सामान्य काळातील सोळावा रविवार
दिनांक: २०/०७/२०१४
पहिले वाचन : ज्ञानग्रंथ १२:१३,१६-१९
दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ८:२६-२७
शुभवर्तमान : मत्तय
१३:२४-४३
“कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या.”
प्रस्तावना:
शुभप्रभात, आज आपण सामान्य काळातील सोळावा रविवार साजरा करीत असताना, आजची
उपासना आपणास प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे सहनशीलता अंगीकरण्यास निमंत्रण देत आहे.
ज्ञानग्रंथातून घेतलेले आजचे पहिले वाचन आपणास जाणीव करून देते की, आपला देव हा
सर्वाधिकारी असला तरी दयाळू-न्यायाधीश आहे व तो मोठ्या सहनशक्तीने आपणावर राज्य
करतो. तर दुस-या वाचनात संत पौल पवित्र आत्म्याचा प्रभाव स्पष्ट करीत म्हणतो की,
आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो.
शुभवर्तमानाद्वारे प्रभू
येशूख्रिस्त देवाच्या राज्याविषयाची शिकवण निंदनाच्या, मोहरीच्या आणि खमिराच्या
दाखल्याद्वारे जनसमुदयास प्रकट करतो. प्रभू येशूख्रिस्ताची देवराज्याविषयी शिकवण आपण आपल्या दैंनदिन जीवनाद्वारे आचारणात
आणावी व आपणा प्रत्येकाला देवराज्याचे वारसदार बनता यावे म्हणून ह्या पवित्र
मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करू या.
सम्यक विवरणः
पहिले वाचन : ज्ञानग्रंथ १२:१३,१६-१९
परमेश्वराच्या न्यायाचे उगमस्थान त्याच्या अधिकारात आहे. परमेश्वर हा सर्वाधिकारी असला तरी तो दयाळू न्यायाधीश आहे व तो मोठ्या सहनशक्तीने ह्या जगावर राज्य करतो. परमेश्वराने त्याच्या लोकांना त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप करण्याची संधी देऊन त्यांना तारणाची महान आशा दाखविली आहे.
दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ८:२६-२७
आपण शरीराने, मनाने व आत्म्याने दुर्बल आहोत हे पवित्र आत्म्याला ठाऊक आहे व तो आपला विश्वासू कैवारी असल्यामुळे सहाय्य पुरवितो. आपण कशासाठी प्रार्थना करावी, काय व कसे मागावे हे आपल्याला कळत नाही अशावेळी पवित्र आत्मा देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना जुळवून ती देवाला सादर करतो व मध्यस्थी करतो.
शुभवर्तमान : मत्तय
१३:२४-४३
येशू ख्रिस्त हा देवाचा
पुत्र व जगाचा तारणारा होता हे दाखवून देण्याचा उद्देश मत्तयने शुभवर्तमान
लिहिताना डोळ्यासमोर ठेवला होता. म्हणूनच मत्तय “स्वर्गाचे राज्य” ह्या शब्दाचा
वापर वारंवार करतो व जुन्या करारातील संदर्भ घेतो. उदाः, मत्तय १३:३४-३५.
‘देवाच्या राज्याविषयीचे दाखले’
हे तेराव्या अध्यायाचे महत्वपूर्ण वैशिष्ट आहे. ह्या दाखल्यांद्वारे येशू
ख्रिस्ताने सैतान व त्याच्या परिणामकारक घातकस्वरूपी कृतीचे वर्णन केलेले आहे. ही
सैतानस्वरूपी कृती देवाच्या राज्याचा नाश करण्यास नेहमीच तत्पर असते. ह्या
तेराव्या अध्यायाद्वारे येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना व जनसमुदयास पाप व त्याचे
परिणाम ह्याबद्दल नुसते कोरे पाषाण तत्वज्ञान सांगत नाही तर त्याचे व्यवहारातले
अस्तित्व तो गृहीत धरून त्याच्यावर तो व्यावहारिक उपाय सांगतो. उदा. अध्याय ७:१५
“खोट्या प्रवक्त्यापासून जपून रहा, मेंढराचा वेष घेऊन ते तुमच्याकडे येतात. पण
आतून ते क्रूर लांडगे असतात.” ह्या वचनावरून ख्रिस्ताने त्याच्या वचनाला अनुसरून
चालणारे शिष्य व त्याच्या वचनाला अनुसरून चालण्याचे सोंग करणारे शिष्य यांच्यातील
भेद स्पष्ट केला आहे. त्याचप्रमाणे अध्याय १३:२४-३० ह्यात तणाच्या दाखल्याव्दारे येशू
सिध्द करतो की, सध्या वरकरणी जी गोष्ट नजरेस पडते ती महत्वाची नाही तर अखेरचा
न्याय हीच याची अंतिम कसोटी आहे. ह्यास्तव प्रत्येक सत्य स्वरूपी शिष्याने धीर
बाळगून संयमाने वागावे.
“तण” हा निंदणाचा एक असा
प्रकार आहे की, सुरवातीच्या वाढीला हे निंदण हूबेहूब गव्हाच्या रोपासारखे दिसते
म्हणूनच दाखल्यातील मालक म्हणतो, “नको, नको! कदाचित तण खुरपताना तुम्ही गहूही
उपटून काढालं?”(मत्तय; १३:२९). पुढे अध्याय १३:३७-४३ द्वारे येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांस तणाच्या दाखल्याचा
अर्थ सविस्तरपणे सु-स्पष्ट करून दिला आहे.
आपल्या खाजगी द्वेषाखातीर
दुस-यांच्या शेतात गुप्तपणे तणाचे बी पेरणे ही सूड घेण्याची सर्वसाधारण पध्दत
त्यावेळेस पेलेस्टाईन मध्ये अस्तित्वात होती. तणाचे बी जर जेवणामध्ये मिश्रीत केले
तर ते विषारी असल्यामूळे खाणा-या व्यक्तीला अस्वस्थपणाचा आणि उलट्याचा असा अनुभव
येत असे. ह्यास्तव रोमन कायद्यानुसार हे सैतानी कृत्य करणा-याला अगदी कठोर शिक्षा
केली जाई.
अध्याय १३:३१-३५ द्वारे
येशू ख्रिस्त मोहरीचे बी आणि खमीर ह्या दोन बोधकथा जमावापुढे प्रस्तुत करतो.
मोहरीचे बी व खमीर ह्या दोन्ही बोधकथा अल्प आरंभाविषयी आहेत. त्यावेळेस अगदी लहानश्या
वस्तूला मोहरीच्या दाण्याची उपमा देण्याची रीत होती. उदाहरणार्थ “येशूने त्यांना
म्हटले, मी तुम्हाला खरच सांगतो, मोहरीच्या दाण्याएवढी जरी तुमची श्रद्धा असली अन
या डोंगराला म्हणालात, उठ येथून अन जा तिकडे! तर तो जागचा हलेल! तुम्हांला अशक्य
असं काहीच असणार नाही!” (मत्तय १७:२०).
जरी मोहरीचे बी लहान असले
तरी त्याचे झाड वाढून तीन मीटरपर्यंत उंच होत असे आणि ज्याप्रमाणे मूठभर खमीर
खुपश्या पिठास मिसळून ते फुगवते, त्याचप्रमाणे स्वर्गाच्या राज्याचे आहे. देवाचे
कार्य प्रथम अगदी क्षुल्लक भासले तरी दिसते तसे नसते हे लवकरच प्रत्यक्षात येते
आणि अखेरीस प्रत्येकाला त्याची दखल घेणे भाग पडते, तो पर्यंत मधल्या काळात
शिष्यांनी धीराची व संयमाची पराकाष्ठा जोपासली पाहिजे.
बोध कथाः
- रुपेश आणि दिनेश, हे दोघे जीवा-भावाचे मित्र होते. खट्याळकी, चोरी-मारामारी ही तर अगदी त्यांच्या डाव्या हातांचा खेळ असायचा. कॉलेजमध्ये असताना एका सात्विक धर्मगुरूच्या मार्गदर्शनाखाली रूपेशने आपल्या जीवनाचा कायापालट केला, आपल्या सामाजिक नैतीक मुल्यांची व जबाबदारीची जाणीव घेऊन तो एक उत्कृष्ट डॉक्टर बनला. मात्र दिनेशमध्ये तीच सैतानी प्रवृत्ती अजूनपर्यंत जागृत होती; तीच खट्याळकी, चोरी व मारा-मारी ह्या त्याच्या दुष्ट कृत्यांमुळे त्याच्या कुटुंबाला त्रास होतच होता परंतु त्यांच्याबरोबर शेजा-यांना व संपूर्ण समाजाला त्याचा त्रास होत होता. एके दिवशी दिनेश अचानक तीव्र (भयानक) अपघातात सापडतो, अगदी मरणाच्या वाटेवर असतानाच त्याला रुपेशच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले जाते. दिनेशची अवस्था पाहून रुपेशाला गहिवरून येते, परंतु त्याचवेळी रुपेशच्या मनात विचार येतो, ‘जर का मी दिनेशवर औषध-उपचार केले नाहीत तर दिनेशपासून होणा-या तीव्र त्रासापासून मी त्याच्या कुटुंबाचे, शेजा-यांचे व संपूर्ण समाजाचे संरक्षण करू शकतो’. रुपेशच्या मनात दुष्ट विचारांचे वादळ उठले असतानाच त्याला क्षणातच, भूतकाळातील धर्मगुरूंनी केलेल्या उपदेशाची आठवण झाली व तो स्वतःशीच म्हणाला, ‘जर का पूर्वी माझ्यामध्ये इतका वाईटपणा होता तरीसुद्धा देवाने मला माझा कायापालट होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली, त्याने माझा सर्वनाश केला नाही, तर दिनेशचा सर्वनाश करण्याचा मला अधिकार कोणी दिला? आज देव माझ्यायोगे दिनेशासाठी एक नवीन शांतीचे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देत आहे आणि मी ती संधी दिनेशला दिलीच पाहिजे’.
- श्री. दालमेत ह्यांच्या कुटुंबाची समाजात उच्च शिक्षित म्हणून ख्याती होती. एक मुलगा इंजिनियर, दुसरा डॉक्टर तर मुलगी सी.ए. परंतु सर्वकाही सुरळीत चालू असतानाच इंजिनिअर मुलगा वाईट व्यसनांच्या आहारी गेला, डॉक्टर मुलाने गैररीत्या गरीब लोकांना फसवून शरीराच्या अवयवांची देवान-घेवाण केल्यामुळे पोलिसांनी त्याला जेलबंध केले तर सी.ए. झालेल्या मुलीने एका युपीच्या मुलाबरोबर पळून लग्न केले. (आजच्या शुभवर्तमानातदेखील येशू ख्रिस्त दाखल्याद्वारे स्पष्टीकरण देत असताना म्हणतो, “चांगले बी पेरले होते त्यात निंदण कोठून आले”.)
मनन-चिंतनः
आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू आपणा समोर तीन महत्वाचे दाखले सादर करतो;
१) तण आणि पिक २)
मोहरीचा दाणा ३) खमीर
हे तिन्ही दाखले स्वर्गाच्या राज्याविषयी घोषणा करून स्वर्गाचे राज्य व
सैतानाचे राज्य ह्याच्यांमधला मार्मिक भेद आपणासमोर प्रस्तुत करतात. स्वर्गाचे
राज्य हे सार्वकालिक टिकणारे सत्यरूपी देवाचे राज्य आहे तर सैतानाचे राज्य हे
क्षणिक सु:खविलासी असत्यरुपी राज्य आहे.
स्वर्गाच्या राज्याला दिवस-रात्र, प्रकाश-अंधकार ह्यांची
कधीही भिती नसते परंतु सैतानी राज्याला नेहमीच दिवस व प्रकाश ह्यांची अमर्याद भीती
असते. ह्याच कारणास्तव आपण आजच्या शुभवर्तमानात पाहतो की, कश्याप्रकारे शेतक-याने
दिवसा गव्हाचे चांगले बी पेरले परंतु वै-याने (सैतानाने) कश्याप्रकारे लोक झोपत
असताना रात्रीच्या अंधाराचा लाभ घेऊन गव्हामध्ये निंदण पेरले.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की, आपला देव सर्वांधिकारी
असला तरी दयाळू न्यायाधीश आहे, त्याची इच्छा होईल तेव्हा तो कारवाई करू शकतो
तरीसुद्धा तो मोठ्या सहनशीलतेने आम्हांवर राज्य करतो. ह्या वचनानुसार आपला देव हा
सर्वसामर्थ्य व शक्तिशाली आहे, तो क्षणातच सैतानी राज्य पराभूत करू शकतो. त्याच्या
तारण योजनेत सर्वांनी स्वइच्छेने सहभागी व्हावे अशी त्याची इच्छा आहे. तो कधीही
कुणाचा विनाश करू पाहत नाही.
ह्या जगामध्ये कुणीही सर्वसंपन्न, परिपूर्ण नाही आणि कुणीही
असंपन्न, अपरिपूर्ण नाही; ज्याप्रकारे प्रत्येक चांगल्या माणसात वाईट भावनेचे लवलेश
असतातच त्याचप्रकारे प्रत्येक वाईट माणसात चांगल्या भावनेचे लवलेश असतात. ह्या
जगामध्ये एकमेव सर्वसंपन्न व परिपूर्ण व्यक्ती म्हणजे आपला तारणारा प्रभू येशू.
आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपण सुद्धा ह्या परिपूर्ण वाटेवर वाटचाल करावी अशी
परमेश्वराची दैवी इच्छा आहे.
नैसर्गिक नियमानुसार जरी ‘गव्हाचे रुपांतर निंदणात आणि
निंदणाचे रुपांतर गव्हामध्ये कधीच होऊ शकत नाही परंतु नैसर्गिक नियमाविरुद्ध मानवी
जीवनात अशा प्रकारचे रुपांतर साध्य आहे’, जर एखादी व्यक्ती आज सैतानी राज्याला
प्राधान्य देत असली तरी कदाचित उद्या तीच व्यक्ती सैतानी राज्य नाकारून स्वर्गाचे
राज्य स्वीकारू शकते. उदा. संत पौल.
आजच्या आधुनिक काळात सर्वसामर्थ्यशाली व्यक्ती आपल्या
वै-याचा प्रतिकार करून त्याचा पराभव करण्यास सदैव तयार असतो. तो अश्या प्रकारच्या
संधीची चाहूल लागताच कार्यरत होतो, कारण त्या व्यक्तीस माहित असते की, हा त्याचा
सर्वसामर्थ्यशालीपणा हा क्षणिक आहे. आज जरी तो सर्वसामर्थ्यशाली असला तरी उद्या तो
सर्वसामर्थ्यशाली असू शकतो ह्याची त्यास खात्री नसते. परंतु ह्या उलट आपला परमेश्वर हा
जरी सर्वसामर्थ्यशाली असला तरी तो आपल्या सारखा जागतिक स्वभावानुसार वागत नाही;
कारण परमेश्वराचे सामर्थ्य हे क्षणिक नसून ते सार्वकालिक टिकणारे आहे, तरीसुद्धा
तो कुणाचाही सर्वनाश करू पाहत नाही. आपला परमेश्वर हा सहनशील व दयाळू आहे, ह्या
सहनशीलतेद्वारे व दयाळूपणाने तो आपल्या प्रत्येकाला सैतानी राज्यातून, असत्याच्या
वाटेवरून परतण्यासाठी प्रेमाने आमंत्रण करत असतो, जेणेकरून आपण सर्वजण त्याच्या
सार्वकालिक राज्याचे वारसदार ठरू.
परमेश्वर जसा सहनशील व दयाळू आहे, त्याचप्रमाणे आपणसुद्धा
आपल्या दैनंदिन जीवनात सहनशीलतेचे व दयाळूपणाचे वस्त्र धारण केले पाहिजे तरच ख-या
अर्थाने आपण परमेश्वराच्या राज्याची घोषणा करू शकतो, म्हणूनच;
हे देवा दे मज सहनशीलता,
न पेरण्यास निंदण,
अन दे मज एैसी कृपा,
होण्यास तुझा एकमेव गहू,
तत्क्षणी राहीन मी;
सार्वकाली,
तुझ्या कोठारी,
तुझ्या स्वर्गधामी,
तृप्त आणि आनंददायी!
आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसादः करितो मी याचना, ऐकावी प्रार्थना.
- आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरू, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांना देवराज्याची मुल्ये आपल्या शब्दांद्वारे व कृत्यांद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
- जे लोक असत्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत, अश्या सर्व लोकांना येशू ख्रिस्ताच्या सत्यदायी प्रेमाचा अनुभव यावा व सत्याचा मार्ग त्यांनी अनुसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
- जे स्वार्थापायी चांगल्या सामाजिक कार्यात अडथळा आणतात, त्यांना त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीची जाणीव व्हावी व त्यांनी जनहितासाठी निस्वार्थीपणे कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
- आता शांतपणे वैयक्तिक आणि सामाजिक गरजा प्रभूचरणी समर्पित करूया.
Great Work Brothers
ReplyDeleteKeep up the work of Evangelization
God Bless your Ministry