Monday, 28 March 2016



Reflection for the homily of Divine Mercy Sunday (03/04/1206) By: Allwyn Gonsalves. 






पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार

दैवी दयेचा रविवार




दिनांक: ०३/०४/२०१६ 
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये: ५:१२-१६.
दुसरे वाचन: प्रकटीकरण: १:९-११,१२-१३,१७-१९.
शुभवर्तमान: योहान: २०:१९-३१.


                     “ न पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.



प्रस्तावना: 

आज आपण पुनरुत्थानानंतरचा दुसरा रविवार साजरा करीत आहोत. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, येशूवरील विश्वास धरणाऱ्याचा समुदाय एक दिलाचा व एकजीवाचा होता, ह्या समुदयात विविध लोक एकत्र आले. आजचे दुसरे वाचन प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतले आहे, आणि ह्या वाचनात आपणाला, संत योहानला झालेल्या येशूच्या प्रकटीकरणाविषयी ऐकायला मिळते. आजच्या शुभवर्तमानात संत योहान, आपल्याला थोमाचे अविश्वासातून विश्वासाकडे झालेल्या परिवर्तनाबद्दल सांगतो.
त्याचप्रमाणे आज आपण दैवी दयेचा (Divine Mercy)  सण साजरा करीत आहोत. दैवी दयेच्या विश्वासात वाढण्यासाठी आपणास संत फॉस्टीना ह्या महान संताची मदत आपल्या दैनंदिन जीवनात होते. संत फॉस्टीना आपणास तिच्या बरोबर, ‘हे येशूमाझी तुझ्यावर श्रध्दा आहे’ अशी प्रार्थना करावयास आव्हान करते. तिच्या जीवनाचे आचारण आपण सतत करावे व ख्रिस्ती श्रध्देत वाढावे म्हणून आपण देवाकडे त्याच्या दयेसाठी प्रार्थना करूया. संत थोमाने येशूला पाहताच, ‘माझ्या देवा! माझ्या प्रभो!’ हे शब्द उच्चारले. जरी तो सुरूवातीला विश्वासात डगमगला तरी नतंर तो ख्रिस्ताचा खरा अनुयायी झाला व ख्रिस्ताच्या शब्दांचा प्रचार सर्वत्र केला. आजच्या शुभर्वतमानात येशू ख्रिस्त आपणास निमंत्रित करून म्हणत आहे, ‘न पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.’ ह्याच पुनरूत्थित ख्रिस्तामध्ये आपला विश्वास सदैव राहून तो आपल्या कार्यात दिसावा म्हणून आपण आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ५:१२-१६.

प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात आपण ऐकतो की, सर्व शिष्य आपली सर्व संपत्ती प्रेषितांच्या चरणाशी ठेवीत व त्यांना काहीही उणे पडत नसे. ह्या पुस्तकात ख्रिस्ती धर्माचा व ऐक्याचा उगम कसा झाला, याबाबत आपणास ऐकायला मिळते. येशूच्या स्वर्गरोह्नानंतर शिष्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना छळ, अडचणी व मनस्ताप सहन करावा लागला. परंतू त्यांची प्रभूवरील श्रद्धा अढळ होती. त्यामुळे हा समुदाय एक मनाचा व एक जीवाचा होता. ख्रिस्ताठायी व ख्रिस्तामुळे त्यांच्यात ऐक्य होते आणि त्यामुळेच त्यांना जगातील कुठलीही शक्ती ख्रिस्तापासून दूर करू शकली नाही.
उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयास असमर्थ आहे (रोमकरांस पत्र ८:३९), ख्रिस्ताने आपल्या जीवनात मृत्यू व पुनरुत्थानाद्वारे सर्वांस एका छ्ताखाली, एक कळप व देवाची लेकरे म्हणून एकत्रित केले. त्यांना काही उणे पडले नाही ते सर्व आनंदित होते, कारण त्यांनी सर्वप्रथम देवाचा व इतरांचा विचार केला. प्रभू म्हणाला होता जेथे दोघे वा तिघे एकत्रित येतात त्यांच्यामध्ये मी हजर आहे”. ख्रिस्ताच्या प्रितीपासून कोण आपणाला वेगळे करील? (रोम ८:३५)

दुसरे वाचन: प्रकटीकरण १:९-११,१२-१३,१७-१९.

संत योहान विश्वासू लोकांना सांगतो की, देवाने त्याला दर्शन दिले व देवाचा अनुभव लिहिण्यास प्रवुत्त केले आहे. संत योहानला ख्रिस्ती समूहास सामोरे आलेल्या अडचणीची जाणीव होती. आम्ही कोणावर विश्वास ठेवावा? व का ठेवावा? ह्या त्यांच्या प्रश्नास संत योहान उत्तर देत म्हणतो की, ‘प्रत्येकजण जी देवाची मुलं  होतो, तो जगावर विजय मिळवतो आणि त्यामुळे आम्हाला जगावर आमच्या विश्वासाने विजय मिळाला. जग तुम्हाला आनंदित करील, प्रसन्न करील परंतू तुमचा आनंद सर्वकाळ टिकणारा नसेल. देवावरील विश्वासाने तुम्ही त्याच्या प्रीतीचा अनुभव घ्या’, अशी शिकवणूक संत योहान देतो.

शुभवर्तमान: योहान २०: १९-३१

      शिष्य भयभीत झाले होते. आपल्या गुरुनंतर आपले काय होईल? ह्या प्रश्नाने त्यांच्या भित्र्या मनात घर केले होते, लपून बसलेले असताना व दरवाजे बंद असताना प्रभू त्यांच्यामध्ये येऊन उभा राहतो व दर्शन देताना म्हणतो, “तुम्हास शांती असो.थोमा हा त्यांच्यामध्ये नव्हता. तो म्हणाला, “त्याच्या हातात खिळ्याचे व्रण पाहिल्यावाचून व खिळे होते त्याजागी आपले बोट घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही”. आपल्या बंधुबरोबर एकत्र न राहिल्यामुळे त्याला पुनरुत्थित येशूला भेटण्याची संधी लाभली नाही.  तरीही विशेषरीत्या येशू, पुन्हा थोमाला दर्शन देतो. थोमाचे हृद्य, प्रीतीने व भक्तीने ओसंडून वाहते म्हणूनच तो उद्गारतो, “माझ्या प्रभू व माझा देवा”. प्रभू भविष्यात येणाऱ्या आपल्या सर्व शिष्यांस उद्देशून म्हणतो की, ह्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत परंतू पाहिल्यावाचून जे विश्वास ठेवतात ते धन्य होत’.
      थोमा हा प्रभू येशूबरोबर अनेक वर्षे होता. त्याने येशूच्या शक्तीचा अनुभव घेतलेला होता. येशूने अनेक चमत्कार केले होते ह्याचा तो साक्षीदार होता. इतकेच नव्हे तर जेव्हा येशूने लाझरसला मरणातून उठविले होते, तेव्हा थोमा इतर शिष्यांना म्हणाला होता की, आपणही येशूबरोबर जाऊ, जेणेकरून आपल्यालाही मरण प्राप्त होईल. परंतू जेव्हा त्याच्या विश्वासाच्या कसोटीची खरी वेळ आली तेव्हा थोमा डगमगला. विश्वास म्हणजे अंधारात विचार न करता मारलेली उडी (leap of faith). येशू आपल्या शिष्यांना जे पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे होते त्यांना धन्यअसे संबोधतो.


बोध कथा:

अर्नाळा ह्या ठिकाणी काही वर्षाअगोदर, एक बोट मासेमारी करण्यासाठी अथांग सागरात गेल्यावर बेपत्ता झाली. पुष्कळ वर्षानंतर अनेक प्रयत्न केल्यावरही त्या बोटीचा काहीही थांगपत्ता लागला नाही. एक स्री जिचा पती त्या बोटीवर होता ती रोज रात्री समुद्रकिनारी जात असे व दूर सागरात एकटक लावून पाहत असे. तिने आपल्या घराचा दरवाजाही कधीही बंद ठेवला नव्हता. तिला अनेकजणांनी समजावण्याचा प्रयत्न केला परंतू सर्व निष्फळ. तिने आशा सोडली नव्हती. तिचा विश्वास होता कि एकदिवस तिचा पती पुन्हा घरी येईल. जेव्हा ती मरण पावली तेव्हा तिच्या ओठावर शब्द होते, “माझे पती आले तर त्यांना सांगा मी त्यांची खुप वाट पाहिली”.
त्या स्त्रीचा विश्वास होता, की तिचा पती जिवंत आहे व एकदिवस तो नक्कीच परत येईल. तिच्या विश्वास आणि प्रीतीमुळे तिने रोज तिच्या पतीला परत येताना पहिले होते. प्रभू उठला आहे व तो आजतागायत जिवंत आहे. त्याला पाहिल्यावर थोमा उत्तरला, “माझ्या देवा, माझ्या प्रभो!”. विश्वास हा अपेक्षित गोष्टीचा भरवसा व अदृश्य गोष्टींची खात्री आहे.

मनन चिंतन:

जेव्हा जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मृतासारखी वागायला लागतात तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलाव लागतंअसं म्हणतात. पवित्र शास्त्रामध्ये आपण तीन प्रकारच्या व्यक्ती पाहतो. पहिले ज्यांनी अदभुत गोष्टी पाहिल्या तरी विश्वास ठेवत नाही. उदाह्र्णार्थ, इजिप्तचा फारो राजा. दुसऱ्या प्रकारच्या व्यक्ती म्हणजे ज्यांनी पाहिल्यावर विश्वास ठेवला. उदाह्र्णार्थ थोमा. ह्या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींपेक्षाही तिसऱ्या प्रकारच्या व्यक्तीमध्ये ज्या व्यक्ती न पाहता विश्वास ठेवतात त्यांचा समावेश होतो आणि त्यांनाच प्रभू धन्यअसे संबोधतो. नोहाने परमेश्वराची वाणी ऐकली त्याने पाहिले नव्हते तरी त्याने विश्वास ठेवून बोट तयार केली. आब्राहमला भविष्याची कल्पना नसून सुद्धा त्याने देवावर विश्वास ठेऊन आपले घरदार सोडले.
      जर थोमाने शिष्याची साक्ष ऐकून विश्वास ठेवला असता, तर कदाचित त्याचा विश्वास महान असा गणला गेला असता. कारण थोमाने अनेक वेळा प्रभूकडून ऐकले होते की, मानवाच्या पुत्राला जीवे मारले जाईल आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल. मेलेल्या लाझरसला प्रभूने कसे उठविले ह्याचाही तो साक्षीदार होता. थोमाला मसीहाजो तारणारा येणारा होता त्याला अनेक दु:खाना सामोरे जावे लागणार होते हे पवित्र शास्त्राद्वारे माहित होते; परंतू थोमाला आपल्या इंद्रियांनी अनुभव घेऊन विश्वास ठेवायचा होता. थोमाला वाटले होते की, तो बरोबर वागत होता व विश्वास ठेवण्यासाठी आपल्या इंद्रियांनी अनुभव घेणे गरजेचे आहे हे त्याला वाटत होते.
      श्रद्धा ही सामर्थ्यवान असते. श्रद्धेचा घटक आपल्यात असल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. प्रभू जिवंत असताना सर्व शिष्यांची श्रद्धा प्रभू येशूवर होती. प्रभूपुढे प्रश्न होता अखिल मानवजातीचा. प्रश्न होता चिरंतन अशा अंतिम सत्याचा. प्रश्न होता अगणित कुंभ धारण करून राहणाऱ्या अमर आत्मत्वाचा. जगातील अंतिम व कधीही न बदलणारं शाश्वत सत्य आहे; कुणालाही त्याचा अनुभव आपल्या विलासी रंगमहालात राहून कधीच घेता येणार नाही. केवळ जगायचं या शुद्ध लोचट आसक्तीला, पाण्यातील हत्तीला मगर चिटकतो तस चिटकून त्याचा प्रत्यय कुणालाही कधीही घेता येणार नाही. त्यासाठी जशी दिवसामागून रात्र असते तसा जीवनामागून मृत्यू असतो याचा शरीरातील पेशीपेशींना दाट आणि अमळ परिचय व्हावा लागतो. मन, शरीर, बुद्धी सर्व निकोप आत्मनिर्भर व्हावं लागत. मग सत्य कुणी दुसऱ्यानं सांगाव लागत नाही, पटवून द्यावे लागत नाही तर ते आपोआपच शरीर-शरीरातून प्रकटून पावू लागतं. मुक्ती किंवा सर्वश्रेष्ठ आत्मानुभव हे कधीही विचारून, विकत घेऊन किंवा भिक्षा मागून मिळणारी वस्तू नव्हे.
आपला विश्वास हा आपल्या अंत:कणातून असावा लागतो. ज्याप्रमाणे दुसऱ्यांनी अन्न खाऊन आपली भूक कधीच शमत नाही किंवा दुसऱ्यांनी पाणी प्राशन केल्याने आपली तृष्णा कधीच शमत नाही, अगदी त्याचप्रमाणे कुणाच्याही केवळ उपदेशामुळे कुणाचाही कधीच उध्दार होत नसतो. जिथं जिथं जीवन असत तिथं तिथं प्रकट करण्याची अनावर ओढ असते. मुक्तीची तळमळ असते. बाहेरून ती दिसत नसेल, पण आतून हे कार्य अखंडितपणे चाललेलं असत म्हणून जीवन म्हणजेच प्रकटनअसे आपण म्हणू शकतो.
कधी कधी या प्रकटनाचा प्रलख्ख देखावा मानवजातीपुढे यावा लागतो; कारण ग्रंथ, उपदेश नितीत्व आणि साक्ष यापलीकडे जाऊन ती आसक्त झालेली असते. जगात दृश्य वस्तूंच्या पलीकडे आणखी काही सूक्ष्म जगत आहे हे पहायलाही तिला अवसर नसतो. थोमाच्याही मनात युद्ध त्यामुळेच पडलं होत. त्याला व शिष्यांना भय वाटत होते, परंतू येशू त्यामध्ये येऊन म्हणतो, “तुम्हास शांती असो”.
एकदा भय संपले की, जो प्रदेश लागतो त्यालाच मुक्ती असे म्हणतात’. अनेकदा आपणही जीवनात असा अनुभव घेतो. धीर गळून पडतो. समोर मार्ग दिसत नाही. प्रभो समोर असला तरीही आपण खोल गर्तेत रुतलेलो असतो. संत कबीर म्हणतात, “आगे थे सदगुरू, दीपक दया हाथी.गुरु नेहमीच आपल्या समोर काळजाचा दिवा लावून असतो, तो आपलं आयुष्य उजळवत असतो. दुःखाचा प्याला तो अगोदर पीतो आणि स्वतःच्या आयुष्याची खंडणी भरुन तो उभा असतो. बऱ्याचदा आपणालाही थोमाप्रमाणे प्रभू जो आपल्या सामर्थ्याचा मूळस्त्रोत आहे त्याचा विसर पडलेला असतो. आपणही शंका घेतो व शंका भयाचे कारण ठरते.
थोमा आपल्या बुद्धीद्वारे आपल्या इंद्रियांचा अनुभव घेवून प्रभूचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होता. प्रभू त्याच्या सर्व शिष्यांना म्हणतो, “तुम्हास शांती असो”. संत पौल लिहितो, “सर्व बुद्धीच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमची अंतःकरणे व तुमची मने ख्रिस्त येशूच्या द्वारे राखील (फिलीपैकरांस पत्र ४:७) व शांतीचा देव तुम्हाबरोबर राहील (४:९).
प्रभू म्हणतो, “माझी शांती मी तुम्हांला देतो, तुमचं मन अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा भयभीत होऊ देऊ नका” (योहान १४:२७). प्रेम मानवाला स्वतःच्या पलीकडे पाहण्याची शक्ती देतो म्हणून ते प्रेम खरखुरं असावं. ते हृदयाच्या गाभाऱ्यातून उमलायला हवं. प्रिती कोणत्याही भीतीतून किंवा दुःखातून मुक्त होण्याचा सहज सुलभ मार्ग आहे.
आपल्या विश्वासाने आपल्या जीवनाला खऱ्या प्रेमाने अर्थ येतो. व हा विश्वास अपेक्षित गोष्टींचा भरवसा व अदृश्य गोष्टींची खात्री असा आहे’ (इब्री ११:१).

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमची पुनरुत्थित ख्रिस्तावरील श्रद्धा दृढ कर.
१. आपले परमगुरु पोप फ्रान्सीस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या विश्वासपूर्वक पार पाडाव्यात आणि लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
२. जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आणावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, त्यांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. शांती निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी आज जगभरात अनेक संघटना कार्यरत आहेत, त्यांच्या कार्यात प्रभूचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी तसेच प्रत्येक सदस्यातील बंधुभावाची भावना वृद्धिंगत होऊन एकमेकांतील जवळीकता वाढावी म्हणून आपण प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment