Fr. Albert Pegado is a Capuchin Priest belonging to St. Bonaventure Province,Maharashtra. At present he is at Katta, serving as Assistant Novice Master.
सामान्य काळातील विसावा
रविवार
पहिले वाचन: यशया ५६:६-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:१३-१५,२९-३२
शुभवर्तमान: मत्तय १५:२१-२८
प्रस्तावना:
आज देऊळमाता सामान्य काळातील विसावा रविवार साजरा करीत आहे.
आजची उपासना आपणास देव-प्रेम व आपला विश्वास या विषयावर मनन-चिंतन करण्यास बोलावित आहे.
पहिल्या वाचनात देव शब्बाथ दिवस पाळणा-यांना व त्याच्या आज्ञेत राहणा-यांना कसे देणग्यांनी
भरत असतो ह्याविषयी सांगत आहे. दुस-या वाचनात संत पौल त्याच्या अधर्मी लोकांमधील मिशनकार्याविषयी
सांगत आहे.
शुभवर्तमानात आपण एका कनानी बाईच्या विश्वासामुळे तिची इच्छापूर्ती
कशी होते हे पाहतो. देवाच्या ठायी भेदभाव, जातीभेद व वर्णभेद नाही. ह्या पवित्र
मिसाबलीदानामध्ये सह्भागी होत असताना आपण सुध्दा आपल्या जीवनात देवाचे प्रेम अनुभवावे
व तेच प्रेम आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे सर्वत्र पसरावे म्हणून विशेष
प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन:
देव सर्व देणग्यांचा दाता आहे. आपल्याला जे काही हवे आहे ते
आपण मागण्याअगोदरच देव आपली गरज समजून त्या गोष्टी आपणाला पुरवीत असतो. तो आपला
निर्माता आहे आणि आपण त्याची निर्मिती आहोत. निर्मितीच्या गरजा निर्मात्याला ठाऊक
असतातच. हेच यशया संदेष्टा आपणाला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
दुसरे वाचन:
जगात अजूनही प्रेम, शांती, जिव्हाळा वाढेल हेच प्रमुख ध्येय
संत पौल आपल्या मिशन कार्यासाठी वापरीत आहे. प्रेम दिल्याने अजून प्रेम वाढते; दिल्याने
मिळत असते. “केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे” हा महामंत्र आपण आपल्या
मिशनकार्यात वापरला पाहिजे.
शुभवर्तमान:
१. देवाने मानवाची निर्मिती
त्याच्या प्रतिमेप्रमाणे केली. स्त्री आणि पुरुष अशी ती निर्माण केली. देवाने
त्याच्या निर्मितीमध्ये कुठलाही भेदभाव किंवा वर्णभेद केला नाही. परंतु आज जर का
आपणामध्ये वर्णभेद, जातीभेद किंवा लिंगभेद असेल तर तो केवळ आपल्या मनुष्यप्राण्यामुळेच
आणि म्हणूनच त्या भेदभावाकरिता आपण देवाला कुठल्याही प्रकारे दोषी ठरवू नये.
देवाने त्याचे आपणा मानवावरील असलेले प्रेम दाखविण्यासाठी
त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्या तारणासाठी क्रुसावर बळी अर्पण केला. परंतु
आपण त्या देवपुत्राच्या त्यागाला विसरलो आहोत. त्याने क्रुसावर उच्चारलेल्या प्रेमाच्या
आणि क्षमादानाच्या महामंत्राला आपण विसरलेलो आहोत.
देव प्रेम आहे परंतु प्रेम देव नाही. देवाठायी प्रेम आहे.
परंतु ब-याचश्या वेळेला प्रेमाठायी देव असतोच असं नाही. म्हणून ब-याचश्या वेळेला
प्रेम आणि देव ह्यांच्यामधील फरक न कळल्यामुळे आपण आपल्या जीवनात चूक करून बसत
असतो. जर आपण खरोखर त्या जीवंत देवाची लेकरे असू तर त्याने शिकविलेल्या
महामंत्राप्रमाणे आपण आपल्या जीवनात वागण्याचा प्रयत्न करू इतकेच नव्हे तर त्या
प्रेमावर विसंबून आपल्या जीवनात त्याचे आचरण करू. जर तो आपला प्रेमळ परमेश्वर आहे
आणि आपण त्याची निवडलेली प्रजा आहोत.
२. शताधिपतीच्या चाकाराचा वृतांत आणि
आजच्या शुभवर्तमानातील वृतांत यात अगदी निकटचे साम्य आहे (८:५-१३). हे दोन्ही
वृतांत दूर अंतरावरून उच्चारलेल्या आरोग्य वचनाने विश्वासाप्रमाणे घडून आले आणि
त्या विश्वासाची कसोटी पाहणारा वांशिक ताणतणात हे दोन्ही मुद्दे यात समान आहेत.
येशूजवळ आलेली स्त्री ही कनानी होती असे सांगून मत्तयने हा मुद्दा अधिक तीव्र
केला आहे. जुन्या करारात कनानी लोक इस्र्यायलचे आरंभापासून शत्रू होते.
ह्या वृतांतात येशूने तिला प्रथम उत्तर दिले नाही (मत्तय १५:२३), कारण आपले
कार्य विशेषतः यहुद्यांसाठी आहे हे येशूने येथे स्पष्ट केले (मत्तय १५:२४). येशूच्या
ह्या स्पष्टीकरणाद्वारे त्या स्त्रीच्या आशेला जागेला आशा उरली नव्हती, तरीसुद्धा
त्या कनानी स्त्रीने चिकाटी सोडली नाही. तिने पुन्हा मदतीची याचना विश्वासाने
केली. ह्या याचनेस्तवच तिला अधिक जिव्हारी लागणारे शब्द म्हणजेच पराराष्ट्रीयांची
तुलना कुत्र्यांशी केलेली ऐकावी लागली. ही तिच्या विश्वासाची परिक्षा होती आणि
तिचा विश्वास त्या कसोटीस पात्र ठरला. म्हणूनच वृतांताच्या शेवटी येशू ख्रिस्त
म्हणतो, “बाई, तुमची श्रद्धा दांडगी आहे; तुमची इच्छा पुरी होवो!” (मत्तय १५:२८).
बोधकथा:
१. एकदा एक विमान, विमानतळावरून सुटले, काही ठराविक अंतरावर गेल्यावर त्या
विमानाने वेग घेतला. काही काळाच्या प्रवासानंतर विमान आकाशात हेलकावे खाऊ लागले.
काही वेळानंतर ते विमान आकाशात गटांगळ्या घालावयास लागले. वैमानिकाला इंजिनामधील
बिघाड जाणवला व त्याने प्रवाश्यांना त्या विषयी कल्पना दिली. विमानाच्या इंजिनात
बिघाड झाला आहे आणि ते विमान वैमानिकाच्या नियंत्रणा बाहेर गेले आहे. आता आपले
विमान अपघाताने खाली कोसळणार तेव्हा आपले प्राण वाचावे म्हणून प्रत्येक व्यक्ती आप-आपल्या पद्धतीने प्रार्थना करू लागली. काही ख्रिस्ती व्यक्ती होत्या त्यांनी
रोझरी करायला सुरवात केली.
अश्या परिस्थितीत असतानाच त्या सर्व लोकांनी पाहिले की, विमानातील
छोटयाश्या मोकळ्या जागेत एक छोट बाळ खेळत होतं. विमान एवढे हेलकावे खात आहे तरी
त्या मुलाला बिलकुल भय वाटत नव्हतं ह्याचं सर्वांना आश्चर्य आणि कुतुहूल वाटले.
म्हणून एका व्यक्तीने त्या मुलाला जवळ बोलावून प्रश्न विचारला: विमान हालत आहे,
विमान आता जमिनीवर पडणार आणि आपण मृत्युमुखी पडणार ह्याचे तुला भय वाटत नाही का? तेव्हा मुलगा उद्गारला: मला भिती मुळीच वाटत नाही. विमानाच्या इंजिनाला कितीही बिघाड झाला, तरी हे विमान खाली पडणारच नाही. कारण ह्या विमानाचे वैमानिक माझे वडील आहेत.
ते मला कधीच इजा पोहचू देणार नाहीत. आपल्या वडिलांवर असलेल्या दांडग्या विश्वासामुळे
तो विमानात आपतकालिन परिस्थितीत असताना देखील आनंदाने खेळत होता.
२. एकदा एक व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन रस्त्याने जात होती. थोडा रस्ता पार
केल्यावर रस्त्यामध्ये एक खडतर पुल लागला. तो पुल फार धोकादायक होता. पुल पार करणे
म्हणजे जीवन मरणाशी झुंज परंतु तो पुल पार करणे त्यांना गरजेचेच होते. म्हणून वडील
आपल्या मुलीला म्हणतात, बेटा, तू माझ्या हाताला घट्ट हात पकडून ठेव म्हणजे तू
पडणार नाही. त्यावर मुलगी उद्गारली, माझ्यापेक्षा तुम्हीच माझा हात घट्ट पकडा.
वडिलांनी आश्चर्यचकित होऊन मुलीला विचारले, दोघांमधील फरक काय?
मुलगी म्हणाली, ‘बाबा, मी जर तुमचा हात पकडला आणि संकट आले तर भिऊन मी तुमचा हात
सोडून देईन. परंतु तुम्ही माझा जर हात पकडला तर कितीही संकटे आली तरी तुम्ही माझा
पकडलेला हात सोडणार नाही ह्याची माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. हा माझा विश्वास
आहे.’
मनन चिंतन:
विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न
दिसणा-या गोष्टींबद्दलची खात्री आहे. मनुष्याला भक्तीचे आकर्षण अधिक आहे परंतु
भक्तीचे जे दुसरे अंग आहे ‘कृती’ त्याचे आकर्षण मनुष्याला फार कमी आहे. याला
प्रमुख कारण म्हणजे भक्तीमध्ये सुरक्षितता आहे तर कृतीमध्ये साहस व जोखीम आहे
म्हणूनच बरीच माणसे कृतीपेक्षा भक्तीमध्ये आपलं मन रमवितात. भक्ती म्हणजे सुरक्षितता
व कृती म्हणजे धोका. खर म्हणजे कृती करण्यासाठी साहस याव म्हणून आपण भक्ती करतो
परंतु मनुष्याची उडी भक्तीकडून कृतीकडे पडत नाही ही वास्तुस्थिती नाकारता येत नाही.
विश्वास आपणास हेच शिकवित आहे. आपण विश्वास ठेवतो तो फक्त
विश्वासू व्यक्तीवर ज्यांच्याकडून आपल्या गरजा पु-या होतील अशा व्यक्तींवर आणि जर
त्या गरजा आपल्या पूर्ण झाल्या तर आपण त्या व्यक्तीला विश्वासू म्हणतो. आपला
सर्वांचा विश्वासू व्यक्ती सर्वसमर्थ देव आहे कारण तो आपण मागण्याअगोदरच आपल्या
गरजा पुरवित असतो. कारण तो आपला कर्ताकरविता देव आणि उत्पन्नकर्ता आहे परंतु
त्याला आपण देखील विश्वासू असले पाहिजे. आपल्या जीवनात आपण जे काही मिळविले आहे,
कमाविलेले आहे हे सर्व त्याच्यावरील विश्वासामुळेच. हाच दांडगा विश्वास त्या कनानी
बाईमध्ये ख्रिस्ताने पाहिला आणि तिच्या विश्वासामुळेच तिची मुलगी बरी झाली.
आपल्यामध्ये देवावरील असलेला विश्वास अधिकाधिक वाढवा व आपल्या विश्वासाद्वारे आपण
दूर गेलेल्या लोकांना देवाच्या व ख्रिस्तसभेच्या अधिकाधिक जवळ आणावं व देवाच्या व
ख्रिस्ताच्या प्रेमात आणि विश्वासात वाढण्यात मदत करावी म्हणून ह्या मिस्सामध्ये प्रार्थना
करू या.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, आमचा विश्वास वाढव.
- ख्रिस्तसभेसाठी- हे प्रेमळ पित्या, आमचे पोप, कार्डीनल्स आणि बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्यांना तुझ्या प्रेमात आणि विश्वासाने भर ज्याद्वारे त्यांच्या हातून अखिल ख्रिस्तसभेची सेवा चांगल्या प्रकारे होईल.
- प्रभू-परमेश्वरा, ज्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये तुझ्यावरील विश्वास कमी होत चालला आहे. तू आमचा दाता आणि करविता आहे हे मानण्यास कमी पडत आहेत त्यांना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या विश्वासात आणि प्रेमात दृढ कर.
- इराकमधील आपल्या ख्रिस्ती बांधवांवर अत्याचार होत आहेत व ते दडपणाखाली आहेत. त्यांना योग्य ते संरक्षण मिळावे व आपला धर्म त्यांना स्वतंत्रपणे पाळता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
- सर्व आजारी लोक विशेष करून ज्या व्यक्तींना दुर्दम्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना तुझी आरोग्यदायी कृपा आणि सामर्थ्य लाभावे आणि त्यांच्या जीवनात प्रेम आणि आनंद पसरावा म्हणून प्रार्थना करूया.
- आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
Very good...Inspiring
ReplyDelete