दिनांक: १०/०८/२०१४
पहिले वाचन: १ राजे: १९:९, ११-१३
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र: ९:१-५
शुभवर्तमान: मत्तय: १४: २२-३३
“धीर धरा, मी आहे; भिऊ नका”
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय भाविकांनो, आज ख्रिस्तसभा
सामान्य काळातील एकोणीसावा रविवार तसेच ‘वियानी संडे’ साजरा करीत आहे. ख्रिस्तसभा
आपणाला आज आपली भिती नाहीशी करून आपला विश्वास बळकट करण्यासाठी व परमेश्वराच्या
सामर्थ्यावर अवलंबून राहण्यासाठी आमंत्रण देत आहे.
आजचे पहिले वाचन राजे च्या पहिल्या पुस्तकातून घेतले आहे.
येथे मानवी स्वभाव असलेला एलिया भितीमुळे कसा पळून जातो व देव त्यास दर्शन देऊन
पुन्हा त्याच्या जबाबदारीची आठवण करून देऊन त्याला पुन्हा कसा कामगिरीवर पाठवतो
ह्याचे वर्णन केले आहे. तर दुस-या वाचनात यहुदी लोकांनी येशूला देवाचा पुत्र
म्हणून न स्विकारल्याबद्दल होणारे दु:ख संत पौलाने रोमकरांस पत्र ह्यामध्ये व्यक्त
केले आहे. शुभवार्तामानामध्ये येशू कश्याप्रकारे पाण्यावरून चालतो व गरजेत
असलेल्या आपल्या शिष्यांस सहाय्य करून त्यांचा विश्वास वाढवतो हे मत्तयने उत्तमरित्या
आपल्या समोर मांडले आहे.
आजच्या ह्या मिस्साबलीत सहभागी होत असताना प्रार्थना करूया
की हे परमेश्वरा आमची भिती नाहीशी कर व आमचा तुझ्यावरील विश्वास दृढ कर. तसेच आज
सर्व धर्मगुरुंसाठी परमेश्वराकडे विनवणी करूया की हे परमेश्वरा त्यांना चांगले
आरोग्य दे, येणा-या सर्व संकटांना सामोरे जाण्यास शक्ती व कृपा दे व हे समर्पित
जीवन त्यांनी प्रभूची व लोकांची सेवा करण्यात घालवावे, ह्यासाठी त्यांच्यावर
आशीर्वाद यावा म्हणून ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: १ राजे: १९:९, ११-१३
एलिया प्रवक्ता ईजबेलीच्या भितीमुळे पळून जातो व रानात जाऊन
पोहचतो. तेथे प्रभूचा दूत त्याला भाकरीने व पाण्याने तृप्त करतो व चाळीस दिवस व
चाळीस रात्रींचा प्रवास करावयास सांगतो. ह्या खडतर प्रवासानंतर एलिया परमेश्वराचा
डोंगर होरेब येथे पोहचला. येथे पर्वतावर एलियाच्या परमेश्वराबरोबर झालेल्या
भेटीमध्ये दोन समांतर कृती आपणासमोर येतात:
१.
परमेश्वराचा प्रश्न – एलियाची तक्रार
२.
परमेश्वराची आज्ञा – एलियाची संमती
परमेश्वर एलियाला येथे काय करतोस ह्याचा जाब विचारतो. हे
सूचित करते की एलिया इथे नसून इसरायलमध्ये हजर असायला हवा होता. परंतु एलिया
प्रभूच्या प्रश्नाला सरळ उत्तर न देता लोकांविषयी परमेश्वरासमोर तक्रार मांडतो.
त्याची ही ग्वाही ‘आपण प्रवक्ता नसून एक सर्वसामान्य माणूस’ असल्याचे दर्शविते,
परंतु परमेश्वर पुन्हा एकदा त्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यासाठी त्याला
आपणासमोर (परमेश्वरासमोर) उभे राहण्यास सांगतो. तद्नंतर पारंपारिक घडणा-या
गोष्टीनुसार (धरणीकंप, वारा, अग्नी) देवाचा साक्षात्कार होतो (निर्गम ३:२,
१९:१६-१९), परंतु ह्यावेळी परमेश्वर त्यात नव्हता तर शांत आणि मंद वाणीमध्ये
परमेश्वर एलीयाबरोबर बोलला आणि लागलेच एलियाने मोशेने झाकलेल्याप्रमाणे आपले तोंड झाकून
घेतले (निर्गम ३३:१८-२३).
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र: ९:१-५
निवडलेल्या लोकांनी म्हणजेच इसरायली वंशाने येशूला
न स्वीकारल्याने होणारे दु:ख संत पौल येथे व्यक्त करीत आहे. इसरायली लोकांना
ख्रिस्ताकडे वळविण्यासाठी जरी त्याला परमेश्वराकडून हद्दपारी स्वीकारावी लागली,
तरी तो ह्यासाठी तयार आहे. त्याचे हे दु:ख भावनात्मक किंवा कारुण्यपूर्ण आहे, कारण
इसरायली जनता परमेश्वराने निवडलेली व विशेषाधिकार असलेली जनता आहे ह्याचे त्याला
भान होते; त्याला झालेला मनस्ताप व्यक्त करताना तो मोशेने केल्याप्रमाणे प्रार्थना
करीत आहे (निर्गम
३२:३२).
तुम्ही विशेष अशी निवडलेली देवाची मुले आहात
ह्याची आठवण करून देतो (अनुवाद १४:१). देव तुमचा उत्पन्नकर्ता (अनुवाद ३२:६) व
तुम्ही त्याची मुले (निर्गम ४:२२) व विशेष प्रकारचा करार केलेले नाते (उत्पत्ती
१५:१८) असे असून तुम्ही परमेश्वराचा पुत्र ‘येशू ख्रिस्त’ ह्याला नाकारल्याचे व
त्याला ख्रिस्त म्हणून न स्वीकारल्याचे दु:ख व्यक्त करत आहे.
शुभवर्तमान: मत्तय: १४: २२-३३
मत्तयमधील १४:२२-३३ हा येशूचा समुद्राच्या पाण्यावरून
चालण्याचा उतारा मार्क ६:४५-५२ व योहान ६:१५-२१ मध्ये देखील सापडतो. मत्तयच्या
शुभवर्तमानातील १४:२२ म्हणते, ‘येशूने लागलेच शिष्यांस लावून दिले’, हे वाचताना
दृश्य काही विचित्रच वाटते, पण जर का योहानलिखीत शुभवर्तमानात दृष्टी टाकली, तर हे
येशूने का म्हणून केले ह्याची जाण होते. जेव्हा येशूने पाच हजार लोकांना जेवणाने
तृप्त केले तेव्हा लोक बळजबरीने येऊन येशूला आपला राजा करण्याच्या बेतात होते
(योहान ६:१५), आणि अश्या ह्या गंभीर परिस्थितीत शिष्यांनी सर्व गोधळ करून
लोकांच्या इच्छेला होकार दिला असता कारण ते देखील येशूच्या पृथ्वीतलावरील सत्तेची
आतुरतेने वाट पाहत होते, म्हणून येशू त्यांस तारवांत बसून दुसरीकडे जाण्यास लावून
देतो आणि ही परिस्थिती स्वतःच सांभाळून नंतर प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती
जातो. येशू ख्रिस्त जरी संपूर्ण दिवस देवाच्या राज्याची घोषणा करत व चमत्कार करत
गावोगावी फिरत असला तरीदेखील तो रात्रीच्या वेळी किंवा भेटेल त्या वेळेस आपल्या
पित्याबरोबर एकांतात बोलण्याची किंवा प्रार्थना करण्याची संधी घालवत नसे (मार्क
१:३५; मत्तय १४:२३, २६:३६-५६; लूक ५:१६, ६:१२, २२:४१-४४).
एकीकडे संपूर्ण रात्रभर येशू आपल्या पित्याबरोबर प्रार्थनेत
होता तर दुसरीकडे त्याचे शिष्य बोटीमध्ये समुद्रात उठाणा-या मोठमोठ्या लाटांनी हैराण
झाले होते. अश्यावेळी येशू रात्रीच्या चौथ्या प्रहरी समुद्रावरून चालत
त्यांच्याकडे येतो. प्राचीन काळात किंवा पुरातन काळात रात्र चार भागांमध्ये वाटली
गेली होती: संध्याकाळचे ६ ते ९, ९ ते मध्यरात्रीचे १२, १२ ते सकाळचे ३ व ३ ते ६.
येशू चौथ्या प्रहरी म्हणजेच सकाळचे ३ आणि ६ वाजल्यांच्या आत त्यांच्याजवळ येतो. शिष्य
मरणाच्या भितीत असतानाच येशू त्यांच्याजवळ येतो परंतु ते येशूला न ओळखता ‘भूत’ आहे
म्हणून अधिकच भयभीत होतात. भितीमुळे येशूने वादळ शांत केलेला चमत्कार (मत्तय
८:२३-२६) ह्याचादेखील त्यांना विसर पडतो परंतु येशू त्यांना सहारा देत म्हणतो, “धीर
धरा, मी आहे, भिऊ नका” (मत्तय १४:२७) असे म्हणून येशू अप्रत्यक्षरित्या निर्गमच्या
पुस्तकात ३:१४ मध्ये “मी आहे” असे परमेश्वराने मोशेला वापरलेल्या शब्दांची
पुनरावृत्ती करतो, ह्याचा अर्थ असा की ‘परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, तुम्ही भिऊ
नका’.
येशूचे हे उद्गार संपता-न-संपताच पेत्राने लागलेच विचारले,
‘प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा’ (मत्तय ४:२८). हे
बोलणे काही पेत्रासाठी नवीन नव्हते. शुभवर्तमानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी
उदाहरणार्थ मत्तय १६:१६, १७:२४-२७, २६:३३-३५, योहान ६:६८ आणि अनेक अश्या ठिकाणी
पेत्र शिष्यांच्या वतीने येशूबरोबर किंवा इतरांबरोबर बोलत असे. येथेदेखील तेच
कृत्य पेत्र पुन्हा एकदा करतो. येशू त्याला नाही म्हणत नाही तर ह्या अनैसर्गिक
कृत्यात सामील होण्यास आवाहन किंवा पाचारण करतो परंतु थोडा वेळ चालल्यानंतर
त्याच्या अविश्वासामुळे व भितीमुळे तो पाण्यात पडून बुडू लागला. येशूने त्याला
पाण्यात बुडू दिले नाही तर आपला हात पुढे करून त्याला वाचविले आणि त्याचा व
शिष्यांचा अल्पविश्वास दूर करून विश्वास दृढ केला व लागलेच शिष्य त्याच्या पाया
पडून ‘आपण खरोखर देवाचे पुत्र आहात’ म्हणून त्याची आराधना करू लागले.
बोधकथा:
१. मॅक्सी नावाचा गृहस्त विक्रेता म्हणून एका
पुस्तकाच्या कंपनीत कामाला लागला. त्याला आपल्या ह्या कामाची पुरेपूर जाणीव होती
परंतु आटोकाट प्रयत्न करूनदेखील तो पुस्तकांचा जास्त खप करू शकत नव्हता. जसे दिवस
सरकले, तसतसा पुस्तकांचा खप न झाल्यामुळे त्याची भीती वाढत गेली. एके दिवशी तर
मॅनेजरने त्याला दम भरला की जर तू अपेक्षेइतकी पुस्तके विकली नाहीस तर तुला
नोकरीवरून काढण्यात येईल. त्याची पत्नीदेखील त्याच्याकडे तक्रार करू लागली की ‘ती
पैश्याअभावी कुटुंब चालवू शकत नाही व पदरी असलेल्या मुलांची काळजी घेऊ शकत नाही’.
एके दिवशी ह्याच विक्रीच्या कामासाठी मॅक्सी
बाहेर गेला असताना त्याच्याकडे हॉटेलचे बिल भरण्यासाठी व घरी परतण्यासाठी काहीच
पैसे नव्हते. अश्यावेळी हॉटेलच्या खोलीत संकटाच्या अंधारात गुरफटलेला असताना व कोणाचीच
साथ नसल्यामुळे तो सरतेशेवटी प्रभूकडे फिरला. त्याने प्रार्थना करावयास सुरवात
केली. प्रभूने त्याला समज, मार्गदर्शन व सहाय्य द्यावे म्हणून त्याने प्रार्थना
केली. त्याच क्षणी खोलीच्या एका फळीवर असलेल्या पवित्र शास्त्रावर त्याची नजर
पडली, त्याने ते उघडून परमेश्वराकडे कळकळीने प्रार्थना करावयास सुरवात केली.
पवित्र शास्त्र वाचत असताना प्रभू येशूच्या मत्तयलिखीत शुभवर्तमानातील खालील
शब्दांवर त्याची नजर पडली, “ह्यास्तव, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे
म्हणून चिंता करत बसू नका. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रींय लोक करीत
असतात. तुम्हांला ह्या सर्व गोष्टींची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.
तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे
त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील” (मत्तय ६:३१-३३).
ह्या शब्दांवर त्याने सखोल मनन-चिंतन केले व
कळकळीची प्रार्थना केली आणि काय चमत्कार!!! त्याच्या सर्व चिंता दूर झाल्या,
त्याच्या मनावरचे दडपण कमी झाल्याचे त्याने अनुभवले, त्याची भीती नाहीशी होऊन
त्याला हिंमत मिळाली कारण त्या क्षणी प्रभू आपल्याबरोबर आहे ह्यावर त्याने विश्वास
ठेवला व त्याचा त्याने अनुभव घेतला. त्या रात्री त्याला कित्तेक दिवसानंतर निवांत
झोप लागली. दुस-या दिवशी सकाळी लवकर उठून व चांगले कपडे करून तो पुस्तकांची विक्री
करण्यास दारोदारी फिरला आणि काय आश्चर्य जी पुस्तके तो कित्येक आठवड्यात विकू शकला
नव्हता ती त्याने काही दिवसात विकून टाकली.
२. एकदा एक जोडपे
आपल्या तीन महिन्यांच्या नवजात बाळाला घेऊन सणासाठी जात होते. तेथे पोहचण्यासाठी
त्यांना तरीतून (बोटीतून) जावे लागे. सणाला जाण्यासाठी लोकांची अफाट गर्दी होती
आणि ह्याच गर्दीत ह्या जोडप्यालादेखील बोटीच्या कडेला जागा मिळाली. बोट एकीकडून
दुसरीकडे जात असताना गर्दीमुळे त्या बाळाच्या वडिलांना जोराचा धक्का बसला व आपल्या
बाळाबरोबर तो पाण्यात पडला. हे बघून त्याच्या बायकोने जोरजोरात रडणे सुरु केले.
तेवढ्यात बाजूच्या सर्व लोकांनी तिला धीर देत म्हटले, “भिऊ नकोस, परमेश्वर आपल्या
बरोबर आहे, त्या दोघांना काहीच होणार नाही”, आणि लागलेच त्यांनी बोटीवरील दोर
फेकून त्या दोघांना वर खेचले व दोघांचे प्राण वाचवले. (टीप: माझ्या स्वतःच्या
जीवनात घडलेली ही सत्य घटना आहे).
मनन चिंतन:
आपण शुभवर्तमानात वाचले की ‘येशूने शिष्यांना मचव्यात बसून
सरोवरापलीकडे पुढे जायला लावून दिले’, हे करण्यामागे येशूचा काहीतरी हेतू होता. तो
जाणून होता की त्याचे शिष्य मोठ्या संकटाला सामोरे जाणार आहेत आणि म्हणूनच ह्या
संकटातून त्यांना मुक्त करण्यासाठी व त्यांची त्याच्यावरील श्रद्धा बळकट
करण्यासाठी त्यांना पाठवून येशू एकांकी प्रार्थनेसाठी जातो आणि जेव्हा योग्य वेळ
येते तेव्हा तो त्यांच्याजवळ पाण्यावरून चालत येतो व त्याने बेत केल्याप्रमाणे
दोन्ही गोष्टींची पूर्तता करतो; त्यांचे जीव घेणा-या लाटांपासून प्राण वाचवतो व
त्यांचा अविश्वास घालवून देतो. म्हणूनच जे येशूला ‘भूत’ म्हणत होते तेच काही
क्षणातच त्याला ‘देवाचा पुत्र’ म्हणून संबोधितात.
आपल्या जीवनाच्या
प्रवासातदेखील वादळी वारे सुटतात, त्यांना तोंड देणे आपले कर्तव्य असते कारण आपण
त्या प्रसंगापासून पळ काढू शकत नाही. कधी-कधी आपण होतील ते प्रयत्न करतो परंतु
परमेश्वराचा विचार करीत नाही. स्वतःच्या बळावर सर्व संकटे, दु:खे आपण दूर करण्याचा
प्रयत्न करतो आणि जर का ते नाहीच झाले तर असह्य अवस्थेत सरतेशेवटी देवाकडे धाव
घेतो. मग लागलेच देव म्हणतो, “धीर धरा, मी आहे, भिऊ नका”, हा देव आपल्या
अंतकरणाच्या गाभ्यात आहे, देव आपल्यापासून दूर नाही तर आपण देवापासून दूर आहोत;
परंतु तो आपल्याला कधीच नाकारत नाही. जेव्हा-जेव्हा आपण त्याला हाक देतो
तेव्हा-तेव्हा तो आपल्या मदतीसाठी तयार असतो.
एखादं छोट मुल आपण
जेव्हा हवेत पुन्हा-पुन्हा उडवून त्याला पकडतो तेव्हा त्या बाळाच्या चेह-यावरील
हावभाव काय असतात? ते आनंदी असतं कारण जो उडवतं आहे तो/ती आपणाला पुन्हा पकडेल व
खाली पडू देणार नाही हा त्याचा विश्वास असतो परंतु ज्या मुलाच्या अंगी हा विश्वास
नसतो तो लागलेच रडायला लागतो व त्या कृतीचा तो आनंद घेत नाही. सर्कसमध्ये आपण बघतो
की जे एका दोरीवरून दुस-या दोरीवर उडी मारतात त्यांचा एकमेकांवर विश्वास असतो
म्हणूनच ते हिमतीने व कुठलीही भिती अंगी न बाळगता एकीकडून दुसरीकडे उडी घेतात व
लोकांच मनोरंजन करतात. ह्या दोन उदाहरणांमध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे
‘श्रद्धा’ किंवा ‘विश्वास’. आपला विश्वास जेव्हा बळकट असतो तेव्हा आपल्या अंगी
असलेली सर्व भिती नाहीशी होते कारण प्रभू आपल्याबरोबर असल्याची आपणाला जाण असते.
कधी-कधी आपल्या जीवनाच्या प्रवासात परमेश्वर आपणाला,
पेत्राला विचारल्याप्रमाणे “पाण्यावरून चालून” त्याच्याकडे येण्यासाठी सांगत असतो.
ही गोष्ट कठीण असल्याकारणाने आपण बुडण्याच्या भितीने डळमळतो. परंतु लागलेच मायेने
भरलेला प्रभूचा हात आपणाला वाचवण्यासाठी आपणापर्यंत पोहचतो कारण ‘ज्या प्रभूने
आपणाला पाण्यावरून चालण्यासाठी बोलावले आहे, तोच प्रभू आपणाला पाण्यात बुडू देईल
का?’ तो माझ्यासाठी नेहमी थांबलेला असतो, तो दररोजच्या छोट्या-छोट्या प्रसंगामध्ये
हजर असतो, त्याला फक्त ओळखण्यासाठी आपण कमी पडतो. ज्याप्रमाणे क्रिकेटर किंवा
फुटबॉलपटू चेंडूवरून डोळे सरकवतो व त्याचा नाश होतो, त्याचप्रमाणे आपण देखील जर
आपली दृष्टी त्याच्यावरून हटवली तर आपला नाश होणे अटल आहे. आजच्या ह्या दिवशी
प्रभूकडे विशेष कृपा मागूया की हे प्रभो आमची भिती दूर कर व तू आमच्याबरोबर नेहमी
आहेस हा आमचा विश्वास बळकट कर, आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘प्रभो, आमच्या प्रार्थनेचा स्वीकार कर.
१. ह्या महिन्यातील जे काही पोप महाशयांचे हेतू आहेत ते पूर्ण व्हावेत तसेच
धार्मिक कारभार पाहणा-या सर्व धार्मिक पुढा-यांना प्रभूचे बळ, त्यांच्यात असलेली
सर्व भिती नष्ट व्हावी व त्यांचा विश्वास बळकट होऊन त्यांनी इतरांना देखील त्यांचा
विश्वास वाढवण्यास मदत करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. आज ख्रिस्तसभा वियानी संडे साजरा करीत आहे. धर्मगुरूंचा आश्रयदाता संत जॉन
मारी वियानी ह्यांच्या मध्यस्थीद्वारे आज आपण सर्व धर्मगुरूंसाठी विशेष प्रार्थना
करू या, हे परमेश्वरा त्यांना चांगले आरोग्य दे, सर्व संकटापासून त्यांचे संरक्षण कर
व त्यांनी संत वियानीसारखे पावित्र्याचे जीवन जगून इतरांना देखील पवित्र्यात
जगण्यास मार्गदर्शन करावे ह्यासाठी त्यांना तुझी कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
३. जे लोक निर्वासित आहेत, राजकीय
वादांवरून होणा-या वाईट दुष्परिणामानमुळे ज्यांना शरणार्थी जावे लागत आहे, अश्या
लोकांना दानशूर व्यक्तींनी होईल ती मदत करावी व जगण्यासाठी त्यांना सहारा द्यावा
म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. जगात अशांतता पसरलेली आहे. युद्ध, मारामा-या, आतंकवाद दिवसेंदिवस वाढत आहे.
हे शांतीच्या राजा आमच्या प्रत्येकाच्या जीवनात व कुटुंबात आम्हास शांतीचे दान दे
व ह्याच दानाद्वारे आमच्या समाजात, देशात व संपूर्ण विश्वात शांती आणण्यास आम्हास
मदत व तुझे बळ मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment