. आपण तृप्त होऊ.
देवाण-घेवेची नवी वृत्ती यायला हवी. साठवण्याची लपवून ठेवण्याची वृत्ती जायला हवी.
यासाठी आपण प्रत्यकाने आजच्या शुभवर्तमानात ऐकल्याप्रमाणे आपल्याकडे जे काही आहे
ते देण्यास सदैव पुढे यावे म्हणून देवाकडे विशेष कृपा मागूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना :
प्रतिसाद: प्रभो आम्हाला तुझी
भाकर दे.
- धर्मगुरू व प्रापंचिक हृदयाने जवळ यावेत, त्यांच्या एकात्मतेतून ख्रिस्तसभेची वाढ व्हावी व सर्वांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण व्हावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
- ख्रिस्ताबरोबरची आपली एकात्मता, आपल्या एकमेकांवरील प्रेमातून आपण जगाला दाखवून द्यावी व त्यातूनच ख्रिस्तसभेचे मानवी हक्काचे कार्य प्रकट व्हावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
- आपल्या कार्याचे दर्शन या बलिदानातून दिसावे व कार्याचा उगम कॅथोलिक ख्रिस्तसभेच्या मार्गावरून व्हावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
- या मिस्साबलिदानाद्वारे आपण केवळ पापापासून दूर न राहता, सकारात्मक विचार करून आपण कार्य करावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
- आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.