Fr. Wilson D'Souza is a Capuchin Priest. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province, Maharashtra. He has done his doctorate in Biblical Theology and at Present he is rendering his service at La-Verna Capuchin Theologate,Pune.
सामान्य काळातील चौदावा
रविवार
"मी जो मनाचा सौम्य व लीन आहे. मला अनुसरा
व माझ्यापासून शिका."
दिनांक: ०६/०७/२०१४
पहिले वाचन : जख-या
९:९-१०
दुसरे वाचन : रोमकरांस
पत्र ८:९,११,१३
शुभवर्तमान : मत्तय ११:२५-३०
प्रस्तावना:
प्रिय बंधू भगिनींनो; आज
ख्रिस्तसभा आपल्याला सामान्य काळातील चौदाव्या रविवारच्या मिस्सामध्ये नम्रतेवर
धडा देत आहे. लहान होऊन महान होण्यासाठी गर्वाने फुगून जावून स्वतःला
मो़डण्यापेक्षा स्वतःला वाकवून महान होण्यास शिकवत आहे.
आजचे पहिले वाचन जख-याच्या
पुस्तकातून घेतलेले आहे. संदेष्टा आपल्याला सियोनेच्या भावी राजाची कल्पना देतो.
हा भावी राजा न्यायी व यशस्वी आहे कारण तो मनाचा, दिलाचा सौम्य व लीन आहे. संत पौल
रोमकरांस लिहिलेल्या पत्रात पवित्र आत्म्याची कार्य आणि त्या आत्माने प्रेरीत होऊन
आपण जीवनात कसे वागावे हे नमुद करतो.
आजच्या शुभवर्तमानात आपण
पाहतो की, येशू आपल्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद देत आहे आणि आपणा सर्वांस बालकासारखे
होण्याचे आमंत्रण देत आहे. कारण मनुष्य जोपर्यत नम्र, लहान व अज्ञानी होत नाही
तोपर्यत देवाच्या रहस्यांची त्याला जाण होवू शकत नाही.
सम्यक विवरणः
पहिले वाचन (जख-या ९:९-१०):
आजच्या पहिल्या वाचनामध्ये
सियोनेच्या भावी राज्याविषयी कल्पना मांडली आहे. भावी राजा कसा असावा आणि तो परप्रांतातील
राज्यापेक्षा वेगळा कसा असेल ह्याचे वर्णन केले आहे. संदेष्टा जख-या, सियोन
कन्येला आणि यरूशलेम कन्येला भावी राज्याच्या नम्रतेची जाण करून देत आहे. भावी
राजा हा न्यायी व यशस्वी असेल. तो गाढवाच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून येईल व
आपली सौम्यता, लीनता प्रकट करेल. गाढव हा इतर प्राण्यामधील एक प्राणी जरी असला तरी
त्याला तुच्छ मानले जाते. त्याला भरपूर ओझे वाहण्यासाठी लावले जाते आणि एखादा कधी का
व्यवहारात चुकला तर त्याला आपण गाढवाची उपमा देतो असे असून सुध्दा गाढव सर्व काही
नम्रतेने, लिनतेने आणि सौम्यतेने स्विकार करतो.
आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा आणखी
एक गोष्ट आपल्या निदर्शनात आणतो ती म्हणजे, “शांतीचा राजा.” हा राजा येरूशलेमातील
घोडे व एफ्राईममधील सर्व रथ नष्ट करील. तो इंद्रधनुष्य तोडून टाकील व
राष्ट्रांमध्ये शांती प्रस्थापित करील. तसे पाहिले तर रथ, घोडे आणि इंद्रधनुष्य हे
युध्दासाठी वापरले जातात. ही सर्व गर्विष्टाची चिन्हे आहेत. युध्दाद्वारे युध्द
जिंकून महान होण्यासाठी आणि मान-सन्मान मिळविण्यासाठी त्यांचा वापर केला जातो.
इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे. तो असा, “Pride goes on horse back and comes back
on foot begging.”
दुसरे वाचन ( रोमकरांस पत्र ८:९-११,१३):
संत पौल रोमकरांस लिहलेल्या
पत्रात पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन नम्रतेचे जीवन जगण्यासाठी आमत्रंण देत आहे.
नम्रता हे पवित्र आत्म्याकडून मिळालेले एक वरदान आणि दान आहे. गलतीकरांस
लिहिलेल्या पत्रात अध्याय ५ ओव्या २२-२३ मध्ये संत पौल म्हणतो, “आत्म्याच्याद्वारे
निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा,
विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन, हे आहे व अश्यांविरुध्य नियमशास्त्र नाही.” ही
सर्व पवित्र आत्म्याची दाने आहेत. आत्म्याने प्रेरित होऊन जीवन जगत असताना मनुष्य
देहाच्या अधीन जात नसतो परंतु देहाच्या व आत्म्याच्या युद्धात गर्विष्टपणा
देहाच्या स्वाधीन जातो आणि देहाचे कृत्ये करतो, देहाची वासना भागवतो व मरणास
प्राप्त होतो. तर! पवित्र आत्म्याने भरलेला नम्र मनुष्य आत्म्याची कार्ये करतो व
स्वर्गीय सुख आपल्या जीवनात अनुभवतो.
शुभवर्तमान (मत्तय; ११:२५-३०):
देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेला प्रभू येशू ख्रिस्त
देवाचा मन्र सेवक आजच्या शुभवर्तमानामध्ये त्याच्या प्रिय पित्याला धन्यवाद देऊन त्याचे
स्तवन व मनन करत आहे. तो आपणाला बालकाची भूमिका घेण्यासाठी बजावत आहे. येशू आपल्या
स्वर्गीय पित्याला ‘पिता’ ह्या नावाने संबोधितो तसेच तो स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांचा
निर्माणकरता प्रभू आहे असे दर्शवितो. तो आपल्या पित्याशी प्रार्थनेद्वारे,
स्तवनाद्वारे संभाषण करतो. ह्या प्रार्थनेमध्ये तो देवाला धन्यवाद देतो. देवाने
सर्वकाही ज्ञानी, सुशिक्षित, गर्विष्ठ आणि विचारवंत ह्यांच्यापासून गुप्त ठेवलेले
आहे आणि देवाचे महान रहस्य त्यांनी बालकांना प्रकट केलेले आहे. म्हणून येशू
म्हणतो, ‘जर तुम्हांला स्वर्गात जायचं असेल आणि स्वर्गराज्य मिळवायचं असेल तर
बालकाप्रमाणे सौम्य, लीन, व सरळ बना.’
पुढे येशू आपल्याला त्यांच्या स्वतःच्या कामगिरीविषयी
सांगतो. पिता आणि पुत्र ह्यांच्यामध्ये ऐक्य आहे. पित्याने सर्व काही पुत्राच्या अधीन
सोपविले आहे. पिता-पुत्राच नात हे मजबूत आहे. आणि त्याचे ऐकमेव कारण म्हणजे येशू
सौम्य, लीन अंतःकरणाचा, मनाचा, शरीराचा आहे. तो केवळ शब्दाने दुस-यांना नम्रतेने
धडे देत नाही, तर स्वतः दुस-यांचे पाय धुऊन नम्रतेचा धडा देत आहे. तो स्वतःला इतका
वाकवतो की शिष्यांच्या पायाचे तो चुंबन घेतो. आणि असे म्हणतो, “तुम्ही मला गुरू व
प्रभू असे संबोधिता आणि ते ठिक बोलता; कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरू
असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.” कारण जसे मी
तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे. (योहान
१३:१३-१५) तो स्वतः गुरु आणि प्रभू असताना
त्याने असे केले. येशू कष्टी व भाराक्रांत जणांना त्याच्याकडे येण्याचा आवाहन देत
आहे. त्याने दुस-यांचे पाय धूतले ह्यास्तव आपण देखील तेच करावे असे तो
आपल्याला शिकवितो. तो म्हणतो, “अहो, कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे
या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.” (मत्तय ११:२८) मी जो मनाचा सौम्य व लीन आहे.
मला अनुसरा व माझ्यापासून शिका.
ख्रिस्त हा नम्रतेचा नमुना म्हणून आपल्यासमोर प्रकट केला
आहे. तो म्हणतो, “मनुष्याचा पुत्रहि सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व
पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडनीत म्हणून अर्पण करावयास आला आहे” (मार्क:
१०:४५) आजच्या तिन्ही वाचनाद्वारे प्रभू आपल्याला त्याच्यापासून शिकण्यासाठी
आमंत्रण देत आहे आणि त्याच्यासारखा सौम्य, लीन, सरळ व नम्र होण्यासाठी आवाहन देत
आहे.
मनन-चिंतनः
आजच्या समाजाकडे जर आपण नजर लावली
तर आपल्याला सातत्याने अनेक लोक ताठ मानेन फुशारकी मानून गर्विष्टाचे जीवन जगताना
दिसत आहेत. अश्या माणसांची उपमा केवळ शेतात असलेल्या सरळ उभ्या कणसाबरोबर करता
येईल. जे लीन, सौम्य व लहान असतात ते कधीच दुस-यांना आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता
दिखाऊपणाची भूमिका घेऊन दाखवण्याचा प्रत्यन करत नाहीत. ते सतत विनम्र, सहनशील,
दुस-यांपेक्षा कमी आणि इतर सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असेच समजतात. उदाहरण
द्यायचे झाले तर महात्मा गांधी: ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसेचा
मार्ग स्विकारून गर्विष्ट आणि सरळ मानेने चालणारे ब्रिटिश राजवटीला सळो की पळो
केले.
गेल्याच वर्षी स्वर्गवासी झालेले
नेल्सन मंडेला हे देखील नम्रतेचे एक उदाहरण आहेत. सत्ताविस वर्षे तुरुंगवास भोगला
आणि काळा- गोरा हा वर्णभेदाचा भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रत्यनाची पराकष्ट
केली. जेव्हा त्यांची तुरूगांतून सुटका झाली तेव्हा लोकांनी त्यांना राष्ट्राचा अध्यक्ष
म्हणून निवडले. तसेच अजून एक महत्वाचे उदाहरण द्यायचे झाले तर, कोलकत्ताच्या मदर
तेरेसा: ह्यांनी तर स्वत:ला नम्रते मध्ये वाकून घेतले होते: त्यांचे बोलणे, चालणे,
वागणे, आणि करणे हे त्यांच्या नम्रतेचे प्रतिक होते. ह्या सर्वांनी येशू ख्रिस्ताच्या
नम्रतेचा आदर्श गिरवला होता. जे खरोखर नम्र लहान असतात तेच परमेश्वराच्या
दृष्टीकोनातून महान बनत असतात. नम्र होणे म्हणजे स्वःताला वाकून घेणे, दुसऱ्यांना
आपल्यापेक्षा महान समजणे. ते घोड्यावर स्वार होत नसतात तर गाढवीच्या शिंगरावर बसत
असतात.
बोध कथाः
एक दिवस गुरु आपल्या शिष्यांना घेऊन एका गावातील शेती-वाडीतून प्रवास करत
होते. तो सप्टेंबर महिना होता. शेतात लावलेले भाताचे कणसे आत्ताच कुठेतरी तयार होत
होती. एका शिष्याची नजर शेतात पिकत असलेल्या भाताकडे गेली. त्याला कळून चुकले की
भाताची काही कणसे ताठ मान करून सरळ उभी होती तर काही कणसे वाकलेली होती. ह्या
शिष्याच्या मनात विचार आला की देवाने झुकलेल्या कणसावर अन्याय केले आहे. त्याने
आपल्या गुरूला आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी प्रश्न केला. “काही कणसे ताठ मानेने
डौलदारपणे वाऱ्याच्या झुळकीवर सरळ उभी आहेत. तर, दुसरी मात्र छोटयाश्या वाऱ्याच्या
झुळकीने का वाकलेली आहेत?
गुरूने शिष्याला स्पष्टीकरण देताना म्हटले, “जे कणसे सरळ
आहेत आणि जे वाकलेली आहेत ती दोन्ही कापून माझ्याकडे आण.” दोन्ही कणसातील भाताचे दाणे
काढून त्या शिष्याला दाखवले की; एका कणसातील दाणा भाताविना होता तर दुसरा भाताने
भरलेला होता. जे भाताने भरलेले होते त्यांची कणसे वाकलेली होती. तर, जे रिकामी
होती त्यांची कणसे ताठ मानेने सरळ डोलत
होती. नम्रतेने वाकलेला मनुष्य सर्वठायी परिपूर्ण असतो.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसादः प्रभो, आमच्या प्रार्थना स्विकारून घे.
१. येशू ख्रिस्ताच्या
शिकवणुकीनुसार वागण्यास आपल्याला आपल्या धार्मिक नेत्यांनी योग्य ते मार्गदर्शन
करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. येशू ख्रिस्ताची सौम्यतेची
व लीनतेची शिकवण आपण आचरणात आणून एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्वांची पावसासाठी
कळकळीची प्रार्थना आपल्या प्रभू येशूने ऐकून आपल्याला चांगल्या पाऊसाचे दान द्यावे
म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या राजकीय नेत्यांनी
सौम्यतेचा व नम्रतेचा मार्ग स्वीकारून जगात शांतता प्रस्तापित करण्यासाठी विशेष
प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वयक्तिक
गरजांसाठी प्रभूयेशुकडे प्रार्थना करूया.
Congratulations
ReplyDelete